हरवलेली कवितांची वही ...

Submitted by दुसरबीडकर on 8 May, 2014 - 17:39

हरवलेली कवितांची वही...
एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून
कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल
महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-
आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं
सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात
पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत
त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व
दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत
होते..
लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसारात
तिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवार
व्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिन
महिण्याची गरवार..काही बोलला हा की बिचारी काही न
बोलता गुपचूप टिपं
गाळायची..तो ड्युटीला गेला की मोकळ्या घरात
श्वासाला कोंडून घ्यायची मनासारखी..!निदान सासुसासरे इथं
असते तर घरात माणसे दिसली असती..सुखदुःख
बोलता आलं असतं...!!
''स्वातीsssअगं मेलीस काय?? कुठायसं. ?'' नी त्याने
रागारागात ओफिसबॅग सोफ्यावर फेकली.शर्टाच्या बाहीचे
बटन उघडे करत तो बेडरुममध्ये पोचला..ती निवांत
झोपलेली होती..तिच्या श्वासागणिक
वरखाली होणार्या वाढत्या पोटाकडे बघितलं..दोन क्षण
तो सगळं विसरला. .त्याच्यातला माणुस जिवंत असण्याचं हे
एक लक्षण होतं खरं पण लगेचच तो भानावर आला.
''काय ग??केव्हाच्या हाका मारतोय तुला,कान फुटलेयत
का?'' मेघ गरजला होता..ती गरबडीने जागी होवून
कशीबशी उभी राहिली..धरणी मेघाच्या आवाजाने आनंदीत
होण्याएवजी लटपटत होती..
''बोल ना??काय मुर्खासारखी उभी राहिलीस नुसती..अक्कल
कवडीची नाही..निदान नवरा आला तर दरवाजात तरी दिसावं
बायकोने..''
तिला हे रोजचचं होत..तरिही रोज जुनं मन नव्यानं भरुन
यायचचं..!
''अहो..दुपारपासून गरगरल्यासारखं होतं होते..कंबर
नी पाठही फार दुखत होती..वाकल्याही जात
नव्हतं..गोळ्या घेवून जरा पडली आणि डोळा लागला''.
विटनेस बोक्समध्ये
उभ्या असलेल्या अशिलासारखा तिचा चेहरा घाबरला होता..
''मग..आराम पडला ना आता??बाकी बायांना काय आपोआप
मुलं झालीत..विनात्रासाची..कंबर नी पाठ दुखतेय हिची...चल
मी फ्रेश होतो..जेवायला वाढ लवकर..''
''अहोss मी काय म्हण..'' तीचं बोलणं न ऎकताच
तो बाथरुमकडे वळाला..
लुंगीने हातपाय पुसल्यावर त्याने ती कमरेला गुंडाळली..जेवणा
च्या टेबलकडे वळला..ती टेबलाच्या कोपर्यावर नुसतीच
उभी होती..टेबलावर जेवणाची कसलीच तयारी नव्हती..
''काय आहे हे?? तुला सांगितल होत ना...लवकर वाढ
म्हणून??तुला समजत नाही का गं?? नवरा इतका दमूनभागून
आल्यावर त्याला जेवायला न वाढता फक्त उचल्यासारखं
त्याच्याकडे बघतेस''
तो पुन्हा तीचा अंत पहात होता..
''अहो..दुपारी त्रासामुळे झोप लागली..अन
आता तुमच्या आवाजानेच जाग
आली..तुम्ही बसा ..मी आता पंधरा मिनिटात स्वयपांक
करते..'' असं म्हणत,पदर कंबरेला खोचत ती मलूल चेहर्यात
मोठ्या आर्जवाने उत्तरली...
''बस्स कर...नवरा इतका दमून येतो..निदान जेवण तरी वेळेवर
द्याव माणसानं..मी साला मर मर काम करतो..कुणासाठी??
तुमच्यासाठीच ना..अन तुला साधं इतकही जमू नये??काय
काम असतं ग तुला ऎरवी??खबरदार..आता स्वयंपाक
करशील तर...सगळा फेकून देईन..याद राख. अजिबात
स्वयंपाक करायचा नाहीस आज...कळलं का..मुर्ख साली..बरं
