पुण्याचा दुर्दैवी कायापालट

Submitted by बेफ़िकीर on 4 December, 2013 - 03:57

प्राथमिक शाळेमध्ये सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पाटीवर पेन्सिलीने लिहिताना गारठलेल्या बोटांची पंचाईत होत असे. कानटोपी / माकडटोपी, स्वेटर, बूट मोजे याशिवाय सकाळी शाळेला निघणे अशक्य! कुठेही पाणी प्या, उत्तम चव आणि तृप्ततेची हमी! भरपूर झाडे, टेकड्या, पाऊस, शांतता, मैदाने वगैरे पुण्याची श्रीमंती असे!

इतर सर्व शहरांप्रमाणेच येथेही तांत्रिक विकास झाला व त्याचे सर्व फायदेतोटेही झाले. पण महाराष्ट्रातील इतर कित्येक शहरांच्या तुलनेत पुण्याचा विकास किंवा पुण्याचा कायापालट हा वेगळ्या गतीने व वेगळ्या प्रकारे झाला. हा विकास व हे बदल तीन ठळक घटकांमुळे झाल्याचे लक्षात येईल. हे बदल व असा विकास महाराष्ट्रातील कोणत्याच शहराचा होऊ शकला नाही. मुंबईची गोष्टच वेगळी आहे कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे.

हे तीन घटक पंधरा पंधरा वर्षांच्या हप्त्यात प्रभावी ठरल्यासारखे वाटते.

१९७० ते १९८५ - ऑटोमोबाईल सेक्टर -

टेल्को, बजाज ऑटो व बजाज टेंपो या सर्वांनी मिळून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी (बस/ट्रक/मेटॅडोर इ.) क्षेत्रे काबीज केली. संपूर्ण देशात तर त्यांचा सप्लाय झालाच पण त्यामुळे पुण्याचे स्वरूप बदलले. हे बदल कोणते?

१. सायकलींची जागा स्वयंचलीत दुचाकींनी घेणे
२. टांग्यांची जागा रिक्षांनी घेणे
३. प्रदुषण वाढणे
४. दुचाकी व तीनचाकीसाठी कर्जे, त्यांचे हप्ते, डाऊन पेमेंट, असे सर्व अर्थकारण आरंभणे

यातील काही फरक इतर शहरांमध्येही असेच झालेले असणार, पण पुण्यात आणखी एक फरक असा पडला की तंत्रज्ञान अभियांत्रिकी व ऑटो अभियांत्रिकी या क्षेत्रातील लोकांना नोकर्‍या मिळू लागल्या. शासकीय सेवा, बँका यात आयुष्य व्यतीत करणार्‍यांना आता ऑटो मॅन्युफॅक्चरर्स व त्यांच्या अ‍ॅन्सिलरीजकडे जॉब्ज मिळू लागले. हा फरक खास पुण्यापुरता व काही प्रमाणात औरंगाबादपुरता (बजाज ऑटो) व अत्यल्प प्रमाणात अहमदनगरपुरता (कायनेटिक) होता. लुना, टीव्हीएस ५०, बजाज एम फिफ्टी, बजाज एम एटी या वाहनांनी मध्यमवर्गीयांचे खिसे काबीज केले. इतर शहरांमधून लोकांनी नोकरीसाठी पुण्यात येण्याचे प्रमाण या ऑटो क्षेत्रामुळे जबरदस्त वाढले.

इ.स. १९८५ ते २००० - शिक्षणक्षेत्र विकास

तसेही आधीपासूनच विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतीक राजधानी वगैरे वगैरे उपाधी प्राप्त झालेल्या पुण्यात प्रथमच खासगी कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. राजकीय पुढार्‍यांनी सुरू केलेली ही कॉलेजेस डोनेशन व भरमसाठी फिया आकारू लागली. शिक्षण अधिकजणांना उपलब्ध होणार यामुळे शासनाने हे सारे संमत तर केलेच पण गुणवत्ताही बर्‍यापैकी घसरू दिली. विचित्र तिढे निर्माण होऊ लागले. पी सी एम ला ९३ टक्क्याला सी ओ ई पी क्लोज झाल्याने ९२ टक्केवाल्यावर सायन्सला जायची वेळ येणे आणि तेव्हाच दोन लाख देणगी आणि वार्षिक आठ हजार फी भरण्याची कुवत असलेल्या पंचाहत्तर टक्क्यांवर खासगी अभियांत्रिकीत प्रवेश मिळणे असेही प्रकार झाले. पण हे सारे प्रकार थांबवले गेले नाहीत. ते तसेच चालू राहिले व तीच शैक्षणिक संस्कृती ठरू लागली. या शिक्षण क्षेत्रात पडलेल्या फरकामुळे पुण्यात आणखी एक मोठा फरक पडला. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, काश्मीर व राजधानीतून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. बक्कळ पैसे असलेल्यांची मुले दिमाखात इंजिनियरिंगला जाऊन मोटारसायकली उडवू लागली.

