आधुनिक सीता - २६

Submitted by वेल on 13 January, 2014 - 07:53

bhaag 25- http://www.maayboli.com/node/47055

रफिकच्या घरातल्या सगळ्या बायका मोठ्या मोठ्या आवाजात काही तरी बोलत होत्या, एका सेकंदाचीही विश्रांती न घेता. एवढ्या मोठ्या आवाजातल्या बोलणे ऐकण्याची मला सवय नव्हती शिवाय गेल्या सहा महिन्यात तर मी रफिक आणि फातिमा ह्या दोघांच्या आवाजाशिवाय कोणाचाच आवाज ऐकला नव्हता. त्या प्रचंड कलकलाटाचा त्रास होऊन मी तिथेच चक्कर येऊन बेशुद्ध पडले.

मला पुन्हा जाग आली तेव्हा मी वेगळ्याच खोलीत होते. रफिकच्या सगळ्या नातेवाईक बायका माझ्या आजूबाजूला होत्या. मी शुद्धीवर येताच त्यांचा कलकलाट पुन्हा सुरू झाला. रफिकच्या सर्वात लहान बहिणीने त्यांना ढकलतच त्या खोलीबाहेर नेलं. थोड्या वेळाने फातिमा आणि रफिकची सर्वात धाकटी बहिण - सलमा पुन्हा तिथे आल्या. त्यांनी माझ्यासाठी सूप आणलं होतं. मी फतिमाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"यु ड्रिंक. वेज सूप. नो नॉनवेज." माझे सूप पिऊन होते तोवर रफिक त्या खोलीत आला त्याच्या हातात एक फ्रेम होती. रफिकने ती फ्रेम मी बसलेल्या बेडसमोर टेबलावर ठेवली. त्या फ्रेममध्ये एका लहान मुलाचा फोटो होता.

"हा माझा लहानपणीचा फोटो. बघ किती गोंडस होतो मी. मुद्दाम तुझ्यासमोर लावलाय. रोज माझा लहानपणीचा फोटो पाहिला की माझं बाळ कसं माझ्यासारखं गोंडस दिसेल. म्हणजे मुलगी झाली तर तुझ्यासारखी दिसायला हरकत नाही पण मुलगा झाला तर तो माझ्यासारखाच दिसायला हवा. खर तर अम्मी अब्बूना हे पटत नव्हतं. त्यांचं मत फोटो फक्त आल्बम मध्ये ठेवावेत. पण मी तेच करतो जे मला पटतं. बडी अम्मीला पटवून दिलं की झालं. बडी अम्मीला मी पटवून दिलय. बाकीच्यांची चिंता मी करत नाही. "
मी मान डोलावली. मनात म्हटलं इथं मला हे बाळ नकोच आहे. तुझ्या सारखं ते दिसायचा न दिसायचा प्रश्नच येत नाही.
"आणि तू आजपासून ह्या खोलीत राहशील. सलमा तुझ्यासोबतच राहिल. तुझं सामान सगळं ह्या खोलीत आणून ठेवलं जाईल. तुला काही हवं असेल तर हिला सांग. फातिमा तर असेलच येऊन जाऊन. तसं सलमालासुद्धा थोडंफार इंग्लिश येतं बोलता."
मी काय बोलणार मी फक्त मान डोलावली.

ह्यानंतरचे पुढचा महिना खूपच वेगात गेला. रफिकने मला वाचायला प्रेग्नंसी केअर बेबी केअर वर काही पुस्तके आणून दिली होती. तो मला रोज घराबाहेरच्या बागेत फिरायला घेऊन जात असे. बागेभोवती उंच भिंती होत्या. दर आठ दिवसांनी तो मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे घेऊन जात असे. खरं तर प्रेग्नन्सी केअर पुस्तकांमध्ये दर महिन्याला चेकप करावे असे लिहिलेले असतानाही तो मला दर आठवड्याला डॉक्टरकडे का नेत असे मला कळत नव्हतं. हॉस्पिटलमधे चेकप झाल्यावर तो मला मॉलमध्ये फिरायला नेत असे. अर्थातच दर वेळी फतिमा आणि सलमा सोबत असतच. आम्ही सोबत असलो की सलमा खूप खरेदी करत असे. सिनेमांच्या आणि गाण्यांच्या सीडीज, कपडे, चपला आणि खेळणी म्हणजे सॉफ्ट टॉय आणि वेगवेगळे गेम्स.

