लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १

Submitted by वेल on 16 November, 2013 - 13:53

आपण जंक फूड खायला सुरुवात केल्यापासून असं लक्षात आलं आहे की, लहान मुलांना खूप लवकर डेन्टिस्टकडे जावं लागतं. असंही पाहाण्यात आलं आहे की अगदी दोन-सव्वादोन वर्षाच्या मुलांच्या सतरा दातांचं रूट कॅनाल करावं लागलं,

आपल्या मुलांच्या दाताचे असे हाल होऊ नयेत म्हणून हा लेख ...

लहान मुलाचा पहिला दात दिसतो साधारणपणे मूल सहा महिन्याचं होतं तेव्हा. काही मुलांना जन्मतःच दात असू शकतात. काही मुलांना चौदाव्या महिन्यातसुद्धा दात येतात. दात येण्याची वेळ हा जेनेटिक फॅक्टर समजला जातो.

मुलांना आलेल्या पहिल्या दाताच्या सेटला दुधाचे दात म्हणतात (मला माहित आहे सगळ्यांना माहिती आहे, तरी सांगितलं). बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा दुधाच्या दाताचे कोश हाडांमध्ये तयार होत असतात.

जबडयाचे चार क्वाड्रण्ट (मराठी शब्द नाही माहिती) पडतात. लहान मुलांच्या प्रत्येक क्वाड्रण्ट मध्ये पाच दात असतात. सगळे मिळून वीस दात. कोणते दात कोणत्या महिन्यात / वर्षी येतात त्याचे चित्र पाहा - teeth eruption pattern.

दात येण्याच्या सुमारास अनेक मुलांना ताप येतो किंवा लूज मोशन्स येतात. आपल्या़कडे समज आहे की हे एकदम नॉर्मल आहे. परंतु कोणताही त्रास न होता मुलांना दात येऊ शकतात. (माझ्या मुलाला काही त्राअस न होता दात आले.) त्याकरीता आपल्याला काही खास काळजी घ्यावी लागते. मुलांच्या हिरड्या तिसर्‍या - चौथ्या महिन्यापासून शिवशिवू लागतात. दात बाहेर येण्यासाठी त्या स्वतःला तयार करत असतात. आपण मुलांच्या तोंडात निरखून पाहिले तर खालच्या हिरडीला आतील बाजूने थोडासा कडक फुगवटा आलेला दिसतो. ह्या काळात मुलांना जी मिळेल ती वस्तू मुले तोंडात घालतात. मुलांना निसर्गानेच दिलेली ही जाणीव आहे की जिथे दात येणार असतो त्यावर चावले की दात बाहेर येताना कमी त्रास होणार आणि दात विनासायास बाहेर येणार. ह्या काळात मुलांना टीदर देणे खूप चांगले. बाजारात कडक प्लास्टिकचे, (मी-मी ब्रॅण्ड किंवा कोणताही दुसरा ब्रॅण्ड), पाणी किंवा जेल भरलेले, वेगवेगळ्या आकाराचे टीदर्स येतात. ते टीदर्स उकळलेल्या पाण्याने धुवून मुलांना चावायला द्यावेत. टीदर्स आपणच आपल्या हातात पकडावेत. मुले स्वत;च्या हातात टीदर्स एखादे मिनिट पकडतात आणि मग ते पडते आणि त्याला परत धूळ लागते. जर टीदर्स द्यायचे नसतील तर स्वत:चे हात स्वच्छ धुवून, हाताला चालेल इतपत गरम पाण्याने धुवून मुलांच्या तोंडात आपले बोट चावायला द्यावे. मुले आरामात पंधरा - वीस मिनिटं बोट चावत बसतात. आपल्यालाही तेवढा वेळ मुलांसोबत गप्पा मारता येतात. (लहान बाळाशी गप्पा - आम्ही मारतो बुवा). असे दर दोन तासाने करावे ह्यामुळे मुले इतर कोणत्याही वस्तू तोंडात घालून चोखणे कमी होते. ह्याशिवाय मुले स्वतःची मूठ तोंडात घालून चोखत असतात तेही थांबवू नये. वरचेवर स्वच्छ ओल्या कपड्याने मुलाचे हात पुसून घ्यावेत. असे केल्याने, आपले किंवा स्वतःचे कपडे, गोधड्या इत्यादी वस्तू तोंडात घालून चोखत नाहीत आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे टळते.

