पेटेंटेड मराठी

Submitted by शबाना on 13 June, 2014 - 09:43

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.

माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.

http://www.maayboli.com/node/47803

आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.

बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.

मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.

सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.

बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.

आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !

तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .

सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.

खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?

वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )

लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !

लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली वाचायला..
माझ्या पुतण्याला काही वर्षे "अखंड संपूर्ण" या शब्दाचे वेड होते. तो कश्याच्याही संदर्भात ते शब्द वापरायचा.
उदा. माझी अखंड संपूर्ण झोप झाली. मला अखंड संपूर्ण मासा दे, तू अखंड संपुर्ण वेडा आहेस ( हे मला उद्देशून बरं का ! ) .. मग आम्ही पण त्याचे नाव अखंड संपूर्ण असे ठेवले होते.

मजा आली वाचताना! आमच्याकडे आजोबांनी 'उदमळतंय' हा शब्द आणला. मळमळणे / डुचमळणे + कसेसेच वाटणे + अन्न घशाशी आल्याची भावना होणे या सर्व गोष्टी त्यांच्या मते ह्या एका शब्दात सामावलेल्या असायच्या. त्यांच्यानंतर बरीच वर्षे कोणी हा शब्द वापरला नाही आमच्याकडे.

पण मी आता राहते त्या भागात अगोदर उघड्यावर कोंबड्या, बकर्‍या, डुकरे इत्यादी प्राण्यांचे मांस विक्रीला ठेवलेले असायचे. तिथून जाताना मला त्या वासाने व रक्तरंजित दृश्याने हमखास 'उदमळायला' व्हायचे! तेव्हापासून तो शब्द माझ्या बोलण्यात पुन्हा प्रविष्ट झाला आहे.

मित्रपरिवारात संकेतार्थी बरेच शब्द आहेत व वापरले जातात. खूप लांबलचक वाक्ये / शब्द वापरण्यापेक्षा तो एक संकेतार्थी शब्द वापरला की काम होते! किंवा शेजारच्या एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय हे कळू द्यायचे नसेल तर असे शब्द वापरले जातात.

अरुंधती , आमची आजी याला उमळतय/ उमसतंय असे म्हणायची.
आमच्या आईचा आवडता वाक्यप्रयोग 'वरपास्नं खालपर्यंत झोडून काढेन'
आम्ही आम्हाला मुलेबाळे झाल्यावरही तिने असे म्हणताच खोटे खोटे घाबरतो.
Wink

आमच्या आजीची शब्दसंपदा तर अफाट होती.
केव्हातरी आठवून आठवून लिहिते.

साती Happy

रोमन टिकली Happy

माझी पोरगी लहान असताना दुधी, भेंडी असे ईकारांत शब्द ती अमेरिकन स्टाईलमधे दुधाSSय, भेंडाSSय असे म्हणत असे. तिचे ऐकून मेव्हणीच्या पोरांनी नि भावाच्या मुलींनी पण तेच शब्द उचलले. आत्ता आमच्याकडे (इथे नि देशात पण) दुधाय नि भेंडायच्या भाज्या होतात. Happy

रवीवार म्ह्नले कि मटण असायचे घरी... एकदा माझ्या लहान बहिणीणे म्हनले .... आज टण्म आणले आहे ना..... तेव्हापासुन टण्म हाच शब्द घरात वापरला जातो..

मस्त Happy पेटंट्स वाचायला मजा येणार.

आमच्या मातोश्रींचा आवडता शब्द 'फारातफार' ! कॉलेजात जाईपर्यंत हा शब्द वेगळा आहे हे न जाणवताच मीही बर्‍याच वेळा वापरत असे तेव्हा मैत्रिणींनी लक्षात आणून दिले की 'फार फार तर काय होईल !' असे वापरले जाते सहसा. त्यांना फारच गंमत वाटायची 'फारातफार'ची.
तसेच अप्रऽतिम, अतिसुंदर असे शब्द उलट्या अर्थाने नियमित वापरणारे पाहिले आहेत Happy

आमच्याकडे निम्मि जनता कानडी निम्मी मराठी. त्यामुळे असल्या शब्दप्रयोगांची नुसती रेलचेल. आजोबांची एक बहिण होती- पापक्का. (आता तिचे नाव असे का? यावर एक वेगळीच पोस्ट होइल)

एकदा मामेभावाच्या मुंजीला ती आली होती (त्यावेळी ती ८०+ सहज असेल) येता जाता नातेवाईक आपले तिला "येन अंतीवा पापक्का" असं विचारायचे. पोराटोरांनी तेच उचललं आणि गल्लीभर जो सापडेल शिवी देताना "येन अंतीवा पापक्का!!"

