आता कशाला शिजायची बात - मंजूडी - आंब्याची डाळ (लिंबू पिळून)

Submitted by मंजूडी on 5 September, 2014 - 02:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेला गणपती विसर्जनाला जाताना तोंड आंबट करून जातो म्हणून त्यावेळी नैवेद्याला आंबट डाळ करण्याची पद्धत आहे. माझ्या सासरी वाटली डाळ करतात आणि माहेरी आंबेडाळ, अर्थातच लिंबू पिळून. कारण भाद्रपदात मिळणार्‍या कैर्‍या 'नेमक्या' आंबट असणं अशक्य आहे. काही हौशी चैत्र-वैशाखातल्या कैर्‍या किसून खास गणपती विसर्जनासाठी डीप फ्रिजात राखून ठेवतात, पण त्या अतिशीत किसाला 'नेमकी' आंबट चव लागत नाही. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी आंबेडाळ करण्यासाठी आपण लिंबूच वापरूयात.

तर, लागणारे जिन्नस पुढीलप्रमाणे:

चण्याची डाळ - २ वाट्या (कमीत कमी आठ तास भिजत घालणे)
ताजं ओलं खोबरं - ३ ते ४ टिस्पून
ताज्या हिरव्या मिरच्या - ४ ते ५
ताजी हिरवीगार कोथिंबीर - मूठभर
ताजी रसदार लिंबं - २ ते ३
चांगली खरमरीत फोडणी
मीठ, साखर चवीप्रमाणे.

खरमरीत फोडणीसाठी लागणारे जिन्नस:

तेल - ३ टिस्पून
मोहरी - अधपाव टिस्पून
जिरं - अर्धा टिस्पून
हिंग - पाऊण टिस्पून
हळद - पाव टिस्पून
सुक्या मिरच्या - २

आपण चण्याची डाळ कच्चीच ठेवतो, त्यामुळे हिंग नेहमीपेक्षा जास्त वापरायचा आहे, म्हणजे डाळ पोटाला बाधायची नाही.

क्रमवार पाककृती: 

ashiba7.jpg

१. चण्याची डाळ स्वच्छ धुवून आठ तास भिजत घालावी.

२. भिजवलेली डाळ पुन्हा २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. म्हणजे डाळीचा विशिष्ट कच्चट वास निघून जातो.

३. डाळ मिक्सरमधे वाटून घ्यावी. त्याबरोबर हिरव्या मिरच्याही वाटून घ्या. डाळ वाटताना पाणी घालायचे नाही. आणि डाळ अगदी गुळगुळीत वाटायची नाही. मिक्सर इंचरवर एक-दोन वेळा फिरवला की बास्!

ashiba4.jpg

४. तेलाची खरमरीत फोडणी करून घ्यावी. तेल पुरेसे तापल्यावर मोहरी घालायची, ती लागलीच तडतडली पाहिजे. लगेचच जिरं घालायचं आणि लगेचच हिंग. हिंग किंचित तळला गेला पाहिजे, सेकंदभराने लगेच हळद आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत. सुक्या मिरच्या घालताच क्षणी गॅस बंद करून चमच्याने सुक्या मिरच्या हलवायच्या, म्हणजे त्या तळल्या जातील.
फोडणी खमंग करण्याच्या नादात करपणार नाही ह्याकडे लक्ष द्या. आणि फोडणी न करपवण्याच्या नादात कच्ची राहणार नाही एवढं बघा.

ashiba6.jpg

डाळ चविष्ट होण्यासाठी डाळ वाटणे आणि फोडणी करणे ह्यातच खरे कसब आहे.

५. आता वाटलेली डाळ, ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून त्यावर लिंबू पिळा. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकत्र करून घ्या.

ashiba5.jpg

त्यावर थंड केलेली खरमरीत फोडणी घालून नीट कालवून घ्या. डाळ तयार आहे.

आता बाप्पाला दहीपोह्यांची शिदोरी बांधून द्या आणि पाणावल्या डोळ्यांनी आंबेडाळीचा नैवेद्य दाखवा.
मोदक, पेढे, लाडू, बर्फ्या, पंचखाद्य, श्रीखंड, गुलाबजाम, फ्रूटसॅलड, बासुंदी, दुधीहलवा, खीर, शीरा, पुरणपोळ्या खाऊन दमलेला बाप्पा ही चटपटीत डाळ खाऊन तृप्त होईल आणि तुम्हां-आम्हां सर्वांना भरभरून आशीर्वाद देईल.

गणपती बाप्पा मोरया!!

Dal.jpg

प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झंपी | 5 September, 2014 - 15:09 नवीन

मायबोलीवर अशीच एक रेसीपी आहे आधीच , अगदी लिंबू पिळून.

आधीच प्रकाशित झालेली मायबोलीवरील रेसीपी, स्वतःचे बदल करून चालणार नाही असे असताना हि चालेल का संयोजक?
>>>

वाटली डाळ आणि आंबे डाळ हे २ वेगळे पदार्थ आहेत. करण्याची पद्धत आणि येणारा स्वाद यांमधेही फरक आहेच. तेंव्हा ही पाककृती स्पर्धेसाठी चालेल. तसेच थोडेसे बदल करून पदार्थ पूर्ण बदलतो किंवा नाहीही. तेव्हा एखाद्या पाककृतीत स्वत:ने काय काय बदल करून तो पदार्थ 'गणेशोत्सव स्पर्धेसाठी' द्यायचा हा निर्णय सहभागींचा आहे. प्रत्येक घटकासह पाककृती इथल्या शेकडो पाककृतीत पडताळणे शक्य नाही. विजेत्यांची निवड मतदानाने होणार असल्याने मायबोलीकर योग्य निर्णय घेतील यात शंका नाही. इथल्याच एखाद्या पाककृती मधे थोडेसे बदल करून ती स्पर्धेसाठी देऊ नये हे सांगण्यामागे अगदीच नगण्य बदल करुन एखादी पाककृती दिली जाऊ नये इतकीच अपेक्षा आहे. आपण मायबोलीबाहेरची नियमात बसणारी कोणतीही पाककृती देऊ शकता, प्रताधिकाराचा मुद्दा लक्षात ठेवून!