हे असे शिक्षण मिळू लागणे हे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये का झाले नसेल? त्याची कारणे बहुधा जरा गंमतीशीरच असावीत. पुण्याची हवा, पाणी, वाढ होण्यास असलेला भरपूर वाव, मुंबई व इतर शहरांशी सोपे कनेक्शन, त्या काळी गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प असणे अशी अनेक कारणे असू शकतील. उदाहरणार्थ, मुलाला शिकायला परगावी पाठवायचे झालेच तर नागपूरच्या उन्हाळ्याच्या तुलनेत पुण्याला पाठवणे लोकांना रुचणार यात शंका नसावी.

शिक्षणक्षेत्रातील ह्या क्रांतीकारक टप्प्यामुळे पुणे हे देशाचे फेव्हरिट एज्युकेशन सेंटर ठरले. विद्यार्थ्यांचा अखंड प्रवाह सुरू झाल्यामुळे पुण्याचे परिवर्तन अर्थातच अत्यंत वेगाने होऊ लागले. रस्ते, इमारती, होस्टेल्स, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन्स, दुचाकी, दुचाकी दुरुस्ती, मेस, टपर्‍या, याशिवाय करमणुकीची साधने अश्या अनंत व्यवसायांना एक जबरदस्त उड्डाण मिळाले. पुणे व देशातील इतर तुलना करता येण्याजोगी शहरे ह्यांच्यातील फरक व तफावत मोठ्या प्रमाणावर वाढणे येथेच सुरू झाले.

इ.स. २००० ते २०१३ - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी -

या विषयावर काही नाही लिहिले तरी चालण्यासारखे आहे कारण हा चालू कालखंड असून तो सर्वज्ञात आहे. पुन्हा एकदा पुण्यात 'वाढीस असलेला वाव', पाण्याची व विजेची उपलब्धता, दळणवळण, कनेक्टिव्हिटी त्यात आता वरती शिकून बाहेर पडणारे व नोकर्‍या शोधणारे विद्यार्थी हे सर्वच घटक कामी आले. पैशाकडेच पैसा जातो म्हणतात तसे जो येईल तो पुण्यातच कंपनी थाटू लागला. या कालावधीत पुण्यातील काही विभागांना युरोपसारखे दिसता येऊ लागले.

पाच पाच धरणे आता कमी पडतात. जागांचे भाव अप्राप्य पातळीला पोचलेले आहेत. शिक्षण व इतर सर्व बाबी अतिशय महागलेल्या आहेत. वातावरण प्रचंड प्रदुषित झालेले आहे. वाहतुक अत्यंत बेशिस्त आणि अपुर्‍या रस्त्यांवर होत आहे. वीज कमी पडत आहेच. बाहेरून येणार्‍यांचा ओघ थांबतच नाही आहे. अत्यंत काटेकोर आणि अप्रिय निर्णय घेतल्याशिवाय पुण्याचा र्‍हास थांबणे हे एक दूरचे व सत्यात न उतरणारे स्वप्न वाटत आहे.

पुण्याने कायम पेन्शनरांचे शहर म्हणूनच राहावे असे कोणीच म्हणणार नाही, पण अनप्लॅन्ड ग्रोथ आणि नुसतीच उपभोग घेण्याची प्रवृत्ती (काँट्रिब्यूट न करण्याची प्रवृत्ती) ह्यामुळे जो र्‍हास होत आहे त्याचे कित्येक दृष्य परिणाम सभोवती आधीच दिसत आहेत.

हा असा विकास बुलढाणा, औरंगाबाद, नागपूर, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव किंवा तत्सम शहरांत झाला नाही. असा विकास देशातील चार ते पाच मध्यम आकाराची व पुण्याशी तुलना करता येण्याजोगी शहरे सोडली तर इतरत्र झाला नाही.

