पुण्याचा दुर्दैवी कायापालट

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2013 - 03:57

प्राथमिक शाळेमध्ये सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पाटीवर पेन्सिलीने लिहिताना गारठलेल्या बोटांची पंचाईत होत असे. कानटोपी / माकडटोपी, स्वेटर, बूट मोजे याशिवाय सकाळी शाळेला निघणे अशक्य! कुठेही पाणी प्या, उत्तम चव आणि तृप्ततेची हमी! भरपूर झाडे, टेकड्या, पाऊस, शांतता, मैदाने वगैरे पुण्याची श्रीमंती असे!

इतर सर्व शहरांप्रमाणेच येथेही तांत्रिक विकास झाला व त्याचे सर्व फायदेतोटेही झाले. पण महाराष्ट्रातील इतर कित्येक शहरांच्या तुलनेत पुण्याचा विकास किंवा पुण्याचा कायापालट हा वेगळ्या गतीने व वेगळ्या प्रकारे झाला. हा विकास व हे बदल तीन ठळक घटकांमुळे झाल्याचे लक्षात येईल. हे बदल व असा विकास महाराष्ट्रातील कोणत्याच शहराचा होऊ शकला नाही. मुंबईची गोष्टच वेगळी आहे कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे.

हे तीन घटक पंधरा पंधरा वर्षांच्या हप्त्यात प्रभावी ठरल्यासारखे वाटते.

१९७० ते १९८५ - ऑटोमोबाईल सेक्टर -

टेल्को, बजाज ऑटो व बजाज टेंपो या सर्वांनी मिळून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी (बस/ट्रक/मेटॅडोर इ.) क्षेत्रे काबीज केली. संपूर्ण देशात तर त्यांचा सप्लाय झालाच पण त्यामुळे पुण्याचे स्वरूप बदलले. हे बदल कोणते?

१. सायकलींची जागा स्वयंचलीत दुचाकींनी घेणे
२. टांग्यांची जागा रिक्षांनी घेणे
३. प्रदुषण वाढणे
४. दुचाकी व तीनचाकीसाठी कर्जे, त्यांचे हप्ते, डाऊन पेमेंट, असे सर्व अर्थकारण आरंभणे

यातील काही फरक इतर शहरांमध्येही असेच झालेले असणार, पण पुण्यात आणखी एक फरक असा पडला की तंत्रज्ञान अभियांत्रिकी व ऑटो अभियांत्रिकी या क्षेत्रातील लोकांना नोकर्‍या मिळू लागल्या. शासकीय सेवा, बँका यात आयुष्य व्यतीत करणार्‍यांना आता ऑटो मॅन्युफॅक्चरर्स व त्यांच्या अ‍ॅन्सिलरीजकडे जॉब्ज मिळू लागले. हा फरक खास पुण्यापुरता व काही प्रमाणात औरंगाबादपुरता (बजाज ऑटो) व अत्यल्प प्रमाणात अहमदनगरपुरता (कायनेटिक) होता. लुना, टीव्हीएस ५०, बजाज एम फिफ्टी, बजाज एम एटी या वाहनांनी मध्यमवर्गीयांचे खिसे काबीज केले. इतर शहरांमधून लोकांनी नोकरीसाठी पुण्यात येण्याचे प्रमाण या ऑटो क्षेत्रामुळे जबरदस्त वाढले.

इ.स. १९८५ ते २००० - शिक्षणक्षेत्र विकास

तसेही आधीपासूनच विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतीक राजधानी वगैरे वगैरे उपाधी प्राप्त झालेल्या पुण्यात प्रथमच खासगी कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. राजकीय पुढार्‍यांनी सुरू केलेली ही कॉलेजेस डोनेशन व भरमसाठी फिया आकारू लागली. शिक्षण अधिकजणांना उपलब्ध होणार यामुळे शासनाने हे सारे संमत तर केलेच पण गुणवत्ताही बर्‍यापैकी घसरू दिली. विचित्र तिढे निर्माण होऊ लागले. पी सी एम ला ९३ टक्क्याला सी ओ ई पी क्लोज झाल्याने ९२ टक्केवाल्यावर सायन्सला जायची वेळ येणे आणि तेव्हाच दोन लाख देणगी आणि वार्षिक आठ हजार फी भरण्याची कुवत असलेल्या पंचाहत्तर टक्क्यांवर खासगी अभियांत्रिकीत प्रवेश मिळणे असेही प्रकार झाले. पण हे सारे प्रकार थांबवले गेले नाहीत. ते तसेच चालू राहिले व तीच शैक्षणिक संस्कृती ठरू लागली. या शिक्षण क्षेत्रात पडलेल्या फरकामुळे पुण्यात आणखी एक मोठा फरक पडला. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, काश्मीर व राजधानीतून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. बक्कळ पैसे असलेल्यांची मुले दिमाखात इंजिनियरिंगला जाऊन मोटारसायकली उडवू लागली.

