व्यसन नावाचा राक्षस!

Submitted by अविनाश खेडकर on 8 August, 2014 - 02:23

आज एका मित्राच्या अंतयात्रेस गेलो होतो. आमचा १० वर्षाचा सहवास कायमचाच संपला होता. त्याचे कुटूंबीय आक्रोश करत होते. त्याच्या ऐन तीशीत या जगाचा नोरोप घेण्याने सगळ्यांनाच हळहळ वाटत होती. पण माझ मन त्याचा मृत्यू मान्य करायला तयार होत नाही. कधी काळी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा तरूण दारूच्या नादाला कधी लागला ते आम्हालाही कळल नाही. पुढे त्याचे हे व्यसन एव्हढे वाढले कि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
त्याची उर बडवून रडनारी आई, हतबल बाप, शुध्द हरपलेली बायको आणि ३ वर्षाचं एक केविलवाण पोर पाहून काळीज पार हेलावून गेल. अशी वेळ देवाने शत्रुवर देखील आनू नये अस क्षणभर वाटल. पण देव कुठे आणतो असली वेळ माणसावर? ती तर मानूस स्वता:च ओढून घेतो आणि स्वता:चा नाश करून घेतो.

मनात एक हळहळ सतत राहील की मी माझ्या मित्रासाठी काहीच करू शकलो नाही. मी बर्‍याच वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला समजावण्याइतपत माझी क्षमता नव्ह्ती कदाचित. पण कुणी त्याला
वेळीच व्यसनापासून परावत्त केल असत तर आज तो आमच्यात असता, हेही तितकच खर. माझ्या मित्रासारखे व्यसनाच्या आहारी जावून कित्येकजन स्वता:च्या व त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनाची राखरांगोळी करतात त्याची काही गिनती आहे का? म्हनून मी ठरवलय की मला जस शक्य होईल तस मी लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करील. त्यासाठी शाळा कॉलेजेस व प्रसंगी खेडोपाडी जावून लो़कांशी चर्चा करील.

पण मित्रांनो यासाठी मला आपली बहूमोल मदत हवी आहे. कारण व्यसन मुक्ती या विषयावरील माझ ज्ञान अगदी तोकडं आहे व अनुभव शून्य. पण माझा हेतू प्रामाणिक आहे व संकल्प तडीस नेण्याची जिद्दही अफाट आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी मला या कामी मदत करावी. आपण आपणास या विषया संबंधीत कुठलीही माहीती या ठिकाणी देऊ शकता. आपणास माहिती पुरवणे सोपे जावे म्हणून मुद्दे देत आहे .

१. व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार.

२. व्यसन कसे लागते व त्याची कारणे ( वैदकीय दृष्टीकोन )

३. एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला आहे ते कसे ओळखावे ? त्याची लक्षणे.

४. व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व बोध्दिक दुष्परीणाम .

५. व्यसनापासून परावृत्त कसे व्हावे वा करावे.

६. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या शेवाभावी संस्था व शासकीय उपक्रम

७. व्यसनापासून परावृत्त झालेली काही प्रेरणादायी उदाहरणे.

८. व्यसनमुक्ती संदर्भातील मान्यवरांचे लेख, रेकोर्डिंग इत्यादी.

आणि या व्यतिरिक्त कोणतीही माहिती समर्पक उदाहरणे, शेर, कविता विनोद जे कि व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरतील. अशी माहिती तुम्ही पाठवू शकता वा लिंक देवू शकता.

तुम्ही ही माहिती माझ्या इ मेलवरही पाठवू शकता. वा फोन करून काही सुचना करू शकता. माझा आय डी खाली देत आहे.

avinash007.khedkar@gmail.com

mobile: 08888325748

मी हा धागा खूप सकारात्मक हेतूने उघडला आहे. व्यसनमुक्ती विषयी आपले काही नकारात्म मते असतील. उदा. व्यसनमुक्ती अशक्य असते. टेन्शन फ्री लाईफसाठी व्यसनाशिवाय पर्याय नाही इत्यादी तर अशी मते कृपया आपल्याकडेच ठेवा. कारण अशा मतांवर हुज्जत घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतका व्यसनाच्या आहारी होता तुमचा मित्र पण त्याच्या आई बापांना त्याचे लग्न लावुन देताना काही चुक करतोय असे वाटले नाही. तुमच्या मित्राला पण लग्न करताना काही वाटले नाही. लग्न केले तर केले आणि वर मुल पण जन्माला घातले. ह्यात फक्त बायको आणि मुलाची सहान्भुती वाटते आहे.

