शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्यापुस्तिकेवरील आक्षेपार्ह संदेशांवर पोलिसांकडून बंदी :
या कामाकरिता मुंबई पोलिसांनी स्वतंत्र क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

-गा.पै.

बीएनएचएस या संस्थेत रिसर्च असिस्टंट या पदावर काम करणारे वरद गिरी यांनी गांडुळ आणि पालींवर संशोधन केलं आहे. गांडुळाची नवी जात त्यांनी शोधली आहे (देवगांडूळ). त्यांनी पालीच्या एका नविन प्रजाती चा शोध लावला आहे, आणि त्यांंचेच नाव या नविन जाती ला देण्यात आले आहे.
४ जुलै च्या लोकप्रभा अंकात याविषयी सविस्तर वाचायला मिळेल.

http://zeenews.india.com/news/eco-news/mumbai-scientist-gets-new-lizard-...

मुंबईच्या एच.आर. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कुंभारवाडी, जिल्हा.अहमदनगर, येथील पाण्याचे दुर्भिक्ष संपवले.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/solve-water-pr...

आज एक सकारात्मक बातमी वाचनात आली ती इथे शेअर करते:-

कॅनडातील टोरेंटोमध्ये 'साईन' नावाचं एक रेस्टोरंट उघडलंय त्याचे मालक भारतीय वंशाचे असुन त्यांचे नाव आहे श्री. अंजन मणिकुमार. या हॉटेलचं वैशिष्ट्य असं की येथील द्वारपालापासून शेफपर्यंत एकूण एक स्टाफ हा मूक्-बधीर आहे, अगदी वेटर्ससुद्धा ! असे असुनही या हॉटेलला मिळणारा प्रतिसाद जबरदस्त आहे.
समाजातील मूकबधीर व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने अंजन यांनी हे हॉटेल सुरु केले आहे. मात्र येथे येणार्‍या ग्राहकांना मूक-बधीर वेटर्स कशी सेवा देणार? हा मुख्य प्रश्न त्यांना भेडसावला. पण त्यावर उपाय शोधुन काधण्यात ते यशस्वी झाले.
मूकबधीर व्यक्ती एकमेकांशी एस एस एल भाषेद्वारे संवाद साधत असतात. याच भाषेचा आधर घेत अंजन यांनी ऑर्डर घेण्यापासुन वेटरशी थेट संवाद साधण्यापर्यंत ही भाषा चित्ररुपात तयार केली व ती मेनुकार्डद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवली. ग्राहकही मोठ्या उत्सुकतेने ही भाषा समजुन घेत आहेत व ऑर्डर देत आहेत असा अनुभव आहे.
सामाजिक बांधीलकी म्हणून एक वेगळा मार्ग अवलंबणार्‍या श्री. अंजन मणिकुमार यांचे व त्यांच्या सार्‍या टीमचे अभिनंदन !

आशिका यानी वर दिलेले वृत्त अतिशय प्रेरणादायी असून मूकबधीर असणार्‍या सुमारे २०० मुलामुलींनी टोरॅन्टोच्या त्या हॉटेलमध्ये नोकरीसाठी अर्ज दिले आहेत. सध्या ५० मुलेमुली आहेत तिथे....वैशिष्ठ्य म्हणजे यातील एकालाही/एकीलाही हॉटेल मॅनेजमेन्ट वा सर्व्हिसेस कशा दिल्या जातात याचे ज्ञान माहिती काहीच नव्हते....ती कमतरता श्री.अंजन मणीकुमार यानी ट्रेनिंगद्वारा पूर्ण केली असून सध्या त्या शहरातील "साईन्स" हे हॉटेल आता गर्दीने फुलले आहे....तिथल्या स्थानिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

यूट्यूबवर मणीशंकर आणि हॉटेल...तसेच तिथले काम कसे चालते याची माहिती देणारी एक क्लिप आहे. ती इथे देत आहे....सदस्यांनी जरूर या मूकबधीरांच्या जिद्दीची प्रशंसा करण्यासाठी ही क्लिप पाहावी.

http://youtu.be/VPgh5Yk2HaY

आशिका....धन्यवाद खरे तर तुम्हाला दिले पाहिजेत....अशासाठी की तुम्ही इतकी प्रेरणादायी बातमी इथे दिली. मी त्याबद्दल पूर्वी वाचलेच होते, फक्त लिंक यूट्यूबवर येण्याची वाट पाहात होतो.

