प्राथमिक शाळेमध्ये सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पाटीवर पेन्सिलीने लिहिताना गारठलेल्या बोटांची पंचाईत होत असे. कानटोपी / माकडटोपी, स्वेटर, बूट मोजे याशिवाय सकाळी शाळेला निघणे अशक्य! कुठेही पाणी प्या, उत्तम चव आणि तृप्ततेची हमी! भरपूर झाडे, टेकड्या, पाऊस, शांतता, मैदाने वगैरे पुण्याची श्रीमंती असे!
इतर सर्व शहरांप्रमाणेच येथेही तांत्रिक विकास झाला व त्याचे सर्व फायदेतोटेही झाले. पण महाराष्ट्रातील इतर कित्येक शहरांच्या तुलनेत पुण्याचा विकास किंवा पुण्याचा कायापालट हा वेगळ्या गतीने व वेगळ्या प्रकारे झाला. हा विकास व हे बदल तीन ठळक घटकांमुळे झाल्याचे लक्षात येईल. हे बदल व असा विकास महाराष्ट्रातील कोणत्याच शहराचा होऊ शकला नाही. मुंबईची गोष्टच वेगळी आहे कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे.
हे तीन घटक पंधरा पंधरा वर्षांच्या हप्त्यात प्रभावी ठरल्यासारखे वाटते.
१९७० ते १९८५ - ऑटोमोबाईल सेक्टर -
टेल्को, बजाज ऑटो व बजाज टेंपो या सर्वांनी मिळून दुचाकी, तीनचाकी व चारचाकी (बस/ट्रक/मेटॅडोर इ.) क्षेत्रे काबीज केली. संपूर्ण देशात तर त्यांचा सप्लाय झालाच पण त्यामुळे पुण्याचे स्वरूप बदलले. हे बदल कोणते?
१. सायकलींची जागा स्वयंचलीत दुचाकींनी घेणे
२. टांग्यांची जागा रिक्षांनी घेणे
३. प्रदुषण वाढणे
४. दुचाकी व तीनचाकीसाठी कर्जे, त्यांचे हप्ते, डाऊन पेमेंट, असे सर्व अर्थकारण आरंभणे
यातील काही फरक इतर शहरांमध्येही असेच झालेले असणार, पण पुण्यात आणखी एक फरक असा पडला की तंत्रज्ञान अभियांत्रिकी व ऑटो अभियांत्रिकी या क्षेत्रातील लोकांना नोकर्या मिळू लागल्या. शासकीय सेवा, बँका यात आयुष्य व्यतीत करणार्यांना आता ऑटो मॅन्युफॅक्चरर्स व त्यांच्या अॅन्सिलरीजकडे जॉब्ज मिळू लागले. हा फरक खास पुण्यापुरता व काही प्रमाणात औरंगाबादपुरता (बजाज ऑटो) व अत्यल्प प्रमाणात अहमदनगरपुरता (कायनेटिक) होता. लुना, टीव्हीएस ५०, बजाज एम फिफ्टी, बजाज एम एटी या वाहनांनी मध्यमवर्गीयांचे खिसे काबीज केले. इतर शहरांमधून लोकांनी नोकरीसाठी पुण्यात येण्याचे प्रमाण या ऑटो क्षेत्रामुळे जबरदस्त वाढले.
इ.स. १९८५ ते २००० - शिक्षणक्षेत्र विकास
तसेही आधीपासूनच विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतीक राजधानी वगैरे वगैरे उपाधी प्राप्त झालेल्या पुण्यात प्रथमच खासगी कॉलेजेस मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. राजकीय पुढार्यांनी सुरू केलेली ही कॉलेजेस डोनेशन व भरमसाठी फिया आकारू लागली. शिक्षण अधिकजणांना उपलब्ध होणार यामुळे शासनाने हे सारे संमत तर केलेच पण गुणवत्ताही बर्यापैकी घसरू दिली. विचित्र तिढे निर्माण होऊ लागले. पी सी एम ला ९३ टक्क्याला सी ओ ई पी क्लोज झाल्याने ९२ टक्केवाल्यावर सायन्सला जायची वेळ येणे आणि तेव्हाच दोन लाख देणगी आणि वार्षिक आठ हजार फी भरण्याची कुवत असलेल्या पंचाहत्तर टक्क्यांवर खासगी अभियांत्रिकीत प्रवेश मिळणे असेही प्रकार झाले. पण हे सारे प्रकार थांबवले गेले नाहीत. ते तसेच चालू राहिले व तीच शैक्षणिक संस्कृती ठरू लागली. या शिक्षण क्षेत्रात पडलेल्या फरकामुळे पुण्यात आणखी एक मोठा फरक पडला. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, काश्मीर व राजधानीतून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. बक्कळ पैसे असलेल्यांची मुले दिमाखात इंजिनियरिंगला जाऊन मोटारसायकली उडवू लागली.
