ये क्या जगह दोस्तों...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज आमच्या कंपनीतर्फे आम्ही २०/२५ स्वयंसेवकांनी एका NGO ला भेट दिली. वृक्षारोपण, सौरदिव्यांचं रोपण, तिथल्या मुलींसाठी घेतल्या गेलेल्या मेहंदीवर्ग, सौंदर्य प्रसाधन, संगणक वर्ग, इ. वर्गांमध्ये सहभाग घेतला. कंपनीने त्यांच्या सध्या चालू असलेल्या/ नजीकच्या काळात सुरू होऊ घातलेल्या नियोजित प्रकल्पांकरताच्या खर्चाचा काही वाटा उचलला.

ही NGO बोईसरमध्यल्या ५० एकर जागेत वसली आहे. वेश्या व्यापाराला बळी पडलेल्या निष्पाप मुलींची वेश्यावस्तीवर धाड टाकून त्यांची तिथून रितसर सुटका करून आणून इथं त्यांचं पुनर्वसन केलं जातं. अशा मुलींच्या पालकांचा ठावठिकाणा शोधून काढून मुलींना पुन्हा त्यांच्या स्वाधीन करताना आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य केलं जातं. अशा मुलींमध्ये बहुतांश मुली या नेपाळ, बांग्लादेशातल्या असतात. काहींना त्यांच्या लग्नाच्या नवर्‍यानेच तर काहींना भावी जोडीदारानेच विकलेलं असतं. या संस्थेत आल्यावर त्यांची आवश्यक ती शारीरिक तपासणी केली जाते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं अशा मुलींना/स्त्रीयांना मानसिक धक्क्यातून आणि प्रचंड दडपणाखालून बाहेर काढलं जातं. HIV संसर्ग झालेल्यांना इथं उपचार सुरू केले जातात. गर्भपात, प्रसुती यांची तरतूद केली जाते.

आम्ही इथं जाण्याआधी थोडीफार तोंडओळख करून गेलो होतो. पण प्रत्यक्ष भेट दिल्यावर या सगळ्याची प्रखरता कितीतरी पटींनी जाणवली. अशा मुलींसोबत काम करताना, त्यांच्याशी बातचित करताना मन सुन्न होऊन जातं. बारा ते अठरा वर्षांदरम्यानच्या, तारुण्यात पदार्पण करू पाहणार्‍या या मुलींच्या डोळ्यांत भविष्याची स्वप्नं दिसण्याऐवजी त्यांच्या वाट्याला अमानुष वासनेचा बळी, गर्भपात, बाळंतपणं, सिगारेटचे चटके आणि कसले कसले शारीरिक छळ आलेले बघून मन बधीर होते. या मुली इथं येण्यापूर्वी त्यांनी नेमकं काय काय सहन केलं असेल याची कल्पना केली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. बाराव्या वर्षी माता झालेल्या आणि त्या बाळाची जबाबदारी सर्वस्वी स्वतःवर येऊन पडलेल्या मुलीने भविष्याकडे काय म्हणून बघायचे? ड्रग्जच्या अंमलाखाली रस्त्यावर आणून टाकल्या गेलेल्या आणि तिथून इथं आणल्या गेलेल्या पण आता मागचा भूतकाळ अजिबात न आठवणार्‍या, नृत्यकलेत सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या मुलीने जगण्याची कुठून सुरुवात करावी? पालकांचा ठावठिकाणा लागलाय पण लोकभयानं ते तिला इथून घेऊन जायला तयार नसलेल्या मुलीने कोणाला जवळ करावे? तेरा चौदाव्या वर्षी HIV ग्रस्त झालेल्या मुलीने कोणाला दोषी धरायचे? आम्ही तिथे असतानाच बाहेरून एका नावाचा पुकारा झाला. तर लगेच आपापल्या कामात मग असलेल्या मुली कार्यशाळेतून भराभर उठून आवाजाच्या दिशेने धावल्या. कदाचित आपल्याच घरच्यांकडून फोन आला असेल या आशेनं.

इथं मुलींना आणल्यानंतर बाकीच्या कायदेशीर बाबी निपटतानाच या मुलींना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उपचारांची तजवीज करण्यात येते. एकदा त्यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या शालेय शिक्षणाच्या पूर्ततेबरोबरच, संगणक शिक्षण, कराटे शिक्षण, विविध हस्तकला, ब्युटीपार्लर कोर्सेस, मेहंदी कोर्सेस, खेळांचं शिक्षण, शेतीविषय कामांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण इ. देऊन त्यांना स्वावलंबी केलं जातं, असं सांगण्यात आलं. बांग्लादेशातल्या मुलींना परत स्वगृही गेल्यानंतर बहुतेकदा शेतीशिवाय दुसरा पर्याय नसतो म्हणून त्या मुलींकरता खासकरून शेतीमधल्या कामांत जास्त लक्ष दिले जाते.

