आता कशाला शिजायची बात - मंजूडी - आंब्याची डाळ (लिंबू पिळून)

Submitted by मंजूडी on 5 September, 2014 - 02:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेला गणपती विसर्जनाला जाताना तोंड आंबट करून जातो म्हणून त्यावेळी नैवेद्याला आंबट डाळ करण्याची पद्धत आहे. माझ्या सासरी वाटली डाळ करतात आणि माहेरी आंबेडाळ, अर्थातच लिंबू पिळून. कारण भाद्रपदात मिळणार्‍या कैर्‍या 'नेमक्या' आंबट असणं अशक्य आहे. काही हौशी चैत्र-वैशाखातल्या कैर्‍या किसून खास गणपती विसर्जनासाठी डीप फ्रिजात राखून ठेवतात, पण त्या अतिशीत किसाला 'नेमकी' आंबट चव लागत नाही. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी आंबेडाळ करण्यासाठी आपण लिंबूच वापरूयात.

तर, लागणारे जिन्नस पुढीलप्रमाणे:

चण्याची डाळ - २ वाट्या (कमीत कमी आठ तास भिजत घालणे)
ताजं ओलं खोबरं - ३ ते ४ टिस्पून
ताज्या हिरव्या मिरच्या - ४ ते ५
ताजी हिरवीगार कोथिंबीर - मूठभर
ताजी रसदार लिंबं - २ ते ३
चांगली खरमरीत फोडणी
मीठ, साखर चवीप्रमाणे.

खरमरीत फोडणीसाठी लागणारे जिन्नस:

तेल - ३ टिस्पून
मोहरी - अधपाव टिस्पून
जिरं - अर्धा टिस्पून
हिंग - पाऊण टिस्पून
हळद - पाव टिस्पून
सुक्या मिरच्या - २

आपण चण्याची डाळ कच्चीच ठेवतो, त्यामुळे हिंग नेहमीपेक्षा जास्त वापरायचा आहे, म्हणजे डाळ पोटाला बाधायची नाही.

क्रमवार पाककृती: 

ashiba7.jpg

१. चण्याची डाळ स्वच्छ धुवून आठ तास भिजत घालावी.

२. भिजवलेली डाळ पुन्हा २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. म्हणजे डाळीचा विशिष्ट कच्चट वास निघून जातो.

३. डाळ मिक्सरमधे वाटून घ्यावी. त्याबरोबर हिरव्या मिरच्याही वाटून घ्या. डाळ वाटताना पाणी घालायचे नाही. आणि डाळ अगदी गुळगुळीत वाटायची नाही. मिक्सर इंचरवर एक-दोन वेळा फिरवला की बास्!

ashiba4.jpg

४. तेलाची खरमरीत फोडणी करून घ्यावी. तेल पुरेसे तापल्यावर मोहरी घालायची, ती लागलीच तडतडली पाहिजे. लगेचच जिरं घालायचं आणि लगेचच हिंग. हिंग किंचित तळला गेला पाहिजे, सेकंदभराने लगेच हळद आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत. सुक्या मिरच्या घालताच क्षणी गॅस बंद करून चमच्याने सुक्या मिरच्या हलवायच्या, म्हणजे त्या तळल्या जातील.
फोडणी खमंग करण्याच्या नादात करपणार नाही ह्याकडे लक्ष द्या. आणि फोडणी न करपवण्याच्या नादात कच्ची राहणार नाही एवढं बघा.

ashiba6.jpg

डाळ चविष्ट होण्यासाठी डाळ वाटणे आणि फोडणी करणे ह्यातच खरे कसब आहे.

५. आता वाटलेली डाळ, ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून त्यावर लिंबू पिळा. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकत्र करून घ्या.

ashiba5.jpg

त्यावर थंड केलेली खरमरीत फोडणी घालून नीट कालवून घ्या. डाळ तयार आहे.

आता बाप्पाला दहीपोह्यांची शिदोरी बांधून द्या आणि पाणावल्या डोळ्यांनी आंबेडाळीचा नैवेद्य दाखवा.
मोदक, पेढे, लाडू, बर्फ्या, पंचखाद्य, श्रीखंड, गुलाबजाम, फ्रूटसॅलड, बासुंदी, दुधीहलवा, खीर, शीरा, पुरणपोळ्या खाऊन दमलेला बाप्पा ही चटपटीत डाळ खाऊन तृप्त होईल आणि तुम्हां-आम्हां सर्वांना भरभरून आशीर्वाद देईल.

गणपती बाप्पा मोरया!!

Dal.jpg

प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नियम क्रमांक दोन सांगतो की 'त्यावर चवीला फोडणी घालू शकता.' Happy

एकच फोटो दिसतोय फक्त Uhoh
बाकी फोटू नाही दिसत Sad

मस, मदत करा!

