आधुनिक सीता - २६

Submitted by वेल on 13 January, 2014 - 07:53

bhaag 25- http://www.maayboli.com/node/47055

रफिकच्या घरातल्या सगळ्या बायका मोठ्या मोठ्या आवाजात काही तरी बोलत होत्या, एका सेकंदाचीही विश्रांती न घेता. एवढ्या मोठ्या आवाजातल्या बोलणे ऐकण्याची मला सवय नव्हती शिवाय गेल्या सहा महिन्यात तर मी रफिक आणि फातिमा ह्या दोघांच्या आवाजाशिवाय कोणाचाच आवाज ऐकला नव्हता. त्या प्रचंड कलकलाटाचा त्रास होऊन मी तिथेच चक्कर येऊन बेशुद्ध पडले.

मला पुन्हा जाग आली तेव्हा मी वेगळ्याच खोलीत होते. रफिकच्या सगळ्या नातेवाईक बायका माझ्या आजूबाजूला होत्या. मी शुद्धीवर येताच त्यांचा कलकलाट पुन्हा सुरू झाला. रफिकच्या सर्वात लहान बहिणीने त्यांना ढकलतच त्या खोलीबाहेर नेलं. थोड्या वेळाने फातिमा आणि रफिकची सर्वात धाकटी बहिण - सलमा पुन्हा तिथे आल्या. त्यांनी माझ्यासाठी सूप आणलं होतं. मी फतिमाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"यु ड्रिंक. वेज सूप. नो नॉनवेज." माझे सूप पिऊन होते तोवर रफिक त्या खोलीत आला त्याच्या हातात एक फ्रेम होती. रफिकने ती फ्रेम मी बसलेल्या बेडसमोर टेबलावर ठेवली. त्या फ्रेममध्ये एका लहान मुलाचा फोटो होता.

"हा माझा लहानपणीचा फोटो. बघ किती गोंडस होतो मी. मुद्दाम तुझ्यासमोर लावलाय. रोज माझा लहानपणीचा फोटो पाहिला की माझं बाळ कसं माझ्यासारखं गोंडस दिसेल. म्हणजे मुलगी झाली तर तुझ्यासारखी दिसायला हरकत नाही पण मुलगा झाला तर तो माझ्यासारखाच दिसायला हवा. खर तर अम्मी अब्बूना हे पटत नव्हतं. त्यांचं मत फोटो फक्त आल्बम मध्ये ठेवावेत. पण मी तेच करतो जे मला पटतं. बडी अम्मीला पटवून दिलं की झालं. बडी अम्मीला मी पटवून दिलय. बाकीच्यांची चिंता मी करत नाही. "
मी मान डोलावली. मनात म्हटलं इथं मला हे बाळ नकोच आहे. तुझ्या सारखं ते दिसायचा न दिसायचा प्रश्नच येत नाही.
"आणि तू आजपासून ह्या खोलीत राहशील. सलमा तुझ्यासोबतच राहिल. तुझं सामान सगळं ह्या खोलीत आणून ठेवलं जाईल. तुला काही हवं असेल तर हिला सांग. फातिमा तर असेलच येऊन जाऊन. तसं सलमालासुद्धा थोडंफार इंग्लिश येतं बोलता."
मी काय बोलणार मी फक्त मान डोलावली.

ह्यानंतरचे पुढचा महिना खूपच वेगात गेला. रफिकने मला वाचायला प्रेग्नंसी केअर बेबी केअर वर काही पुस्तके आणून दिली होती. तो मला रोज घराबाहेरच्या बागेत फिरायला घेऊन जात असे. बागेभोवती उंच भिंती होत्या. दर आठ दिवसांनी तो मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे घेऊन जात असे. खरं तर प्रेग्नन्सी केअर पुस्तकांमध्ये दर महिन्याला चेकप करावे असे लिहिलेले असतानाही तो मला दर आठवड्याला डॉक्टरकडे का नेत असे मला कळत नव्हतं. हॉस्पिटलमधे चेकप झाल्यावर तो मला मॉलमध्ये फिरायला नेत असे. अर्थातच दर वेळी फतिमा आणि सलमा सोबत असतच. आम्ही सोबत असलो की सलमा खूप खरेदी करत असे. सिनेमांच्या आणि गाण्यांच्या सीडीज, कपडे, चपला आणि खेळणी म्हणजे सॉफ्ट टॉय आणि वेगवेगळे गेम्स.