जाताजाता.....एक अ‍ॅडिशन करावी लागेल माझ्या वरील प्रतिसादात...ती अशी की हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांना "साईन लॅन्ग्वेज" द्वारेच आपली ऑर्डर द्यावी लागते....पण हे कामही मणीशंकर यानी सोपे केले आहे. जे मेनूकार्ड दिले जाते त्यातील प्रत्येक पदार्थाशेजारीच त्याची "साईन" आहे, ती संबंधित ग्राहक अगदी सहज करू शकतो बोटांद्वारे....ऑर्डर नोंदविणारी ती मूकबधीर व्यक्ती तितक्याच चतुराईने ती योग्यरितीने नोंदवून घेऊन पूर्तताही करत असतो. हे सारे तिथल्या ग्राहकांना आवडते असे दिसत आहे.

लोकहो,

तात्पुरत्या परवान्यावर रहात असलेल्या तस्लिमा नसरीन यांना मोदी सरकारने एका वर्षाची निवासी अनुज्ञप्ती (व्हिसा) दिली आहे. बांगलादेशातील नृशंस अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या तस्लिमा यांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल श्री. मोदी आणि श्री. राजनाथ सिंग यांचं अभिनंदन. तसेच अनेक मैत्रीस्थळांवरील (सोशल मीडिया) सदस्यांनी ही मागणी उचलून धरली होती. त्यांचेही अभिनंदन.

अधिक माहीतीसाठी (इंग्रजी दुवा) : http://www.ndtv.com/article/india/after-meeting-rajnath-singh-taslima-na...

आ.न.,
-गा.पै.

२००४ साली इंडोनेशियात आलेल्या त्सुनामीमध्ये अ‍ॅचे नावाच्या बेटाजवळील भागात रहाणारी व आपल्या माता-पित्यांपासुन हरवलेली ४ वर्षांची रौदतुल जनाह ही चिमुरडी १० वर्षांनंतर अ‍ॅचे बेटांच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या ब्लांगपिडीया या लहानशा शहरात सापडली. एक मच्छिमार कुटुंबाने तिचे संगोपन केले होते.

तिची आई जमालिया हिच्या भावाला एकदा ही मुलगी या भागात नजरेस पडली. आपल्या बहिणीच्या चेहर्‍याशी साधर्म्य साधणारा तिचा चेहरा पाहुन त्यास संशय आला व त्याने बहिणीला कळवले. जमालिया व तिचे पती तेथे पोहोचले व तिच्या जन्मखुणांचा वगैरे पुरावा देताच मच्छिमार कुटुंबाची खात्री पटली की ही जमेलियाचीच मुलगी आहे. या कुटुंबाने मोठया मनाने तिची आई-वडिलांकडे रवानगी केली आहे.

तब्बल १० वर्षांतर असे हरवलेले अपत्य परत मिळणे ही केवळ आनंदाचीच वार्ता होय.

http://www.worldbulletin.net/news/142242/girl-lost-in-2004-tsunami-at-ag...

गणित विषयातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा असा फिल्ड्स पुरस्कार प्रिन्सटन विद्यापीठातील प्रा. मंजुल भार्गव यान्ना मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय वन्शज आहे. गणित विषयात अनेक यशाची शिखरे गाठणारे मंजुल भार्गव यान्ना वयाच्या २८ व्या वर्षीच प्रिन्सटन मधे प्राध्यापकी मिळाली. प्रा. भार्गवान्चे यान्चे दैदिप्यमान यशाबद्दल अभिनन्दन आणि पुढील यशस्वी वाटचाली साठी शुभेच्छा.