लेकीचे खास शब्द म्हणजे टचई (चटई) आबोजा (आजोबा), कोबीचाबाजी. भेंडीचाबाजी. (कच्च्या भाज्यांना पण असंच म्हणायचं)

नवर्‍याने एकदा "एक चुटका काढतो" म्हटल्यावर वाटलं एखादा पीजे सांगेल. कसलं काय... घोराय्ला लागल्यवर समजलं. चुटका काढणे म्हणजे वामकुक्षी. Happy

आमच्या वडलांचे मराठी म्हणजे "भयंकर सुंदर" आणि "भयानक गोड" Happy

शबाना,

भंपू या शब्दावरून भंपादक या शब्दाची आठवण झाली! Lol

बडोद्यात बरेच नातलग होते माझे. ते चक्क गुजराती म्हणी मराठीत वापरत. उंध मारलं (= टोमणा मारला), भजिय सोडलं (पिल्लू सोडलं), इत्यादि वाक्प्रयोग बोलण्यात येत.

वेगवेगळ्या मराठी बोलींचे खास खास ढंग वाचायला मजा येते! Happy

आ.न.,
-गा.पै.

माझी मैत्रिण मिरजची,. तिच्या आईकडे अनेक असे शब्द आहेत. शेपू किंवा तत्सम भाजी न कापता (नुसती निवडून) त्याला फोडणी देऊन कढईत अर्धवट शिजली की बत्ता घेऊन त्या कढईतच थोडी चेचतात.
त्याला भाजी चांगली 'खुंदलायची' असा शब्द वापरतात.

मस्त Happy

हे गंमत झाली प्रकरण माझ्या आईचेही चालते.
तर मग गंमत काय झाली, असे म्हणताना तिचा स्वताचाच चेहरा एवढा खुलून येतो की यापुढे ती एखादा पाणचट प्रसंग सांगणार असली तरी (बहुतांश वेळा असेच असते Wink ) पण तरी आपला चेहरा आधीच खुलतो. निदान माझा तरी..
काही लोकांना मात्र सर्व सांगून झाल्यावर, तर ही अशी गंमत झाली, असा समारोप करायची सवय असते. मग उगाच अच्छा हि गंमत होती का असे स्वताच्याच मनाशी बोलत ओढून ताणून हसरा चेहरा करावा लागतो.

माझ्या आईचे आणि माझे कोडलँगवेज, शॉर्टकट, ताकभाताला फक्त त टाईप बोलणे खूप चालते. जे वडिलांच्या बाऊन्सर जाते. अचानक ते "काय?" म्हणत विचारणा करतात, जणू काही आपण ऐकताना काहीतरी अर्धवट ऐकले. मग आमच्यातला बोलतो, तुमच्यापर्यंत काही नाही, त्याला/तिला समजले Happy
बरेचदा वडींलांची फिरकी घेताना, चिडवताना हे परवलीचे शब्द वापरतो. त्यांच्या समोरच बोलूनही, आपल्याबद्दल बोलले जातेय हे त्यांना समजूनही त्यांना नक्की काय चिडवलेय हे समजत नाही. अर्थात या केस मध्ये नेहमीच चिडवणारा मी आणि खळखळून हसणारी आई असेच कॉम्बिनेशन असते. पण मुलगा मोठा झाल्याने वडील राग आईच्या हसण्यावर काढतात Wink

बाकी हे सो कॉलड पेटंट शब्द खरे तर मराठीचे असे नसून एखाद्या कुटुंबाचे असे असतात. मग त्यात आईने रोजच संध्याकाळी "बाबूजी, आज खाने मे क्या करनेका" करत लाडात केलेली विचारणा असते तर त्याच आईने दिवसातून दहा वेळा "गाढवा, तू कसल्याच कामाचा नाहीयेस" म्हणत केलेला उद्धारही असतो. Happy