पुण्याचच असा कायापालट होण्यामागे वर लिहिल्याप्रमाणे हवा, पाणी, वाढ करण्यास असलेला वाव, सुशिक्षित व अशिक्षित मॅनपॉवर उपलब्ध असणे, कनेक्टिव्हिटी हे सर्व घटक एकाच ठिकाणी होते. पण या पंचेचाळीस वर्षांमध्ये एक जन्मजात पुणेकर म्हणून आजतागायत एकदाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा नेत्याकडून काही भरीव व ठोस नियोजन आकारास आलेले पाहिलेले नाही, हे दुर्दैवी आहे. बी आर टी की काय ती योजना जवळपास फेल गेलेली आहे. मेट्रो होणे लांबच आहे, कर्वेरोडला पर्याय काढता आलेला नाही. बसेस पुरेश्या नाहीत. टू व्हीलर्सच्या संख्येवर नियंत्रण नाही. पार्किंग उपलब्ध नाही. जागांचे भाव अवाच्या सवा झालेले आहेत. पाणी व वीजकपात नित्य आहे.

पुण्याच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे विकासास मिळालेला वाव हा पुणेकरांनी व इतरांनी हपापल्याप्रमाणे उपभोगला, पुढार्‍यांनी पोळ्या भाजून घेतल्या आणि आता ह्या शहराची दुरावस्था लवकरच कुत्रेही खाणार नाही अशी होईल.

फार पूर्वी पाहिलेल्या पुण्यावर असलेले अपरिमित प्रेम हा लेख लिहिण्यास कारणीभूत ठरले.

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेकाळी मुंबईचा पाऊस हा स्मरणरंजनाने हळवं होण्याचा विषय होता. आता पावसाळ्याच्या कल्पनेने धडकी भरते<<<

बाई, फक्त एक विचारावेसे वाटले. ह्या वाक्यामधून मानवी व्यवस्थापनात तृटी (त्रुटी) आहेत असे म्हणायचे आहे की अ‍ॅक्च्युअली मुंबईचा पाऊस अलीकडे (काही नैसर्गीक / मानवनिर्मीत इत्यादी कारणांनी) खरोखरच आधीहून हिंस्त्र झाला आहे असे म्हणायचे आहे हे समजले नाही. मोस्टली, 'अलीकडे पाऊस व्यवस्थापन व्हिस अ व्हिस लोकसंख्यावाढ' हा प्रॉब्लेम झालेला असावा असे तुम्ही म्हणत असाल असे वाटत आहे. नेमके काय ते माहीत नाही.

धन्यवाद!

हो व्यवस्थापनाबद्दलच बोलत आहे. प्लॅस्टिकच्या कचर्‍यापासून रेक्लेमेशन्सपर्यंत बरीच कारणं वाचनात येतात. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही त्यामुळे भर शहरात पूरसदृश परिस्थिती होते.

बेफिकीर अगदी नेमके लिहिले आहे.प्रत्येकवेळी पुण्याला गेलं कि वाटत फुगा फुगतोच आहे. फुटण्याची वाट बघत आहेत सगळे कि काय? कर्वे रोडवर अक्षरशः लहान मुलांबरोबर जायची भिती वाटते. मेट्रो सुरु होण्याची शक्यता वाटत नाही. सुधारणा होण्यासाठी आतून इच्छा नाही. महत्वाच म्हणजे सर्वजण पुण्याचा वापर तात्पुरत्या स्टॉप ओव्हर साठी करताहेत कि काय असं वाटत. फक्त शासनाचाच नव्ह्जे तर लोकांची स्वार्थी वृत्ती पण तेवढीच कारणीभुत आहे,
बाकीच्या शहरात ही अशीच परिस्थिती आहे. कोल्हापुअरच्या आसपासच्या टेकड्या सुद्धा लोकांनी विकत घेतल्या आहेत. भारी गाड्यांमधून फिरतील पण टोल देणार नाही हा अ‍ॅटिट्युड. असो. लिहिलं तितक कमीच आहे.