ही संस्था बालकृष्ण आचार्य यांनी २००० मध्ये स्थापन केली. २००५ मध्ये त्यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्रिवेणी आचार्य या ह्या संस्थेचं कार्य पुढे चालवत आहेत.

http://www.rescuefoundation.net/ ही या संस्थेची वेबसाईट आहे. तिथे अधिक माहिती वाचता येईल, फोटो गॅलरी बघता येईल.

जरूर वाचा आणि बघा.

If anyone wants to support to the NGO at their individual capacity, they can get in touch with Mr Mahesh Ruparelia (projects@rescuefoundation.net/ 9619401637)

प्रकार: 

"ये क्या जगह है दोस्तो...." शहरयार यांची ही रचना या पूर्वी ऐकली/वाचली होती. एका तरुणीची वेदना त्यात प्रकटते आणि एके ठिकाणी ती म्हणते "बुला रहा है कौन मुझ को, चिलमनो के उस तरफ, मेरे लिये भी क्या कोई, उदास बेकरार है...." ~ श्री.गजानन यांचा लेख वाचल्यावर उमजते की अशा एक नाही अनेक अल्पवयीन आणि दडपशाहीने वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागणार्‍या उमरावजानना आशा आहे की त्यानीही म्हणावे "मेरे लिये भी क्या कोई, उदास बेकरार है...". त्याना एकप्रकारच्या नरकातून वाचविण्यासाठी, शारीरिक हालअपेष्टातून सोडविण्यासाठी "रेस्क्यू फाऊंडेशन" अथकपणे झटत आहे. लेखातून संस्थेच्या कार्याची ओळख झाली, त्याशिवाय त्यांच्या वेबसाईटवरून पूर्ण माहिती मिळते...विशेषत; आचार्य पतीपत्नी करीत असलेले सामाजिक कार्य तर समोर येतेच शिवाय रेड लाईट एरियात प्रत्यक्ष जाऊन मनाविरूद्ध वेश्याव्यवसायात यावे लागलेल्या मुलींना तेथून सोडवून आणणे आणि केन्द्रात दाखल करणे...यातील जे संभाव्य धोके आहेत त्यानाही नीडरपणे सामोरे जाणे याबाबत तर त्यांचे, पोलिस मदतीचे, सहकार्‍यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच.

लेख आणि फोटोगॅलरी या विभागावरून संस्थेच्या कार्याची व्याप्ती ठळकपणे समोर येते.

तुमच्या लेखात "...कंपनीने त्यांच्या काही प्रकल्पांकरताच्या खर्चाचा वाटा उचलला...." असा सुरुवातीला उल्लेख आहे. व्यक्तिगत पातळीवर मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम त्याना दिली तर ते घेतात का ? असेल तर संबंधित माहिती तुम्ही इथे द्याल ?

<< या मुली इथं येण्यापूर्वी त्यांनी नेमकं काय काय सहन केलं असेल याची कल्पना केली तरी मेंदूला झिणझिण्या येतात. बाराव्या वर्षी माता झालेल्या आणि त्या बाळाची जबाबदारी सर्वस्वी स्वतःवर येऊन पडलेल्या मुलीने भविष्याकडे काय म्हणून बघायचे? ड्रग्जच्या अंमलाखाली रस्त्यावर आणून टाकल्या गेलेल्या आणि तिथून इथं आणल्या गेलेल्या पण आता मागचा भूतकाळ अजिबात न आठवणार्‍या, नृत्यकलेत सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या मुलीने जगण्याची कुठून सुरुवात करावी? पालकांचा ठावठिकाणा लागलाय पण लोकभयानं ते तिला इथून घेऊन जायला तयार नसलेल्या मुलीने कोणाला जवळ करावे? तेरा चौदाव्या वर्षी HIV ग्रस्त झालेल्या मुलीने कोणाला दोषी धरायचे? >>

अस्वस्थ करणारे प्रश्न. यांची अंशतः का होईना उत्तरे मिळवण्यासाठी झटत असलेल्यांना मनापासून अभिवादन.

शीर्षक किती समर्पक निवडलं आहे ! >>> +१ (आज माझा अगो ला +१ द्यायचा दिवस दिसतोय Happy )

गजा, आपल्या बर्‍यापैकी सुरक्षित आणि बेसिक गरजा व्यवस्थित पुरवल्या गेलेल्या आयुष्या व्यतिरिक्त अशी आयुष्य बघायला मिळाली तर आपल्या पलिकडे काय जग आहे हेही कळते.