हे असे शिक्षण मिळू लागणे हे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये का झाले नसेल? त्याची कारणे बहुधा जरा गंमतीशीरच असावीत. पुण्याची हवा, पाणी, वाढ होण्यास असलेला भरपूर वाव, मुंबई व इतर शहरांशी सोपे कनेक्शन, त्या काळी गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प असणे अशी अनेक कारणे असू शकतील. उदाहरणार्थ, मुलाला शिकायला परगावी पाठवायचे झालेच तर नागपूरच्या उन्हाळ्याच्या तुलनेत पुण्याला पाठवणे लोकांना रुचणार यात शंका नसावी.

शिक्षणक्षेत्रातील ह्या क्रांतीकारक टप्प्यामुळे पुणे हे देशाचे फेव्हरिट एज्युकेशन सेंटर ठरले. विद्यार्थ्यांचा अखंड प्रवाह सुरू झाल्यामुळे पुण्याचे परिवर्तन अर्थातच अत्यंत वेगाने होऊ लागले. रस्ते, इमारती, होस्टेल्स, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन्स, दुचाकी, दुचाकी दुरुस्ती, मेस, टपर्‍या, याशिवाय करमणुकीची साधने अश्या अनंत व्यवसायांना एक जबरदस्त उड्डाण मिळाले. पुणे व देशातील इतर तुलना करता येण्याजोगी शहरे ह्यांच्यातील फरक व तफावत मोठ्या प्रमाणावर वाढणे येथेच सुरू झाले.

इ.स. २००० ते २०१३ - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी -

या विषयावर काही नाही लिहिले तरी चालण्यासारखे आहे कारण हा चालू कालखंड असून तो सर्वज्ञात आहे. पुन्हा एकदा पुण्यात 'वाढीस असलेला वाव', पाण्याची व विजेची उपलब्धता, दळणवळण, कनेक्टिव्हिटी त्यात आता वरती शिकून बाहेर पडणारे व नोकर्‍या शोधणारे विद्यार्थी हे सर्वच घटक कामी आले. पैशाकडेच पैसा जातो म्हणतात तसे जो येईल तो पुण्यातच कंपनी थाटू लागला. या कालावधीत पुण्यातील काही विभागांना युरोपसारखे दिसता येऊ लागले.

पाच पाच धरणे आता कमी पडतात. जागांचे भाव अप्राप्य पातळीला पोचलेले आहेत. शिक्षण व इतर सर्व बाबी अतिशय महागलेल्या आहेत. वातावरण प्रचंड प्रदुषित झालेले आहे. वाहतुक अत्यंत बेशिस्त आणि अपुर्‍या रस्त्यांवर होत आहे. वीज कमी पडत आहेच. बाहेरून येणार्‍यांचा ओघ थांबतच नाही आहे. अत्यंत काटेकोर आणि अप्रिय निर्णय घेतल्याशिवाय पुण्याचा र्‍हास थांबणे हे एक दूरचे व सत्यात न उतरणारे स्वप्न वाटत आहे.

पुण्याने कायम पेन्शनरांचे शहर म्हणूनच राहावे असे कोणीच म्हणणार नाही, पण अनप्लॅन्ड ग्रोथ आणि नुसतीच उपभोग घेण्याची प्रवृत्ती (काँट्रिब्यूट न करण्याची प्रवृत्ती) ह्यामुळे जो र्‍हास होत आहे त्याचे कित्येक दृष्य परिणाम सभोवती आधीच दिसत आहेत.

हा असा विकास बुलढाणा, औरंगाबाद, नागपूर, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव किंवा तत्सम शहरांत झाला नाही. असा विकास देशातील चार ते पाच मध्यम आकाराची व पुण्याशी तुलना करता येण्याजोगी शहरे सोडली तर इतरत्र झाला नाही.

