बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

Submitted by फारएण्ड on 19 October, 2013 - 22:26

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले. त्यामुळे मग जेव्हा त्याने त्यानंतर पहिल्यांदा तेथे रन काढला तेव्हा मोठीच कामगिरी होती ती!

पण त्याला 'डक' समजण्यातला धोका कांगारूंना पुढच्याच अ‍ॅडलेड कसोटीत दिसला. पहिल्या डावांत साधारण बरोबरी झालेली असताना दुसर्‍या डावात त्यांचे सहा लोक उडवून आगरकरने मॅच ओपन केली. मग द्रविड ने दुसर्‍या डावातही शेवटपर्यंत राहून ती जिंकून दिली. पण चौथ्या दिवशी आगरकरने त्या विकेट्स काढल्या नसत्या तर भारताला संधीच मिळाली नसती.

अमेरिकेतील वर्ल्ड सिरीज किंवा इंग्लंड मधली काउंटीची चॅम्पियनशिप आधीच्या सीझन मधे जिंकून देणारा कप्तान जेव्हा निवृत्त होतो तेव्हा मीडियामधले रकाने च्या रकाने त्याला वाहिले जातात. अमेरिकेत पुढे त्यांच्यावर चित्रपट निघतात. आपल्या रणजी ला तेवढी किंमत दिली जात नाही. पूर्वी तेथे धावांचा पाऊस पाडणारे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकत नसत तेव्हा ठीक होते. पण आता तसे नाही. नाहीतर मागच्या वर्षी अंतिम सामन्यात महत्त्वाच्या वेळेस जबरी बोलिंग करून मुंबईला करंडक जिंकून देणारा खेळाडू इतका दुर्लक्षित राहिला नसता.

मागच्या सीझन च्या आधी आगरकरचे मुंबई व्यवस्थापनाबरोबर काहीतरी वाजले, व तो अचानक संघ सोडून निघून गेला. मग त्याला पटवल्यावर आला, कप्तान झाला व रणजी करंडकच जिंकून दिला. ही खास पाकिस्तानी स्टाईल - आज सर्वसाधारण खेळाडू, उद्या संघाबाहेर्/निवृत्त/बंदी, तर परवा विजयी कप्तान!

आगरकर बद्दल एकदम चपखल कॉमेण्ट एक क्रिकइन्फो वर परवा वाचायला मिळाली - "He would have been the best bowler if an over had only five balls!" Happy ओव्हर मधे चार-पाच जबरी भेदक बॉल टाकायचे व त्यातून वाचल्याबद्दल बॅट्समनला बक्षिस दिल्यासारखा एक बॉल द्यायचा ही आगरकरची खासियत. त्यामुळेच तो कधी प्रचंड आवडायचा तर कधी त्याचा प्रचंड राग यायचा.

कौशल्याबद्दल बोलायचे तर फास्ट बोलर चे 'फिजिक' अजिबात नसूनही बर्‍यापैकी चांगला वेग (आणि ९८ साली तो आला तेव्हा असलेल्या आपल्या बोलर्सच्या मानाने तर खूपच चांगला), खतरनाक स्विंग, चांगला यॉर्कर या जमेच्या बाजू. ओव्हर मधे एक 'हिट मी' बॉल देणे हा मेन प्रॉब्लेम. मात्र इतर सर्व बोलर्सच्या तुलनेत अत्यंत चांगली फिल्डिंग, आणि 'ऑल राउंडर' मधे गणना होण्याएवढी नाही, पण अचानक चमक दाखवणारी बॅटिंग. लॉर्ड्स च्या ड्रेसिंग रूम मधे तेथे कसोटी शतके मारणार्‍यांची नावे लिहीलेली आहेत तेथे असलेले त्याचे नाव तेथील टूर गाईड आवर्जून दाखवतो.