व्यसनी लोकांसाठी काही कोणी करायची गरज नाही. तो त्यांचा जाणता चॉइस असतो. काही काही व्यसनी माणसांना नंतर अक्कल येते, ते व्यसनातुन बाहेर येतात. ज्यांना ही अक्कल येत नाही त्यांच्या साठी कोणी कीतीही काही केले तरी उपयोग होत नाही.

मायबोलीवर, मुक्तांगण विषयी लेख वाचलेले आठवतात, थांबा लिंक शोधतो.
टोच्या भाऊ- व्यसन हा एक आजार आहे, हे त्या आजारी माणसाला देखील कळत नसतं.! असो.
माझा एक मित्र सध्या दारुच्या व्यसनात अडकलेला आहे ह्या पायी त्याला घटस्फोट देखील घ्यावा लागला. सर्वांनी नाना प्रकार योजुन बघितले पण उपाय शुन्य. Sad

व्यसन हा चॉइस आहे.
@बंडु - तुम्हीच कबूल केले आहे की तुमच्या मित्राच्या बाबतीत तुम्ही प्रयत्न करुन काही उपयोग झाला नाही. जर तुमच्या मित्राला वाटले की व्यसन सोडावे तर तो नक्की प्रयत्न करुन सोडु शकतो. त्याला सोडायचे नाहीये.
तुमची सहानभुती सुद्धा मित्राच्या बायकोसाठी पाहीजे. आणि व्यसन असुन सुद्धा जर त्याने लग्न केले असेल तर ते पाप आहे.

समाजात नीयतीच्या मुळे , स्वताचा काही दोष नसताना अतिशय वाईट परिस्थितीत जगणारी लोक आहेत. मदत करायचीच जर असेल तर त्यांना करावी.

टोच्या भाऊ- व्यसन हा एक आजार आहे, हे त्या आजारी माणसाला देखील कळत नसतं>>>>> बलात्कार करणे हा पण मानसिक आजारच आहे, मग त्यांना पण मोकळे सोडायचे का?

व्यसनी लोकांना कुटुम्बिय आणि मित्रांना मानसिक, शाररीक आणि आर्थिक त्रास दिल्याबद्दल फौजदारी गुन्हा करुन तुरुंगात टाकावे.

टोच्या भाऊ- काय करता! हे तर मी हि जाणतो पण चांगला मित्र असला तर बोलल्या शिवाय राहवत नाही हो. Sad
"न कोई मरता है न कोई मारता है, गीता मे लिखा है"
तो सध्यातरी संपर्कातून बाद आहेच.

व्यसनी माणसाला काय मदत करायची? तो स्वतःच तर या फंदात पडलाय असे मलाही आधी वाटायचे.

पण आता लक्षात येते की माणुस एकदा व्यसनाचा गुलाम झाला की त्याचा परतीचा मार्ग बंद होतो. मग कोणी कितीही समजावले तरी एक्दा का त्याला तलफ आली की तो गेला कामातुन. त्याला यातुन बाहेर पडण्यासाठी मदत करणे हे एकदोघांचे नाही तर पुर्ण समाजाचे कर्तव्य आहे. मुक्तांगणसारख्या संस्था स्थापणारे लोक वेडे नाहीयेत.

अविनाश, तुम्ही खुप चांगला संकल्प केला आहे, तो तडिस जावो. सध्या तरी मी शुभेच्छांपलिकडे काही देऊ शकत नाही. सध्या ज्या संस्था हे काम करताहेत त्यांच्याशी संपर्क करुन तुम्ही तुमचे काम सुरू करु शकता. त्यांची नक्कीच मदत होईल.

एक्दा का त्याला तलफ आली की तो गेला कामातुन. >>>> साधनाताई - जेंव्हा तलफ नसेल तेंव्हा लग्न करु नये, मुले जन्माला घालू नये हे कळत नाही का?
सर्व व्यसनी लोक अतिशय स्वार्थी आणि आत्मकेंद्रीत असतात.
त्यांच्या आई बापाला पण कळत नाही का व्यसनी मुलाचे लग्न लावुन देउ नये हे.

व्यसनी माणसा साठी समाजानी का झळ सोसायची.
मग बलात्कारी, चोर, खूनी लोकांनी काय पाप केलय? त्यांना पण मानसिक आजारच असतो. त्यांच्यासाठी पण मुक्तांगण काढा की.