आपण मुलांना चार ते सहा महिन्यांचे असताना वरचे खाणे सुरु करतो. साधारण पंधरा दिवस मुलांना बाहेरच्या खाण्याची सवय झाली की थोडे बारिक टेक्स्चरचे मऊ शिजलेले खाणे द्यावे - (गहू किंवा तांदळाच्या तूपात भाजलेल्या रव्याची वीस मिनिटे मऊ शिजलेली खीर). मुलांना दात आले नसले तरीही टेक्स्चरचे मऊ शिजलेले खाणे द्यावे, मुलांच्या हिरड्या हे खाणे खाण्याइतक्या कडक असतात. मुलांना कधीही कोणतेही खाणे मिक्सरमधून बारीक करून देऊ नये. तसे खाणे दिल्यास मुलांना मिक्सरमधून काढलेले टेक्स्चरलेस खाणे खाण्याची सवय लागते आणि अन्न चावताना त्यात लाळ मिसळण्याची प्रक्रिया, या सवयीमुळे होत नाही, ज्यामुळे अन्न पचनास त्रास होऊ शकतो. (आलेले दात किडू शकतात) शिवाय अशा प्रकारे चावून खाण्याची सवय लागल्याने दात येण्याच्या प्रक्रियेला मदत होते. शिवाय पटपट खा लवकर खा असा मुलांच्या मागे घोशा लावू नये. ह्यामुळे मुलांना घास तसाच गिळण्याची सवय लागते. मुलांना मजेत खाऊ द्यावे. हसत खेळत गप्पा मारत, गोष्ट सांगत.. त्यांना मध्ये मध्ये आपण चावून कसे खायचे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. मुलांना भूक लागली असेल ह्या समजूतीने त्यांनी मागितलेले नसताना त्यांना खायला देऊ नये. अगदी जन्मापासून मुलांना दर दीड ते दोन तासांनीच खायला द्यावे. (अगदी जन्मलेले बाळ फारसे दूध पित नाही, एखाद दुसर्‍या मिनिटात लगेच झोपते, तेव्हा त्याला वीस मिनिटे ते अर्धा तास, झोपेतून उठवून, हलक्या चापट्या मारून, पंख्याखाली उघडे ठेवून, तळपायाला गुदगुल्या करून उठवावे, दूध पिऊन मगच झोपू द्यावे, आणि एका फीडिंगनंतर दोन तास काहीही देऊ नये, मुले भूक लागली की स्वतः उठतात आणि रडतात. मूल रडू लागले की त्याला स्वच्छ करायची वेळ झाली आहे का ते प्रथम पाहावे, त्याला भूक लागली आहे ह्याची खात्री करून मगच दूध पाजावे. साधारण पंधरा - वीस दिवसात मुलांचा दूध पिण्याच्या वेळेचा पॅटर्न तयार होतो आणि तो मग बराच काळ टिकतो. सुरुवातीला आपल्याला खूप संयम ठेवावा लागतो. पण एकदा संयम ठेवला आणि मुलांना दर दोन तासांनीच खायची सवय लागली की मुले व्यवस्थित बाळसे धरतात, त्यांचे पोट अन्न पचनासाठी व्यवस्थित तयार होते - पाचक रस वेळच्या वेळी तयार होतात वगैरे... .पचन व्यवस्थित झाल्याने मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहाते, इम्युनिटि वाढते. दोन तासाचा पॅटर्न फॉलो न करणारी मुले साधरण्पणे किरकिरी असतात कारण पोटात पाचकरस तयार झालेले नसताना त्यांच्या पोटात अन्न जाते,)

दात येण्यास सुरुवात झाली की दाताची निगा राखणे खूप महत्वाचे आहे. दात दिसायला सुरुवात झाल्यावर रोज सकाळी मूल उठले की आणि त्याचे खाऊन झाले याशिवाय रात्री झोपताना दात ब्रश करावे. बोटात अडकवायचा ब्रश आणून त्याने दात घासायला सुरुवात करायची. तो ब्रश खूप मऊ असतो, त्याने हिरडीला कोणतीही इजा होणार नाही. खाऊन झाल्यावर मुलांना पाणी प्यायची सवय लावावी. रात्री झोपण्यापूर्वी मुलांचे खाऊन झाले, ब्रश करून झाले की त्यानंतर मुलांना काहीही खायला देऊ नये. ते अन्नकण दातावर राहून दात किडायची प्रक्रिया लगेच सुरू होते. रात्री झोपेत मुलांना भूक लागते त्यावेळी फक्त आईचे दूधच द्यावे. ते अगदी अशक्य असल्यास मुलांना गायीचे दूध दयावे परंतु त्यानंतर लगेच ओल्या कापडाने मुलांचे दात पुसून काढावेत आणि थोड्या वेळाने पाणी पिण्यास द्यावे. असे न केल्यास मुलांचे दात नक्की किडतात.

