व्यसन नावाचा राक्षस!

Submitted by अविनाश खेडकर on 8 August, 2014 - 02:23

आज एका मित्राच्या अंतयात्रेस गेलो होतो. आमचा १० वर्षाचा सहवास कायमचाच संपला होता. त्याचे कुटूंबीय आक्रोश करत होते. त्याच्या ऐन तीशीत या जगाचा नोरोप घेण्याने सगळ्यांनाच हळहळ वाटत होती. पण माझ मन त्याचा मृत्यू मान्य करायला तयार होत नाही. कधी काळी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा तरूण दारूच्या नादाला कधी लागला ते आम्हालाही कळल नाही. पुढे त्याचे हे व्यसन एव्हढे वाढले कि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
त्याची उर बडवून रडनारी आई, हतबल बाप, शुध्द हरपलेली बायको आणि ३ वर्षाचं एक केविलवाण पोर पाहून काळीज पार हेलावून गेल. अशी वेळ देवाने शत्रुवर देखील आनू नये अस क्षणभर वाटल. पण देव कुठे आणतो असली वेळ माणसावर? ती तर मानूस स्वता:च ओढून घेतो आणि स्वता:चा नाश करून घेतो.

मनात एक हळहळ सतत राहील की मी माझ्या मित्रासाठी काहीच करू शकलो नाही. मी बर्‍याच वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला समजावण्याइतपत माझी क्षमता नव्ह्ती कदाचित. पण कुणी त्याला
वेळीच व्यसनापासून परावत्त केल असत तर आज तो आमच्यात असता, हेही तितकच खर. माझ्या मित्रासारखे व्यसनाच्या आहारी जावून कित्येकजन स्वता:च्या व त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनाची राखरांगोळी करतात त्याची काही गिनती आहे का? म्हनून मी ठरवलय की मला जस शक्य होईल तस मी लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करील. त्यासाठी शाळा कॉलेजेस व प्रसंगी खेडोपाडी जावून लो़कांशी चर्चा करील.

पण मित्रांनो यासाठी मला आपली बहूमोल मदत हवी आहे. कारण व्यसन मुक्ती या विषयावरील माझ ज्ञान अगदी तोकडं आहे व अनुभव शून्य. पण माझा हेतू प्रामाणिक आहे व संकल्प तडीस नेण्याची जिद्दही अफाट आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी मला या कामी मदत करावी. आपण आपणास या विषया संबंधीत कुठलीही माहीती या ठिकाणी देऊ शकता. आपणास माहिती पुरवणे सोपे जावे म्हणून मुद्दे देत आहे .

१. व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार.

२. व्यसन कसे लागते व त्याची कारणे ( वैदकीय दृष्टीकोन )

३. एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला आहे ते कसे ओळखावे ? त्याची लक्षणे.

४. व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व बोध्दिक दुष्परीणाम .

५. व्यसनापासून परावृत्त कसे व्हावे वा करावे.

६. व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या शेवाभावी संस्था व शासकीय उपक्रम

७. व्यसनापासून परावृत्त झालेली काही प्रेरणादायी उदाहरणे.

८. व्यसनमुक्ती संदर्भातील मान्यवरांचे लेख, रेकोर्डिंग इत्यादी.

आणि या व्यतिरिक्त कोणतीही माहिती समर्पक उदाहरणे, शेर, कविता विनोद जे कि व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी उपयुक्त ठरतील. अशी माहिती तुम्ही पाठवू शकता वा लिंक देवू शकता.