मा. टोचा भाऊसाहेब
तुम्हाला एक नम्र विनंती आहे. कृपया गैरसमज नसावा. कुणाचाही एगो दुखावण्याचा माझा माणस नाही.
कुठली व्यक्ती जन्मजात आदर्श वा वाईट म्हणून जन्माला येत नाही . तर ती या समाजातील तिच्या जडणघडणीतून तशी घडत जाते. ज्या अर्थी कुणी जन्माला येतांना व्यसनी म्हणून जन्माला येत नाही त्या अर्थी त्याला ही व्यसने याच समाजात लागतात. म्हणजे त्याच्या व्यसनी बनण्याच्या प्रक्रियेत समाज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत असतो.
अगदी त्याच पध्दतीने एखादा व्यसनी बनलेला माणूस योग्य सल्ला, योग्य उपचार आणि चांगले वातावरण याचा मेळ घालून व्यसनापासून परावृत्त केला जाऊ शकते अशी भाबडी आशा बाळगणारंपैकी मी एक आहे. म्हणून हा सगळा खटाटोप.
<<<<<<<@बंडु - तुम्हीच कबूल केले आहे की तुमच्या मित्राच्या बाबतीत तुम्ही प्रयत्न करुन काही उपयोग झाला नाही. जर तुमच्या मित्राला वाटले की व्यसन सोडावे तर तो नक्की प्रयत्न करुन सोडु शकतो>>>>>>>>>>>>>>> मान्य आहे कि आमच्या मित्राच्या बाबातीत आम्ही प्रयत्न करूनही काही फायदा झाला नाही. याचा अर्थ असा थोडाच होतो कि व्यसनी माणसाचे व्यसनच सुटू शकत नाही? तो पराभव आमचा आहे आम्ही त्यास पुरेश्या ज्ञानाअभावी योग्य प्रकारे समजावू शकलो नाही. म्हणून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्याचे व्यसन सुटू शकते हे सत्य नाकारून कसे चालेल? सृष्टीहि माणसे जन्माला घालतांना त्याचा मरणरूपी उपाय आधीच शोधते. कारण कोणतीही समस्या ही तिच्या उपयासकट निर्माण होते. फक्त आपणास तो उपाय कधी लवकर सापडतो तर कधी उशिरा, तर कधी कधी आपल्याला तो उपायच सापडत नाही. मग आपण हतबल होतो आणि या संमस्सेवर आता कसलाच उपाय नाही अशी धारणा करून घेतो. पण त्या समस्सेवर उपाय असतोच असतो हेही तितकच खर आहे.

<<<<टोच्या भाऊ- व्यसन हा एक आजार आहे, हे त्या आजारी माणसाला देखील कळत नसतं>>>>> बलात्कार करणे हा पण मानसिक आजारच आहे, मग त्यांना पण मोकळे सोडायचे का?>>>>>> आहेत ना आमली पदार्थाचे सेवन करणे, सार्वजनीक ठिकाणी दारू पिऊन गोंधल करणे याला पण कायद्यात शिक्षेच्या तरतूदि आहेत. म्हणून आपण त्याची तुलना थेट बालात्काराशी करावी? मग तर खिसेकापुंना आणि खुन्यांना एकच शिक्षा दिल्या सारके होईल.

व्यसन सोडण्यासाठी व्यसन करण्यारया व्यक्तीची ती सोडण्याची इच्छा मात्वाची असते हे मान्य! पण त्यात ही इच्छा निर्माण करण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही हे म्हणनं किती शहणपणाच ठरेल?

चूक भूल देणे घेणे …………………

मला या ठिकाणी महत्वाची माहिती हवी कृपया ती दिलीत तर आभारी आहे. फुकटची चर्चा टाळली तर विधायक कामासाठी उर्जा कामी येईल.

माहिती बद्द्ल सर्वांचे मनापासून आभार.
प्राजक्ताजी, कविताजी, आशिकाजी धन्यवाद. अजून काही माहिती असेल, अनुभव असतील तर शेअर करत चला.

