आधुनिक सीता - २६

Submitted by वेल on 13 January, 2014 - 07:53

bhaag 25- http://www.maayboli.com/node/47055

रफिकच्या घरातल्या सगळ्या बायका मोठ्या मोठ्या आवाजात काही तरी बोलत होत्या, एका सेकंदाचीही विश्रांती न घेता. एवढ्या मोठ्या आवाजातल्या बोलणे ऐकण्याची मला सवय नव्हती शिवाय गेल्या सहा महिन्यात तर मी रफिक आणि फातिमा ह्या दोघांच्या आवाजाशिवाय कोणाचाच आवाज ऐकला नव्हता. त्या प्रचंड कलकलाटाचा त्रास होऊन मी तिथेच चक्कर येऊन बेशुद्ध पडले.

मला पुन्हा जाग आली तेव्हा मी वेगळ्याच खोलीत होते. रफिकच्या सगळ्या नातेवाईक बायका माझ्या आजूबाजूला होत्या. मी शुद्धीवर येताच त्यांचा कलकलाट पुन्हा सुरू झाला. रफिकच्या सर्वात लहान बहिणीने त्यांना ढकलतच त्या खोलीबाहेर नेलं. थोड्या वेळाने फातिमा आणि रफिकची सर्वात धाकटी बहिण - सलमा पुन्हा तिथे आल्या. त्यांनी माझ्यासाठी सूप आणलं होतं. मी फतिमाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"यु ड्रिंक. वेज सूप. नो नॉनवेज." माझे सूप पिऊन होते तोवर रफिक त्या खोलीत आला त्याच्या हातात एक फ्रेम होती. रफिकने ती फ्रेम मी बसलेल्या बेडसमोर टेबलावर ठेवली. त्या फ्रेममध्ये एका लहान मुलाचा फोटो होता.

"हा माझा लहानपणीचा फोटो. बघ किती गोंडस होतो मी. मुद्दाम तुझ्यासमोर लावलाय. रोज माझा लहानपणीचा फोटो पाहिला की माझं बाळ कसं माझ्यासारखं गोंडस दिसेल. म्हणजे मुलगी झाली तर तुझ्यासारखी दिसायला हरकत नाही पण मुलगा झाला तर तो माझ्यासारखाच दिसायला हवा. खर तर अम्मी अब्बूना हे पटत नव्हतं. त्यांचं मत फोटो फक्त आल्बम मध्ये ठेवावेत. पण मी तेच करतो जे मला पटतं. बडी अम्मीला पटवून दिलं की झालं. बडी अम्मीला मी पटवून दिलय. बाकीच्यांची चिंता मी करत नाही. "
मी मान डोलावली. मनात म्हटलं इथं मला हे बाळ नकोच आहे. तुझ्या सारखं ते दिसायचा न दिसायचा प्रश्नच येत नाही.
"आणि तू आजपासून ह्या खोलीत राहशील. सलमा तुझ्यासोबतच राहिल. तुझं सामान सगळं ह्या खोलीत आणून ठेवलं जाईल. तुला काही हवं असेल तर हिला सांग. फातिमा तर असेलच येऊन जाऊन. तसं सलमालासुद्धा थोडंफार इंग्लिश येतं बोलता."
मी काय बोलणार मी फक्त मान डोलावली.

ह्यानंतरचे पुढचा महिना खूपच वेगात गेला. रफिकने मला वाचायला प्रेग्नंसी केअर बेबी केअर वर काही पुस्तके आणून दिली होती. तो मला रोज घराबाहेरच्या बागेत फिरायला घेऊन जात असे. बागेभोवती उंच भिंती होत्या. दर आठ दिवसांनी तो मला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे घेऊन जात असे. खरं तर प्रेग्नन्सी केअर पुस्तकांमध्ये दर महिन्याला चेकप करावे असे लिहिलेले असतानाही तो मला दर आठवड्याला डॉक्टरकडे का नेत असे मला कळत नव्हतं. हॉस्पिटलमधे चेकप झाल्यावर तो मला मॉलमध्ये फिरायला नेत असे. अर्थातच दर वेळी फतिमा आणि सलमा सोबत असतच. आम्ही सोबत असलो की सलमा खूप खरेदी करत असे. सिनेमांच्या आणि गाण्यांच्या सीडीज, कपडे, चपला आणि खेळणी म्हणजे सॉफ्ट टॉय आणि वेगवेगळे गेम्स.

