लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १

Submitted by वेल on 16 November, 2013 - 13:53

आपण जंक फूड खायला सुरुवात केल्यापासून असं लक्षात आलं आहे की, लहान मुलांना खूप लवकर डेन्टिस्टकडे जावं लागतं. असंही पाहाण्यात आलं आहे की अगदी दोन-सव्वादोन वर्षाच्या मुलांच्या सतरा दातांचं रूट कॅनाल करावं लागलं,

आपल्या मुलांच्या दाताचे असे हाल होऊ नयेत म्हणून हा लेख ...

लहान मुलाचा पहिला दात दिसतो साधारणपणे मूल सहा महिन्याचं होतं तेव्हा. काही मुलांना जन्मतःच दात असू शकतात. काही मुलांना चौदाव्या महिन्यातसुद्धा दात येतात. दात येण्याची वेळ हा जेनेटिक फॅक्टर समजला जातो.

मुलांना आलेल्या पहिल्या दाताच्या सेटला दुधाचे दात म्हणतात (मला माहित आहे सगळ्यांना माहिती आहे, तरी सांगितलं). बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा दुधाच्या दाताचे कोश हाडांमध्ये तयार होत असतात.

जबडयाचे चार क्वाड्रण्ट (मराठी शब्द नाही माहिती) पडतात. लहान मुलांच्या प्रत्येक क्वाड्रण्ट मध्ये पाच दात असतात. सगळे मिळून वीस दात. कोणते दात कोणत्या महिन्यात / वर्षी येतात त्याचे चित्र पाहा - teeth eruption pattern.

दात येण्याच्या सुमारास अनेक मुलांना ताप येतो किंवा लूज मोशन्स येतात. आपल्या़कडे समज आहे की हे एकदम नॉर्मल आहे. परंतु कोणताही त्रास न होता मुलांना दात येऊ शकतात. (माझ्या मुलाला काही त्राअस न होता दात आले.) त्याकरीता आपल्याला काही खास काळजी घ्यावी लागते. मुलांच्या हिरड्या तिसर्‍या - चौथ्या महिन्यापासून शिवशिवू लागतात. दात बाहेर येण्यासाठी त्या स्वतःला तयार करत असतात. आपण मुलांच्या तोंडात निरखून पाहिले तर खालच्या हिरडीला आतील बाजूने थोडासा कडक फुगवटा आलेला दिसतो. ह्या काळात मुलांना जी मिळेल ती वस्तू मुले तोंडात घालतात. मुलांना निसर्गानेच दिलेली ही जाणीव आहे की जिथे दात येणार असतो त्यावर चावले की दात बाहेर येताना कमी त्रास होणार आणि दात विनासायास बाहेर येणार. ह्या काळात मुलांना टीदर देणे खूप चांगले. बाजारात कडक प्लास्टिकचे, (मी-मी ब्रॅण्ड किंवा कोणताही दुसरा ब्रॅण्ड), पाणी किंवा जेल भरलेले, वेगवेगळ्या आकाराचे टीदर्स येतात. ते टीदर्स उकळलेल्या पाण्याने धुवून मुलांना चावायला द्यावेत. टीदर्स आपणच आपल्या हातात पकडावेत. मुले स्वत;च्या हातात टीदर्स एखादे मिनिट पकडतात आणि मग ते पडते आणि त्याला परत धूळ लागते. जर टीदर्स द्यायचे नसतील तर स्वत:चे हात स्वच्छ धुवून, हाताला चालेल इतपत गरम पाण्याने धुवून मुलांच्या तोंडात आपले बोट चावायला द्यावे. मुले आरामात पंधरा - वीस मिनिटं बोट चावत बसतात. आपल्यालाही तेवढा वेळ मुलांसोबत गप्पा मारता येतात. (लहान बाळाशी गप्पा - आम्ही मारतो बुवा). असे दर दोन तासाने करावे ह्यामुळे मुले इतर कोणत्याही वस्तू तोंडात घालून चोखणे कमी होते. ह्याशिवाय मुले स्वतःची मूठ तोंडात घालून चोखत असतात तेही थांबवू नये. वरचेवर स्वच्छ ओल्या कपड्याने मुलाचे हात पुसून घ्यावेत. असे केल्याने, आपले किंवा स्वतःचे कपडे, गोधड्या इत्यादी वस्तू तोंडात घालून चोखत नाहीत आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे टळते.