पुण्याचच असा कायापालट होण्यामागे वर लिहिल्याप्रमाणे हवा, पाणी, वाढ करण्यास असलेला वाव, सुशिक्षित व अशिक्षित मॅनपॉवर उपलब्ध असणे, कनेक्टिव्हिटी हे सर्व घटक एकाच ठिकाणी होते. पण या पंचेचाळीस वर्षांमध्ये एक जन्मजात पुणेकर म्हणून आजतागायत एकदाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा नेत्याकडून काही भरीव व ठोस नियोजन आकारास आलेले पाहिलेले नाही, हे दुर्दैवी आहे. बी आर टी की काय ती योजना जवळपास फेल गेलेली आहे. मेट्रो होणे लांबच आहे, कर्वेरोडला पर्याय काढता आलेला नाही. बसेस पुरेश्या नाहीत. टू व्हीलर्सच्या संख्येवर नियंत्रण नाही. पार्किंग उपलब्ध नाही. जागांचे भाव अवाच्या सवा झालेले आहेत. पाणी व वीजकपात नित्य आहे.

पुण्याच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे विकासास मिळालेला वाव हा पुणेकरांनी व इतरांनी हपापल्याप्रमाणे उपभोगला, पुढार्‍यांनी पोळ्या भाजून घेतल्या आणि आता ह्या शहराची दुरावस्था लवकरच कुत्रेही खाणार नाही अशी होईल.

फार पूर्वी पाहिलेल्या पुण्यावर असलेले अपरिमित प्रेम हा लेख लिहिण्यास कारणीभूत ठरले.

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिकचीही हीच गत होत आहे असे म्हणत आहे, येत्या काही वर्षात नाशिकचे दुसरे पुणे होणार ह्यात शंका नाही. नाशिकची कारणे साहजिकच वेगळी,

१. गोन्डन ट्रँगलमधला उरलेला कोन Sad
२. वाईन कॅपिटल ऑफ द कंट्री
३. पिल्ग्रिमेजला मिळणारे प्रोत्साहन

इ.इ.

नियोजनाचा अभाव सगळीकडेच आहे, जागांचे भाव सगळीकडेच वाढताहेत. समस्या बर्‍यापैकी संपूर्ण देशाला भेडसावत असावी.

२००१ पासुन मी इकडे आहे.
आयटी लाटेत झालेले बदल पाहिलेत.
सर्वसामान्य माणुस अंदाज देखील लावु शकणार नाही असे बदल झालेत.
चांगले वाइट दोन्ही आहेत. अर्थात जास्त बदल चांगलेच झालेले आहेत.
वाइट ही रिलेटिव्ह टर्म आहे.

मुळात पानशेत प्रकरणानंतर पुण्याची घडी बसवताना विचारपुर्वक बसवायला हवी होती... भविष्याचा विचार करुन रस्तेबांधणी .. जागा प्रकरण वगैरे यावर विचार करुन मगच घडी बसवायला हवी होती

इंग्रजांनी मुंबईत लोकल ट्रेन इतक्या योग्य पध्दतीने फिरवली आहे की.. तुम्हाला मुंबईत कोणत्याही ठिकाणी जायचे असल्यास लोकल चा पर्याय उपलब्ध आहे.....

असे पुण्यात बिल्कुल नाही.........रिंगरेल्वे सुध्दा उभारण्यास जागा शिल्लक ठेवली नाही... आता रिंगरेल्वे उभारायची असल्यास पुण्या भोवती उभी करावी लागेल........आत शिरण्यास जागाच नाही आहे

पुण्याच्या डेव्हलपमेंट प्लानवर साठलेली धुळ साफ करण्यासाठी निविदा माघवल्यात महापालिकेनी.

मी स्वतः पुण्यात आले तेव्हाचं पुणं आणि आत्ताचं पुणं यात जमिन आस्मानाचा फरक आहे. सिंहगड रस्त्यावर तेव्हा विठठलवाडीच्या पुढे झाडंच झाडं होती. आता झाडांसाठी फार खडकवासल्याच्या पुढे जावे लागते. चतु:शृंगी मंदिर गावाबहेर गणले जाई... आता तिथेच गाव सुरू होते.
मलाही हळहळ वाटत असेल तर तुम्ही तर इथे जन्म घेऊन बालपण घालवले तुमची कळकळ जाणवतेय.