फोटोंच्या नावातली स्पेस काढून फोटो अपलोड केलेले आहेत.

धन्यवाद वेबमास्तर!

वाटली डाळ आणि आंबे डाळ हे २ वेगळे पदार्थ आहेत. करण्याची पद्धत आणि येणारा स्वाद यांमधेही फरक आहेच. तेंव्हा ही पाककृती स्पर्धेसाठी चालेल.>>> Happy

धन्यवाद संयोजक!

.>>>>तसेच थोडेसे बदल करून पदार्थ पूर्ण बदलतो किंवा नाहीही. तेव्हा एखाद्या पाककृतीत स्वत:ने काय काय बदल करून तो पदार्थ 'गणेशोत्सव स्पर्धेसाठी' द्यायचा हा निर्णय सहभागींचा आहे. प्रत्येक घटकासह पाककृती इथल्या शेकडो पाककृतीत पडताळणे शक्य नाही. विजेत्यांची निवड मतदानाने होणार असल्याने मायबोलीकर योग्य निर्णय घेतील यात शंका नाही. इथल्याच एखाद्या पाककृती मधे थोडेसे बदल करून ती स्पर्धेसाठी देऊ नये हे सांगण्यामागे अगदीच नगण्य बदल करुन एखादी पाककृती दिली जाऊ नये इतकीच अपेक्षा आहे. आपण मायबोलीबाहेरची नियमात बसणारी कोणतीही पाककृती देऊ शकता, प्रताधिकाराचा मुद्दा लक्षात ठेवून!<<<<

संयोजक, तुमच्या प्रतिसादाबद्दल थँकू,
तुम्ही नियम आधी देता मग त्यात फेरफार करून गोंधळ उडवता. आधी लिहिले की, मायबोलीवरील प्रकाशित पाकृ बदल करून चालणार नाही. बर्‍यापैकी विरोधाभास आहे नियमात आणि ह्या प्रतिसादात(नेहमीसारखेच) आणि 'नगण्य' हे देखील खूपच रीलेटीवच आहे नाही का? तुमच्या मते 'नगण्य' काय मग? मला वाद नाही घालायचाय पण हे असे निरिक्षण आहे म्हणून लिहिले.

----------------------------------------------------------------------------------------------------
आता माझ्या आधीच्या प्रतिसादास कारण,
पहिले म्हणजे पारंपारीक आंबेडाळीत "कैरी" घालतात. तेव्हा ह्यात कैरी न घालता 'आंबेडाळ' का म्हटलेय हे एक कोडं आहे. बदल केलाय तर पारंपारीक नाव कशाला? लिंबूडाळ नाव चालले असते मग असा गोंधळ नसता झाला.
आणि पारंपारीक पद्धतीत ,गणपती विसर्जनाच्या दिवशी वाटळी डाळ'च' करतात ज्याच्यात लिंबू रस घालतात. कारण ना कैरीचा मौसम ना पुर्वी सगळ्यांकडे फ्रीझ होते.;) म्हणून वाटलं की वाटली डाळ नुसती फोडणी घालून दिलीय कारण शिजवायचे नाही आहे. आणि आता, एकंदरीत कृतीची प्रस्तावना वाचून, जर एखाद्याच्या घरी देत असतील 'आंबेडाळ' लिंबू पिळून तर काय बोलणार.
पण पाकृ वाचून असे वाटले की, मायबोलीवर वाटली डाळ आहे, मग स्पर्धेसाठी नाव 'आंबेडाळ' देवुया हा विचार करून टाकलेली वाटली. असो.

मंजूडी, तुमची कैरी शिवाय केलेलीआंबेडाळ चालवून घेवू, आता चिकाशिवाय खरवस तुम्ही चालवून घ्यालच. Happy

बरं, असो. आणि हो, शुभेच्छा!

तो.पा.सु. ही डाळ आमच्या कडी खुप प्रिय आहे.. अगदी वाटी वर वाटी संपवतात.. कोलोज मधे फोटो टाकायची
कल्पना छान. आणि फोटो पण छान..

माधव, ४-५ हिरव्या मिरच्या 'वाटून' घातल्या आहेत आधीच.. त्यामुळे सुक्या मिरच्या दोन पुष्कळ झाल्या. मिरच्या जास्त खाऊ नका Proud

भरत मयेकर, केलेल्यातली फोडणी वगळून काकडीच्या रायत्यात घातली होती.

मंजू मी आज करणार आहे. आमच्याकडे अजूनही लोणच्याच्या आंबट कैर्‍या मिळत असल्याने मी कैरी वापरूनच करेन डाळ.
ही रेसेपी टाकल्यापासून इथे यायचं टाळतेय. Happy आज डाळ भिजत घातल्यावर मगच आले प्रतिसाद लिहायला.

Pages