सलमा खूप बडबडी. त्यातून तिला सिनेमा पाहायला खूप आवडत असे. त्यांच्या घरातली ती पहिली मुलगी जिने खूप इंग्लिश सिनेमे पाहिले होते. इतकेच नव्हे तर तिने लहान मुलांसाठीच्या स्पेशल सिरिअल्स, कार्टून्सही खूप पाहिले होते.ती सतत माझ्याशी कोणत्या ना कोणत्या सिनेमा बद्दल किंवा कार्टून बद्दल बोलत असे. ती रफिकची खूप लाडकी होती. रफिक अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन सलमाचे जवळ जवळ सगळे हट्ट पुरवत असे. रफिकच्या पाठिंब्यामुळे सलमा कॉलेजमध्ये बॉटनी शिकत होती. इतकेच नव्हे तर सलमाला आवडणार्‍या मुलाबरोबर तिचे लग्न ठरवायला रफिकनेच पाठिंबा दिला होता. तो मुलगाही अजूनही शिकत होता. त्यांचे लग्न ठरून दोन वर्षे झाली होती. सौदीच्या रिवाजाप्रमाणे त्यावेळीही सलमाचा त्या मुलाशी निकाह होऊ शकला असता, पण तज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्याच्या सांगण्यावरून आणि रफिकच्या अनुमोदनामुळे सलमाचे कॉलेज शिक्षण संपल्यानंतरच तिचा त्या मुलाशी निकाह होणार होता. इतकेच नव्हे ती निकाहनंतर इंग्लंडला जाणार होती. कामापुरतेच बोलणार्‍या फातिमापेक्षा सलमाचा सहवास मला जास्त सुखकारक वाटत असे. ती माझ्याशी तिच्या कलेक्शनमधले गेम्सही खेळत असे. आम्ही एकत्र सिनेमा बघत असू गाणी ऐकत असू. त्या काळात माझ्याशी बोलून तिने तिचे बोली इंग्लिश खूप सुधारले होते. खूप हुषार होते ती. पण ती देखील रफिकच्या घराबद्दल त्याच्या कुटुंबियांबद्दल फारसे काही बोलत नसे. सारखे इकडचे तिकडचे बोलणे. सलमाचं वाचनही खूप चांगलं होतं. तिने इंग्लिशमधल्या चांगल्या कादंबर्‍या वाचल्या होत्या. बरीचशी मोटिव्हेशनल पुस्तकं वाचली होती. मला तिच्य कडून समजलं ते एवढच की तिच्या बाकीच्या बहिणींना लग्न होण्यापूर्वीदेखील घरात खूप कामे करावी लागत त्यामुळे त्यांचे कॉलेज शिक्षण झालेले नव्हते. याउलट सलमाला घरात काहीच काम करावे लागत नसे. तिच्या सोबत राहून मला अरेबिकचे काही शब्द समजायला सुरुवात झाली होती. मी अरेबिकमधली छोटी छोटी वाक्य बोलू शकत होते. रफिकच्या चारही अम्मी मला रोज भेटायच्या. बोलायला यायच्या. सुरुवातीचे काही दिवस सलमा त्यांचे बोलणे मला इंग्लिशमध्ये सांगायची. मग माझी उत्तरे त्यांना अरेबिक मध्ये. हळू हळू त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मला पाठ होऊन गेली. त्या सतत विचारीत, कशी आहेस, काही त्रास नाही ना, काही खायला हवे का? भरपूर काम कर, काम नाही तर व्यायाम कर म्हणजे बाळ होताना काही त्रास होत नाही.

ह्या सगळ्या संभाषणातच सलमानेच माझे नामकरण सकिना असे केले. रफिकच्या सगळ्या अम्मी, फातिमा आणि खुद्द सलमा मला सकिना म्हणून हाक मारीत. रफिक मात्र मला सुनिता म्हणूनच हाक मारत असे. हॉस्पिटलच्या कार्डवर मात्र माझे नाव सरिता गोखले असेच लिहिले होते. माझ्या पासपोर्टवर हेच नाव होते.

साधारण महिन्याभराने रफिकने तो विषय माझ्याकडे काढला.
"सुनू, बडी अम्मी अब्बू म्हणत आहेत की, इस्लामिक प्रथेनुसार बेबीच्या आई वडिलांचा एकमेकांशी निकाह व्हायला हवं आणि बेबीच्या आईला कुराण वाचता यायला हवं आणि तिने इस्लाम मध्ये सांगितलेल्या सगळ्या प्रार्थना केल्या पाहिजेत. शिवाय तुला काही खास वस्तू म्हणजे कमी मसाला, कमी मिरचीचं जेवण, खजूर अशा काही गोष्टी तुला खाव्या लागतील. त्यात नॉन वेज नसेल. तर मी तुझ्या वतीने सांगितलय की इस्लाम धर्म स्वीकारायला तयार आहेस आणि निकाह साठी सुद्धा. आज रविवार. येत्या गुरुवारी आपण तू इस्लाम स्वीकारण्याचा कार्यक्रम करू. त्यासाठी आवश्यक ती मदत फातिमा करेल तुला. तुला काही प्रार्थना पाठ करायला लागतील आणि लगेचच शुक्रवारी तुझा माझा निकाह होईल इथल्या पद्धतीप्रमाणे" मी मोठा आवंढा गिळून होकार दर्शवला. आनंद झाला हे दाखवण्यासाठी रफिकला बिलगले आणि मग त्या रात्री बाथरूम मध्ये जाऊन खूप रडून घेतले.

रफिकने सांगिल्याप्रमाणे फातिमाने मला 'ला इलाह' कसे म्हणायचे ते शिकवले आणि गुरुवारी मी इस्लाम धर्म स्वीकारला. मी सौदीची नागरिक नव्हते पण आता सौदीच्या कागदोपत्री माझे नाव सरिता गोखले उर्फ सकिना असे झाले. यापुढे हॉस्पिटलच्या कोणत्याही कागदपत्रावर माझे नाव सकिना असे असणार होते.

दुसर्‍या दिवशी माझा रफिकबरोबर निकाह होता. निकाहची तयारी अगदी जोरदार नाही तरी चांगलीच चालू होती. रफिकच्या बहिणी आणि इतर नातेवाईक बायका रफिकच्या घरी येऊन राहिल्या होत्या. येता जाता मला कोणी ना कोणी तरी बघायला, भेटायला येत होत्या. रफिकच्या घरात गाणे बजावणे आणि खाणे जोरदार चालू होते. संध्याकाळी फातिमाने माझ्या हातावर मेंदी काढली. सलमाला तिच्या मोठ्या बहिणींसोबत गप्पा मारायच्या असल्याने त्या रात्री फातिमा माझ्यासोबत राहणार होती.

क्रमशः

पुढील भाग - http://www.maayboli.com/node/47410

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages