विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणातल्या लग्नात नवरीला अंगठी नवरा घालत नाही तर त्याचा वडील भाऊ किंवा वर लिहिल्याप्रमाणे वडील घालतात. >> हे ऐकलेलं Happy नशीब आमच्या लग्नापर्यंत काळ बदलला... मला पचलंच नसतं... साबूंनी किंवा दिराने अंगठी घालणं Happy

मुलगा मुलगी जर नोकरीला आहे तर लग्नाचा खर्च घरच्यांवर न टाकता ( ते शक्य नसल्यास किमान कमीत कमी तरी टाकावा ) अर्धा अर्धा करावा. आमच्या घरी काकांचे मावशींचे माझे देखील लग्न खर्च दोन्ही बाजुंनी अर्धा अर्धा मान्य करुनच केलेला आहे. यात कमीपणा वगैरे काहीही नाही. हॉल, भटजी लग्नाची सजावट जेवणावळ इत्यादी खर्च वाटुन घेतलेला होता. फक्त देवाणघेवाण ही त्यांच्यावर सोडलेली त्यात देखील सासु सासरे यांच्या बरोबर इतर ५-१० यांना कपडे साड्या दिले. त्यांनी देखील केले अर्थात ही बोलणी आम्ही एकत्र बसुनच ठरवली. घरच्यांना कमीत कमी खर्च होईल याकडे आम्ही जास्त लक्ष दिले. कंपनीतुन आवश्यक कर्ज घेतले होतेच. खर्चाची मांडणी आणि वहिवाट लग्नाआधीच ५ दिवस पुर्ण केली. त्यामुळे प्रत्यक्षात पैसाचा गोंधळ कमी झाला. लग्न झाल्यानंतर नवलाईचे नऊ दिवस सरल्यावर परत एकदा एकत्र बसुन कुणाचा ठरलेल्या खर्चा पेक्षा जास्त खर्च वगैर झाला आहे का हे बघुन घेतले ( या बाबतीत सौ. काटेकोर ) आणि महिन्याभरात सोक्षमोक्ष लावुन टाकला. कुणाचे रुसवेफुगवे ठेवले नाही आणि तशी वेळ देखील येउ दिली नाही.
उगाच घाईघाई न करता नियोजन केले तर सगळे सुरळीत होते हे किमान घरातल्या ३-४ लग्नाच्या अनुभवावरुन तरी बोलता येईल Happy

@ धिरज काटकर | 27 November, 2014 - 15:46

@आजकालचे निर्ढावलेले भडजी १०००१+ इतकी दक्षिणा उकळतात, >>> हे १०००१+ - नेमके कश्या कश्याचे घेतले जातात? तुम्हाला काहि माहिती आहे का? Happy

@उंची पोषाखही या भडजींला द्यावा लागतो म्हणे.>>> ही माहिती फक्त १ टक्का खरी आहे. आणि त्यातही उंची पोषाख हे खरे नसून..नुस्तेच १ धोतर किंवा नेहेरु शर्टाचे कापड आणि टोपि इतकच खरं आहे.

माझ्या लग्नात खर्च निम्मा निम्मा वाटून घेतला. यात भटजी, हॉलचे भाडे आणि जेवणाचा खर्च. दोन्ही कडली आमंत्रीतांचा आकडाही सारखा - १५-२० डोकी कमीजास्त. कुठल्याही स्वरुपात हुंडा दिला जाणार नाही हे 'स्थळ' बघतानाच स्पष्ट केले होते. बरेचदा नवरदेवाचे परदेशात वास्तव्य असेल तर पॅसेज मागणे चालायचे. माझ्या बाबांनी अशा प्रकारे आडून हुंडा द्यावा अशी अपेक्षा असेल तर आम्हाला स्थळाचा विचार करायचा नाहिये हे चौकशी करायला गेले तेव्हाच स्पष्ट केले होते. माझे जे दागिने होते ते आईने मला दिले. त्या जोडीला नवर्‍याने त्याची हौस म्हणून केले. माझ्या दीरांना रिसेप्शन हवे होते. पण ते एकतर आमच्या लग्नाच्या ठरलेल्या बजेटच्या बाहेर होते आणि जोडीला माझे आणि नवर्‍याचे असे रिसेप्शनला म्हणून वेगळे बोलवण्यासारखे कुणी आमंत्रीतही नव्हते. त्यामुळे रिसेप्शन नको असे स्पष्ट सांगितले. संबंधीत मंडळी थोडी नाराज झाली कारण त्याना त्यांच्या व्यवसायातील मंडळींना बोलवायचे होते. त्यावर तुम्ही तुमच्या मुलांच्या मुंजींना त्या लोकांना बोलवू शकता असे सांगून मीच विषय संपवला. माझ्या नवर्‍याच्या सुट-बुट(पोषाख) खर्च मी केला. माझ्यासाठी ५ साड्या नवर्‍याने घेतल्या. मुलाची आई आणि करवली तसेच मुलीची आई अणि करवली अशी साड्यांची देवाणघेवाण झाली. माझ्या आई आणि बहिणीसाठी साडी खरेदी माझ्या पसंतीने झाली. लग्न ठरल्यावर मी दर १५ दिवसांनी विकेंडला होणार्‍या इनलॉजकडे रहायला जायची. होणारा नवरा परदेशत. त्या ६ महिन्यात माझी सासरच्या मंडळींशी चांगली ओळख झाली होती. अनावश्यक विधी तसेच इतर फापटपसार्‍याला कात्री लावायचे फुकटचे सल्ले मी साबाईंनाही द्यायची. त्यांना पटले की साबुवांना पटवायचे काम माझ्या गळ्यात पडायचे. काही गोष्टी साबुवांना पटायच्या काही नाही. मग त्या त्या वेळेनुसार व्यवहारी किंवा पोरकट असे लेबल लागायचे.

