'सच' तो यही है!

Submitted by योग on 12 November, 2013 - 04:03

सचिन रमेश तेंडुलकर, बस नाम ही काफी है!

तरी देखिल सचिन, उर्फ साहेब, उर्फ तेंडल्या बद्दल गेली दोन दशके भरभरून लिहीले व बोलले गेले आहे आणि सचिन च्या शेवटच्या कसोटी सामन्या नंतर देखिल त्याचा संदर्भ वारंवार दिला जाईल यात शंका नाही. अगदी अलिकडे, सचिन च्या निवृत्तीवरून शंखनाद करणारे माझ्यासारखे त्याचे असंख्य चाहते देखिल आता सचिन खरोखरच निवृत्त होत आहे या जाणिवेने निश्चीतच थोडे गलबलले असतील. कारण तो आता मैदानावर खरोखरीचा पुन्हा दिसणार नाही हे कटू सत्य मात्र स्विकारावे लागेल. कपिल, सुनील ही दैवते माझ्या पिढीसाठी आधीच देव्हार्‍यात विराजमान झालेली असताना एक नविन देव असा साक्षात समोर घडताना बघणे आणि आयुष्याच्या सोनेरी कालावधीतील अनेक क्षण त्याच्या खेळीने अधिक ऊजळलेले अनुभवण्याचा याची देही याची डोळा साक्षीदार असल्याचा आनंद शब्दातीत आहे. ईतका की, अगदी टॉनी ग्रेग च्या शब्दकोशातील शब्द देखिल कमी पडतात.

घटना, तपशील, विक्रम, आकडेवारी, अशा अनेक परिमितीतून सचिन नावाच्या सूर्याची दैदीप्यमान कारकीर्द तपासली गेली असली तरी आजच्या पिढीतील सर्वार्थाने संपूर्ण अशा खेळाडूचा गौरव करताना निव्वळ खेळ, आकडेवारी, विक्रम यापलिकडे जाऊन काही गोष्टी नोंदवाव्याश्या वाटतात.

१. सर्वप्रथम एक ऊत्तम माणूसः मला वाटते सचिन ची ही ओळख सर्वात अधिक श्रेष्ट आहे. मुलगा, विद्यार्थी, पती, वडील, मित्र, अशा अनेक भूमिका साकारताना कधी कुठेही त्याच्या बाबतीत अशोभनीय ऐकले व बोलले गेलेले नाही. जवळ जवळ २५ वर्षाच्या कारकीर्दीत तेही भारतासारख्या क्रिकेट्वेड्या व प्रसार माध्यमांचा २४ तास दबाव असणार्‍या देशात ही गोष्ट जवळ जवळ लाखात एक आहे. कुटूंबवत्सल संस्कृती ही आजही भारतीय संस्कृतीचा प्रमुख आधार व ओळख मानली जाते. सचिन चे नाव त्याही बाबतीत आदरानेच घेतले जाते.

२. शिस्त, कार्यनिष्ठा, निगर्वीपणा: कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करणे व ते टिकवून ठेवणे यासाठी या तिनही गुणांची आवश्यकता असतेच. आचरेकर सरांचा एक आदर्श विद्यार्थी ते क्रिकेट चा एक जागतिक आदर्श Brand Ambassador या प्रवासात सचिन ने या तिनही गुंणांची कास सोडलेली नाही हे दिसून येते. १२ तास त्याच्या नेट सरावाच्या कहाण्या असोत; की एखाद्या विशीष्ट मालिके आधी वा प्रतीस्पर्धी गोलंदाजाविरुध्द तयारी करण्याचे किस्से असोत; किंवा वेळोवेळी ईतर ज्येष्ट खेळाडूंकडून सल्ला वा मार्गदर्शन घेणे असो; किंवा घरगुती अडी अडचणी वा दुखापतींवर मात करून पुन्हा मैदानावर भारतासाठी खेळण्याची व विजय मिळवून देण्याची धडपड असो. या प्रत्येक गोष्टीत सचिन ची कार्यनिष्ठा व खेळाबद्दल असलेले अपार प्रेम आणि आदर या बाबींचा कायम हेवा वाटतो.

