मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

Submitted by तुमचा अभिषेक on 16 February, 2014 - 12:23

आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले. वाटेत सव्वाचार मिनिटांनी भमरसिंग मिठाई अन फरसाणवाला लागतो, येताना त्याच्याकडे खादाडी करून घरच्यांसाठी पण गरमागरम सामोसे घ्यायचा प्लान होता. मात्र प्लॅन थोडा चेंज करत पोटात किलबिलणार्‍या कावळ्यांना शांत करायला मी आधीच खादाडी करायचा निर्णय घेतला. तसेही कुठे मला डोंगरावर सूर्य नमस्कार मारायचे होते. जी काही भटकंती वा निसर्गाशी प्रणयाराधना करायची होती ती भरल्यापोटी करणे केव्हाही चांगलेच..

काल अवचितपणे पडलेल्या पावसामुळे वातावरण भन्नाटच होते. किंबहुना सकाळी उठल्यावर खिडकीतून पुर्ण मुंबईवर एक नजर फिरवून हे वातावरण बघूनच मी हा मॉर्निंग वॉल्कचा निर्णय घेतला. जेवढे उल्हासित खिडकीतून बाहेर नजर फिरवताना वाटले होते त्यापेक्षा जास्त बाहेर पडल्यावर वाटू लागले. वाटेत विचार आला की च्यायला सकाळी साडेसहा-पावणेसातला भमरसिंगकडे काय खायला मिळणार आहे. मात्र माझा अंदाज साफ चुकलाय हे मी समजून चुकलो जेव्हा तिथे जमलेली गर्दी मला लांबूनच दिसली. एवढ्या सकाळी खाण्याचे प्रकार मात्र मोजकेच होते, पण आवडीचे असेच होते. मी एक गरमागरम सिंगल समोसा आणि एक प्लेट फाफडा-जिलेबी मिक्स घेतली. याआधी कधी हे खाल्ले नव्हते असे नाही पण असे भल्या पहाटे खाण्यातील मजा काही औरच. ईसके उपर चाय तो बनती हि है म्हणून लागलीच भटाच्या टपरीकडे मोर्चा वळवला. हा खाण्यापिण्याचा प्रोग्राम उरकून मी डोंगराच्या मेनगेट पाशी येऊन मोबाईल चेक केला तर सात वाजून बारा मिनिटे झाली होती.

सव्वासात वाजले तरी वातावरण असे होते की सव्वाआठपर्यंत तरी सुर्याची कोवळी किरणे भूतलावर पोहोचणार नव्हती. मी कानातली गाणी चालू करून डोंगर चढायला घेतला. संगीताच्या तालावर श्रम फारसे जाणवत नाही हा स्वानुभव. तसेही डोंगर चढणे म्हणजे काही फार गड सर करणे नव्हते. मुळात जिथून चढायला सुरूवात करतो तो डोंगराचा पायथाच समुद्रसपाटीपासून बरेच उंचीवर असल्याने पुढे पाचेक मिनिटेच रमतगमत चालायचे असते. टेकडीच्या एका टोकावर असलेल्या देवीच्या मंदिराकडे न जाता मी जोसेफ बापटिस्टा गार्डनच्या दिशेने पावले वळवली. रस्त्यात अध्येमध्ये दिसत होती ती कुठल्या झाडाखाली, कुठल्या बेंचवर, कुठल्या कठड्यावर, तर कुठे पायरीवरच पेपर अंथरून.. अंह, प्रेमी युगुले नाही, तर शाळाकॉलेजातील मुले अभ्यास करत बसली होती. त्यांना पाहून माझे दहावी-बारावीचे दिवस आठवले. अश्या अभ्यासूंसाठी डोंगराच्या एका शांत भागात पण निसर्गाच्याच सानिध्यात सिमेंट कॉंक्रीटचे तंबू टाईप स्टडीकॅंप उभारले आहेत, मात्र त्या ठराविक जागेतच अभ्यास करण्यापेक्षा एवढ्या भल्यामोठ्या डोंगरावर वेगवेगळ्या जागा शोधत अभ्यास करण्यातच आम्हीही धन्यता मानायचो. वाटेतल्या झाडांवर कावळ्यांची कावकाव सुरू झाली होती, मात्र वर गार्डनमध्ये विविध पक्षी आजही गलका करत असतील अशी आशा होती. चला बघूया पुढे ते खरेच मला भेटले का ते..

