पैल तो गे काऊ कोकताहे ।

Submitted by पुरंदरे शशांक on 27 July, 2014 - 23:15

पैल तो गे काऊ कोकताहे ।

लहानपणची गोष्ट. दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोरजोरात ओरडू लागला की आई / आजी म्हणायची - आज कोणीतरी पाहुणा येणार रे ... मी विचारायचो - तुला काय माहित ? त्यावर उत्तर यायचे - हा काय कावळा ओरडतोय ना !! त्याला बरोबर ठाऊक असते कुठल्या घरी पाहुणा येणार ते.. तो बरोब्बर त्या घरापाशीच जाऊन ओरडणार मग ...
माझं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा ?? या विचारात छान मजेत जायचा ...

पुढे मोठेपणी जेव्हा माऊलींची ही रचना वाचण्यात आली तेव्हा या कल्पनेचा वापर (कावळा ओरडतोय म्हणजे कोणी तरी पाहुणे येणार) माउलींनी किती सुंदररित्या केलाय हे वाचून स्तिमित तर झालोच पण माऊलींची शब्दकळा इथे कशी वेगळेपणाने अवतरली आहे याचेही विशेष वाटू लागले..

पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥

कावळा हा शब्द उच्चारायला जरा कठीण/ जड वाटतो की काय म्हणून "काऊ" हा शब्द माऊलींनी असा काही वापरलाय की तिथेच आपल्या मनात एक दाद दिली जाते - की कसा मऊसूत शब्द आहे हा.. - काऊ - विशेषतः अगदी लहान मुलांना कावळा दाखवताना "काऊ" हाच शब्द घरोघरी वापरला जातो तोच माऊलींनी नेमका उचललाय - कारण त्या शब्दामागे एक जिव्हाळा आहे - एक आपुलकी आहे - मनात एक सहज उमटणारे नाते आहे - हा कावळा आता एक साधा पक्षी राहिलेला नसून एक निरोप्या, एक सहचर झालाय - काऊ या शब्दाने तो नेमका प्रगट होतोय. आणखी एक म्हणजे - कावळा हा तसा कर्कश्श ओरडणारा म्हणून प्रसिद्ध -त्याची काव, काव बर्‍याच वेळेला नकोशी होते पण इथे ती काव, काव कर्कश नसून हवीहवीशी झालीये म्हणून त्या ओरडण्यालाही कोकताहे असा मवाळ शब्द माऊलींनी योजलाय..
एवढे या काऊविषयी माऊली आज जिव्हाळा का दाखवतात बरे ?? तर कारण सहाजिकच तेवढे मोलाचे आहे इथे - हे पाहुणे साधे-सुधे नसून प्रत्यक्ष पंढरीराय आहेत काय म्हणून माऊलींना तो कावळा -त्याचे ते ओरडणे हे सगळे हवेहवेसे होत आहे - त्यांचे जणू प्राण त्या वाट पहाण्यात अडकलेत इतक्या उत्कंठेने ही विराणी प्रकटलीये..

शकुन गे माये सांगताहे .....

या विशेष पाहुण्याच्या आगमनाला ते शकुन म्हणून संबोधत आहेत ... ज्याला कोणाला भगवंताविषयी प्राणापलिकडे प्रेम असेल तोच हा शब्द वापरू शकेल - शकुन - किती सुंदर आणि सर्व लक्षणांनी युक्त असा शब्द..
काही चांगली गोष्ट घडायची असताना काही संकेत मिळतात - जसे उजव्या डोळ्याची पापणी सतत लवणे, उजवा बाहू स्फुरणे - अशा वेळेस सहज मनात येते - काय भाग्याची गोष्ट घडणारे म्हणून हे शकुन होताहेत आज !!
आणि माऊलींना भगवंताखेरीज कुठलीच गोष्ट मोलाची वाटत नसल्याने त्यांना साधा कावळा ओरडला तरी तो शकुन वाटतोय - न जाणो हा संकेत ते पंढरीराय येण्याचा तर आहे का ?? ही अनावर उत्कंठा कशी ओसंडतीये या सगळ्या विराणीतून .... या कावळ्याचे ओरडणे हाच मोठा शकुन आणि मग त्या कावळ्याचे कोडकौतुक तर किती करु नि किती नको असे माऊलींना झालंय पार .....

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

तुझे सोन्यानें मढवीन पाऊ - अरे, एवढी मोठी शकुनाची गोष्ट जर घडणार असेल तर तुझे पंखसुद्धा मी सोन्याने मढवून देईन बघ ...
तुला दहीभात आवडतो ना त्याचीच उंडी तुला भरवीन बघ .... पण - जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ... या माझ्या जीवाला ज्याची अत्यंत आवड आहे त्याची काही खबरबात सांग तर जरा - मला त्यातच गोडी आहे रे - अगदी पटकन सांग बरं.... जराही वेळ लावू नकोस बघ ...

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी । - अरे, तुला दहीभात नकोसा झाला असेल तर मी दुधाची वाटीदेखील तुला देईन रे - अगदी वाटीभरुन दूध तुझ्या ओठाला लावीन - पण सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ?? पण खरंच तो विठुराणा येणारे ना रे ??
काय हे आर्त!! काय ही विनवणी !!
या संसारातल्या अति क्षुल्लक, क्षणभंगुर गोष्टींसाठी मी रात्रंदिस इथे जिवानिशी झुरतो आहे आणि तिकडे माऊलींना "त्या"च्या आगमनाचे इतके मोल वाटते आहे की दारातल्या कावळ्याच्या ओरडण्यातून तो विठू येऊ घातलाय की काय अशी जगावेगळी ओढ या विराणीतून अशी काही प्रकटलीये की ही विराणी वाचतानाच डोळ्यातून अश्रूधारा लागतात अगदी - कशी ही ओढ, कशी ही विनवणी - सगळंच जगावेगळं आहे हे .... ही विरहिणी अगदी अगदी वेगळीच आहे - अखेर ती अलौकिक अशा आपल्या माऊलींची आहे - त्यांची प्रतिभा, त्यांचे आर्त, त्यांचा विठूराणा - सगळे जगावेगळेच आहे पार ...