सलमा खूप बडबडी. त्यातून तिला सिनेमा पाहायला खूप आवडत असे. त्यांच्या घरातली ती पहिली मुलगी जिने खूप इंग्लिश सिनेमे पाहिले होते. इतकेच नव्हे तर तिने लहान मुलांसाठीच्या स्पेशल सिरिअल्स, कार्टून्सही खूप पाहिले होते.ती सतत माझ्याशी कोणत्या ना कोणत्या सिनेमा बद्दल किंवा कार्टून बद्दल बोलत असे. ती रफिकची खूप लाडकी होती. रफिक अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन सलमाचे जवळ जवळ सगळे हट्ट पुरवत असे. रफिकच्या पाठिंब्यामुळे सलमा कॉलेजमध्ये बॉटनी शिकत होती. इतकेच नव्हे तर सलमाला आवडणार्‍या मुलाबरोबर तिचे लग्न ठरवायला रफिकनेच पाठिंबा दिला होता. तो मुलगाही अजूनही शिकत होता. त्यांचे लग्न ठरून दोन वर्षे झाली होती. सौदीच्या रिवाजाप्रमाणे त्यावेळीही सलमाचा त्या मुलाशी निकाह होऊ शकला असता, पण तज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्याच्या सांगण्यावरून आणि रफिकच्या अनुमोदनामुळे सलमाचे कॉलेज शिक्षण संपल्यानंतरच तिचा त्या मुलाशी निकाह होणार होता. इतकेच नव्हे ती निकाहनंतर इंग्लंडला जाणार होती. कामापुरतेच बोलणार्‍या फातिमापेक्षा सलमाचा सहवास मला जास्त सुखकारक वाटत असे. ती माझ्याशी तिच्या कलेक्शनमधले गेम्सही खेळत असे. आम्ही एकत्र सिनेमा बघत असू गाणी ऐकत असू. त्या काळात माझ्याशी बोलून तिने तिचे बोली इंग्लिश खूप सुधारले होते. खूप हुषार होते ती. पण ती देखील रफिकच्या घराबद्दल त्याच्या कुटुंबियांबद्दल फारसे काही बोलत नसे. सारखे इकडचे तिकडचे बोलणे. सलमाचं वाचनही खूप चांगलं होतं. तिने इंग्लिशमधल्या चांगल्या कादंबर्‍या वाचल्या होत्या. बरीचशी मोटिव्हेशनल पुस्तकं वाचली होती. मला तिच्य कडून समजलं ते एवढच की तिच्या बाकीच्या बहिणींना लग्न होण्यापूर्वीदेखील घरात खूप कामे करावी लागत त्यामुळे त्यांचे कॉलेज शिक्षण झालेले नव्हते. याउलट सलमाला घरात काहीच काम करावे लागत नसे. तिच्या सोबत राहून मला अरेबिकचे काही शब्द समजायला सुरुवात झाली होती. मी अरेबिकमधली छोटी छोटी वाक्य बोलू शकत होते. रफिकच्या चारही अम्मी मला रोज भेटायच्या. बोलायला यायच्या. सुरुवातीचे काही दिवस सलमा त्यांचे बोलणे मला इंग्लिशमध्ये सांगायची. मग माझी उत्तरे त्यांना अरेबिक मध्ये. हळू हळू त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मला पाठ होऊन गेली. त्या सतत विचारीत, कशी आहेस, काही त्रास नाही ना, काही खायला हवे का? भरपूर काम कर, काम नाही तर व्यायाम कर म्हणजे बाळ होताना काही त्रास होत नाही.

ह्या सगळ्या संभाषणातच सलमानेच माझे नामकरण सकिना असे केले. रफिकच्या सगळ्या अम्मी, फातिमा आणि खुद्द सलमा मला सकिना म्हणून हाक मारीत. रफिक मात्र मला सुनिता म्हणूनच हाक मारत असे. हॉस्पिटलच्या कार्डवर मात्र माझे नाव सरिता गोखले असेच लिहिले होते. माझ्या पासपोर्टवर हेच नाव होते.