तर, माझगाव परिसराला पाण्याचा पुरवठा करणार्‍या, डोंगरमाथ्यावर वसलेल्या टाकीच्या तळाशी, उजव्या हाताच्या गेटने मी गार्डनमध्ये प्रवेश केला. नेहमीची संध्याकाळची गर्दी नसल्याने पार दूरवर नजर जात होती. एक गार्डन, त्या पलीकडे दुसरे, त्या पलीकडे तिसरे ... प्रत्येकाचा आपलाच एक आकार आणि आपलेच एक वैशिष्ट्य. कमीअधिक प्रमाणात कापले जाणारे गवत तर कुठे त्या गवताच्या रंगाची भिन्नता. प्रत्येक गार्डनची सीमारेषा आखणार्‍या फूलझाडांचेही सतरा प्रकार. प्रत्येकात असलेली बसायची सोय देखील वेगवेगळ्या आकार उकाराची. या सर्वांना सामाऊन घेणार्‍या परीघावरून फिरणारा जॉगिंग ट्रॅक, ज्यावर आपण काय किती धावलो हे कडेने लिहिलेल्या मार्किंग्सवर मोजत काही फिटनेस कॉशिअस स्त्री-पुरुषांचे धावणे सुरू होते. मी मात्र त्यांच्या वेगाला डिस्टर्ब न करता त्याच परीघावरून चालतच एक राऊंड मारून पुर्ण डोंगराला एकदा नजरेखालून घालायचे ठरवले. आरामात रमतगमत चालायचे ठरवले तरी सकाळचा फ्रेश मूड, आजूबाजुला धावणार्‍यांमुळे तयार झालेले उत्साही वातावरण आणि पायात असलेले स्पोर्ट्स शूज यांमुळे माझीही पावले झपाझप पडत होती.

अर्धी फेरी मारून झाल्यावर एक पाणवठा लागला, तिथेच नळाला तोंड लाऊन थंडगार पाणी आत टाकले. थोडे सवयीनेच तोंडावर शिंपडले आणि तोच ओला हात केंसांतून आरपार फिरवला तसे थंडी जाणवून गारठून निघालो. मात्र गालाला सुया टोचल्यासारखे वाटू लागल्याने मूड डबल फ्रेश झाला. पुढे दोन पर्याय होते, एक पुढे त्याच जॉगिंग ट्रॅकवर जावे किंवा चार पायर्‍या उतरून गार्डनच्या खालच्या अंगाला यावे. डोंगराचा एक कडाच तो ज्याला पुर्णपणे सुरक्षिततेचे कुंपण घातले आहे. त्या आत बसण्यासाठी म्हणून तसाच पुर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत कठडा फिरवला आहे. अर्थात मी तिथेच गेलो हे वेगळे सांगायची गरज नाही. तिथून खाली डॉकयार्ड स्टेशन दिसते तर समोर पसरलेला अथांग समुद्र, एक बंदर, जे भाऊचा धक्का म्हणून ओळखले जाते. रेल्वेच्या पुलावर, पर्यायाने उंचावर असणारे डॉकयार्ड स्टेशन देखील तिथून खूप खाली आहे असे भासते. खाली स्टेशनला लागणारी ट्रेन भातुकलीच्या खेळातली वा एखाद्या प्रोजेक्टच्या मॉडेलमधली आहे असे वाटावे. भाऊच्या धक्क्याच्या आसपास कुठलीही गगनचुंबी इमारत नसल्याने समुद्र अगदी काठापासून क्षितिजापर्यंत एकाच नजरेत बघता येतो. बंदराला लागलेल्या बोटी अन डॉकमधील मोठाली यंत्रे आणि क्रेन्स हा समुद्र इतर समुद्रांपेक्षा वेगळा आहे हे दर्शवत होते. जवळपास पाऊण एक तास मी तिथेच गाणी ऐकत बसून होतो, हळूहळू दक्षिण मुंबई शहराला जागे होताना बघत.