३. मैदान व मैदानाबाहेरील वर्तणूकः खरे तर क्रिकेट चा खेळ हा आता 'जेंटलमन गेम' राहिलेला नाही. बदलत्या कालानुसार सर्वच संघांच्या व खेळाडूंच्या मैदानावरील वर्तणूकीत आक्रमक बदल झालेले दिसून येतात. त्यातही तुफान गोलंदाजी बरोबरच शिवीगाळीचे तुफान माजवणार्‍या काही विशीष्ट संघांनी या आगीत तेल ओतण्याचे काम निश्चीत केले. अशा माजलेल्या संघांच्या "अरे ला कारे" म्हणण्याची हिंमत व धडाडी दाखवणार्‍या गांगुली उर्फ दादा च्या भारतीय संघावर खूष असलेला तोच क्रिकेटवेडा भारतीय प्रेक्षक मात्र सचिन च्या निव्वळ बॅट कडूनच ती अपेक्षा करत असे यातच सर्व काही आले. त्या अनुशंगाने, मैदानावर अशा गोष्टींमध्ये मात्र सचिन फारच क्वचित वेळा सहभागी झालेला आहे. त्याच्या सर्व भावना या त्याच्या बॅट मधूनच व्यक्त झालेल्या आहेत. मग ते शोएब अख्तर ला २००३ च्या क्रिकेट कप मध्ये षटकार मारणे असो; शारजाह वाळवंटातील १९९८ च्या त्या फेमस "डेझर्ट स्टॉर्म" सामन्यात वॉर्न, फ्लेमिंग, कास्परॉविझ कंपनीला ठरवून बदडून काढणे असो; वा एखाद्या गोलंदाजाला जाणिवपूर्वक ठोकणे असो. मैदानाबाहेर शेन वॉर्न सकट जवळ जवळ सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंनी सचिन एक ऊत्तम मित्र व सौहार्दपूर्वक वागणारा नम्र मनुष्य आहे असे वेळोवेळी नमूद केले आहे. अन्यथा, पैसा, प्रसिध्दी, यश, या गोष्टी अक्षरशः पायाशी लोळण घेत असताना डोके जागेवर ठेवून व पाय घट्ट जमिनीवर ठेवून राहणे आणि आपल्या मूळ संस्कार व संस्कृतिशी असलेली नाळ कायम ठेवणे हे भल्या भल्यांना देखिल जमलेले नाही.

४. ध्यास आणि अभ्यासः आपण भारतीय मुळात दैववादी आहोत. लताबाईंचा जन्म हा गाण्यासाठीच, किंवा झाकीर हुसैन चा जन्म तबल्यासाठीच, बाबा आमटेंचा जन्म समाजकार्यासाठीच, याच दृष्टीकोनातून आपण अनेक नामवंत व किर्तीवान कलाकार वा आदी समाज प्रभृती यांकडे पाहत असतो. बरेच वेळा या लोकांनी ऊपसलेले कष्ट, त्यांची जीवापाड मेहेनत, ध्येयपूर्तीसाठी केलेले त्याग, ई. सर्वाचा आपल्याला विसर पडत असतो. निव्वळ यश आणि अपयश याच दोन तागड्यांच्या तराजूत आपण त्यांचे मोजमाप करत असतो. पण क्रिकेट हाच निव्वळ ध्यास, हेच एक वेड, आणि त्याच्या ध्येयपूर्ती साठी जे जे आवश्यक ते ते सर्वदा करण्याची सचिन ची वृत्ती त्याच्या ईतर समकालीन क्रिकेट्पटूंपेक्षा निश्चीतच अधिक ठळकपणे समोर येते. अन्यथा मैदानाबाहेरील जाहिराती, समारंभ, रंगीबेरंगी आयुष्य, संधी, आमिषे, ई. च्या गदारोळात अनेक गुणवान व पारंगत खेळाडूंच्या कारकीर्दीचा धुव्वा ऊडालेला आपण पाहिलेला आहे. सचिन चा जन्म क्रिकेटसाठीच हे जितकं खरं आहे तितकच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक खरं आहे ते सचिन च्या २४ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीमागील त्याचा निरंतर ध्यास आणि सतत अभ्यास.