सलमा खूप बडबडी. त्यातून तिला सिनेमा पाहायला खूप आवडत असे. त्यांच्या घरातली ती पहिली मुलगी जिने खूप इंग्लिश सिनेमे पाहिले होते. इतकेच नव्हे तर तिने लहान मुलांसाठीच्या स्पेशल सिरिअल्स, कार्टून्सही खूप पाहिले होते.ती सतत माझ्याशी कोणत्या ना कोणत्या सिनेमा बद्दल किंवा कार्टून बद्दल बोलत असे. ती रफिकची खूप लाडकी होती. रफिक अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन सलमाचे जवळ जवळ सगळे हट्ट पुरवत असे. रफिकच्या पाठिंब्यामुळे सलमा कॉलेजमध्ये बॉटनी शिकत होती. इतकेच नव्हे तर सलमाला आवडणार्‍या मुलाबरोबर तिचे लग्न ठरवायला रफिकनेच पाठिंबा दिला होता. तो मुलगाही अजूनही शिकत होता. त्यांचे लग्न ठरून दोन वर्षे झाली होती. सौदीच्या रिवाजाप्रमाणे त्यावेळीही सलमाचा त्या मुलाशी निकाह होऊ शकला असता, पण तज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्याच्या सांगण्यावरून आणि रफिकच्या अनुमोदनामुळे सलमाचे कॉलेज शिक्षण संपल्यानंतरच तिचा त्या मुलाशी निकाह होणार होता. इतकेच नव्हे ती निकाहनंतर इंग्लंडला जाणार होती. कामापुरतेच बोलणार्‍या फातिमापेक्षा सलमाचा सहवास मला जास्त सुखकारक वाटत असे. ती माझ्याशी तिच्या कलेक्शनमधले गेम्सही खेळत असे. आम्ही एकत्र सिनेमा बघत असू गाणी ऐकत असू. त्या काळात माझ्याशी बोलून तिने तिचे बोली इंग्लिश खूप सुधारले होते. खूप हुषार होते ती. पण ती देखील रफिकच्या घराबद्दल त्याच्या कुटुंबियांबद्दल फारसे काही बोलत नसे. सारखे इकडचे तिकडचे बोलणे. सलमाचं वाचनही खूप चांगलं होतं. तिने इंग्लिशमधल्या चांगल्या कादंबर्‍या वाचल्या होत्या. बरीचशी मोटिव्हेशनल पुस्तकं वाचली होती. मला तिच्य कडून समजलं ते एवढच की तिच्या बाकीच्या बहिणींना लग्न होण्यापूर्वीदेखील घरात खूप कामे करावी लागत त्यामुळे त्यांचे कॉलेज शिक्षण झालेले नव्हते. याउलट सलमाला घरात काहीच काम करावे लागत नसे. तिच्या सोबत राहून मला अरेबिकचे काही शब्द समजायला सुरुवात झाली होती. मी अरेबिकमधली छोटी छोटी वाक्य बोलू शकत होते. रफिकच्या चारही अम्मी मला रोज भेटायच्या. बोलायला यायच्या. सुरुवातीचे काही दिवस सलमा त्यांचे बोलणे मला इंग्लिशमध्ये सांगायची. मग माझी उत्तरे त्यांना अरेबिक मध्ये. हळू हळू त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मला पाठ होऊन गेली. त्या सतत विचारीत, कशी आहेस, काही त्रास नाही ना, काही खायला हवे का? भरपूर काम कर, काम नाही तर व्यायाम कर म्हणजे बाळ होताना काही त्रास होत नाही.

ह्या सगळ्या संभाषणातच सलमानेच माझे नामकरण सकिना असे केले. रफिकच्या सगळ्या अम्मी, फातिमा आणि खुद्द सलमा मला सकिना म्हणून हाक मारीत. रफिक मात्र मला सुनिता म्हणूनच हाक मारत असे. हॉस्पिटलच्या कार्डवर मात्र माझे नाव सरिता गोखले असेच लिहिले होते. माझ्या पासपोर्टवर हेच नाव होते.

