वऱ्हाडी चिकन - varhadi chicken

Submitted by टीना on 7 June, 2014 - 13:06
varhadi chicken
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १ किलो ( Skin काढून ) ,
तेल - १ मोठी वाटी ,
कांदा - २ मोठे चिरून थोडे तेलावर भाजून पेस्ट केलेली ,
लसूण - २ मध्यम आकाराचे गड्डे ,
हिरव्या मिरच्या - ४ ,
अद्रक / आलं - बोटाच्या २ पेरा एवढा तुकडा ,
(आलं ,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा डोल - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले ,
जिरे - १ चमचा ,
दगडफूल ( प्रमाण बोटाची २ पेर ) ,
कलमी - बोटाएवढा १ तुकडा ,
मिरे - ८ ते १० ,
लवंग - ५ ते ६ ,
विलायची - ३ ,
धने - १० ग्रॅम किंचित तेलात भाजून (+दगडफूल + मिरे + लवंग + विलायची + कलमी +जिरे ) बारीक केलेले ,
हिरव्या मेथी च्या ८ १० काड्यांची पाने बारीक चिरून ,
कोथिंबीर बारीक चिरून ,
तिखट ,
हळद ,
मीठ .

क्रमवार पाककृती: 

चिकन ३ पाण्यात धुवून घ्यावे . त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे . ३ ते ४ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे .

शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय भाज्यांमध्ये तेलाची तर्री ठेवत असल्यामुळे तेल जास्त टाकतात ) .

तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी , धने आणि इतर जिन्नस असलेली पेस्ट घालून परतावे , त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी .

त्यात बारीक चिरलेली मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून मग ६ चमचे तिखट , दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवून घेताना टाकलेल्या मिठाचा अंदाज घ्यावा ).

आता त्या फोडणीत १/२ पेला पाणी टाकून झाकण ठेवावे . २ मिनिटात फोडणी आणि त्यातले तेल (तर्री ) वेगळे
झालेले दिसेल . त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे . २ ते ३ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे .

आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे . ५ मिनिटांनी वाढावयास घ्यावे .
DSC06152.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

विदर्भात चिकन मधे रस्सा हा घट्ट न ठेवता पातळ ठेवतात . घट्ट रस्सा ठेवायचा असल्यास मसाल्यांचे प्रमाण कमी करावे .
इथे लोक तेज खातात (तिखट नाही) म्हणून प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मसाले आणि तिखट कमी जास्त करावं … पहिला घास घेतल्यावर ठसका लागून पाणी प्यायची वेळ आल्यास माझ्यावर नाव नाही रे बा !

माहितीचा स्रोत:
आप्पाजी (आईचे वडील)
varhadi chicken

माहितीचा स्रोत: 
आप्पा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं, (बिनतेलाच्या, कमी तिखट, अर्थात पथ्याच्या) वर्‍हाडी चिकनला चुलीवर केल्याचा स्मोकी फ्लेवर कसा द्यावा?


कोळसा पेटवा. व वाटीत ठेवा

त्यावर थेंबभर तूप टाका. चाणाक्ष नजरांना फोटोत पकडलेला धूर दिसेलच.

कोळशासकट वाटी चिकनमधे ठेवा.

हे सगळं कंत्राट २-४ मिनिटं झाकून ठेवा.
टीप : शेवटच्या फोटोतला पातेल्याखालचा गॅस बंद आहे.
चिकनची रेस्पी संपूर्ण फॉलो केली आहे, फक्त रंगीत तर्रि बनू दिली नाही. चव सुंदर होती. पोटात अ‍ॅसिडीटी झाली नाही.

दि मा..
मस्तच.. स्मोकी फ्लेवर द्यायला मी पन सेम स्टेप करते..
पण राजस्थानी चिकन मसाला करताना.. तिकड पण भयंकर तेल , तुप, तिखट खातात..
ती भाजी तेल तुप दोन्ही मधे बनवतात..लागते पन सॉल्लीड्ड..
मी केलीए तयार..