कोलाहल वाढू लागला, पक्ष्यांच्या किलबिलीची जागा फलाटावरच्या वाढत्या गर्दीचा गोंधळ घेऊ लागला, तसे मी उठायचे ठरवले. दुतर्फा वाढलेल्या झाडांमुळे अजूनही सुर्याची किरणे माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. पण जसे पुन्हा मोकळ्या बगीच्यांमध्ये आलो तसे कोवळे उन जाणवू लागले. तो उबदारपणा हवाहवासा वाटू लागला. म्हणून आता तो उपभोगायसाठी डोंगरावरचा मुक्काम आणखी थोडा वाढवायचे ठरवले. एक बाकडा पकडून, अंह, त्यावर बसलो नाही तर त्याच्या कडेला माझे शूज काढून ठेवले आणि माझ्या आवडत्या प्रकारासाठी सज्ज झालो. दव पडलेल्या गवतावरून अनवाणी पायांनी चालणे. खाली तळपावलांना जाणवणारा थंडगार ओलावा, सोबत गुदगुल्या करत टोचणारी गवताची पाती आणि वर अंगाखांद्यावर खेळणारी सोनेरी किरणे. अंगावरची सारी वस्त्रे भिरकाऊन तिथेच लोळत पडावे असा मोह पाडणारा अनुभव घेत मी पुढची पंधरा-वीस मिनिटे फेर्‍या घालत होतो. या प्रकाराची संध्याकाळीही आपलीच एक मजा असते, खास करून डोंगराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कारंज्याच्या जवळचे एखादे गार्डन पकडावे, ते ही वार्‍याची दिशा अशी बघावी की कारंज्याचे तुषार त्या सुसाट वार्‍याबरोबर उडत येऊन आपल्याला पार न्हाऊन टाकतील. आयुष्यातल्या सार्‍या चिंता या प्रकारात विसरायला होतात. माझे अभ्यासाचे टेंशन तरी वेळोवेळी विसरायला मी हाच फंडा वापरायचो.

असो, तर त्याचवेळी घड्याळात वेळ चेक करून आता माहेरी गेलेली बायको उठली असेल या हिशोबाने तिला फोन लाऊन त्या गवतावर चालता चालताच तिच्याशीही दहा-पंधरा मिनिटे बोलून घेतले. आज आपला नवरा चक्क स्वताहून फोन करून चक्क दहा ते पंधरा मिनिटे बोलतोय आणि ते ही चक्क हळूवार आणि रोमॅंटीक.. एकंदरीत चक्क्राऊनच गेली ती बिच्चारी.

बस मग पुढे काय परतीचा रस्ता. उतरणीचा असल्याने तरंगतच उतरलो. तसेही दमण्यासारखे श्रमदान झाले नव्हतेच, किंबहुना दिवसभर, अंह आठवडाभर पुरणारा उत्साह घेऊन परतत होतो. वाटेत घरच्यांसाठी सामोसे पार्सल घ्यायला विसरलो नाही, आणि एकदाची स्वारी नऊच्या सुमारास घरी परतली !

------------------------------

सदर अनुभव आमच्या माझगावच्या डोंगराची जाहीरात करण्यासाठी लिहिला आहे. तर कधी आलात त्या भागात जरूर भेट द्याल. अन मलाही आवाज द्यायला विसरू नका. मी तिथून हाकेच्या अंतरावर राहत असलो तरी हाक न मारता फोन वा मेसेज करू शकता Happy

- तुमचा अभिषेक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह फोटो?? श्या .. तेव्हा हे काही असे घरी येऊन लिहिणार हे डोक्यात असते तर त्या अनुषंगाने काढलेही असते. अन्यथा आपल्याच घराजवळ असलेल्या जागेचे काय फोटो काढायचे. अन याचमुळे म्हणून आधीचे जुनेही असे काही फारसे नसतील, तरी असल्यास शोधता येतील, पण ते संध्याकाळच्या गजबजलेल्या वातावरणात निसर्गाचे नाही तर आपलेच निसर्गाला बॅकग्राऊंडला ठेऊन पोज देऊन काढलेले असतील, त्यात मजा नाही..