अरे बापरे ,कसल्या या प्रथा !! मला वाटत होतं कि फक्त आमच्या उत्तर भारतातच हे प्रकार चालतात.इकडे तर नवर्या मुलाच्या शिक्षणा प्रमाणे आणि मिळकती प्रमाणे लग्नाचे रेट बदलतात.तरी कमित कमी रेट २० ते २५ लाख असतोच.गाडी शिवाय लग्न तर निव्वळ अशक्य !!भले ही पोराची पेट्रोल भरायची लायकी नसली तरी चालेल पण लग्नात गाडी हविच.अशा वेळी खरंच किव येते त्या सुशिक्षित मुलाची ही आणि मुलिची ही.काही प्रकरणात तर मुलिंना आई वडिलांशी भांड्ताना पाहिले आहे कि माझं लग्न फ्लॅट आणि गाडि सकट करुन द्या म्हणून.
माझ्या सासरी माझंच लग्न सगळ्यात स्वस्तात झालंय !! फक्त ५ माणसांची वरात.नवर्‍यानी स्पष्ट सांगीतलं होतं आम्ही आमच्या मर्जी नी लग्न करतोय ,त्यामुळे ही प्रकरण मला चालणार नाहीत.अर्थात हे आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतानाच ठरवलं होतं.पण नशिबानी दहेज आणि देणं घेणं या विषया वर कधिही कोणिही उच्चारहि केला नही.

@ ड्रीमअगर्ल - लिंबू भाऊंचे हे विधान वाचा <<<शेळपट/पुचाट वर-पुरुषांमुळे परिस्थिती इतकी बिघडली की सरसकट मुली नकोतच व्हायला असा सरळ सरळ अन्यायी स्त्रीविरोधी भुमिकेचा प्रचार होऊन स्त्रीभृणहत्येत भर पडत राहिली आह<<<

वाचतेय. माझ्या लग्नात सोन्यावरून घासाघीस झाली होती... अतिशय वाईट वाटले... मुलगा झाल्यावर ठरवले होते हुंड्याचा प्रश्नच नाही, अर्धा खर्च वाटून घ्यायचा. यथावकाश मुलाने लग्न ठरवलं. सापु साधा करावा अशी आमची इच्छा पण हौशी मंडळी समोरची! त्यांचा मान राखला. सापु पाहून माझे वडील भयंकर चिडले ... हा सापु आहे की लग्न. हा सापु असेल तर लग्न काय.. लग्नापर्यंत त्यांचे डोळे मिटले होते नाहीतर त्यांना बोलायला कमी केलं नसतं त्यांनी...कारण लग्न एकदम फिल्मी स्टाईलने... आम्ही दिलेले पैसे इतके बिच्चारे वाटत असले तरी मला समाधान होते त्यादिवसाचा जेवणाचा अर्धा खर्च दिल्याचा. विहीणीच्या पंगतीविषयी पुढच्या भागात...

