मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

Submitted by फारएण्ड on 21 August, 2014 - 02:30

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

पूर्वी हे नव्हते. एखाद्याने प्राचीन काळी एखाद्या विषयावर जे लिहीले होते तेच त्याचे/तिचे सार्वकालिक मत आहे असे गृहीत धरून चालत असे. त्यामुळे त्याच्या/तिच्या इतर विषयांवरच्या इतर मुद्द्यांना प्रतिक्रिया म्हणून ते पूर्वग्रह पुढे आणता येत असत. पण आता असे करणे अवघड होऊ लागले आहे. तर अशा मुद्देवंचितांकरिता येथे काही उपाय सांगितलेले आहेत. हे संक्षिप्त आहे. पूर्ण मुद्दे माझ्या आगामी पुस्तकात मिळतील. तुम्हाला अजून माहीत असतील. ते ही लिहा (म्हणजे ते मी माझेच मुद्दे म्हणून त्या पुस्तकात घालेन. त्यारून वाद निर्माण झालाच तर खालच्या एखाद्या उपायाचा वापर होईलच).

तर अशा सिच्युएशन मधे जर कधी अडकला असाल - की समोरच्याला जोरदार विरोध तर करायचा आहे, प्रत्यक्ष बोलताना जसे केवळ जोरात ओरडण्याने आपण बरोबर आहोत असा समज निर्माण करता येतो तसे काहीतरी लेखी करायचे आहे, पण त्याकरता योग्य मुद्दा सापडत नाहीये, किंवा आपण एकदा व्यक्त केलेला मुद्दा हेच एक सार्वत्रिक सत्य आहे, त्यापेक्षा वेगळे काही असूच शकत नाही असे तुम्हाला (कायमच) वाटते, त्यामुळे अजून काय लिहीणार असा प्रश्न पडतो - तर अशा वेळी केवळ मुद्दा योग्य वाटतो म्हणून दुसर्‍याचे म्हणणे मान्य करण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची नामुष्की येण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणतेही उपाय वापरा. आपली फुल परवानगी आहे.

१. स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट
हा सर्वात लोकप्रिय व जास्त वापरला जाणारा उपाय आहे. म्हणजे कोणी "खेड्यांत ग्रामीण निसर्गसौंदर्य टिकवले पाहिजे" असे म्हंटले की आपण त्यावर "म्हणजे खेड्यातील लोकांनी असेच राहावे?" असे विचारावे, किंवा त्याहीपुढे जाउन "म्हणजे खेड्यातील लोकांनी कायम उपाशीच मरावे काय?" असा गुगली टाकावा. आणि मग त्यानंतर तुमचा गुगली हाच मूळच्या व्यक्तीने लिहीलेला मुद्दा आहे असे धरून वाद घालावा. म्हणजे "खेड्यातील लोकांनी उपाशी मरावे" हे किती निरर्थक मत आहे यावर बरेच काही लिहावे. तुमचा प्रश्न निरर्थक असल्याने तुम्हाला तो सहज खोडता येतो. त्यामुळे मूळचा मुद्दा आपण खोडून काढला अशा थाटात वागावे. पाहिजे तर इतर एक दोन ठिकाणी जाउन ते जाहीर करावे.

- त्यावर मग तो पोस्टकर्ता मवाळ पक्षातील असेल तर "मला असे म्हणायचे नव्हते" वगैरे पडता पवित्रा घेतो. आता ऑलरेडी आपल्यावर फोकस आला आहे. एक हेतू सफल. त्यानंतर तुमच्यात व त्याच्यात पुरानी दुश्मनी किती आहे त्याप्रमाणे पुढचे पवित्रे ठरतील. 'अपना आदमी' असेल तर मग "कल्पना आहे, पण त्यातून असा अर्थ निघू नये..." वगैरेच्या दिशेने जावे. नाहीतर "प्रत्यक्ष लिहीले नसले तरी तुम्हाला तेच म्हणायचे आहे" अशा आक्रमक दिशेने.
- याउलट तो जहाल पक्षातील असेल तर डायरेक्ट तुमच्या बुद्धीवर शंका घेतो, मग तुम्ही त्याच्या बुद्धीवर किंवा आणखी कशाकशावर घ्यावी आणि मांजा काटलेल्या पतंगाप्रमाणे वाद जाईल तिकडे जाऊ द्यावा.

