पेटेंटेड मराठी

Submitted by शबाना on 13 June, 2014 - 09:43

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.

माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.

http://www.maayboli.com/node/47803

आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.

बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.

मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.

सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.

बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.

आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !

तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .

सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.

खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?

वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )

लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !

लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेक phonetically spellings शिकायच्या वयात..तिचा भाऊ तिच्याहून ६ वर्ष मोठा...
दोघांचे " प्रेमळ" सं भाषण सुरू होते....

You are a idiot...No you are a idiot ...

भावाने लगेच ठेवणीतले शस्त्र काढले...
You don't even know how to spell idiot, so you cant call me idiot...

बहिण पण तत्परतेने उद्गारली... I can spell...I can spell...it's spelled " IDUD"...
तेव्हापासून आमच्याकडे " IDUD" लाडाचा शब्द आहे Happy

तुझ्या बापाला बटर..

हे यावरुन आले.

च्यायला !

च्या आयला ! बटर बाबाला.

चहा आइला , बटर बाबाला.

( बटर म्हनजे चहात बुडवुन खायचा कडक पाव. )

त्याच्या बैलाला ढोल, नानाची टांग.. असे शब्दप्रयोग माझ्या लहानपणी फार होत ( मुंबईचा जावई चित्रपटात पण ते आहेत. )
त्याला काही अर्थ असावा असे वाटत नाही.

माझा भाऊ पुण्यात शिकत होता तेव्हा माझ्यासाठी वरसंशोधन सुरु होते. पुण्यातील मुलगा असल्यास भाऊ पत्रिका/फोटो घेऊन जात असे. त्याच्या एका मित्राकडे गाडी होती. त्यामुले तो ही भावाला घेऊन त्या घरी जात असे.
एकदा सहकार नगरला हे दोघे माझी पत्रिका-फोटो द्यायला गेले. त्या मुलाच्या आईला वाक्यागणिक 'नाही का?' असं म्हणायची सवय होती. 'पत्रिका जमली तर तुमच्या बहिनी ला आणि आई वडिलांना बोलावून घेऊ नाही का?' 'फारच गरम होतय नाही का?' भाऊ किंवा त्याचा मित्र 'हो ना' हे उत्तर देऊन पकले. तेव्हापासून आमच्याकडे तो मित्र आला की किंवा ghree नाही का? हो ना! ही पेटंट वाक्य असतातच!
माझ्या माहेरी आम्हाला चौघांना (माझे आई वडील, भाऊ आणि मी) बरेचदा 'बरं का' असं एका टिपिकल हेलात म्हणायची सवय आहे असे माझ्या भावजयीने अलीकडेच सांगितले!

माझी आजी 'भाजी चांगली रटमट शिजू दे' असं म्हणायची. पाणी खूप वेळ उकळलं की ते 'उकळ उकळ उकळलं ' असं म्हणायची.
माझी आई टॉमबॉय मुलींना 'धेंडासूर ' म्हणते. बाबा 'बहुतेक' च्या ऐवजी 'बोत करून' म्हणतात.

छान लेख.
कॉलेजमध्ये असताना आमचा चार मैत्रीणींचा एक ग्रुप होता.एक दिवस आम्ही चौघी कॅटीन बसलो असताना लांबुन एक मुलगी येताना दिसली. मी विचारल 'कोण आहे ती?'
सोलापुरी मैत्रीणी 'अबे.. ते हुशार झाड बे..'
ती क्लासमधली एकदम सीनसिअर आणि टॉपर मुलगी होती.त्यावेळेपासून अशालोकांसाठी ' हुशार झाड' हा आमचा
कोडवर्ड झाला. कॉलेजनंतर ऑफिसमध्ये सुध्दा बरीच हुशार झाड भेट्ली. इथे मायबोलीवर आल्यावरपण बर्‍याच लोकांचे लेख, त्यावरचा अभ्यास, इथले प्रतिसाद .वैचारीक वादावादी बघुन माझ्या कानात मैञीणीचा आवाज येतो..'जौन दे बे.. हे हुशार झाड नाही हुशार झाडांच जंगल आहे.'

आमच्याकडे वावदुक हा शब्द उभय मात्यापित्यांच्या तोंडी खूपदा ऐकला आहे.
कोणाकडे गेल्यावर फार गोड बोलावे लागले (मनाविरूध्द) की त्याबद्दल बोलताना "लाडू, पेढे, जिलेबीss" बोलून वैताग आला असे म्हटले जाते.
अतितापट व लगेच मूड जाणाऱ्या लोकांची कुटुंबात रेलचेल आहे. तेव्हा 'उडाला भुईनळा', 'पापड मोडला', 'फ्यूज उडालाय', 'धूर दिसतोय का धूर' असे म्हणाल्यावर कोणाचे काहीतरी बिनसल्याची वर्दी लगेच मिळते.

