कोकण सायकल राईड - पुणे ते दापोली, मुरूड व हर्णे.

Submitted by मनोज. on 30 October, 2014 - 11:50

आपटलेल्या कोकण राईडनंतर आमच्या छोट्यामोठ्या एकदिवसीय राईड्स सुरू होत्या. त्यादरम्यानच्या चर्चांमध्ये गांधीजयंती आणि दसरा असे शनिवार रविवारला जोडून येत आहे आणि त्यामुळे चार दिवसांचा भलामोठा वीकांत मिळत आहे याचीही चर्चा सुरू होती.

अलिबाग, गोवा, गणपतीपुळे ही ठिकाणे ठरत होती आणि चर्चांमध्येच काही ना काही कारणाने कटाप होत होती. सप्टेंबर महिन्यात या विषयी गंभीरपणे चर्चा सुरू झाल्यानंतर अलिबाग किंवा दापोली च्या आजुबाजूला (पण कोकणातच्च.!!) असा ठराव झाला. यथावकाश अलिबागही मागे पडले व दापोली भाग नक्की झाला.

कोणत्या ठिकाणी जायचे..? कोणत्या मार्गे जायचे..? जाताना गाडीत सायकली टाकायच्या की येताना..? मोठ्या वीकांतामुळे किती गर्दी असेल..? एका दिवसात किती किमी अंतर कापायचे..? मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी करायचा आहे..? असे अनेक प्रश्न डोक्यात घेवून आम्ही सर्वजण तीनचारदा भेटलो आणि यापेक्षा दुप्पट नवीन प्रश्न सोबत घेवून एकमेकांचा निरोप घेत होतो. शेवटी अनेक पर्यायांमधून एक पर्याय ठरला

दापोली - असुद - मुरूड - हर्णे - अंजर्ले - केळशी - बागमांडला - हरिहरेश्वर - श्रीवर्धन - दिवेआगार - माणगांव.

अंतर आणि वेळ यांचे गणित जमत जमवणे अवघड दिसत होते त्यामुळे पुणे ते दापोली आणि माणगांव ते पुणे ही घाटवळणे गाडीने पार करावयाची असे ठरले. मुख्यत: ताम्हिणी घाट दोन्हीवेळा घाटांमधून पार होणार असल्याने ही सायकल राईड, खडतर, थकवणारी, कष्टप्रद अशी न ठरता एकदम आरामदायक सहल असणार होती. वर्धन आणि अमितने यावर नाराजी दर्शवली व किमान माणगांव ते पुणे सायकलने येवूया असा प्रस्ताव अनेकदा मांडला. परंतु आम्ही सर्वजण बहुमताने या सूचनेला सतत नकार देत होतो. Wink

रविवारी सर्वजण एकत्र बसलो आणि प्लॅन बनवला. या प्लॅनमध्ये अनेक गोष्टी - अगदी अत्यंत महत्वाच्या गोष्टी "आयत्या वेळी बघू" या सदरात टाकल्या. दापोलीपर्यंत गाडीने जायचे आणि त्या दिवशीचा मुक्काम मुरूडमध्ये करायचा इतक्याच गोष्टी "नक्की" ठरल्या.

बुधवारी रात्री ग्रूपवरती सूचना आणि चौकश्या होत होत्या... अचानक रात्री उशीरा अमितने "अरे आंबेनळी घाटाने जावूया" असा नवीन प्रस्ताव मांडला. पुणे - महाबळेश्वर - पोलादपूर आणि नंतर कोकणांत उतरावयाचे ही सुचवणूक धमाल उडवून गेली. एकमुखाने सर्वांनी ताम्हिणीच्या मार्गावर शिक्कामोर्तब केले.

गुरूवारी सकाळी लवकर उठून वारजे ब्रिजखाली सर्वजण जमले. महिंद्रा पिकअपमध्ये सायकल्स लोड केल्या व निघालो.

IMG_2514.JPG

थोडे अंतर पार केले न केले तितक्यातच,

"ड्रायव्हर नाईट ड्युटी करून आला आहे. आपल्यापैकी कोणीतरी गाडी चालवावी लागेल"

किरण कुमारनी जाहीर केले. मात्र सोबत सर्वजण निष्णात ड्रायव्हर असल्याने "पिरंगुट गाठूया.. मग पुढे बघू!" अशी आश्वस्त करणारी सुचना मिळाली व आम्ही दापोलीकडे कूच केले.