झाल असतं...जोश्या आज चायनिजला नेणार
होता ऒफीसनंतर..उगाच नाही म्हटलो..''
रागारागात त्याने पुन्हा कपडे
चढवले,बाईकची चावी घेतली,स्लिपर घातली व बाहेर
पडला...दरवाजाचा धाडकन आवाज झाला...हिच्या कातर
मनाचा बांध पुन्हा फुटला होता..
तो बाहेर आला..मन सुन्न झाले होते..रफिकच्या पानटपरीपुढे
बाईक थांबवली..बोटांनी इशारा केला..रफिकने नेहमीप्रमाणे
दोन विल्स नेव्हीकट त्याला लांबवले व डायरीत नोंद
केली..बाईक त्याने तिथेच लावली..थोडासा समोर चालत जात
नागेशच्या नारळपाणी दुकानाजवळच्या दगडी पुलावर
तो आरामात बसला..बायकोचा तिव्र राग येत होता...विल्स
शिलगावून तो रागारागात झुरके मारत होता..झुरक्यागणिक
मनावरचं आभाळ,त्रागा कमी होत होता..बराच वेळ तो बसून
होता..तिथेच निश्चल...पुलापलीकडे काही रोड
बनविणार्या कामगारांची पालं होती..त्यातून एका पालामधून
एक जोडपं बाहेर पडल..नवराबायको असावेत..ती गरवार
दिसत होती..तो तिला आधार देत,हळुवारपणे चालत
होता..दोघांचेही चेहरे फुललेले दिसत होते..व डोळ्यात
कौतुकाचे भाव होते..त्याच कुतुहल वाढलं..त्यांच्या लक्षात
न येवू देता तो त्यांना न्याहाळू लागला..
जोडपं हळुवार पावले टाकत..रोडपर्यन्त आली...तिथून
पुन्हा संथ गतीने पुलापर्यन्त..त्याने बायकोला पुलावर
बसवले व म्हटले..''बैस हिथंच..जादा पायपिट
बी नगं..मी नारळाच पाणी आणतो तुलं..'' बायको कौतुकानं
पोटभरुन हसली..
ह्याला त्याच्या बायकोची आठवण झाली..सालं
मी इतक्या प्रेमानं बायकोला कधी जवळ घेतल??दिवस
राहिल्यापासुुन कधी तीला काय हवं नको ते विचारल??
तो आठवू लागला..पण अपेक्षित उत्तर येईना..त्याच मन
त्याला खात होतं..
इतक्यात जोडप्यातला नवरा एक नारळ कापून घेवून
आला..स्ट्राँ टाकून बायकोच्या तोंडापुढ नारळ धरलं..व
प्यायचा आग्रह करु लागला..बायको लाजत होती..
ह्याच्याकडे बघुन तो पुरुष उत्तरला..''आवं लाजतीस
कशाला?त्या साहेबास्नी बी बायकू आसलचं
की,तेबी बायकुचा लाड आसाच करत आसतील की..व्हय
ना साहेब??''
तो बळेबळे कसनुसं हसला..मन खात होतं,अपराधीपणाच
आभाळ आताशा दाटून येत होतं..स्वतःच्या
झालेल्या चुका समोरच्या नारळपाण्यात स्पष्ट दिसत
होत्या..
''आवं घे की सम्द..वढं वढं.. डाक्तर मनले न लेकरू गोरपानं
व्हत म्हणून..मंग घे..'' नवरा तिला आग्रह करीत होता..
''घेतेनं पण चला घरला मंग
पिईन..तुमास्नी भूकबी लागली असलं,सैपाक करा लागील
मलं..'' बायको अजुनही लाजत होती...
''होत राहिल सैपाक..तुह्यापुढं लय हाये का??मी करु लागीन
तुलं..मंग त झालं..??
इकडे याच्या डोळ्यांच्या कडांवर आतल्या पावसाचे हलके
थेंब जमा झाले होते..मन कस लख्ख झालं
होत..काळजातला हळवा कप्पा उघडल्या गेला होता,मनाला पंख
फुटले होते..
समोरच संभाषन ऎकण्याची मनस्थिती होती पण
स्वतःच्या घरात..तो निर्धारानं उठला..''नागेश दो इधर ला..''
अस म्हणून दोन नारळ त्याने घेतले..बाईकजवळ आला..किक
मारली...समोर येवून चायनिज काॅर्नरवर पार्सल घेतलं...व
सुसाट निघाला..
रोज भरभर आवाज देणारी बाईक आज हळुवार जात
होती..आभाळ पुन्हा एकदा निरभ्र झाले
होते..हरवलेली कविंताची वही पुन्हा सापडली होती....मनातला संदिप
खरे काॅलेजनंतर प्रथमतः पुन्हा एकदा कवितांच वाचन करीत
होता..सगळं कसं हवहवसं वाटत होतं..फुग्यातली
हवा निसटून,फुगा उंच उडून जात होता....!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहिलय. सगळ्या "त्या"ला एकतरी "त्यो" दिसू देत, जगातल्या थोड्या तरी बायका सुखी व्हायला सुरुवात होईल.

