ड्रॅगनच्या देशात १४ - ली आजीची भेट, मास्टर यांग ची शाळा आणि चेंगदूचे जायंट पांडा केंद्र

Submitted by इस्पीकचा एक्का on 23 December, 2014 - 06:28

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

आज सहलीचा चौदावा दिवस. न्याहारीकरता चवथ्या मजल्यावरच्या रेस्तरॉमध्ये आलो. डायनिंग हॉलची एक बाजू संपूर्ण काचेची होती. सकाळचा नजारा जरा नीट बघवा म्हणून काचेचाच दरवाजा ढकलून छोटेखानी टेरेसवर आलो आणि वेगळ्याच यांगशुओचे दर्शन झाले. अजूनही धुक्यात बुडालेल्या चित्रविचित्र टेकड्या, गर्द झाडीत बसलेली घरे, थोडेसे दूर असलेले तळे, अजून निर्मनुष्य असलेले रस्ते आणि हॉटेलसमोरचे छोटे पटांगण...काल बघितलेल्या गर्दीने भरलेल्या यागशुओपेक्षा हे चित्र वेगळे होते.

न्याहारी करून लॉबीत आलो. आज सकाळी एका खेडेगावाला भेट द्यायची होती. हे नेहमीचे प्राचीन गाव वगैरे नव्हते. यांगशुओ जवळचे ऐशान नावाचे छोटेसे खेडे होते. मी त्याचे नाव अगोदर ऐकले नव्हते आणि गुईलीन शेजारच्या खेडेगावात जसा भ्रननिरास झाला तसा इथे होऊ नये असे काहीसे भाव माझ्या बोलण्या-चालण्यात आले असावेत. कारण गाइड स्वतःहून म्हणाला की या वेळेस तसं काही होणार नाही याची खात्री बाळगा. प्रसिद्ध नसलेले खरेखुरे चिनी गाव पाहण्याची मलाही उत्सुकता होतीच.

आज कारमधून नाही तर ओपन एअर मिनी बसमधून जायचे होते. येवढ्या लांब नावाचे हे वाहन म्हणजे काय प्रकरण आहे ते लवकरच कळले.

ही बस या भागातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे... साधारण आपल्याकडच्या १०-१२ सीटच्या रिक्शासारखी. आमचा ऐशानच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पाच मिनिटात आम्ही यांगशुओ गावाच्या बाहेर पडलो. नीटस, चकचकीत रंगीत घरे, गुळगुळीत आखीवरेखीव रस्ते मागे पडले होते आणि एका वेगळ्या जगाची सुरुवात होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस शेतजमीन आणि बांबूची बेटे दिसायला लागली. नऊ वाजले होते तरी अजून धुके कमी झाले नव्हते. तरीसुद्धा त्यातून डोकावत जवळच्या टेकड्या त्यांचे वेगवेगळे आकार दाखवीत खुणावत होत्या.

.

जरा पुढे गेल्यावर एक छोटीशी वस्ती लागली. आधुनिक चारचाकी सोडल्यातर भारताच्या खेडेगावांची आठवण झाली.

.

वाटेत एक नदी लागली आणि दृश्य पाहून गाडी थांबवायला सांगितली. नदीचे नितळ स्वच्छ पाणी, दोन्ही काठांवर गर्द हिरवी झाडी आणि कपडे धुणाऱ्या स्त्रिया. चित्रातली नदी अजून किती वेगळी असते? भारतापेक्षा येथे फरक म्हणजे स्त्रिया शर्ट-पँट घालून होत्या आणि झाडी जरा जास्त मनमोहक वाटली.

जसे ऐशान जवळ येऊ लागले तसे यांगशुओ काउंटीचे सौंदर्य परत खुलायला लागले. भाजीपाल्याची लागवड आणि भातशेती दिसायला लागली.... आश्चर्याची गोष्ट अशी की एखाद्या शेतात भात कापून माळणीसाठी रचून ठेवलेले होते तर पालीकडल्या शेतात नुकतीच लावणी झालेली दिसत होती ! आणि अर्थातच सगळीकडे पार्श्वभूमीवर एकापेक्षा एक विचित्र आकाराच्या टेकड्या होत्याच.

.

.

थोड्याच वेळात गाडी एका बर्‍या दिसणार्‍या घरासमोर उभी राहिली. गाइड म्हणाला, "चला तुम्हाला चिनी खेडेगावातले पारंपरिक घर दाखवतो."