साधारण महिन्याभराने रफिकने तो विषय माझ्याकडे काढला.
"सुनू, बडी अम्मी अब्बू म्हणत आहेत की, इस्लामिक प्रथेनुसार बेबीच्या आई वडिलांचा एकमेकांशी निकाह व्हायला हवं आणि बेबीच्या आईला कुराण वाचता यायला हवं आणि तिने इस्लाम मध्ये सांगितलेल्या सगळ्या प्रार्थना केल्या पाहिजेत. शिवाय तुला काही खास वस्तू म्हणजे कमी मसाला, कमी मिरचीचं जेवण, खजूर अशा काही गोष्टी तुला खाव्या लागतील. त्यात नॉन वेज नसेल. तर मी तुझ्या वतीने सांगितलय की इस्लाम धर्म स्वीकारायला तयार आहेस आणि निकाह साठी सुद्धा. आज रविवार. येत्या गुरुवारी आपण तू इस्लाम स्वीकारण्याचा कार्यक्रम करू. त्यासाठी आवश्यक ती मदत फातिमा करेल तुला. तुला काही प्रार्थना पाठ करायला लागतील आणि लगेचच शुक्रवारी तुझा माझा निकाह होईल इथल्या पद्धतीप्रमाणे" मी मोठा आवंढा गिळून होकार दर्शवला. आनंद झाला हे दाखवण्यासाठी रफिकला बिलगले आणि मग त्या रात्री बाथरूम मध्ये जाऊन खूप रडून घेतले.

रफिकने सांगिल्याप्रमाणे फातिमाने मला 'ला इलाह' कसे म्हणायचे ते शिकवले आणि गुरुवारी मी इस्लाम धर्म स्वीकारला. मी सौदीची नागरिक नव्हते पण आता सौदीच्या कागदोपत्री माझे नाव सरिता गोखले उर्फ सकिना असे झाले. यापुढे हॉस्पिटलच्या कोणत्याही कागदपत्रावर माझे नाव सकिना असे असणार होते.

दुसर्‍या दिवशी माझा रफिकबरोबर निकाह होता. निकाहची तयारी अगदी जोरदार नाही तरी चांगलीच चालू होती. रफिकच्या बहिणी आणि इतर नातेवाईक बायका रफिकच्या घरी येऊन राहिल्या होत्या. येता जाता मला कोणी ना कोणी तरी बघायला, भेटायला येत होत्या. रफिकच्या घरात गाणे बजावणे आणि खाणे जोरदार चालू होते. संध्याकाळी फातिमाने माझ्या हातावर मेंदी काढली. सलमाला तिच्या मोठ्या बहिणींसोबत गप्पा मारायच्या असल्याने त्या रात्री फातिमा माझ्यासोबत राहणार होती.

क्रमशः

पुढील भाग - http://www.maayboli.com/node/47410

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, थोडंशी असहमती, कारण कशामुळे माहीत नाही पण पटकन माझ्या डोळ्यासमोर नॉट विदाऊट माय डॉअर आलं. त्यात तिलाही देश माहीत नव्हता. आधारासाठी एकही व्यक्ती जवळ नव्हती. तरीही ती सुटकेचे सगळे प्रयत्न करत होतीच!
बाकी ते सीतेचं नाव खराब करायचा प्रयत्न वगैरे अतिच होतंय आणि त्यापेक्षाही फालतू होतंय हे मात्र नक्की!

कथा रेंगाळली आहे. मी नुकतीच वाचायला घेतली आणि इतक्या भागात नविन काहीच वाटत नाहीये Sad

तिला हवी तशी कथा लिहु द्या असा अनेकांचा सूर आहे इथे पण इतके भाग तीने हवेतसेच लिहिले की!
आता कोणी स्वतःचं मत किंवा थोडीफार सुधारणा सांगत असेल तर तिलाही राग येणार नाही असं वाटतय!
आलाच तर तीने सांगावं स्पष्ट म्हणजे वाचक योग्य तो निर्णय घेतील.

पटकन माझ्या डोळ्यासमोर नॉट विदाऊट माय डॉअर आलं. त्यात तिलाही देश माहीत नव्हता. आधारासाठी एकही व्यक्ती जवळ नव्हती. तरीही ती सुटकेचे सगळे प्रयत्न करत होतीच!>>> माझ्याही मनात अगदे हेच विचार आले...

लेखिकेला कथा लिहु देणे, विचार्प्रणाली असणे ई. मान्य..

बाकी ते सीतेचं नाव खराब करायचा प्रयत्न वगैरे अतिच होतंय आणि त्यापेक्षाही फालतू होतंय हे मात्र नक्की!<<<< हे नक्कीच.