माझ्या विवाहातील एक प्रसंग:

माझ्या आईच्या आईने एक प्रश्न निर्माण केला. कार्यालयातील स्टाफने सकाळी साडे पाच वाजता चहा सर्व्ह करायला हवा होता (जे कार्यालयात राहिले होते त्यांच्यासाठी) तो त्यांनी पावणे सहा वाजता दिला. त्या पंधरा मिनिटांत आजीने बर्‍यापैकी तोंडसुख घेऊन पाहिले स्टाफवर! वरवर बघता हा काही प्रॉब्लेम नाही, पण जावे त्याच्या वंशा!

ते साल १९९३ होते. आजी ऐन उमेदीतील अनुभवी म्हातारी म्हणवली जात होती तेव्हा. तिचा नातू म्हणजे मी हा तिच्या मुलाचा मुलगा नव्हता तर मुलीचा मुलगा होता. (माझ्या वडिलांची आई १९८८ सालीच निवर्तली होती). ही आजी एरवी विशेष वाद न करणारी, पण तेव्हाच तिला जोर चढला. कारण काय? तर मुलाकडचे म्हणून आम्ही 'हे असे असे वागू शकतो' असे दाखवणे! आता मुलगा स्वतः आणि मुलाचे बहुतांश नातेवाईक पुण्याचे! मुलगी कोल्हापूरची! तिचे पुण्यात फक्त दोनच नातेवाईक! काका आणि आत्या! कार्यालय पुण्यात, लग्न पुण्यात, तिथे परगावाहून आलेल्यांनी काय परफॉर्मन्स द्यायचा? ते आपले बापुडवाणेपणे स्टाफच्या मागे लागून चहावर लक्ष ठेवू लागले. बाकी माझी आजी सोडली तर कोणालाही तो चहा साडे पाचला न मिळाल्याची विशेष खंत नव्हतीच. शेवटी आजीचा मुख्य हेतू लक्षात आल्यावर मी स्वतःच सर्वांदेखत तिला म्हणालो, अगं होतोय ना चहा तयार, थांब की जरा! मग विषयावर पाणी पडले.

सगळे व्यवस्थित होत आहे हे काहींना बघवत नाही. त्यातही पुन्हा माझ्या हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थित होत आहे हे तर अजिबातच नाही. मग असे प्रॉब्लेम्स उद्भवत असावेत.

आमच्या लग्नात देणेघेणे वगैरे प्रकार नव्हतेच. त्यामुळे तो विषय निघू शकला नाही. नमस्कार चमत्कारांना माझा विरोध नाही. मी दोनच तत्वे पाळतो. जोवर समोरच्या माणसाचे वय आपल्यापेक्षा अधिक आहे तोवर त्याला नमस्कार करून त्याच्याकडून काहीतरी चांगले शिकण्याची संधी आहे आणि ज्याचे वय आपल्यापेक्षा कमी आहे त्याने आपल्याला नमस्कार करावा अशी आपली अजिबात लायकी नाही. माझे पुतणे, पुतण्या वगैरे पब्लिकला माझ्यासमोर वाकताना मी आडदांडपणा करून मधेच रोखतो. आपण काय आहोत हे आपल्याला माहीत आहे, उगाच दुसरा वयाने लहान आहे म्हणून नमस्कार कसला करून घ्यायचा!

बाकी लग्न निर्विघ्नपणे पार पडले. मी देशस्थ आणि बायको कोकणस्थ असूनही!

आपल्या मुलाच्या मुलाच्या लग्नात मात्र लोकं असले प्रकार करत नसावेत! 'खानदानाचा' प्रश्न असतो ना शेवटी!

एक मजेशीर प्रसंग मात्र घडला. मी त्याकाळी ज्या कंपनीत नोकरीला होतो तेथील स्टाफला जेवायला बोलावले होते. चारच जण येऊ शकणार होते. त्या चारांपैकी दोघे ख्रिश्चन, एक मुसलमान आणि एक 'बेलसरे' होता. ते साडे अकराला कार्यालयात हजर! साडे अकराला पहिली पंगत बसलीही! ते म्हणाले आम्ही आता जेवायला बसतो कारण ऑफीसला गेले पाहिजे लवकर! मग काय नाही म्हणणार? बसले जेवायला! इकडे माझी बायको 'जेवणार्‍या पंगतीला आग्रह करतानासाठीची साडी नेसायला' जी वधूपक्षात गेली ती बारा वाजता बाहेर आली. मी एकदा पंगतीपुढे आणि एकदा वधूपक्षापुढे नाचत होतो. शेवटी ती वधूपक्षातून बाहेर पडली आणि मला समोर बघून खिळलीच! तिची बिचारीची अपेक्षा असेल की नव्या साडीत ती फारच जहाल किलिंग दिसत आहे असे भाव माझ्या नजरेत प्रकट होतील. तर माझ्या मुखातून बाहेर पडलेले वाक्यः

"डब्ल्यू बी चे सगळे लोक जेवून गेले, करतीयस काय तू?"