तुम्ही ही माहिती माझ्या इ मेलवरही पाठवू शकता. वा फोन करून काही सुचना करू शकता. माझा आय डी खाली देत आहे.

avinash007.khedkar@gmail.com

mobile: 08888325748

मी हा धागा खूप सकारात्मक हेतूने उघडला आहे. व्यसनमुक्ती विषयी आपले काही नकारात्म मते असतील. उदा. व्यसनमुक्ती अशक्य असते. टेन्शन फ्री लाईफसाठी व्यसनाशिवाय पर्याय नाही इत्यादी तर अशी मते कृपया आपल्याकडेच ठेवा. कारण अशा मतांवर हुज्जत घालण्याची माझी बिलकुल इच्छा नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर खरे तुमच्या पोस्ट च्या निमित्ताने या आजारासंबंधी जास्तीची माहिती देत आहे
सगळ्यात पहिल्यांदी
१) व्यसन ( मी दारू या व्यसना विषयी बोलत आहे )हा मूलतः मानसिक आजार आहे हे जाणून घ्यावे त्याचे शारीरिक दुष्परिणाम मात्र नंतर जाणवतात तर डायबेटीस आणि क्यान्सर हे प्रामुख्याने शारीरिक आजार आहेत.

२) दुष्परिणामांची माहिती असतानाही तुम्ही म्हणताय हा स्वताहून ओढवून घेतलेला आजार आहे .माझ्या मते हे चुकीचे विधान आहे . कोणीही "चला आता आपण "व्यसन" या आजाराचे रोगी बनूया " असा विचार करून अतिरिक्त सेवनाला सुरवात करत नाहीत.

मी आधीच्या प्रतिसादात म्हटले आहे त्याप्रमाणे आनंदाच्या प्रसंगी घरी / ऑफिस मध्ये /काही काही जणांच्या घरी नियमित बिझनेस च्या निमित्ताने पार्ट्या होत असतात या निमित्ताने खरी तर प्यायला सुरवात होते ( मी फक्त दारू विषयी लिहित आहे ) आणि मग पुढे नैराश्या पोटी/मला माझ्या शिक्षणानुसार नोकरी मिळत नाही म्हणून/ मला नोकरीमध्ये डावलल जातंय म्हणून /माझ्या कामाकडे दुर्लक्ष होतंय ह्या भावनेपोटी/ माझी कोणाला किमतच नाही/माझी कोणी कदरच करत नाही या भावनेनी ( तसेच बर्याच कारणांनी ) आणि मोठ्या वयात रिटायर मेंट नंतर बराच पैसा हाताशी आला.रिकामा वेळ पण मिळाला मग आत्ता या रिकाम्या वेळेच करायचं काय या आणि अशा अनेक मानसिक कारणामुळे "अतिरिक्त सेवनाला" सुरवात होते. ( धीम्या गतीने) आणि आधी कंट्रोल मध्ये पिणारा मनुष्य या आणि अशा मानसिक कारणामुळे/नैराश्यापोटी कधी कंट्रोल च्या बाहेर जाऊन प्यायला लागतो ते त्याच त्यालाच समजत नाही आणि मगच तो त्या आजारच रोगी बनला आहे असे आपण म्हणू शकतो
जनरली मानसिक रित्या कमकुवत असलेल्या लोकांमध्ये तसेच मी आधीच्या पोस्ट मध्ये म्हटले तसे कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करणाऱ्या स्वभावाच्या व्यक्तींना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.

सगळ्यात मोठ्ठा मुद्दा म्हणजे हा आजार किव्वा रोग आहे हेच लोकांना माहित नसते

३) पूर्वी जस कि लैंगिक शिक्षणाबद्दल मुलांमध्ये प्रबोधन होत नसे तस आणि तसच या आजाराबद्दल सुद्धा लोकांमध्ये प्रबोधन होत नाही जे आवश्यक आहे ..लैंगिक शिक्षणाविषयी मुलांना वेळीच समजावून सांगितलं पाहिजे अस आपण म्हणतो तद्वत १५/१६ वर्षांच्या मुलांमध्ये " व्यसन " या आजाराबद्दल पण माहिती दिली गेली पाहिजे.