कस्ला भारी लेख आहे. मस्तच, शबाना. रोमन टिकली Happy

टेंगळासारखं उभे रहाणे/ करणे... मधेच कुठेतरी, येण्या-जाण्याच्या वाटेत येणे.
अधे-मधे घोटाssळाss - त्या दोन्ही ss सकट कपाळावर हात मारून घेत म्हटलं की आपण केलेला वेंधळेपणा... नुस्तं शेवटचं ss म्हणजे दुसर्‍याचा.

कुगी - मोठ्या दीरांच्या लेकाने स्कूटरला ठेवलेलं नाव... अजून तेच म्हणतो. त्याला लेकरू यायची वेळ आली.
दूधनी... किंवा दुधी - दुधाची बाटली... तेच महाशय.

रेस्सिस्ट - (तो स ला स नीट ठास्सून म्हणायचा) अती कॉम्पिटिटीव्ह नेचरच्याला... ह्या शब्दातला "रेस" चा अर्थं कळला की ऐकणारे बेशुद्ध पडतात... त्यामुळे चार चौघात ही शिवी घालायला बंदी आहे. ते अर्थं उकलून वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड होतं.

जा रे ब्रह्मज्ञान्या... अती पाजळाणार्‍याला

आमच्याकडे ना सगळेच कायम नको तितक्या उत्साहात असतात त्यामुळे "तुम्ही/तू म्हंजे ना... लग्न नको करून तर... आहेस' हे सतत ऐकवत अन ऐकत असतो.
ह्या कोल्हापुरी म्हणीचा उत्तरार्ध ... '...तर कोणत्या घोड्यावर चढू आहेस' असा आहे. अख्खी म्हण म्हणायला वेळच नसतो. दुसरा घोडा तयारच असतोय... बाजूलाच.

लय आगाव... टिपिकल कोल्हापूरी... ह्याचा खरा शेवट ,... हाय बेनं' असा होतो. पण बोलून दाखवायची गरज नाही.

(घाल) नखाड - अगदी थोडासा भात, भाजी आमटी.. काहीही "वाढ थोडंसं'... 'वाढ नखाएव्हढं' ह्याचं लोभस (??) कोल्हापूरी शार्टफारम.

माझ्या नवर्‍याचा - थोडक्यात गोडी - हा वाक्प्रचार किण्णं करतो माझ्या डोक्यात. कारण कांदा, पीठ, भाज्या, परत कांदा.. परत पीठ... अजून भाज्या... परत कांदा... ह्या चौर्‍यांशीलक्ष भज्यां मधून बाहेर पडायच्या मी प्रयत्नात. आणि "अजून?" ह्या प्रश्नाला "... हो.. पण थोडक्यात गोडी" म्हटलं की... माझ्या कानातून धूर आणि डोक्यात किणकिण.

हो... डोक्यात किणकिण... म्हणजे जे काही चाललय ते प्रचंड त्रासदायक आहे... आणि कोणत्याही क्षणी ठोss होण्याची शक्यता आहे.

आईकडे... ".. कुणी चैन करून ठेवलीये?" ह्याचा अर्थं कुणी पाण्याची सांड-लवंड करून नासाडी केलीये असा होतो. ह्याचं मूळ शोधायला(च) हवं.

काय मॅव मॅव करतोयस उंदरासारखं?
हा टोटल बिन्डोक र्हेटोरिकल प्रश्नं माझा लेकाला असायचा. उग्गीच सुख दुखल्यासारखं हाई हुई... वॅवॅ... केलं की मी म्हणायचे. त्याने तो एकदा त्याच्या लहान मामेभावावर वापरला तेव्हा त्यातला मूर्खपणा मला कळला... पण खूप उशीर झाला होता.

ही पेटंटेड (मराठी) भाषा पार भिनते रक्तात. ती पुढच्या पीढीत जाणार ह्याची 'भयंकर सुर्रेख भीती' आहे.

पुन्हा एकदा, शबाना, मस्तच सुरुवात केलीयेस. मज्जा येतेय वाचायला.

मस्तच!
माझ्या मामी केर उचलायच्या सुपलीला केरलं किंवा केरुट म्हणायच्या. आमच्या बर्‍याच घरात हाच शब्द वापरला जातो.