साधारण नऊ महिन्याच्या मुलाला सगळे दात आलेले नसले तरीही दूधात कुस्करलेली पोळी (चपाती) मऊ शिजवलेला आणि मऊ कुस्करून वरणात कालवलेला भात हे व्यवस्थित चावून खाता येते. असे चावून खाल्यामुळे मुलांची दात येण्याची प्रक्रिया सोपी होते. ह्या काळातही मुले तोंडात बोटे घालत असतात. त्यांना रांगता, चालता येऊ लागलेले असते, त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे. कोणतीही अस्वच्छ वस्तू त्यांच्या हाताला लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. त्यांना सतत काहीतरी - त्यांच्या ओळखीची वस्तू चावायला द्यावी जेणेकरून मुलांना समजते की चावायची इच्छा झाली तर हीच वस्तू चावायची. साधारण सात - आठ महिन्यापसून मुलांचे दात घासताना मुलांसाठीच्या खास पेस्ट्चा वापर करायला सुरुवात करावी. एकतर त्यांची चव मुलांना आवडेल अशी असते आणि त्यात फ्लोराईडचे प्रमाण खूप नगण्य असते. सुरुवातीला अगदी दोन मोहरीच्य दाण्याएवढी पेस्ट दात घासायला घ्यावी. आपण स्वतःचे दात घासताना मुलांसमोर घासावेत जेणेकरून मुलांना समजते की घरातले सर्व दात घासतात. जमल्यास दात घासणे ही एक ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी करावी.

साधारण दोन सव्वादोन वर्षापर्यंत मुलांचे दुधाचे सर्व दात म्हणजे वीस दात येतात.

बरेच पालक मुलांना दात किडतील म्हणून चॉकलेट खायला देत नाहीत. परंतु चॉकलेटपेक्षा मोठा शत्रू आहे बिस्किट्स. एकतर बिस्किट्स मैद्याने बनतात. त्यात इतर धान्ये असली तरी त्यांचा बेस मैदा हाच असतो. त्यात साखर आणि ट्रान्स्फॅट्स असतात आणि हे मिश्रण दातांना लवकर चिकटते. त्यामुळे मुलांना बिस्किट्स शक्यतो देऊच नयेत, परंतु दिल्यास लगेच दातावरून ब्रश फिरवण्यास सांगावे. चॉकलेट किंवा कोणतीही मिठाई किंवा आईसक्रीम खाल्ल्यावरदेखील लगेच दात घासण्यास सांगावे.

मूल सात वर्षाचे होईपर्यंत मुलांचे दात घासून देण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांना स्वतः दात घासायला द्यावे पण ते आपण घासून दिल्यानंतर. याशिवाय वर सांगितल्याप्रमाणे रात्री एकदा दात घासून झाल्यानंतर मुलांना काहीही खाण्यास देऊ नये. तरीही त्यांनी जर काही खाल्ले तर पुन्हा एकदा दात घासायला लावावे.

मूल दात घासण्यास कंटाळा करत असेल तर त्यांना दात खराब होतील काळे पडतील, त्यांना भोकं पडतील आणि ते तुटतील अशी भीती जरूर दाखवावी परंतु तुला डेंटिस्ट्कडे न्यावे लागेल ते तुझे दात काढून टाकतील, तुला इंजेक्षन देतील अशी भीती कधीही दाखवू नये. पुढे कधी मुलांना डेंटिस्ट्कडे न्यावे लागले तर मुलांच्या मनात भीती असणे चांगले नाही. मुले डेंटिस्ट्कडे जाणार नाहीत.