५. देशप्रेम आणि संघभावना: क्रिकेट हा खेळ ११ खेळाडूंचा आहे. संघभावना नसेल तर तर ब्रायन लारा सारखा देव देखिल विंडीज चे पानिपत वाचवू शकत नाही हा इतीहास आहे. संघाचा विजय आणि देशाचा विजय याच दोन गोष्टींना सचिन ने कायम मह्त्व दिले आहे. वैयक्तीक हेवेदावे, राजकारण, पूर्वग्रहदूषीत वागणूक अशा अनेक गोष्टि आपण मैदानावर व मैदानाबाहेर बघत असतो. यास भारतीय संघाचे अनेक कर्णधार देखिल अपवाद नाहीत. पण या सर्वात, सर्व संघ सहकार्‍यांकडून सारखाच आदर, प्रेम, व मित्रत्व लाभलेल्या सचिन चे संघातील स्थान म्हणूनच विशेष वेगळे ठरते. आणि अत्यंत प्रतीकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर ऊभे राहून देशाचे रक्षण करणे म्हणजेच केवळ देशप्रेम व देशनिष्टा एव्हडीच मर्यादीत व्याख्या असेल तर करोडोंच्या देशात मूठभरच देशप्रेमी ठरतील. किंबहुना, आपल्या दैनंदीन व्यवहारातील वर्तणूक सुध्दा आपल्या देशप्रेमाची व निष्टेची साक्ष व निकष ठरू शकते हा दृष्टीकोन ठेवला तर स्वताबरोबरच अखिल समाजाचे व पर्यायाने देशाचे कल्याण होण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा, सचिन चा मैदानावरील खेळ, त्याची वागणूक, हे सर्व "आधी देश, आधी संघ" मग ईतर सर्व याची साक्ष पटवणारा आहे यात दूमत नसावे.

क्रिकेट नंतर चरीतार्थासाठी काय? असले कूट प्रश्ण त्याला पडण्याची शक्यता कमी असल्याने त्याचे रूपांतर पैशापासरी समालोचक वा समीक्षक यात होणार नाही हे निश्चीत. क्रिकेट जगतातील सर्वात बलाढय व धनाढ्य क्रिकेट मंडळाची तळी ऊचलून धरण्याची देखिल त्याला व्यावहारीक गरज नसल्याने एकंदरीतच क्रिकेट च्या बाबतीत आजतागायत त्याने राखलेला संतुलीत व आदरयुक्त दृष्टीकोन याही पुढे तो कायम ठेवल अशी आशा ठेवायला भरपूर वाव आहे. खासदारकीचा मंच व क्रिकेट जगतात कमावलेले स्थान याचा वापर करून खरे तर भारताच्या क्रिकेट च्या भविष्यासाठी (खेळाडू, खेळ, समिती, ईत्यादी) सचिन ईतरांपेक्षा निश्चीतच खूप काही अधिक करू शकतो.

सचिन च्या कारकिर्दीचा सूर्य आता लौकीक अर्थाने मावळतीस लागला आहे हे खरेच. मात्र त्याच्या कारकिर्दीतील अनेक क्षण, अनेक घटना, हे पुढील अनेक दशके कायम तेजस्वी राहतील यातही शंका नाही. शेवटी सचिन हा आपल्या सारखाच हाडा मासाचा जिवंत मनुष्य आहे. घर, संसार, व्यावसायीक अशा सर्व क्षेत्रातील अडी अडचणी, चढ, ऊतार हे सर्व त्यालाही चुकलेले नाही. खरे तर शाब्दीक टीका, निंदा, आरोप, हे सर्व ईतर सर्वांपेक्षा अनेक पटींनी त्याच्या वाटयाला क्वचित अधिक आले आहे. करोडो क्रिकेटवेड्या भारतीयांच्या देशात सदैव अपेक्षा व आकांक्षांचे ओझे पाठीवर घेऊन मैदानात ऊतरणार्‍या सचिन ला चूक आणि बरोबर याच कायम नाण्याच्या दोन बाजूंच्या निकालास सामोरे जावे लागले आहे. आजही व भविष्यात देखिल त्याची फेरारी, खासदारकी, प्रशस्त बंगला, ई. अशा अनेक विषयांवरून त्याच्यावर टीका केली जाईल हेही खरे.

पण २४ वर्षांनंतरही सचिन चे नाणे आजही तितकेच खणखणीत आहे आणि मुंबईतील शेवटच्या टॉस चा निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी The Head has always been in the same place..!

परवा अजून एक पर्व संपेल, अजून एक देव देव्हार्‍यात कायमचा ठेवला जाईल, एका नव्या देवाच्या प्रतीक्षेत! कारण आम्हाला देव लागतो.