भर कार्यालयात बायकोला उद्देशून असे बोलण्याची हिम्मत फार कमी वरांमध्ये असते. माझ्यात ती होती कारण आम्ही दोघे एकमेकांना आपापल्या वयाच्या अनुक्रमे चौथ्या व तिसर्‍या वर्षापासून ओळखत होतो. त्यामुळे वातावरण तंग तर झालेच नाही, पण तिने नेहमीच्या सवयीने सर्वांदेखत माझा किमान शब्दात कमाल पाणउतारा करून 'लग्नाच्या पंगतीचा शालू नेसायला किती वेळ लागतो' हे ज्ञानामृत पाजले.

ह्या धाग्याबद्दल लिंबू भाऊंचे अनेक आभार! अनेक गोष्टी नोंदवता आल्या. आमच्या लग्नात तेव्हा प्रचलीत असलेल्या जवळपास सर्व प्रथा पाळल्या गेल्या. आम्ही देशस्थ असल्याने रात्री देवीचा गोंधळही झाला. पण आता मागे वळून बघताना वाटते, की तेव्हाच्या वधूवरांना काही 'से'च नसायचा.

लग्न होते नवरा बायकोचे, पण त्यात भावनिक गरजा इतरांच्याच भागवल्या जातात हे दुर्दैवी आहे.

इतका खर्च करणे हा जर केवळ प्रतिष्ठेचा भाग असेल तर ती प्रतिष्ठा न प्राप्त होणे बरे, हे आज समजते.

माझ्या नवर्‍याचा रजिस्टर लग्न करायचा पक्का आग्रह. आमच्या नात्यात कोणाचंच असं रजिस्टर लग्न न झाल्याने आईवडिल हैराण झाले होते.समजवण्याचा शेवटचा प्रयत्न करून पाहिला,पण नवरा मतावर ठाम होता.लग्न होण्याआधी ४-५ दिवस आधी परत आईने नणंदेला फोन केला की नवरा विधीवत लग्नाला तयार आहे की नााही.त्यावेळी तिने सांगितले की आहे तयार म्हणून .वडिल वैतागले होते.पण आईने त्यांना चूप केले होते.(हे मला नंतर कळले)
मग फक्त पाउण-एक तासाचे सप्तपदी वगैरेविधी झाले. नंतर रजिस्ट्रार आले होते.त्यांच्यासमोर शपथा घेऊन रजिस्टर लग्न झाले.लग्नादिवशी नवरा ,त्यांच्या खोलीत वैतागलेला होता .हा काय धेडगुजरी प्रकार झाला म्हणून.तिथे मी वैतागले होते की माझे आईवडिल इतके सांगत होते नवर्‍याला नेहमीप्रमाणे लग्न करायचा,तेव्हा ऐकला नाही..आयत्यावेळी तयार कसा झाला. आमचे ( म्हणजे मीचभांडत होते ) भांडणही तिथे झाले
लग्नानंतर ५-६ दिवसांनी नणंदच हसत म्हणाली की अग, मीच खोटे सांगितले की तो तयार आहे म्हणून..डोक्याला हात लावला उगीच नवर्‍यावर चिडत आहिले म्हणून.
पण छान सुट्सुटीत प्रकार होता.पण माझ्या मुलाचे तसे लग्न करायला नाही आवडणार.अर्थात त्याने काही चॉईस दिलाच तर.

आता हा माझ्या पुतणीच्या विवाहातील प्रसंग!

पुतणी रत्नागिरीची! सड्यावरचे लिमये! माधुरीचे लांबचे नातेवाईक! तिला मी पुण्यात कोहिनूरमध्ये नंतर भेटू शकलो होतो ही आठवण अजूनही हुळहुळते, पण त्या दिवशी काही तिच्या नशिबात मी दिसण्याचा योग नव्हता.

नियोजीत वर औरंगाबादचा! मराठवाड्यातील कुलकर्णी! 'बेभान' देशस्थ!