आपण मुलांना चार ते सहा महिन्यांचे असताना वरचे खाणे सुरु करतो. साधारण पंधरा दिवस मुलांना बाहेरच्या खाण्याची सवय झाली की थोडे बारिक टेक्स्चरचे मऊ शिजलेले खाणे द्यावे - (गहू किंवा तांदळाच्या तूपात भाजलेल्या रव्याची वीस मिनिटे मऊ शिजलेली खीर). मुलांना दात आले नसले तरीही टेक्स्चरचे मऊ शिजलेले खाणे द्यावे, मुलांच्या हिरड्या हे खाणे खाण्याइतक्या कडक असतात. मुलांना कधीही कोणतेही खाणे मिक्सरमधून बारीक करून देऊ नये. तसे खाणे दिल्यास मुलांना मिक्सरमधून काढलेले टेक्स्चरलेस खाणे खाण्याची सवय लागते आणि अन्न चावताना त्यात लाळ मिसळण्याची प्रक्रिया, या सवयीमुळे होत नाही, ज्यामुळे अन्न पचनास त्रास होऊ शकतो. (आलेले दात किडू शकतात) शिवाय अशा प्रकारे चावून खाण्याची सवय लागल्याने दात येण्याच्या प्रक्रियेला मदत होते. शिवाय पटपट खा लवकर खा असा मुलांच्या मागे घोशा लावू नये. ह्यामुळे मुलांना घास तसाच गिळण्याची सवय लागते. मुलांना मजेत खाऊ द्यावे. हसत खेळत गप्पा मारत, गोष्ट सांगत.. त्यांना मध्ये मध्ये आपण चावून कसे खायचे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. मुलांना भूक लागली असेल ह्या समजूतीने त्यांनी मागितलेले नसताना त्यांना खायला देऊ नये. अगदी जन्मापासून मुलांना दर दीड ते दोन तासांनीच खायला द्यावे. (अगदी जन्मलेले बाळ फारसे दूध पित नाही, एखाद दुसर्‍या मिनिटात लगेच झोपते, तेव्हा त्याला वीस मिनिटे ते अर्धा तास, झोपेतून उठवून, हलक्या चापट्या मारून, पंख्याखाली उघडे ठेवून, तळपायाला गुदगुल्या करून उठवावे, दूध पिऊन मगच झोपू द्यावे, आणि एका फीडिंगनंतर दोन तास काहीही देऊ नये, मुले भूक लागली की स्वतः उठतात आणि रडतात. मूल रडू लागले की त्याला स्वच्छ करायची वेळ झाली आहे का ते प्रथम पाहावे, त्याला भूक लागली आहे ह्याची खात्री करून मगच दूध पाजावे. साधारण पंधरा - वीस दिवसात मुलांचा दूध पिण्याच्या वेळेचा पॅटर्न तयार होतो आणि तो मग बराच काळ टिकतो. सुरुवातीला आपल्याला खूप संयम ठेवावा लागतो. पण एकदा संयम ठेवला आणि मुलांना दर दोन तासांनीच खायची सवय लागली की मुले व्यवस्थित बाळसे धरतात, त्यांचे पोट अन्न पचनासाठी व्यवस्थित तयार होते - पाचक रस वेळच्या वेळी तयार होतात वगैरे... .पचन व्यवस्थित झाल्याने मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहाते, इम्युनिटि वाढते. दोन तासाचा पॅटर्न फॉलो न करणारी मुले साधरण्पणे किरकिरी असतात कारण पोटात पाचकरस तयार झालेले नसताना त्यांच्या पोटात अन्न जाते,)

दात येण्यास सुरुवात झाली की दाताची निगा राखणे खूप महत्वाचे आहे. दात दिसायला सुरुवात झाल्यावर रोज सकाळी मूल उठले की आणि त्याचे खाऊन झाले याशिवाय रात्री झोपताना दात ब्रश करावे. बोटात अडकवायचा ब्रश आणून त्याने दात घासायला सुरुवात करायची. तो ब्रश खूप मऊ असतो, त्याने हिरडीला कोणतीही इजा होणार नाही. खाऊन झाल्यावर मुलांना पाणी प्यायची सवय लावावी. रात्री झोपण्यापूर्वी मुलांचे खाऊन झाले, ब्रश करून झाले की त्यानंतर मुलांना काहीही खायला देऊ नये. ते अन्नकण दातावर राहून दात किडायची प्रक्रिया लगेच सुरू होते. रात्री झोपेत मुलांना भूक लागते त्यावेळी फक्त आईचे दूधच द्यावे. ते अगदी अशक्य असल्यास मुलांना गायीचे दूध दयावे परंतु त्यानंतर लगेच ओल्या कापडाने मुलांचे दात पुसून काढावेत आणि थोड्या वेळाने पाणी पिण्यास द्यावे. असे न केल्यास मुलांचे दात नक्की किडतात.

