मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

Submitted by फारएण्ड on 21 August, 2014 - 02:30

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

पूर्वी हे नव्हते. एखाद्याने प्राचीन काळी एखाद्या विषयावर जे लिहीले होते तेच त्याचे/तिचे सार्वकालिक मत आहे असे गृहीत धरून चालत असे. त्यामुळे त्याच्या/तिच्या इतर विषयांवरच्या इतर मुद्द्यांना प्रतिक्रिया म्हणून ते पूर्वग्रह पुढे आणता येत असत. पण आता असे करणे अवघड होऊ लागले आहे. तर अशा मुद्देवंचितांकरिता येथे काही उपाय सांगितलेले आहेत. हे संक्षिप्त आहे. पूर्ण मुद्दे माझ्या आगामी पुस्तकात मिळतील. तुम्हाला अजून माहीत असतील. ते ही लिहा (म्हणजे ते मी माझेच मुद्दे म्हणून त्या पुस्तकात घालेन. त्यारून वाद निर्माण झालाच तर खालच्या एखाद्या उपायाचा वापर होईलच).

तर अशा सिच्युएशन मधे जर कधी अडकला असाल - की समोरच्याला जोरदार विरोध तर करायचा आहे, प्रत्यक्ष बोलताना जसे केवळ जोरात ओरडण्याने आपण बरोबर आहोत असा समज निर्माण करता येतो तसे काहीतरी लेखी करायचे आहे, पण त्याकरता योग्य मुद्दा सापडत नाहीये, किंवा आपण एकदा व्यक्त केलेला मुद्दा हेच एक सार्वत्रिक सत्य आहे, त्यापेक्षा वेगळे काही असूच शकत नाही असे तुम्हाला (कायमच) वाटते, त्यामुळे अजून काय लिहीणार असा प्रश्न पडतो - तर अशा वेळी केवळ मुद्दा योग्य वाटतो म्हणून दुसर्‍याचे म्हणणे मान्य करण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची नामुष्की येण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणतेही उपाय वापरा. आपली फुल परवानगी आहे.

१. स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट
हा सर्वात लोकप्रिय व जास्त वापरला जाणारा उपाय आहे. म्हणजे कोणी "खेड्यांत ग्रामीण निसर्गसौंदर्य टिकवले पाहिजे" असे म्हंटले की आपण त्यावर "म्हणजे खेड्यातील लोकांनी असेच राहावे?" असे विचारावे, किंवा त्याहीपुढे जाउन "म्हणजे खेड्यातील लोकांनी कायम उपाशीच मरावे काय?" असा गुगली टाकावा. आणि मग त्यानंतर तुमचा गुगली हाच मूळच्या व्यक्तीने लिहीलेला मुद्दा आहे असे धरून वाद घालावा. म्हणजे "खेड्यातील लोकांनी उपाशी मरावे" हे किती निरर्थक मत आहे यावर बरेच काही लिहावे. तुमचा प्रश्न निरर्थक असल्याने तुम्हाला तो सहज खोडता येतो. त्यामुळे मूळचा मुद्दा आपण खोडून काढला अशा थाटात वागावे. पाहिजे तर इतर एक दोन ठिकाणी जाउन ते जाहीर करावे.

- त्यावर मग तो पोस्टकर्ता मवाळ पक्षातील असेल तर "मला असे म्हणायचे नव्हते" वगैरे पडता पवित्रा घेतो. आता ऑलरेडी आपल्यावर फोकस आला आहे. एक हेतू सफल. त्यानंतर तुमच्यात व त्याच्यात पुरानी दुश्मनी किती आहे त्याप्रमाणे पुढचे पवित्रे ठरतील. 'अपना आदमी' असेल तर मग "कल्पना आहे, पण त्यातून असा अर्थ निघू नये..." वगैरेच्या दिशेने जावे. नाहीतर "प्रत्यक्ष लिहीले नसले तरी तुम्हाला तेच म्हणायचे आहे" अशा आक्रमक दिशेने.
- याउलट तो जहाल पक्षातील असेल तर डायरेक्ट तुमच्या बुद्धीवर शंका घेतो, मग तुम्ही त्याच्या बुद्धीवर किंवा आणखी कशाकशावर घ्यावी आणि मांजा काटलेल्या पतंगाप्रमाणे वाद जाईल तिकडे जाऊ द्यावा.

