वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 November, 2014 - 05:44

रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्‍या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!

वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत शरीर जसजसे थकत जाते तसतसे मनही खूप कातर होत जाताना दिसते हे पाहिले आहे, अनुभवले आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, शारीरिक असमर्थतेमुळे मन खट्टू होणे, शरीराची दुर्बलता ही आयुष्याच्या आनंदात बाधा आणणारी मानणे, आप्तस्वकीयांचा वियोग - विरह सहन न होणे, बदलत्या काळासोबत स्वतःला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे व शारीरिक असमर्थतेमुळे आलेल्या मर्यादा, मनाचा हट्टीपणा.... या आणि अशा अनेक गोष्टी ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांच्या मनातली नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यात कोणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले, कोणाचा अपमृत्यू झाला, टीव्हीवर कोणतीतरी भयानक बातमी पाहिली किंवा काहीतरी अस्वस्थ करणारे वाचनात आले की झाले!

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वतःच्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते. वेदनांची, मृत्यूची भीती आणि आपल्यानंतर काय याची चिंता झोप उडविते.

मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, औषधोपचारांस व वैद्यकीय तपासणीस खळखळ व टाळाटाळ, कुपथ्य, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वतःच्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल अनुत्साह... हे सारे कसे हाताळायचे?

या सार्‍याचा परिणाम त्यांच्या शरीरस्वास्थ्यावर तर होतच असतो, शिवाय इतर कुटुंबावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यांचे खिन्न असणे हे जवळच्यांना सहन न होणारे असते. ज्येष्ठ व्यक्ती जर वेगळी राहात असेल व स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याबद्दल आग्रही असेल तर अनेकदा हे नैराश्य लवकर कळूनही येत नाही.

ज्येष्ठांमधील नैराश्याला दूर करण्यासाठी वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त कोणते उपाय करता येतात व येऊ शकतात?

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत त्यांचे औदासिन्य, निराशा कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे?

यासंदर्भातील काही उपयुक्त माहिती, सल्ले, अनुभव, टिप्स जरूर शेअर कराव्यात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मैत्रिण एका गुणेआजींकडे पेईंग गेस्ट रहायची आम्ही विद्यापीठात एमए करताना, आजी होत्या ७० वर्षांच्या एकट्या रहायच्या. मुलाने टाकले होते वाटते. गजनी होत्या दर २-५ मिनिटानी माणूस विसरायच्या, आणि सारखे नव्याने ओळख करून घेऊन म्हणायच्या "ये डोक्याला तेल लावून देते". भाजी परत परत आणायला जायच्या. तेव्हा गम्मत वाटायची. आता आठवून फार वाईट वाटते.

डीविनिता, भजनी मंडळाच्या पोस्ट्ससाठी +१! आमच्याकडेदेखील असाच दंगा चालतो! वयस्कर बायकांसाठी भिशी ही देखील हक्काने relax होण्याची चांगली जागा आहे! आत्याच्या भिशीच्या बायका अजूनही दरवर्षी कुठे कुठे फिरून येतात.
माझ्या लहानपणीच्या आठवणीतली आजी देवळात जायची. माझी आई देखील आता घरातच भजनी मंडळ जमते म्हणून त्यात सामील होते. मला स्वतःला म्हातारी झाल्यावर काय करत असेन अशी कल्पना करता येत नाहीये अजून मला! पण भजन वै. will be the last thing!

जिज्ञासा भजन शिकून घे, >>>>?