माझ्या आईचा वाक्प्रचार म्हणजे "माझ्या डोळ्याने बघ" कोणाला वाटेल यात खोल अर्थ दडलाय. पण एखादी गोष्ट/वस्तू कुठे ठेवली आहे ते ती सांगत असेल आणि आम्हा कोणाला ते समजत नसेल तर आम्ही तिच्या डोळे कोणत्या दिशेने बघत आहेत ते आधी तिच्या डोळ्याकडे पाहून घ्यायचं आणि मग त्या दिशेने शोधायचं म्हणजे तिच्या डोळ्याने बघणे! Uhoh

पण कबूल करायला हवं की मी पण स्वतःला "माझ्या डोळ्यांनी बघ" म्हणताना पकडलय Happy

शबानाजी,

एका गंभीर लेखमालेवरुन एकदम विनोदी लेखन ? काही काही माणसांचा "आदमासच" बांधता येत नाही. नुसत्याच गडी माणसांचा अस नाही बाईमाणसांचा पण येत नाही.

छान आणि मजेशीर आहे हा धागा....इतका की वाचल्यानंतर समजून येते की कित्येक शब्द...जे आपल्यातीलच झाले आहेत अगदी....ते नित्यनेमाने वापरातील आहेत आणि ते उच्चारताना वा ऐकताना काहीच वेगळे वाटत नाही.

आमच्या कोल्हापूरात बोलाचालीतील चित्रपट परीक्षण अफलातूनच असते. "दिलप्यानं तोडलया नुस्तं !" असं कुणीतरी म्हटलं की ऐकणार्‍याने समजून घ्यायचे...."गंगा जमुना" चित्रपटात दिलीपकुमारने अभिनयाची कमाल केली आहे. "वहिदा काय घुमलीया....चक्कीत जाळच हुतूया !" = वहिदा रेहमानने "गाईड" मध्ये नृत्य आविष्कार प्रभावी केला आहे.

पोराने "आये खायाला दे..." असा पुकारा केला की ही आई हमखास उत्तर देणार...."भाड्या, मगाशीच तोबरा भरला होतास की..." = तोबरा हे नाम कुठून आले वा कशापासून बनले गेले हे नाही समजत, पण भाव जाणला जातो की पोराने काही वेळापूर्वी भरपूर खाल्ले होते.

मस्त आहे धागा....!!!
हे वाचल्यावर जरा स्वतः च्या शब्दकोशावर नजर टाकली...
मी बुंगाट हा शब्द वापरते... लोक सुसाट हा शब्द वापरतात.... गाडी बुंगाट होती.... Happy Happy

आमच्या शेजारी कुर्गी कुटुंब रहात होते त्यांची लहान मुलगी आमच्याघरीच असायची. माझी आई आणि कुणी बोलत असले कि ती आजूबाजूलाच असायची. त्या बायकांच्या बोलण्यात जरासा पॉज आला कि ती मधेच काहीतरी बोलून टाकायची.... "तर अशी गंम्मत", " त्यातून दिवस हे असे"... तिने हे कुठून उचलले होते कळायचे नाही, पण
प्रत्येकवेळी आमच्याकडे आलेल्या बाई दचकायच्या नक्की.. तिचे वय त्यावेळी ३ वर्षे !

"...लोक सुसाट हा शब्द वापरतात.... गाडी बुंगाट होती...."

~ "बुंगाट" शब्द मस्तच वाटतो....जरी सुसाट मुळे गाडीचे चित्र झटदिशी नजरेसमोर येत असले तरी.

आमच्याकडे "तर्राट" शब्द वापरतात...वेगासाठी, म्हणजे "डायवरनं गाडी काय तर्राट हाणली....क्क्या ईच्चारू नगं !"

ड्रायव्हर असा स्पष्ट उच्चार कुणीच करत नाहीत....डायवर, तर क्लीनरसाठी "किन्नर".

आमच्याकडे कुणी वेड्यासारखे वागत असेल तर जाऊ दे त्याचे चार आणे पडले असतील असे म्ह्णतात. जास्त प्रगती असेल तर आठ आणे, नाहीतर रुपया.:फिदी:

Pages