ईथे आमच्या कडे पालघर या ठीकाणी एका ट्रस्टच्या हॉस्पीटल मध्ये एक उपक्रम राबवला जातो. ज्यांना दारु सोडायची आहे व ज्यांनी सोडली आहे ते दर रविवारी एकत्र येतात आणि आपापले अनुभव शेअर करतात, जसे ज्यांनी दारु सोडली आहे ते आपल्या स्वतःबद्दल माहीती देतात त्यांना व्यसन कसे लागले, त्यांनी कशा प्रकारे घरातल्या लोकांना त्रास दिला, बायकपोरांना छळले, कुटुंबाची वाताहत केली, सुरुवातीचंच वाक्य असतं "नमस्कार . मी बेवडा 'अबक' ..मग माहीती देण्यास सुरुवात होते, प्रत्येक वयोगटाची माणसे येतात. अगदी चांगल्या ठीकाणी कामावर असणारी माणसे ही येतात.

मुक्तांगण संस्थेत कार्यकर्ते हवे असतात असे वाचले होते.
एकदा व्यसनमुक्त झालेला माणूस परत परत त्याकडे वळायची शक्यता असते.. त्यामूळे त्या व्यक्तीला सतत
आधार द्यायची गरज असते.

टोचा ह्यांचे मत जरी अतिरेकी वाटले तरी सत्य आहे.

एडस झालेल्या माणसाचे लग्न लावून देणे जसे चूक आहे तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाचे, तो निर्व्यसनी होण्यापूर्वी लग्न लावून देणेही चूक आहे.

अर्थात लग्न मुलं झाल्यानंतर कोणी व्यसनाच्या आहारी जात असेल तर बिचारे कुटुंबिय.

पण असं जरी असलं तरीही जसे आजारी माणसाला ट्रीटमेंट दिली जाते तशी व्यसनी माणसांनाही देणे गरजेचे आहे.

मानसोपचार तज्ञांकडुन ट्रीटमेंट होउ शकते पण व्यसनाधीनांना त्यांच्याकडे नेणे किंवा जाण्यासाठी मनवणे खुप कठीण असते.

सर्वांचे आभार.
प्राजक्ताजींनी सुचवलेला तुषार नातू यांचा ब्लॉग वाचतोय सध्या. आणि मी हा धागा उघडल्याच सार्थक झाल्यासारख वाटतय.

बेवड्याची डायरी या टायटल खाली त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्याम्वर केलेले लेखण माझ्यासाठी खूपच उपयोगी ठरेल असे वाटतेय.

सगळ्यांच्याच माहितीच स्वागत आहे. १ महिना अभ्यास करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचा विचार आहे.

कुठली व्यक्ती जन्मजात आदर्श वा वाईट म्हणून जन्माला येत नाही . तर ती या समाजातील तिच्या जडणघडणीतून तशी घडत जाते. ज्या अर्थी कुणी जन्माला येतांना व्यसनी म्हणून जन्माला येत नाही त्या अर्थी त्याला ही व्यसने याच समाजात लागतात. म्हणजे त्याच्या व्यसनी बनण्याच्या प्रक्रियेत समाज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत असतो.>>>>>>>> असे असते तर तुमच्या व्यसनी मित्राला जर भाऊबहीण असतील तर ते का नाही व्यसनी झाले. बहुतकरुन तुम्ही पण तुमच्या मित्राच्या सारख्याच वातावरणात वाढला असाल, मग तुम्ही का नाही व्यसनी झालात?

व्यसनी माणसाचे व्यसनच सुटू शकत नाही? तो पराभव आमचा आहे आम्ही त्यास पुरेश्या ज्ञानाअभावी योग्य प्रकारे समजावू शकलो नाही.>>>>> व्यसनी माणसाने स्वता ठरवले तरच त्याचे व्यसन सुटते. कोणी मदतकरुन किंवा मानसौपचारानी सुटत नाही. जे व्यसनी स्वता व्यसनातुन बाहेर पडायचे असे ठरवतात ते AA ला जायचा प्रयत्न करतात. AA ला मारुनमुटकुन नेउन काही उपयोग होत नाही.

तुम्ही अजुन ही त्या व्यसनी मित्राने लग्न करुन एका बाई च्या आयुष्याची वाट का लावली ह्याचे उत्तर शोधत नाही. अशी एखाद्या स्त्रीच्या आयुष्याची वाट लावणे आणि बलात्कार करणे ह्यात काय फरक आहे?
तुमचा तो मित्रच होता म्हणुन तुम्हाला त्याच्या बद्दल वाईट वाटतय. पण तटस्थपणे बघा.
एकदा एखादा दुसर्‍यांचे आयुष्य उधळुन लावणार्‍या गुन्हाला मानसिक आजाराचे लेबल लावले की सारेच सोपे होते. गुन्हेगार एकदम Victim समजला जातो. पण जे खरे Victim आहेत त्यांच्या साठी काहीतरी करायची गरज आहे.

