ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा प्रश्नशास्त्राचा अभ्यास ‘पाश्चात्य होरारी’ च्या अभ्यासाची जोड दिल्यानेच खर्‍या अर्थाने बहरु लागला. कृष्णमुर्ती पद्धती श्रेष्ठ आहेच पण ‘पाश्चात्य होरारी’ मधूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे हे मान्यच करावे लागेल.
माझ्या संग्रहात ‘पाश्चात्य होरारी’ वरचे अनेक उत्तमोत्तम ग्रंथ आहेत. त्यात मी सौ बार्बारा वॅटर्स यांना फार मानतो. त्यांच्याच एका ग्रंथात त्यांनी सोडवलेली एक होरारी केस मी आपल्या समोर मांडतो.

ही ती केस स्ट्डी स्वत: लेखिका सौ बार्बारा वॅटर्स यांच्याच शब्दात..

माझे एक जातक श्री. क्ष गेले कित्येक महिने जागा खरेदीच्या प्रयत्नात होते, बर्‍याच जागा बघितल्या नंतर शेवटी एक जागा त्यांना पसंत पडली. श्री. क्ष यांनी मला फोन करुन सांगीतले की त्यांना हवी होती तशी जागा सापडली असून , प्रारंभिक सर्व बोलणी, पैशाच्या वाटाघाटी ई. सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता फक्त खरेदीखत करायचे बाकी आहे. पण एव्हढा मोठा जोखमीचा व्यवहार करण्यापुर्वी एकदा ज्योतिषशास्त्रा द्वारे हा व्यवहार करावा का म्हणजेच हि जागा, तिचा विक्रेता, जागेची ठरलेली किंमत, व्यवहार यात काही धोका तर नाही ना? याबाबत त्यांना जाणुन घ्यायचे होते

...

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉगवर http://suhasgokhale.wordpress.com/ येथे उपलब्ध आहे.

दरम्यानच्या काळात आणखीही काही लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केले आहेत.

जातकाचे प्रतिसाद आणि मा.बो. वरिल प्रसिद्ध 'गानु आजींची अंगाई'

19 डिसेंबर 2013 ची प्रसन्न सकाळ, दिवसातल्या सर्व अपॉईंटमेंटसचा आढावा घेत होतो. सकाळी आठची पहीलीच अपॉंईटमेंट सौरभची होती. आता हा बाबा वेळेवर येणार का असा विचार मनात येतो न येतो तोच सौरभ दारात हजर ! सौरभचा प्रश्न होता “नोकरी कधी मिळणार ?”,,,

के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड!

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉगवर http://suhasgokhale.wordpress.com/ येथे उपलब्ध आहे.

मधल्या काळात आणखीही काही लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केले आहेत ते ही पहावेत्त .

आ,न,

सु,गो.

ग्रंथ परिक्षण: How to Be a Great Astrologer : लेखक श्री जेम्स ब्राहा (उसगाव)

जन्मपत्रिकेचा अभ्यास करताना प्रथम ग्रहांची स्थानगत, राशीगत, नक्षत्रगत फळे तसेच भावेशांची फळे काय आहेत हे पाहावे लागते. पण ही ग्रंथात वर्णन केलेली ही सर्व फळे पृथक /सुटी किंवा ज्याला आपण इंग्रजीत ‘आयसोलेटेड’ म्हणतो अशी असतात, ती जशीच्या तशी कधीच मिळणार नाहीत , कारण प्रत्येक ग्रह इतर ग्रहांच्या कोणत्या ना कोणत्या प्रभावा खाली असतोच असतो.

ह्या प्रभावामुळे त्या ग्रहाच्या फळ देण्याच्या क्षमतेत फार मोठे बदल होतात एव्हढेच नव्हे तर दोन ग्रहांच्या योगांमुळे एक तिसरीच प्रभावी शक्ती निर्माण होऊन एकदम वेगळी / भलतीच फळें मिळू शकतात. यामुळे प्रत्येक ग्रहाचे ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे निर्भेळ असे फळ मिळणे कदापीही शक्य होणार नाही.