गाडीतून उतरतो तर घराच्या अंगणाच्या कोपऱ्यात एक वृद्ध बाई खाली बसून काहीतरी जाळताना दिसली. गाईडकडून कळले की कर्मधर्मसंयोगाने तो पूर्वजांच्या स्मरणाचा दिवस होता. गाईडला म्हणालो, "जे चालले आहे त्यात खंड पाडू नकोस. सगळा कार्यक्रम यथासांग पार पडू दे." यात जेवढा त्या स्त्रीला त्रास न देण्याचा विचार होता तेवढाच तो चाललेला सोहळा बघायची अचानक आलेली संधी सोडायची नव्हती हा विचारही होता !

एका बांबूच्या मोठ्या टोपलीवर बांबूचीच परात आणि परातीत तीन वाडग्यांत भात, तीन छोट्या कपांत चहा, एका बशीत डुकराच्या मांसाचा तुकडा, पाण्याची बाटली, एक चिलीम, तंबाखूची पिशवी आणि चिनी फटाक्यांच्या माळा होत्या. आजीबाई कसले तरी पेपर जाळीत होत्या.. त्यांना पेपर मनी म्हणतात. असे जेवण, चहा, पाणी व तंबाखू अर्पण केला आणि खास ठसे उमटवलेले पैशाचे कागद जाळले म्हणजे हे सर्व पूर्वजांना ते जेथे कोठे असतील तेथे मिळते अशी समजूत आहे. शेवटी फटाके वाजवले आणि जेवण कावळ्यांना न देता घरात परत नेले. थोडाफार फरक सोडला तर ही आपल्याकडची सर्वपित्री अमावास्याच !

आजीचं नाव ली फुंग यींग. वय वर्षे ७५+. सडपातळ आणि एकदम टुणटुणीत. हसरा चेहरा आणि मायाळू स्वभाव. मनमोकळेपणाने हसून स्वागत केलं आणि बरोबर फिरून आपलं सगळं घर दाखवलं. घर तसे काही फार मोठे नव्हते पण आजूबाजूच्या घरांपेक्षा थोडे मोठे दिसत होते. बाहेर बांबूच्या टोपल्या, टोप्या आणि इतर बरेच सामान आडव्या बांबूंवर टांगून ठेवलेले होते.

घराबाहेरच्या अंगणात जरा उंचावर दगडी पिंडीसारख्या आकारावर एक दगडी जाते होते. हे कशाला असे विचारल्यावर आजीने त्याचा सोयाबीनचे दूध काढायला कसा उपयोग करतात ते प्रात्यक्षिकासह दाखवले. आम्हीही थोडाबहुत हात चालविण्याचा प्रयत्न केला. नवीन पिढीतल्या गाईडच्या आणि माझ्या कौशल्यात फार फरक नव्हता +D ! पण ७५+ वयाच्या आजीने ते जाते असे काय चालवले की आम्हा दोघांना लाज वाटावी.

मग आजीने घरात यायचे आमंत्रण दिले आणि खेड्यातील चिनी घर कसे असते ते दिसले. मोजक्याच जुन्या लाकडी वस्तू... एक बाकडे, दोन आरामखुर्च्या आणि आजी एकटीच राहत असल्याने वापरात नसलेल्या व एका बाजूला एकमेकावर रचलेल्या लाकडी खुर्च्या. त्याचा विरुद्ध बाजूच्या भिंतीलगत एक अर्ध्या उंचीची कॅबिनेट, तिच्यावर फ्लॅट स्क्रीन टीव्ही, त्याच्या दोन्ही बाजूनं जरासे वर भिंतीवर चाओ-माओ यांचे फोटो. एका बाजूला पोर्टेबल पंखा आणि वॉटर कूलर-डिस्पेनसर. एका टेबलावर लोणच्यासारख्या पदार्थांनी भरलेल्या काही बरण्या आणि असेच छोटेमोठे समान होते. मुलांनी भेट दिलेला नवा फ्रीज एका कोपऱ्यात दिमाखाने उभा होता. बाजूच्या एका लहान खोलीत झोपण्यासाठी एक लाकडी पलंग होता. झाले, आजीच्या सामानाची यादी संपली.

.

.

.