अशी एखादीची कहाणी वाचण्यात येते त्यावेळी वाटते, एखादीच असेल तशी.. पण ती तशी एखादीच नसते.
आज जगभरात फ्लेश ट्रेड ने भयावह रुप घेतलेले आहे. कल्पनाही करवत नाही एवढ्या प्रमाणावर हे चाललेले आहे.
अशा संस्था जितक्या निर्माण होतील तेवढ्या थोड्याच.

नमस्कार,

प्रतिसादांबद्दल आभार.

अशोकमामा, वैयक्तिक पातळीवर दिलेली मदत देणगी घेत असावेत. वर दिलेल्या वेबसाईटीवर वरच्या बाजूला 'DONATE NOW' असा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यावर या रेस्क्यू प्रक्रियेतल्या वेगवेगळ्या कामांची यादी येतेय. त्यातल्या कोणत्या कामासाठी देणगी देऊ इच्छितो, तो पर्याय निवडल्यावर पुढे देणगी कोणकोणत्या मार्गे देऊ शकतो हे दिसतेय. (क्रेडिट कार्ड, पे पाल, धनादेश इ.) ते बघा. तिथे या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट लीडरचा इमेल आहे. त्यावरून आधी चौकशी करता येईल. हा ई-मेल अ‍ॅड्रेस आहे. admin@rescuefoundation.net

दरम्यान मलाही अधिक माहिती मिळाली मी तर इथे लिहीन.

गजानन, महत्वाची माहिती दिलीयेस. थोडक्यात पण कळकळीने लिहिलंयस.
संपर्क तपशीलाबद्दल वेगळे धन्यवाद. वेबसाईट पहाते, संपर्क करते.

अस्वस्थ वाटलं वाचून.
माहितीबद्दल धन्यवाद, गजाभाऊ.

अस्वस्थ वाटलं वाचून. नीट माहिती दिली आहेस. सुपंथ तर्फे काही मदत करता येईल का ह्यबद्दल बघायचेय का ?

धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
असामीला अनुमोदन.

वर्षाला सरासरी ३०० मुलींची सुटका हे लोक करतात.
वेबसाईटवरील फोटोंमध्ये रेडलाईट भागातलेही काही फोटो आहेत. त्यावरून तिथल्या अवस्थेची कल्पना येते.

सुपंथ तर्फे काही मदत करता येईल का ह्यबद्दल बघायचेय का ?<<< असामी, हो बघायला हरकत नाही. त्यासाठी काय करावे लागते? प्रोसिजर काय असते?

गजाननराव....

तुम्ही दिलेल्या admin@rescuefoundation.net या पत्त्यावर अ‍ॅडमिन याना मी मेल केली आहे. आज त्यांचे उत्तर आले की लागलीच पोस्टाने चेक पाठवून देतो.

साईटवरील विकल्प पाहिले. पण मला सर्वाधिक पोस्टाचाच मार्ग सोपा वाटतो. एकतर माझ्या घराशेजारीच पोस्ट ऑफिस आहे. शिवाय बॅन्केच्या त्या विविध सुविधा (कार्डस...सारख्या) माझ्याकडे नसल्याने अशी रक्कम पाठवायची झाल्यास चेकशिवाय अन्य मार्ग नाही.

रेस्क्यू फॉऊंडेशन समिती चेक स्वीकारतील अशी आशा आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यावर इथेही माहिती देतोच.

ह्या साईटची फोटो गॅलरी पाहिली.

रेडलाईट एरियामधले रुम्स आणि रस्त्यांचे फोटो बघवले नाहीत. ह्या धंद्याला कधीच मरण नाही म्हणून इतके जीव ह्यात ओढले जातात आणि त्यांची शरिरं/मनं जगण्याच्या लढाईत पाचोळा होऊन रहातात का? ह्या धंद्याला कारणीभूत असलेल्या अनकंट्रोल्ड वासना नामक राक्षस पोसणार्‍या समाजाच्या एका भागाची चीड आली. ग्राहक काही तासांसाठीच तिकडे मान वळवून बघतो आणि कार्यभाग साधला की उजळ माथ्याने पुन्हा उर्वरित समाजात मिसळून जातो. पण ह्या स्त्रियांचं काय? ह्यांच्या आरोग्यस्वास्थ्याचं काय? ह्यांच्या मनःस्वास्थ्याचं काय? ह्यांच्या जळून गेलेल्या स्वप्नांचं काय?

