वऱ्हाडी चिकन - varhadi chicken

Submitted by टीना on 7 June, 2014 - 13:06
varhadi chicken
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १ किलो ( Skin काढून ) ,
तेल - १ मोठी वाटी ,
कांदा - २ मोठे चिरून थोडे तेलावर भाजून पेस्ट केलेली ,
लसूण - २ मध्यम आकाराचे गड्डे ,
हिरव्या मिरच्या - ४ ,
अद्रक / आलं - बोटाच्या २ पेरा एवढा तुकडा ,
(आलं ,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा डोल - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले ,
जिरे - १ चमचा ,
दगडफूल ( प्रमाण बोटाची २ पेर ) ,
कलमी - बोटाएवढा १ तुकडा ,
मिरे - ८ ते १० ,
लवंग - ५ ते ६ ,
विलायची - ३ ,
धने - १० ग्रॅम किंचित तेलात भाजून (+दगडफूल + मिरे + लवंग + विलायची + कलमी +जिरे ) बारीक केलेले ,
हिरव्या मेथी च्या ८ १० काड्यांची पाने बारीक चिरून ,
कोथिंबीर बारीक चिरून ,
तिखट ,
हळद ,
मीठ .

क्रमवार पाककृती: 

चिकन ३ पाण्यात धुवून घ्यावे . त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे . ३ ते ४ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे .

शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय भाज्यांमध्ये तेलाची तर्री ठेवत असल्यामुळे तेल जास्त टाकतात ) .

तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी , धने आणि इतर जिन्नस असलेली पेस्ट घालून परतावे , त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी .

त्यात बारीक चिरलेली मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून मग ६ चमचे तिखट , दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवून घेताना टाकलेल्या मिठाचा अंदाज घ्यावा ).

आता त्या फोडणीत १/२ पेला पाणी टाकून झाकण ठेवावे . २ मिनिटात फोडणी आणि त्यातले तेल (तर्री ) वेगळे
झालेले दिसेल . त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे . २ ते ३ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे .

आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे . ५ मिनिटांनी वाढावयास घ्यावे .
DSC06152.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

विदर्भात चिकन मधे रस्सा हा घट्ट न ठेवता पातळ ठेवतात . घट्ट रस्सा ठेवायचा असल्यास मसाल्यांचे प्रमाण कमी करावे .
इथे लोक तेज खातात (तिखट नाही) म्हणून प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मसाले आणि तिखट कमी जास्त करावं … पहिला घास घेतल्यावर ठसका लागून पाणी प्यायची वेळ आल्यास माझ्यावर नाव नाही रे बा !

माहितीचा स्रोत:
आप्पाजी (आईचे वडील)
varhadi chicken

माहितीचा स्रोत: 
आप्पा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर दिलेल्या मसाल्यांशिवाय इतर कोणताचमसाला घालायचा नाही का? गरम/काळा मसाला पण नाही?
आणि तेल एव्हढं घालावेच लागते का?
वरील मसाला प्रमाण एक पूर्ण चिकन साठी आहे का?

आणि तेल एव्हढं घालावेच लागते का?>>>>>>
१ किलो चिकनसाठी २ लवंगा,६ मिरी,१ वेलची एवढाच बदल मी केला.तसेच तेलही थोडेसे कमी घालते,बाकी टिनाची रेसिपी फॉलो करते. झकास होते

काल हे चिकन केलं. खूप भारी रेसिपी ! मस्त झालं एकदम.
दगडफूल नव्हतं आणि मेथी ऐवजी कसुरीमेथी घातली. तेल इथे दिल्यापेक्षा कमी घातलं अर्थातच आणि तिखट सोसवतं इतपतच घातलं.

मला लसुण थोडं कमी असतं तरी चाललं असतं असं वाटलं. इथे अमेरिकेत करणारे पूर्ण दोन गड्डे लसुण घालता का? की जरा कमी ?

थंडीत खायला भारी वाटलं एकदम. Happy

टीनातै, तुमची रेस्पी आमच्या घरात एकदम पॉप्युलर झाली की सतत तीच करून मी कंटाळले.सुक्के चिकन ची रेस्पि असंल तर टाका की.

पग्या, मी बहुधा १ मोठा गड्डा लसूण वापरते. २ लागत नाहीत मलाही.
दगड्फूल वापर नेक्सट टाइम ,सहज मिळेल तुला पटेल मधे वगैरे. त्याने वेगळा स्वाद येतो.

कालच बनवले होते! अर्धा किलो चिकनला एक किलोच्या हिशेबात रस्सा केला होता दीड दोन ग्लास रस्सा मारला निवांत अन मग थंडीसाठी घातलेले थर्मल अन स्वेटर काढून टाकले होते असे कानफटं गरम झाले होते, बायको घरुन परत येताना दगडफूल घेऊन आली होती त्यामुळे काल रेसिपी मधे न कुछ कम न कुछ ज्यादा!

ऐसा रस्सा परत होणे नाही ओ टीना माय! __/\__

पराग, अमेरिकेतले लसण म्हणजे एकच गड्डा लागेल अस वाटतय..

देवकी, सुक्क चिकन.. टाकते नंतर..

त्याने वेगळा स्वाद येतो.>>मैत्रेयी , सौ टके कि बात..

लगे रहो बापू..

दी अल्केमिस्ट, नक्की बनवा ..

Happy

IMG_1189[1].JPG

केलं...जबरी झालं. आधी एकदा केलेलं पण मला वाटतं दगडफूल जास्त घातलं गेलं तेव्हा, त्यामुळे थोडी उग्र चव आलेली. यावेळी परफेक्ट झालं...मस्त एकदम!
मी कांदा-खोबरं एकत्र भाजून, सगळे गरम मसाले भाजून मिक्सरमध्ये कांदा-खोबरं, गरम मसाल्याचे पदार्थ व आलं-लसूण-मिरची - सगळं एकत्रच वाटलं.
तेल आणि तिखट सोसेल इतपतच घातले Happy

रायगड आणि शितल मस्तच जमलय.. Happy
आता मलापन खायची हुक्की आलीए..
तूर्तास हे फोटो बघा..

बहिणीकडे सोलापूरला गेली तेव्हा वर्‍हाडी चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं केलं होतं ते.. आणि नंतरही एक दोनदा चिकन सुक्कं केलेलं..


.
.

माबोवर लिहायचा कन्टाळा ,

नही चलेगा नही चलेगा

येऊ द्या लवकर
इथे दोन पेले लाळेने भरून गेलेत प्रचि पाहून Wink

ओ टीना बै
ते फटू गुगल ड्राइव्हवरून दिसून नाई र्‍हाय्ले.

ओ टीना बै
ते फटू गुगल ड्राइव्हवरून दिसून नाई र्‍हाय्ले.>> आब्बा.. आस कस.. एकदा क्रोमात जाउन बगा बर..

रायगड आणि शितल, मस्त फोटो.

शितल, तुमच्या फोटोतल्या भाकर्‍या कसल्या खास दिसत आहेत. तडक जेवायला बसावंसं वाटावं इतक्या सुंदर.

शीतल., फोटो कसले ला़ळगाळू आहेत. आता मला परत या वीकांताला बन्वावं लागेल हे चिकन!

टीने, फोटू दिसेना!

Pages