थोडा वेळ किरणने आणि नंतर वर्धनने गाडीचा ताबा घेतला व माणगांव फारसे काही घडले नाही. वर्धन सराईतपणे गाडी चालवत होता. अमित आणि किरण पुढे बसले होते तर केदार गाडीच्या हौद्यातून निसर्गसौंदर्य पाहण्यात आणि कॅमेर्‍यातून वेगवेगळ्या फ्रेम्स टिपत होता. मी (हौद्यातच) गाढ झोपी गेलो होतो.

IMG_20141002_081558.jpg

माणगांव नंतर एके ठिकाणी थांबून नाष्टा आवरला व दापोलीकडे कूच केले.

उन वाढत होते.. उकाडा जाणवत होता आणि तळपत्या उन्हात कोकणातल्या नयनरम्य रस्त्यांवरून आमचे मार्गक्रमण सुरू होते.

दापोलीला साधारणपणे १ वाजता पोहोचलो.

IMG_20141002_130331.jpg

डायवर मामांना टाटा करून व एके ठिकाणी ठीकठाक जेवण आवरून असुद येथील केशवराज मंदिराकडे सायकली वळवल्या. दापोलीची अगदीच निवांत रहदारी सोडून कोकणातला वळणावळणाचा रस्ता आणि हिरवाईसोबत असुदला पोहोचलो

असुद येथे एका घराच्या ओसरीवर सायकली लावल्या व केशवराज मंदिराकडे पायी निघालो.

10624888_855169794493922_552591024283867123_n.jpg

माडापोफळींची दाटी असलेल्या ठिकाणी, लाल मातीच्या पायवाटेवरून मंदिराचा रस्ता सुरू होतो. केशवराज मंदिर, आजुबाजूची शांतता, डोंगरातून वाहत येणारे थंडगार पाणी आणि एकूणच नितांतसुंदर परिसर...

IMG_20141002_150901~2.jpgIMG_2531.JPGIMG_20141002_152229~2.jpgIMG_20141006_082618.jpg

केशवराज मंदिर दर्शनानंतर सायकल जेथे लावल्या होत्या त्या काकांकडे कोकम सरबत प्यायले व आम्ही मुरूडकडे मोर्चा वळवला.

घनदाट झाडी असलेला वळणावळणाचा रस्ता.. आणि संपूर्ण उतार, आम्ही सर्वजण विनासायास मुरूडमध्ये प्रवेश केला व रिसॉर्टमध्ये दाखल झालो.

1798486_855174001160168_6456537074518466843_n.jpg

दुपारचे साडेतीन वाजले होते. रिसॉर्टमध्ये प्रवेश केला. सामान खोलीत टाकले. चहा + थोडी विश्रांती आवरली व आम्ही मासे खरेदीसाठी हर्णे कडे रवाना झालो.

वाटेत एक दोन ठिकाणी समुद्राचा अप्रतीम नजारा बघत आणि थोड्या चढावर आरामात सायकल चालवत आम्ही हर्णे येथे पोहोचलो.

IMG_20141002_172037.jpgIMG_20141002_171957.jpgIMG_2541.JPG

मासे बाजार

IMG_20141002_172211.jpgIMG_20141002_173729.jpgIMG_2554.JPGIMG_2561.JPG

सुवर्णदुर्गाच्या पार्श्वभूमीवर...

IMG_20141002_173610~2.jpg

समुद्रावर थोडाफार क्लिकक्लिकाट करून आम्ही सायकली कुठे लावायच्या या गहन प्रश्नात बुडून गेलो. सायकल व हेल्मेटमुळे आजुबाजूचे सगळे पब्लीक आमच्याकडे "सर्कशीतून पळून आलेले अस्वल" टाईप्स कटाक्ष टाकण्यात गुंतले होते आणि त्यांनी सायकलशी छेडछाड करणे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते.

शेवटी एका होडीच्या आडोश्याला सायकली लावल्या आणि अचानक किरणने "अरे मी नेहमी येतो येथे.. तुम्ही या भटकून. मी सायकल जवळ थांबतो" असे जाहीर केले.

आम्ही बाजारात प्रवेश केला.

माचवे / होडी किनार्‍यावर येत होत्या.. कधीही न बघितलले मासे बघत आणि तिथे होणारे भाव बघत आम्ही थोडा वेळ टीपी केला.
मोठाल्या प्लॅस्टीक बॉक्समधून मासे आणले जात होते व बैलगाडी / रिक्शा / छोटे टेम्पो मधून बाहेर नेले जात होते. बर्फाचाही एक टेम्पो उभा होता. मागणीप्रमाणे बर्फाचा चुरा करून त्याचेही बॉक्स रवाना होत होते.