साधारण महिन्याभराने रफिकने तो विषय माझ्याकडे काढला.
"सुनू, बडी अम्मी अब्बू म्हणत आहेत की, इस्लामिक प्रथेनुसार बेबीच्या आई वडिलांचा एकमेकांशी निकाह व्हायला हवं आणि बेबीच्या आईला कुराण वाचता यायला हवं आणि तिने इस्लाम मध्ये सांगितलेल्या सगळ्या प्रार्थना केल्या पाहिजेत. शिवाय तुला काही खास वस्तू म्हणजे कमी मसाला, कमी मिरचीचं जेवण, खजूर अशा काही गोष्टी तुला खाव्या लागतील. त्यात नॉन वेज नसेल. तर मी तुझ्या वतीने सांगितलय की इस्लाम धर्म स्वीकारायला तयार आहेस आणि निकाह साठी सुद्धा. आज रविवार. येत्या गुरुवारी आपण तू इस्लाम स्वीकारण्याचा कार्यक्रम करू. त्यासाठी आवश्यक ती मदत फातिमा करेल तुला. तुला काही प्रार्थना पाठ करायला लागतील आणि लगेचच शुक्रवारी तुझा माझा निकाह होईल इथल्या पद्धतीप्रमाणे" मी मोठा आवंढा गिळून होकार दर्शवला. आनंद झाला हे दाखवण्यासाठी रफिकला बिलगले आणि मग त्या रात्री बाथरूम मध्ये जाऊन खूप रडून घेतले.

रफिकने सांगिल्याप्रमाणे फातिमाने मला 'ला इलाह' कसे म्हणायचे ते शिकवले आणि गुरुवारी मी इस्लाम धर्म स्वीकारला. मी सौदीची नागरिक नव्हते पण आता सौदीच्या कागदोपत्री माझे नाव सरिता गोखले उर्फ सकिना असे झाले. यापुढे हॉस्पिटलच्या कोणत्याही कागदपत्रावर माझे नाव सकिना असे असणार होते.

दुसर्‍या दिवशी माझा रफिकबरोबर निकाह होता. निकाहची तयारी अगदी जोरदार नाही तरी चांगलीच चालू होती. रफिकच्या बहिणी आणि इतर नातेवाईक बायका रफिकच्या घरी येऊन राहिल्या होत्या. येता जाता मला कोणी ना कोणी तरी बघायला, भेटायला येत होत्या. रफिकच्या घरात गाणे बजावणे आणि खाणे जोरदार चालू होते. संध्याकाळी फातिमाने माझ्या हातावर मेंदी काढली. सलमाला तिच्या मोठ्या बहिणींसोबत गप्पा मारायच्या असल्याने त्या रात्री फातिमा माझ्यासोबत राहणार होती.

क्रमशः

पुढील भाग - http://www.maayboli.com/node/47410

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या नायिकेला आधुनिक "सीता" का बरे म्हणावे ? प्रेगनंट झाली वगैरे मुद्दे बाजूला ठेवले तर कुठेही (अगदी २६ ही भागामधे) ही नायिका सुटकेसाठी काहीही मानसिक प्रयत्नदेखील करताना दिसत नाही, अथवा तशी इच्छादेखील ठेवत नाही. रफीक म्हणाला, म्हणून त्याच्याबरोबर सेक्स, मग मूल होऊ नये म्हणून काहीही काळजी घेतली नाही, मग आता म्हणाला धर्म बदल, म्हणून धर्म बदलला, निकाह कर म्हणून निकाह केला. नायिकेची स्वतःची इच्छा अथवा प्रयत्न आहेत कुठे?

धर्म बदलण्याच्या प्रसंगामधे तर कुठेही नायिकेला काहीही वाटताना दाखवलेले नाही. बिनधास्त आहे, मेंदीवगैरे काढून घेतेय. जस्ट "कार्यक्रम झाला" एवढेच मेन्शन? नक्की काय कार्यक्रम झाला??
पहिल्या काही भागामधे नायिका फार धर्मपरायण वगैरे दाखवली होती ना? मग धर्म बदलताना तिला इमोशनली काहीही वाटले नाही?