बापा सासुरवाड़ी आठवली मले तर! आपल्याइकळे जावयाले रावसाहेब म्हांतेत तिकडे पावणेसा म्हणतेत! मांडव परतनी ले गेलतो तवा बेज्या खाऊ घालत केर सांगरी ची भाजी (केर म्हणजे आपल्याकडे भेटतात ते केरं लोनचे बनते त्याचे अन सांगरी म्हणजे शमीच्या झाडाच्या वाळवलल्या शेंगा) गट्टे साग गट्टे पुलाव ४० टाइप ची मिठाई प्याज कचौरी लाल मांस रेत वाला गोश्त अन काय काय! सगळे सारे तुपात!!!

दीमा,
मस्तं आहे हा प्रकार. कधी गरज नाही पडली किंवा असं काही करून छान होईल माहीत नव्हतं. करून बघेन नक्की.

आजचा रस्सा...

श्रावणसमाप्तीच्या शुभेच्छा लोक्स..

मुद्दाम मोठा ठेवला Wink Lol Proud

वा!

टीना,
आज तुझी रेसिपी बनवली.(कमी तेलात आणि कमी तिखटात+ कमी मसाल्यात) .पण चिकन मस्त दिसतेय आणि वासही मस्त येतोय.खोबरं नाही टाकलं(आयत्यावेळी मिक्सरने राम म्हटला) पण झकास दिसतंय.
मागे तुझ्या पद्धतीने केलेले चिकन, पंजाबी शेजारणीला दिले होते.तिच्या मुलाने आवर्जून तुझी रेसिपी घेतली आहे. त्याला खूप आवडले म्हणाला.

आली का परत वर रेसेपी. या रेसेपीसाठी मुद्दाम दगडफुल मागवून घेतलं होतं. या आठवड्यात करणार नक्की.

अरे व्वा देवकी मस्तच.. फोटो टाकायचा न इथं..

डीविनिता, नवी व्हेज रेस्पी दिलीय गो Wink
वाचली बा बुक्की पासुन..
हि बघ रिक्षा टकतेय इथपन.. http://www.maayboli.com/node/55953

काय सांगू बाप्पा, लय पानी सुटुन राहिलं तोंडाले.
या चिकनच्या भाजी संग, वरतून टाकाले सांभार, आन लिंबु, बुक्की मारुन फोडलेला कांदा पायजेच.

त.टी.: सांभार म्हणजे कोथिंबिर.

केलं गं टिना शेवटी एकदाचं. पण तरी तुझी रेसेपी पुर्ण फॉलो नाही करता आली. आमच्या घरातले दिड मेंबर तिखट न खाणारे आहेत. हाफ तिकिट तर अजिब्बात तिखट खात नाही. त्याला थोडं आलं-लसणाचं वाटण, धण्याची पुड आणि वाटलेलं खोबरं घातेलला रस्सा आणि चिकन लागतं. त्यामूळे फक्त हळद आणि मीठ घालून शिजवायच्या ऐवजी हे सगळं थोडंसं घालून आणि पाणी घालून चिकन शिजवून घेतलं. त्याच्या पुरते पिसेस आणि सगळं पाणी बाजूला काढून मग बाकी सगळं तुझ्या पद्धतीने आणि प्रमाणात केलं. (चिकन अर्धा किलो पेक्षा कमीच असल्याने मसाल्यांचं प्रमाण निम्मं ठेवलं होतं) फक्त तेलं मात्र कमीच घेतलं.

मसाला खूप आवडला मला. पण माझ्या मिक्सरमध्ये खूप बारीक वाटण झालं नाही, सगळ्याच गोष्टी कमी असल्याने. पुढच्या वेळी मी चार वेगवेगळी वाटणं न करता सगळे पदार्थ एक एक करत मिक्सरमध्ये अ‍ॅड करत एकच वाटण करेन. बघू चवीत किती फरक पडतो ते.

अजून उकळतंय चिकन. त्यामूळे फोटो नंतर.

edited_1447613312300.jpg
Aaj hya recipe ne chicken Karun pahila. Apratim jhala. Thanks Tina for this recipe.

मिनी, जहबहरी दिसतय!

सोन्याबापु, तुमच्या सासरचा पत्ता दया Lol

Pages