बादवे जिज्ञासा मधला ज्ञ टंकता येत नाहीय.>>>>:हाहा: अग मग तिचे नाव लिहीलेस कसे?:फिदी:

रश्मी. सहमत
<<<<या ज्येष्ठ नागरीकानी मानसीक ताण-तणाव करणार्‍या सिरीयल ( हिन्दी-मराठी कुठल्याही) अजीबात बघुच नये या ठाम मताची मी आहे. मला मान्य आहे की तब्येती मुळे, वाढत्या वयामुळे बर्‍याच ज्येष्ठाना टिव्ही हाच आधार असतो पण या सिरीयल मध्ये आजकाल सासु-सुनान्मधील तणाव, सासर्‍या-सुनेमधील वाद, मुलाचा भिडस्त पणा ( का रे दुरावा ही झी ची सिरीयल माझ्या सारख्या चाळिशीकडे जाणार्‍या बाईला खूप ताण आणते, तर वयस्कर लोकान्चे काय? ज्याना कदाचीत आपल्या मुला-सुनेकडुन असले अनूभव आलेय) हेच दाखवतात. आणी मग जूनी दुखे: आठवुन हे लोक स्वतःला त्रास करुन घेतात>>>>>. प्लस वन वन वन .
माझि आई वय ६८ वर्ष सध्या हेच चालु आहे.:अओ:

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत त्यांचे औदासिन्य, निराशा कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे? >> यावर तर फारच कठीन वाटते. निदान कुठे तरी जुळल्याने दोन माणसे घरी येतात, हीही त्यांचेकडे कधी तरी जातील सुखदु:खाच्या गप्पा रंगतील असे व्हायला पाहीजे परंतु वरील प्रकारतील व्यक्ती एकलकोंडी असल्यासारखे जाणवते. तेव्हा कुठेतरी जुळलेले बरे जसे संघ, ज्ये.ना. संघ, बगीचा मधे सकाळ संध्याकाळ समवयस्का सोबत किंवा पती-पत्नी फिरायला जाणे असे केल्यास आपोआप मैत्री वाढेल आणि त्याच्या बदल जाणवेल. टीव्ही वरील सिरीयल पाहणे बंद करणे आजच्या घडीला फार जरुरी वाटते. आमचे शेजारी जोडपे अजिबात सिरीयली पाहत नाहीत २ वेळा फिरायला जातील, तिर्थयात्रा झाल्यातरी अजुन कुठे जाऊन येतील त्यामुळे मन मोकळे होत राह्ते. घरातील तोच तोच पणाचा कंटाळा निघुन जातो. असा कंटाळा तर बहुतेकांनाच येतो. २ दिवस जरी बाहेरगांवी जाऊन आले की थोडे तरी वेगळे वाटायला लागते.

अग मग तिचे नाव लिहीलेस कसे?>>अगं कॉपी पेस्ट केले शेवटी!
अन्‌ भजन शिकून घेऊदे की, आवाज, सूर नकोच आहेत Proud

ज्या ज्येष्ठांना पाळीव प्राणी, लहान मुले, माणसांची फारशी आवड नाही, अध्यात्मात रुची नाही, घराबाहेर पडायला व लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही अशांच्या बाबतीत>> मला पण अश्या प्रकारचा स्व भाव म्हणजे रेसीपी फॉर डिप्रेशन असेच वाटले होते लेख वाचला तेव्हा. पण म्हटले असतीलही असे काही लोक्स. जर काहीच पहिल्यापासून केले नसेल. कट़कट्या रुक्ष, विक्षिप्त दु:खी पेसीमिस्टिक वैतागवाणा असाच स्वभाव पहिल्या पासून असेल तर तो म्हातारपणात काही बदलणे शक्य नाही. अश्या माणसांशी इंटरअ‍ॅक्षन सुद्धा नको वाटते.

तसेच म्हातारे जोडपे असेल व त्यात एक अश्या स्वभावचे असेल तर दुसर्‍याचे फार हाल होतात. अश्यावेळी दुसृया स्पाउसला थोडी ब्रीदिन्ग स्पेस द्यावी. अगदी सेपरेशन नाही तरी चारआठ दिवस यात्रेला, दुसृया मुलाकडे वगैरे पाठवावे. डिप्रेशन मुळे आहेत ते आजार बळावतात व नसलेले आजार येण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. उगीच इतक्या वर्षांचा संसार वगैरे रोमॅटिक कल्पनांवर विसंबून
आहेत ते दिवसही दु:खी करून घेउ नये. पण हे नातेवाइकांच्याच पचनी पडत नाही. भारतातही ६० च्या पुढे विभक्त झालेल्या जोडप्यांच्या केसेस आहेतच.

