हुलग्याची उसळ आणि सार

Submitted by प्राची on 11 April, 2011 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हुलगे,
ओलं खोबरं,
एक चमचा धणे,
छोटा कांदा,
चिंच,
गुळ,
गोडा मसाला,
लाल मिरचीपूड,
मीठ,
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि भरपूर लसूण,
कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

१. हुलगे आदल्या रात्री भिजत घालावेत.
२. सकाळी भरपूर पाणी घालून कुकरला हुलगे शिजवून घ्यावेत.
३. पाणी आणि हुलगे वेगळे निथळून घ्यावे.
४. ओलं खोबरं, धणे, बारीक चिरलेला कांदा आणि चिंच वाटून घ्यावे. हे वाटण निथळून घेतलेल्या पाण्यात मिसळून चवीप्रमाणे तिखटमीठ घालावे. गूळ घालावा. वरून हिंग-मोहरी, कढीपत्ता, लसणीची झणझणीत फोडणी द्यावी. कोथिंबीर घालावी. एक उकळी काढावी.
हे झालं हुलग्याचं सार तयार. Happy
५. शिजलेले हुलगे मिक्सरमधून जरा फिरवून काढावेत. जरा चेचल्यासरखे व्हावेत इतपतच फिरवावेत. कढईत हिंग-मोहरी, कढीपत्ता, लसणीची झणझणीत फोडणी करावी. चेचलेले हुलगे त्यात घालून जरा परतावे. मग त्यात चवीप्रमाणे तिखटमीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. सगळे नीट मिसळून जरा परतून घ्यावे. वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर घालावी.
ही झाली हुलग्याची उसळ. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाण्यार्‍यावर अवलंबून :)
अधिक टिपा: 

१. सार गरमगरम प्यायला मस्त लागते. उसळही वाटीत घेऊन नुसती हाणावी.
२. हुलगे भिजवण्याआधी नीट निवडून घ्यावेत, नाहीतर घासात दगड येऊन दात पडण्याचा संभव असतो. Proud

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकण साईडच्या लोकांना शेंगोळया माहिती नाही आणि घाटावर कुळथाचे पिठले माहिती नाही असे बहुतेकदा होते.

मलापण शेंगोळया माहिती नव्हत्या, मी श्रीरामपूर येथे नवऱ्याच्या नोकरीनिमित्ताने पावणेचार वर्षे होते तेव्हा मला शेगोळ्या पदार्थ माहिती झाला, कुळीथाला हुलगे म्हणतात तिथे, आणि मी तिथल्या आमच्या मालकांच्या कुटुंबाला कुळथाच्या पिठल्याची ओळख करून दिली.

कुळीथाच्या पिठल्यासाठी लागणारे पीठ कसे कसे करतात?
अर्धवट माहितीच्या आधारे: कुळीथ भाजुन घ्यायचे.( की नाही?) त्यात भाजलेल्या सुक्या मिरच्या आणि धणे (भाजुन) जात्यावर भरडायचे....असे काहीतरी आईने सांगितलेले आठवते.

बर्‍याचदा बाजारात मिळणार्‍या पीठात हे नसल्यामुळे खमंगपणा नसतो.

मुंबईत असताना ऑफिसमधील एक कोकणातला शिपाई होता. त्याने आणलेले पीठ तसे होते. चौकशी केल्यावर त्याने सांगितले की त्याने कोकणातुन येताना जाते आणले आणि बायको दळून पीठ करते. बायकोला त्रास देतो म्हणुन त्याला शिव्या घातल्या पण २ कि. पीठही विकत घेतले. काय करणार तो खमंग वास घेतल्यावर राहावले नाही.

हे पीठ मिक्सरवर कसे करावे हे कोणी सांगेल का? किंवा असे खमंग वासाचे पीठ कुठे मिळेल?

मा. रोहित पिठी - काळसे गावात मिळेल..
बाकी तुम्ही सांगितलेले बरोबर आहे (सुक्या मिरच्या, धणे वगैरे).

देवकी, याच बाफवरच्या पहिल्या पानावर तेविसाव्या पोस्टीत मंजूडीने कुळथाच्या पिठल्याची/ कुळथाच्या पिठीची पाककृती लिहिली आहे. त्याच पानावरच्या पोस्टी वाचल्यात तर स्वाती_आंबोळे यांनी कुळथाच्या पिठल्याला स्वर्गीय चव कशी आणावी याची टिपही लिहिलेली आहे.

कुळीथ कधीच एकदम गाळ शिजत नाहीत का? <<< शक्यतो नाही.
माझ्या रेसिपीत बघशील तरः प्रेशर कुकरमधे १ शिट्टी काढून मग १५/२० मिनिटे कमी Flame वर शिजवावा लागतो. त्याशिवाय शिजत नाही..

देवकी: आमच्याकडे पिठी (पीठ) असते ती तयार म्हणजे मिरच्या, धणेपूड इत्यादी घालावे लागत नाही. त्याची पिठी करायची झाल्यास फक्त लसणाची फोडणी करतो.. त्यात भरपूर पाण्यात कालवून पीठ घालतो. वरून मीठ आणि थोडी चिंच किंवा आमसूल टाकतो.. आणि उकळवतो.. पण मला पिठी पेक्षा पिठलं आवडतं...

>>मोड आणूनच कोणतेही कडधान्य खावे.
बरोबर आहे पण काही कड्धन्यांन चालत नाहि असे मी ऐकलेले आहे म्हणून विचारले!! उदा.: सोयाबीन!!

सर्वसाधारणपणे मूग्,मटकी,चणे,पां.,का.वाटाणे,कुळीथ इ. कडधान्ये माझ्या मनात होती.
माझ्या माहितीप्रमाणे सोयाबीन थोडे भाजून गव्हाबरोबर दळतात.त्याची उसळ करतात की नाही हे माहीत नाही.

माफ कर प्राची थान्क्स म्हणायचं राहिले मी घाटावर दिली असल्याने माझ्या पिटी ला इतका मान नाही आहे . पण माझ्या मुली आवडीने खातात

आज कुळीथाचे /हुलग्याचे पीठ गावाहून साबांनी पाठवलेय...म्हणून हा धागा उघडला...मला शेंगोळी खूप आवडते...माझी आजी एकदम मस्त करायची...आता करेन म्हणतेय...पण इथे शेंगोळीची कृती कोणीच दिली नाहिये...प्लीज कोणाला माहित असेल तर द्या ना.

कुळीथ मिळतात इथे मला पण पीठ नाही. कायम पुण्यातून मागवून स्टॉक ठेवायला लागतो. कितपत भाजायचे, काय काय घालून भाजायचे याचं मार्गदर्शन कोणी करू शकेल का?

राजा, रसोई और अन्य कहानीयांमधला काश्मीरचा एपीसोड बघताना कुळीथ तिथे खुप आवडीने खाल्ले जातात हे कळल.

Pages