बिआरटी चा टोटल बोर्‍या वाजला आहे.
माझ्या भागात तर २०० फुटी रोड आहेत. काही काही ठिकाणी ट्रॅफिक अतिशय कमी असणार्‍या रस्त्यावर पण ( उदा एक्सप्रेस वे जिथे संपतो तिथून ते रावेत ) त्या रस्त्यावर ट्रॅफिक नसते म्हणून ऑलमोस्ट रोज जातो आणि १ तासात केवळ एखादी सिटीबस तिथून जाते. पण तरी रस्ता खोदून BRT करत आहेत. का?

पिंपळे सौदागर मध्ये देखील हिच बोंब, लोक BRT च्या रस्त्याचा वापर पदपथ म्हणून करतात. सकाळी आणि संध्याकाळी ह्या पदपथावर खूप लोक चालतात. ही पदपथाची सोय चांगली आहे पण त्याला खूप पैसे BRT च्य नावाने गेले. का?

एकंदरीत नियोजन प्रकार कशाशी खातात हे कळलेले नाही. सिटी प्लानिंग होत असताना मात्र नगरसेवक, आमदारांना खूप फायदा झाला कारण मग त्यांनी नवीन होणार्‍या रस्त्यालगत जमिनी विकत घेऊन ठेवल्या.

विकासाचे काय? भारतीय आणि विकास? आर यू किडिंग मी?

लेख एकदम पटला. कुठल्याही जन्मजात पुणेकराच्या मनात हिच तळमळ असते . परंतु आता ह्या सगळ्याच्या पलीकडे गेले आहोत. पुणे तिथे सगळेच उणे हि म्हण योग्य वाटते हल्ली.

छान लेख. कळकळ दिसली.
मी फक्त १९५५ ते १९६० या काळात पुण्यात राहिलो. पण माझ्या मनावर पुण्याचा उमटलेला ठसा अजून कायम आहे. मला पुणे शहर खूपच आवडते.
माझे एक स्वप्न आहे - सहा महिने (निदान एक महिना) पुण्यात टिळक रोड किंवा डे. जि. वर रहावे. लोक म्हणतात भारतात प्रदूषण आहे, उन्हाळा, गर्दी आहे, भारतातल्या इतर शहरात मी हे दुर्लक्षू शकत नाही. मला तेव्हढेच दिसते. म्हणून भारतात इतर शहरात रहाणाची इच्छा नाही.
पण पुण्यात हे सगळे मी दुर्लक्षित करीन. घसा बसला (जो नेहेमीच जबरदस्त दुखतो) तरी औषधे खाऊन राहीन, पण पुण्याला जाईन!! टिळक रोड, लक्ष्मी रोडवर भटकावे, काही जुन्या आठवणी जाग्या कराव्या. आप्पा बळवंत चौकात जावे, काही नाही तर नुसते इकडे तिकडे हिंडावे, नवीन चांगली मराठी पुस्तके विकत घ्यावीत. नाटके बघावीत, गाण्याच्या मैफलीला जावे.
वाईट इतकेच वाटते की, सर्व दृष्टीने शक्य असूनहि सौ., मुले या माझ्या विचाराच्या पूर्णपणे, विरुद्ध आहेत, अगदी विषयसुद्धा काढू देत नाहीत!! या विषयावर घटस्फोट घेण्याची सुद्धा इच्छा होते कधी कधी!

जाउ दे, " टडोपा " आले.

बेफी,

पुणेकर नसूनही मला पुणे प्रचंड आवडतं, २००५ पासुन मी पण ईथे रहातो आहे, आणि म्हणून तुमची तळमळ पटली.
हे सगळे बदल होतांना मी ही जवळून पाहिले आहेत, आणि पुण्याची खराब होत असलेली अवस्था पाहून हळहळ वाटते.
विकासाच्या या प्रक्रीयेत सरकार आणि राजकारण यातील प्रत्येक घटक फक्त आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यात स्वारस्य दाखवतो. आणि मग सर्व विकासाचा बट्याबोळ होतो. >> प्रचंड अनुमोदन !!!

मला पुणे एक थर्डक्लास शहर वाटते.चार दोन पेठातल्या लोकांनी केलेले ओव्हरेक्झॅगरेट शहर

बेफिकीर....