लग्न रत्नागिरीत! मुलीची सख्खी आजी (वडिलांची, म्हणजे माझ्या मावस भावाची आई, माझी मावशी) दीनानाथला अ‍ॅडमीट! अवस्था 'सिरियस'! जेमतेम चारजण रत्नागिरीत लग्नाला शोभा द्यायला म्हणून जाऊ शकले त्यातला मी एक! त्यामुळे जबाबदारीचे वाटप करताना आम्हा चौघांवर बर्‍यापैकी लोड!

सीमान्तपूजन रात्री आठला सुरू होऊन दहाला जेवणे संपायला हवीत हे रत्नागिरीतील कार्यालयाच्या संचालकाचे नियम, जो स्वतः जातिवंत कोकणस्थ होता!

औरंगाबादहून एका बसमधून त्यादिवशी पहाटेच निघालेले वर्‍हाड दुपारी साडे तीन वाजताच कार्यालयात पोचणार अशी वदंता होती. अडीच वाजल्यापासून रत्नागिरीतील लग्नघरात नुसती पाचावर धारण बसलेली! हे लोक असतात कसे, करतात काय, म्हणतात काय, मागतात काय, वगैरे!

पावणे तीन वाजता वधूपक्ष कार्यालयात दाखल! आम्हीही नटून थटून आपले उभे!

बरं, तो जमाना काही मोबाईलचा नाही.

तीन वाजले, साडे तीन वाजले, चार वाजले! आता हद्द झाली.

साडे चार वाजल्यावर कुजबूज सुरू झाली.

पाच वाजता कुजबुजीने थेट चर्चेचे स्वरूप धारण केले.

साडे पाच वाजता मावसभाऊ आणि वहिनी काला पत्थरमधल्या खाणीत अडकलेल्यांना जसे सांगतात की 'तुम्हालाही बाहेर काढले जाईल' त्या आवेशात आले.

सहा वाजता सगळ्यांचे चहापान झाले. नंतर ताज्यातवान्या तक्रारी सुरू झाल्या. आता मावसभावाकडे उत्तरच नव्हते. तो निर्वाणीचा संदेश देऊन म्हणाला की फोन लागत नाही आहे, वर्‍हाड निघालेले आहे, ते पोचेल.

साडे सहा वाजता रस्त्यावरील बैलगाडी कार्यालयासमोर (बैलाला फेस आल्यामुळे का होईनात) थांबली तरी गहजब होऊ लागला. बैलांची चौकशी करण्यात येऊ लागली. शंभर मीटरवरून चालत येणारा प्रत्येकजण वर्‍हाडी वाटू लागला. वधूचा मेक अप अरबी समुद्राला शरण जाऊन ओघळू लागला.

सात वाजता 'आले आले, आता येणारच' अशी एक आवई उठली. नीट शहानिशा केल्यावर समजले की वर्‍हाड पुण्यात पोचले होते. 'पुणे' नावाचे एक शहर आहे हे मीसुद्धा तेव्हा विसरून गेलेलो होतो.

साडे सात वाजता वधूने जाहीर केले की तिच्या आईने (म्हणजे माझ्या मावस वहिनीने) तिच्या सासूचे पाय धुवायचे नाहीत, अन्यथा ती वधूपक्षात भूमीगत होईल.

आमचे म्हणणे असे होते की पाय धुवा किंवा नका धुवू, फक्त या आता!

पाय न धुणे ह्यावरून वधूला समजावू पाहणार्‍यांचा एक निराळाच कळप तिला समजावण्याच्या कामी रुजू झाला.

साडे आठ वाजता कार्यालयाच्या संचालकाने सभा घेऊन जाहीर केले की आता सीमांतपूजन वगैरे विसरा, उद्या थेट लग्न करा आणि मोकळे व्हा!

त्यावर झालेल्या गदारोळात नऊ वाजले. कार्यालयाच्या संचालकाने 'एक्ष्ट्रा' पैसे घेऊन कर्मचार्‍यांना थांबवले व त्यामुळे ते कर्मचारी माझ्या मावस भावाला सामील होऊन प्रतीक्षा करण्यास हातभार लावू लागले.

अश्यातच साडे नऊ वाजले आणि त्याचक्षणी समजले की अजून काहीही समजलेले नाही.

हताश मावसभाऊ आता एका पायरीवर बसला आणि माझी वहिनी उच्च रक्तदाब हा एक रोग नसून भोग आहे ह्या विचारापर्यंत आली.

दहा वाजता रहदारी तुरळक झाली. आता वर्‍हाडी वाटेल असा एक चेहराही दिसेना! आपण सगळे तरी जेवून घेऊ अशी एक सूचना पुढे आली व तिचा बिमोड करण्यात आला.