अशा वेळेस काही चतुर लोक किंवा कंपूवाले पोस्टकर्त्याला +१, मोदक वगैरे द्यायला पुढे होतात, किंवा मूळ विषयावर काहीतरी मुद्दा लिहीतात (रिकामटेकडे कुठले!). वाद योग्य दिशेने जाण्याची भीती निर्माण होते. अशा वेळेस त्या लोकांच्या पोस्टमधला एखादा धागा पकडून तेथून हे पुन्हा चालू करावे. एखादा तरी बकरा मिळतोच.

येथे लक्षात घ्या की दोन्ही केस मधे वाद भरकटवण्याचे व तेथे स्वत:वर अटेन्शन ठेवण्याचे उद्दिष्ट सफल होते.

२. "हेच लोक" थिअरी
आपला समाजशास्त्रीय अभ्यास एवढा अचूक आहे की विविध मते असलेले लोक आपण मॉनिटर करत असतो, कोणत्या प्रसंगात कोणता गट कसा वागतो, त्या गटांत नक्की लोक कोणकोण आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे आहे व आपण ते वेळोवेळी नोंद करून ठेवत असतो, असा आभास निर्माण करणे. किंवा काही आयडींच्या गटाचा आपण गेली कित्येक वर्षे गट म्हणून अभ्यास व पाठपुरावा करत आहोत, व मधल्या काळात ते आयडी एक गट म्हणून तसेच राहिलेले आहेत अशा थाटात बोलणे.

उदा: "आत्ता 'अ' पक्षाच्या हिंसक आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक त्यावेळी जेव्हा 'ब' पक्षाने हिंसक आंदोलन उभे केले तेव्हा त्याला सपोर्ट करत होते", किंवा "रेल्वेच्या भाववाढीला विरोध करतात. पण हेच लोक ३०० चा पिझा ३३० चा झाला तर अजिबात तक्रार करत नाहीत". यात एका बाबतीत विरोध करणारे व दुसर्‍या बाबतीत न करणारे - या "दोन्ही" गटांत तेच लोक होते हे आपल्याला अभ्यासावरून पक्के माहीत असल्याच्या थाटात बोलावे.

कवितांमधे जसे "धुंद धुंद आसमंत" वगैरे लिहीले तरी ४-५ लोक वा वा करायला सहज सापडतात. तसे अशा ढोबळ वाक्यांशी ताबडतोब सहमत होणारे ४-५ लगेच मिळतात. मिळाले नाहीतरी "अचानक सहज उभे करता येतात". त्यामुळे काहीतरी अ‍ॅनेलिटिकल मत लिहील्याचा आभास बरेच दिवस टिकतो.

३. पुडी सोडून देणे
राजकारणात एखादी जरा बर्‍यापैकी लोकप्रिय व्यक्ती असेल, नवखी असल्याने फारशी स्कॅण्डल्स त्यांच्या नावावर नसतील व त्यामुळे त्यांच्याबद्दल जरा काही लोक चांगले लिहीत असतील, तर काही दिवस सर्वांचे तसे चांगले मत होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला तर कोणाबद्दल कोणी चांगले बोलणे मान्य नसल्याने वैताग येतो. काळजी नसावी. यावरही उपाय आहे.

"XXX काय? ठीक आहे ठीक आहे. एवढे कौतुक करताय, दापोली प्रकरण तुम्हाला माहीत नसेलच, किंवा तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केलेले दिसते".
असे काहीतरी सोडून द्यावे. अर्ध्या लोकांना उगाचच मग हे जे कोणी XXX आहेत त्यांचे काहीतरी दापोली प्रकरण आहे असे वाटते. आपला उद्देश साध्य. इतर कोणी मग 'दापोली' प्रकरण काय विचारले तर तेथून गायब व्हावे, किंवा पूर्ण दुर्लक्ष करून विषय भलतीकडे न्यावा.