हा मान, सन्मान, ई. सर्व आधीच्या ईतर क्रिकेट्पटूस मिळायाला ह्वे होते का, वगैरे या असल्या वादात मला वैयक्तीक स्वारस्य नाही. तूर्तास, हा एक शेवटचा सामना सचिन ने स्वताच्या आनंदासाठी, खेळाच्या ऊत्सवासाठी खेळावा आणि जमलेच तर अजून एक शतक ठोकावे अशी एक शेवटची अपेक्षा त्याचा चाहता म्हणून नोंदवतो. साहेबांच्या खेळातील खरा "साहेब" हा भारताचा आहे ही भावना व हे सत्य आजच्या व येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असेल ईतके मोठे कार्य सचिन ने केले आहे. त्यासाठी वैयक्तीक मी व आमची पिढी त्याचे सदैव ऋणी असू.

क्रिकेट खेळाच्या अवकाशात सचिन हा आता अढळ धृव तारा आहे, राहील.. बस यही एक सच है!

सचिन च्या शेवटच्या सामन्यासाठी व आगामी सुखी, समाधानी व निरोगी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देवुयात.
http://www.espncricinfo.com/sachinfarewell/content/site/sachin_farewell/...

खेरीज खास मायबोलीकरीता सचिन ची एखादी मुलाखत घ्यायला, किमान ऐकायला वा वाचायला मिळेल अशी आशा करूयात.

ता.क. अलिकडेच लंडनस्थित जागतिक कंपनीमधील महत्वाच्या कामाचा कार्यभार स्विकारताना प्रेरणा व व्यावसायातील 'ईनोव्हेशन' म्हणून ऊपस्थित साहेब लोकांना सचिन चे ऊदाहरण दिले.
Yes Sir! They obliged. :).. `सर' सचिन रमेश तेंडुलकर!

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
16 Nov 2013 @1.00 pm:

आणि तो क्षण आलाच...
सचिनचे आजचे आभार प्रदर्शनाचे भाषण हे या अध्यायाचा कळसच म्हणायला हवे. एक सचिन घडवण्यात गेले २४ वर्षे अधिक काय आणि किती होतं याचं सार त्याच्या शब्दात होतं. त्यातला प्रत्येक शब्द, भावना, 'सच' होते. त्या शब्दांना आपल्या मातीचा गंध होता, देशाभिमानची झळाळी होती, सगे सोयर्‍यांची ओल होती, कर्तव्यनिष्टेची जाण होती, विनम्रतेची साक्ष होती आणि सर्वात शेवटी ज्या खेळपट्टीने त्याला घडवले त्या खेळपट्टीला, कर्मभूमीला अतीशय भावपूर्ण व आदरयुक्त नमस्कार करून सचिन ने 'संस्काराचा' कायमचा धडा सर्वांच्या मनात कोरला आहे. क्रिकेट च्या देवाचं ते रूप कायम स्मरणात राहील.
साहेब आज 'शब्दांनी' तोडलत.

असा पुत्र, असा खेळाडू, असा सचिन पुन्हा न होणे.

त्रिवार मुजरा...!!

सचिन आणि क्रिकेट या एकाच नाण्याच्या दोन बाजू. सचिन च्या आभार भाषणापूर्वी मात्र सचिन ची पत्नी सौ. अंजली हीने एका वाक्यात या दोन बाजूंचा ठळक फरक दाखवून दिला.
"I can imagine cricket without Sachin but I can't imagine Sachin without cricket..! "
निशःब्द केलं. २५ वर्षे सचिन च्या प्रवासाची साक्ष व जोडीदार असलेल्या अंजलीच्या या शब्दाने अक्षरशः झोपेतून जागं केलं! जेव्हा 'ईतर बाकी' वेगळ्याच चिंतेत असतात तेव्हा आपलं माणूस मात्र आपल्याच चिंतेत असतं. अफाट..!!!
To me these words will forever remain as the best words ever spoken about Sachin and the Cricket. Kudos !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अरे ला कारे" म्हणण्याची हिंमत व धडाडी दाखवणार्‍या गांगुली उर्फ दादा च्या संघावर खूष असलेला तोच क्रिकेट्वेडा प्रेक्षक मात्र सचिन च्या निव्वळ बॅट कडूनच ती अपेक्षा करत असे यातच सर्व काही आले. >> Happy

साहेबांच्या खेळातील खरा "साहेब" हा भारताचा आहे ही भावना व हे सत्य आजच्या व येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असेल ईतके मोठे कार्य सचिन ने केले आहे. त्यासाठी वैयक्तीक मी व आमची पिढी त्याचे सदैव ऋणी असू. >> अगदी... ७०ची पिढी सदैव सचिनची ऋणी राहिल.

