वऱ्हाडी चिकन - varhadi chicken

Submitted by टीना on 7 June, 2014 - 13:06
varhadi chicken
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १ किलो ( Skin काढून ) ,
तेल - १ मोठी वाटी ,
कांदा - २ मोठे चिरून थोडे तेलावर भाजून पेस्ट केलेली ,
लसूण - २ मध्यम आकाराचे गड्डे ,
हिरव्या मिरच्या - ४ ,
अद्रक / आलं - बोटाच्या २ पेरा एवढा तुकडा ,
(आलं ,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा डोल - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले ,
जिरे - १ चमचा ,
दगडफूल ( प्रमाण बोटाची २ पेर ) ,
कलमी - बोटाएवढा १ तुकडा ,
मिरे - ८ ते १० ,
लवंग - ५ ते ६ ,
विलायची - ३ ,
धने - १० ग्रॅम किंचित तेलात भाजून (+दगडफूल + मिरे + लवंग + विलायची + कलमी +जिरे ) बारीक केलेले ,
हिरव्या मेथी च्या ८ १० काड्यांची पाने बारीक चिरून ,
कोथिंबीर बारीक चिरून ,
तिखट ,
हळद ,
मीठ .

क्रमवार पाककृती: 

चिकन ३ पाण्यात धुवून घ्यावे . त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे . ३ ते ४ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे .

शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय भाज्यांमध्ये तेलाची तर्री ठेवत असल्यामुळे तेल जास्त टाकतात ) .

तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी , धने आणि इतर जिन्नस असलेली पेस्ट घालून परतावे , त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी .

त्यात बारीक चिरलेली मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून मग ६ चमचे तिखट , दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवून घेताना टाकलेल्या मिठाचा अंदाज घ्यावा ).

आता त्या फोडणीत १/२ पेला पाणी टाकून झाकण ठेवावे . २ मिनिटात फोडणी आणि त्यातले तेल (तर्री ) वेगळे
झालेले दिसेल . त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे . २ ते ३ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे .

आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे . ५ मिनिटांनी वाढावयास घ्यावे .
DSC06152.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

विदर्भात चिकन मधे रस्सा हा घट्ट न ठेवता पातळ ठेवतात . घट्ट रस्सा ठेवायचा असल्यास मसाल्यांचे प्रमाण कमी करावे .
इथे लोक तेज खातात (तिखट नाही) म्हणून प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मसाले आणि तिखट कमी जास्त करावं … पहिला घास घेतल्यावर ठसका लागून पाणी प्यायची वेळ आल्यास माझ्यावर नाव नाही रे बा !

माहितीचा स्रोत:
आप्पाजी (आईचे वडील)
varhadi chicken

माहितीचा स्रोत: 
आप्पा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ चमचे तिखट हे वाचूनच ठ्सका लागला Happy इन्टरेस्टिंग आहे पण, थोडे ़ कमी तिखट घालून का होइना, पण करेन Happy
कलमी म्हणजे काय?

मस्त!!
ठसका लागणारं, नाकाडोळ्यातून पाणी काढणारं झणझणित चिकन खाऊन "य" वर्षं झालीत. फोटॉवरून तरी हे त्याच कॅटेगरीतलं वाटतंय. नक्की करणार.

"चक्कीत जाळ" म्हणतात कोल्हापुरात... तशीच मस्त झणझणीत असणार चव. फोटो बघूनच स्सं झालंय Happy

अरे बापरे!

ताट खतरा आहे.
ते वरती असलेल्या तेलाचं काय करता? ते पण खायचं ( प्यायचं) का?
़ खरच प्रश्ण पडलाय. Happy

साती , rmd >> धन्यवाद Happy

कलमी म्हणजे दालचिनी - अगदी बरोबर (मध्य भारतात वसलेल्या विदर्भाची मिश्र संस्कृती ) Wink

अल्पना , अमेय२८०८०७ >> हि भाजी खाताना रुमाल / टॉवेल जवळ हवाच … तो लागणार नसेल तर भाजी जमली नाही अस म्हणतो आम्ही Proud

झंपी >> आधी लिहिल्याप्रमाणेच वैदर्भीय भाज्यांमध्ये तर्री असतेच … पिण्या इतपत जास्त होत नाही ती त्यामुळे काळजी नसावी … Wink

खतरनाक दीसून रायलं थे. . एकस नंबर !! द्या धाडून इकडे जरासक.
मस्त. . तिकडची आठवण आली. रेसिपी इथे दिल्याबद्दल धन्यावाद.

स्स्स्स्स्स.......... खतर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्नाक!!!!!!!!!!!!

काय रंग आहे आहाहा... टीना कहाँ रहती हो?????????????? Lol

कझिन ने वर्‍हाडी मसाला पाठवलाय.. विदर्भ मसाला म्हंजे हाच का??

लव दॅट ,' जाल्लिम तिखट सावजी' करीज... तो प्रकार पण वर्‍हाडातलाच का????????

वर्षू नील >>>
मी वैदर्भीयच , यवतमाळ ची …
३ वर्ष झाले पुण्यात असते . वऱ्हाडी मसाला ? बरेच प्रकार बसतात त्यात … हो सावजी मटण म्हणून तो प्रकार प्रसिद्ध आहे . नागपूर गेलात तर जागोजागी दिसेल . पण मसाले थोडेफार बदलतात . वरची डिश मला आप्पांनी शिकविली … ती पण चवीप्रमाणे vary होते .

धन्यवाद सर्वांना

बन्डु >>
प्रत्येकाच्या capacity वर ठरत काय होईल ते … आधीपासून तिखट खाऊन असल्यामुळे जाणवत नाही काही … फिक्क असेल तर उलट तोंडात फिरत माझ्या … एखादवेळी पुरेपूर कोल्हापूर मधे गेली तरी त्याहून जास्त तिखट करा असं सांगणारी आहे मी … sollidd लूक असतो त्यांच्या बघण्याचा Proud

आभार सर्वांचे

श्रीयू >>> मेथी मसाल्यामुळे तेज झालेल्या भाजीला माइल्ड करते आणि टेस्ट मधे पन फरक पडतो त्याने … आप्पांचा special टच … म्हणू शकतो सगळेच लोक मेथी टाकत नाही Happy

Lol
मी नॉनव्हेज मद अंड कस्सच नाई खात अन मायीवाली एक मैत्रीण मासमच्छी नाई खात .. म्हणुन हे..
याले मनते सुवर्णमध्य Proud

Pages