हॉस्पिटल रफीकचेच आहे ना? मग सोनोग्राफे रिपोर्टवर काहीही नाव असले तरी त्याला काय फरक पडतो?? आणि पडत असेल तर ते विचारायला वकीलाकडे कशाला गेला? निकाह करण्याआधी सरिताला धर्म बदलावा लागेल हे तर त्यालाही माहित असणार की. (सौदीमधे स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट नाही, भारतात आहे)

कथा तिथेच तिथेच फिरते आहे. पुढे जातच नाहीये. सरिता सुटका वगैरे न करता मिसेस रफीक बनून तिथेच राहातेय बहुतेक.

तिच्याकडे काही ऑप्शन आहे का. तुम्हाला काय वाटतय तिने काय करावं. रडून आक्रस्ताळेपणा करून काही होणार आहे का? जिथे तिला नजर कैदेत ठेवलं होतं तिथून ती पळून जाऊ शकली असती का?

पुढच्या भागाची वाट पाहा एवढच मी सांगेन.

बरेच ऑप्शन पहिल्यापासून आहेत. नायिका त्यांचा कधी विचारदेखील करताना दिसत नाही. सुटकेचा काही प्लान मनातल्या मनात बनवताना अद्याप तरी दिसत नाहीये. फर्स्ट पर्सन नॅरेटीव्ह असल्याने किमान ते तरी दाखवता येऊ शकतं.

अजूनतरी २६ भागानंतरदेखील नवनवीन कॅरेक्टर्सच अ‍ॅड होताना दिसत आहेत. कुठल्याच कॅरेक्टरचा ग्राफ उभा राहिलेला नाही. रफीक काय आणी त्याचं अख्खं घर काय सौदी असण्यापेक्षा लखनौ अथवा अवधचे (फिल्मी) मुसलमान जास्त वाटत आहेत. आधीच्या पण एका भागात लिहिलं होतं मी- रफीकमधे सौदी पुरूषाची मानसिकता अजिब्बात दिसत नाही.

रफीकचा लहानपणीचा फोटो लावला आहे वगैरे... फोटोग्राफीबद्दल सौदी मुसलमानांचे काय विचार आहेत ते एकदा तपासून घ्या. बहुतेक सौदींच्या मते. फोटोग्राफी इज अन-इस्लामिक. घरामधे तर कधीही "व्यक्तीचा" फोटो लावलेला दिसणार नाही त्यामागे त्यांची फार मोठी धार्मिक धारणा आहे.. आपल्या भारतातल्या देवबंदीने पण असाच फतवा नुकताच काढला होता मग तो नंतर मागे घेण्यात आला आहे.

धर्म बदलण्याचा कार्यक्रम : कधीच नाही, कायम "इस्लाम स्विकारण्याचा कार्यक्रम" असंच म्हटलं जातं. या फार छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण फार महत्त्वाच्या असतात. एका सौदी मुस्लिमसाठी "हिंदू हा धर्म नाही" त्यामुळे "धर्म बदलण्याचा कार्यक्रम" असे म्हटलेदेखील जाणार नाही. तपशीलामधे अशा चुका टाळल्या
तर वाचकांना वाचायला बरं पडतं.

Nandini tai chya 2nhi post na +100 anumodan
Sorry vallari pan katha ata bharkataleli vatatey.....pu. Le. Shu.

नंदिनी +१

कथेचे २६ भाग झाले पण आतापर्यंत जे काही झालं ते एकूण ५-६ भागात होऊन गेल्यासारखं वाटतय. कथा फारशी पुढे सरकत नाहिये. त्यातल्या त्यात नायिका आणि रफिक सोडल्यास बाकि पात्रसुद्धा तशी काहिच करत नाहियेत असं वाटतय. यापुढे लगेच कथेला काहितरी जोरदार वळण लागेल अशी आशा आहे.

पु.ले.शु.