साधारण नऊ महिन्याच्या मुलाला सगळे दात आलेले नसले तरीही दूधात कुस्करलेली पोळी (चपाती) मऊ शिजवलेला आणि मऊ कुस्करून वरणात कालवलेला भात हे व्यवस्थित चावून खाता येते. असे चावून खाल्यामुळे मुलांची दात येण्याची प्रक्रिया सोपी होते. ह्या काळातही मुले तोंडात बोटे घालत असतात. त्यांना रांगता, चालता येऊ लागलेले असते, त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे. कोणतीही अस्वच्छ वस्तू त्यांच्या हाताला लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. त्यांना सतत काहीतरी - त्यांच्या ओळखीची वस्तू चावायला द्यावी जेणेकरून मुलांना समजते की चावायची इच्छा झाली तर हीच वस्तू चावायची. साधारण सात - आठ महिन्यापसून मुलांचे दात घासताना मुलांसाठीच्या खास पेस्ट्चा वापर करायला सुरुवात करावी. एकतर त्यांची चव मुलांना आवडेल अशी असते आणि त्यात फ्लोराईडचे प्रमाण खूप नगण्य असते. सुरुवातीला अगदी दोन मोहरीच्य दाण्याएवढी पेस्ट दात घासायला घ्यावी. आपण स्वतःचे दात घासताना मुलांसमोर घासावेत जेणेकरून मुलांना समजते की घरातले सर्व दात घासतात. जमल्यास दात घासणे ही एक ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी करावी.

साधारण दोन सव्वादोन वर्षापर्यंत मुलांचे दुधाचे सर्व दात म्हणजे वीस दात येतात.

बरेच पालक मुलांना दात किडतील म्हणून चॉकलेट खायला देत नाहीत. परंतु चॉकलेटपेक्षा मोठा शत्रू आहे बिस्किट्स. एकतर बिस्किट्स मैद्याने बनतात. त्यात इतर धान्ये असली तरी त्यांचा बेस मैदा हाच असतो. त्यात साखर आणि ट्रान्स्फॅट्स असतात आणि हे मिश्रण दातांना लवकर चिकटते. त्यामुळे मुलांना बिस्किट्स शक्यतो देऊच नयेत, परंतु दिल्यास लगेच दातावरून ब्रश फिरवण्यास सांगावे. चॉकलेट किंवा कोणतीही मिठाई किंवा आईसक्रीम खाल्ल्यावरदेखील लगेच दात घासण्यास सांगावे.

मूल सात वर्षाचे होईपर्यंत मुलांचे दात घासून देण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांना स्वतः दात घासायला द्यावे पण ते आपण घासून दिल्यानंतर. याशिवाय वर सांगितल्याप्रमाणे रात्री एकदा दात घासून झाल्यानंतर मुलांना काहीही खाण्यास देऊ नये. तरीही त्यांनी जर काही खाल्ले तर पुन्हा एकदा दात घासायला लावावे.

मूल दात घासण्यास कंटाळा करत असेल तर त्यांना दात खराब होतील काळे पडतील, त्यांना भोकं पडतील आणि ते तुटतील अशी भीती जरूर दाखवावी परंतु तुला डेंटिस्ट्कडे न्यावे लागेल ते तुझे दात काढून टाकतील, तुला इंजेक्षन देतील अशी भीती कधीही दाखवू नये. पुढे कधी मुलांना डेंटिस्ट्कडे न्यावे लागले तर मुलांच्या मनात भीती असणे चांगले नाही. मुले डेंटिस्ट्कडे जाणार नाहीत.