जाळायला काही नसेल तर अग्नि सुद्धा शांत होतो त्याचप्रमाणे मंगळ , नेपच्युन सारखे ग्रह इतर ग्रहांच्या योगात नसतील तर निष्प्रभ होतात. शुक्रा सारख्या कलासक्त ग्रहाची शनीच्या योगात अशी काही कुतरओढ होते की ज्याचे नाव ते. एरवी विवाहाचा ,वैवाहिक सुखाचा कारक मानला गेलेला शुभोत्तम शुक्र जेव्हा युरेनस च्या कुयोगात असतो तेव्हा संसारसुखाची अक्षरश: राख रांगोळी होते, काही वेळा तर प्रकरण घटस्फोटा पर्यंत जाते. बुधाची तरल, तल्लख बुद्धी नेपच्युनच्या योगात गुन्हेगारी कडे कधी वळली हे कळणार सुद्धा नाही. शनीच्या योगातला चंद्र आयुष्यभराची साडेसाती देतो. अगदी गुरु सारखा परम शुभ ग्रह देखिल रवीच्या कुयोगात ‘बडा घर पोकळ वासा’ अशी दैन्यावस्था करुन टाकतो.

त्यामुळे कोणती फळें मिळणार आणि ती कशी व केव्हा मिळणार या प्रश्नांची अंतिम उत्तरें हे ग्रहांचे आपसात होणारे ग्रहयोगच देऊ शकतात. पत्रिकेचा मूलभूत अभ्यास असो की कालनिर्णया साठी केलेला तात्कालिन अभ्यास ( गोचर भ्रमणें, प्रोग्रेशन्स, डायरेक्शनस,रिटर्नस) ग्रहयोगाचा कौल घेऊन त्यांचा स्थल, काल, स्थिती सापेक्ष अर्थ लावल्या खेरिज कोणतेच भविष्य कथन शक्य होणार नाही.

हा इतका महत्वाचा आणि अपरिहार्य विषय असताना सुद्धा भारतात त्यावर हाताच्या बोटांवर मोजण्या एव्हढे सुद्धा ग्रंथ उपलब्ध नाहीत हे आपले सर्वांचे दुर्दैवच म्हणायचे. त्यामुळे नाईलाजाने आपल्याला फिरंग्यांनी लिहलेल्या ग्रंथांकडे वळावे लागते.

ग्रहयोग या विषया वरच्या 'How to Be a Great Astrologer : लेखक श्री जेम्स ब्राहा (उसगाव)' या अशाच एका अप्रतिम ग्रंथाचे परिक्षण.माझ्या ब्लॉग वर उपलब्ध आहे:

http://suhasgokhale.wordpress.com/

जिज्ञासूंनी वाचून आपला अभिप्राय जरुर कळवावा

सुहास

( याखेपेला 'आ.न. सु.गो.' असे लिहित नाही, याचे कॉपीराईट असलेले बुजुर्ग माबो कर 'गा.पै.' मला धरुन बडवतील!‌ )

आज नाही म्हणले तरी सुमारे पंचवीस वर्षे मी ज्योतिष या विषयाशी या ना त्या मार्गाने संबंध ठेवून आहे, सुरवातीची काही वर्षे मी केवळ ज्योतिषशास्त्रा बद्दल कमालीची उत्सुकता असलेला (अगदी प्राथमिक स्तरावरचा) विद्यार्थी होतो, त्याच काळात मी पुणे आणि मुंबईच्या अनेक ज्योतिषांना त्यांचा एक ग्राहक (जातक) म्हणून भेटलेलो आहे. काही वेळा नुसती चौकशी केलीय तर काही वेळा चक्क पैसे मोजलेत. पुण्यातल्या तर बहुतेक जवळजवळ सर्वच नावाजलेल्या ज्योतिषांचा मला अनुभव आहे.

