१७ – यांगत्से क्रूझ : व्हाईट एंपरर सिटी, कुतांग गॉर्ज व शेनाँग स्ट्रीम

Submitted by इस्पीकचा एक्का on 29 December, 2014 - 01:30

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

सफरीच्या एकोणिसाव्या दिवशीची सकाळ जरा गडबडीची होती. कारण आज किनारपट्टीवरून फेरफटका मारून करायच्या दोन सहली होत्या. पहिली सहल तर सकाळी ७:३० लाच सुरू होणार होती. म्हणजे त्या अगोदर न्याहारी वगैरे करून तयार होणे भाग होते. सेंचुरी स्कायवाल्यांनी नको नको म्हणाल अशी गच्च इटिनेररी बनवली होती. पण आम्हीही मागे न राहता त्यांचा एकही कार्यक्रम न चुकवण्याचा पण केला होता ! सगळे आटपून ७:२० लाच लॉबीमध्ये हजर झालो. आमचा बहुतेक सगळा इंग्लिश बोलणारा गट जमा झाला होता. उरलेल्यांना आमच्यातल्या उत्साही मंडळींनी फोनाफोनी करून हलवले. तरी दोनएक मंडळी गळलीच. शेवटी फार उशीर नको म्हणून जमलेले सर्व गाइडच्या आधिपत्याखाली सफेद सम्राटाच्या शहरावर (व्हाईट एंपरर सिटी) स्वारी करायला निघालो.

बोट फेंगी नावाच्या गावाला थांबली होती. बोटीवरून तराफ्यांवर उतरलो तर समोर उंच किनार्‍यावर जायला दोन एस्कॅलेटर्स ! एस्कॅलेटर असलेला घाट प्रथमच पाहिला.

घाट चढून गेल्यावर थोडे उजवीकडे चालल्यावर फेंगी गावाचे जुन्या घाटावरचे प्रवेशद्वार दिसते. नवीनं एस्कॅलेटरवाला घाट बांधल्यामुळे आता जुन्या घाटाचा उपयोग फक्त प्रवाशांनी फोटो काढण्यापुरता आहे. पण याचा आकार व बांधणी बघून फेंगी बंदराच्या गतवैभवाची कल्पना येते.

गोंगशून शू नावाच्या एका सरदाराने पश्चिम हान राजघराण्याच्या (इ.पू. २०६ ते इ. २४) शेवटच्या काळात बंडाळी करून आपले स्वतंत्र राज्य स्थापले आणि स्वतःला शू जमातीचा राजा म्हणून घोषित केले. त्या सुमारास फेंगीजवळच्या बायदी नावाच्या पर्वताच्या कड्याच्या आधारे वर जाणार्‍या पांढर्‍या धुक्यामध्ये त्याला ड्रॅगनचा आकार दिसला. त्यावरून त्याने स्वतःला पांढरा सम्राट आणि त्या डोंगरावर वसवलेल्या त्याच्या राजधानीचे पांढर्‍या सम्राटाचे शहर (व्हाईट एंपरर सिटी) असे नामकरण केले.

आता या राजधानीच्या ठिकाणी फक्त एक मंदिरांचा समूह उरला आहे... आणि त्यांच्याशी जोडलेल्या लोककहाण्या. मात्र यांगत्सेच्या काठावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचे सामरिक व राजकीय महत्त्व चिनी इतिहासात फार मोठे होते. यांगत्सेच्या खोर्‍यातील अनेक महत्त्वाच्या लढाया या जागेच्या आसपास झाल्या. पर्वतावरून नदी आणि तिच्या परिसराचे छान विहंगम दृश्य दिसते. पूर्वीचे खूप उंच डोंगर व कडे आता थ्री गॉर्जेस धरणाच्या पाणीसाठ्यामुळे जरासे कमी उंचीचे दिसतात. बायदीचा बराचसा परिसर पाण्याखाली गेला आहे. देवळांची जागाही तीन बाजूंनी पाण्याने वेढली गेली आहे.

फेंगीहून व्हाईट एंपरर सिटीच्या प्रवेशद्वारापर्यंत बसने साधारण २५-३० मिनिटात पोचलो.