आजोबा फार पूर्वीच निवर्तले होते. दोन्ही मुलांची लग्ने होऊन ती फार दिवसापासून शहरातच राहत असतात आणि वर्षांतून एकाद्या वेळेस आजीला भेटायला येतात. हीच परिस्थिती चीनमध्ये बहुतेक खेड्यांची आहे. तरुण शहरात काम शोधण्यासाठी जातात आणि खेड्यात बहुतेक वृद्ध लोकच बहुसंख्येने उरतात. जसे आपल्या कोंकण आणि मुंबईचे आहे तसेच समीकरण चिनी खेडी आणि शहरांचे आहे.

बाकाच्या मागच्या भिंतीवर चिकटवलेली नातवंडांनी काढलेली चित्रे आणि दुसऱ्या एका भिंतीवर चिकटवलेल्या नातवंडांच्या शाळा व हायस्कूलच्या सर्टिफिकेट्सच्या प्रती आजीने मोठ्या अभिमानाने दाखवल्या तेव्हा शब्द कळले नाही तरी आजीचा जरासा कातर झालेला आवाज कानांना जाणवला.

.

मुख्य घराच्या बाजूलाच दोन छोट्या इमारती होत्या. त्यांतली एक म्हणजे आजीचे स्वयंपाकघर. बैठकीच्या खोलीत डामडौल नसला तरी एक प्रकारची टापटीप होती, स्वच्छता तर होतीच होती. त्यामानाने इथे अस्ताव्यस्तपणा जाणवला, स्वच्छताही तितकीशी दिसली नाही.

त्याच इमारतीच्या दुसर्‍या खोलीत आजी तिच्या पाळलेल्या डुकरांसाठी खाणे बनवते... डुकरांना शिजवलेले जेवण देतात ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकली !

आणि हे ते आरामात पहुडलेले भाग्यवान प्राणी ! त्यांच्या गुबगुबीत शरीरांकडे बघूनच दिसते आहे आजी त्याची किती काळजी करत असणार ते !

सगळी फेरी मारून झाल्यावर आजीने आग्रहाने घरात परत बोलवले आणि बस म्हणाली. आग्रह करूनही मी ऐकत नाही म्हटल्यावर गाइडकरवी एक पेअर सोलून जबरदस्तीने खायला भाग पाडले. ली आजी कायमचीच स्मरणात राहील. कोण कुठची हजारो किमीवरची आजी, पण एका तासाभराच्या सहवासात तिने मला माझ्या स्वता:च्या आजीची केवळ आठवणच करून दिली असे नाही तर जणू माझ्या आजीच्या सहवासाचेच सुख मिळाल्याच्या भावनेनेच मनात घर केले. जड अंतःकरणाने ली आजीचा निरोप घेतला.

परत येताना निसर्गसौंदर्य जरा अजून उजळ दिसत होते... कारण घुक्याचा पडदा हळूहळू दूर होऊ लागला होता. परत तीच नदी लागली पण आता पुलाच्या दुसर्‍या बाजूचा जाताना निर्मनुष्य दिसलेला घाट चाकरमान्यांनी गजबजला होता. आपापली "चारबांबी" काढून लोक उद्योगघंद्याला निघाले होते.

यांगशुओला परतलो ते एका शाळेत नांव दाखल करायलाच ! आमच्या गुरुचे नाव होते, मास्टर यांग दोंग बू. आज तीन विषयांचा अभ्यास करायचा होता. त्यांनी या तीनही विषयांत त्यांनी विद्यापीठातून मास्टरची पदवी मिळवलेली आहे.

पहिला विषय होता, चिनी कॅलिग्राफी. आजचा धडा होता १ ते ९ पर्यंत चिनी आकडे गिरवायचे...

नंतर चिनी रंगकामाचे धडे घेतले. परंपरागत बांबू आणि पांडा यांचे चित्र चिनी पद्धतीचे ब्रशांचे फटकारे मारत काढायला शिकलो...

आणि नंतर जवळच्या एका सार्वजनिक बागेत जाऊन 'ताई ची' चे शिक्षण घेतले...

हे सगळे होईपर्यंत एक वाजला. पोटात कावळे ओरडू लागले होते. पोटपूजा आटपून दोन वाजता चारचाकीने गुईलीनला निघालो. तेथून साडेसहा वाजताचे चेंगदूला जाणारे विमान पकडायचे होते. गुईलीन ते चेंगदू हे अंतर १,००० किमी आहे आणि उड्डाण पावणेदोन तासाचे आहे. हॉटेलवर पोचायला साडेनऊ-दहा वाजले.