IMG_2574.JPGIMG_2583.JPG

एकूण सगळा नजारा बघून झाल्यानंतर आम्ही आम्हाला लागणार्‍या मासे खरेदीकडे वळालो.

"ए भाऊ.. कुठली मासे देवू..? पापलेट घे.. अस्ले कुठं मिलनार नाय.."

अशा पद्धतीने आमचे बाजारात स्वागत झाले.

जोरजोरात चाललेले भाव आणि एकावेळी चारपाच ठिकाणी बोलताना आमच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव प्रेक्षणीय असावेत. एक मामी चार पाच छोटे पापलेट ४०० रू ला देत होती. आम्ही नाही म्हणाल्यावर दर दोन मिनीटांनी एक या हिशोबाने पापलेट वाढत होते. एकंदर मासे आणि भाव यांचा काहीच हिशोब न कळाल्याने आम्ही चुपचाप तिथून पोबारा केला.

पुढच्या ठिकाणी केदार एकच मोठा मासा हातात घेवून भाव करत होता.

"अरे हा मासा जून असेल - कोवळे मासे बघ की..!!"

माझे अज्ञान उघडे पडले... आणि तेथे एकच हशा / धमाल उडाली. "अरे काय... मासे कधी जून होतात का..?", "मासे आणि कणीस यांत फरक असतो रे..." अशा कानपिचक्या देत सर्वजण पुन्हा मासळीकडे वळाले.

IMG_20141002_175819.jpgIMG_20141002_173446~2.jpg

शेवटी तिसर्‍याच एका मामीकडे बराच वेळ भाव करून अडीच तीन किलोचा एक "हलवा" नामक मासा ७०० रू ला मिळाला.

IMG_20141002_180035~2.jpg

मासे साफसूफ करताना ती मामी माशांचे भाव, मार्जिन, पैसे सुटत नाहीत वगैरे नेहमीचे बोलू लागल्यावर मी दाबात सांगीतले.. "आम्ही पुण्याहून सायकलने आलोय इकडे"

"चालायचंच बाळा.. वाईट दिवस सगळ्यांच्यावर असत्यात"

त्या कोळीण मामीने सिक्सर मारला होता. Lol

पडलेला चेहरा उचलून.. आणि साफ केलेले मासे घेवून सर्वजण मुरूडकडे निघालो.. तळलेले मासे, गप्पा आणि एकंदर प्रवासाचा आढावा घेत पहिला दिवस संपला.

उद्यापासून सलग सायकलींग सुरू होणार होते.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"चालायचंच बाळा.. वाईट दिवस सगळ्यांच्यावर असत्यात" >>>> भारी !
>>>
हाहाहा.. खास कोकणी उत्तर मिलाला! गारंबी बघून डोळे शांत झाले..

खूप वर्षांपुर्वी ८९-९० साली वडिलांबरोबर मालगुंडला गेलो होतो. बाबांनी एका दुकानाबाहेर बसलेल्या गर्दीतल्या एका म्हातार्‍याला विचारले 'केशवसुतांचा वाडा कुठे आहे?'.
"केशव सूत?? कोष्ट्यापैकी कोन नाय राहात गावात" असे उत्तर मिळाले होते Happy

चालायचंच बाळा.. वाईट दिवस सगळ्यांच्यावर असत्यात">>. Rofl
भारी आहे प्रवास.
भाग रोज एक ह्या हिशेबात येवु देत. Happy

वॉव, मस्त आहे अ‍ॅडवेंचर!!
कोळीण मामी भल्तीच हुश्शार आहे!! Rofl

खूप छान लिहिल आहे. हा बाजार रोज भरतो का? मला बाजार असताना जायचे आहे. बावधन वरुन बस करुन कसे जाता येईल तेवढे जर माहिती असेल तर सांगा.

>>>> मुख्यत: ताम्हिणी घाट दोन्हीवेळा घाटांमधून पार होणार असल्याने ही सायकल राईड, खडतर, थकवणारी, कष्टप्रद अशी न ठरता एकदम आरामदायक सहल असणार होती <<<< घाटांमधून हा शब्द बदलून "(पिक अप) गाडीमधुन" असा हवा आहे का?

>>>> "अरे हा मासा जून असेल - कोवळे मासे बघ की..!!" <<<< Rofl

>>>> "आम्ही पुण्याहून सायकलने आलोय इकडे" <<< = >>>> चालायचंच बाळा.. वाईट दिवस सगळ्यांच्यावर असत्यात <<<< अस्सल कोकणी झटका की रे हा.....

पुढचा भाग कुठाय? पुढे माझे गाव येणारे.....