कवायत, प्रार्थना, कराटे, खेळ, शिवणकाम वगैरे करतानाचे फोटो आशादायी आहेत.

खूप खूप अस्वस्थ वाटलं काही वेळ. नंतर परत आपण आपापल्या उद्योगात रमून जाऊ, कुणालाच काडीचाही उपयोग नसलेल्या....फक्त स्वतःला आनंद मिळवून देणार्‍या छंदांमधे गुरफटून जाऊ. कारण आपलं विश्व तेवढंच. आपल्याच आजूबाजूला कित्येक काळोखे ग्रह असेच अनंत काळापर्यंत फिरत असतील. त्यांच्या कक्षा आपल्या कक्षेला कधी छेदत नसल्याने त्यांच्याकडे असं कधीतरीच आपलं लक्ष जाईल. थोडं चुकचुकू आणि परत आपल्या ऑर्बिटमध्ये फिरत राहू Sad . गिल्ट येतोय.

मला त्या साईटवरचे फोटो दिसत नाहीयेत.
सुन्न करणारे वास्तव आहे हे!
माहितीबद्दल धन्यवाद गजानन. त्यांना देणगीखेरीज इतर कोणकोणत्या मार्गाने - प्रकारे मदत करता येईल हेही कळू शकले तर बरे होईल.

अस्वस्थ वाटलं वाचून.
माहितीबद्दल धन्यवाद, गजाभाऊ. >>>>> +१०० ...

अशोकमामा, ओके.

अकु, पैशाव्यतिरिक्त आणखी काय मदत करू शकतो, हे कदाचित त्यांच्याशी संपर्क साधूनच कळेल.
अश्विनी, हम्म. ( त्या तारामाश्याच्या गोष्टीतल्यासारखे एखाद्याच्या आयुष्यात तरी आपण बदल थोडाफार बदल घडवून आणू शकतो. )

त्या तारामाश्याच्या गोष्टीतल्यासारखे एखाद्याच्या आयुष्यात तरी आपण बदल थोडाफार बदल घडवून आणू शकतो. >>> हो. जमेल तसं करायचंच Happy अश्या गोष्टींनी मनाला पडलेल्या पिळाचा एक वळसा तरी मुद्दाम सोडवायचा नाही. आपण आपल्यातच मश्गुल असलो तरी तो वळसाच कायम आठवण देत राहतो की बाई गं, तुझ्या पलिकडेही जग आहे आणि त्याची कायम आठवण ठेव.

गजाननराव....

रेस्क्यू फाऊंडेशनचे प्रोजेक्ट ऑफिसर श्री.अमिष नाथवानी यानी माझ्या पत्राची नोंद घेऊन लागलीच अगत्याने देणगी संदर्भात जादाची माहिती पाठविली आहे. त्यानुसार आज मी चेकने रक्कम पोस्टाद्वारे पाठविली आहे. मदतीसंदर्भात श्री.नाथवानी यानी खालील पत्ता व फोन नंबर दिला आहे. त्याचा वापर इथल्या कुणा सदस्यांना करायचा असेल तर ते करू शकतात :

Rescue Foundation, Plot No.39, Fatimadevi Road, Behind Our Lady of Remedy School,
Poisur, Kandivali (W), Mumbai - 400067, Maharastra, India.

Telephone : +91-22-28060707 / 28625240
Mobile : +91-98202 10705
E-mail : admin@rescuefoundation.net

( एक किरकोळ शंका : तुमच्या लेखात "बोईसर" असा उल्लेख आहे...तर अमिष यानी दिलेल्या पत्त्यात Poisur असे टंकलेले दिसले. दोन्ही ठिकाणे एकच का ? )

अशोकमामा, हे इथं नमूद केलंत हे बरं झालं. (मला नुसतं 'गजानन' म्हणून संबोधलंत तरी चालेल.)

पोयसर (जि. मुंबई) आणि बोईसर (जि. ठाणे) ही दोन वेगवेगळी ठिकाणं आहेत.

पोयसरला हेड ऑफिस आहे. बोईसरला विस्तारलेला बालिकाश्रम आहे. दिल्ली आणि पुण्यातही यांचं काम चालतं. इथे वाचता येईल. http://www.rescuefoundation.net/protective-home.html

आणि अशोकमामा, खरोखर धन्यवाद. इथे या संस्थेबद्दल मी लिहिलं ते चांगलंच झालं, म्हणायचं. तुम्हीही शक्य त्या लोकांना याविषयी सांगा (सांगतच असाल).

अस्वस्थ वाटलं वाचून.
माहितीबद्दल धन्यवाद, गजाभाऊ. >>>>> +१०० ...

Pages