पूर्वी मी आणि रवी टाइम्स मधील शब्दकोडे दो घे मिळून सोडवत असू. हैद्राबादला म टा ची डाक एडिशन तीन वाजे परेन्त दुपारी अशी येते. रात्री जेवायच्या आधी मी गरम पोळ्या कर्ता करता हे कोडे सोडवत असू.
त्यात एकदा सुंदर असा क्लू आला. त्यात शेव्टाचे अक्षर रू आधीच होते आणि दुसरा आडवा शब्द शेवटचे अक्षर रा असा आला. म्हणजे सुंदर ह्या जागी रारू ! म्हणून काही ही सुंदर म्हणाय चे असले की रारू आहे अगदी असे प्रचलित झाले. Happy

परवा मुलीला शिकवताना annihilate ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगताना पूर्ण पणे पराभव करणे असे मी तिला चटकन सांगितले. ते तिच्या डोक्याव रून गेले. काय पूर्ण पणे प्रभाकर करणॅ ? असे तिने विचारले. तेव्हापासून एखाद्याचा पार पोपट झाला असे म्हणायच्या ऐव जी त्याचा प्रभाकर झाला असेच म्हनतो.

रोमन टिकली मस्तच Happy
लय वर्षांपूर्वी ट्युशन घ्यायचे. एक विद्यार्थी राग आला दुसर्‍याचा की त्याला ए नेफळ्या म्ह्णायचा. अर्थ माहीत नाही.
नात्यातली एक ताई बरीच वर्षे युएसमध्ये राहते. ती आल्यावर तिच्याशी बोलतांना खूप मजा येते. तिला पटकन शब्द सापडत नाहीत. दाण्याच्या कुटाचं groundnuts ची चटणी होते. त्यावरून काही खूप क्लिष्ट समजवायचं असेल तर आम्ही सरळ groundnuts चटणी आठवतो.
कॉलेजच्या गृपच्या गम्त्या तर बर्‍याच. बुद्धाला एका झाडाखाली बसून तप करतांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले म्हणतात. त्यावरून जरा कुणी 'शाणपट्टी' करायला लागलं की विचारायचं कुठल्या झाडाखाली बसला होतास म्हणून. त्याचा वेगळा अर्थही होत असेल हे ध्यानीही यायचे नाही.
कॉलेजमध्ये एक मुलगा लेडीज रूम समोरून जातांना स्लो व्हायचा, शीळ घालणे, भांग पाडणे ई. उद्योग चालायचे. त्याचं नाव प्रवीण. तो आला की जोरात ओरडायचं प्रवीणSssssssss... मग हळूच लोणचं.... प्रवीण ह्या ब्रँडच लोणचं तेव्हा बरं फेमस होतं. नंतर असले प्रकार करणर्‍या प्रत्येकाला प्रवीण लोणचं रूढ झालं हे सांगणं नलगे!

मस्त धागा!

मी ती लेखमाला खुप आवडीने वाचायला घेतलेली पण खरच डो़यावरून गेली मग थांबवली हो रिया,

मलाही 'बुडाले ,बुडाले' असं व्हायला लागलं म्हणून थांबवली.

मस्त आहे लेख आणि प्रतिक्रिया.

माझी छोटी भाचीपण 'हॅप्पी टू यु' म्हणते.

डोंबलं हा शब्द आमच्याकडेपण फेमस आहे.

मुग्धा 'अर्धबोबडं' हा शब्द माझी आईपण वापरते.

काहीजण खायला दिले याअर्थी चारले हा शब्द वापरतात. आम्ही श्रीरामपुर येथे असतांना एकदा मी आमच्या मालकांच्या मुलीला घेऊन बाजारात गेले आणि आम्ही पाणीपुरी खाल्ली. तेव्हा मालकांच्या मुलीने घरात सगळ्यांना सांगितले की 'काकुंनी मला पाणीपुरी चारली', मी ऐकतच राहीले कारण गाई-गुरांना चारा घातला किंवा दिला असं माझ्या परीचयाचे होतं. जनरली आपण दिली हा शब्द वापरतोना.

मस्त मजेशीर लेख आणि प्रतिक्रिया पण....
जुन्या नव्या अनेक आठवणी जाग्या केल्या ह्या लेखानं.

दाद,
तर कोणत्या घोड्यावर चढू आहेस' >>
याला आमच्याकडे "येऊ नकोस तर.... कुठल्या गाडीत बसू"? आहे.

एखादा खूप बाता मारत असेल पण प्रत्यक्षात कृती काहीच करत नसेल तर त्यासाठी माझी काकू म्हणायची...
"तोंड मारी बाता.......आणि *** खाई लाथा" (*** हा 'तोंड'या शब्दाशी यमक साधणारा शब्द अगदी स्वच्छ उच्चारून.)