लेख पटला..
गेल्या ५ वर्षातलेच बदल बघितलेत फक्त पण तरीही जाणवतील असे आहेत ..

असाच वेग आता मला माझ्या गावी जयसिंगपुरमधे सुद्धा जाणवतोय.. नुस्ती गर्दी नि मॅनेजबल असुनही नगरपालिकेचा शुन्य रिस्पॉन्स!

लेख आवडला.पुण्याच्या विकासाबद्द्ल चिंता सर्वांनाच आहे. पुण्याच्या विकासासाठी पुण्याची वाढ थांबवली पाहिजे असे शरद पवार एकदा म्हणाले होते. पुण्याच्या विकासा वरुन पुर्वी लिहिलेला विकास आराखडा हा लेख आठवला.

बेफिकीरजी,

प्रगती झाली म्हणजे बाहेरुन लोंढे येणारच.
संस्कृती बदल तर होणारच, आणि ते आपल्याला सहन करावे लागणारच.

सर्वात जास्त तिळपापड तेव्हा होतं, जेव्हा संस्कृती बदल होते.

असो.

लेख पटला. दर वेळी देशात - पुण्यात जाते तेव्हा अजून जास्त गर्दी, अस्ताव्यस्त वाढ बघून पुणं हे पुणं राहिले नाही याची जाणीव होउन हळहळ वाटतेच. विशेषतः २००० च्या नंतर खूपच बदललं सगळं. आताच्या पुण्याशी रिलेट करताच येत नाही मला Sad

छान लेख आणि नेमकी कारणं मांडली आहेत बेफिकीर.

जेव्हा एखाद्या प्रदेशाचा विकास होण्यास सुरवात होते तेव्हा सरकारनं दूरदृष्टी दाखवून पायाभूत सोयी, नगरविकास यांची उपलब्धता करून देणे, योग्य नियोजनानुसार शहराची वाढ करून देणे, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा समजून नविन भूखंड मिळवून देऊन त्यांच्या विकासाचा सुनियोजित आराखडा बनवून त्यानुसार कामं होत आहेत याची खात्री करणे या सगळ्या गोष्टी करणे अपेक्षित असते.

दुर्दैवाने तसे होत नाही. विकासाच्या या प्रक्रीयेत सरकार आणि राजकारण यातील प्रत्येक घटक फक्त आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यात स्वारस्य दाखवतो. आणि मग सर्व विकासाचा बट्याबोळ होतो.

कालाय तस्मै नमः . संस्कृती सर्वच ठिकाणची बदलते आहे. औद्योगीक विकासाने त्याचा वेग वाढतो इतकच. परदेशात सुध्दा हेच घडले आहे.

महात्मा गांधींना अपेक्षीत असलेले औद्योगीकरण हे स्वप्न आहे. खेड्याचा विकास कागदावरच राहिला.

भौतीक विकास या संकल्पनेपोटी सांस्कृतीक विकास, सर्वांगीण विकास, एकात्मीक विकास हे फक्त पुस्तकात अभ्यासाला शिल्लक राहीले.

छान लेख आहे.

कोणत्याही मोकळ्या जागेचा केवळ कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल इमारती बांधण्यासाठीच उपयोग करायचा आहे याला प्राधान्य असल्यासारखे सगळीकडे पुणे वाढले आहे. तुम्हाला १००० सोसायट्या व मॉल्स बांधायचे आहेत तर बांधा, पण ते सगळे एका उपनगराच्या मर्यादित भागात दाटीवाटीने कशाला? पुण्याला विस्तारायला भरपूर जागा आहे. पूर्वी टेकड्या हे लिमीट होते, पण आता त्याबाहेर शहर गेले आहेच. कोणत्याही सोसायटीतून पाच मिनीटात जाता येइल अशी मैदाने, बागा का असू नयेत?