प्रा. मंजुल भार्गव यान्च्या कार्या बद्दल अधिक माहिती येथे मिळेल.

http://www.simonsfoundation.org/quanta/20140812-the-musical-magical-numb...

http://en.wikipedia.org/wiki/Manjul_Bhargava

डॉ. मंजुल भार्गवांच्या बातमीसोबत अजून एक आनंदाची बातमी म्हणजे मूळ इचलकरंजीच्या सुभाष खोत यांना nternational Mathematical Union’s Nevanlinna Prize मिळाले आहे. सुभाष खोत ९५ साली आय.आय.टी. जेईईला पहिले आले होते. त्यांनी मिळवलेले यश खरोखरच दैदिप्यमान आहे.

http://www.thehindu.com/sci-tech/science/nevalninna-prize-to-iitb-alumnu...

सुभाष खोत ९५ साली आय.आय.टी. जेईईला पहिले आले होते. त्यांनी मिळवलेले यश खरोखरच दैदिप्यमान आहे. >> सुभाष खोतचे अभिनंदन. तो माझ्या बॅचचा होता. त्याला १२वी ला ही PCM/PCB दोन्ही मधे ९९.६६% होते. इचलकरंजीत १२ वी पर्यंत (मराठी माध्यमात) शिकून पुढं त्यानं एवढं यश मिळवलं हे खरंच अभिनंदनीय आहे

परभणीच्या रखमाबाईंना जन्मतच मोतिबिंदू होता. त्यामुळे चाचपडतच त्यांचे आयुष्य गेले. वयाच्या ६५व्या वर्षी आपण हे जग याचि देहा, याचि डोळा पाहू शकू, असे त्यांच्या गावीही नव्हते. मात्र, परभणीत भरलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात एका दृष्टिदात्याची नजर रखमाबाईंच्या अंध डोळ्यांवर खिळली. रखमाबाईंना नवी दृष्टी द्यायची असा निर्धार झाला आणि भायखळ्याच्या जे. जे. रुग्णालयात रखमाबाईंच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. चक्क ६५व्या वर्षी रखमाबाईंना जग पाहायला मिळाले! हे एकच उदाहरण नाही. जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागात गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून हा दृष्टिदान यज्ञ सुरू असून त्यामुळे असंख्य जिवांना नव्याने जग पाहायला मिळाले आहे.
.....लोकसत्तेतील बातमी
http://www.loksatta.com/mumbai-news/sixty-five-year-blind-woman-found-vi...

मंजुल भार्गव, सुभाष खोत यांचे अभिनंदन.
रखमाबाईंना पण दृष्टी मिळाल्याबद्दल अभिनंदन.
डॉ. लहाने आणि त्यांच्या टीमचा दृष्टीदान यज्ञ तर सर्वश्रुत आहे.

सुभाष खोत ९५ साली आय.आय.टी. जेईईला पहिले आले होते. त्यांनी मिळवलेले यश खरोखरच दैदिप्यमान आहे. >> सुभाष खोतचे अभिनंदन. तो माझ्या बॅचचा होता. त्याला १२वी ला ही PCM/PCB दोन्ही मधे ९९.६६% होते. इचलकरंजीत १२ वी पर्यंत (मराठी माध्यमात) शिकून पुढं त्यानं एवढं यश मिळवलं हे खरंच अभिनंदनीय आहे
------ सुभाष खोत यान्चे अभिनन्दन...

इरोम शर्मिला यांची आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून मुक्तता.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5118376554654566456&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140821&Provider=- पीटीआय&NewsTitle=इरोम शर्मिला रुग्णालयातून बाहेर

माधुरी पुरंदरे यांना त्यांच्या लहान मुलांशी निगडीत साहित्याच्या कामाबद्दल साहित्य अकादमीचा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार जाहीर झाला.
फार मस्त बातमी.

मी माधुरी पुरंदरे यांना मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्काराविषयीच लिहायला आले होते..अत्यंत आनंदाची बातमी! कालच मिस पॉटर नावाचा Beatrix Potter ह्या ब्रिटीश लेखिकेच्या जीवनावर आधारीत चित्रपट पाहिला. त्यांनी बालसाहित्यात मोलाची भर घातली आणि आज माधुरी पुरंदरे यांना त्यांच्या बालसाहित्यातल्या कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचे वाचून छान वाटले!