ह्या प्रवेशद्वारापासून पाण्याने वेढलेल्या मंदिर समूहापर्यंत जायला एक जुन्या पद्धतीचा लाकडी पूल आहे.

.

शहराच्या आवारात सर्वप्रथम सम्राटाचा नाही तर एक झुगे लिआंग नावाच्या त्याच्या एका जनरलचा पुतळा आपले स्वागत करतो... असे का याचे कारण थोडे पुढे गेल्यावर समजेल.

वाटेत एक चिनी इंग्लिशचा एक नमुना दिसला

याचे सुगम इंग्लिश भाषांतर आहे, "Keep off the grass".

डोंगराच्या चढणीच्या अर्ध्यावर गेल्यावर यांगत्सेचा कुतांग पास हा चिंचोळा प्रवाहमार्ग दिसू लागतो. या खिंडीसारख्या जागेच्या सौंदर्याचे वर्णन चिनी कवितांत फार प्राचीन काळापासून केले गेले आहे. सध्या धरणामुळे पाण्याची पातळी जवळ जवळ १५०+ मीटरने वर आली आहे तरीसुद्धा ९० अंशातल्या कड्यांच्या मधल्या चिंचोळ्या दरीतून वाहणारा यांगत्सेचा ओघ स्तिमित करतो. जेव्हा धरण नव्हते तेव्हा १५० मीटर अधिक उंचीचे ते कडे आणि त्यातून वाहणारा यांगत्सेचा खळाळता ओघ नक्कीच जास्त चमत्कारपूर्ण दिसत असणार. शेकडो वर्षे त्यावर अनेक प्रसिद्ध कविता केल्या गेल्या आहेत.

कुतांग पासच्या चित्राला १० युवानच्या नोटेवर स्थान मिळाले आहे.

नंतर बोट याच मार्गावरून पुढे जाणार होती तेव्हा कुतांग पास आणि त्याच्या पुढचा नयनमनोहर भाग जवळून बघायची संधी होती.

डोंगरमाथ्यावर गेल्यावर किल्ल्याच्या दरवाज्यासारखे पण कलापूर्ण सजावट केलेले शहराचे प्रवेशव्दार दिसते.

शेजारच्या झाडीतून सम्राटाचा ड्रॅगन "कोण आहे रे तिकडे" अशी डरकाळी फोडताना दिसतो.

ही जागा जुन्या राजधानीची अवशेष यापेक्षा फारच वेगळ्या कारणामुळे सर्वसामान्य चिनी मनात मानाचे स्थान पटकावून बसलेली आहे. शू राजघराण्यातला एक लिऊ बेई नावाचा राजा शेजारच्या वू राज्याबरोबर झालेल्या लढाईत हरला. तशात तो आजारी पडला. राजाची दोन मुलेही लहान होती. तेव्हा याच जागेवर त्याने मरण्यापूर्वी आपला पंतप्रधान झुगे लिआंग याच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवला आणि असेही सांगितले की जर ह्या मुलांपैकी एकही राजा बनण्यास पात्र ठरू शकला नाही तर झुगेने स्वतः राजसत्ता ग्रहण करावी. झुगेने साम्राज्याची काळजी तर उत्तम प्रकारे वाहिलीच पण राजपुत्रांना राज्यकारभाराचे उत्तम शिक्षण देऊन त्यातल्या मोठ्याचा योग्य वयात येताच राज्याभिषेक केला. त्याच्या अशा अलौकिक स्वामिभक्ती व प्रामाणिकपणामुळे आजही या परिसरातले झुगेचे शिल्प असलेले मंदिर हे सर्वात जास्त पूजनीय समजले जाते. त्या मंदिरातले हे वरील प्रसंगाचे शिल्प... मृत्युशैय्येवर असलेल्या राजाजवळ पंखा घेऊन उभा आहे तो पंतप्रधान जनरल झुगे लिआंग आणि त्यांच्या समोर ते दोन लहान राजपुत्र गुडघ्यावर बसून आदर प्रदर्शित करत झुकलेले आहेत.