अभि , किती छान. पण फोटो नक्की नक्की टाका. द्क्षीण मुंबईत चांगल्या लोकेशन ला राहण्यासारखे सूख नाही.
हिरवळीत चालण्याबद्दल अगदी अगदी. माझ्याकडेचे शेपटीवाले निष्पाप जीव तर लोळतात पंधरा वीस मिनिटे.
फाफडा जलेबी इथे पण मिळते आणि लोक्स भर भरून खाताना, पारसल नेताना दिसतात.

मुंबईतील खास जागा असा मामींचा बाफ आहे तिथे पण ह्या लेखाची लिंक द्या. जय जलाराम.

अरे, क्या यार. सुबह सुबह नॉस्टॅल्जिक बना दिया. ते वरून अर्धचंद्राकृती दिसणारं डॉकयार्ड स्टेशन आणि जेटीचा समुद्र, माझगाव डॉक वगैरे वाचताना एकदम डोळ्यासमोर येत होते. आम्हीप्ण डॉकयार्ड स्टेशनपासून हाकेच्याच अंतरावर रहायचो. काय तरी ते मस्त दिवस होते आयुष्यातले.

हा भमरसिंग कुठला म्हणे, ते पण जरा सांगाल का?

माझगावच्या गार्डनमध्ये दर रविवारी आम्ही टीपी करायला म्हणून जायचो. तिथे फिरून कंटाळा आला तर भाऊचा धक्का. Happy (भाऊच्या धक्क्यावर जास्त जाणे व्हायचे नाही, कारण तिथे पप्पांचे बरेचसे लोक ओळखीच होते.) पण गावदेवीचा डोंगर मात्र एकदम फेवरेट.

डॉकयार्डला रहाण्याचा अप्रतिम फायदा म्हणजे मुंबईतल्या कुठल्याही भागासोबत मस्त कनेक्टीव्हीटी मि़ळते. किद्धर भी घूमो.

हँगीग गार्डन तिथेच आहे का जवळपास. ते ही लोकेशन भन्नाट आहे. आणि ते महेश भट्ट च्या सिनेमात असायचे ते कॅफे लाल रेलिन्ग्स वाले? अब जाना ही पडेंगा.

हँगीग गार्डन तिथेच आहे का जवळपास.<<< नाही. हे माझगाव म्हणजे टिपिकल सोबो नाही. सीएसटीवरून पीडीमेलो रोड पकडून यायचे. किंवा हार्बर लाईन पकडली की चौथे स्टेशन डॉकयार्ड रोड.

मुलुंडकडून येत असाल तर सेण्ट्रल लाईन पकडा, आणि सॅन्डहर्स्ट रोड स्टेशनला उतरा तिथून "माझगाव गार्डन" असे सांगून टॅक्सी पकडा. व्यवस्थित याल. तिथे फिरून झालं की परत टॅक्सी पकडा आणि "फेरी व्हार्फ किंवा भाऊचा धक्का" असे सांगा. तिथे मनसोक्त भटकून घ्या. मासे वगरे घ्ययाचे असतील तर लवकर सक्काळी जा. एकदम फ्रेश कॅच. आपले लॉन्चवाले दोन तीन भाई आहेत त्यांना वाटल्यास निरोप देऊन ठेवेन. Happy

मुलुंडकडून येत असाल तर सेण्ट्रल लाईन पकडा, आणि सॅन्डहर्स्ट रोड स्टेशनला उतरा तिथून "माझगाव गार्डन" असे सांगून टॅक्सी पकडा. व्यवस्थित याल. >>सो स्वीट. झिंदाबाद जरूर जावेंगे. ह्या वीकांताला सायरस सिलिंडर आणि इराणी सोने बघायला जाणारच आहे. आज सोमवार आणि ऑलरेडी वीकांताचे प्लॅन सुरू.

नेहमीप्रमाणे छान लेख.
सुरवातीला वाचताना मनात आलेलं की अरे हा एकटा कसा गेला फिरायला? बायको कुठे गेली? विचारणार होते पण नंतर कारण समजले. कारण याआधी 'सुख...' या लेखमालिकेत तिच्याबद्दल एव्हढं लिहले आहेस की आता अभि+तुझी बायको हे समिकरणच बनलय त्यामुळे तु बायकोला घरी सोडुन एकटा फिरायला जाशील असे वाटतच नाही.