सौजन्य: मटा

"आईस बकेट ला उत्तर राईस बकेट चे"

'आइस बकेट'ऐवजी गरजूंना तांदूळाचे वाटप करण्याच्या उपक्रमाचा मंजुलता यांचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि या फोटोला तब्बल ५० हजार लाइक्स मिळाले. आपल्या समाजामध्ये अनेक जणांना दोन वेळचे खाण्यासही मिळत नाही, अशा लोकांसाठी 'राइस बकेट' ही अभिनव कल्पना असल्याचे मंजुलता यांना वाटते. 'आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटना किंवा झोपडपट्टीत राहत असलेल्यांना एक पिशवीभर तांदूळ दिले तर त्यांचे पोट भरू शकेल,' असेही त्यांनी सांगितले. 'पूर्ण बादली भरून तांदूळ देण्याची काहीच गरज नाही. थोडे तांदूळ दिले तरीही गरजूंचे पोट भरेल,' असेही त्या म्हणतात.

उद्देश काय?

बादलीभर बर्फाऐवजी बादलीभर तांदूळच का द्यायचे असा प्रश्न विचारला असता मंजुलता म्हणाल्या, 'आपल्या संस्कृतीमध्ये देण्याला खूप महत्त्व आहे. कोणताही धर्म आपल्याला हेच सांगतो. गरजूंना केलेले दानही सत्पात्री असते.'

'आइस बकेट चॅलेंज' म्हणजे काय?

एक बादलीभर बर्फ अंगावर ओतून घेण्याचे आव्हान स्वीकारायचे आणि ते शक्य नसले किंवा त्यात अपयशी ठरल्यास विशिष्ट रकमेची देणगी 'अमयोट्राफिक लॅटरल स्क्लेरोसिस' (एएलएस) या रोगावरील संशोधनासाठी द्यायची, याला 'आइस बकेट चॅलेंज' असे म्हणतात. ही देणगी 'मोटर न्यूरॉन डिसीज असोसिएशन' या स्वयंसेवी संशोधन संस्थेला दिली जाते. याची सुरुवात ब्रिटनमधून मागील काही महिन्यांपासून सुरू झाली. त्यात अनेक सेलिब्रेटीजना भाग घेतला आणि त्याची चित्रे सोशल मीडियावर अपलोड केली. तेव्हापासून जवळपास जगभर हा प्रकार सुरु झाला आहे.

कोण आहेत मंजुलता?

हैदराबाद येथील तांदूळ संशोधन केंद्रामध्ये ३८ वर्षीय मंजुलता कलानिधी काम करतात. मंजुलता यांनी वैयक्तिक स्तरावर सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल या केंद्रामध्येही त्यांचे कौतुक होत आहे. अनेक सरकारी आणि सामाजिक संस्थांनी 'राइस बकेट' संकल्पना व्यापक प्रमाणावर चालवण्यासाठी तयारी दर्शविली आहे. एक बादलीभर तांदूळ दान करण्याची कल्पना सहज सुचली असली तरीही त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.
....

स्वतःच्या अंगावर बर्फाची बादली ओतून त्याचे फोटो टाकण्याचा प्रकार मला विकृती वाटली. यापेक्षा दुसऱ्याला उपयोगी पडण्यासाठी आपल्याला काय करता येईल, का असा विचार केला असता 'राइस बकेट'ची संकल्पना सुचली.
- मंजुलता कलानिधी

मस्त बातम्या, मी पण राईस बकेट ची बातमी देण्यासाठी इथे येत होतो... पण बघतो तर आधीच दिल्ये इथे ही बातमी.

माधुरीताईंना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रत्यक्ष ओळख नसतानाही घरातल्याच कोणाला तरी हा पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते आहे.

त्यांच्या बद्दल अजून सांगायचे म्हणजे पुण्यातील 'मैत्री' तर्फे मेळघाटातील कोरकू आदीवासी मुलांसाठी त्यांच्याच म्हणजे कोरकू भाषेत पुस्तके बनवण्याचे काम शिक्षणतज्ञ वर्षा सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्या पुस्तकांकरता चित्रे काढण्याचे काम माधुरीताई करत आहेत आणि ते देखिल विनामोबदला.

Pages