बाकी ते सीतेचं नाव खराब करायचा प्रयत्न वगैरे अतिच होतंय आणि त्यापेक्षाही फालतू होतंय हे मात्र नक्की!<<<< मग सरळ शिर्षकच दुस-या नावाचे देऊन टाकायचे ना ..... उगाच कोणत्याही कथेला हिंदु धर्मातीलच नावे कशी आठवतात.......!!!
उलट नाव देऊन पहा बरे म्हणजे मुलगी दुस-या धर्मातील अन् मुलगा हिंदु........ कशा प्रतिक्रिया येतात पहा....... खाऊन टाकतील उगाच हिंदु सहनशील आहे म्हणुन हे अतिच होतय........

अहो, पण या कथेत रफिक आहे ना दुसर्‍या धर्माचा आणि त्यातूनही व्हिलन. रावणाचा रफिक केलाय की आणि रावणापेक्षा वाईट दाखवलाय की! उगाचच उठून जिथे तिथे धर्म मध्ये आणायची काही गरज आहे का? अशी नावं दिल्याने लगेच मूळ व्यक्ती बदनाम होते का? उगाच बिनबुडाचे वाद का सुरू करताय?

रच्याकने, उलट केलं असतं तर त्याबद्दल बोंबाबोंब सुरू झाली असती.

नकोच लिहूस तू नंदिनी. Happy

>>>रावणाचा रफिक केलाय की आणि रावणापेक्षा वाईट दाखवलाय की! >>> हे फक्त विकास दादा पवारांसाठी आहे. आणि हे फक्त समजावून सांगण्यासाठी आहे. यात माझा इतर काहीही उद्देश नाही. Happy

अहो, पण या कथेत रफिक आहे ना दुसर्‍या धर्माचा आणि त्यातूनही व्हिलन. रावणाचा रफिक केलाय की आणि रावणापेक्षा वाईट दाखवलाय की! >>>>>>> तो व्हिलन आहे ना मग नायिकापण व्हिलनच झालेय का 10-15 भागापासुन...... सर्व तेच तेच रंगत बसलीय? आधुनिक रामाने तीला सोडवायचा काही प्रयत्न किंवा तीचे भाऊ, बाप का स्वस्थ बसलेत............. बसु शकतात का? बसु शकत असतील तर मग कथा मस्त चाललीय.......... नावे दिल्याने मुळ व्यक्ती बदनाम होत नाही ना मग उलट दिल्यास फरक पडतो की नाही बघा...

कथा रेंगाळतेय - हे मी मन्य करते आणि थोडा स्पीड घ्ययचा प्रयत्न करते आहे.

बाकी ज्यांच हिंदू धर्म, सीता इत्यादीं बद्दल जे काही मत आहे त्यांना एकच विनंती आहे, कथा पूर्ण होऊ द्यात, मग मी मतदान घेते आणि अगदीच वाटलं तर कथेच नाव बदलते.

आता कोणी स्वतःचं मत किंवा थोडीफार सुधारणा सांगत असेल तर तिलाही राग येणार नाही असं वाटतय!
आलाच तर तीने सांगावं स्पष्ट म्हणजे वाचक योग्य तो निर्णय घेतील.

लेख जेव्हा प्रकाशित केला जातो तेव्हा तो लोकांनी वाचावा ह्या अपेक्षेनेच प्रकाशित केला जातो. वाचणारेही मनाशी काहीतरी अपेक्षा ठेऊन वाचतात आणि वाचल्यावर जेवढी अपेक्षापुर्ती झालीय त्याला अनुसरुन प्रतिक्रिया देतात.

आणि जेव्हा एखादा लेख ओपन फोरमवर लिहिला जातो तेव्हा त्यावर ब-यावाईट, उलटसुलट, खोचकभोचक, प्रोत्साहन देणा-या, खाली ओढणा-या प्रतिक्रिया येणारच. या अशा प्रतिक्रिया ह्या नविन लेखकासाठी एक प्रकारचे शिक्षणच आहे.

टीकात्मक प्रतिक्रियांनी निराश न होता किंवा चिडुन न जाता त्यातुन प्रोत्साहित होऊन यापेक्षाही चांगले लिखाण माझ्या हातुन मी घडवेन आणि टीकेचे रुपांतर कौतुकात करेन हा विश्वास लेखकाने मनात जोपासायला हवा.

साधना - प्रयत्न करते आहे.