पॉश बिल्डिंग मधले वातानुकूलित ऑफिस, सेक्रेटरी, संगणक, आजूबाजूला मदतनीस, शिकाऊ ज्योतिष विद्यार्थी असा पूर्णं व्यावसायिक सेटअप असलेल्या हाय टेक ज्योतिषांकडे गेलोय आणि बोळकंडीतल्या, कुबट, अंधार्‍या जागेत, मिणमिणत्या पिवळ्या गुल्लोबच्या उजेडात (?), धुळीने माखलेल्या सतरंजीवर बसून भविष्य जाणून घेतलेय (काय ढेकूण चावले हो त्या अर्ध्या तासात! आणी तो गोण्या त्याला त्याचे काही नाही, आपला मजेत गाय छाप मळत होता). ‘ली मेरेडियन’ मधल्या लाऊंज मधला ज्योतिषी अनुभवला आहे आणि ओंकारेश्वरावर पोते टाकून बसलेल्या वृद्ध बाबाजींच्या पायाशी ही बसलोय.

सगळे ज्योतिषी बघितलेत. पाच हजार (त्या काळी!) फी घेणारे सेलेब्रिटी ज्योतिषी बघितलेत (नुसते बघितलेत, अनुभवले नाहीत, परवडायला पाहीजे ना? ) क्रेडिट कार्डाने मानधन स्वीकारणारे बघितलेत आणि ठेवा पंचांगावर काय इच्छेला येईल असे विनवणारे अल्पसंतुष्ट ही पाहिलेत. केशकर्तनालयात असतो तसा मानधनाचा दरफलक ऑफिसच्या भितीवर टांगणारे (अगदी टिपीकल पुणेरी स्टाइल) ज्योतिषी पाहिलेत आणि मोफत भविष्य सांगून वर मस्त मसाला दूध पाजून, जाताना स्वत:च्या दारच्या चाफ्याची दोन नाजूक फुले हळुवारपणे हातावर ठेवणारे प्रेमळ, सात्त्विक ज्योतिषी ही अनुभवलेत.

ग्रंथकर्ते पाहिलेत (बरोबर वळिकल तुमी) , मासिक वाले पाहिलेत, क्लासवाले पाहिलेत, पोस्टलवाले भेटलेत, तुफानी हास्याचे मंतरलेले प्रयोग करणार्‍यांशीही (हे ही बरोबर वळिकल तुमी राव ) एकदा बातचीत झालीय, नाडीवाले बघितलेत, दाढीवाले-जटावाले अनुभवलेत, थ्रि पीस सुटातले पाहिलेत आणि कफनीवाले ही बघितलेत (काय त्या कफनीतला बुवा हो तो ! नको तिथे सारखा करकरा खाजवत होता, म्यॅनरलेस), स्वामी समर्थ वाले झाले, कालीमाता वाले भेटले, स्वामी झाले, म्हाराज पावले , बापूंचा आशीर्वाद घेतला, बुवांचे दर्शन मिळाले, बाबांनी प्रसाद (?) दिलाय , अण्णां च्या (किती बरोबर वळिकता हो तुमी) दरबारात सुद्धा हजेरी लावलीय. गुर्जी तर पैशाला पासरी. एव्हढेच नव्हे तर मुंबईचे पंत ही झालेत !

राजस्थानी ठाकोरजी, साऊथचा सुब्बु आणि एक पांडेजी पण भेटलेत, नशीब आमचा नेपाळी गुरखा बहादूर ज्योतिषी नाही.
पोपटवाले झाले, लोलकवाले, फांसेवाले पण अनुभवलेत . नंदीवाल्याला सुद्धा पाच दहा रुपये देऊन झालेत. हातवाले, पायवाले, अंगठावाले झालेत. त्या हात वाल्याने कसली शाई वापरून हाताचा ठसा घेतलान कोण जाणे ती शाई, तीही लालेलाल, जाता जाईना, मग काय पुढचे चार पाच दिवस मी रक्ताने बरबटलेला असावा असा तो लाल खुनी पंजा घेऊन हिंडत होतो, माझा हात बघून लोकं जाम टरकायची तेव्हा !