४) लैंगिक शिक्षणाची माहिती मिळूनही मुल एड्स आणि इतर ( कुठले ते मला माहित नाही ) लैगिक रोगांची शिकार होऊ शकतात तसेच या रोगाची व्यवस्थित माहिती देऊनही लोक या रोगाचे शिकार बनतील हे माहित आहे पण निदान त्याच प्रमाण तरी कमी होईल

५) या आजाराबद्दल जास्त बोलल जात नाही किव्वा लोक बोलण टाळतात

६) डायबेटीस झाल्यावर जसे पथ्य - पाणी सांभाळावे लागते तसे मूलतः हा मानसिक आजार असल्याने मनावर कंट्रोल ठेवणे /त्याकरता योगाची मदत घेणे/ जरूर पडल्यास मानसोपचार तज्ञाला भेट देणे /अल्कोहोलिक अन्यानिमास च्या मिटिंग नियमित रित्या अटेंड करणे हे पथ्य -पाणी प्रामुख्याने या आजारामध्ये सांभाळावे लागते.

७) डायबेटीस हा आजार पथ्य -पाणी आणि औषध उपचारांनी कंट्रोल मध्ये ठेवता येतो तसच हा आजार वरील उपचारांनी कंट्रोल मध्ये ठेवता येतो .

८) क्यान्सर मध्ये आणि या आजारात एक साम्य आहे क्यान्सर मध्ये "केमो" केली आणि औषधोपचार केले तरी तो आजार उलटण्याची शक्यता असते.तसेच हा रोग पण उलटण्याची शक्यता असते. अशा वेळी घरच्या कुटुंबीयांनी त्या रोग्याला खंबीर पणे साथ देण्याची आवश्यकता असते
९) मधुमेय आणि क्यान्सर या रोगान्कारता रोग्याच्या नातलगांचा खंबीर सहभाग अपेक्षित असतो तसच या आजार संबंधी पण रोग्याच्या नातलगांचा खंबीर सहभाग ( रोग कंट्रोल मध्ये ठेवण्याकरता ) अपेक्षित आहे

<<आज हीच वस्तुस्थिती दारू बददल आहे. आपण वाईन किंवा बियरला प्रोत्साहन देत आहोत. जाहिराती मध्ये पैसे मिळतात हा "उद्योग" कराच्या रूपाने पैसा देतो आहे म्हणून पण हाच भस्मासुर उद्या आपल्या पुढच्या पिढीवर उलटलेला पाहताना डोळे पांढरे होताना दिसतील.>>> +११११११११
म्हणूनच सरकार प्रबोधनात्मक जाहिराती बनवताना दिसत नाही

( वरील सगळी माहिती माझ्या एका जवळच्या ओळखीत एक गृहस्थ त्यांच्या रिटायर मेंट नंतर या रोगाचे /आजाराचे बळी पडल्यामुळे त्यांच्या पत्नी कडून मिळाली आहे जी मी मायबोलीच्या वाचकांना देत आहे. हा रोग कुठल्याही वयात लागू शकतो हे त्यांच्या मुळेच मला समजले )

म्हणतो तद्वत १५/१६ वर्षांच्या मुलांमध्ये " व्यसन " या आजाराबद्दल पण माहिती दिली गेली पाहिजे.<<< मला आठवतंय, अकरावी बारावीला सबस्टन्स अ‍ॅब्युजवर आम्हाला धडे होते, अजूनही आहेत का माहित नाही.

व्यसन हा स्वतःहून ओढवून घेतलेला आजार आहे, हे पूर्णपणे मान्य, पण ज्या स्टेजला "नशा करणे" आणि व्यसनी होणे यामधला फरक संपतो, तिथं ती व्यक्ती स्वतःहून आयुष्य कंट्रोल करू शकत नाही, या स्टेजवरून परत फिरून नॉर्मल आयुष्य जगल्याची अशी उदाहरणे फार कमी आहेत. मी पाहिलेल्यांपैकी तर जवळजवळ नाहीतच.

सुजा.. पोस्ट पटली.