कथेचे नाव बदलायचे हे चिडून नाही म्हटले. मनापासून म्हटले. ही कविता मी लिहिली तेव्हा मला ह्यासून समर्पक नाव सुचले नव्हते. पण जर वाचकांना वाटत असेल की नाव चुकले आहे तर मी ते नक्कीच बदलेन. शेवटी वाचणारे आहेत म्हणूनच लिहिण्याला अर्थ आहे नाही तर कथा कादंबरी कविता सगळच व्यर्थ आहे.

ही कथा फक्त सीतेचे नाव खराब करायलाच लिहित आहे वाटते.......... >>> हे जरा अति होतंय हां.

आतापर्यंत लिहिलेल्या कथेवर मतं द्या पण लेखिकेला जसं हवंय तसं लिहू द्यात. तिला कथा सुचवू नका.

>>>> दर आठवड्याला तो हॉस्पिटल , माल ला नेतो तेव्हाही हि बाई काहीच विचार करत नाही पळून जाण्याचा. >>>> कुठे पळणार? तिला हा देशही माहित नाहीये. आणि तिच्याकडे तिचा पासपोर्टही नाहीये. सीता देखिल पळून गेली नव्हती.

*************************************************************************************

सीतेच्या बाबतीत नशिबाचा भाग असा की रावणाने तिच्यावर जबरदस्ती केली नाही. तिला सन्मानानं वागवलं. या उलट रफिकनं नायिकेला स्पष्ट संकेत दिले होते की जर ती स्वतःहून त्याच्या स्वाधीन झाली नाही तर तो तिच्यावर जबरदस्ती करेल. काय करणार होती ती या परिस्थितीत? >>>>>>>>>>>>>> असे असताना मग तिला सीता का म्हणावे???

नंदिनीच्या पोस्टींना आणि मामीला अनुमोदन!!
साधना लेटेस्ट पोस्ट एकदम पटली.

हिंदू धर्म, सीता इत्यादी इत्यादी... का ही ही!! प्रत्येक विषयात जात/धर्म/लिंग वाद उकरून काढायची गरज आहेच का??? श्या कंटाळा आलाय आता...!!

ज्यांना सीता नावाबद्द्ल आक्षेप आहे.. तुमच्या आजुबाजुला राम, शंकर, लक्ष्मी अशा नावाची माणस नाहिच आहेत का? असली तर ती अगदी देवांसारखी वागतात का?

वरिल सर्वांना अनुमोदन - +१००००० >>>>>>> १०० टक्के अनुमोदन.. कथा चांगली आहे वेल, सुरूवातही खूप मस्त आणि उत्कंठावर्धक होती. पण आता २६ भागांनंतरही काही ट्विस्टस किंवा पुढे काय होऊ शकतं, याची झलक दिसत नाहीये. रेंगाळत्ये कथा तिथेच. त्यामुळे थोडा भ्रमनिरास होतोय खरा...! पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही लिहीलेलं वाईट ाहे. उलट तुमच लिखाण आवडतय, कथा पण थोडी वेगळ वाटली म्हणूनच तर आम्ही सगळे उत्सुकतेने वाट पाहतो पुढच्या भागांची.. !

बाकी ते सीतेचं नाव खराब करायचा प्रयत्न वगैरे अतिच होतंय आणि त्यापेक्षाही फालतू होतंय हे मात्र नक्की!<<<< हे नक्कीच. >>> हे मात्र अगदी खरं, यात सीतेचं नाव खराब होण्याचा मला संबंध दिसत नाहीय लेखिकेने तिच्या मनाप्रमाणेच लिहावी कथा, त्या ढवळाढवळ करण्याचा हक्क नाहीचे. आम्ही फक्त चांगल्या लिखाणाचे चाहते म्हणून आणि या कथेचे वाचक म्हणून लेखिकेला थोडे मोठे भाग आणि ट्विस्ट्स किंवा कथेला चालना देणा-या गोष्टी टाकण्याची विनंती करू शकतो.

ज्यांना सीता नावाबद्द्ल आक्षेप आहे.. तुमच्या आजुबाजुला राम, शंकर, लक्ष्मी अशा नावाची माणस नाहिच आहेत का? असली तर ती अगदी देवांसारखी वागतात का? >>> अगदी अगदी खरं आणि योग्य मराठी कुडी..!

सागरला महित आहे सरिता कुठे आहे ते, पण सागर कुठे आहे हे अजून कुणालाच महित नाही .. तो ही कदाचित रफिकच्या कैदेत असेल , रफिकचा काय भरोसा ..

सरिताला सागरचे पत्र मिळाले होते पण ते खरे होते की खोटे ते काय महित. ..