मृ देवी,

तुमच्या मातु:श्रींच्या उल्लेखनीय जीवनास वंदन! Happy

ज्या वृद्ध व्यक्तींनी स्वतःला व्यस्त राखून आपले आरोग्य, मनस्थिती आणि दिनचर्या उत्तम जोपासली आहे त्यांचे खरेच कौतुक आहे. आपला वेळ इतरांच्या उपयोगी पडावा म्हणून काही चांगल्या उपक्रमांत भाग घेणारे आजी-आजोबाही पाहाण्यात आहेत. त्यांची सकारात्मक दृष्टी पाहून छान वाटते.

अरु +१

खूप छान वाटतंय स्वतःला अ‍ॅक्टिव्ह राखलेल्या ज्येष्ठांचं वाचून.

जे शरीर थकल्यामुळे अ‍ॅक्टिव्ह राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी मात्रं बाकिच्यांनी जाणीवपुर्वक प्रयास करावेत. आधीच शरीराने थकलेले व त्यात मनानेही खचले तर सगळंच कठिण.

ज्या वृद्ध व्यक्तींनी स्वतःला व्यस्त राखून आपले आरोग्य, मनस्थिती आणि दिनचर्या उत्तम जोपासली आहे त्यांचे खरेच कौतुक आहे<<<

सुदैवाने ह्यात माझे वडील बरेच अग्रेसर आहेत.

वय ८२! प्रकृती ठणठणीत! अध्यात्मात रस! रोज दोन तास पूजा, बाकी दिवसभर धार्मिक वाचन! टीव्ही सिरियल्स, बातम्या, वर्तमानपत्रे व दिवसातून तीन वेळा एक एक तास चालणे! (पहाटे सव्वा पाच ते सव्वा सहा, सकाळी दहा ते अकरा, सायंकाळी साडे पाच ते साडे सहा). ह्याशिवाय पहाटे घरातच अर्धा तास व्यायाम !

शुद्ध शाकाहारी, आयुष्यभर पूर्ण निर्व्यसनी! आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वयंपूर्ण!

आता हात फ्रॅक्चर झाला व शुगर डिटेक्ट झाली तेव्हापासून ह्या रोजनिशीत काही बदल झाले, पण आता ते पूर्ववत होत आहेत. विशेषतः आई गेल्यानंतर त्यांनी स्वतःला खूपच सावरले. शुगर आहे हे समजल्यापासून आहारावर अगदी सहज नियंत्रण आणू शकले.

त्यांनी त्यांची आई (माझी आजी) सतत आजारी राहात असल्यामुळे त्यांच्या वयाच्या चक्क सातव्या वर्शापासून पोळ्या लाटलेल्या आहेत व स्वयंपाक केलेला आहे. त्यांना एक मोठा भाऊ, पाच लहान भाऊ आणि दोन बहिणी! त्यांचे हे अती लहानपणी स्वयंपाक करण्याचे उदाहरण मला आठवले मी पुन्हा थक्क होतो.

असो, प्रतिसाद लांबला! पण वडिलांकडे बघून अनेकदा असे वाटते की असे आयुष्य जगणारे वृद्ध असतील तर नैराश्य येईलच कसे!