नुसता चेहरा बघून अचूक जन्मकुंडली मांडलेली बघितलीय. भगवद्गीता,ज्ञानेश्वरीचे रसाळ दाखले देत , कर्मवादाची सुरेख सांगड घालून केलेले , मंत्रमुग्ध करून सोडणारे भविष्य ही ऐकलंय आणि कर्णपिशाच्चाचा अनुभवही घेतला आहे.

तोडगे वाले अघोरी ज्योतिषी पाहिलेत आणि हो आता सांगायला हरकत नाही मी चक्क एका बंगाली बाबाला पण भेटलोय (तो नालासोपार्‍याचा नाही, आमचा बाबा वसईचा!) कम्युनिकेशन स्किल्स जबरी असतात या लोकांची, बॉडी लँग्वेजची उत्तम जाण असते यांना. समोरच्या व्यक्तीला एका क्षणात पारखतात, ह्यांची लेक्चर्स बिझनेस स्कूल्स मध्ये ठेवली पाहिजेत.

वेबसाइट वाले बघितलेत (क्लिकलेत), ब्लॉगवाले झालेत (मी स्वतः त्या पैकीच बरे का), बच्चन, शाहरुखचे , अंबानींचे ज्योतिषी (असे ते म्हणतात) भेटलेत, नेहरूची साक्ष काढणारे ही भेटलेत, नाही म्हणायला तसा दाखवला त्यांनी एक पिवळा पडलेला जीर्णशीर्ण फटू , पण त्या फटूतले ते टोपीवाले नेहरूच हे काही ओळखता येत नाही असे भाबडेपणाने कबूल केल्यावर, मारायला धावले.

थातूर मातूर , गुळमुळीत बोलणार बघितलेय, बोलबच्चन सहन केलेत, मी (म्हणजे ते ज्योतिषीबुवा ) किती महान ज्योतिषी आहे याची तासा-तासाची लेक्चर्स ऐकली आहेत, एका अती ज्येष्ठ , अती मान्यवर ज्योतिषाने दुसर्‍या तितक्याच तोलमोलाच्या ज्योतिषाची अर्वाच्य भाषेत केलेली येथेच्च निंदा ऐकलीय, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कृष्णमूर्ती वाले बघितलेत तर कृष्णमूर्तीचे नाव घेताच पिसाळून तरबत्तर होऊन अंगावर आलेले वैदिकवालेही झेललेत आणि हो, एक अष्टकवर्ग वालं खडूस खोकड पण भेटलंय मला एकदा .

अमेरिकेत असताना फिरंगी ज्योतिषांशी सुद्धा संवाद झाला, अनुभव मात्र घेता आला नाही, बेणीं तासाला 100/200 डालर घेतात, येव्हढे कुठनं आणायचे पैसे? पण सॅन डीयागोच्या आमच्या रॅन्चो बर्नार्डो कम्युनिटीच्या अन्युअल डे च्या फंक्शन (म्हणजे जत्रा!) मध्ये एका नेटिव्ह अमेरिकन इंडियन बाईने क्रिस्ट्लबॉल मध्ये बघून सांगितलेल्या भविष्याचा अनुभव जरूर घेता आला. (मी इंडियातून आलोय हे कळल्यावर पैसे नाही घेतले त्या म्हातारीने , जाताना आपल्या पडक्या दाताच्या फटीतून ‘णमो नार्‍हायणा’ असे काहीसे पुटपुटली)

तर असेच अनुभव काही कडू , गोड आणी आंबट आपल्याला सांगायचा बेत आहे, बघू कसे काय जमतेय ते.

संपूर्ण लेख माझ्या ब्लॉग वर http://suhasgokhale.wordpress.com/

सुहास

सुहासजी यावर जरुर लिहा.वेगवेगळी माणस अनुभवण हा देखील एक सुंदर विषय आहे. भविष्यात याचे एक पुस्तक देखील होईल.