हे असे शिक्षण मिळू लागणे हे महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये का झाले नसेल? त्याची कारणे बहुधा जरा गंमतीशीरच असावीत. पुण्याची हवा, पाणी, वाढ होण्यास असलेला भरपूर वाव, मुंबई व इतर शहरांशी सोपे कनेक्शन, त्या काळी गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प असणे अशी अनेक कारणे असू शकतील. उदाहरणार्थ, मुलाला शिकायला परगावी पाठवायचे झालेच तर नागपूरच्या उन्हाळ्याच्या तुलनेत पुण्याला पाठवणे लोकांना रुचणार यात शंका नसावी.
शिक्षणक्षेत्रातील ह्या क्रांतीकारक टप्प्यामुळे पुणे हे देशाचे फेव्हरिट एज्युकेशन सेंटर ठरले. विद्यार्थ्यांचा अखंड प्रवाह सुरू झाल्यामुळे पुण्याचे परिवर्तन अर्थातच अत्यंत वेगाने होऊ लागले. रस्ते, इमारती, होस्टेल्स, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन्स, दुचाकी, दुचाकी दुरुस्ती, मेस, टपर्या, याशिवाय करमणुकीची साधने अश्या अनंत व्यवसायांना एक जबरदस्त उड्डाण मिळाले. पुणे व देशातील इतर तुलना करता येण्याजोगी शहरे ह्यांच्यातील फरक व तफावत मोठ्या प्रमाणावर वाढणे येथेच सुरू झाले.
इ.स. २००० ते २०१३ - इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी -
या विषयावर काही नाही लिहिले तरी चालण्यासारखे आहे कारण हा चालू कालखंड असून तो सर्वज्ञात आहे. पुन्हा एकदा पुण्यात 'वाढीस असलेला वाव', पाण्याची व विजेची उपलब्धता, दळणवळण, कनेक्टिव्हिटी त्यात आता वरती शिकून बाहेर पडणारे व नोकर्या शोधणारे विद्यार्थी हे सर्वच घटक कामी आले. पैशाकडेच पैसा जातो म्हणतात तसे जो येईल तो पुण्यातच कंपनी थाटू लागला. या कालावधीत पुण्यातील काही विभागांना युरोपसारखे दिसता येऊ लागले.
पाच पाच धरणे आता कमी पडतात. जागांचे भाव अप्राप्य पातळीला पोचलेले आहेत. शिक्षण व इतर सर्व बाबी अतिशय महागलेल्या आहेत. वातावरण प्रचंड प्रदुषित झालेले आहे. वाहतुक अत्यंत बेशिस्त आणि अपुर्या रस्त्यांवर होत आहे. वीज कमी पडत आहेच. बाहेरून येणार्यांचा ओघ थांबतच नाही आहे. अत्यंत काटेकोर आणि अप्रिय निर्णय घेतल्याशिवाय पुण्याचा र्हास थांबणे हे एक दूरचे व सत्यात न उतरणारे स्वप्न वाटत आहे.
पुण्याने कायम पेन्शनरांचे शहर म्हणूनच राहावे असे कोणीच म्हणणार नाही, पण अनप्लॅन्ड ग्रोथ आणि नुसतीच उपभोग घेण्याची प्रवृत्ती (काँट्रिब्यूट न करण्याची प्रवृत्ती) ह्यामुळे जो र्हास होत आहे त्याचे कित्येक दृष्य परिणाम सभोवती आधीच दिसत आहेत.