===================================================================

पंधरावा दिवस "पांडा" चे शहर चेंगदू मध्ये उगवला. चेंगदू सिचुआन या चीनच्या दक्षिणपश्चिम भागातल्या राज्याची राजधानी आहे. हे शहर चीनच महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रापैकी एक आहेच पण ते जायंट पांडाचे शहर म्हणूनही जगप्रसिद्ध आहे. या शहराच्या उत्तरेला १० किमी वर हे २,००,००० हेक्टर क्षेत्रफळाचे प्रशस्त "पांडा पैदास आणि संशोधन केंद्र" केंद्र आहे. आज पहिला कार्यक्रम त्याला भेट देण्याचा होता.

पांडा मुख्यतः दोन प्रकारचे आहेत. पहिला जास्त प्रसिद्ध जायंट पांडा हा एक अस्वलाचा प्रकार आहे. गुबगुबीत गोलमटोल पांढरे शरीर, त्याच्यावरचे भलेमोठे काळे ठिपके आणि डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे यामुळे त्याची एक गोड दिसणारा प्राणी अशी ख्याती झाली आहे. त्यातच वॉल्ट डिस्ने पिक्चर्सने त्याला फिल्म, कार्टुन्स आणि खेळण्यांच्या माध्यमातून बरीच प्रसिद्धी दिली. हा एक नष्ट होऊ घातलेला प्राणी असून जगात सर्व मिळून केवळ ३,००० च्या आसपासच जायंट पांडा आहेत. त्यातील ९०% पेक्षा जास्त एकट्या चीनमध्ये आहेत. चेंगदूमधल्या संशोधन केंद्रात पांडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

जायंट पांडा हा एक बराच आळशी प्राणी असून दिवसाचा बहुतेक वेळ झोपण्यात आणि लोळण्यात घालवतो. याचे ९९% खाणे म्हणजे बांबूची कोवळी पाने. केंद्राच्या आवारात फिरून बर्‍याच जायंट पाडांच्या जागेपणीच्या आणि निद्रावस्थेतील लीला पाहिल्या.

.

.

.

नंतर केंद्रामध्ये जाऊन पांडावरचा एक महितीपट बघितला. पांडा एवढा आळशी प्राणी आहे की त्याची नैसर्गीक पैदास खूप कमी आहे आणि त्यामुळेच त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. या पांडा पैदास केंद्रात कृत्रिम पद्धतींचा वापर करून त्यांची पैदास वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण पांडामध्ये कृत्रिम पैदास करणेही इतर प्राण्यांच्या मानाने फार कठीण आहे. इतके की येथे दर पिलाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो ! नंतर ते जीवित राहावे म्हणून त्याची अनेक महिने खूप काळजी घ्यावी लागते. नशिबाने एक महिन्यापूर्वी एका पिलाचा जन्म झाला होता. इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले ते पिलू पाहिले.

नंतर साधारण ५०० मीटरवर असलेल्या तांबड्या पांडाच्या विभागात गेलो. हा एक तपकिरी रंगाच्या मांजरासारखा दिसणारा रॅक्कून, स्कंक अथवा विझल च्या प्रकारातील प्राणी आहे. म्हणजे जायंट आणि तांबड्या पाडांमध्ये नाव सोडून दुसरे साम्य अथवा नाते नाही ! हा प्राणी फक्त बांबूच खातो. याच्या भागात याला प्रवाशांकरिता बनवलेल्या लाकडी मार्गावरून चालायची परवानगी आहे... आणि तिचा तो न घाबरता फायदा घेतो. उलट "त्याच्यापासून कमीतकमी दोन मीटर दूर राहा, त्याला त्रास देऊ नका नाहीतर चिडलेल्या मांजरासारखा हल्ला करेल." अश्या प्रवाशांनाच दिलेल्या धमकीच्या पाट्या जागोजागी आहेत !

.

ह्या केंद्राच्या आवारत फिरताना नेहमीसारखीच चिनी सौदर्यदृष्टीची चमकही बघायला मिळते. केंद्राचे आवार एखाद्या बागेला लाजवेल असे होते. केंद्रामधली हिरवाई, वेगवेगळी सुंदर फुले, तलाव, कोई मासे आणि मनमोहक काळे राजहंस... केंद्र बघता बघता आपण कितीतरी चाललो याची जाणीव होऊन देत नाहीत.