आता जरा तिकडे गेलो होतोच तर दोन चिनी जनरल्सच्या आग्रहाखातर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना दोन युक्तीच्या गोष्टी सांगून आलो +D !

देवळांच्या परिसरातले बैलावर आरूढ झालेल्या युवतीचे शिल्प.

परत येताना वाटेत एक चिनी स्पेशियालिटी स्टोअर लागले… अर्थातच फार धाडस न करता पुढे निघालो...

बोटीवर परत येऊन अर्धा तास झाला असेल तेवढ्यात घोषणा झाली की सिचुआन राज्याची प्रसिद्ध पाककृती "हॉट पॉट" चे प्रात्यक्षिक बोटीचा खानसामा पाचव्या डेकवर करणार आहे. गाईडने हॉट पॉट ची बरीच स्तुती केली होती तेव्हा त्याबाबत कुतूहल होतेच. हा केवळ येथील लोकांचा एक आवडता पदार्थच नाही तर पडसे-खोकल्यावरचा रामबाण उपायही समजला जातो. डेकवर पोचलो तर बल्लवाचार्य सगळी सामग्री घेऊन तयार होते.

एका बशीत काही चिकनचे तुकडे आणि काकडी, गाजर, कांदा वगैरे भाज्याचे मोठे तुकडे ठेवलेले होते. तर दुसर्‍या बाजूला लसूण आणि मिठाची भांडी सोडून इतर पाच भांड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मिरची असलेले मसाले होते. खानसाम्याने ते सर्व मसाले पाच सहा डाव तेलामध्ये चांगले परतून घेतले आणि मग त्यांत सगळ्या भाज्या एकवेळेसच टाकल्या आणि थोडे पाणी टाकून एक उकळी आणली. हा... काय तिखट सूप बनले आहे इतके जनता म्हणते इतक्यात खानसाम्याने ते सर्व एका मोठ्या पातेल्यात ओतले. टेबलाच्या एका बाजूवर मसाल्याच्या १०-१५ पिशव्या ठेवल्या होत्या. एवढ्या सगळ्या पिशव्या नक्कीच जाहिरात करायला असाव्या ठेवलेल्या आहेत असा माझा कयास होता.

... पण खानसामा एक एक पिशवी जशी पातेल्यात रिकामी करायला लागला तसतसे सगळ्यांना ते सूप न पिताच नाकतोंडातून धूर येणे म्हणजे काय याचा प्रत्यय येऊ लागला +D ! हे आहे त्या पाकृ चे अंतिम देयक (final product).

अर्थातच खानसाम्याने "सर जरा घ्या दोन घोट चाखायला" असे म्हणण्याच्या अगोदर तेथून बाहेर पडलो. आणि ते फायद्याचेच झाले, कारण बोट कुतांग गॉर्जच्या नयनमनोहर प्रवेशव्दाराजवळ पोचली होती. जे कडे अगोदर एका पर्वतावर उभे राहून पाहिले होते ते जवळून नदीतून सफर करताना कसे दिसतात हे पाहण्याची उत्कंठा होतीच.

हे आहे कुतांग गॉर्जचे प्रवेशद्वार.

.

दरीतून वेगाने वाहणार्‍या यांगत्सेच्या नागमोडी प्रवाहाच्या बाजूला असंख्य वेडेवाकडे पसरलेले उंच कडे आहेत. कित्येकदा तर प्रवाह इतका चिंचोळा होतो आणि बहुतेक बोट पुढे जाऊ शकणार नाही किंवा नक्कीच पुढून येणार्‍या बोटीला घासेल असे वाटते.

.

पण बोटींचे कप्तान एकमेकाला भोंग्यांच्या आवाजाचे इशारे देत मोठ्या कौशल्याने बोटी पुढे काढत होते. डोंगरांच्या रांगांतून मध्येच अचानक एखादे निसर्गरम्य परिसरात बसलेले गाव दिसत होते...

तर कधी या सर्व निसर्गात उठून दिसणारे आणि चीनच्या सांपत्तिक स्थितीची आणि विकासाची जाहिरात करणारे शहर दिसत होते.

तास-दीड तासाने बोट बादोंग नावाच्या बंदरात उभी राहिली.