<<<तुम्ही अजुन ही त्या व्यसनी मित्राने लग्न करुन एका बाई च्या आयुष्याची वाट का लावली ह्याचे उत्तर शोधत नाही>>>

बर्‍याचदा मुलगा व्यसनी आहे हे माहीत असुनही मुलीचे आईवडील आपल्या मुलीचे लग्न लावुन देतात अशा मुलांशी याचे कारण बर्‍याचदा गरीबी असते, इथे अशी बरीच उदाहरणे आहेत, गावात जवळ जवळ अशी व्यसनाधीन माणसे बरीच असतात त्यामुळे त्यांना दारु पिणे हे वाईट आहे असे वाटतच नसते, बाकीचे माहीत नाही पण ईथे काही जमातीत लग्नात दारु ही कंपल्सरी द्यावी लागते हा प्रकार पाहीलाय मी. बाकी आपला मुलगा इतका व्यसनाच्या आहारी गेला असताना आईवडीलांनी त्याचे लग्न करुन देणे हे चुकीचे आहे असे मलाही वाटते पण कदाचित आपला मुलगा कसाही असला तरीही तो आई वडीलांना चांगलाच असतो आणि लग्न झाल्याने तो सुधारेल असा त्यांचा गैरसमज असतो.

कविता ताई - तुम्ही एकदम माफी देण्याच्या मोड मधेच आहात. आई बापांचा काय तर म्हणे गैरसमज असतो. आणि लग्न करणार्‍या मुलाला अक्कल नसते का?

तुमच्या जवळच्या मुली च्या बाबतीत अशी फसवणुक झाली तर ही जस्टीफिकेशन द्याल का?
ह्या व्यसनी लोकांना मुक्तांगण च्या ऐवजी सक्तमजुरी हाच उपाय आहे.

टोचा (तुमचे नाव आधी टोच्या होते का, किंवा टोच्या नावाचा आणिक एक आयडी आहे का इथे?)
असो,
आपण वेगळा धागा काढाल का? आपले मत काही अंशी पटतेय आणि काही अंशी न पटणारे खोडायची इच्छा आहे, परंतु इथे धागाकर्त्याला जे अपेक्षित आहे त्याचा मान ठेऊया.

अबाऊट धाग्याचा विषय मागे मी सिगारेट व्यसनावर आंतरजालावरच खूप सुरेख माहिती वाचली होती. इतकी रंजक की मलाच सिगारेटचे व्यसन आधी धरून मग ते सोडायची इच्छा झाली होती. जर सापडली तर इथे जरूर शेअर केली जाईल.

ह्या कारणासाठी माफी कुणालाच नाही ना मुलाला , मुलाच्या आईवडीलांना आणि ना मुलीच्या आईवडीलांना कारण लग्न शक्यतो नात्यातच होतात आणि मुलगा ईतका व्यसनी असेल तर सर्वांनाच त्याची माहीती असेल मग आणि लग्न जुळवताना कुणीही चौकशी करतंच आणि कुणी ना कुणी माहीती देतंच.

ईथे हे होतेच आहे हो, आणि मुली बिचार्‍या निमुटपणे लग्न करुन मोकळ्या ही होतायत. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की जितकी चुक मुलाच्या आई वडीलांची आणि मुलाची आहे त्याहुन जास्त चुक तर मुलीच्या आईवडीलांची आहे कारण मुलगा व्यसनी आहे तरीही त्यांनी आपल्या मुलीचे आयुष्य बरबाद केले. (हे मी त्या आईवडीलांबद्दल बोलत आहे ज्यांना मुलगा व्यसनाधीन आहे हे माहीत असुनसुद्धा ते आपल्या मुलीचे लग्न अशा मुलाशी लावुन देतात ; इथल्या आजुबाजुच्यागावात अशी भरपुर उदाहरणे आहेत).

टोचा भाऊ- तुमचं मत काही अंशी बरोबर आहे हो. म्हणून तर आता अश्या मित्रासोबत संपर्क नाहिये. त्याची पत्नी सधन कुटुंबातून आहे, उच्च शिक्षित आहे, शिवाय तिला ही भरपुर पॅकेज आहे. एवढच काय तर त्याच्या पत्नीने स्वतःचा फ्लॅट ही बुक केला आहे.तरी ही दोघांची झालेली ताटातूट योग्य नाही असं सारखं वाटत राहतं. माझ्या मित्राला मीच नव्हे तर आमच्या कंपू मधल्या सार्या जणांनी प्रयत्न करून बघितले तरी उपयोग शुन्य. खडसावून, प्रेमाने, येन केन प्रकारेण समजावून झालं आहे. त्याच्या आई वडिलांकडे बघुन दया येते पण काय करणार हा पठ्ठा मानेल तर ना.