लोकांचा राग, या वस्तूंच्या उत्पादकांवर, त्यांना नको तितके ग्लोरीफाय करणार्‍यांवर असावा. त्याचा आजार जडलेल्यांवर नसावा.
ज्या गावात दारुबंदीची चळवळ होते त्या गावात स्त्रिया ( हो त्याच, कारण जास्त त्रास त्यांनाच होतो) आधी
दारुची दुकाने बंद पाडतात.

आम्हाला " एकच प्याला " नाटकातला उतारा अभ्यासाला होता.. पण तो व्यसनांचे दुष्परीणाम या दृष्टीकोनातून न शिकवता गडकर्‍यांची अलंकारीक भाषा.. या दृष्टीकोनातून शिकवला गेला होता.

<<या स्टेजवरून परत फिरून नॉर्मल आयुष्य जगल्याची अशी उदाहरणे फार कमी आहेत. >> नाही अशी बरीच उदाहरण आहेत . व्यसन या आजाराला बळी पडलेल्या लोकांकरता " एकच प्याला" हा विषासमान असतो हे जर त्या रोग्याला समजल आणि ही गोष्ट आपल्याकरता नाही कारण आपल्यालाच हा आजार जडला आहे ( इतरांना नाही ) हे जर त्याने मान्य केल आणि जर त्याने निष्ठेने पाळल ( मानसिक रित्या खंबीर राहून दारूच्या थेबालाही स्पर्श केला नाही ) तर तो रोगी अतिशय नॉर्मल आयुष्य जगू शकतो आणि अशी बरीच उदाहरण आहेत ( हे पण मला त्यांच्या कडूनच समजल )

<<लोकांचा राग, या वस्तूंच्या उत्पादकांवर, त्यांना नको तितके ग्लोरीफाय करणार्‍यांवर असावा. त्याचा आजार जडलेल्यांवर नसावा. >> नसेलही दिनेश . पण लोकांना जर समजल कि हा मनुष्य या आजाराचा रोगी आहे तर लोक त्याच्या कडे वेगळ्या दृष्टीने बघतात . शक्यतो त्याच्याशी बोलण टाळण्याचा कल असतो. म्हणूनच हा रोग त्या रोग्याच्या कुटुंबियांकडून लपवला जातो Happy
आणि म्हणूनच मी आधीच्या पोस्ट मध्ये म्हटलंच आहे "दारू पिण्याबद्दल लोकांच आक्षेप नसतो पण या रोगाबद्दल मात्र बोलणही लोक टाळतात" आणि रोग्याशी बोलण सुद्धा Happy

सुजा... खुपदा दारू प्यायलेल्या माणसाची बडबड दुसर्‍या माणसासाठी अत्यंत कंटाळवाणी / त्रासदायक असते.
आणि त्या अवस्थेत तो कुणाचेही ऐकण्याच्या मनोवस्थेत नसतोच.. म्हणून असेल हे. कुटुंबाबाहेरचा माणूस टाळू शकतो. घरचे काय करणार ?

दिलीपकुमार, निम्मी, उषा किरण, ललिता पवार यांचा "दाग" नावाचा पण छान चित्रपट होता. त्यात एक प्रसंग आहे. आपण दारू प्यायल्यावर कसे वागतो हे त्याला कळावे म्हणून तो शुद्धीवर असताना. निम्मी त्याच्यासमोर
नशेत असल्याचे नाटक करते. तो खुप संतापतो आणि तिला बेदम मारहाण करतो. निम्मीला याचा खुप आनंद होतो. अभिनयासाठी हा चित्रपट अवश्य बघावा... पण अश्या चित्रपटांचा आणि नाटकांचा व्यसनी माणसांवर अजिबात परिणाम होत नाही, हेच खरे.