मस्तच. ही चव अगदी तोंडावर आहे. या दिवसात लिंबाचा रस घालूनच करतात. बाप्पाला ही डाळ देण्यामागे काहितरी कारण आहे. ( आठवले तर लिहितो.)

मंजूडी, भारी आहे ट्राय करण्यासाठी तेम्प्तींग. Happy (तोंडात लाळ आल्याने असे होतेय टायपींग. :फिदी:)

मलाही शेवटचा फोटो दिसतोय फक्त.

बरंय एकच फोटो दिसतोय ते, किती जळवणार?? Proud
आमच्याकडे चैत्रातच अशी डाळ होते, गणपतीला वाटली डाळ. आता इथे लिंबू पिळून करून बघेन

मायबोलीवर अशीच एक रेसीपी आहे आधीच , अगदी लिंबू पिळून.

आधीच प्रकाशित झालेली मायबोलीवरील रेसीपी, स्वतःचे बदल करून चालणार नाही असे असताना हि चालेल का संयोजक?

इथे फक्त डाळ कच्ची ठेवलीय आणि एक दोन मसाले कमी. हाच एक बदल दिसतोय.

हीच अशीच सेम डाळ आमच्याकडे करतात विसर्जनाच्या दिवशी...>> हो. करत असत आणि खाल्लेली आहे. मुठेच्या तिरी केलेल्या अनेक विसर्जनांची आठवण आली. चपट्या स्टीलच्या डब्यात ही डाळ असे. आरती म्हणून मग चमच्याने कोणीतरी दिलेली डाळ प्रसाद घेउन हात चाट्ताना बाप्पा आत गेलेल्या पाण्यावरचे गोल तरंग अविश्वासाने बघायचे. मग पांचाळेश्वराच्या देवळात घंटा वाजवून घरी परत. एकदा अर्ध्यावाटीची करून पाहिली पाहिजे. माझे बक्षिस ह्या पाककृतीला.

मायबोलीवर अशीच एक रेसीपी आहे आधीच , अगदी लिंबू पिळून.>> झंपी, लिंक देणार का प्लिज? मला मायबोलीवर आंबेडाळीची कृती सापडली नाही.

वाटली डाळ म्हणून शोधा मग सापडेल.>>> ओह बरं!!

वाटली डाळ आणि आंबेडाळ या दोन्ही भिन्न पाककृती आहेत.

वाटली डाळ करताना वाटलेली चण्याची डाळ फोडणीत घालून परतून शिजवली जाते.
आंब्याची डाळ करताना वाटलेल्या चण्याच्या डाळीत फोडणी फक्त मिक्स केली जाते, परतून शिजवत नाहीत :).

संयोजक, तुमच्या नियमाप्रमाणे इथे शिजवायचे नसल्याने, फक्त वरून फोडणी टाकलेला पदार्थ व थोडेफार मसाले इथे तिथे करून आधीच प्रकाशित असलेली मायबोलीवरची रेसीपी चालू शकते का ह्या शंकाचे निरसन करणार का?

मग तर असे बरेच पदार्थ, नावं बदलून , थोडेफार जिन्नस काढून/वाढवून मायबोलीवरचीच रेसीपी टाकली तर तुमचा नियमात बसेल का?

मग तर असे बरेच पदार्थ, नावं बदलून , थोडेफार जिन्नस काढून/वाढवून मायबोलीवरचीच रेसीपी टाकली तर तुमचा नियमात बसेल का?>> ह्या अनुषंगाने हेतेढकल खाकरा भेळ पण आधी माबोवर आलेली आहे.

मुळा घालून (कैरीऐवजी) आणि लिंबू पिळूनपण करतात अशी डाळ, अर्थात गणपतीत नाही. पुण्याला पहिल्यांदा बघितला नणंदेकडे.

आधीच प्रकाशित असलेली मायबोलीवरची रेसीपी चालू शकते का ह्या शंकाचे निरसन करणार का?>>>>बर्फाची रेस्पी हिट होईल मग!! Happy

मस्त आहे रेसिपी. फोटो बघून तोंडाला पाणी सुटलं.
मंजूडीने बाकीचे फोटो मुद्दाम सिक्रेट ठेवले असावेत. 'कमिंग सून' म्हणत उत्सुकता वाढवायला. Wink

मस्त, मस्त ! तोंपासु Happy
आमच्याकडेही विसर्जनाच्या दिवशी हीच डाळ असायची. अगदी अशीच ! लिंबू पिळून. नॉस्टॅल्जिक झाले.
करायला हवी आता.

वाटली डाळ आणि आंब्याची डाळ दोन अगदीच स्वतंत्र पाककृती आहेत ह्याला अनुमोदन.

Pages