त्या कार्यालयात जिंदगानी घालवायची असल्याप्रमाणे लोक सेटल झाले.

सेटल झालेल्यांना आता उद्या लग्न आहे, जिचे लग्न आहे ती आपल्यातच बसलेली आहे, वगैरे कश्याचेही भान उरलेले नव्हते. ते बिनदिक्कत तोंड सोदत होते कोणावरही!

साडे दहा वाजता एक 'ह्या ट्रीपनंतर भंगारात काढायची आहे' अश्या स्वरुपाची बस अंगणात आली. त्यातून बाहेर आलेल्या माणसांना 'आपण एका लग्नासाठी येथे आलो आहोत' ह्याचे अजिबात भान नव्हते. औरंगाबाद ते रत्नागिरी हा प्रवास करताना सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन झालेच पाहिजे ह्याला त्यांचे प्राधान्य होते. ते दृष्य पाहून कार्यालय संचालक उघड्या अंगाने, एक लुंगी नेसून काहीतरी अर्वाच्य बोलायला पुढे येऊ पाहात होता आणि त्याला मागे ओढणार्‍यात आम्ही होतो.

त्यानंतर त्या वर्‍हाडाचे सर्व सामान वरपक्षात उचलून नेण्याची कामगिरी आम्ही पार पाडली.

वरपक्षातील एकाच्याही चेहर्‍यावर 'आपल्याला उशीर झाला आहे' हे भाव अजिबात नव्हते ह्याचे मला आजवर कौतुक वाटते.

त्यानंतर झालेल्या गाठीभेटीत मराठवाड्यातील पुरुषांना टॉवेल व टोपी देण्यात आली. त्यांना टोपी घालून त्याच टॉवेलने छताला टांगावे अश्या विचारात आम्ही असताना एक नगण्य गुरुजी पेटला व त्याने सीमान्तपूजनाचे विधी उरकले.

त्यानंतर जेवणे झाली व रत्नागिरीतील त्या कार्यालयाचा संचालक त्या दिवशी प्रथमच 'तारीख उलटल्यानंतर' निद्रेस प्राप्त झाला.

-'बेफिकीर'!

लोकहो,

हा बाफ लग्नासंबंधी हलक्याफुलक्या प्रसंगाचे कथन करण्यासाठी आहे. मात्र अस्मादिकांचा विवाह ठरतांना जरा भारी प्रसंग घडला होता.

लग्नाचे वेळेस मी इथे इंग्लंडमध्ये होतो. दहा दिवसांची सुट्टी काढून मुंबईस आलो आणि मुली बघायला सुरुवात केली. एकसेएक भंकस मुली पाहून जाम वैतागलो. परतायची वेळ आली, पण सुट्टी नऊ दिवसांनी वाढवावी लागली. या वाढीव सुट्टीत भावी बायको भेटली. रविवारी मुलगी पाहायला गेलो होतो. सोमवार मुलीची माहिती काढण्यात गेला. मंगळवारी सकाळी नवाच्या सुमारास फोनवरून होकार झाले. बुधवारी सकाळी साखरपुड्याची खरेदी उरकली. दुपारी मातोश्री कचेरीतही गेल्या (बातमी सांगायची घाई झाली होती ना!). गुरुवारी संध्याकाळी झोकात साखरपुडा झाला (हौस आणि खर्च सासरेबुवांचा!). अस्मादिक गुरुवारी अभक्ष्यभक्षण करत नसल्याचे पाहून सासरेबुवांना जावयास कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालं. समारंभ आटपल्यानंतर कोपऱ्यावर आईसक्रीम खायला जाऊया म्हणून सुचवलं. म्हंटलं आपल्यातर्फे छोटीशी भेट, तर तोही खर्च सासरेबुवांनीच केला. शुक्रवारी रात्री मुबैहून प्रस्थान. निरोपास तिकडचे चौघेही (बायको + साबासाबुसाली) आले होते. येतांना साखरपुड्याची प्रचि आणलेली.

हां, तर भारी प्रसंग काय होता की, आगोदर मी ज्या विमानाने परतणार होतो ती विमानकंपनी बुडीत गेली! f_doh[1].gif त्यामुळे रजा वाढवावी लागली आणि मध्यंतरीच्या काळात विवाह ठरला.

पुढे तीनेक महिन्यांनी तो झालाच. खर्च अर्धाअर्धा करायचा म्हणून मी निक्षून बजावलं. समारंभाचा सगळा विदा सासरच्यांनी ठरवला. विमानकंपनी बुडीत गेली तरी ग्राहकाला तोशीस लागली नाही. पण नंतर जो खर्च उपटला तो आजूनही चालूच आहे! Lol

आ.न.,
-गा.पै.