मी ही अशीच उदाहरण बघितली आहे अगदी आमच्या शेजारचे काका देखिल मस्त रोज रात्री टुन्न होवून पडलेले असतात कधी रस्त्यावर तर कधी कुठे. त्यांची पोरं ही जाम कंटाळली आहेत पण काय करता?

तरीही एक सांगतो की प्रेमाचं माणूस असं भरकटतांना बघितलं कि काहितरी तुटतं मनात म्हणूनच अविनाश दादांचा लेखन प्रपंच असावा. अस दंड, शिक्षा, तुरुंग, फटके हे उपाय अगदी टोकाचे वाटतात असं माझं मत आहे. असो.

(तुमचे नाव आधी टोच्या होते का, किंवा टोच्या नावाचा आणिक एक आयडी आहे का इथे?)>>>>>

टोच्या नावाचा दुसरा आयडी आहे ( असावा )

व्यसनी माणसाचे लग्न लावण्याच्या फंदात आईबाबांनी पडू नये हे इथे मायबोलीवर लिहायला छान वाटते पण आपल्या समाजात तरुणांचे सर्व प्रकारचे प्रश्न एकदा लग्न झाले की लगेच दुस-या दिवशी धाडकन सुटतात असे मानले जाते.

लग्नासारख्या जालिम इलाजाने रोग बरा झाला नाही तर एक मुल झाल्यावर नक्कीच होणार याची तर १००% खात्री असते. तरीही झाला नाही तर दुसरे मुल.

आजवर जे बरे झाले नाहीत ते उद्या अमुकतमुक घडल्याने बरे होणार असे बहुतेकांना वाटते, हे समाजविचार बदलण्यासाठी आपण काय करु शकणार?

त्यामुळे जे व्यसनी आहेत त्यांचे व्यसन सुटेल/कमी होईल इतके पाहणे ज्यांना जमतेय त्यांनी ते करावे.

शिवाय ज्यांनी लग्नानंतर या व्यसनाला जवळ केलेय त्यांचे काय? लग्न एकदा केले की ते अनडू करणे आपल्या समाजात इतके सोपे नाहीय.

माझी नम्र मते:
=============

१. व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार.

एखाद्या पदार्थाचे अतिरिक्त सेवन किंवा एखाद्या वस्तूचा अतिरिक्त वापर! इतके अतिरिक्त की त्याशिवाय जगण्याचा प्रयत्न केला तर तीव्र अस्वस्थता जाणवते, शारीरिक क्षमता प्रभावित होतात, सामान्य जीवन जगता येत नाही, ते सेवन / वापर करून प्रकृती खालावत जाते तरीही सवय तशीच राहते, ते सेवन / वापर करण्यासाठी निमित्ते व आर्थिक सहाय्य शोधले जाते, हळूहळू ते सेवन / वापर हेच आयुष्य होऊन जाते, स्वतःकडे, कुटुंबाकडे व नोकरीकडे लक्ष देणे अशक्य होते, ह्यातील कोणतीही पातळी!

व्यसनांच्या प्रकारांमध्ये हे प्रकार प्रामुख्याने येऊ शकतात. तंबाखू चघळणे / धूम्रपान, मद्यसेवन, अंमली पदार्थ सेवन, नवीन तंत्रज्ञानातून उपलब्ध झालेल्या उपकरणांचा अतिरिक्त वापर (जसे आंतरजाल, संचारध्वनी संच व त्यावरील विविध अ‍ॅप्स), पोर्नोग्राफिक साहित्य / स्थळे ह्यांचा कामशांतीसाठी केलेला अतिरिक्त वापर, असुरक्षित शरीर संबंध येतील अश्या परिस्थितीत सातत्याने जाण्याचा अतिरेक वगैरे!

ह्याशिवाय आर्थिक दुर्बल घटकांमध्ये लहान वयान पॉलिश / रंगांचा वास घेणे, कचर्‍याचा वास घेणे, तुरुंगातील कैद्यांमध्ये पालीचे वीष सेवन करणे, अनैसर्गीक संभोग करणे वगैरे प्रकार येऊ शकतात, पण ह्यांचा समावेश लेखाच्या व्याप्तीत करून घेण्याचे विशेष कारण नाही,.