मुलांना दात येऊ लागले की सहा महिन्यातून एकदा त्याला डेण्टिस्ट्कडे नेऊन दात दाखवून आणावेत. त्याकरता लहान मुलांच्या डेण्टिस्टकडेच गेले पाहिजे असे नाही. लहान मुलांच्या दातावर एखादा काळा ठिपका जरी दिसला तरी लगेच दात तपासून घ्यावे. मुलांचे दात खूप लवकर किडतात आणि किड तशीच राहिली तर मुलांनाही मोठ्यासारख्याच रूट कॅनालसारख्या ट्रीट्मेण्ट घ्याव्या लागतात. ज्या करून घेण्यास मुले तयार होत नाहीत आणि मग कॉन्शस सेडेशन सारखा ऑप्शन वापरून मगच ट्रीट्मेण्ट करता येते. ह्यासाठी अ‍ॅनेस्थेटिस्ट डॉक्टर बोलवावे लागतात. पूर्वी लहान मुलांच्या दाताच्या ट्रीट्मेण्ट जनरल अ‍ॅनेस्थेशिया देउन केल्या जात. परंतु हे केवळ हॉस्पिटलमध्ये केले जऊ शकते. ह्या दोन्ही ट्रीटमण्ट्साठी मुलांना सहा ते आठ तास उपाशी ठेवावे लागते.

ह्याशिवाय कीड तशीच राहिली तर दुधाच्या दाताखाली तयार होणार्‍या कायमस्वरूपी दातांनाही त्रास होऊ शकतो, ते दात येण्यापूर्वीच त्यात (डेव्हलपमेण्टल) डीफॉर्मिटी होऊ शकतात. त्यामुळे हे तर दुधाचे दात आहेत, पडून नवे येणार आहेत असे म्हणून लहान मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दाढांना कीड लागू नये म्हणून एक प्रीव्हेण्टिव ट्रीटमेण्ट करता येते. (भारतात करतात. भारताबाहेर कुठे कुठे करतात माहित नाही). त्यांना सीलण्ट असे म्हणतात. दाढांमध्ये ज्या नैसर्गिक खाचा असतात त्या पाण्यासारखे पातळ प्रवाही औषध वापरून सील करतात. त्यांचा नैसर्गिक आकार बदलत नाही, परंतु त्या खाचा सील होऊन त्यात अन्न अडकत नाही आणि दाढा कीडण्याची प्रक्रिया लांबते. दाढा आल्या आल्या मुलांच्या दाढा सील करून घ्याव्यात. सीलण्ट्स हे दाढा आल्या आल्या आणि किडण्यापूर्वी करता येतात. ज्या दाढा (मोठ्यांमध्ये उपदाढा) किडलेल्या नाहीत, वापरून गुळगुळीत झालेल्या नाहीत, ज्यांचे सुळके खूप जास्त झिजलेले नाहीत अशा दाढांनाच सीलण्ट करता येते.

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते, तिच्याकडेही बरेचदा दुर्लक्ष होते - पण परमनण्ट दातांबद्दल पुढच्या भागात...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुना दात पडल्यावर नवा दात किती दिवसात येतो असे काही स्टॅण्डर्ड नाहीत. काहींना पडण्याआधी येतो काहींना नंतर. हलणारा दात धडपडून पडल्यावर पडला हे खूप कॉमन आहे. तरीही दाताच्या डॉक्टरकडे गेलेले चांगले. ते त्या भागाचा एक्स रे काढून हिरडीच्या आत नवीन दात किती तयार झाला आहे, जो दात पडला तो मूळासकट पडला का आत एखादा तुकडा कपची राहिली आहे हे तपासू शकतील. दात मुळासकट पडलेला आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे कारण कोणत्याही कारणाने एखादा छोटासा तुकडा जरी आत राहिला तरी पुढे इन्फेक्शन होऊ शकते. अर्थात हलणारा दात पडला म्हणजे तो ९९% मूळासकतच पडला असणार. पण तरी रिस्क का घ्या? दाताच्या डॉक कडे जाऊन एकदा दाखवून आणणे बरे.

धन्यवाद वल्लरी. खुपच छान माहिती आहे.
माझ्या मुलीला आता १० वा महिना सुरु आहे. हिरड्या तर ६-७ व्या महिन्यापासुन फुगून आल्यात पण अजुन दात नाही आलेत काही प्रॉब्लेम नाही ना? माझ्या नवर्याला काळजी वाटतेय. पण मी असे वाचले आहे कि ६ ते १४ महिन्यापर्यन्त दात येतात.

Namaskar
Mazi mulgi 3vrshachi ahe 8 divsa pasun dat dukhvte jevn band kel tine. Dr. Ni root canal sangitl varchya donhi bajuchya dadha kidlya. Aaj root canal kel. Pn left side ch gal v lips khup sujla ahe. Dr. Mhantat 3-4divs suj rahnar. Khup kalji vatte. Root canal cha decision chukla tr nahi na. Me kay kru ata. Please help Me.

