लच्छा पराठा

Submitted by saakshi on 4 December, 2014 - 08:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. गव्हाचे पीठ - २ वाट्या
२. मैदा - अर्धी वाटी
३.तूप/बटर - ४ मोठे चमचे
४.जिरा - १ चमचा पूड करून
५.धने - १ चमचा पूड करून
६.गरम मसाला - चिमूटभर
७.हळद - १ छोटा चमचा
८.अंडे - १
९.कणीक मळण्यासाठी पाणी
१०. साखर आणि मीठ - १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

१.मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात अंडे फोडून टाकावे. त्यातच २ चमचे तूप/बटर टाकून मिसळून घ्यावे.
२.वरच्या मिश्रणात जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ, गरम मसाला आणि साखर टाकून नीट मिसळावे.
३.कोमट पाणी हळूहळू टाकत मळून घ्यावे. मळलेली कणीक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी.
४.अर्ध्या तासानंतर कणीक बाहेर काढून तुपाचा हात लावून चांगली तिंबून घ्यावी.
५.कणकेचे चपातीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करावेत. वरच्या मिश्रणाचे ७ ते ८ गोळे होतील.
६.एक गोळा घेऊन घडी न घालता लाटून घ्यावा. त्यावर एक चमचा तेल पसरून लावावे. वरून मैदा भुरभुरावा. या मैद्यामुळे पराठ्याला छान पदर सुटायला मदत होते.

lp1.jpg

७.मग लहानपणी जसे कागदाचे पंखे करताना घड्या घालायचो तशा या लाटीच्या घड्या घालाव्यात.
घड्या घालताना असे दिसेल

lp2.jpg

सर्व घडया घातल्यावर असे दिसेल

lp3.jpg

८. आता ही घडया घातलेली पट्टी दोन्ही बाजून हलकेच ओढून लांबवावी. मग तिची गुंडाळी करावी.
गुंडाळी करताना

lp4.jpg

शेवटचे टोक खेचून गुंडाळीच्या मध्यावर दाबावे.

९.असे सर्व गोळे तयार करून घ्यावेत.
तयार गोळे

lp5.jpg

१०.हलक्या हाताने पराठे लाटावेत. तूप/ बटर टाकून खरपूस भाजावेत.

तयार पराठे

lp6.jpglp7.jpglp8.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना भरपूर.
अधिक टिपा: 

पराठे भाजताना तव्याचे तापमान मध्यम ठेवावे. कमी झाल्यास पराठ्याचे पदर सुटत नाहीत.
तूप वापरताना हात आखडता घेऊ नये, त्याची चव अप्रतिम लागते.
बटाट्याची तिखट गोड भाजी/ चटणी/दही/सॉस सोबत गट्टम करावेत. Happy

माहितीचा स्रोत: 
तूनळी आणि स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लच्छा पराठ्यात अंडं असतं?>>>>नाही घातलं तरी चालत. मी ज्या रेस्प्या पाहिल्या त्यात होतं , अंडं घातल्यामुळे मस्त कुरकुरीत होतात पराठे.

मस्त दिसतायत. एकदम प्रोफेशनल.
मलाही करून बघायचे झाल्यास अंडं घालायचं नाही. ते चालेल का?

मस्त दिसतायत. एकदम प्रोफेशनल.>>> धन्यवाद सायो Happy
अंडं नाही घातलं तरी चालेल. केल्यावर फोटो नक्की टाका.

जबरी दिसतायत. जाम आवडले.:स्मित: पण नो अन्डे. करुन पहाणार पण अन्डे नाही घालणार.

कृती स्टेप बाय स्टेप दिसल्याने जीव पराठ्यात पडला.:डोमा:

मस्तच!
माझी एक मारवाडी मैत्रीण फक्त गव्हाच्या पिठाच्या करते. त्याला ती जाडी रोटी म्हणते.
एकदा एका साऊथ इंडीयन मैत्रीणीने केले होते, ते फक्त मैद्याचे पण त्यात अधिक प्रमाणावर तेल वापरले होते. तोंडात टाकताच विरघळणारे. दोघींनीही अंडे वापरले नव्हते.

भारी फोटो आहेत. बहुतेक तरी मृणाल साळवी (चिकन करी फेमस) यांच्या ब्लॉगवर अंड न घालता पराठा करायची कृती आहे.

मस्त फोटो आहेत, मी कॅलरी कॉन्शस नव्हते तेव्हा करुन बघितलेत हे प्रकार, हा पराठा खरोखर सुन्दर होतो, अन्ड न घालताच केले होते मी, मैदा पण नव्हता घातला..दोन्ही मुळे चव आणी मुलायम टेक्षर येत असणार.
मी जुन्या मायबोलिवर लिहला होता हा प्र्कार,..अन्ड न घालता दही घातल तरी मस्त पदर सुटतात.

वा काय दिसतायत पराठे !! रेसिपी लिहीलीत म्हणून नाहीतर खूप कॉम्प्लीकेटेड आहे असं वाटलं असतं. करुन बघणार. सोपी दिसतेय.

मी अंडं न घालता नुसत्याच गव्हाच्या पीठाचा करते. नेहेमीच्या साध्या (नमक-अजवायनच्या) पराठ्यासाठी भिजवलेल्या कणकेचा. मीठ, ओवा आणि थोडंसं मोहन, कधीतरी जीरेपुड इतकंच घालून कणिक मळते आणि पराठ्याच्या आत तुप लावून तुपावरच भाजून नेहेमीच्या घडीच्या चौकोनी पराठ्या ऐवजी असा लाटून लच्छा पराठा करते.

फोटो अप्रतिम आलेत. उद्या अंड घालून करून बघते मी.

वॉव मस्त जमलेत..

एक शंका - केरळा पराठे असतात ते असेच लच्छा पराठेच असतात ना.. त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो की मी हमखास केरळा पराठे आणि त्यांच्या पद्धतीचे चिकन मागवतो. आवडीचा प्रकार आहे.

Pages