सविस्तर अभ्यास आणि एक जबाबदार जागृत नागरीक या नात्याने तुम्ही केलेले पुणे शहराच्या स्थितीचे वर्णन खरे तर योग्य त्या शासकीय पातळीपर्यंत जाणे गरजेचे आहे.....[कदाचित जाईलही]....तरीही हा लेख मी लिहिला असता तर मी या लेखाच्या शीर्षकात "दुर्दैवी" शब्दाचे प्रयोजन केले नसते. कारण स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकापासूनच नगरांची महानगरी होण्यात त्या चार मोठ्या शहरानंतर पुणे शहराचा क्रमांक फारच वरचा होता आणि शासनाने विज्ञानाच्या तसेच तांत्रिक विकासाच्या क्षेत्रात इतके मोठे परिवर्तन घडविण्याचा जर ध्यास घेतला होता आणि जर त्यामुळे आर्थिक घडीला काही मजबूती येईल असे आराखडे बांधले गेले असतील तर या सुधारणेच्या चक्रात सर्वसामान्यतः नागरिकांची आणि शहरी बांधणीची कुचंबणा होत राहाणारच हे तर्कशास्त्र पन्नास वर्षापूर्वीही स्वीकारले गेले होतेच. काय मिळवायचे आहे तर काय गमवावे लागेल यावर अर्थतज्ज्ञ आणि विकासप्रमुख यानी श्वेतपत्रिकाही सादर केलेल्या असतात....ज्या जरी जशाच्या तशा मान्य केल्या जात नसतील तरीही समाजावर त्याचे परिणाम होत राहातातच....मग काहींना ते सुपरिणाम वाटतात तर दुसर्‍या बाजूने ते दुष्परिणाम मानले जातात.

मी कोल्हापूरचा असून मुलगा पुण्यात आल्यापासून या शहराच्या माझ्या फेर्‍यामध्ये वाढ झाली आहे. शासकीय अधिकारी म्हणून कार्यालयीन कामानिमित्ताने येत होतो, त्यावेळी पाहिलेले सायकलीचे पुणे जसे पाहिले आहे, स्मरणात आहे तसेच आता अवाढव्य झालेले आणि वेगाने वाढतच चाललेले पुणे आज पाहात आहे. तरीही पुण्याची खास अशी संस्कृती टिकून राहिलेली आहेच आहे. वाद निर्माण केले गेले आहेत ते बेफाट आणि बेमुर्वतखोरपणे रस्त्यावर धावणार्‍या बाईक्स आणि कार्सनी....शिक्षणक्षेत्राला मी दोष देऊ इच्छित नाही. कारण त्याचे लाभ महाराष्ट्रातील सार्‍या मुलामुलींना मिळाले आहे. त्या आधारे त्याना विविध क्षेत्रात भक्कम नोकर्‍या मिळाल्या असून ते आणि अन्य शहरात राहात असलेले त्यांचे कुटुंबिय समाधानी चित्तवृत्तीने जगत आहेत, हे चित्र फार उजवे आहे, बेफिकीर.

पुणे शहर निवडले गेले आहे "कायापालट" बद्दल....तरीही मी इथे सांगू इच्छितो की मी बंगलोर, नागपूर तसेच सुरत या शहरांची २५ वर्षापूर्वीची आणि आत्ताची बेफाम वाढ पाहिली आहे. बंगलोर तर सुंदर म्हणून संबोधिले गेलेले एक शहर....पण आज आवाक्याबाहेर गेलेली ट्रॅफिक आणि प्रदुषण यामुळे त्याचेही पुण्यासारखे रुपांतर होत आहे....आणि जागेच्या किंमतीबाबत तर काय लिहावे ? त्यामुळे तर आमच्या कोल्हापूरातही जागेबाबत डोळे विस्फारून टाकणारे आकडे बाजारात येत आहे. हा सारा परिणाम परिवर्तनाच्या नावाखाली झाला आणि होत आहे त्याला शासन तरी काय करेल ? ही एक म्हटली तर ज्वलंत समस्या होऊ शकते.... पण शेवटी शासनाकडून तीव्र कार्यवाहीची आपण अपेक्षा ठेवू शकतो..... या देखण्या शहरावर अजूनी बाह्य आक्रमणाचा अजूनी किती बोझा टाकावा यावर तेथील स्थानिक नगरसेवकांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे नक्की... पण ते होऊ शकणार नाही....इतकी त्यांच्या कार्यक्षमतेविषयी तुमच्यासारख्या पुणेकरांना खात्री असणारच.

असो.... एका महत्वाच्या विषयावर तुम्ही केलेल्या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन.