(मात्र मुंबईचे नियोजन चांगले आहे असे वाटत नाही. नवी मुंबई होऊन सुद्धा मूळ मुंबईतील कार्यलयांचे विकेन्द्रीकरण पाहिजे तेवढे झाले नाही. इतक्या वर्षात एवढ्या लोकांना व्हीटी/चर्चगेट ला सकाळी जावे लागू नये यासाठी काय प्रयत्न झाले? ९ च्या ऐवजी १२ डब्यांच्या, व आता १५ डब्यांच्या गाड्या करणे हा खरा उपाय नाही. लाखो लोकांना ज्या परिस्थितीत सकाळी लोकल ने जावे लागते ते पाहता नियोजन योग्य आहे असे म्हणता येणार नाही).

चांगला लेख!

विकासाच्या या प्रक्रीयेत सरकार आणि राजकारण यातील प्रत्येक घटक फक्त आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यात स्वारस्य दाखवतो. आणि मग सर्व विकासाचा बट्याबोळ होतो. >>+१

मामी, अतिशय सुयोग्य प्रतिसाद आहे तुमचा!

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार मानतो.

उदयन, मै देवी आणि फार एन्ड, तुमचेही प्रतिसाद आवडले.

धन्यवाद!

पुण्याशी नैमित्तिक भेटींव्यतिरिक्त फारसा संबंध आलेला नाही, तरीही कळकळ पोचली.

अवांतर : फारएन्डला +१.
मुंबईचे प्रश्न आणखीनच वेगळे आणि बहुधा अधिक जटिल आहेत. विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टीने. बेट असल्यामुळे वाढीला वाव मर्यादित आणि सिंहाच्या गुहेसारखी येणारी पावलंच दिसतात, जाणारी नाहीतच हे चित्र बदलतच नाही. शहरव्यवस्थेवर ताण आता ती कुठल्याही क्षणे तुटेल/कोलमडेल इतका आहे. एकेकाळी मुंबईचा पाऊस हा स्मरणरंजनाने हळवं होण्याचा विषय होता. आता पावसाळ्याच्या कल्पनेने धडकी भरते. २६/११च्या निमित्ताने आपल्या सागरी सीमा पुरेशा सुरक्षित नाहीत हे सगळ्या जगाला कळलं. लोकल्सचा उल्लेख वाचला वरती. त्या मुंबईच्या धमन्या आहेत हे खरं, पण बॉम्बस्फोट आठवले की त्यातल्या एकाही धमनीला इजा झाली तर किती हानी होऊ शकते हे जाणवून थरकाप होतो. मुंबईकरांचं 'स्पिरिट' हा एक अतिशय चीड आणणारा शब्दप्रयोग आहे. हे नागरिक आहेत. मरण्यामारण्यासाठी प्रशिक्षित सैनिक नव्हेत. 'आज कुठल्या आपत्तीला तोंड द्यावं लागेल कोण जाणे' असा विचार मनाच्या एका कोपर्‍यात सतत बोचत असणं हे काही प्रगतीचं किंवा सुबत्तेचं लक्षण नव्हे. असो.

लेख पटला, आवडला. बर्‍याच मोठ्या शहरांचे वास्तव असावे हे.
मी २००० साली पुण्यात आलो आणि २००७ साली पुणे सोडले. हे सगळे बदल होतांना जवळून पाहिले आहेत. आणि तरीही आता २०१३ साली पुण्यात आल्यावर कुठल्यातरी परक्या शहरात आल्याची भावना होते. Sad
मामी, स्वाती आंबोळे, फारएन्ड यांचे प्रतिसादही आवडले.
कधी कधी वाटते की छोट्या शहरात राहणे चांगले. बदल होतात, पण तुम्हाला भोवळ येईल अशा वेगाने होत नाहीत. अर्थात, छोट्या शहरांच्या आपल्या स्वतःच्या मर्यादाही आहेतच !

लेख पटला. पुणेकर नसूनही अगदी लहान असल्यापासून पुण्याला नेहमीचे येणे-जाणे असल्याने झालेले बदल व्यवस्थित लक्षात येतात.

पुण्यात आणखी एक मोठा फरक पडला. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, काश्मीर व राजधानीतून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला >>>> पुणं मोठं शहर आहे आणि तिथे सतराशे साठ कॉलेजेस असल्याने परप्रांतीयांची वाढ लक्षणीय वाटते. पण नुसत्या पुण्यातच नव्हे तर नांदेड, संगमनेर, कोपरगाव, लोणी अशा सगळ्या ठिकाणी जिथे इंजिनियरिंग किंवा मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे परप्रांतीय विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने दिसतात. आणि याला मुख्य कारण आपल्या इथली प्रवेश प्रक्रिया हे आहे असे मला वाटते.

