हुलग्याची उसळ आणि सार

Submitted by प्राची on 11 April, 2011 - 03:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हुलगे,
ओलं खोबरं,
एक चमचा धणे,
छोटा कांदा,
चिंच,
गुळ,
गोडा मसाला,
लाल मिरचीपूड,
मीठ,
फोडणीकरता तेल, मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि भरपूर लसूण,
कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

१. हुलगे आदल्या रात्री भिजत घालावेत.
२. सकाळी भरपूर पाणी घालून कुकरला हुलगे शिजवून घ्यावेत.
३. पाणी आणि हुलगे वेगळे निथळून घ्यावे.
४. ओलं खोबरं, धणे, बारीक चिरलेला कांदा आणि चिंच वाटून घ्यावे. हे वाटण निथळून घेतलेल्या पाण्यात मिसळून चवीप्रमाणे तिखटमीठ घालावे. गूळ घालावा. वरून हिंग-मोहरी, कढीपत्ता, लसणीची झणझणीत फोडणी द्यावी. कोथिंबीर घालावी. एक उकळी काढावी.
हे झालं हुलग्याचं सार तयार. Happy
५. शिजलेले हुलगे मिक्सरमधून जरा फिरवून काढावेत. जरा चेचल्यासरखे व्हावेत इतपतच फिरवावेत. कढईत हिंग-मोहरी, कढीपत्ता, लसणीची झणझणीत फोडणी करावी. चेचलेले हुलगे त्यात घालून जरा परतावे. मग त्यात चवीप्रमाणे तिखटमीठ, गोडा मसाला, गूळ घालावा. सगळे नीट मिसळून जरा परतून घ्यावे. वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर घालावी.
ही झाली हुलग्याची उसळ. Happy

वाढणी/प्रमाण: 
खाण्यार्‍यावर अवलंबून :)
अधिक टिपा: 

१. सार गरमगरम प्यायला मस्त लागते. उसळही वाटीत घेऊन नुसती हाणावी.
२. हुलगे भिजवण्याआधी नीट निवडून घ्यावेत, नाहीतर घासात दगड येऊन दात पडण्याचा संभव असतो. Proud

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुळथाचं पिठलं...अहाहा!!
मला बाकी काही नाही आवडत कुळथाचं. पण कांदा घातलेलं, लसूण घालून फोडणी दिलेलं, आमसूल घातलेलं पिठलं म्हणजे लय भारी!
सगळे लोक पिठलं-भात आवडीने खातात, पण मला या पिठल्याबरोबर पोळीच्च हवी असते!! Uhoh

उसळ कधी खाल्ली नाही. करुन पाहीन आता. थँक्स प्राची.
मागे एकदा टण्याच्या आईने कुळथाच्या पिठल्याची कृती लिहीली होती, तेव्हापासून ते रेग्युलरली करते.
छान लागते. Happy

प्राचीतै, काल दोन्ही केलं. मस्त! पावसात भिजून गुर्गुट्या भाताबरोबर गर्र् र्र् म सार /कळण... उईम्म्म्म्म्म्मा! Happy
हे उष्ण असतात कळाले तेव्हा कपाळालाच हात लावला. पण सर आली धावून, कुळीथ घेतले खाऊन. Proud

प्राचीताई,वाचून तोंपासू Happy खायला कधी घालताय ? कुळथाची उसळ आणि सार मस्तच पण पिठले खात नाही. लहाणपणी गणपतीपुळ्याला ३ दिवस गेलो होतो. तेव्हा हाटेलची सोय नव्ह्ती त्यामुळे ब्राम्हणांकडे जेवायचे. त्यानी ३ दिवस स़काळ्-संध्याकाळ सेम पिठले पण कांदा वैगेरे न घालता खायला घातले...त्या चवीचा बालमनावर आघात झाला आहे तो अद्यापी आहे Happy

व्वा, छान पाकृ ! लहानपणी घरी नेहमी कुळिथ/ हुलगे यांचे पदार्थ असायचे, कढण/ सार, पिठलं, उसळ, शेंगोळे ....! हुलग्याच्या सारात ताक घालून खायची पद्धत आहे आमच्या कडे (नाशिक जिल्हा)!
पण कुळिथ/ हुलगे उष्ण प्रकृतीचे असल्याने सहसा त्यात आले, लसूण घातला जात नाही, थोडा काळ/ गोडा मसाला घालतात! आणि expected mothers ना तर वावडेच असते.
एक पारंपारिक रेसीपी शेअर केल्या बद्दल धन्यवाद!