असा कायापलट होताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा रोजच दिसत आहे,

आज पुण्यात १५ किमी अंतर पार करण्यासाठी १ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो,

बदल सार्वजनिक सहभागातून होणार असला तरी पुढाकार स्थानिक नेत्यांनीच घेणे गरजेचे आहे, शहरातील प्रमुख रस्ते आणखी अरुंद करीत बीआरटी चा घाट , अनावश्यक आणि केवळ अतिक्रमणासाठी तयार होत असलेला सायकल ट्रॅक, वर्षानुवर्षे काम करुन तयार करण्यात आलेले ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल ,तरीही चौकातले ट्राफीक जैसे थे, हे सगळे कमीच कि काय मग रस्त्याचे खड्डे ..................................

लेख एकदम भावला. जन्मापासून पुण्यात असल्यामुळे हे सगळे बदल डोळ्यासमोर झालेले आहेत. कधी कधी वाटते की जिथे आपण लहानपण घालवले ते हे गाव नव्हे. खरोखरी ८० च्या दशकात पुणे हे गाव म्हणावे असेच होते. बदल हा आवश्यकच असतो पण पुण्यात त्या बरोबर बकालपणा वाढत गेला.
दुर्दैवी कायापालट हा शब्द अगदी योग्य आहे.

मी जन्मापासून पुणेकर - माझी नाळच बांधली गेलीये या शहराशी. गेली पन्नास वर्षे हे शहर पहातोय आणि बदलही अनुभवतोय....
बेफिकीर - तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरे आहे, अनेक बदल झाले खरे पण नुकसानीच जास्त झालीये असे वाटते. अर्थात काळाबरोबर बदलही होणारच -त्यात चांगले-वाईट दोन्हाही आलेच...

पुणे हे पहिल्यापासून महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे (फारच थोडे अपवाद वगळता). अजूनही एखादी तरुण मुलगी/ स्त्री ही पुण्याच्या मध्यवर्ति भागात कामानिमित्ताने/ अभ्यास वा अशाच कारणाने अगदी मध्यरात्रीही एकटी जाऊ-येऊ शकते. ही गोष्ट मला पहिल्यांदा समजली ती बाहेरुन पुण्यात आलेल्या माझ्या मित्रांकडून. पुण्यात इतर प्रांतातील अनेक मंडळी स्थायिक व्हायचे हे एक मोठे कारण आहे.
दुसरे कारण असे की पुण्यात दंगे-धोपे (राजकीय, धार्मिक वा इतरही) व्हायचे प्रमाणही अत्यल्प आहे.

पुण्याच्या आसपासचा बराच भाग अजूनही बर्‍यापैकी हिरवागार आहे - अशी झाडे-झुडपे ही कुठल्याही शहराला फुफ्फुसासारखी आहेत - जेवढी झाडी जास्त तेवढे शहर निरोगी. त्यामुळे अशी झाडे-झुडपे पुण्याच्या मध्यवर्ति भागात अजून चांगल्या प्रकारे जोपासली जावी जेणेकरुन हे वाढते प्रदूषण जरा तरी कमी होईल.

बाकी रहदारी, वहातूक याविषयी अनेक जणांनी लिहिले आहेच - त्यात शासनाबरोबर आपणही(शिस्तीच्या बाबतीत, सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत) तितकेच जबाबदार आहोत. कायम दुसर्‍याकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेच असतात हे सोयीस्कररीत्या विसरुन कसे चालेल ?

अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही (सवाई गंधर्वसारखे) अजूनही इथे अतिशय उत्साहात होत असतात - हे पुण्याचे खास वैशिष्ट्य अजून वृद्धिंगत होवो.

बाकी काही असो - अजून काही वर्षांनी का होईना हे एक आदर्श शहर म्हणून गणले जाईल असा एक आशावाद (कोणाला तो भाबडाही वाटू शकेल) मनात आहे. अनेक स्वयंसेवी संघटना आपापल्या परीने हे शहर जपण्याचा प्रयत्न करीत असतात - आपणही अशा एखाद्या संस्थेच्या कामात भाग घेऊन खारीचा का होईना पण वाटा उचलू शकतो. कृति महत्वाची आहे - चर्चा, वादविवाद यापेक्षा छोटी का होईना कृतिकडे जास्त लक्ष देऊयात....