मुलांना दात येऊ लागले की सहा महिन्यातून एकदा त्याला डेण्टिस्ट्कडे नेऊन दात दाखवून आणावेत. त्याकरता लहान मुलांच्या डेण्टिस्टकडेच गेले पाहिजे असे नाही. लहान मुलांच्या दातावर एखादा काळा ठिपका जरी दिसला तरी लगेच दात तपासून घ्यावे. मुलांचे दात खूप लवकर किडतात आणि किड तशीच राहिली तर मुलांनाही मोठ्यासारख्याच रूट कॅनालसारख्या ट्रीट्मेण्ट घ्याव्या लागतात. ज्या करून घेण्यास मुले तयार होत नाहीत आणि मग कॉन्शस सेडेशन सारखा ऑप्शन वापरून मगच ट्रीट्मेण्ट करता येते. ह्यासाठी अ‍ॅनेस्थेटिस्ट डॉक्टर बोलवावे लागतात. पूर्वी लहान मुलांच्या दाताच्या ट्रीट्मेण्ट जनरल अ‍ॅनेस्थेशिया देउन केल्या जात. परंतु हे केवळ हॉस्पिटलमध्ये केले जऊ शकते. ह्या दोन्ही ट्रीटमण्ट्साठी मुलांना सहा ते आठ तास उपाशी ठेवावे लागते.

ह्याशिवाय कीड तशीच राहिली तर दुधाच्या दाताखाली तयार होणार्‍या कायमस्वरूपी दातांनाही त्रास होऊ शकतो, ते दात येण्यापूर्वीच त्यात (डेव्हलपमेण्टल) डीफॉर्मिटी होऊ शकतात. त्यामुळे हे तर दुधाचे दात आहेत, पडून नवे येणार आहेत असे म्हणून लहान मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दाढांना कीड लागू नये म्हणून एक प्रीव्हेण्टिव ट्रीटमेण्ट करता येते. (भारतात करतात. भारताबाहेर कुठे कुठे करतात माहित नाही). त्यांना सीलण्ट असे म्हणतात. दाढांमध्ये ज्या नैसर्गिक खाचा असतात त्या पाण्यासारखे पातळ प्रवाही औषध वापरून सील करतात. त्यांचा नैसर्गिक आकार बदलत नाही, परंतु त्या खाचा सील होऊन त्यात अन्न अडकत नाही आणि दाढा कीडण्याची प्रक्रिया लांबते. दाढा आल्या आल्या मुलांच्या दाढा सील करून घ्याव्यात. सीलण्ट्स हे दाढा आल्या आल्या आणि किडण्यापूर्वी करता येतात. ज्या दाढा (मोठ्यांमध्ये उपदाढा) किडलेल्या नाहीत, वापरून गुळगुळीत झालेल्या नाहीत, ज्यांचे सुळके खूप जास्त झिजलेले नाहीत अशा दाढांनाच सीलण्ट करता येते.

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते, तिच्याकडेही बरेचदा दुर्लक्ष होते - पण परमनण्ट दातांबद्दल पुढच्या भागात...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक - जी मुले पाळणाघरात जातात त्यांचासाठी - मुलांना डब्याबरोबर ज्यूस देऊ नका - पाणी द्या.. नाहीतर ज्यूस पिऊन गुळण्यां न करता मुलांना झोपवतं असेल तर ज्यूसमधल्या साखरेमुळे दात किडतात...

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते, तिच्याकडेही बरेचदा दुर्लक्ष होते>>>
परमनंट? दाढा पडून परत येत नाहीत का?

Pahilya veesdatanmadhye alelya dadha padun tithe upadadha kinva premolars yetat pan te 10 - 12 hya vayogatat hote. Sadepach sahachya sumaras aaleli dadh jee hyaa vees datamnmage yete ti permanent dadh asate ti padat nahi

Tya dadhebaddal adhik pudhachya bhagat

Iblis hee tumachi shanka mi compliment mhanoon ghete.

मी डेंटिस्ट नाही. पण माझ्या फॅमिली हेड डेंटिस्ट आहे.

माझ्या मुलीच्या दाढा आल्यानंतर आम्ही सीलण्ट करुन घेतले आहे. फारच चांगली ट्रीटमेण्ट आहे. ते सीलण्ट ५-७ वर्ष टिकते असे तिचे डॉ. म्हणाले आहेत.