हा असा विकास बुलढाणा, औरंगाबाद, नागपूर, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव किंवा तत्सम शहरांत झाला नाही. असा विकास देशातील चार ते पाच मध्यम आकाराची व पुण्याशी तुलना करता येण्याजोगी शहरे सोडली तर इतरत्र झाला नाही.
पुण्याचच असा कायापालट होण्यामागे वर लिहिल्याप्रमाणे हवा, पाणी, वाढ करण्यास असलेला वाव, सुशिक्षित व अशिक्षित मॅनपॉवर उपलब्ध असणे, कनेक्टिव्हिटी हे सर्व घटक एकाच ठिकाणी होते. पण या पंचेचाळीस वर्षांमध्ये एक जन्मजात पुणेकर म्हणून आजतागायत एकदाही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा नेत्याकडून काही भरीव व ठोस नियोजन आकारास आलेले पाहिलेले नाही, हे दुर्दैवी आहे. बी आर टी की काय ती योजना जवळपास फेल गेलेली आहे. मेट्रो होणे लांबच आहे, कर्वेरोडला पर्याय काढता आलेला नाही. बसेस पुरेश्या नाहीत. टू व्हीलर्सच्या संख्येवर नियंत्रण नाही. पार्किंग उपलब्ध नाही. जागांचे भाव अवाच्या सवा झालेले आहेत. पाणी व वीजकपात नित्य आहे.
पुण्याच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे विकासास मिळालेला वाव हा पुणेकरांनी व इतरांनी हपापल्याप्रमाणे उपभोगला, पुढार्यांनी पोळ्या भाजून घेतल्या आणि आता ह्या शहराची दुरावस्था लवकरच कुत्रेही खाणार नाही अशी होईल.
फार पूर्वी पाहिलेल्या पुण्यावर असलेले अपरिमित प्रेम हा लेख लिहिण्यास कारणीभूत ठरले.
-'बेफिकीर'!
यावरचा उपाय एक सायन्स फिक्शन
यावरचा उपाय एक सायन्स फिक्शन होईल.
मी जन्माने पुणेकर नाही. लग्न
मी जन्माने पुणेकर नाही. लग्न करून पुणेकर झाले. माझ्या सासू, सासरे, पती यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टी मला मूळ पुणेकरांच्या वेदनांची जाणीव करून देतात. आमच्या शहरात पर्याय नसल्याने माझ्यासारखे अनेक लोक इतर शहरांतून इथे आले आणि गर्दी निर्माण केली.
पुणे असमतोल विकासाचे बळी ठरले आहे. सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे आणि केवळ चमत्कारच वाचवू शकतो.
यावेळी सोलापूर भेटीत जाणवलेली
यावेळी सोलापूर भेटीत जाणवलेली गोष्ट म्हणजे सोलापूर ची तरूण पिढी पुण्यालाच शिफ्ट होत आहे. काही जण शिक्षणा निमित्त , काही जण नोकरीसाठी. एका रिटायर्ड नातेवाईकाने पुण्यालाच घर घेतले आहे, तिथे मुली शेजारी रहाता यावे म्हणून. सोलापूर आता म्हातार्यंचे गाव झाले आहे असे एकजण वैतागाने म्हणाला. इतरही अनेक गावातून पुण्याला येत असतील लोक, अवघड आहे.
सोलापूरला स्थायिक व्हायला
सोलापूरला स्थायिक व्हायला नाही का तयार कोणी?
सोलापूर आता म्हातार्यंचे गाव
सोलापूर आता म्हातार्यंचे गाव झाले आहे >>>
पूर्वी पुण्याला पेन्शनरांचं शहर म्हणत असत त्याची उगाचच आठवण झाली.
र्वी पुण्याला पेन्शनरांचं शहर
र्वी पुण्याला पेन्शनरांचं शहर म्हणत असत त्याची उगाचच आठवण झाली. >>>> आपला केप्या पुण्यातच असतो ना???? उगाचच आठवलं ......
अरूण
अरूण
विकु, तंतोतंत नांदेड बाबत
विकु, तंतोतंत नांदेड बाबत झाले आहे. बऱ्याचशा कॉलनीतील दोन मुलांपैकी एक मूल अमेरिकेत व दुसरं पुण्यात. पण माझा भाऊ सगळे बस्तान सोडून परत आला नांदेडला, वर्क फ्रॉम होम मुळे. त्याला सगळे का परत जाताय म्हणत होते, मोठी हिंमत दाखवावी लागली.