अशा वेळेस काही चतुर लोक किंवा कंपूवाले पोस्टकर्त्याला +१, मोदक वगैरे द्यायला पुढे होतात, किंवा मूळ विषयावर काहीतरी मुद्दा लिहीतात (रिकामटेकडे कुठले!). वाद योग्य दिशेने जाण्याची भीती निर्माण होते. अशा वेळेस त्या लोकांच्या पोस्टमधला एखादा धागा पकडून तेथून हे पुन्हा चालू करावे. एखादा तरी बकरा मिळतोच.

येथे लक्षात घ्या की दोन्ही केस मधे वाद भरकटवण्याचे व तेथे स्वत:वर अटेन्शन ठेवण्याचे उद्दिष्ट सफल होते.

२. "हेच लोक" थिअरी
आपला समाजशास्त्रीय अभ्यास एवढा अचूक आहे की विविध मते असलेले लोक आपण मॉनिटर करत असतो, कोणत्या प्रसंगात कोणता गट कसा वागतो, त्या गटांत नक्की लोक कोणकोण आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे आहे व आपण ते वेळोवेळी नोंद करून ठेवत असतो, असा आभास निर्माण करणे. किंवा काही आयडींच्या गटाचा आपण गेली कित्येक वर्षे गट म्हणून अभ्यास व पाठपुरावा करत आहोत, व मधल्या काळात ते आयडी एक गट म्हणून तसेच राहिलेले आहेत अशा थाटात बोलणे.

उदा: "आत्ता 'अ' पक्षाच्या हिंसक आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक त्यावेळी जेव्हा 'ब' पक्षाने हिंसक आंदोलन उभे केले तेव्हा त्याला सपोर्ट करत होते", किंवा "रेल्वेच्या भाववाढीला विरोध करतात. पण हेच लोक ३०० चा पिझा ३३० चा झाला तर अजिबात तक्रार करत नाहीत". यात एका बाबतीत विरोध करणारे व दुसर्‍या बाबतीत न करणारे - या "दोन्ही" गटांत तेच लोक होते हे आपल्याला अभ्यासावरून पक्के माहीत असल्याच्या थाटात बोलावे.

कवितांमधे जसे "धुंद धुंद आसमंत" वगैरे लिहीले तरी ४-५ लोक वा वा करायला सहज सापडतात. तसे अशा ढोबळ वाक्यांशी ताबडतोब सहमत होणारे ४-५ लगेच मिळतात. मिळाले नाहीतरी "अचानक सहज उभे करता येतात". त्यामुळे काहीतरी अ‍ॅनेलिटिकल मत लिहील्याचा आभास बरेच दिवस टिकतो.

३. पुडी सोडून देणे
राजकारणात एखादी जरा बर्‍यापैकी लोकप्रिय व्यक्ती असेल, नवखी असल्याने फारशी स्कॅण्डल्स त्यांच्या नावावर नसतील व त्यामुळे त्यांच्याबद्दल जरा काही लोक चांगले लिहीत असतील, तर काही दिवस सर्वांचे तसे चांगले मत होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला तर कोणाबद्दल कोणी चांगले बोलणे मान्य नसल्याने वैताग येतो. काळजी नसावी. यावरही उपाय आहे.

"XXX काय? ठीक आहे ठीक आहे. एवढे कौतुक करताय, दापोली प्रकरण तुम्हाला माहीत नसेलच, किंवा तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केलेले दिसते".
असे काहीतरी सोडून द्यावे. अर्ध्या लोकांना उगाचच मग हे जे कोणी XXX आहेत त्यांचे काहीतरी दापोली प्रकरण आहे असे वाटते. आपला उद्देश साध्य. इतर कोणी मग 'दापोली' प्रकरण काय विचारले तर तेथून गायब व्हावे, किंवा पूर्ण दुर्लक्ष करून विषय भलतीकडे न्यावा.

४. "आत्ता वेळ नाही, नाहीतर तुम्हाला गप्प केले असते"
चालू चर्चेच्या विषयातील (किंबहुना कोणत्याही विषयातील) सर्व उपलब्ध ज्ञान आपल्याकडे आहे, त्यामानाने इतर अगदीच कालची पोरे आहेत. पण केवळ व्यापातून वेळ नसल्याने ते आपण सध्या लिहू शकत नाही. असे सांगावे, पण यासाठी टोन महत्त्वाचा आहे. नुसत्या टोन वरून लोकांना हे खरेच आहे असे वाटायला हवे. अशा वेळी "थांबा जरा वेळाने तुमचा याविषयावर क्लास घेतो", किंवा "मी त्याबद्दल लिहीले तर तुमची बोलती बंद होईल" असे म्हणावे, किंवा आपण इतरत्र कोठेतरी तुम्हाला पूर्ण गप्प केले होते असे ठोकून द्यावे. वाचणार्‍यांपैकी अर्ध्यांचा तरी तुम्ही या विषयातील तज्ञ आहात असा समज होईल.