<कथा तिथेच तिथेच फिरते आहे. पुढे जातच नाहीये.>+१००००

त्यामुळे पुढे वाचण्यात काही मजा नाही.

शक्यता नंबर १ - सरिता बाळंत होणार आणि तिची सुटका होणार, सागर तिचा स्विकार करणार नाही (कारण ती सिता आहे)

शक्यता नंबर २ - सलमा सरिताला पळून जायला मदत करणार, तरिही पुढे सागर तिचा स्विकार करणार किंवा नाही

शक्यता नंबर ३- जर रफिकने त्याच्या बाळाची आई म्हणून निवड केली आहे हे सरिताच्या लक्षात आल तर ती त्याला बाळ होऊ देईन किंवा नाही यावरून blackmail करू शकते

शक्यता नंबर ४ - सकिना तिथेच राहून रफिक वर आणि त्याच्या कुटुंबावर राज्य करणार

अजुन एक शक्यता.. :- रफिक ला फक्त बाळच हवं होतं .. आता ते फक्त सरीता कडुनच का? याला काहिही कारण असु शकत जस की ती सुनिता सारखी दिसते ई. ..... नंतर बाळ मिळाले गरज संपली की सरीता कडे दुर्लक्ष .. आणि तिची सलमा ई. मध्यमांतुन सुटका... सागर ने स्विकार न करणे...

बाकी सागरने स्विकार न करणे यावर सगळे ठाम दिसताहेत...

तसेही सागरने सीतेचा स्विकार केला तर आयुष्यभर सीतेला सागरच्या या एवरेस्टइतक्या उपकाराखाली दडपुन आयुष्य घालवावे लागेल. त्यापेक्षा सीतेने स्वतःचे आयुष्य स्वतःच शोधलेले बरे.

मूळ सीता किती हजार वर्षे आधी होऊन गेली माहित नाही पण आपल्या समाजाची विचारसरणी अजुनही त्या सीतेच्या वेळेलाच थबकलीय... Sad

वेल, आता लवकर संपव गोष्ट. सुरवातीच्या दोन तीन भागांनंतर सीतेची गोष्टही एकाच जागी थबकल्यासारखी वाटतेय. बुद्धिबळाचा खेळ वगैरे वाचुन सीता काहीतरी डाव टाकेल असे वाटलेले पण तिच्या फेवरमध्ये काहीच घडले नाही. आता तर सीता अजुनच अडकलीय. आता लगेच जर सुटली नाही तर मग कायमचीच अडकेल. मग तिचा मुलगा मोठा होऊन तिला भारतात घेऊन जातो आणि ती तिथुन सटकते असे दाखवावे लागेल.

नंदीनीच्या दोन्ही पोस्ट ना प्रचंड अनुमोदन...

सरीताकडे बरेच मार्ग होते..
ती psycology practice करणारी असते त्याच देखिल काहीच उपयोग दिसला नाही...
जे होत ते होउ द्या ह्याच्यावर तिचा भर आहे..

सीते सारख काहिच केलं नाही... फक्त परीस्थीति सारखी आहे..
सीता परीस्थीतीमुळे नाही तर तिच्या वागण्यामुळे नमनीय आहे.

१) रावण जेव्हा तिला पळवुन नेत होता तेव्हा तीने आपले दागिने काढुन खाली टाकायला सुरुवात केली.. जेणेकरुन रामाला कळाव ति कुठे आहे..
२) रावणाला तिला स्पर्श करायची सुद्दा भिती वाट्ली.. फक्त एका गवताच्या काडीने तीने त्याला दुर ठेवल..

अजुनही बरच काही... ह्या गोष्टी वेगवेगळ्या रुपकाने यायला हव्या होत्या...

बघु वाट पुढ्च्या भागात उत्तर येतिल अस वाट्त आहे...
पु.ले.शु.

नंदीनीच्या दोन्ही पोस्ट +१

आधुनिक सीता म्हणून सीतेचे नाव तेवढे खराब होतेय असे वाटतेय

तिची गोष्ट तिला लिहु देउया ना....