Dentist mi nahi maza navara ahe>>>> त्यांना आणा की मायबोलीवर! Happy

वत्सला - माझा नवरा आंतरजालापासून कोसो दूर आहे. जीमेल सुद्ध जर त्याला डेस्कटॉपवर वापरायचं असेल तर तो मला बाजूला बसवतो किंवा मी घरात नसेन तर मला फोनवर प्रत्येक स्टेप विचारतो. म्हणून त्याचे हे सगळे विचार मला माझ्या आयडीवरून व्यक्त करावे लागतात. आपले कोणतेही प्रश्न असतील तर खुशाल विचारा, मी नवर्‍याला विचारूनच उत्तर देणार आहे...

मी माझ्या मुलीची दात एकदा मिठा ने मग पेस्ट ने घासुन देते " हे बरोबर आहे का? की काही बदल करु?
तसेच ति जिभ घासत नसल्याने मी तिला मिठाच्या पाण्याची गुळनी करायला लावते

प्रितीभुषण - काय वय आहे तुझ्या मुलीच?. मिठाने घासायची काही गरज नाही. लहान मुलांची पेस्ट वापरली खूप झालं, तसं सुद्धा लहान मुलं जिभ घासत नाहीत किंवा घासू देत नाहीत कारण त्यामुळे त्यांना उलटी येण्याची शक्यता असते, स्पर्शाला खूप सेन्सिटिव्ह असते त्यांची जीभ. साधारण चार वर्षाच्या मुलाची जीभ आठवड्यातून दोन वेळा घासली तरी खूप झाले, पण ती जिभलीने घासावी गदी वरचेवर हलक्या हाताने.. ते ऐकत नसतील तर आपण घासून दाखवावे, बघ माझी जिभ किती स्वच्छ झाली आणि मला आता तोंडात किती फ्रेश वाटतय सांगू.... त्याहून लहान मुलांनी नुसत्या पाण्याच्या चुळा भरल्या तरी पुरे. (दात घासल्यानंतर). मुलं अनुकरणाने शिकतात. आपण केलेलं दाखवायचं त्याचा फायदा सांगायचा, करतात ते सुद्धा.

दातसुद्धा अगदी हलक्या हाताने घासावेत.

वल्लरी खूप माहीतीपर लेख...

२ सूचना (अर्थात बरोबर नसल्यास जाणकारांनी बरोबर करावे) दाताची अंडी - याला दाताची कणी म्हणता येईल का? दाताची अंडी म्हणजे समजलं नाही. क्वाड्रन्ट याला चार विभाग म्हणता येइल का?

काही शंका - मुलांसाठीची टूथपेस्ट सुचवू शकाल का? मुलांची पेप्सोडेंट चालेल का?
अर्णव दाढा घासूच देत नाही. पुढचे दात घासू देतो. दाढा घासताना कडकडून चावतो बोटाला. कसं समजावता येइल?
अधूनमधून मीठाने दात घासावेत असं म्हणतात. ते योग्य आहे का?
दीड वर्ष उलटून गेलं वयाचं तरी अजून चपातीचे तुकडे नीट चावत नाही. फळांचे तुकडे चघळून थूकून टाकतो. म्हणून रस पोटात जाण्यासाठी मिक्सरला बारीक करावं लागतं...
कडधान्यांचा एखादा छोटासा तुकडा जरी जीभेवर आला किंवा पालेभाजीचं पान... तरी तू थू करून पूर्ण घासाच थुंकून टाकतो... चावून खाण्याची सवय कशी लावावी? आयतं मऊ मऊ गिळण्याची सवय लागलेय... बरं वजन हळूहळू वाढतंय त्यामुळे थोडंतरी पोटात जावं असं वाटून मिक्सरला लावून ते देते... Sad
घरी नसल्यामुळे फळांचे तुकडे, लाडू, कुरमुरे, दाणे, लाह्या असले पदार्थ पुढ्यात वाटीत देऊन खायला सांगू शकत नाही... घरी असताना पोटभरीचंच जेवण (चपाती, दूध किंवा वरण भात भाजी) दिलं जातं नाहीतर फळांचे तुकडे चोखून तसाच झोपतो. Sad

. दाढा आल्या आल्या मुलांच्या दाढा सील करून घ्याव्यात. >> माझा मुलगा १० वर्षाचा आहे. त्याला केले तर चालेल का ? साधारण किति खर्च येइल. ?

दाढा आल्या आल्या मुलांच्या दाढा सील करून घ्याव्यात.>>> हे असे केल्याने दाढांची नैसर्गिक धार कमी होत नाही का?