(वडिलांचीच माहिती देत बसण्याचा मोह झाल्याबद्दल क्षमस्व)

आमच्याकडे पण धार्मिक वाचन, पेपर वाचन, सिरियल्स, बातम्या चालू असतं. पण साबा आणि माझे बाबा दोघांनाही एकटं बाहेर पाठवू शकत नाही मध्यंतरी बीपीमुळे मोठे प्रॉब्लेम्स झाल्यामुळे. बाबांना ते पाय मोकळे करायला गेले असताना अचानक बीपी शूट होऊन ऑलमोस्ट पॅरेलेसिस अ‍ॅटॅक /हार्ट अ‍ॅटॅक येता येता राहिला होता. ते पुर्ण तिरके झाले होते रस्त्यातच. मग रस्त्यावरचेच २ जण त्यांना धरुन घरी घेऊन आले. पुढच्या अर्ध्या तासात बाबा आयसीयू मध्ये अ‍ॅडमिट. दोन्ही अ‍ॅटॅक्स परतवले गेले. साबांच्या डोळ्यांचं बीपी शूट होऊन एका डोळ्याने पुर्ण दिसेनासे झाले असल्याने त्यांनाही एकटं पाठवू शकत नाही. बाबांना खूप कमी ऐकू येतं व श्रवणयंत्र सूट झालं नाही त्यामुळेही त्यांना एकटं बाहेर पाठवता येत नाही.

त्या दोघांना घराबाहेरचा विरंगुळा म्हणून स्वतःच कुठेतरी नेऊन आणावं लागतं.

अमा ,
खरंच गं!
अशा लोकांना कसं सांभाळावं तेच कळत नाही!
बोलायला गेलं तरी प्रॉब्लेम होतो.. नाही बोललं तरी! Sad

फॉलो करतेय.. बघुया काही उपाय सापडतो का मला ही!

आपल्याकडे प्रवास अजूनही वृद्धांसाठी सुखाचा असा म्हणवत नाही. आई आयुष्यभर फिरत राहिली, अगदी एकटीनेही.
आताही फिरायचे असते पण आम्हाला तिला एकटीला बाहेरगावी पाठवायचे धाडस होत नाही. प्रत्येकवेळी सोबतीला कुणी मिळेल, हेही शक्य नाही. तो तिला सल असतो.

महिन्यातून एकदोनवेळा नाटक सिनेमाला मात्र नेतो. त्याची चांगली सोय आहे मुंबईत.

मला वाटते की धाग्याचा विषय वेगळा आहे आणि बरेसच प्रतिसाद वेगळ्याच दिशेने आले आहेत.

ज्यांचा स्वभाव निराश होण्याचा नाही ते स्वताला गुंतवुन घेतात, छंद सांभाळतात आणि जमेल तितके आनंदी रहातात. अशी उदाहरणे देउन काहीच उपयोग नाही.

प्रश्न असा आहे की जी वृद्ध मंडळी निराश आहेत त्यांच्या साठी काय करावे किंवा त्यांनी काय करावे?

तसेही वृद्धापकाळी नैराश्य येणे हे नैसर्गीक आहे. ते थोडे गृहीते धरले पाहीजे.
औषधांचा चांगला उपयोग होतो. ती नक्कीच घ्यावीत.

छंद करा, फिरायला जा, मित्र जमवुन गप्पा मारा हे सांगणे ठीक आहे, हे सर्व जर जमत असेल तर ती व्यक्ती नैराश्यात जाणारच नाही. आणि ज्या व्यक्तींना हे जमत नसते, आवड नसते कींवा स्वभाव मनमोकळा नसतो, कुढणारा असतो, त्यांना हे सल्ले देउन काही उपयोग होत नाही.

त्यामुळे सीरोटोनीन वाढवणारी औषधे घेत रहाणे हा थोडाफार उपाय आहे.

मलाही टोचासारखेच वाटते आहे. धाग्याच्या उद्देश वेगळा आहे. इथे लोक आपली उदाहरणे देत आहेत ज्यातील व्यक्ती सकारात्मक आहेत.

माझ्यामते वृद्ध लोक आधीच थकलेले असतात आणि हल्लीच बदलत जाणारे जग ह्याशी जुळवून घेणे कदाचित त्यांना जमत नसेल. मुळात अंगात जोर नसताना चालणे फिरणे हे सुचवण्याचा प्रश्न येतच नाही. अशा व्यक्तींना प्रेम आणि आधार देणारे आणि मुख्य म्हणजे आता ते आहेत तसे प्रेमानी स्विकारणे ह्याची गरज असते. त्यामुळे मी म्हणजे जी लोक त्यांच्या जवळ आहेत त्यांना थोड्या टिप्स द्यायला पाहिजेत.