सुजा, पोस्ट आवडली.
दारुच्या व्यसनाबाबतही बरेच स्टिरीयोटाइप्स आहेत. दारुडा म्हणजे बेताल बडबड, मारहाण वगैरे काहीसे चित्र मनात असते. पण बरेच लोकं क्लोजेट अल्कोहोलिक असतात. त्यामुळे व्यसन बराच काळ लक्षातही येत नाही. हे लोकं रोजचे आयुष्य अतिशय व्यवस्थित जगत असतात. आपले व्यसन लपवण्याची काळजी हे लोकं घेत असल्याने घरच्या लोकांचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते.

सुजा ताई,
आपणहून ओढवून घेतलेला आजार आहे याचे कारण साधे आहे आपण जर दारू प्यायलाच नाहीत तर आपल्याला व्यसन जडणारच नाही. आपण आपले वजन वाढले आहे असे माहित असूनही खाण्यावर ताबा ठेवला नाही आणि आपले गुढघे खराब झाले आणि त्याची शस्त्रक्रिया करावी लागली तर त्याला काय म्हणाल या अर्थाने ते आहे.
राहिली गोष्ट व्यसनाबाबत बहुसंख्य लोक आपण स्मार्ट किंवा कूल दिसण्यासाठी अथवा आपण बावळट मागासलेले दिसू नये म्हणून पहिली सिगारेट किंवा प्याला तोंडाला लावतात. आणि एकदा त्याची चटक लागली कि पार्टीत प्यावी लागते. उच्चभ्रू लोकात राहण्यासाठी प्यावी लागते अशी कारणे देतात. किंवा सिगारेत्ने रुबाबदार दिसतो अशी फुसकी करणे देतात.
असो.

<<आपण जर दारू प्यायलाच नाहीत तर आपल्याला व्यसन जडणारच नाही>> पण अस घडत नाही ना डॉक्टर नव्हे ते अशक्यच आहे. आता दारू पिण्याला जनमान्यता मिळाल्याने ती उघड उघड कॉलेज मधल्या मुलांकडून/तसच मुलींकडून ही प्यायली जातेय. आत्ता ती पूर्वीसारखी लपून छपुन पिण्याची जरुरी राहिलेली नाही आणि त्यामुळेच या रोगाचं/आजाराच प्रमाण भयावह वाढतय.

आजकाल ३१ डिसेंबर जवळ यायला लागला कि कॉलेज कुमारांच्या आणि कुमारिकांच्या पण पालकांमध्ये अस्वस्थता येते कारण बियर चा पहिला पेग याच दिवशी घेतला जातो.( किव्वा तो घेण्याची शक्यता दाट असते ) . नवीन वर्षाच स्वागत करायला जर तुम्ही ( तरुण मुलांसंबधी बोलतेय मी) मित्र/ मैत्रिणींच्या पार्टीत दारू ( एखादा तरी बियरचा पेग/ अगदी एखादाच कारण बियरला दारू समजतच नाहीत ना लोक. छे बियर म्हणजे दारू आहे का ? अस विचारतात ) प्यायलाच नाहीत तर तुम्हाला मागासलेले/बुरसटलेल्या विचारांचे समजल जात/ कुठल्या जगात वावरताय अस विचारलं जात/ त्याची टर उडवली जाते/अरे एखादा पेग तरी घेऊन बघ रे काही होत नाहीये अशी गळ घातली जाते /इतका कसा रे साधा -भोळा/संस्कारी तू? अशा पद्धतीच्या कोमेंट्स केल्या जातात आणि तुम्ही म्हणताय दारू प्यायलीच नाहीत तर व्यसन जडणार नाही. अशक्य गोष्ट बोलताय तुम्ही .

मी आधीच्या प्रतिक्रियेमध्ये लिहिल्या प्रमाणे हा रोग/आजार सरसकट सगळ्या दारू पिणार्यांना होत नाही. हा रोग दारू पिणार्यातल्या सिलेक्टेड लोकांना जडतो. आत्ता मधुमेह आणि कर्करोग जसा सिलेक्टेड लोकांना होतो. तो सगळ्या लोकांना का होत नाही .फक्त ठराविक लोकांनाच का ? याच जस उत्तर नसत त्याच प्रमाणे हा रोग पण फक्त ठराविक लोकांनाच का सगळ्या दारू पिणार्यांना का नाही ? याचंही उत्तर नसत Happy

@ सुजा - <<अशक्य गोष्ट बोलताय तुम्ही >> नाही म्हणणे शक्य आहे.