४. "आत्ता वेळ नाही, नाहीतर तुम्हाला गप्प केले असते"
चालू चर्चेच्या विषयातील (किंबहुना कोणत्याही विषयातील) सर्व उपलब्ध ज्ञान आपल्याकडे आहे, त्यामानाने इतर अगदीच कालची पोरे आहेत. पण केवळ व्यापातून वेळ नसल्याने ते आपण सध्या लिहू शकत नाही. असे सांगावे, पण यासाठी टोन महत्त्वाचा आहे. नुसत्या टोन वरून लोकांना हे खरेच आहे असे वाटायला हवे. अशा वेळी "थांबा जरा वेळाने तुमचा याविषयावर क्लास घेतो", किंवा "मी त्याबद्दल लिहीले तर तुमची बोलती बंद होईल" असे म्हणावे, किंवा आपण इतरत्र कोठेतरी तुम्हाला पूर्ण गप्प केले होते असे ठोकून द्यावे. वाचणार्‍यांपैकी अर्ध्यांचा तरी तुम्ही या विषयातील तज्ञ आहात असा समज होईल.

- अशा वेळी ती दुसरी व्यक्ती पेचात पडते. सज्जन माणूस असेल तर "मला ती चर्चा लक्षात नाही. जरा लिन्क देऊ शकाल काय?" वगैरे सावध व नम्र पवित्रा घेते. त्यावर "बरोबर आहे, ते लक्षात नसेलच..." वगैरे अजून आक्रमक व्हावे किंवा सरळ गायब व्हावे. एक दोन दिवस त्या व्यक्तीला "हा आयडी काहीतरी भारी लिहून आपल्याला निरूत्तर करणार आहे" असे वाटत राह्ते.

- मात्र दुसरी व्यक्तीही पेटली असेल तर येथून सहसा व्यक्तिगत डिवचाडिवचीवर येते. आपल्याला काय फरक पडतो. नाहीतर फॉर अ चेंज अॅडमिन कडे तक्रार करावी. पाहिजे तर तेथेही खवचट टोन तसाच ठेवावा. "यावर कारवाई करणार नसालच, पण ऑन द रेकॉर्ड राहावे म्ह्णून लिहीतोय" वगैरे.

- नाहीतर अत्यंत वाईट शब्दांत, अंसंसदीय भाषेत समोरच्याला हिणवावे. यथावकाश ती पोस्ट उडवली जाईल. मग त्या विषयांवर आपली मते त्या साईटच्या मतांच्या विरोधी असल्याने आपल्या पोस्ट्स उडवल्या जातात असा कांगावा करावा. एकूणच आपल्या उडवलेल्या पोस्ट्स या त्यातील भाषेमुळे नसून त्यातील मतांमुळे उडवल्या जातात असा कांगावा कोठेही करायला सोयीचा आहे.

५. "तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म"
एखाद्याने व्यक्त केलेले विरोधी किंवा किमान चिकित्सक मत जर आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल, पक्षा बद्दल असेल (किंवा नसेलही, पण तुम्हाला भांडणाची खुमखुमी असेल) तर येथे हे उपयोगी पडते. अशा वेळेस लगेच तशी इतर उदाहरणे घेऊन "त्यावेळेस तुम्हाला असे मत द्यावेसे वाटले नाही का?" हे विचारावे. त्या व्यक्तीला ती घटना माहीत असेल्/नसेल, त्या वेळेस ती व्यक्ती सोशल नेटवर्क वर असेल/नसेल, त्याने काही फरक पडत नाही. किंबहुना त्या व्यक्तीने तसे मत तेव्हाही व्यक्त केले असेल, तरीही काही फरक पडत नाही. फार थोडे लोक स्वतःच्या लिंका ("पिंक लिंक") सेव्ह करून लागेल तेव्हा लगेच वापरू शकतात. तेव्हा चपखल जबाब मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे. चिंता नसावी.