माझी आई ८० ची आहे. निरक्षर आहे. पुण्यात राहते. दरवाज्याची लॅच सुद्धा कशी उघडावी माहिती नाही. फोन करणे, टीव्ही लावणे, जमत नाही. म्हणून मी तीन गॅलर्‍या असलेले घर घेतले. मुद्दम २ रा माळा निवडला. वर्‍हाडी शिवाय इतर कुठलीच भाषा आईला येत नाही. मल तिची सतत काळजी असते पण ती सतत स्वतःला कामात ठेवते. अजूस्वैपाक्म, धुनी, भांडी, झाडलोट सगळे काही करते. पण घराअतल्या घरात.

सीरोटोनीन वाढवणारी औषधे घेत रहाणे हा थोडाफार उपाय आहे>>माफ करा पण मनाच्या डॉक्टरकडे गेले की नैराश्य जास्त पकडते वृद्धांना असा माझा घरातला अनुभव आहे. याना समजावणे आणि त्यानी समजून घेणे यापलिकडे गेलेले असतात. त्यांच्या अवतीभवतीची कमी जास्त वयाची मंडळी सुखी असूनही हे मात्र नैराश्याने ग्रासलेले असतात. उदा. सासरे माझे ८४ व्या वर्षी पण दणकट नि मनाने खंबीर होते पण साबा मात्र पार खचल्या होत्या. याउलट आई माझी ब-यापैकी नीट तर बाबा मात्र ६५ व्या वर्षी केवळ शुगर डिटेक्ट झाली व मोतीबिंदू मुळे दोन तास हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले तर खचले. साबा व वडील मानसोपचार करणा-या डॉक्टर कडे नेल्यावर जास्तच निराश झाले.

मनाच्या डॉक्टरकडे गेले की नैराश्य जास्त पकडते वृद्धांना असा माझा घरातला अनुभव आहे>>>>>> हे शक्य आहे. पण तुम्हाला काऊंसेलर म्हणायचे आहे की औषध देणारा डॉक्टर?

अमेरिकेतल्या एका अभ्यासाप्रमाणे, नैराश्यासाठी काउंसलिंग ला गेलेल्या १० पैकी ४ लोकांचे नैराश्य अजुनच वाढते.

अमेरिकेतल्या एका अभ्यासाप्रमाणे, नैराश्यासाठी काउंसलिंग ला गेलेल्या १० पैकी ४ लोकांचे नैराश्य अजुनच वाढते.>>>> टोचा @ हा नैराश्यासाठी काउंसलिंग ला गेलेल्या व्यक्तींना झालेला एक तोटा असु शकतो.पुर्ण काउंसलिंगच तोट्याचं आहे असं म्हणु शकत नाही ना. हे माझं फक्त मत आहे. मी त्यातली जाणकार नाही.

बाकी मी तुमच्या व बी यांच्या वरच्या पोस्ट शी सहमत आहे. व इतरांच्याही कारण मला वाटतं इथे येणार्यां प्रत्येक पोस्ट च्या अनुभवा मधुन कुणाला ना कुणाला उपयोग होउ शकतो . तुम्ही लिहिल्याप्रमाणे जर <<<<"छंद करा, फिरायला जा, मित्र जमवुन गप्पा मारा हे सांगणे ठीक आहे, हे सर्व जर जमत असेल तर ती व्यक्ती नैराश्यात जाणारच नाही. आणि ज्या व्यक्तींना हे जमत नसते, आवड नसते कींवा स्वभाव मनमोकळा नसतो, कुढणारा असतो, त्यांना हे सल्ले देउन काही उपयोग होत नाही.>>>>>तर त्यांच्याशी कसे डील करायचे .तर इथे माझ्यामते त्यांच्या(निराश व्यक्तीच्या) कलाने घ्यायचे,शक्य तीतकी आवडनिवड सांभाळायची .काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायची.इतकच आपण ,मला वाटतं करु शकतो.इतरांनी अजुन सुचवा.