ती काय सिरिअल आहे का..जिच्याबद्दल आपण सुचवत रहायच आणि टिआर्पी प्रमाणे ती बदलेल..
लिहितेय लिहुद्या..शिकतेय शिकुद्या..तिचीही काहितरी विचारप्रणाली असेलच ना....

मूळ सीता किती हजार वर्षे आधी होऊन गेली माहित नाही पण आपल्या समाजाची विचारसरणी अजुनही त्या सीतेच्या वेळेलाच थबकलीय... >>> +१०००

तिची गोष्ट तिला लिहु देउया ना.... > अनुमोदन.+१००
वेल please public pressure ला बळी पडू नकोस.

रफीकमधे सौदी पुरूषाची मानसिकता अजिब्बात दिसत नाही. >>> -१

नंदिनी really? तू कीती सौदी पुरुषान्ना जवळुन ओळखतेस? मी गेली ७-८ वर्ष काहीन्ना जवळुन ओळ्खते आणि मला रफीकमधे सौदी पुरूषाची मानसिकता दिसते. माझ्याकडे त्यान्चे real life किस्से आहेत पण एवड मराठीत टाईप करण जमणार नाही आणि english मधे टाईप केल की ईथे बोम्बाबोम्ब होते. Happy

नंदिनी really? तू कीती सौदी पुरुषान्ना जवळुन ओळखतेस?<<< बर्‍याच. माझा बेस्ट फ्रेन्डचा नवरा अरब आहे. इतरही बरेच मित्र-मैत्रीणी आहेत. माझा एक बॉस अरब आहे. सौदीमधे काम करणारे तर अनेक लोक ओळखीचे आहेत..

वेल,
सरिताच्या आई-वडील. भाउ, एक्स नवरा यापैकी कुणालाच सौदी ल येउन मुलगी कशी आहे याची शहानिशा करावी वाटली नाही?
का कथा एकपात्री आहे त्यामुळे ते करत असलेले प्रयत्न नरेट होत नहियेत?

अरब पुरुषांची मानसिकता बघता, हे मूल, यानंतर दर दीड वर्षात एक अशा फ्रिक्वेन्ची ने सरिताला मुलं होत रहातिल.. मग आहेच "चार दिवस सासुचे"...कथेचे उद्दिष्ट काय आहे? सुरुवातीला जशी कथेने पकड घेतली होती तशी आता घेत नाहिये.. नवीन भाग आला की, हाताला काही नवीन धागा लागेल असं वाटत असताना भाग संपतो... नवीन काही सुचत नसेल, कथेला योग्य दिशा देउ शकत नसाल तर २ भागांमध्ये अजुन मोठे ब्रेक घेतलेत तरी चालतील...
येथे सरिता स्वत। काहीच करु शकत नाही सुटकेसाठी.. तिला बाहेरुन कुणाचीतरी मदत मिळणं भाग आहे, नाहितर रफिकचच मतपरिवर्तन होणं; जे कदाचित मुलं झाल्यवर होईल...
(केवळ मुल व्हावं म्हणुन संगन्मताने सागर अन रफिक ने हि खेळी खेळली असेल, मग सागर अन रफिक दोघही व्हिलन !! मग सरिता सागलाबद्दल द्वेष ठेवुन त्याल सोडुन लांब जाईल---> आधुनिक सीता !!!)

तुमच्या लेखन कौशल्यामुळे पुधील भागाची वाट पाहिली जाते... पण जर काहीच हॅपेनिंग मिळत नसेल तर किती दिवस तेच ते रुटिन वाचायच आम्ही?? उठली, फतिमने दिलेले सुप प्यय्ली, रफिक बरोबर वेळ घलवला, मग बाथरुम मध्ये जाउन रडली...
काहीतरी मेजर ट्विस्ट येउ द्या...
रबर ताणलं की तुटतं..

असो...