>>> भविष्यात याचे एक पुस्तक देखील होईल.>>>

माझ्या मनातलं बोल्लात , घाटपांडे काका! आणि बघा, कळत नकळत तुम्ही पण भविष्य सांगून रायला की राव...

बाकी आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद,थांकू

असेच .अनुभव काही कडू , गोड आणी आंबट (आणि तुरट सुद्धा !) ,माझ्या कडे आलेल्या जातकांचेबी हाईत बर्का त्ये तर लईच भारी हैत.. बगू म्होरल्या टायमाला....

नमस्कार सर्व दिग्गजांना,

एक प्रश्न:

द्वितीय स्थानात नेपचून ग्रह (युवा अवस्था) वृश्चिक या जल राशीमध्ये असेल तर तो निष्यांत ज्योतिषकार बनतो का?

के. पी. होरारी ने उत्तर दिले.. अचूक – ठाम आणि परखड! >>>
पण तुम्ही तर उत्तरं देत नाही ना. तुमचं स्वतावर तेवढा विश्वासच नाहीये ना. मारला खडा आणि लागला असं झालं असेल . हल्लीचे सगळेच ज्योतिषी असे खडेच मारत असतात . त्यातला एखादा लागला कि स्वताला ज्योतिषी वगेरे समजायला लागतात

सुहासजि माझा मुला च जन्म ११/१२/२००० जन्म वेल ११.४५ एम आहे .स्थान देवास (म.प्र).
केरियर कोनच्या फिल्द मधे बनवल पाइजे.

>>> द्वितीय स्थानात नेपचून ग्रह (युवा अवस्था) वृश्चिक या जल राशीमध्ये असेल तर तो निष्यांत ज्योतिषकार बनतो का? <<<

गणेशजी, असे फक्त एखादा ग्रह अमूक तमूक स्थानात /राशीत आहे म्हणून अमूक प्रकारची फळें असे सांगता/ठरवता येत नाही, हा अनेक ग्रहांचा एकत्रित परिणाम असतो , क्रिकेट्च्या टीम सारखा,

ज्योतीष या विषयाता रुची असणे, त्याचा अभ्यास होणे आणि त्यात पारंगत होणे अशा तीन वेगवेगळ्या शक्यता विचारात घ्याव्या लागतील. ज्योतीष या विषयाचा अभ्यास करणे त्यात प्राविण्य मिळवणे या साठी काय गुण आवश्यक आहेत ? तरल बुद्धीमत्ता, गणित, तर्कशास्त्र, माहीतीचे पृथ:करण व एकत्रिकरण करण्याची क्षमता, उत्कृष्ट स्मरणशक्ती, संवाद कौशल्य इ. त्याच बरोबर काही' इंट्यूशन' या प्रकारातली देणगी.

आता हे गुण देणारे ग्रह (बुध्, नेपच्युन ,शनी इ.) , आपला प्रभाव जास्त चांगल्या तर्‍हेने पाडू शकतात अशा योग्य स्थानात असले की त्या व्यक्तीत ज्योतिषी व्हायची क्षमता आहे असे समजायला हरकत नाही.

आता या ठीकाणी 'पैसा / आर्थिक यश' याचा विचार केलेला नाही, हा घटकही विचारात घ्यायचा असेल तर पैसा देणारे ग्रह कोठे आहेत ,कशा स्थितीत आहेत हे बघायला लागेल.

'ज्योतिषी व्हायची क्षमता' देणारी अनेक कॉम्बीनेशन आहेत. वेळेअभावी त्यांचा उहापोह ईथे करत नाही पण ह्याबद्द्ल माझ्या ब्लॉग वर नक्कीच एखादा लेख लिहीन. मला असा लेख लिहण्याची प्रेरणा दिल्या बद्दल आधिच आभार मानतो.

आता तुमची उत्सुकता आहे म्हणून लिहतो: माझ्या पत्रिकेत खरोखरच नेपच्युन द्वितीय स्थानातच आहे !