आमच्यापैकी कुणीही, सगळं काही भरपूर/ मनासारखं असूनही कुरबुर करत असलो की आई म्हणते
"सतरा साडे(साड्या) तरी ...... भागाबाईचे कुले उघडे" त्यामुळे आता आम्ही याचा एकतर पूर्वार्ध तरी म्हणतो किंवा
नुसतं 'भागाबाईचे' इतकंच म्हणतो...

एखाद्याला खूप जोरदार दम कुणी दिला असेल (सिनेमात वगैरे) तर काका 'हग्यादम दिला बघ त्याला' असं म्हणायचा Proud

सातार्‍यात "लंब्याचा बोळ" दारूच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे.
एखाद्या दिवशी फारच भरकटल्यासारखं कुणी वागत/ बोलत असेल तर आई विचारायची,
"काय आज लंब्याच्या बोळातनं आलायस का?"
हे फक्त आमच्याच घरातलं पेटेंटेड वाक्य नसेल, हे अख्ख्या सातार्‍यातलं पेटेंटेड वाक्य असेल. Happy

अन्जू इकडे नगर भागात काही कम्युनिटीतले लोक अगदी सर्रास लहान मुलाला भरवणे यासाठी "चारणे " हा शब्द वापरतात.
"अगदी चारल्याशिवाय खातच नाही हा"
"चारू का तुला मी वरणभात?"
इ.इ.

माझी बहिण एकदा म्हणाली मी सरळ बोलते तुझ्याच मनात काळभोर आहे Uhoh Proud

तेंव्हापासुन आमच्या मनात काळंबेरंच्या जागी काळभोर असतो Proud

मस्त लेख, प्रतिक्रियाही मस्त.

माझ्या सासरी 'तरंगणे' हा वाक्प्रचार वेगवेगळ्या वेळी वापरतात. हे तरंगणे कधी? तर आपलं छानपैकी आवरून झालेलं आहे पण अजून बाहेर पडायला वेळ आहे म्हणून टिवल्याबवल्या चाललेल्या आहेत. तेव्हा विचारतात, का रे तरंगलाय्स? (म्हणजे आवरलंय तर जा की बाहेर, का टीपी चाल्लाय?) किंवा घरी खूप पाहुणे आहेत, जेवणाच्या पंगती बसत आहेत अजून. ज्यांची जेवणं व्हायची आहेत, ती मंडळी 'तरंगली' आहेत. थोडक्यात, दोन कामांच्या मध्ये तुम्ही अडकला असाल तर तो मधला काळ म्हणजे तरंगण्याचा काळ. अत्यंत चित्रदर्शी शब्द आहे, मला भारी आवडतो Happy

नानाची टांग, आयला, च्यायला (sorry) हे मुंबईत फेमस आहेत खूप वर्षे.

हल्ली कोपच्यात घे, सही हे शब्द बरेच बोलले जातात.

माझ्या लेकीच्या ग्रुपचे "मस्त किंवा सुंदर" साठी काही खास शब्द - भारी आणि वाडीव.

भारी ठीक आहे पण वाडीव कुठून आला काय माहीत Uhoh

आमच्या पुर्विच्या घरमालकीणबाई मुळच्या म.प्र. तल्या.

त्यांचे हिन्दिमिश्रित मराठी कान त्रुप्त करून जायचे. त्यांचा एक पेटंट शब्द..."खरं वास्तविक पाहता....: हे वाक्य बरेच वेळा एकसंधपणे वापरत.

माझ्या मुलाचे अगदी लहानपणीचे शब्दशोध...सँडल ला सँडल म्हट्ले तर बुटांन्ना 'बुटल' म्हणायचा.त्याला 'भाजिपोळिचा पोंगा' हा अखंड शब्द उच्चारणे जमायचे नाही म्हणून ' कोमन्या' हा शब्द कुठून शोधला देव जाणे! त्याच्या आईला ते व्यवस्थित कळायचे. आम्ही हा शब्द अजून वापरतो व प्रवासात नीरनिराळ्या प्रकारचे 'कोमने' अजूनही घेउन जातो.

तो थोडा मोठा, झाल्यावर मित्रमंडळीत खेळतांन्ना, राग आल्यावर इतर भलभलत्या शिव्या शिकण्यापेक्षा त्याला काही शब्द सुचवले होते... 'भुसनळ्या', 'सुत्तरफेण्या', वगैरे वगैरे. देणार्‍याला शिवी दिल्याचे समाधान, घेणार्‍याला काहितरी शिविसारखे वाटते पण नेमके काय ह्याचे कन्फ्युजन.!

वाढिव असेल का ते?
ओव्हरस्मार्ट व्यक्तीला उद्देशून आम्ही हा शब्द वापरतो. वाढिव आहे तो असं!

Pages