वॉल्क ... असाच शब्द आहे फक्त उच्चारताना तेवढा त्यातला `ल' सायलेंट ठेवायचा असतो.

भमरसिंग ... कुठेय आता हे नक्की कसे सांगावे हा प्रश्नच आहे, तुळशीवाडीच्या बाजूला. जवळच एक चेतना म्हणून फार जुने जनरल स्टोअर आहे, चायनीजची गाडीही लागते, समोर एक साईश्रद्धा नावाचा बार आहे, प्रसाद बेकरी आहे वगैरे वगैरे .. आतला रस्ता आहे, इथून बस जात नाही अन्यथा बसस्टॉपच सांगितला असता..
जे माझगावचे नाहीत त्यांनी डोंगर वा सेल्सटॅक्स परीसरात कोणालाही विचारले भमरसिंग मिठाईवाला/फरसाणवाला तरी सांगेल. मात्र तेथील मिठाई मला नाही आवडत वा इतरही बरेच पदार्थ काही खास नसतात. पण वर उल्लेखलेले, समोसे सोबतीची चटणी मस्त. फाफडा जिलेबी, आणि एक मिक्स फरसाण हे देखील चांगले मिळते.

तरी कोणी डोंगरावरच भटकंती करायला जाणार असेल आणि संध्याकाळची वेळ असेल तर डोंगराखाली मिळणारी ओली भेळ आणि सेवपुरी बेस्ट. त्यातही "अमृत" नाव असलेल्या स्टॉल आपला नेहमीचा, माझ्यामते इतरांपेक्षा चांगला. भेल/सेवपुरी खाल्यावर शेवकुरमुर्‍यांचा सुखा खायला जास्त मजा येते आणि भेल खाल्याचे समाधान तेव्हाच मिळते. अर्थात कोणी हायजिनची जरा जास्तच काळजी घेणारा असेल तर एखादी सुखी भेलच ट्राय करावी.

नंदिनीने ... वर सांगितलेल्या भटकंतीच्या कार्यक्रमात भायखळा राणीबाग सुद्धा जोडू शकता, आमच्याकडे कोणी सहपरीवार येते तेव्हा डोंगर, धक्का, राणीबाग असेच पॅकेज फिरवतो त्यांना. तीनही ठिकाणे एकमेकांपासून टॅक्सीचे मीटर पडते ना पडते तोच येतात.

निल्सन ... अगदी अगदी, माझ्याही मनात तोच विचार आला की बायकोबरोबर आलो असतो तर हाच लेख सुखाच्या मालिकेत गेला असता. पण झाले ते चांगलेच.

पेट थेरेपी ... देतो मामींचा बाफ शोधून त्यावर याची लिंक Happy

अरे वा, भारी आठवण ़करून दिलीस.
़जेजेत असताना आर एम भट हॉस्टेलात रहाणार्या बी एफ ला घेऊन आर एम भट मार्गावरून चालत ़जाऊन या बाप्टिस्ट गार्डनला फिरायला ़जात असे.
Wink

अभिषेक, साईश्रद्धा बार आठवला तरी भमरसिंग आठवत नाहीये. Sad चेतना नाही, मला अंबिका जनरल स्टोअर आठवतेय. बरेच मोठे आहे. त्यांच्याकडे घेतलेला एक प्लास्टिकचा पाऊच अजून उत्तम स्थितीमध्ये आहे.

आम्ही बर्याचदा हॉस्टेलसमोर असणार्‍या दुकानातून समोसे आणायचो. त्याच्याकडे मिठा समोसा हा एक भन्नाट प्रकार मिळायचा.