२. व्यसन कसे लागते व त्याची कारणे ( वैदकीय दृष्टीकोन )

वैद्यकीय दृष्टिकोन वैद्यच सांगू शकतील. शरीरात नेमके काय घडते ज्यामुळे माणूस तोल गेल्याप्रमाणे त्या त्या वस्तूच्या आहारी जायला तयार होतो हे कोणी डॉक्टरांनीच सांगावे. बाकी बाह्य स्वरुप इतपत मर्यादीत उत्तर द्यायचे झाल्यास व्यसन हे बरेचदा 'करून पाहू / आवडले / ऑकेजनली हरकत नाही / विशिष्ट ग्रूपबरोबर हरकत नाही / ठरावित वारंवारतेने हरकत नाही / नियमीतपणे केले तरी चालेल पण मर्यादेत असावे / नियमीतपणे व सोसेल तितके करूनही बाकी सर्व नीट करता येत आहे तर का करू नये / माझा आनंद फक्त ह्यातच आहे तर तो लोक मला का मिळू देत नाहीत, मी कुठे कोणावर काही मर्यादा घालतोय / मला व्यसनी म्हणणारे गेले उडत, मला माहीत आहे वेळ पडली तर मी सगळे सोडू शकतो / का सोडू / पैसे कमी पडत असले तर काहीतरी विकून टाकू आणि त्या पैश्यांतून व्यसन करू / कर्ज काढू किंवा उधारी घेऊ / जग गेले खड्ड्यात, मला आत्ता हे करायचे आहे म्हंटल्यावर मी काहीही करून हे करणारच / मला कोणीही कधीच समजून घेतले नाही त्यामुळे मी असा झालो / मला आता कोणीही आणि काहीही नको आहे, फक्त व्यसन करायचे आहे, अश्या पातळ्या सहसा येतात.

३. एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला आहे ते कसे ओळखावे ? त्याची लक्षणे.

पुन्हा वैद्यकीय लक्षणे वैद्यच सांगू शकतील. बाह्य लक्षणे म्हणायची तर त्या व्यसनासाठी खास वेळ काढणे, खास कारणे काढणे, त्या व्यसनाच्या आठवणीतच इतर गोष्टी करणे, ते व्यसन करायचे आहे ह्याला प्राधान्य देऊन बाकीच्या गोष्टी ठरल्या जाणे, हटवादीपणा, न मिळाल्यास भांडणे, खोटे बोलणे, वरवर फार महत्वाची असतील अशी पण प्रत्यक्षात बिनबुडाची कारणे सांगून व्यसन करायला जाणे, बजेटचा एक बर्‍यापैकी मोठा भाग व्यसनांनी व्यापला जाणे, एखाद्या प्रसंगात / समारंभातही प्रमुख विधीपेक्षा व्यसनाला अधिक महत्व देणे, व्यसन करण्यापूर्वीच्या व केल्यानंतरच्या मनस्थितीत प्रचंड फरक जाणवणे, चोर्‍या करणे, उधार्‍या करणे, वस्तू विकणे, प्रकृती खालावणे, चेहरा / त्वचा / डोळे / आवाज / हालचाली / उत्साह / निद्रा / आहार ह्यात सामान्यत्व न राहणे अशी काही लक्षणे किंवा व्यसनाच्या आहारी गेल्याच्या खुणा म्हणता येतील.

४. व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व बोध्दिक दुष्परीणाम .

आर्थिक परिणाम वरील एक दोन उत्तरांमध्ये आलेलेच आहेत. सामाजिक परिणाम तेव्हाच जाणवतात जेव्हा समाजातील एक मोठा वर्ग व्यसनाधीन होतो. एक व्यक्ती व्यसनी झाल्यामुळे ती समाजावर खूप काही वाईट प्रभाव पाडू शकत नाही. (बहुधा सामाजिक ऐवजी कौटुंबिक असे असायला हवे होते). बौद्धिक दुष्परिणामांमध्येही वैद्यच योग्य ते सांगू शकतील. बाह्य स्वरूपाबाबत सांगायचे तर स्मरणशक्तीचा र्‍हास, एकाग्रतेचा र्‍हास, इतरांपेक्षा आपण वेगळे व कमी आहोत असा गंड निर्माण होणे, आत्मविश्वासाचा र्‍हास वगैरे म्हणता येईल. (पुन्हा, मला वाटते की बौद्धिक ऐवजी शारीरिक असायला हवे होते).