वाहव्वा.. क्या बात कही है,वल्लरीजी..खरेच पटलं...सुंदर प्रतिसादासाठी मनापासून आभार..

खूप छान लिहिलय. सगळ्या "त्या"ला एकतरी "त्यो" दिसू देत, जगातल्या थोड्या तरी बायका सुखी व्हायला सुरुवात होईल.>> मस्त कविता

आणि प्रतीसाद

Class !!!

धन्यवाद आबासाहेब...जनरली हे 'आवं' आहो सारख नाहिये.. इथे 'आवं 'हा एकेरी असून बायकोसाठीचाच ग्राम्य शब्द आहे.. 'अगं'चा अपभ्रंश..!!

काहि उपयोग नाही. एका दिवसाचा पश्चाताप आहे हा. असली माणसं कुणाला बघून एका दिवसात सुधरत नाहित...
अशा प्रकारचं एक माणूस माहित आहे Happy
गोष्ट म्हणुन ठीक आहे.

काहि उपयोग नाही. एका दिवसाचा पश्चाताप आहे हा. असली माणसं कुणाला बघून एका दिवसात सुधरत नाहित..>>>> + १००

खबरदार..आता स्वयंपाक करशील तर...सगळा फेकून देईन..याद राख. अजिबात स्वयंपाक करायचा नाहीस आज...कळलं का..मुर्ख साली..>>>> हे वाचल्यावर तो कविता वगैरे वाचत असेल हे पटत नाही. Uhoh

aashu29....

स्वस्ति....

सर्वप्रथम आभार...
काळानुरुप चांगली माणसही बदलत जातात....काळाच्या प्रवाहात स्वतःला सिद्ध करण्याच्या चढाओढीत आतल्या चांगल्या माणसाला विसरत जातात...अत्यंत हळव्या कविता लिहिणारेही वैयक्तिक आयुष्यात अत्यंत्य निच असू शकतात. ..कथेचा नायक मुळातच आत एक चांगला माणूस वास्तव्याला असणारा पण बाहेरुन जगरहाटीला कंटाळलेला आहे...एखादी घटना बघून कुणाचही मन पालटू शकत..बस्स काळीज मुळात तलम हवं...कालौघात निबर झालेल असलं तरी...
माणूस मुळात चांगला असेल तर बदलायला एक क्षणही पुरतो हो...पण मुळातच माणुसकी नसेलच तर सात जन्मही बदलायला कमीच..या कथेमागचा हेतू हाच की कुणालातरी वाचून आपल्या स्वतःतल्या चुकांचा पश्वाताप व्हावा...शेवटी कथास्त्रोतही काल्पनिक नसून मानवी आयुष्यातलाच आहे ना..?

आवडली
"सगळ्या "त्या"ला एकतरी "त्यो" दिसू देत, जगातल्या थोड्या तरी बायका सुखी व्हायला सुरुवात होईल.">>>>खरंच