- अशा वेळी ती दुसरी व्यक्ती पेचात पडते. सज्जन माणूस असेल तर "मला ती चर्चा लक्षात नाही. जरा लिन्क देऊ शकाल काय?" वगैरे सावध व नम्र पवित्रा घेते. त्यावर "बरोबर आहे, ते लक्षात नसेलच..." वगैरे अजून आक्रमक व्हावे किंवा सरळ गायब व्हावे. एक दोन दिवस त्या व्यक्तीला "हा आयडी काहीतरी भारी लिहून आपल्याला निरूत्तर करणार आहे" असे वाटत राह्ते.

- मात्र दुसरी व्यक्तीही पेटली असेल तर येथून सहसा व्यक्तिगत डिवचाडिवचीवर येते. आपल्याला काय फरक पडतो. नाहीतर फॉर अ चेंज अॅडमिन कडे तक्रार करावी. पाहिजे तर तेथेही खवचट टोन तसाच ठेवावा. "यावर कारवाई करणार नसालच, पण ऑन द रेकॉर्ड राहावे म्ह्णून लिहीतोय" वगैरे.

- नाहीतर अत्यंत वाईट शब्दांत, अंसंसदीय भाषेत समोरच्याला हिणवावे. यथावकाश ती पोस्ट उडवली जाईल. मग त्या विषयांवर आपली मते त्या साईटच्या मतांच्या विरोधी असल्याने आपल्या पोस्ट्स उडवल्या जातात असा कांगावा करावा. एकूणच आपल्या उडवलेल्या पोस्ट्स या त्यातील भाषेमुळे नसून त्यातील मतांमुळे उडवल्या जातात असा कांगावा कोठेही करायला सोयीचा आहे.

५. "तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म"
एखाद्याने व्यक्त केलेले विरोधी किंवा किमान चिकित्सक मत जर आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल, पक्षा बद्दल असेल (किंवा नसेलही, पण तुम्हाला भांडणाची खुमखुमी असेल) तर येथे हे उपयोगी पडते. अशा वेळेस लगेच तशी इतर उदाहरणे घेऊन "त्यावेळेस तुम्हाला असे मत द्यावेसे वाटले नाही का?" हे विचारावे. त्या व्यक्तीला ती घटना माहीत असेल्/नसेल, त्या वेळेस ती व्यक्ती सोशल नेटवर्क वर असेल/नसेल, त्याने काही फरक पडत नाही. किंबहुना त्या व्यक्तीने तसे मत तेव्हाही व्यक्त केले असेल, तरीही काही फरक पडत नाही. फार थोडे लोक स्वतःच्या लिंका ("पिंक लिंक") सेव्ह करून लागेल तेव्हा लगेच वापरू शकतात. तेव्हा चपखल जबाब मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे. चिंता नसावी.

विरोधी/चिकित्सक मते व्यक्त करणार्‍यांनी एखादे क्षेत्र कायम "मॉनिटर" करत राहून अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीने त्यातील घटनांवर पक्ष वा व्यक्तिविरहीत मते व्यक्त करावीत असा आपला आग्रह आहे असा आभास निर्माण करावा.
मात्र आपण आपल्या नावडत्या गोष्टींवर तशीच मते देताना त्याचा स्वतःला विसर पडू द्यावा. लोकांना आयडी व त्यांची इतरत्र लिहीलेली मते यांचा ताळमेळ लावण्याएवढा इंटरेस्ट नसतो (ज्यांना इंटरेस्ट वा वेळ असतो त्यांच्याशी ऑलरेडी तुमचे भांडण चालू असतेच), त्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही. बिन्धास्त लिहावे.

असो. तर सध्या हे पाच उपाय सुचवले आहेत. अजूनही आहेत. पण ते वापरले गेलेले दिसले तर या यादीत अ‍ॅड होतील याची खात्री बाळगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख लिहायला तुम्हाला आज सुचले का? तेव्हा मोठे चुका दाखवत होतात त्यांच्या ते!

