फुटाण्याची चटणी

Submitted by सायु on 7 October, 2014 - 08:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फुटाणे = १ छोटी वाटी
लसुण = ६ ते ७ पाकळ्या
लाल सुकी मिरची = १
जिरे = १ छोटा चमचा (पाळ्यातला)
मिठ, साखर = चवी नुसार
तेल = दोन चमचे (चहाचे)

क्रमवार पाककृती: 

वरिल सगळे साहित्य दोन चमचे तेलात अगदी ५ मि. अरत परत करा आणि मिक्सर मधुन गिरवा. वरुन हवे तस मिठ , साखर घाला.. वाढतांना चटणीच्या मधोमध आळं करुन त्यात कच्च गोड तेल घाला..

ही चटणी खुप खमंग लागते..

अधिक टिपा: 

ही चटणी सर्दी वर राम बाण उपाय आहे, फक्त १५ मी.पाणी प्यायचे नाही..

माहितीचा स्रोत: 
माझे बाबा.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार. कोल्हापूरला खलबत्यात कुटून करत असत. साधारण अशीच चटणी बेळगावला उसाच्या रसाबरोबर देतात.

सायली छान आहे चटणी.:स्मित: मी या चटणीत नेहेमी कढीपत्ता घालते ( कोरडा भाजुन ) साऊथ च्या चटणीप्रमाणे. कधी कधी शे. दाणे पण घालते. झकास होते. तेल घालुन भाकरी बरोबर पण मस्त लागते.

मस्त! मीही यात कडीपत्ता, कोथिंबीर घालते. वरून उडद डाळ, लाल मि. घालून चरचरीत फोडणी घालयची!

फुटाणे वापरावेत की फुटाण्याची डाळ? मी बेळगावात असताना उपाहारगृहात फुटाण्याच्या डाळीपासून बनविलेली चटणी डोश्यावर पसरवून मिळायची. अर्थात त्यात लसूण पाकळी टाकली असेल असे चवीवरून कधी जाणविले नाही. शिवाय पूर्णतः सूकी / कोरडी असायची. लसूण टाकला तर ओलसर होईल ना? शिवाय ती जास्त काळ टिकेल का?

दाक्षिणात्य लोकांमधे दाळ्यांच्या चटणी असते.

सायली खूप सुंदर प्रकार. मला फुटाणे आवडतात पण काही इतके कडक असतात की एक दाताखाली आला की सगळी मजा निघून जाते. फुटाणे गुळ तर आवडीचा खाऊ आहे माझा.

फुटाणे गुरवारी खाऊ नये ना?

धन्यवाद चिन्नु
वाचलं मी ते. पण मला एक सांगा अर्धी वाटी लसूण टाकल्यावर ते किती तिखट लागेल? अर्थात खाऊन पाहिल्यावरच प्रत्यक्ष काय ते कळेल.

रेसिपी छान आहे. पण फुटाणे म्हणजे नेमके काय? डाळे म्हणुन मिळतात तेच काय फुटाणे?

मुंबईत सुमारे २० वर्षांपर्यंत चणेवाल्यांची दुकाने होती, जिथे सकाळीच चणे शेंगदाणे इत्यादी भाजायचा कार्यक्रम असायचा. त्या दुकानात मोठी पातेली भरुन भाजलेले वाटाणे, चणे, वेगवेगळ्या चवीचे शेंगदाणे इत्यादी पदार्थ ठेवलेले असत. वाटाण्यात पण पांढरे, पिवळे असे वेगवेगळे वाटाणे असत. मला ते वाटाणे म्हणजे फुटाणे वाटायचे. तेच जर फुटाणॅ असतील तर ते मुंबईत आता सहजासहजी मिळणे कठिण. जुन्या भागांमध्ये जाऊन शोधले तर मिळतील कदाचित.

फुटाणे म्हणजे भिजवुन भट्टीत भाजलेले चणे. याचीच साल काढली की त्याला ( पंढरपुरी ) डाळे म्हणतात. या रेसिपीत डाळे वापरणे अपेक्षीत असावे Uhoh

मस्तं चटणी, सायली
मी तेलात न भाजता वाटते. आणि दह्यात कालवते. वरून चरचरित कढीपत्त्याची फोडणी. इडली, डोसा ह्यावरोबर मस्तं.

आता भाजून करून बघेन, तुझ्या रेसिपीने

सगळ्यांचे खुप खुप आभार...
बी, गुरवार आणि शनिवार फुटाणे खाऊ नये असे म्हणतात..
गुळ फुटाणे हा माझा ही आवडता खाऊ आहे Happy
रश्मी, चिनु ,हेमा ताई विशेष आभार, नविन वेरिएशन्स कळले..:)

हा घ्या फोटो....
fc1.jpg