<<हा रोग दारू पिणार्यातल्या सिलेक्टेड लोकांना जडतो>>
१) धूम्रपानाचा त्रास सगळ्यानाच होतो.
२) इतर खूप मादक द्रव्ये सगळ्यानाच घातक ठरतात व व्यसनी बनवतात.

उद्या जर कर्करोग "वडापाव" खावून फक्त काही १०% लोकानाच होतो पण कुणाला होइल ते सांगता येत नाही असे सिद्ध झाले तर तुम्ही वडापाव खाणे चालु ठेवणे हे योग्य समजाल कि अयोग्य?

खुप मह्त्वाचा विषय आणि अतिशय चांगली माहीती.फार मोलाचं काम करताय तुम्ही .

दारु ,सिगरेट,तंबाखु या पासुन लांब राहणे हे सुरुवातीपासुनच चांगले.पण जर कुणी हे करायला सुरुवात केली असेल तर त्या व्यक्तीच्या घरच्यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावेत पुढे शरीराची आरोग्याची हानी टळते. दारुमुळे हार्ट अटॅक ची शक्यता बरयाच % वाढते.हार्ट अटॅक ,दारुमुळे वयाच्या ३०,३५ ,४० मृत्यू येणे त्या व्यक्तीच्या घरच्यांना व नातेवाईकांसाठी किती दुखद असते हे अनुभवलेय (अतिशय जवळचे नातेवाइक गमावलेत).सगळ्यांनी उपाय सुचवलेत ते चांगले आहेतच पण खरी जबाबदारी घरचे व नातेवाइकांची ,आपले प्रेम, काळजी त्या व्यक्तीला दारुपारुपासुन नक्कीच मुक्त करु शकते .हे एकप्रकारे कौन्सिलींग बरोबर प्रभावी ठरते.औषधे ,कौन्सिलींग आणि घरच्यांची साथ याने व्यसन नक्की सुटते.पण दारु सुटल्यावर चुकुनही त्या व्यक्तीला दारु व्यसनाबाबद हीणवु नका .

शेवटी यंगस्टर्सना एक सल्ला -या बाबतीत अभिनेता सिद्धार्थ जाधव ला आयडॉल माना.तो पुर्ण निर्व्यसनी आहे मागे एका मुलखतीत त्याने याबद्दल फार सुंन्दर बोलला होता.
आपल्या वडिलधारया व पुढ्च्या पिढीला अभिमानाने सांगु शकता.आनंदी राहुन जीवनातले इतर आनंद लुटा.

५. व्यसनापासून परावृत्त कसे व्हावे वा करावे.

अनेक मित्रांना अनेकदा "सिगरेट सोड" असे सांगणे होते आणि जर एखाद्याला खरंच सिगरेट सोडायची इच्छा असेल तर "मला सोडायची आहे पण जमत नाही" असे उत्तर मिळते. या वेळी हळूच व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव डोक्यात सोडून द्यायचा.

मला पुण्यातले मुक्तांगण हे एकच व्यसनमुक्तीकेंद्र माहिती आहे.

व्यसनमुक्ती केंद्र ऐकल्याबरोब्बर नकारात्मक प्रतिक्रिया येतात. "अरे मी इतकापण व्यसनाच्या आहारी गेलो नाहीये!" "मी माझी मी सिगरेट सोडतो पण तिकडे नाही जाणार" "बघू.." अशी उत्तरे मिळतात. मात्र अशावेळी आपणच चिकाटीने मुक्तांगणमध्ये जाण्याचा आग्रह धरावा.