सूज जायला वेळ लागतोच. रूट कॅनॉल केलाय ना आता विचार करू नका जास्त. दोन दिवस द्या सूज उतरायला.
इतक्या लहान वयात दात किडण्याचे कारण?

माझी मुलगी आता १३ महिन्यचि आहे पन तिला अजुन दात आले नहित अस होऊशकत ka???

चिऊ दादा , वेळ न घालवता डॉक्टरकडे जाउन तपासून घ्या

खालील पॅटर्न मधील इशू असू शकतात

dentist

साधारणपणे दात कधी पडायला हवेत? माझा मुलगा ६.१० वर्षाचा आहे आणि अजुनही दात पडायला सुरवात झाली नाही. कुठला दात दुखतो का किंवा हलतोय का विचारले तर नाही म्हणतो.

डॉक्टर सांगतीलच पण माझ्या मुलाला सुळ्या शेजारचा एक दात आला नाहीये (वय सडे तीन वर्षे) . डॉक्टरांना विचारलं तेंव्हा ते म्हणाले 'जन्मापासून तोंडात एकही दात नसलेली व्यक्ती पहिली आहे का तुम्ही कधी? नाही ना मग relax व्हा' यापुढे ते हे ही म्हणाले की एखादा दात हिरड्यांच्या आत वाढला, दाता मागे वाढला वगैरे प्रकार असू शकतात पण त्याची आत्ता काळजी करायची गरज नाही. 6 वर्षाचा झाला की बघू.

सो तुम्हाला पण हेच सांगते की फार काळजी करू नका. माझ्या मित्राच्या मुलाला दुसऱ्या वाढदिवशी पहिला दात आलेला. त्याची एकंदर सगळीच ग्रोथ वयाच्या मनाने 1 वर्ष उशीरा आहे खरी पण त्याने काही फरक पडत नाहीये फारसा. फक्त दात नव्हते त्यामुळे तो जास्त काही खात पित नव्हता म्हणून अंडर वेट होता. त्याचाही त्याला काही त्रास झाला नाही.

@रीया : तुमच्या मताचा पूर्ण आदर ठेवून सांगतो ,

>> जन्मापासून तोंडात एकही दात नसलेली व्यक्ती पहिली आहे का तुम्ही कधी? नाही ना मग relax व्हा'

अशा व्यक्ती असतात.
जर गर्भाशयात किंवा त्यानंतर दातांची मुळे डेव्हलप झाली नसतील तर काही दात येत नाहीत. वरच्या प्रतिसादात डकवलेली आकृती बघा.
फार क्वचित सगळे दात येत नाहीत .. पण hypodontia म्हणजे काही दात ८-१६ येत नाहीत. हे बर्याच वेळेस घडते.
या सर्व प्रकरणाचा फर्स्ट हॅण्ड अनुभव आहे म्हणून एवढा प्रपंच

एक वेळेस लहान मुलांच्या दंत वैद्याला दाखवा. इतकाच सल्ला

शाहीर, तुमच्या पोस्ट मधल्या शेवटच्या वाक्याशी सहमत. माझंही तेच म्हणणं आहे फक्त पुढे जाऊन माझं हे म्हणणं आहे की डॉक्टरांनी काळजी करू नका सांगितलं असेल तर काळजी करू नकाचा.

शिवाय त्यांचं बाळ फार लहान आहे त्यामुळे तुम्ही सांगितलेली केसच असेल हे ठरवणं is too early. तुम्ही ठरावताय असं म्हणत नाहीये मी.

@चिऊ दादा, लहान मुलांचे दाताचे खास डॉक्टर असतात त्यांना दाखवून घ्या .. कधी कधी कॅल्शियम सप्लीमेंट देतात..

माझ्या बाबतीत अगदी सेम हेच घडले होते, रेग्युलर पेडी ला उशिरा कळले. कारण रेअर केस असते तेवढा आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे पेडी हवेत

चिऊ दादा, घाबरु नका, तुम्हाला अजून खूप वेळ आहे. योग्य तो सल्ला घ्या..
माझ्या मुलाला पुढचे ४+४ दात आले नाहीत पण बाकी सर्व आले .. वयाच्या चौथ्या वर्षा पर्यंत येत होते..
त्यानंतर जबड्याच्या आकार तसाच रहावा म्हणून एक कृत्रिम हिरडी सारखे टूल वापरले पुढे १४ वया वर्षी कायम दात आले की implant करावा लागणार..

याचा मूलांच्या वाढीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही

Pages