ईंद्रा, केदार जाधव,
धन्स!

वानखेडे ला कुणि मायबोलीकर जाणारेत काय..?

मस्त लिहीलंय, तो निवृत्त होत असताना अशा चांगल्या गोष्टींबद्दल उल्लेख असलेला लेख माबोवर आल्याने बरे वाटले, खरेतर असे अजून अनेकानेक लेख असायला हवेत, जमले तर एक वेगळा क्लोज्ड ग्रुप स्थापन करून.

खेरीज खास मायबोलीकरीता सचिन ची एखादी मुलाखत घ्यायला, किमान ऐकायला वा वाचायला मिळेल अशी आशा करूयात.>> + अनेकानेक अनुमोदने

खेरीज खास मायबोलीकरीता सचिन ची एखादी मुलाखत घ्यायला, किमान ऐकायला वा वाचायला मिळेल अशी आशा करूयात.
>>

मी मागे प्रशासनाकडे एक प्रस्ताव मांडला होता ईमेल करुन.
मी त्यांना म्हणालो तुम्ही फक्त आमची भेट घडवून आणा. मी सचिनला क्रिकेटबद्दल प्रश्न विचारतो व जागू (मासे फेम) सचिनला त्याच्या मत्स्य खाद्य प्रेमाविषयी प्रश्न विचारेल. प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले Happy

छान लेख
अर्थातच सारेच मुद्दे पटेश
कोणीतरी आपल्याच कौतुकाचा लेख लिहिला आहे अश्या आवडीने सचिनचे लेख वाचले जातात.
या मोसमात सचिनवरचे १०० लेख वाचण्यास हा अंड्या सज्ज झाला आहे.
आणि जर तेवढे नाही आले तर मग उरलेले मीच लिहेन.. होऊ दे खर्च..

>>प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले

हरकत नाही. पुन्हा प्रयत्न करून पहा.. सचिन च्या भेटीचे सेटींग मी करू शकतो, किंबहुना आधी केले होते पण आता निवृत्तीनंतर त्याला जास्ती वेळ ऊपलब्ध असेल.

>>जागू (मासे फेम) सचिनला त्याच्या मत्स्य खाद्य प्रेमाविषयी प्रश्न विचारेल
अगदी! नव्हेत तर, खास जागू रेसिपी देखिल त्याला खायला द्यावी. सचिन च्या मनाला किमान साद देण्याचा हा नामी ऊपाय ठरू शकतो! Happy

कोणीतरी आपल्याच कौतुकाचा लेख लिहिला आहे अश्या आवडीने सचिनचे लेख वाचले जातात. >> +१

या मोसमात सचिनवरचे १०० लेख वाचण्यास हा अंड्या सज्ज झाला आहे.
आणि जर तेवढे नाही आले तर मग उरलेले मीच लिहेन.. होऊ दे खर्च.. > :d

नक्कीच करा हा कार्यक्रम.... >> हो.. पण एक अट आहे.. मासे सचिनने पकडायचे.

योग... वानखेडे वर केदार जाणार होता... तिकिट मिळालं असेल तर.

सचिनचे जगजाहीर गुण इतके मुद्देसुद मांडलेत ते आवडले. असा सर्वगुणसंपन्न खेळाडू एकमेवद्वितीयच असावा. तो बोलताना त्याचा नैसर्गिक टोनही खुप नम्र आणि लाघवी असतो. आवाजही त्याच्या स्वभावाला साजेसा आहे. अलिकडेच त्याची अमित बिल्डर्सच्या कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्ताने घेतली गेलेली दीर्घ मुलाखत पाहिली. एकंदरीतच त्याची पालकत्व, संघभावना, समाजोपयोगी कार्य, कुटुंब या विविध विषयांवरची मते मुद्दाम ऐकण्यासारखी होती. मुलांचा बाबा म्हणुन तो घेत असलेली दक्षता, कोणकोणत्या प्रसंगी आणि कुणाकुणासमोर सेलिब्रिटी असणं टाळतो, मिडीयाचा ससेमिरा टाळण्यासाठी लोकांना घरीच भेटणं अशा अनेक गोष्टी खरंच वाखाणण्यासारख्या आहेत. त्याची देहबोलीही कधी मोठेपणाची ऐट दाखवत नाही. तो समाजासाठी करत असलेल्या अनंत गोष्टी आपल्यापर्यंत / मिडीयापर्यंत पोचत नाहीत, किंबहुना त्या पोचणार नाहीत याची तो विशेष काळजी घेत असतो. Down to Earth ही फ्रेज सचिनच्या बाबतीत ख-या अर्थाने personified म्हणता येईल.

