चिकन दम बिर्याणी - chicken dum biryani

Submitted by डीडी on 25 April, 2014 - 04:28
chicken dum biryani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

भातासाठी -
बासमती तांदूळ ५०० ग्राम
चक्र फूल - १ ( दगडफूल नाही बरं.. :))
तमालपत्र - २
काळी वेलची - २
शाही जीरा - २ टीस्पून
काळी मिरी - ६
वेलची - ६
दालचिनी - २ काड्या
लवंग - ६
बडीशेप - १ टीस्पून
जायपत्री - १
मीठ - ३ टीस्पून

चिकन मॅरीनेशनसाठी -
अर्धा किलो चिकन,
गरम मसाला - १ टेबलस्पून
आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
घट्टं दही - ४ टेबलस्पून
लिंबाचा रस - १ टेबलस्पून
तिखट - १ टेबलस्पून
मीठ - १ टेबलस्पून

इतर साहित्य -
कांदे - ४
टोमॅटो - २
दुध - पाव कप
साजूक तूप - ४ टेबलस्पून
केशर - १०-१२ काड्या
तेल - २ टेबलस्पून
धणे पूड - १ टेबलस्पून
जिरे पूड - १ टीस्पून
हिरव्या मिरच्या - २
पुदिना पाने - दोन मुठ
कोथंबीर

क्रमवार पाककृती: 

१. चिकन मॅरीनेट
एक भांड्यात दही, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, लिंबाचा रस, गरम मसाला एकत्र करून त्यात चिकन २ तास मॅरीनेट करावे.

२. तळलेला कांदा
२ कांदे बारीक आणि लांब कापावेत. फ्राइपॅनमध्ये तेलामध्ये तांबूस होईपर्यंत तळावेत. कांदा करपणार नाही ह्याची काळजी घ्यावी. तळलेला कांदा पेपर टॉवेल वर काढावा, जेणेकरून कांदा कुरकुरीत राहील.

३. चिकन शिजवणे
पॅन मध्ये तुप गरम करून त्यात २ बारीक चिरेलेले कांदे, हिरव्या मिरच्या घालून, कांदा गुलाबे होईपर्यंत परतावे. त्यात आलं लसूण पेस्ट घालून २ मिनिटं परतावे. त्यात मॅरीनेट केलेले चिकन चालून मोठ्या आचेवर ४-५ मिनिटं शिजवावे. त्यात धणे पूड, जिरे पूड, तिखट, गरम मसाला, आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे. त्यात २ कप पाणी घालून १० मिनटे मंद आचेवर शिजून द्यावे. चिकनची ग्रेव्ही एकजीव झालेली असावी.

४. भात
बासमती तांदूळ २० मिनटे पाण्यात भिजत ठेवावा. नंतर स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवावा. एका स्वच्छ कापडावर (४ इंच लांबी रुंदी) दगडफूल, काळी वेलची, शाही जीरा, काळी मिरी, वेलची, दालचिनी, लवंग, बडीशेप आणि जायपत्री ठेवून, पोटली होईल अशाप्रकारे कापडाला गाठ मारावी. साधारण १ लिटर उकळत्या पाण्यात तांदूळ, मीठ, तमालपत्र, मसाल्यांची पोटली आणि १ टीस्पून तेल (भाताची शितं वेगवेगळी रहावीत म्हणून) घालून भात अर्धाकच्चा राहील इतका शिजवावा. भात शिजल्यावर त्यातील पोटली काढून, सर्व पाणी निथळू द्यावे.

५. केशर दुध
दुध कोमट करून त्यात केशर घालून तयार ठेवावे.

६. बिर्याणी थर लावणे
जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात २ टेबलस्पून तूप घ्यावे. (मी मोठा कुकर घेतला होता) तूप तळाला पूर्णपणे लागले पाहिजे. त्यावर भातच एक थर करूनत्यावर चिकनच एक थर पसरावा. त्यावर पुदिना आणि बारीक कोथंबीर पसरावी. पुन्हा भाताचा एक थर. त्यावर थोडा तळलेला कांदा, तूप घालून चिकनचा थर लावावा. ह्याच प्रकार सर्वे थर लावले कि वरून केशराचं दुध आणि २ टीस्पून तूप सोडावे. कुकर बंद करून बारीक आचेवर बिर्याणी ३० मिनिटे 'दम' करायला ठेवावी. कुकर तव्यावर ठेवला तर बिर्याणी तळाला लागणार नाही.