माझी इतर धाग्यांवर अजून बरीच भांडणे व्हायची आहेत, नाहीतर येथे थांबून तुम्हाला माती चारूनच निघालो असतो पुढे!

दुतोंडी गांडूळं कुठली!

-'बेफिकीर'!

फा Lol

अजून भरः
'तुम्ही कुठल्या गप्पांच्या बाफवर पडीक असता मला माहीत आहे, तुमच्यासारख्यांशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाही!'
Proud

>>> सीमंतिनी | 21 August, 2014 - 12:17 नवीन

बापरे स्वाती_आंबोळे हे मला माहिती नव्हते - a man is known by ba.fa. he visits!!!
<<<

Women are mainly known by the BB they visit

अजून भरः

'बरं! तुम्हीच एक काय ते < >! तुम्हालाच काय ते कळतं! आमच्या घरातही तीन तीन < > आहेत, पण त्यांना काय कळतंय म्हणा!'

(< >मधे चालू विषयातील तज्ज्ञ समजलं जाणारं बिरुद भरावं. उदा. आरोग्याशी संबंधित धाग्यावर 'डॉक्टर' .)

फारेन्ड सॉलीड हाणले आहे.:हाहा: माबो चा अभ्यास नाही, तर माबोकरान्च्या अन्तर्बाह्य स्वभावाचा आणी पोस्टीन्चा अभ्यास आहे तो.:फिदी:

नमोरुग्ण, श्वानप्रेमी, ओएनएस वाले हे तीन अपवाद बाईंनी 'अजून भर - तुम्हाला काय कळतंय' म्हणून लिहिलेल्या नियमात बसवू नयेत

एका घरात तीन ओ एन एस वाले असले तर एकुण किती रात्री 'स्टँड' दिला गेला ते लिहा!

(अश्या रीतीने धागा भरकटवणे हा सहावा उपाय आहे)

बरं < > हे एका वाक्यात दोनदा आहे तर रिपिट करायचे की वेगवेगळे पण चालेल
म्हणजे
'बरं! तुम्हीच एक काय ते <हुश्शारचेंडू>! तुम्हालाच काय ते कळतं! आमच्या घरातही तीन तीन <बावळट> आहेत, पण त्यांना काय कळतंय म्हणा!'

हे एका वाक्यात दोनदा आहे तर रिपिट करायचे की वेगवेगळे पण चालेल<<<

हा चालू कलियुगातील महान प्रश्न ठरायला हरकत नाही

Lol ____/\_____ अशक्य आहेस, फा!!

अजून एकः
'तुम्ही कोणाचा डू आय आहात ते चांगलंच ठाऊक आहे. इतक्या वेळा आयडी बंद केला तरी अक्कल आलेली दिसत नाही'

कोणी पुरावा/लिंक मागितल्यास एखाद्या भल्या मोठ्या (शक्यतो इंग्रजीतील) रटाळ लेखाची लिंक द्यावी (विषयाशी संबंधित नसेल तरी चालेल). शक्यतो कोणी वाचत नाही, समजा वाचलं आणि प्रतिक्रिया आली तरी "तुम्हाला लेख कळलाय का?" असा प्रश्न विचारा.

xxxxxx यांच्यावर इग्नोरास्त्रच मारा!

खासकरुन विरोधी मते मांडणार्‍या आयडीवर अथवा बोलण्यास काही मुद्दा न राहील्यास हमखास केला जाणारा उपाय! प्रशासकाच्या विपूत शाळेतल्या बाईंकडे करत असत तशी शेंबूड पुसत तक्रार करणे हे आहेच.

स्वत:कडे अगाध माहितीसंपदा आहे पण वाचणाऱ्यांची ती समजून घ्यायची कुवत नाही असे दाखवायचे असल्यास खालील तीन वाक्ये प्रमाण मानावीत.
1. बाकी चालू द्या.
2. बाकी काथ्याकूट चालू दे.
3. असो. (हे मितभाषित्वाचं द्योतक आहे.)
शिवाय अनुमोदने, +1, + 111111...... करोडो मोदक वाले -
प्रत्येक पोस्ट वाचतांय हां!

अनेकांची गुपिते फोडून ती जाहिर केल्याबद्दल (दामाजीने जसे लोकांना धान्य वाटले होते) फारेण्डाचा फार निषेध Lol
आता आधी जे चालू होते त्यामधे एक्स्पोनेन्शिअल की कायसेसे असते तशी वाढ होईल ना ? Wink

Pages