बेफि, तुम्हाला तेव्हा वैताग आला असेल पण वरचा किस्सा वाचून लै हसले..
विदर्भातले "बेभान" पण एवढे बेभान पाहिले नाही अजून..

नताशा - हल्ली आमच्याशेजारी एक विदर्भातील 'बेभान' काकू राहायला आल्या आहेत. त्यांनी 'हे लोणचे खाताना जरा जपून खा हं' असे सांगून दिलेले लोणचे मी भाजीसारखे खातो. आता मला महाराष्ट्रच समजेनासा झाला आहे राव!

परत मागीतले तर म्हणे 'देईन, पण लिंबू पिळून, तुम्हाला इतके तिखट सहन नाही व्हायचे'!

खानदेशात, मामीने भाचा भाचीचे पाय पडायची पद्धत आहे.माझ्या मामी माझ्या पाय पडायच्या तेव्हा मीच त्यांच्या पाया पडायची ..
त्या म्हणायच्या कि आम्हाला कशाला पापात पडते .म्हटले लहानांनीच पाया पडायला हव्या .काही पण प्रथा कशाला सुरु ठेवायला हव्या .

पल्लवी जोशीची मुलाखत होती खुपते तिथे गुप्ते मध्ये बहुतेक , तिचा कन्यादान ह्या शब्दाला विरोध होता तिने आई वडील आणि भटजी ला सांगितले कि कन्यादान सोडून सगळे विधी करा .तिचे आई वडील म्हणाले कि ,आम्हाला पुण्या मिळेल ,पण ती म्हणाली कि मग पुत्र पण दान केला पाहिजे Happy तिच्या सासूने पण त्याला पाठींबा दिला आणि कन्यादाना शिवाय विवाह पार पडला .

=)) Lol =))

या चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत? जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील? मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्‍यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील? अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील? >> मंजूडी चांगले प्रश्न. चर्चेतून आपली मते आपल्याला स्पष्ट होतात. लग्नाळू मंडळीना मोक्याच्या वेळी ठामपणे पण नम्रतेने, प्रेमाने कसे वागावे ह्याचे उदाहरण मिळते. हल्ली वेगळा विचार करणारी मुले (नवरे मुलगे) आहेत. एका कझिनला ज्या मुलीशी लग्न करायचे होते ती सिंगल अगेन गटात होती त्यामुळे तिच्या घरची पुन्हा लग्न लावून द्यायची तयारी नव्हती. मुलाचे पहिलेच लग्न असल्याने लग्न रीतीने व्हावे ही अपेक्षा होती. मुलीने रजिस्टर लग्न आणि विधिवत लग्नाचे बजेट काढले मग प्रेमाने सांगितले मी विधी आणि माझे १०-१५ आप्त एवढाच खर्च उचलू शकते. मुलाने स्वतः बाकी सर्व (५० लोकांच रिसेप्शन, परगावी पाहुण्यांचा खर्च, देणेघेणे कपडे इ.) खर्च केला. आमची ज्ये.ना मंडळी आधी नाराज झाली पण एकूण लग्नव्यवस्था बघून खुश झाली. ती कुटुंबात समरस झाली आहे. थोडक्यात, चांगली उदाहरणे एकमेकांना सांगत रहावी. हळूहळू बदल घडतो.

एकसे एक भंकस मुली>>>> वाचल्याच म्हणायच्या!
रत्नागिरी औरंगाबादकर किस्सा महान! लग्नानंतर तरी सुधारले का बेभान देशस्थ?

'ह्या ट्रीपनंतर भंगारात काढायची आहे' अश्या स्वरुपाची बस अंगणात आली >> Proud विनोदाचा भाग सोडला तर अश्या बेजबाबदार वाहनांनुळे अनेक लग्नांमधे नवरा नवरी सहीत पुर्ण वर्‍हाडाला अपघात झालेले आहेत आमच्या भागात .आणि नंतर आनंदावर शोककळा(आता इथे तेच कसे योग्य याचे कोणी समर्थन करु नये अन्यथा तो एक विनोद समजला जाईल :स्मित:)