मंजूडी - दाढा सील करायच्या म्हणजे त्यातल्या खाचा भरायच्या. दाढांची धार अज्जिब्बत कमी होत नाही. धार वर असते सुळक्याप्रमाणे आणि खाचा म्हणजे दरीचा एकदम पायथा. सीलण्ट एकदम पातळ प्रवाही असतात खाचेतच बसतात.

सृष्टी - आल्यात तेवढ्या दाढांना करून घे लग्गेच. कारण दाढा वापरून वापरून गुळगुळीत होण्यापूर्वीच सीलण्ट करावे, जास्त टिकते. प्रत्येक दाढेला हजार-बाराशे रुपये खर्च येतो. पण दाढांना कीड लागणे कॅव्हिटी होणे मग त्या रूट कॅनाल होणे ह्यापेक्षा ते चांगले ना?

कोलगेट, पेप्सोडंट ह्यांच्या मुलांसाठीच्या वेगळ्या टूथपेस्ट येतात. त्या वापरायला हरकत नाही. मीठाने दात घासायची आवश्यकता नाही. (टूथपेस्ट वापरत नसल्यास ठीक आहे, पण का नाही वापरायची टूथपेस्ट?)

अर्णवच्या दाढा घासताना बोटात घालायचा ब्रश वापरू नकोस. लांब दांडयाचा ब्रश वापर, सगळी लहान मुलं असच करतात, आमचं बाळ्सुद्धा हेच करायचं आणि त्यांना आपले बोट चावून मजा वाटते..

<<बरं वजन हळूहळू वाढतंय त्यामुळे थोडंतरी पोटात जावं असं वाटून मिक्सरला लावून ते देते...>>

हेच चुकतं ग आपलं. ह्या मुलांनी आपलं कोमल मातृहृदय ओळखलेलं असतं. त्यांना अनुभवाने कळलेलं असतं (हे सगळं प्राण्यांनासुद्धा कळतं मग मुलांना का नाही कळणार) की मी खाल्लं नाही की आपल्याला मिक्सरमधून बारीक करून मिळणार तेव्हा पेशन्स एवढंच सांगू शकते. काहीही झालं तरी मिक्सरला काही लावायचं नाही. तो जेवढं चावून खाईल त्याला खाऊ दे. थुकून टाकलं तर सरळ ताट उचलून ठेवायचं. आणि सांगायचं "थुकून टाकलस ना आता मिळणार नाही. जेवायचं असेल तेव्हा सांग तेव्हा व्यवस्थित चावून खायचं आता तू मोठा झाला आहेस थोडा, तुला दात सुद्धा आलेत तेव्हा चावून खायचं" जेव्हा भूक लागते पोटात कचकचून तेव्हा अख्खा डोंगरसुद्धा चावून खातात ही मुलं चावून (फार क्रूर वाटतय ना? पण तसंच करायचं. and it works miracles) अगं लहान मुलांचा मेंदू खूप सक्षम असतो, त्याला कळतं शरीराला काय हवय आणि कधी. कसं ते आपण ठरवायचं. (अभिज्ञ दोन सव्वा दोन वर्षाचा होईपर्यंत फळे खात नव्हता.) हो असे क्रूर पणे वागताना, आई साबा ह्यांच्या शिव्या खाव्या लागतात, त्या खायच्या.

<<घरी नसल्यामुळे फळांचे तुकडे, लाडू, कुरमुरे, दाणे, लाह्या असले पदार्थ पुढ्यात वाटीत देऊन खायला सांगू शकत नाही...>> हरकत नाही.

<<फळांचे तुकडे चोखून तसाच झोपतो. >> हे जेवण नाही ना ग. मध्ये मध्ये खायला ठीक आहे तेसुद्धा नुसतं चोखून थुकून टाकलं की ताटली उचलून ठेवायची विचारायचं चावून खाणार की उचलून ठेवू? एका खाण्यात फक्त तीन वेळा थुकून टाकणं आलाऊड करायचं म्हणजे तिसर्‍यांदा थुकून टाकलं की पुन्हा खायला मागे पर्यंत्द्यायचं नाही.

वजनाची काळजी करू नकोस जोवर बाळ मस्त हसत खेळत निरोगी आहे. मला पिडो विचारायचे - तुम्ही दोघं जाडे आहात म्हणून बाळाला पण जाड बनवायचं का?