वेल, मुली जे काय आहे ते लिही बर पटापट नाही तर आम्ही लोक असेच अंदाज बांधत राहू आणि एका कथेच्या १५-२० कथा होतिल.

BTW, ही आयडीयाची कल्पना छान आहे कुणी तरी कथा सुरु करा आणि बाकिच्यांनी पुढे चालवा ..

वेल, खरच ह्या सर्व प्रतिसादांना ऊत्तर एकच ...... लगेच पुढचा भाग टाकणे Wink

लवकर लिही

ज्यांना सीता नावाबद्द्ल आक्षेप आहे.. तुमच्या आजुबाजुला राम, शंकर, लक्ष्मी अशा नावाची माणस नाहिच आहेत का? असली तर ती अगदी देवांसारखी वागतात का?
>>>>> इथे कुठ्ल्याही पात्राचं नाव सीता नाही... इथे कथेच्या नावात सीता वापरलं आहे... सीता इथे रुपक म्हणुन वापरल... ते पण देवीच नाव म्हणुन असाव अस मला तरी वाट्लं... ते सीता आणी गीता ह्या चित्रपटातली सीता म्हणुन नसावी किंवा अजुन कुठ्ल्या सीता बद्द्ल लिहिल असेल तर माहिती नाही Happy ...

देवी सीता म्हणुन वापरलं असेल तर तस काही तरी कथेत यावं अशी माफक इच्छा आहे....

वेल, खरच ह्या सर्व प्रतिसादांना ऊत्तर एकच ...... लगेच पुढचा भाग टाकणे

लवकर लिही >>>> ++१११११११११११

लेखिकेला जसं हवंय तसं लिहू द्यात
writer has rights to write as per his/her wish,
some r keeping open end story, some one preferred long one with lots of character,,,
reader has right to say gd ,or bad,etc, but no suggestion,
character in story can work as per writer choice not as per reader choice,,,,

रफीक हे जे पात्र आहे त्या संबंधाने, अरबीच नव्हे कोणत्याही स्त्रीचे हरण करून तिला बंदिवान करून ठेव णार्‍या पुरुषाची दुष्ट, जुलुमी मानसिकता, ह्या नात्यातले क्रौर्य, स्त्रीची हतबलता, चीड, व मग त्याला वापरून सुटका करून घेण्याची धडपड त्यासाठी केलेले प्लॅनिग आणि प्लॉटिन्ग. मनोविचार हे काहीच आलेले नाही फारसे. सर्व वरण भात तूप छाप गोड चालले आहे. प्रत्यक्षात ते तसे नसते किंवा पूर्ण कथानकच त्या लेव्हलचे नसेल. माहीत नाही.

मला वाटते रफीक हा अरबी जन्माने तर मनाने सरितात गुंतलेला असल्याने धाकाचे हत्यार वापरतो पण शारिरिक जुलुम करू इच्छित नाही. खूप गोड नाही पण अंमळ सपक होते आहे खरे...
कदाचित आपल्या अपेक्षा फार उंचावल्या आहेत क्रमश: कथा असल्याने..
एका दमात वाचली असती तर शेवटाकडे पाहून कदाचित सुसह्य झाला असता हा सपकपणा..

<लेखिकेला जसं हवंय तसं लिहू द्यात> - ---- agree

< writer has rights to write as per his/her wish, some r keeping open end story, some one preferred long one with lots of character,,,reader has right to say gd ,or bad,etc, but no suggestion >--if no suggestions from the readers then why to read??? if u give suggestions then there is always scope for improvement (in this case no scope)

> ----- This does not mean readers should to wait.. wait... wait till he/she loses interest in reading..

आधुनिक सीता - part 1 started on 29.8.2013 and even after 26 parts (4 months) there no conclusion or end to this.

मला हे 'आधुनिक सीता - २६ बदलून' असं दिसतंय.
शेवटुन दुसरा आणि तिसरा पॅरा अ‍ॅड केलास ना फक्त?

शेवटुन दुसरा आणि तिसरा पॅरा अ‍ॅड केलास ना फक्त?<<< हो. काही इस्लामबद्दलची वाक्य आणि अरेबिक शिकण्याची वाक्ये अ‍ॅड केलेली आहेत.

पियू - थोडंसं बदललं हो. नंदिनीने काही गोष्टी व्यवस्थित point केल्या होत्या त्या बदलल्या.

Pages