ऋन्म्या, माझगांवचा कुठला डोंगर जाळलास? तुझा जन्म होइस्तोवर मुंबईतला एकतरी डोंगर/टेकडी अतिक्रमणामुळे शिल्लक राहिली होती का? काहिहि पुड्या सोडु नकोस...
Submitted by राज on 14 January, 2022 - 04:22

काहिहि पुड्या सोडु नकोस>>> ते कसं शक्यय?
Submitted by aashu29 on 14 January, 2022 - 08:35

>>>>

या पोस्टला ऊत्तर द्यायला धागा वर काढतोय.
हाच आमचा माझगावचा डोंगर Happy

गेलोय इथे. ( या ग्रुपबरोबर. पण सध्या कोविडमुळे सेशनस बंद आहेत

छान जागा आणि वेगवेगळे पाम्स आहेत. शिवाय आंबा,फणस वगैरे. खरे आपट्याचे झाड आहे. ( दसऱ्याला वाटतो ते बरेचदा कांचन असते. )
टाक्यांच्या आत जायलाही वाटा जिने आहेत.
स्टेशन ते बाग जाण्याच्या वाटेवर ब्रून मस्कावालेही दिसतात.

अच्छा.. मला झाडांबद्दल फार कळत नाही. पण मुंबईत अशी झाडांनी गजबजलेली जागा म्हणजे सुख अस्स्ते हे नक्की. मग तो माझगावचा डोंगर असो वा राणीबाग.

स्टेशन ते बाग जाण्याच्या वाटेवर ब्रून मस्कावालेही दिसतात
>>>
हो. पण आता बदलतेय झपाट्याने माझगाव. लवकरच पुन्हा तिथे राहायला जाऊ तेव्हा काही लेटेस्ट फोटो काढता येतील डोंगराचे आणि उद्यानाचे..

टाक्यांच्या आत जायलाही वाटा जिने आहेत.
>>>>
बाजूच्या रस्त्याने गावदेवीच्या मंदिराकडे गेलात की नाही. ते उद्यानापेक्षा बरेच ऊंचावर आहे. टाकीसारखा वरच्या लेव्हलला आहे. तिथून भाऊचा धक्का मस्त दिसतो Happy

असे सहा सात फोटोत अख्खा डोंगर आणि ऊद्यान कव्हर नाही होणार. पुढच्यावेळी मी गेलो की छान फोटो टिपतो. काही खुफिया जागा आहेत डोंगराच्या पोटात ज्या आंतरजालावरील फोटोंमध्ये कधी सापडणार नाहीत Happy

अरे वाह छान.
आता तिथे जगातील सात आश्चर्येही केलीत बहुधा. बरेच रिनोवेशन होतेय गार्डनमध्येही आणि एकूणच आजूबाजूच्या परीसरात.

मी गेले तीनेक वर्षे गेलो नाहीये त्या उद्यानात. किंबहुना कोविडमुळे दोन वर्षे माझगावलाच जाणे झाले नाही. पण आता लवकरच काही महिन्यांनी पुन्हा माझगाव वाऱ्या सुरू होतील. छोट्या ऋन्मेषलाही सर्वात पहिले त्या गार्डनमध्ये आणि गावदेवीच्या मंदिरात न्यायचे आहे.

जे काही लिहिले आहे त्याला मॉर्निंग वॉक म्हणत नाहीत.
काही काम धंदा नसल्या मुळे केलेला मूर्ख पण म्हणतात.
हँगिंग गार्डन, गिरगाव चौपाटी ह्या ठिकाणी दर्दी मॉर्निंग वॉक वाले असतात.
75 वर्षाचा खरा वॉकर 20 वर्ष वय असलेल्या तरुण ,तरुणी च्या तोंडाला फेस आणतील असे वॉकेर आहेतं.
मी कित्येक वर्ष तिथे वॉक करतो .
आणि त्या लोकांना प्रणाम करतो.
थंडी,पावूस,कडक ऊन त्यांना थांबवू शकत नाही अशी ग्रेट walker आहेत ती लोक.

जे काही लिहिले आहे त्याला मॉर्निंग वॉक म्हणत नाहीत
>>>
सहमत आहे. लेखाचा रोखही तसाच आहे. माझ्यासारख्या आळशी लोकांचा सकाळी कधी नव्हे ते जरा लवकर उठल्यावर मारलेला फेरफटका आणि ते मॉर्निंग वॉल्क असल्याचा आव Happy

सरांच्या आवडी अजब आहेत
त्यांना असं झोडलं कोणी की आवडतं, लगेच त्याला उत्तर देतात
आणि आम्हा भक्तांनी स्तुती केली की अबोला धरतात

करावं तरी काय माणसाने

Pages