असा पेशन्स वीस पंचवीस दिवस ठेवलास - सगळ्यांनी ठेवला तर खाण्यच्या सवयी सुधारल्या असं नक्की समज.

<<दाताची अंडी - याला दाताची कणी म्हणता येईल का? दाताची अंडी म्हणजे समजलं नाही. क्वाड्रन्ट याला चार विभाग म्हणता येइल का?>> क्वाड्रण्ट - विभाग बरोबर. भूमितीत होता हा शब्द, x अक्ष - y अक्ष .. आणि त्यातून बनणारे ४ क्वाड्रण्ट. - तसेच तोंडाचे चार विभाग किंवा क्वाड्रण्ट.

दाताची अंडी ह्याला कणी म्हणता येईल की नाही माहित नाही. (नवरा इंग्रजी शाळेचा.. त्यानेच अंडी हा शब्द सुचवला) . मूळ इंग्रजी शब्द वाचला की मग त्याचे योग्य भाषांतर करेन..

सीलण्ट एकदम पातळ प्रवाही असतात खाचेतच बसतात. >>> ओके! मग हे दुधाच्या दाढांना करून घेणं योग्य की कायमच्या दाढांना?
माझ्या मुलीला आता ३ नंबरच्या दाढा येऊ लागल्या आहेत.

दाताची अंडी>> दाताचं मूळ.

कठीण वाटतंय पण करावं लागणार त्याच्या खायच्या सवयी बदलायला... पेशन्स अर्थातच गरजेचे... कसं जमतंय बघायलाच हवं... धन्यवाद Happy

मंजूडी - दोन्ही दाढांना. मुलीचे वय काय? साडेपाच / सहा / साडेसहा ? तसे असल्यास तीन नंबरच्या दाढा म्हणजे पहिली परमनंट दाढ. आयुष्यभराची साथ करायची आहे तिला. त्या दाढेला तर सर्वात आधी. आणि सीलण्ट वेगवेगळ्या रंगात येतात - निळ्या, हिरव्या, गुलाबी, मुलांना ते मिरवायला आवडते. दुधाच्या दाढा बारा वर्षापर्यंत तोंदात राहाणार असतात. त्यांनासुद्धा सीलण्ट करून घेतलेत तर त्याही नैसर्गिक रित्या पडेपर्यंत न किडता राहतील.

प्रितीभुषण - म्हणजे तोंडातली तिसरीदाढ? म्हणजे ती दुधाची दाढ. सीलंट करून घेतल्यास छान टिकतील १२ वर्षापर्यंत. (मला वाटलं एका विभागातली तिसरी दाढ, अशी गडबड होते,

छान माहिती.
माझ्या पिढीत लहान मुलांच्या दातांकडे बरेच दुर्लक्ष झाले. या वयातल्या अनेक जणांचे दात चांगले नसतात.
त्याच काळात चॉकलेट्स, बिस्किटे, पाव मिळू लागले. चावून अन्न खायची सवयच कमी झाली. त्यामूळे मला
रुट कॅनल वगैरे करावे लागले.

सध्या आईबाबा लहान बाळांच्या दातांकडे लक्ष देताहेत ते फार चांगले आहे.

मला चित्रपटातील कलाकारांच्या दातांकडे पण निरखून बघायची सवय आहे. रणवीर सिंगचे दात चांगले दिसतात Happy

दिनेशदा, सगळ्यांनी स्माईल डिझाइनिंग करून घेतलेलं असतं. अनेकांनी तारांनी सरळ केले असतात आणि अनेकदा त्यांच्या दाताला विनियर्स लावलेले असतात.. ज्यांचे दात मुळातच सरळ असतात ते दातांना व्हाईटनिंग करून घेतात. मुंबईतले स्माईल डिझाइनिंग स्पेशालिस्ट ठाण्याला आहेत, एक भुलाभाई देसाई रोडला आहेत - अनेक मिस इंडिया आणि चित्रतारकांनी त्यांच्या दाताची ट्रीट्मेण्ट त्यांच्याकडून करून घेतलीये.

वल्लरीच सीलण्ट बद्दल नवीन कळ्ले, छान लेख धन्यवाद!. तुम्ही लिहीलेलं सगळं आम्ही करतो आणि रीझल्ट्स खरचं खुप छान आहेत त्याचे.

Pages