तुझ्या लेखामुळे आपण या गृहस्थाला किती न्याहाळतो ते लक्षात आलं. हे मी याच्यापूर्वी फक्त राहूल द्रविडबाबतीत करत असे, आजही करते. थँक्स, नेहमीप्रमाणेच छान लिहिलंयस.

धन्स!
>>Down to Earth ही फ्रेज सचिनच्या बाबतीत ख-या अर्थाने personified म्हणता येईल.
++अनेक अनुमोदन!

१००% सहमत ! कसलेल्या जागतिक किर्तीच्या गोलंदाजांविरुद्ध साहेबांच्या अगणित आक्रमक, शैलीदार खेळी पहाताना मिळालेला निखळ आनंद, हें फक्त एक कारणही माझ्यासारख्या लाखों क्रिकेटप्रेमीना त्याला मानाचा मुजरा करायला पुरेसं आहे !

उत्तम लिहिलंय! प्रत्येक शब्द माझ्याच मनातला. किंबहूना सचिनला खेळाडू म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही जीवापाड प्रेमाने स्विकारलेल्या प्रत्येकाच्या मनातली भावना तुम्ही शब्दरुपात मांडली आहे. अभिनंदन!

उत्तम लेख! ४ नंबरचा मुद्दा तर प्रचंड महत्वाचा आहे. ओल्या रबर बॉलने प्रॅक्टीस करणे, काँक्रीट स्लॅबवर बॉल 'पीच' करायला सांगून बाउंसची तयारी करणे, चेन्नईच्या सामन्याआधी हूमिडीटीची सवय व्हावी म्हणून इनडोअर नेट्समधे एसी बंद ठेउन सराव करणे- या व अशा अनेक गोष्टी साहेबांना साहेब बनवतात.

>>चेन्नईच्या सामन्याआधी हूमिडीटीची सवय व्हावी म्हणून इनडोअर नेट्समधे एसी बंद ठेउन सराव करणे- या व अशा अनेक गोष्टी साहेबांना साहेब बनवतात

अगदी!... सुनिल नंतर हे असे सर्व फक्त साहेबच करू जाणेत.

रच्याकने: सचिन ला मी फक्त एकदाच निव्वळ खुन्नस्/रागाने एखाद्या गोलंदाजावर तुटून पडताना पाहिलेला आहे. झिंबाब्वेचा हेंरी ओलोंगा. त्या क्लिप च्या शेवटी ओलोंगाचा चेहेरा अक्षरशः रडवेल्या शाळकरी मुलागत झाला आहे. सचिन ची देहबोली आणि सौरव चे त्याला समजावणे बरेच काही सांगून जाते:

http://www.youtube.com/watch?v=JmhucTFFnBM

टोनी ग्रेग मोड ऑनः
व्हॉ डा प्लेयर........

या खेरीज, पाक व विशेषतः ऑसी विरुध्द देखिल त्याने अनेक वेळा मुद्दामून तोड फोड केलेली आहे. मला वाटते क्रिकेट मधून 'विश्राम' घ्यायला सचिन पेक्षा अधिक वेळ त्याच्या बॅट ला लागेल! Happy

सर्व मुद्द्यांना प्लस वन !

दुर्दैव आपले जे क्रिकेट हा खेळ खेळत राहायला फिटनेस लागतो जो २४ वर्षांच्या अथक घोडदौडीनंतर चाळीशीत पदार्पण केल्यावर गंडतो, अन्यथा जसा एखादा कलाकार जगतो तिथवर कलेला आपले योगदान देतच राहतो तसे सचिनला आयुष्यभर खेळत राहिलेले बघायला सर्वांनाच आवडले असते.

आता मैदानावर नाही तर नाही पण निदान सीमारेषेपलीकडे तरी जवळपासच दिसत राहा बाबा, फार दूर जाऊ नकोस.

च्याकने: सचिन ला मी फक्त एकदाच निव्वळ खुन्नस्/रागाने एखाद्या गोलंदाजावर तुटून पडताना पाहिलेला आहे. >> २००१ मधे ODI series मधे kasprowitz ला पण पाहिले असशील रे Happy

लेख आवडला.

Thanks re.

I have a feeling... if he scores past 25, he will go on to make 100 in this test.

Pages