.

.

.

.

तेथून पुढे पोटोबाचा कार्यक्रम होता.आज शनिवार असल्याने पुढे काय वाढून ठेवले आहे ही काळजी होतीच! पण गाइड चांगला कसलेला खेळाडू होता. थेट स्वयंपाकघरात शिरून खानसाम्याला पकडून तिळाच्या तेलातले शुद्ध शाकाहारी जेवण बनवून आणले! मसाले कमी प्रमाणात असले तरी भाज्या चवदार होत्या.

पुढचा थांबा होता चेंगदूचे सानशिंगदुई संग्रहालय. यात चेंगदूच्या परिसरातल्या थ्री स्टार पाईल्स नावाच्या तीन टेकड्यांच्या खाली सापडलेले इ. पू. ५००० ते पहिले शू राजघराणे (इ. पू. ११०० ते ७११) या विशाल काळातील अश्मयुगातील वस्तूंपासून ते माती, ब्राँझ आणि सोन्याचा वस्तूपर्यंत अनेक वस्तू आहेत.

जीवनवृक्ष

हा ब्राँझचा मुखवटा हे या संग्रहालयाचे मानचिन्ह आहे... विशेष म्हणजे तो चेहरा चिनी (मंगोलियन) नाही शिवाय नाक मोठे आणि उभे आहे (बसके नाही)! हा कोण हे एक न सुटलेले कोडे आहे. कदाचित माझ्यासारखा काही हजार वर्षांपुर्वी चीन बघायला गेलेला प्रवासी असावा +D !

नेहमीप्रमाणेच याही संग्रहालयाचे आवार इतके आकर्षक होते की त्याचे काही फोटो बघितल्या शिवाय विश्वास बसणे कठीण आहे. (खास सूचना: ही बाग नाही, संग्रहालयाचे आवार आहे!)

.

.

हॉटेलवर आलो तर हे माझी वाट पाहत होते... फळांची बशी आणि माफीनामा. सकाळी वॉश बेसिनमध्ये ब्लॉक झाले होते आणि एसीमधून पाणी गळत होते. ते दुरुस्त करण्यात जरा उशीर झाला होता. सहलीचा खोळंबा होऊ नये म्हणून आग्रह करून खोली बदलून घेऊन घाईघाईने निघालो होतो. हे फिरण्याच्या नादात आतापर्यंत विसरूनही गेलो होतो. पण सकाळच्या थोड्याश्या त्रासाबद्दल हॉटेलच्या मॅनेजर बाईंनी ही अशी दिलगिरी व्यक्त केली होती. चिनी व्यवस्थापनाचा आणि फळांचाही नमुना दिसावा म्हणून हा खास फोटो.

आज खूप चालणे झाले होते पण दमायला वेळ नव्हता. प्रवासाच्या शिणावर माझा नेहमीचा उतारा वापरला... सचैल शॉवर आणि गरमागरम कॉफी... आणि निघालो चेंगदूचा रात्रीचा शो पाहायला. थियेटर चेंगदूच्या ओल्ड क्वार्टर्स मध्ये होते. नव्या चेंगदूमधील काँक्रिटच्या जंगलापेक्षा खूप वेगळ्या रंगीत जगात आलो.

.

.

हा पॅगोडा एका चौकात एकांड्या शिलेदारासारखा उभा होता.

चेंगदूच्या शोमधील काही क्षणचित्रे

.

.


.

.

हे चित्र थिएटरच्या रंगभवनात होते... गाईड काही नीट सांगू शकला नाही. अगदी कालीमातेचेच वाटते !

चला आजचा दिवस संपला. उद्या बसलेल्या बुद्धाचे जगातील सर्वात उंच एकाश्म शिल्प बघायला लेशानला जायचे होते. दीडदोन तास चारचाकीचा प्रवास आहे आणि जरा लवकर निघालो तर गर्दी होण्याअगोदर शिल्प जास्त नीट बघता येईल असे गाइड म्हणाला. होकार दिला आणि त्याचा निरोप घेतला.

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच.. आपल्या काही देवदेवता, अगदी यम देखील प्राचीन चीनमधे पूजला जात होता, असा उल्लेख डॉ. मीना प्रभुं यांच्या " चिनी माती " पुस्तकात आहे.