वऱ्हाडी चिकन - varhadi chicken

Submitted by टीना on 7 June, 2014 - 13:06
varhadi chicken
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - १ किलो ( Skin काढून ) ,
तेल - १ मोठी वाटी ,
कांदा - २ मोठे चिरून थोडे तेलावर भाजून पेस्ट केलेली ,
लसूण - २ मध्यम आकाराचे गड्डे ,
हिरव्या मिरच्या - ४ ,
अद्रक / आलं - बोटाच्या २ पेरा एवढा तुकडा ,
(आलं ,लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट)
सुक्या खोबऱ्याचा डोल - अर्ध्यापेक्षा थोडा कमी छोटे तुकडे भाजून बारीक केलेले ,
जिरे - १ चमचा ,
दगडफूल ( प्रमाण बोटाची २ पेर ) ,
कलमी - बोटाएवढा १ तुकडा ,
मिरे - ८ ते १० ,
लवंग - ५ ते ६ ,
विलायची - ३ ,
धने - १० ग्रॅम किंचित तेलात भाजून (+दगडफूल + मिरे + लवंग + विलायची + कलमी +जिरे ) बारीक केलेले ,
हिरव्या मेथी च्या ८ १० काड्यांची पाने बारीक चिरून ,
कोथिंबीर बारीक चिरून ,
तिखट ,
हळद ,
मीठ .

क्रमवार पाककृती: 

चिकन ३ पाण्यात धुवून घ्यावे . त्यातील पूर्ण पाणी काढून टाकावे . ३ ते ४ चमचे तेलात १/२ छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकून मध्यम आचेवर १० मिनिट झाकण ठेवून शिजवावे .

शिजल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पातेल्यात तेल टाकावे (वैदर्भीय भाज्यांमध्ये तेलाची तर्री ठेवत असल्यामुळे तेल जास्त टाकतात ) .

तेल गरम झाल्यावर त्यात तेलावर भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकावी , त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकावी , धने आणि इतर जिन्नस असलेली पेस्ट घालून परतावे , त्यापाठोपाठ भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी .

त्यात बारीक चिरलेली मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून मग ६ चमचे तिखट , दीड मोठा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे (चिकन वाफवून घेताना टाकलेल्या मिठाचा अंदाज घ्यावा ).

आता त्या फोडणीत १/२ पेला पाणी टाकून झाकण ठेवावे . २ मिनिटात फोडणी आणि त्यातले तेल (तर्री ) वेगळे
झालेले दिसेल . त्यात वाफवून शिजवलेले चिकन टाकून हलवून घ्यावे . २ ते ३ पेले पाणी टाकून त्यास १० ते १२ मिनिट मध्यम आचेवर उकळू द्यावे .

आच बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ताबडतोब त्यावर झाकण ठेवावे . ५ मिनिटांनी वाढावयास घ्यावे .
DSC06152.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ लोकांसाठी
अधिक टिपा: 

विदर्भात चिकन मधे रस्सा हा घट्ट न ठेवता पातळ ठेवतात . घट्ट रस्सा ठेवायचा असल्यास मसाल्यांचे प्रमाण कमी करावे .
इथे लोक तेज खातात (तिखट नाही) म्हणून प्रत्येकाच्या चवीप्रमाणे मसाले आणि तिखट कमी जास्त करावं … पहिला घास घेतल्यावर ठसका लागून पाणी प्यायची वेळ आल्यास माझ्यावर नाव नाही रे बा !

माहितीचा स्रोत:
आप्पाजी (आईचे वडील)
varhadi chicken

माहितीचा स्रोत: 
आप्पा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निसर्गचक्र, धन्यवाद..

दिवीजा, सावजी चिकन मटन च्या डिशेश मधे अस करतात..

माझ्याकड आप्पा धुतलेले तांदुळ सुकवून मग भाजुन घेतात आणि त्याची बारिक पिठी करुन सुद्धा टाकतात पण त्यामुळे जरा माईल्ड होते भाजी म्हणुन मी नै टाकत Wink

जब्बरदस्त दिसत आहे ते चिकन! तेल बघून पुंग्या ताईट झाल्या पण कधी कधी (म्हणजे ३-४ महिन्यातून एकदा) चालतं.