५. व्यसनापासून परावृत्त कसे व्हावे वा करावे.

यशासारखे यश नाही. व्यसनापासून लांब राहण्याचा गंभीर प्रयत्न करणार्‍याला स्तुतीची, प्रशंसेची प्रचंड आवश्यकता असते व हे कित्येकदा त्याला स्वतःलाही सांगता येत नाही. त्याचा अंतर्गत (अंतर्मनाच्या पातळीवरील) लढा किती तीव्र आहे ह्याची इतर सामान्यांना कल्पनाच नसल्याने ते त्याच्या त्या प्रयत्नांच्या बाबतीत विशेष लक्षपूर्वक वागत नाहीत. खरे तर अश्या वेळी त्याला प्रचंड काँप्लिमेंट्स द्यायला हव्यात. त्याच्याशी कधी नव्हे इतक्या आपुलकीने वागायला हवे. त्याला म्हणायला हवे की एकदम सगळे बंद करू नकोस, हळूहळू बंद कर. त्याचा आपल्या हेतूवर विश्वास बसायला हवा. त्याला इतरांनी सामावून घ्यायला हवे. हे यश त्याला खूप सुखावेल. आपण आपल्या सवयीत केलेल्या सूक्ष्म बदलालाही जगाने केवढा रिस्पेक्ट दिला असे त्याला वाटू लागेल. मी काय हवे ते करू शकतो व ते करून दाखवेनच असा त्याचा स्वतःचाच हेतू त्यामुळे बनेल.

बाकी स्वतःच व्यसनापासून दूर जायचे असेल तर व्यसनाची आठवणही राहणार नाही इतके दुसर्‍या कोणत्यातरी आवडीच्या (व आरोग्ययुक्त) बाबतीत स्वत:ला गुंतवायला हवे.

'मी व्यसन सोडले तरी कोणाला त्याचे काय पडले आहे, अजून मला सगळे व्यसनीच तर समजतात' ही भावना अत्यंत घातक आहे.

६. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या शेवाभावी संस्था व शासकीय उपक्रम

आंतरजालावर यादी उपलब्ध असणारच!

७. व्यसनापासून परावृत्त झालेली काही प्रेरणादायी उदाहरणे.

हीसुद्धा आंतरजालावर मिळतील, पण अशी प्रेरणादायक उदाहरणे देऊन व्यसनी माणसांना परावृत्त करणे हे फक्त एक स्वप्न आहे.

८. व्यसनमुक्ती संदर्भातील मान्यवरांचे लेख, रेकोर्डिंग इत्यादी.

त्या त्या संस्थांमध्ये व आंतरजालावर उपलब्ध असणारच.

चु भु द्या घ्या

त्याची पत्नी सधन कुटुंबातून आहे, उच्च शिक्षित आहे, शिवाय तिला ही भरपुर पॅकेज आहे. एवढच काय तर त्याच्या पत्नीने स्वतःचा फ्लॅट ही बुक केला आहे.तरी ही दोघांची झालेली ताटातूट योग्य नाही >>>>>> @ बंडु - मला शॉक बसतो आहे ह्या धाग्यावरची एक एक मते ऐकुन. व्यसनी माणसाच्या पत्नीला पॅकेज चांगले आहे, तिने फ्लॅट बुक केला आहे, म्हणजे तिच्या आयुष्याची वाट त्या व्यसनी माणसामुळे लागली नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्या दोघांची ताटातुट झाली हे योग्य नाही मग काय त्या बाईने व्यसनी माणसाबरोबर आयुष्य काढायला पाहीजे होते का? तुम्ही तिच्या खंबीरपणाचे खरे तर कौतुक केले पाहीजे. तुमची जवळची मुलगी अशा स्थितीत सापडली असती तर तुम्ही काय सल्ला दिला असता.

मीच चुक असावा असे दिसतय. एका व्यक्ती च्या स्वताच्या चॉइस मुळे दुसर्‍या अनेक आयुष्यांची माती होते आहे. पण माबो वर त्या पीडित लोकांच्या बद्दल कणव दाखवण्यापेक्षा, त्या व्यसनी माणसाला "आजारी" म्हणले जातय, नाहीतर मग समाजच दोषी आहे हे सांगीतले जातय.

Pages