विरोधी/चिकित्सक मते व्यक्त करणार्‍यांनी एखादे क्षेत्र कायम "मॉनिटर" करत राहून अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीने त्यातील घटनांवर पक्ष वा व्यक्तिविरहीत मते व्यक्त करावीत असा आपला आग्रह आहे असा आभास निर्माण करावा.
मात्र आपण आपल्या नावडत्या गोष्टींवर तशीच मते देताना त्याचा स्वतःला विसर पडू द्यावा. लोकांना आयडी व त्यांची इतरत्र लिहीलेली मते यांचा ताळमेळ लावण्याएवढा इंटरेस्ट नसतो (ज्यांना इंटरेस्ट वा वेळ असतो त्यांच्याशी ऑलरेडी तुमचे भांडण चालू असतेच), त्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही. बिन्धास्त लिहावे.

असो. तर सध्या हे पाच उपाय सुचवले आहेत. अजूनही आहेत. पण ते वापरले गेलेले दिसले तर या यादीत अ‍ॅड होतील याची खात्री बाळगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे दोन पैसे..

१) मालकच ना तूम्ही इथले..

२) आता कोण जाणार अ‍ॅडमिनच्या विपूत ते दिसेलच की..

३) पॉपकॉर्न ...

४) अ‍ॅडमिन जरा लक्ष द्या.

५) अश्यानेच चांगले चाललेले बीबी बंद पडतात.

६) मग गेली कित्येक वर्षे तूमचेच सरकार होते ना ? तेव्हा का नाही झाले / केले / बोललात !

७) अजय यांची मायबोली राहिली नाही आता.

फारएण्डा, भारी लिहिलंय. Lol
मयेकारांशी सहमत, मुद्दा १ मी केलाय आणि २ चा शिकार बनलोय. a man is known by ba.fa. he visits! सीमंतिनी एकदम बरोबर कन्कूजन. Proud

आणि एक,
पोस्ट मधून पुरेशी विनोदनिर्मिती होत असेल तरीही विषयाशी असंबद्ध शब्दाखुणा टाकाव्या. शब्द्खुणा भारी ही कमेंट मिळतेच. ही युक्ती या बीबी वर कोणीही वापरली नाहीये याची खात्री आहे. Proud

हा हा हा ... जबरी लिहिलेय .. Lol

घरोघरी मातीच्याच चुली.. पण हिच मजा आहे.. विरंगुळा शोधायला आपण इथे येतो तर हे किडे आणि दंगा हवाच..

तरिही विपू आणि संपर्कातून अनेकांनी विनंती केल्याने टंकत आहे. <<< साती, एक राहिले. आणि प्रत्यक्ष फोनवरून!

ज्यानी ज्यानी उपाय लिहिले आहेत त्यानी ते स्वत: नीट वापरात आणून प्रभावी असल्याची खात्री केलेली आहे का?

झकास लिहीलय फारएण्डभाउ. बाकी मान्यवरांनी जोडलेल्या पुरवण्यासुद्धा एक नं.
अजुन एक... इथे मुद्याला धरुन चर्चा होणारच नाही काय? कि फक्त स्कोअर सेट्लींगच?

एक नविन ट्रेंड लिहतो.

पुर्वी मायबोली अशी नव्हती. पुर्वी जे आय डी होते ( मुळ निवासी स्टाईलवर ) त्यांना काही विषेश अधिकार मिळावेत.

१) त्यांच्या लेखावर कुणीही टिका करु नये.
२) त्यांच्या प्रतिसादावर कुणी प्रतिसाद देऊ नये.
३) जुनी आणि नवी अश्या दोन मायबोल्यात मायबोलीचे विभाजन करावे ( भारत पाकिस्थान स्टाईल )

तुमचं चालू द्या.
बघू तरी काय तारे तोडतात एकेक...
काय हो अ‍ॅडमिन, हे असले बाफ चालतात वाटतं तुम्हाला ? टीम अ‍ॅडमिनने धागा काढला एव्हढा मोठा पण काय तर शेवटी पालथ्या घड्यावर पाणीच

काय लिहीताहेत तिकडे एकेक जण. कुणी सेन्सीबल आयडी नाहीये का ?