औषधा विषयी मागे इथेच कुठेतरी पुष्पऔषधी विषयी वाचले होते. जास्त माहीती नाही. पण एवढेच माहीत आहे की डॉक्टरांनी सांगितल्या शिवाय कुठलेही औषध घ्यायचे नाही.

नैराश्य दूर करण्यासाठी झगडत राहणे हाच त्यावर उपाय आहे. ते झगडत कसे रहावे हा चर्चेचा विषय आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.इतरांची उदाहरणे प्रेरणादायक ठरु शकतात. बर्‍याचदा कळत पण वळत नाही अशा परिस्थितीत कुठली गोष्ट ट्रिगर देईल हे सांगता येत नाही.त्यामुळे चर्चा अगदी भरकटली आहे असे म्हणता येणार नाही.

नाही मला काउन्सेलिंग नाही, मानसोपचार (अॅलोपथी) म्हणायचे होते. काउन्सेलिंगचे बरेच फायदे होतात.

>>मनाच्या डॉक्टरकडे गेले की नैराश्य जास्त पकडते वृद्धांना असा माझा घरातला अनुभव आहे. >>
याचे कारण अशा प्रकारच्या आजाराबाबत स्टिग्मा हे देखील असू शकते. मनोरुग्ण म्हणून एक विचित्र इमेज डोक्यात तयार झालेली असते. किंवा ओळखीन, नात्यात डिमेंशियाचा पेशंट असेल तर आपले पण असेच होणार का या भितीने खचायला होते. चांगले डॉक्टर पहिल्यांदा बोलून ही भीती दूर करतात. रोज कुठली औषधे घेतली जातात ते पहातात. वायटामिन डिफिशियन्सी हे देखील नैराश्याचे कारण असू शकते. काही वेळा इतर आजारांसाठी घेत असलेल्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनही नैराश्य येते. बिटा ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, प्रिस्क्रिप्शन पेन किलर्स, स्टॅटिन या औषधांचे साईड इफेक्ट म्हणून डिप्रेशन येऊ शकते. वृद्धांच्या बाबतीत अशा प्रकारच्या साईड इफेक्ट्सची शक्यता वाढते. तसे असेल तर डोस कमी करणे, ते शक्य नसेल तर जोडीला अ‍ॅन्टी डिप्रेसंट असे करतात.

बर्‍याचदा कळत पण वळत नाही अशा परिस्थितीत कुठली गोष्ट ट्रिगर देईल हे सांगता येत नाही.त्यामुळे चर्चा अगदी भरकटली आहे असे म्हणता येणार नाही.>>> +१

निराशा आणि उपचार एवढेच बोलण्यापेक्षा आपले घरचे वृद्ध, त्यांचे अनुभव, इ. प्रतिसाद सुद्धा विषयास समांतरच असल्याने धागा भरकटला आहे असे मला वाटतच नाही.

निराशा आणि उपचार एवढेच बोलण्यापेक्षा आपले घरचे वृद्ध, त्यांचे अनुभव, इ. प्रतिसाद सुद्धा विषयास समांतरच असल्याने धागा भरकटला आहे असे मला वाटतच नाही. >>+१

पूर्ण भरकटला नाही पण बरासचा भरकट्ला.

उदा : मी माझ्या कमी IQ च्या मुलीला ७०% मार्क कसे मिळवावे ह्यावर मार्गदर्शन करा असा धागा काढला तर त्यावर प्रतिसादात माझ्या माहीतीतल्या हुशार मुलाला फार अभ्यास न करता ९५% मार्क मिळाले असे सांगणे.

Pages