रायतं, सलाड सोबत सर्व्ह करावी.. Happy

सौ ला तिच्या वाढदिवसाला बाहेरचं न खाता माझ्या हातचं खायचं होतं म्हणून हा खटाटोप. घाई घाईत केल्यामुळे आधीचे फोटो काढता नाही आले. फक्त एकच..

वाढणी/प्रमाण: 
हे प्रमाण ४ जणांच्या बिर्याणीचं आहे.
अधिक टिपा: 

चिकन आणि तांदूळ समप्रमाणात असणे आवश्यक.
भात सुटा राहील आणि निथळताना अर्धकच्चा राहील हे महत्वाचं. तरच थर लावल्यावर चिकनच्या फ्लेवर मध्ये भात शिजेल.

chicken dum biryani recipe in marathi

प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. ती पोटलीची आयडिया आवडली नाहीतर ते दाताखाली येणारे मसाले अज्जिबात आवडत नाहीत.
मला एकच सांगा मी पहिल्यांदाच चिकन आणुन ही बिर्याणी करणार आहे तर फ्रोझन चांगले लागते का?

बिर्याणी मस्त दिसते आहे.
साहित्य तेच पण बिर्याणी करताना मी जरा शॉर्टकट घेते ...
कांदा सोडून बाकी सर्व चिकनला लावून ठेवते..(कमीत कमी २ तास...नाहीतर रात्रभर रेफ्री. मधे मॅरिनेट करायला ठेवते).
तमालपत्र आणि दालचिनी टाकून १५ मि. पाण्यात भिजवलेला तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घेते.
तेल-तूपावर कांदा डार्क ब्राऊन होईपर्यंत भाजते मग त्यात चिकन टाकून थोडावेळ परतते...मग त्यावर तांदूळाचा थर देऊन..त्यावर केशर दूध-तूप टाकून....पुढे तव्यावर मंद आचेवर बिर्याणी शिजवते.

IMG_4873 (copy).jpg

वॉव....काय भारि दिसतय.मी नॉन-व्हेज चा बाबतीत नवखिच आहे.शिकायला पाहिजे.हे नक्कि ट्राय करुन बघणार.
sonalist - तुम्ही केलेलि बिर्याणि हि एकदम भन्नाट दिसत आहे

दगडफूल - १ ?

म्हणजे? दगडफूल एक कसं काय घ्यायचं?

चक्री फूल (स्टार अनिस) म्हणायचंय बहुतेक तुम्हाला. कारण दगडफूल बिर्याणीत कधीच ऐकलं नाहिये.

इब्लिस बारीक लक्ष आहे.:स्मित:

हो दगडफुल एकच कसे घेणार? वास पण नाही लागणार. स्टार अनिस उर्फ बाद्यान उर्फ बदाम फुल घेतात.

बाकी बिर्याणी दमदार. मस्त फोटो आणी कृती.

आभार मंडळी.. Happy

धन्यवाद इब्लिस.. I meant Star Anise only . Thanks for pointing that out. बाकी रेसिपी आपल्याला आवडली असेल अशी आशा करतो.. (जरी आपण झालेल्या चुकीशिवाय काही नमूद नसेल केलं तरी) .. Lol

फोटो एकदम कातिल आहे. खरंतर तुमच्या प्रत्येक धाग्यातील फोटो चाबूक असतात. Happy

आज पुन्हा एकदा तुमची कोकणवारी.. पाहिली आणि त्यातील खादाडीच्या काही फोटोंवर जीव अडकला. Happy

पोटली करून गाठ मारणे ह्या प्रकाराला बुके गार्नी म्हणतात. त्यासाठी स्टीलची एक छोटी डबी पण मिळते. त्याला गाळणीसारखी छिद्रे असतात.

डीडी,
प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन इटींग Proud
जेवायला बोलवा की! त्या तोंपासू फोटोचा प्रिंटाऊट काय टेस्टी नाय लागला बघा Wink

या जेवायला. पण स्वखर्चाने यावं लागेल.. प्रुफ़ ऑफ कमिंग इज द बुकिंग..:) तो फोटू तोंपासु आहे म्हणताय, जिंकलं राव... तुम्ही न्हाय, आम्ही. Lol

आम्हाला एका कोवर्कर ने मस्त ताजा पुदीना आणून दिला होता. त्याचे काय करावे असा विचारच करावा लागला नाही. पहिला विचार आला म्हणजे बिर्याणी करू. याच रेसेपीने करून पाहिली आणि ती अप्रतीम झाली होती. कुकर मध्ये मस्त दम बसला. दुपारी जेवणाला तुडुंब खाल्ली की रात्री जेवणच नाही Lol

रेसेपी करता धन्यवाद Happy

Ckn_byni.jpg