"अगं बाई, वाचलंस का.. ते हे आपले नाहीत का ...आज विश्वसुंदरी स्पर्धेत जाऊन आले "
"कुठं म्हणे ?"
"काय लक्ष कुठे असतं हल्ली ? "

टैमप्लीज Lol

फारएण्ड, काय लिहू? ईतकं अफाट कौतुक केलय सगळ्यांनी! कारण ते मस्तपैकी रिलेट झालय! वाह!! झकास!!

एक माझ्याकडून पण अ‍ॅडिशनः

एखाद्या समाजमान्य / बहूमान्य अँगल च्या विरुद्ध अँगल घ्यावा. त्या स.मा. / ब.मा. अँगल च्या बाजूने बोलणारे / लिहीणारे कसे बुरसटलेल्या विचाराचे असून, आपण प्रागतिकतेच्या कासेला घट्ट मिठी मारलेली आहे हा गंड मनी बाळगून असावे. मग त्या सर्व बुरसटलेल्या विचारांच्या पाईकांवर, अतीव जुन्या-पुराण्या एखाद्या (शक्यतो अज्ञात ऐतिहासीक / पौराणिक असला, तर अधिक उत्तम) दाखल्याच्या अनुशंगाने हल्ला चढवावा. दाखला देणं हे फक्त आपलं काम, त्याविषयी माहिती विरुद्ध पक्षाने स्व-खर्चाने 'गुगलून बघण्याचा' सल्ला सुद्धा द्यावा. त्यातून एखाद्याने, परत वाद घालण्याची तौहीन केलीच (अरे, आपलं अपब्रिंगींग, शिक्षण, कार्यक्षेत्र म्हणजे काय!! बाकीच्या अती-सामान्य जीव-जंतूंना आपण उत्तरं देऊन मुळातच उपकृत केलेलं आहे), तर त्या बेमुर्वत प्रश्न-कर्त्याला, फक्त 'जाऊ द्या', 'अरे देवा', 'चालू द्या' अशी उत्तरं (की प्रतिवाद) देऊन वास्तविक आपल्याकडे सांगण्यासारखे ज्ञानाचे खजिने असून, ते तुमच्या सारख्यावर उधळण्याची पाळी अजून आलेली नाही हे ध्वनित करावं. स्वतः लोकांच्या बुद्धीची कीव करून सल्ल्यांची खैरात केली तरी चालेल, पण समोरच्याची एखादी सुचना देखील 'प्लीजच, मला सल्ले देऊ नका' अशा स्वरात 'आऊट ऑफ पार्क' भिरकावून द्यावी. एकंदरीतच आपल्या सुपिरीअ‍ॅरीटी काँप्लेक्स ला सतत स्टिरॉईड चा बूस्टर देत रहावं.

अरे सह्हीच! फाभाऊ जोरदार!!!

एक अजून, आपला मुद्दा लिहून झाला की हेमाशेपोचा पूर्णविराम द्यायचा. म्हणजे समोरच्याला पुन्हा उत्तर देण्याची बांधिलकी झटकून टाकायची आणि मग जमेल तसं फ़क्त काड्या करणारया
पोस्टी टाकायच्या.

बेश्टेश्ट!!!!! Lol आतातरी मायबोलीवर वैताग पैदा करणे कमी करा रे भाऊ Happy
प्रतिसादातले काहीकाही आयटम पण बेश्ट आहेत.

open secrets Lol
दर लोकसभा/विधानसभा निवडणुकीच्या वेळी ह्या धाग्याची गरज पडणार हे नक्की!

गेट वेल सून !
म्हणजे "तुम्हाला चांगली सून मिळो" नाही तर "लवकर बरे व्हा"
हे वाक्य कसे नाही आले अजुन या अभ्यासात ? Wink

दयाघना ( सध्याचे नाव Happy ) यालाच ओशीडी म्हणायचं का ?

आई अंबाबाईच्या नावानं उधं उधं उधं..... सारखं करावंच लागतं हो, भक्तगणांना !

Pages