येथून आमची शेनाँग नावाच्या यांगत्सेच्या उपनदीची सफर सुरू होणार होती. या सफरीत अगदी लहान आकाराच्या पाण्याच्या ओघातून पण पहिल्या एवढ्याच उंच दर्‍यांमधून प्रवास करायचा होता. प्रथम आमच्या बोटीवरून आम्ही एका मध्यम आकाराच्या बोटीवर गेलो. जसजशी बोट पुढेपुढे जाऊ लागली तसे कडे जवळ येऊ लागले आणि त्यांची टोके बघताना प्रवाशांच्या टोप्या खाली पडू लागल्या !

.

.

एका कड्यावर असलेल्या घळीकडे इशारा करून गाईडने या भागाचे विशेष असलेल्या "टांगत्या शवपेट्या" (hanging coffins) दाखवल्या. प्राचीन काळात या भागांत राहणार्‍या जमातीतील राजे, जनरल अथवा इतर फार सन्माननीय लोकांच्या शवांना प्रथम इतरांसारखेच पुरत असत. पण दोनतीन वर्षांनंतर त्यांच्या अस्थी उकरून काढून त्या एका सुंदर लाकडी शवपेटीत ठेवत असत आणि ती शवपेटी एका शेकडो मीटर उंच कड्याच्या घळीत लाकडांच्या मदतीने टांगून ठेवत असत. शेकडो / हजारो वर्षे ही प्रथा पाळली जात होती. अश्या शेकडो शवपेट्या शेनाँग नदीच्या काठावर जमा झाल्या होत्या. आलिकडच्या काळात धरणामुळे नदीची उंची वाढल्याने आणि अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने या शवपेट्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले तेव्हा उरलेल्या बहुतेक पेट्या संग्रहालयात हलवल्या आहेत. प्रवाश्यांना मूळ जागी बघता याव्या यासाठी दोनतीन जागी मात्र तेथेच ठेवल्या आहेत. त्यातली ही एक जागा...

थ्री गॉर्जेस धरण बांधण्यापूर्वी या कड्यांची उंची आता दिसते त्यापेक्षा साधारण १५० मीटर जास्त होती. ह्या इतक्या जड आणि अनेक शतके शाबूत राहणार्‍या शवपेट्या कशा बनवल्या जात असत आणि इतक्या उंचीवर चढवून कश्या टांगल्या जात असत हे गूढ अजूनही उकललेले नाही.

दुर्गम भागांतही चाललेली विकासाची कामे मधूनच दिसत होती.

साधारण ४५ मिनिटांनी एक नदीच्या मध्यात बांधलेले बोटींग स्टेशन आले

आम्ही पायउतार होऊन स्टेशनच्या पलीकडे गेलो तेथे वल्ह्यांनी चालवायच्या लहान आकाराच्या होड्या आमची वाट पाहत होत्या.

अगदी वीस वर्षे अगोदर पर्यंत या होड्या या परिसरात माणसांची आणि सामानाची वाहतूक करण्याचे दळणवळणाचे मुख्य साधन होत्या. येथून पुढे आम्हाला त्या काळाचा अनुभव घ्यायचा होता.

.

.

आमची गाईड स्थानिक तुजीया जमातीची होती. तिने आजूबाजूच्या भागांत राहणार्‍या लोकांच्या चालीरीती आणि कहाण्या तिच्या खास विनोदी शैलीत सांगून सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. तिचे मूळ स्थानिक नाव होते "माऊ" म्हणून "मला इंग्लिशमध्ये किट्टी म्हणालात तरी चालेल" असे म्हणाली. तिचे इंग्लिशही उत्तम होते... इतके चांगले की ब्रिटिश प्रवाशांनी "इंग्लिश कुठे शिकलीस?" असे विचारले ! तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने कोणताही कोर्स वगैरे न करता गेल्या काही वर्षात प्रवाशांबरोबर बोलून भाषा आत्मसात केली होती !