शनिवारी केलं हे चिकन. चार वेग वेग़ळी वाटणं - मिक्सर होता म्हणुन बरं. नायतर काय खरं नाही .
चिकन आधी बिनमसाल्याचं शिजवायचं म्हणून जरा कसंसंच होत होतं . पण सगळे मसाले घातल्यावर मस्त मुरली चव.

हा प्रकार करायचा म्हणून मुद्दाम अख्खं चिकन आणून केलं त्यामुळे पण मस्त चव आली.

प्लीज राइट धिस इन इंग्लिश इन माय रेसिपी बूक अशी फर्माइश आलीय बार्क्या शेफ कडून.

अजून खास वर्‍हाडी रेसिप्या येऊ द्यात .

जबरदस्त चिकन वो माय...
लै जाळ दिसू र्हायला!
माह्या आईला सांगाव लागन येकदा कर आसं चिक्कन.
ती बी उम्रावतीची हाये ना.

नाय तं म्याच करतू आता!

फोटो मुळे तं खलासच वो पोरी.
फकस्त तुह्या या चिकनले दाद देयाला लॉग इन झालो वो!

आभार सर्वांचे..

मेधा सहिच..

निनाद,
माझ्या दादाच नाव आहे..धन्यवाद..

झंपी, Lol

मीच तो, येउदेत फोटो..

मस्त लागेल ती पन मामी..
अंडाकरी करताना धुवुन भाजलेल्या तांदळाच पिठ किंवा डाळवा टाक म्हणजे रस्सा जास्त छान लागेल Happy

इतके प्रतिसाद वाचल्यावर मी काय प्रतिसाद देणार बापडी... अंडेच केवळ खात असल्याने, अंडाकरी करणे भाग आहे
आता डाळवा म्हणजे काय?

डाळवा /डाळवं /पंढरपुरी डाळं .

मला पण करून बघायचंय या रेसेपीने चिकन. दगडफुल नाहीये म्हणून थांबले होते. पण आता त्याशिवायच करते. पेरभर दगडफुलाने फारसा फरक नाही पडणार बहूतेक.

झणझणीत मस्त दिसतंय.
चिकन १० मिनिटं वाफवल्यावर शिजतं की नंतर मसाल्यात टाकल्यावर पुन्हा शिजवायचं असतं? मी घरी कधीच केलं नाही, वेळ आलीच तर माहीत असावं म्हणून विचारतेय.

अल्पना,
दगडफुलाने चवीत खुप फरक पडतो..खुप जास्त..

आशुडी,
चिकन १० १२ मिनीट मधे वाफेवर व्यवस्थित शिजत..त्यानंतर त्याचा अर्क रस्स्यात उतरण्यासाठी आणि रस्सा शिजण्यासाठी आणखी ५ ७ मिनिट एकत्र शिजु द्यायच.. Happy

आमची अंडाकरी तयार आहे.

दगडफूल नव्हतं. त्यामुळे ते ऑप्शनला टाकलं.
मेथी ताजी नव्हती. त्याऐवजी कसुरी मेथी घातली.
सुकं खोबरं आणलं की किसून, भाजून स्टीलच्या डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवते. त्यामुळे ते सहज उपलब्ध होतं.
वाटण वाटताना आधी मिक्सरमध्ये सुक्या मसाल्याचं वाटण वाटलं. त्यातच सुकं खोबरंही वाटलं. मग त्यातच आलं, लसूण, मिरची घालून पुन्हा एकदा फिरवलं. भाजलेला कांदा फक्त वेगळा वाटला म्हणून वेगळा वाटला. अशा तर्‍हेने दोन वाटणात आटपलं.
४ तिखट मिरच्या वाटणात घेतल्यानं तिखट आधी फक्त दीड चमचा (मिसळणीच्या डब्यातला छोटा चमचा हं) आणि वर्‍हाडी फील यावा म्हणून वर पाव चमचा टाकलं.
तेल मात्र तीन (टीस्पून) चमच्यांच्यावर टाकवलं नाही. त्याबद्दल क्षमस्व. Happy

अप्रतिम चव आली आहे. मस्त खमंग, मसालेदार.
यात यथावकाश बटाटे, पनीर घालून बघणेत एईल.

Pages