बेफि - नोकऱ्या नाहीत, पाणी, वीज सगळ्याचाच त्रास आहे. शाळा/ कॉलेजमधले शिक्षणही लोकांना आवडत नाही. सगळ्यांची मुलं पुण्यालाच येतात शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी. दवाखाने पण विशेष नाहीत म्हणजे आहेत पण रूबी/ दीनानाथ सारखे मोठे उपचार होत नाहीत. ज्येनांना जे 'कंफर्ट ऑफ लिव्हिंग' पुण्यात मिळतात, ते मराठवाड्यात मिळत नाहीत. नांदेडची मोठी- प्रशस्त घरं विकून तेथे मुलांजवळ दोन बेडरूमच्या फ्लॅटमधे राहणारी अनेक मंडळी माझ्या जवळच्या नात्यात आहेत. या सगळ्याचाच पुण्यावर ताण येतो याची कल्पना आहे पण आम्ही तरी कुठे जावे याचेही उत्तर नाही.
एका शहराचा क्षमतेबाहेर आणि
एका शहराचा क्षमतेबाहेर आणि म्हणून वेडावाकडा विकास होतो कारण त्याच्या शेजारील शहरांचा विकासच होत नाही. म्हणजे सगळे राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. हा धंदा आहे. परिस्थिती कधीच बदलणार नाही हे स्विकारा..
मी फार फार लहानपणी पुण्याला तीन वेळा मुक्कामाला गेलो होतो. एकदा चाळीतील मित्राच्या घरी, एकदा शाळेतील मित्राच्या घरी, तर एकदा काकींच्या माहेरी.
तिन्ही भाग पुण्यातले कुठले होते ते आता माहीत नाहीत. पण पुणे फार बोर वाटलेले इतकेच आठवतेय. म्हणजे पुणेरी लोकांना तेथील शांत निवांत आयुष्याचे कौतुक असायचे. मला विचारायचे काय मग कसं वाटले आमचे पुणे.. तर माझे प्रामाणिक उत्तर हेच असायचे की चार दिवस राहायला बरे आहे. पण कायम नाही राहू शकत असे स्लो लाईफ घेऊन.. कारण हा सवयीचा भाग होता. यात काही हे भारी की ते भारी नव्हते.
पण इथले प्रतिसाद वाचले आणि जाणवले की पुणे सुद्धा बदलले आहे. पण असे वाटते की ना ते पहिल्याचे पुणे राहिले असेल ना ते मुंबईसारखे झाले असेल.
मुंबई सुद्धा बदलली आहे पण मुळातच ती इतर शहरांच्या तुलनेत गजबजलेली आणि वेगवान आयुष्य जगणारी असल्याने पिंडच बदलला असे वाटत नाही.
अस्मिता +११
अस्मिता +११
नांदेड ला कोविड काळात सुमारे दोन वर्षे राहिलो.
इकडचा rent वाचवणे आणि एकंदरीत सगळेच फायदे होते.
तेव्हा ते शक्य झालं कारण बाळ लहान होतं आणि पूर्ण remote working.
आता शक्य नाही.
तिकडे राहिल्यावर बरेच खर्च वाचतात हा अनुभव आहे.
पण आगाऊ मागासलेल्या मानसिकता असणाऱ्या community मध्ये राहावे लागते हेही खरे आहे.
पुण्यात कुणी कुणाकडे लक्ष देत नाही शहर असल्यामुळे.
नांदेड शहर झालेय पण मानसिकता तीच जुनिपुराणी
>>> पिंडच बदलला असे वाटत नाही
>>> पिंडच बदलला असे वाटत नाही.
हे म्हणायचे आहेच ऋन्मेष (आय डी चे हे नाव आज टाईप करता आले). पुण्याचा पिंडच बदलला आहे.
आम्ही पुणे सोडून मामुर्डीत
आम्ही पुणे सोडून मामुर्डीत आलो रहायला.
आता तरी शांत आहे. पुढे काय होईल सांगता येत नाही.
Pages