आजच्या लोकसत्ता पुणे विभाग मधे बातमी आहे -
'शहर विकास आराखड्याला महापालिकेची मंजुरी;आराखडा ८८ हजार कोटींचा'

८८ वर किती शुन्य येतात.. मग ते कुठे कुठे जाणार काय माहिती

जो पर्यंत सरकार, शासन म्हणजे कोणीतरी वेगळे आहे आणि मत दिले किंवा कर भरले की आपली सगळी जबाबदारी संपली असे मानणारी माणसे आपल्यामधे बहुसंख्येने आहे तो पर्यंत (सखेद म्हणावेसे वाटते की) हे बदलाचे चित्र कधीच सुदैवी होणार नाही. आणि हे चित्र पालटावयाचे असेल तर, शशांक यांचे म्हणणे पटते आहे.

अनेक स्वयंसेवी संघटना आपापल्या परीने हे शहर जपण्याचा प्रयत्न करीत असतात - आपणही अशा एखाद्या संस्थेच्या कामात भाग घेऊन खारीचा का होईना पण वाटा उचलू शकतो. कृति महत्वाची आहे - चर्चा, वादविवाद यापेक्षा छोटी का होईना कृतिकडे जास्त लक्ष देऊयात....

शशांक....

"....अजून काही वर्षांनी का होईना हे एक आदर्श शहर म्हणून गणले जाईल असा एक आशावाद ..." हे मला फार आवडले. मी कोल्हापूरकर असूनही पुण्याबद्दल माझ्याही नेमक्या ह्याच भावना आहेत.

आता ह्या शहराची दुरावस्था लवकरच कुत्रेही खाणार नाही अशी होईल.

नाही नाही आता ह्या शहराची दुरावस्था लवकरच कुत्रेही खाणार नाही अशी झालिच आहे...
सर्वच बाबतीत आणी आता परिस्थिति हातबाहेर गेलीय...

>>> पी सी एम ला ९३ टक्क्याला सी ओ ई पी क्लोज झाल्याने ९२ टक्केवाल्यावर सायन्सला जायची वेळ येणे आणि तेव्हाच दोन लाख देणगी आणि वार्षिक आठ हजार फी भरण्याची कुवत असलेल्या पंचाहत्तर टक्क्यांवर खासगी अभियांत्रिकीत प्रवेश मिळणे असेही प्रकार झाले. पण हे सारे प्रकार थांबवले गेले नाहीत. ते तसेच चालू राहिले व तीच शैक्षणिक संस्कृती ठरू लागली. या शिक्षण क्षेत्रात पडलेल्या फरकामुळे पुण्यात आणखी एक मोठा फरक पडला. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, काश्मीर व राजधानीतून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. बक्कळ पैसे असलेल्यांची मुले दिमाखात इंजिनियरिंगला जाऊन मोटारसायकली उडवू लागली.<<<

+१०००

अगदी वाट लागली पुन्याची शिक्षन्क्षेत्रातील अशा बदलाने हेच म्हणता येइल उदासपणे. मुला/मुलींचे लोंढे ज्यांच्याकडेपैसा देवून शिक्षण घेता येतं हे समीकरण अशी श्रीमंत नॉर्थ कडची मुलं/मुली.

बर्‍याच बदलांविषयी चांगलं लिहिलय.

देशात गेलं की मला आताशा ज्यास्तच भिती वाटते रस्त्यावरून चालायला म्हणा किंवा स्वतःची गाडी.

इतकीबेशिस्त पणे गाडी चालवतातच पण रस्ता क्रॉस करायला हि भिती; कोणी उडवेल की काय.
लक्ष्मी रोड वर जाणं सुद्धा नकोसं होतं.

सुदैवाने (!) टि. चंद्रशेखर नागपुरात होते, म्हणुन, नाहीतर नागपुरही याच वाटेने गेले असते. का कुणास ठाऊक, पण नागपुर/ अमरावतीत अजुनही रहदारीची बेशिस्ती फारशी दिसत नाही, जी पुण्यात फारपूर्वीपासुन {अगदी सायकलींच्या जमान्यापासुन} असावी की काय अशी शंका येते. नागपुर बहुदा लुनाचे शहर म्हणुन पुर्वी ओळखले जात होते, असे ऐकले होते.
{संदर्भ :- पुण्यातील माझ्या ४ महिन्यांच्या वास्तव्यातील बरेचसे अनुभव Happy }

Pages