व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाणे म्हणजे "तेथे अ‍ॅडमीट होणे" असा एक समज असतो. मात्र ओपीडी द्वारेही उपचार होतात. आठवड्यातले ठरावीक दिवस ओपीडी सुरू असते. अधिक माहिती मुक्तांगणच्या वेबसाईटवर मिळेल.

मी शक्यतो प्रत्येक व्हिजीटला मित्रासोबत थांबायचा प्रयत्न करतो.(शनिवारी सकाळी १० ते १ च्या दरम्यानची वेळ मला सोयीची असते!)

प्रत्येक व्हिजीटला पुढीलप्रकारे मानसिक व शारिरीक तपासणी होते,

१) जनरल कौन्सीलींग
२) मेडीकल कौन्सीलींग
३) हेल्थ चेकप व त्यानुसार औषधे

जनरल कौन्सीलींगमध्ये व्यसनामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणार्‍या वाईट गोष्टी व त्याचे दुष्परिणाम सांगून व्यसनाचे नक्की कारण काय असावे हे पाहिले जाते व आणखी माहिती उदा. सिगरेट ओढण्याच्या नक्की वेळा, किती सिगरेट्स वगैरेही केसपेपरवर नोंदले जाते.

मेडीकल कौन्सीलींगमध्ये सिगरेटमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यामुळे होणारे दैनंदिन त्रास (पित्त, बीपी, अपचन वगैरे) हे ही सांगीतले जातात.

हेल्थ चेकपमध्ये वजन, बीपी वगैरे तपासले जाते व त्यानुसार औषधे, टॉनीक्स आणि त्यांचे प्रमाण ठरवले जाते. (औषधांमध्ये निकोगम नावाचे एक निकोटीयुक्त च्युईंगम दिले जाते - गरज असल्यास)

औषधांद्वारे प्रामुख्याने पुढील गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

१) भरपूर आहार, पुरेशी झोप व शरीराचे योग्य वेळापत्रक
२) निकोटीन सेवन हा शरीराचा एक भाग झाल्याने ठरावीक वेळानंतर शरिराकडून निकोटीनची मागणी होते. या गरजेसाठी निकोगम दिले जाते. अनेकदा हेही टाळा असा सल्ला मिळतो.
३) व्यसन थांबवल्यानंतर / कमी केल्यानंतर शरीराची निकोटीनची मागणी व पुरवठा अचानक गडबडल्याने शारिरीक त्रास होतात. टॉनीक्स व औषधांद्वारे यावर उपचार केले जातात.
४) हळू हळू संपूर्णपणे व्यसन सोडण्यावर भर दिला जातो.

प्लीज नोट - वरील माहिती संपूर्णपणे निरीक्षणातून, डॉक्टर व कौन्सलर्सना 'सहज' विचारलेल्या माहितीतून मिळाली आहे.
या संपूर्ण उपचारपद्धतीमध्ये स्वत: व्यसन सोडण्याची इच्छाशक्ती अत्यंत महत्वाची आहे - जर एखाद्याला व्यसन सोडायचेच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही.
मुक्तांगणची एका व्हिजीटची फी ५० रू आहे.

***********************************************

मुक्तांगणद्वारे ५ मित्रांचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला.

दोन मित्र संपूर्णपणे व्यसनमुक्त झाले (एक जण खैनी व एक जण सिगरेट् + दारू)
एक मित्र सात आठ महिने व्यसनमुक्त राहून ऑफीस व कौटुंबीक कारणाने पुन्हा सिगरेट ओढू लागला.
एक जण पुन्हा आहे त्याच प्रमाणात सिगरेट ओढत आहे.
एका मित्रासोबत मागच्या वर्षी पहिली व्हिजीट झाली - त्याने सिगरेटचे प्रमाण दिवसा १० / १२ वरून २ / ३ पर्यंत कमी केले - नंतर माझा संपर्क राहिला नाही.

***********************************************

Pages