नीधप, माडगं म्हणजे भरपूर पाण्यात हे पिठ कालवून शिजवायचे आणि त्यात थोडे मीठ आणि गूळ घालायचा. अशक्तपणा, थंडी यावर हे पितात. चांगले शक्तीवर्धक पेय आहे हे.

शंकर पाटलांच्या, भुजंग कथेत याचा उल्लेख आहे तसेच, केला ईशारा जाता जाता, चित्रपटात पण लिला गांधी, उषा चव्हाण ला हे करुन देते, असा प्रसंग आहे.

कुळीथ देशावर होत नाहीत, पण कोकणातून प्राचीन काळापासून व्यापारी ते घाट चढून नेत आले आहेत.

आशूबाई, आवडलं का सार?
आम्ही परवा पिठलं करून पाहिलं. मस्त मस्त एकदम!!!
ते शेंगोळ्यांची कृतीही लिहा कोणीतरी.

खायला कधी घालताय ? >>>> चेतन, तू म्हणशील तेव्हा..फक्त इकडे यावे लागेल हं. Happy

कुळथाचं सार/पिठलं/उसळ सगळच खूप आवडत. ह्या धाग्याबद्दल आभार आणि सिंडी / मंजूडी , ते इथे कसं शोधायचे ते सांगितल्याबद्दल तुमचे पण आभार.

कुळथाची आमटी ...
१ छोटी वाटी मोड आलेले कुळीथ +थोडुसा कांदा +पाणी घालून कुकरमधून उकडून घ्या. १-१ १/२ चमचे तेलावर १ लवंग,४ मिरी,अर्धा इंच दालचिनी व थोडे धणे घाला.त्यात उभा चिरलेला अर्धा कांदा + थोडे ओले खोबरे घालून लालसर रंगावर परतून घ्या.थंड झ्याल्यावर त्यात पाणी व चिंच घालून गुळगुळीत वाटा.कुळथामधे मीठ, हळद,मसाला घालून १ उकळीआल्यावर वरील वाटण घाला. १ उकळी येऊ द्या. सोललेल्या व ठेचलेल्या २-३ लसूण पाकळ्या व अगदी थोडी मोहरी यांची फोडणी करून आमटीवर घालून झाकण लावा.

आवडतं कडधान्य आहे हे. तांदळाच्या भाकरीबरोबर भरपूर रस सोडलेली उसळ हा नेहमी होणारा मेनू आहे. पण सार कधी केले नाही, सुचलंच नाही. बरं झालं हा धागा वर आला, थँक्स प्राची, आता करून बघते. गरमागरम छानच लागेल. उसळीला रस लागतो घरच्यांना त्यामुळे शिजवलेले पाणी वेगळे काढले जात नाही.
देवकी, तुझी आमटीही वेगळी दिसतेय. जरा कुटाणा वाटतोय, करून बघायला हवी. चिंच घालायची आहे पण गुळबीळ दिसत नाहीये. नाही घालायचा का?

हो पाहिली. म्हणूनच शंकानिरसनासाठी हा प्रश्न विचारला. आम्ही ज्याला हुलगा म्हणतो तो गडद निळा / काळसर असतो.
( शेतातल्या ओल्या शेंगामधले दाणे गडद निळे असतात. पूर्ण भरल्यावर, वाळवल्यानंतर काळे दिसतात.)

मग नाही हो माहीत!आम्ही दुकानातून वरीलप्रमाणे कुळीथ घेतो.अरे तुम्ही म्हणता ती शेंग पांढरट असते का?
त्याच्या दाण्याना काय म्हणतात विसरले.पण कुळीथ नाही.

इथे असं समजलं की हुलग्याच्या बिया पिंगट, तांबूस किंवा काळ्या असतात. म्हणजे आम्ही ज्याला हुलगा म्हणतो तो आणि कुळीथ एकच असावे.

मला शक्य झाले तर कधीतरी हुलग्याच्या रोपाचा, शेंगांचा आणि दाण्याचा फोटो टाकीन, असंच माहिती म्हणून. Happy

Pages