dreamgirl तुमच्या सगळ्या पोस्ट आवडल्या.सगळ्या पोस्ट पट्ल्या म्हणुन तर मला २स्टेट्स चित्रपट खुप आवडतो, पण (काही)लोक त्यावरही वाद घालत होते काही महिन्यांपुर्वी की आईवडिलांची मर्जी आजकालची मुलंमुली कशाला घेतील? सगळच आटपुन वगैरे . त्यामागची भावना लक्षात येत नाही त्यांच्या . तुमचं उदाहरण अगदीच वाईट नाही .कुणाचही मन न दुखावता लग्न केलत हे नक्कीच अभिमानास्पदच आहे त्यात तुमचं काही चुकलय असं मला तरी वाट्त नाही .कधी कधी स्वभावाला औषध नसते .तुमच्या स्टोरीचा शेवट हॅपी झाला हे महत्वाचं. Happy

पाया पडण्याच्या बाबतीत मला इतकेच वाटते की पाया पडा आणि संपवा विषय ,मनापासुन पडलात तर चांगलच आहे .(आमच्याकडे आहे ही पाया पडण्याची पद्धत आणि मला फार आवडतेही , हेल्थ ला चांगली, वाकुन अगदि मेंदुपर्यंत पोचतो रक्तप्रवाह Happy )

ब्राम्हणाबद्दल इतकच की जर "अत्रुप्त आत्मा" यांच्या सारखा कलाकार भटजी असेल तर त्यापुढे पैश्याचे काय मोल . Wink Happy

ब्राम्हणाबद्दल इतकच की जर "अत्रुप्त आत्मा" यांच्या सारखा कलाकार भटजी असेल तर त्यापुढे पैश्याचे काय मोल .

सहमत. Happy १०,००० रुपयात एवढे सगळे बसत असेल तर स्वस्तच म्हणायचे.

>>> सगळे व्यवस्थित होत आहे हे काहींना बघवत नाही. त्यातही पुन्हा माझ्या हस्तक्षेपाशिवाय व्यवस्थित होत आहे हे तर अजिबातच नाही. मग असे प्रॉब्लेम्स उद्भवत असावेत. <<<< अगदी अगदी...
नशिबाने बैठकीच्या वेळेसच बाजुला कोपच्यात घेऊन अशाच काहीशा शब्दात या बद्दल माझे अन व्याह्यांचे एकमत झाले होते, व बाकि काड्या घालणार्‍या लोकांकडे निक्षून दुर्लक्ष करावे अशा सल्ल्याच्या देवघेवी झाल्या होत्या. Lol

बेफिकीर, भन्नाट अनुभव..... छान लिहीलाय.
"उशीर, म्हणजे? ते काय अस्ते? घड्याळ? ते कशाला अस्ते? त्याची (हेल्मेटसारखी) सक्ती का? वापरायचे तर मनगटावर छान दिसायला वापरू, आतले काटे कशाला बघायचे?" असा सगळा खाक्या अस्तो....
मी सुपातून जात्यात आलोय केव्हाच... माझ्या लग्नावेळेसच Proud सध्या पीठ होउन बाहेर पडतोय सगळ्यातून...

प्रत्येकाने आपल्या व दुसर्‍याच्या लग्नाचे अनुभव सांगितले आहेत जे होउन गेले आहेत.होउन गेलेल्या अनुभवातुन शहाने होउन पुढच्या पुढिसाठी काय करायचे ठरवले आहे ते पण सांगनार का??

आमच्या मामेबहिणीच्या लग्नामध्ये बेफिकीर यांनी वर्णन केलेला सिमिलर किस्सा घडलाय. फक्त ते लग्न कर्नाटकात असल्याने सीमंतपूजन आणि रूखवताचे जेवायला रात्रीचे दोन वाजले. रात्रीचे दोन आणि तरीदेखील वरपक्षामधल्या काही महान स्त्रिया "आम्ही दमून आले तर कॉफी विचारली नाही" म्हणून बडबडल्या. रात्री दोन वाजता ते केळीच्या दहाबारा पानांवर वाढलेलं मांडे वगैरे पंचलक्वान्न्नांचं जेवण जेवल्यानंतर!!!

त्याच लग्नामध्ये नवरा मुलगा स्वत:च्या घरामध्ये सूटावरचा कोट दरवाज्याच्या मागे लावलेला विसरून आला होता. हे लक्षात आलं रिसेप्शनच्या आधी. नवर्‍या मुलाचं गाव बागलकोट इथे हा किस्सा घडल्यानं आम्हाला दिवसभर टिंगल कराय्ला विषय मिळाला. (कानडीमद्ये दरवाज्याला बागला म्हणतात!)

Pages