ग्रहांची कारकत्वे, पत्रिकेतल्या बाराही भावांचे खातीं आणि राशींचे गुणधर्म चांगले आत्मसात झाले असतील तर असे नियम आडाखे केवळ तर्काच्या साह्याने बांधणे शक्य होईल.

प्रयत्न करणार?

एखादी व्यक्ती वकील , कायदेतज्ञ होईल का? हे बघायचे असेल तर काय ग्रहमान असायला हवे? काही हींट देतो ....

स्मरणशक्ती, भाषेवर प्रभूत्व, कायद्याची किचकट भाषा समजावून त्याचा अर्थ काढण्याची क्षमता, दिर्घकाळ - रेंगाळणारे कंटाळवाणे काम करत राहण्याची चिकाटी, वादविवाद, युक्तीवाद करण्याची कला, संवादकौशल्य ...शनी महाराज पाहीजेतच!

बघा काही सुचतेय का?

आता तुमची उत्सुकता आहे म्हणून लिहतो: माझ्या पत्रिकेत खरोखरच नेपच्युन द्वितीय स्थानातच आहे ! माझ्याही पत्रीकेत नेपच्युन दुसर्‍या स्थानात आहे. मला ज्योतिष विषयाची खुप आवड आहे. मी ज्योतिषशास्त्री परिक्षा याच आवडीपोटी उतिर्ण झालो आहे.

आपल्या शरदकाकांचे 'भविष्यावर बोलू काही' चे सर्व episodes You Tube वर उपलब्ध आहेत. सुमारे १०० हून अधिक भागांतून त्यांनी पत्रिका कशी पहावी याचे मार्गदर्शन केले आहे. प्राथमिक ज्ञानासाठी जिज्ञासूंनी पाहण्यास हरकत नाही.
सुहासराव, एवढ्यांना भेटलात, सर्वतोपरी उत्तम ( उदा.-अचूक कथन, व्यवसाय ऐवजी सेवावृत्तीने भविष्य सांगणारा इत्यादी इत्यादी) कोण आणि किती जण वाटले?

खूप खूप धन्यवाद सुहाससर,

एकंदर मी देव, भविष्य या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवत नव्हतो, परंतु गेले काही दिवसपूर्वी माझ्या ज्योतिष मित्राबद्दल यावर भरपूर चर्चासत्रे झाली आणि मलाही ज्योतिषशास्त्र पारखून पाहण्याची इच्छा झाली आणि मग काय लागलो कामाला. मन एकाग्र केल्यानंतर मी माझ्या ज्योतिष मित्राने दिलेले दाखले चूक कसे आहेत हे पटवून दिले ( तो ग्रहांची अवस्था - अंश न बघता भाकीत करायचा)
मला तूळ राशीचा असल्यामुळे सध्या शनीची उपकारक साडेसाती चालू आहे. त्यांची कृपा झाली म्हणा.
सध्या जसा वेळ मिळेल तसा पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास अभ्यास करत आहे.

बुधाचा वरदहस्त असल्या मुळे हे टिपण २ वेळा लिहावे लागले.

अरे व ! जु ने पोपटवाले एम. एन. सी जाउन नवीन पोपटवाले गोखलेभौ आले.

गोखलेभै आम्हाला नोकरीत कधी कायम करतील कळेल काय ?

>>> गोखलेभै आम्हाला नोकरीत कधी कायम करतील कळेल काय ? <<<

पैसे पडतात भाऊ त्याला , आहेत का चार दिड्क्या खिशात ? नाही अजून नोकरीत कायम नाही म्हणून आपले विचारले हो. भविष्य बघायचेय ना, जरा चांगली भाषा वापरा , मी, अंन्वीताताई, मिलिंद यांचे प्रोफाइल चेक करा, वाटेवर पडलेलो नाही आम्ही कोणी, की तुमच्या दारात भिक मागायला आलेलो नाही.

गोखले भौ , राग मानु नका.

याधाग्याला गंमत म्हणुन पोपटाचा धागा असे पूर्वी म्हणत असत.