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे - अरे तू तर आंब्याची रसाळ फळे खाणारा आहेस त्या रसाळ फळांनी तुझी वाणीही रसाळ झालीये तेव्हा सांग ना रे हाच शकुन (पंढरीनाथ आगमनाचा) आहे ना तो ?

पैलतोगे काऊ कोकताहे .. केव्हा बरे अशी ओढ लागेल या जीवालाही ??? - एक माऊलीच जाणे ...

हरि हरि....
-------------------------------------------------------------------------------------------------
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥

-------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनडिंगांना माज आलाय अशी कविता आपण लिहली तरी मराठीवर ७०० वर्षापुर्वी कानडीचा प्रभाव होता हे संत ज्ञानेश्वरांचे वाञमय वाचले की जाणवते.

सर्वांगे सुंदरु
कासे पितांबरु
विद्येचा सागरु
वंदीयेला

यात प्रत्येक ओळीच्या शेवटी येणारा हा या काऊ मध्ये पण येतो.

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

बंगाली भाषेत जसा रविंद्रनाथांनी जिथे तिथे आणला जसे वर्षा ऐवजी बर्षा तसाच भाषेला गोडवा आणण्याचा प्रकार असावा.

( भाषा या विषयात माझे फारसे ज्ञान नाही सबब जाणकारांनी नाही पटल्यास सोडून द्यावे )

शकुनाला भारतीय संस्क्रूतीत आणि खास करुन ज्योतिषशास्त्रात फार महत्व दिले आहे.

ज्योतिष हे प्राचिन असल्यामुळे त्याच्याशी संबंधीत शकुनचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांना सुचावा हे त्या काळाला धरुनच आहे असे वाटते.

ज्योतिषाकडे एखादा प्रश्न आला आहे की प्रश्नकर्त्याची पत्नी प्रेग्नंट आहे आणि मुलगा की मुलगी हे उत्तर हवे आहे. अश्या वेळी ग्रह -तारे यांचे उत्तर शकुनाने पडताळुन पहावे असा सल्ला जुने जाणते ज्योतिषी देतात.

माणसाला पडणारी स्वप्ने यातील सुचक स्वप्ने कोणती त्याचे अर्थ काय यावर अनेक ग्रंथ लिहलेले सापडतात.

काव्य हे केवळ शाब्दीक न रहाता भावनेला स्पर्श करते हा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांच्या विराणी या प्रकारात खास दिसतो.

विठ्ठलाला आपला प्रियकर मानुन त्याच्या विरहाच्या भावनेने भारलेल्या विराणी हा काव्यातला अदभुत प्रकार आहे.

घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ॥ १ ॥

चांदवो वो चांदणे । चापेवो चंदनु ।

देवकी नंदनु । विण नावडे वो ॥ २ ॥

चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी ।

कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा गा ॥ ३ ॥

सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।

पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा ॥ ४ ॥

तुम्ही गातसां सुस्वरे । ऐकोनि द्यावी उत्तरे ।

कोकिळें वर्जावें । तुम्ही बाइयांनो ॥ ५ ॥

दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।

बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसे केलें ॥ ६ ॥

यातील चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी

किंवा

सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।

पोळी आगीसारिखी । वेगीं विझवा गा

दर्पणी पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।

या सारख्या कल्पना तर विरहात काय अवस्था असते याची उत्कटता दर्शवितात.

सुंदर लिहिलंय शशांक,
लताच्या आवाजात ऐकल्यामुळे माहित असलेली ही रचना, (मी सांगतोय ते ऐकून मजा वाटेल पण) माझा मुलगा लहान असताना त्याला 'अंगाई' गीत म्हणून मी म्हणायचो आणि तो चक्क झोपायचा देखिल Happy

खुप सुंदर लिहीलय....या शब्दांना लताने सुंदर स्वरसाज चढवलाय. त्या चालीतच हे शब्द वाचावे लागतात.

लताने सुंदर गायले आहेच पण या रचनेला चाल लावणे जास्त कठीण वाटते. त्यासाठी पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे कौतूक करावे तेवढे कमीच.
शशांक, खूप छान लिहिले आहे.

सुंदर लिहिलंय.
माउलींची विराणी आणि त्याचं इतकं हृद्य विश्लेषण वाचून सकाळ प्रसन्न झाली.

अवांतर- बैरागी रागात बांधलंय हृदयनाथांनी हे गाणं.त्यातली बासरी काही आगळीच आहे.
नुसतं वाचून संपूर्ण गाणं कानात घुमू लागलंय अगदी Happy

खूप सुरेख लेखन. माऊलीच्या भक्तीत न्हालेले...म्हणूनच त्या विराणीतील शब्द-भावांइतके नितळ.

ही विराणी वाचतानाच डोळ्यातून अश्रूधारा लागतात अगदी>>
अगदी खर.

हे गाणे लागलेले असताना अर्थाकडेही लक्ष असले तर मात्र डोळे मिटून अश्रूंना मनमोकळी वाट करून देणे इतकेच हातात राहते. पण गाणे संपल्यावर नंतरची पाच मिनिटे तसेच शांत बसून राहण्या व्यतिरिक्त काहीही करणे अशक्य होऊन जाते.

अय्यो ! हे असं आहे का ? माऊलींचं आहे हे माहितच नव्हतं.
मला एल्जीबीटी वरचंच काही तरी असेल अस वाट्त होतं.