>>मूळ मुंबईतील कार्यलयांचे विकेन्द्रीकरण पाहिजे तेवढे झाले नाही. <<
झालं आहे आणि थोड्याफार प्रमाणात होत आहे. दक्षिण मुंबईतले घाऊक बाजार नविमुंबईत फार पुर्विच हलवले गेले आहेत. बरीच कार्पोरेट ऑफिसेस नरिमन पॉईंट, कफ परेडहुन उपनगरांत (पवई, बिकेसी, बेलापुर इ.) हलवण्यात आली आहेत. (वाचण्यात आलं कि इंडियन एक्सप्रेसची इमारत हल्लीच विकली गेली; पुरेसे टेनंट मिळत नसल्याने) परंतु मोठ्ठा इश्यु शहरात येणार्‍या लोंढ्यांचा आहे त्यावर जोपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघत नाहि तोवर मुंबई बकाल होत जाणार.

लेख पटला. 'फार पूर्वी पाहिलेल्या पुण्यावर अपरिमित प्रेम' असलेला मीही एक!

२००३ साली अमेरिकेत आलो, त्यानंतर साधारणपणे वर्षाकाठी पुण्याला जातो. दर वेळी पुण्याची दुरवस्था पाहून हळहळ वाटते. वाटतं की पुण्याची मॅक्सिमम वाट लागलेली आहे, आता याहून अधिक काय होणार आहे? पण दुर्दैवाने प्रत्येक पुढच्या भेटीत याचं उत्तर मिळतं! Sad

शहर (किंवा माणूस) सुधारण्यासाठी 'आपल्यामधे काही कमतरता किंवा उणीव आहे' आणि 'दुसर्यांकडून शिकण्यासारखे असते' हे मनापासून पटावे लागते.

पुणेकर नसूनही मला पूणं खूप आवडतं आणि म्हणून लेखाची तळमळ पटली. परंतु वर म्हटल्याप्रमाणे जर सत्तेला आणि जनतेला 'कळलय आणि आता वळायलाच हवं' असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही. निवडणूकींमध्ये निकाल आल्यनंतर किती कळलय आणि किती वळायची इच्छा आहे ते समजतेच.

लेख पटला.

महाराष्ट्रातल्या इतर शहरांचा विकास मुंबई-पुण्याच्या मानाने विशेष असा नाही झाला. खरंतर सोलापुर हे पुणे, हैद्राबाद अश्या शहरांना जवळ आहे, या ठिकाणी एकादे आय टी शहर उभे राहिले असते, पण तिथे कोणी लक्षच नाही दिले.

मुंबईच्या बाबतीत म्हणाल तर अनेक उद्योग मुंबईतून बाहेर पडतायत. फार्मा कंपन्या हैद्राबादला जातायत, कापड उद्योग तर कधीच हद्द्पार झालाय. सध्या ज्या आय टी कंपन्या आहेत, त्यादेखील येणारे नवीन प्रोजेक्ट पुणे, बंगलोर कडे वळवतायत.

जागांचे चढे भाव हे कारण आहेच, पण परिस्थिती जर अशीच राहिली तर मुंबईचे काय होईल याची कल्पनाच करवत नाही. अर्थात ही परिस्थिती कधी ना कधी पुण्यावर ही येऊ शकेल.

पुणेकर नसूनही मला पूणं खूप आवडतं आणि म्हणून लेखाची तळमळ पटली. परंतु वर म्हटल्याप्रमाणे जर सत्तेला आणि जनतेला 'कळलय आणि आता वळायलाच हवं' असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही. >>>>> +१

सिंडी आणि गमभन,

तुमचे प्रतिसाद पटत आहेत. सिंडी, इतर जागांमधील कॉलेजेस आणि पुण्याचा शिक्का हा एकच घटक बहुधा तुमच्या प्रतिसादात अनअ‍ॅड्रेस्ड राहिला की काय असेही वाटत आहे.

सर्व सहृदय प्रतिसाददात्यांचे आभार मानतो.

शिवाय,

बाई, मुंबईबाबत तुम्ही लिहिलेले समजले, पटले आणि अगदी पोचलेही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Pages