आणि भविष्यवअल्याला प्पटवाला म्हणत.

>>नको ,,, सगळेच इथे सांगत बसत नाही, नाहीतर मग माझ्या ज्योतिष अभ्यास वर्गाला (क्लास) कोण येणार?<<
Happy

suhasg , अहो कशाला अशा लोकांना प्रतिसाद देताय अशांचे प्रतिसाद इग्नोर करणे उत्तम !

>>>> suhasg , अहो कशाला अशा लोकांना प्रतिसाद देताय अशांचे प्रतिसाद इग्नोर करणे उत्तम !<<<<
होय ताई, तेही खरेच आहे म्हणा ... बर ते जाऊ दे लौकरच मी माझे 'वेब बेस्ड ' कोर्सेस चालू करतोय , 'बेसिक', 'अड्व्हांस्ड ' 'अप्लाईड' ' के.पी. रिअलाईझड' अशा चार कॅटेगरीज मध्ये आपल्या काही सुचना असल्यास प्लीज कळवाल का? 32 मोड्यूल्स तयार आहेत , अजून व्हिडीओ रेकॉर्डिंग् चालू केले नाही, सुधारणा करायला स्कोप आहे.

suhasg , अहो मी मागे पण सांगितले आहे कि ' ताई' वगेरे नको ' अन्विता ' संबोंधलेले आवडेल .
बाकी तुम्ही online कोर्सेस सुरु करताय म्हणजे उत्तमच असणार . त्याकरता तुम्हाला शुभेच्छा !

>>> त्याकरता तुम्हाला शुभेच्छा ! <<<

स्वगत: " नुस्त अन्विता लिहायचे बाकी काही प्रत्यय जोडायचे नाहीत असे बजावलय , नुस्त अन्विता लिहायचे बाकी काही प्रत्यय जोडायचे नाहीत असे बजावलय , नुस्त अन्विता लिहायचे बाकी काही प्रत्यय जोडायचे नाहीत असे बजावलय "
स्वगत: पूर्ण

धन्यवाद , अन्विता !

१) शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्याचे सोपे रोजच्या रोज करता येण्याजोगे उपाय कुणी जाणकार सांगू शकतील का ???
(जसे शनि महाराजांसाठी अंध ,अपंग,अनाथ यांची सेवा केली जाते ). हिम्कुन्द मृणालाभं …. तर चालूच आहे …. शुक्राचे दान काय असते ???

२)भटक्या कुत्र्यांना केलेल्या अन्नादानातून कोणते ग्रह प्रसन्न होतात ??

शुक्रा साठी देवी उपासना केली जाते.तांदूळ,साखर,दही अशा पांढरया वस्तू ब्राह्मणाला वा गरीब व्यक्तीस दान द्याव्यात.(शुक्राचा रंग पांढरा आहे.)

भटक्या कुत्र्यांना केलेल्या अन्नादानातून कोणते ग्रह प्रसन्न होतात ??>>>>
या संबंधी निश्चित ग्रह सांगता येत नसला तरी कालभैैरव नक्कीच प्रसन्न होईल.

>>)भटक्या कुत्र्यांना केलेल्या अन्नादानातून कोणते ग्रह प्रसन्न होतात ??<<
ग्रहांच माहित नाही पण ती कुत्री कृतज्ञता व्यक्त करतात. त्यामुळे त्यांचे सदिच्छा तरंग आपल्या मनावर काम करतात व आपल्याला समाधान वाटते.भुकेल्या माणसाला अन्नदान केले तरी तोच परिणाम होतो.

@ सुहास गोखले जी,
मला माझा मृत्यू कधी आहे ते कळू शकेल काय?
जन्म २९ जून १९७८ वेळ ०५:३० (पहाटे) स्थान - अहमदनगर
एका प्रसिद्ध ज्योतिषांनी डिसेंबर २०३४ अर्थात वयाच्या साडेछपन्नाव्या वर्षी असे वर्तविले आहे.

Pages