धरण बांधण्यापूर्वी नदीच्या शेवटच्या भागात शेनाँगचा प्रवाह फार उथळ आणि खळखळता होता. इतका की त्यातून होड्या वल्हवणे शक्य नव्हते. काही जण काठावरून बांबूच्या दोरीने होडी ओढत असत आणि बाकीचेही बोटीतून उतरून बोटीला (आपण बंद पडलेल्या चारचाकीला जसे ढकलतो तसे) ढकलत असत. शेकडो वर्षे ही पद्धत वापरून व्यापारउदीम व वाहतूक केली गेली. साहजिकंच या पद्धतीवर आधारलेल्या अनेक लोककथा आणि कविता आहेत. सध्या या भागात पाण्याची पातळी १०० मीटरपेक्षा जास्त वर आल्याने त्या संबंद्धीचे प्रात्यक्षिक जुन्या काळातील लोकांना सहन कराव्या लागणार्‍या कष्टांची नीट कल्पना देत नाही.

हे संग्रहालयातले एक शिल्प वस्तुस्थितीच्या जवळपास आहे. बांबूची दोरी ओढताना कपडे अंगाला घासून कातडीला इजा होत असे म्हणून हे काम संपूर्ण नग्न होऊन करत असत !

परत येताना पूर्वीचाच प्रवास उलट दिशेने करत असताना म्याऊने एक लोकगीत तिच्या सुंदर आवाजात गावून दाखवले. जवळजवळ तीन तास चाललेल्या या सफरीचा वेळ कसा संपला ते कळलेच नाही. बोटीवर परतताना बादोंग शहराचे झालेले हे दर्शन.

आज बोटीवर परतल्यावर चिनी ड्रॅगन्सनी शीतपेय देऊन जरा जोरातच स्वागत केले कारण आज कॅप्तानाची निरोपाची मेजवानी (captain’s farewell dinner) होती.

आतापर्यंत नेहमी बुफे जेवण होते पण आज अगदी राजेशाही पद्धतीने बसून "सिक्स कोर्स डिनर" होते. खानसाम्यांनी त्याच्या कौशल्याची चुणूक दाखवत मस्त पदार्थ केले होते. एका स्वागतिकेने टेबलावर येऊन तुमच्यासाठी रोस्ट बीफ ऐवजी रोस्ट पेकींग डक किंवा माश्याचा एखादा पदार्थ यातले काय हवे असे विचारले. अर्थातच मी डक पसंत केले... मांसाहारी असलात तर हा चिनी पदार्थ जरून खाऊन पहा. हा मला आवडलेल्या पदार्थांपैकी एक आहे. सेंचुरी स्कायने त्यांच्या व्यावसायिक कौशल्याची अजून एक चुणूक दाखवली... जेवणाच्या सुरुवातीला एक घोषणा करून हॉलमधले सगळे दिवे बंद केले. आम्ही सर्व आता काय होते याची चर्चा करू लागलो तेवढ्यातच ट्रॉलीवरून एक मोठा केक आणला, दोन स्त्री प्रवाश्यांना आमंत्रित केले आणि मोठ्या संगीताच्या तालावर जाहीर केले की आज त्या दोघींचा वाढदिवस आहे तर सर्वांनीच त्यांचे अभिनंदन करावे. मग अर्थातच "हॅपी बर्थ डे टू यू" हे गाणे झाले. सर्व प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे बोटीच्या स्टाफच्या आवाजात आवाज मिळवून ते गाणे गायले नसते तरच आश्चर्य ! त्यातली एक स्त्री तर रडायलाच लागली, म्हणाली, "आजपर्यंत माझा वाढदिवस कोणीच साजरा केला नव्हता. आता कितीही समृद्धी आली आणि कितीही वाढदिवस साजरे केले तरी हा सोहळा मी कधीही विसरणे शक्य नाही." या एका प्रसंगाने कप्तानाच्या पार्टीचा रंगच बदलून टाकला.

आज सेंचुरी स्कायने बरीच भागंभाग करवली होती, त्यातच खास मेजवानी... जेवण अगदी अंगावर आले ! खोलीवर येऊन उद्याच्या थ्री गॉर्जेस धरणाच्या भेटीची आणि महानगरी शांघाईची स्वप्ने पाहत झोपी गेलो.

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users