कथेचे २६ भाग झाले पण आतापर्यंत जे काही झालं ते एकूण ५-६ भागात होऊन गेल्यासारखं वाटतय. कथा फारशी पुढे सरकत नाहिये. त्यातल्या त्यात नायिका आणि रफिक सोडल्यास बाकि पात्रसुद्धा तशी काहिच करत नाहियेत असं वाटतय.
>>> + १

अशीच प्रतिक्रिया मी मागील भागावर दि ली होती, पुन्हा पोस्टतोय..
>>>>>

खरे सांगायचे तर ही कादंबरी जरा जास्तच पाल्हाळ लावतेय आणि विनाकारण खेचली जातेय असे तीव्रतेने जाणवतेय.
एकतर दहा -वीस ओळींचे भाग आणि म्हणावे तसे उत्कंठावर्धक किंवा पकड घेणारे भाग काही दिसत नाहीये. अगदी ४ आठवड्यांनंतर आले तरी ४-५ भाग पोस्ट केलेले दिसतात आणि ते ही १० मिनिटात वाचून संपतात आणि विशेष काही घडत नाही..

कादंबरी सुत्र चांगले आहे पण अती तेथे माती हे सुत्र लक्षात ठेवली तर कादंबरी चांगली पकड घेईल आणि सातत्य राहिले तर उत्सुकता कायम राहील.

तिची गोष्ट तिला लिहु देउया ना....

ती काय सिरिअल आहे का..जिच्याबद्दल आपण सुचवत रहायच आणि टिआर्पी प्रमाणे ती बदलेल..
लिहितेय लिहुद्या..शिकतेय शिकुद्या..तिचीही काहितरी विचारप्रणाली असेलच ना....>>>>>: अगदी !

नंदिनीने अगदी माझ्या मनातल लिहिलय. हा भाग वाचल्यावर अस वाटल कि सरिता रफिकच्या प्रेमात पडली आहे. दर आठवड्याला तो हॉस्पिटल , माल ला नेतो तेव्हाही हि बाई काहीच विचार करत नाही पळून जाण्याचा. एकदा का ५-६ महिने झाले की काय करणार आहे पोटातल्या बाळाला घेऊन . मग तर पळता पण येणार नाही . बाळ झाल्यावर तर नाहीच नाही

सरिताच्या आई-वडील. भाउ, एक्स नवरा यापैकी कुणालाच सौदी ल येउन मुलगी कशी आहे याची शहानिशा करावी वाटली नाही?+ १०

सागरला माहित आहे ती कुठे आहे ते. पण तो हि काहीच प्रयत्न करतानI दिसत नाही . त्याच्यामुळेच अडकली आहे न सरिता guilty वाटत नाही का त्याला. Emabassy ची मदत घेऊ शकतो ना भारतात आल्यावर.
आता ही कथा संपायला हवी आहे

नंदिनीताईच्या सर्व पोष्टना प्रचंड अनुमोदन +++++++ 1000
मानसकन्या, शलाका पाटील, गीता, विद्या, छोटी, रतु, साधना आबासाहेब, चौकट राजा, प्रिती विराज व मीच तो यांच्यापण पोष्टना अनुमोदन......
ही कथा फक्त सीतेचे नाव खराब करायलाच लिहित आहे वाटते..........

ही कथा फक्त सीतेचे नाव खराब करायलाच लिहित आहे वाटते.......... >>> हे जरा अति होतंय हां.

आतापर्यंत लिहिलेल्या कथेवर मतं द्या पण लेखिकेला जसं हवंय तसं लिहू द्यात. तिला कथा सुचवू नका.

>>>> दर आठवड्याला तो हॉस्पिटल , माल ला नेतो तेव्हाही हि बाई काहीच विचार करत नाही पळून जाण्याचा. >>>> कुठे पळणार? तिला हा देशही माहित नाहीये. आणि तिच्याकडे तिचा पासपोर्टही नाहीये. सीता देखिल पळून गेली नव्हती.

*************************************************************************************

सीतेच्या बाबतीत नशिबाचा भाग असा की रावणाने तिच्यावर जबरदस्ती केली नाही. तिला सन्मानानं वागवलं. या उलट रफिकनं नायिकेला स्पष्ट संकेत दिले होते की जर ती स्वतःहून त्याच्या स्वाधीन झाली नाही तर तो तिच्यावर जबरदस्ती करेल. काय करणार होती ती या परिस्थितीत?

मात्र कथा रेंगाळते आहे याबद्दल सहमत.

Pages