त्याच्या स्विंगचे एक खतरनाक उदाहरण. रिप्ले मधे लक्ष देऊन बघितलेत तर अफाट स्विंग लक्षात येइल. कालिसचा ऑफ स्टंप उडवणे इतके सोपे नाही.
http://www.youtube.com/watch?v=010HkflyuI4

स्टीव वॉ ने त्याच्या आत्मचरित्रात लिहीले आहे की त्याच्या करीयर च्या सुरूवातीला रिचर्ड्स ला बोलिंग करताना मुद्दाम खुन्नस उकरायला त्याने त्याला बाउन्सर टाकला होता. ही त्याचीच मात्रा वॉ विरूद्ध, त्याच्याच सेलेब्रेटरी शेवटच्या सिरीज मधे
http://www.youtube.com/watch?v=l4v1e_WgYh4

जयसूर्या ९६-९७ मधे पाटा विकेट्स वर व्यंकटेश प्रसाद ई ना ठोक ठोक ठोकायचा (अर्थात प्रसादही आपण हेडिंग्ले च्या स्विंग वाल्या किंवा पर्थच्या बाउन्स वाल्या पिचवर बोलिंग करत आहोत अशा भ्रमात मुंबई व कोलंबोत त्या लाईन-लेन्थ वर जयसूर्याला बोलिंग करायचा). मात्र माझ्या आठवणीत आगरकरने त्याला कधीच जास्त खेळू दिला नाही.
http://www.youtube.com/watch?v=U6GJjE1a6Tw

भारताकडे 'बोल्ड' घेणारे बोलर्स फारसे नव्हते तेव्हा. त्यामुळे याचा यॉर्कर व त्याने उडवलेले बोल्ड व एलबीडब्ल्यूज उठून दिसत. मग नंतर झहीर, इरफान, आरपी सिंग ई. आले.

आगरकरला मॅन ऑफ द मॅच न दिल्याचे मला सर्वात वाईट वाटले होते ते १९९८ च्या श्री लंकेतील 'इंडिपेण्डन्स कप फायनल' ला. याची थोडी पार्श्वभूमी म्हणजे १९९६ मधे वर्ल्ड कप जिंकल्यावर पुढे दोन वर्षे वन डेज मधे लंका सर्वांनाच भारी पडत होते. जुलै १९९८ मधे तेथे ही एक 'इंडिपेण्डन्स कप' स्पर्धा झाली. त्याच्या फायनलला सचिन व दादा दोघांनीही शतके ठोकून भारताला ३०० च्या पुढे नेऊन ठेवले होते. पण लंकेकडे अजूनही फॉर्मात असलेले वर्ल्ड कपचे हीरो होते. त्यांना घरच्या पिच वर ३०० बनवणे तेवढे अवघड नव्हते. पण गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आगरकरने जयसूर्या, कालुवितरणा, रणतुंगा व अरविंदा डीसिल्वा या चार सर्वात महत्त्वाच्या विकेट्स प्रत्येक मोक्याच्या वेळी उडवल्या. त्यामुळेच भारत जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच' नक्कीच आगरकरला मिळायला हवे होते. प्रत्यक्षात सचिनला दिले गेले. तो चांगला खेळला होताच, पण शतके तर गांगुली व डीसिल्वाने ही मारली होती. हे स्कोरकार्ड बघितल्यावर अंदाज येइल.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66157.html

याखेरीज आगरकरच्या बर्‍याच बोलिंग व बॅटिंग मधल्या खेळी लक्षात आहेत. तुमच्याही असतील. अझर, सचिन, गांगुली व द्रविड या चार कप्तानांच्या कारकीर्दीत अनेक वेळा तो संघात आला ते प्रत्येक वेळेस काहीतरी पोटेन्शियल दिसल्यानेच. बर्‍याच संघनिवडींनंतर "अब ये कहाँसे आ गया?" हा माझ्या एका मित्राचा पेटंट प्रश्न असे. सध्याच्या बोलर्स चा फिटनेस पाहता अजूनही कदाचित आला असता. खरे म्हणजे यावर्षीही त्यालाच मुंबईचा कप्तान करणार होते असे वाचले. रणजीची पहिली मॅच सचिनही खेळणार आहे, तर आगरकरलाही का आग्रह केला नाही कळत नाही. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केल्याने बॉम्बे डक चे स्वॅन साँग आपल्याला बघायला मिळाले नाही.

एकूण एक बर्‍याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू. अजित - आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<एकूण एक बर्‍याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू.> अगदी.
आगरकरच्या निवृत्तीची बातमी होत नसल्याबद्दल वाईट वाटत असतानाच हा लेख आला.
त्याच्या निवृत्तीच्या बातमीत त्याने ज्युनियर क्रिकेटमध्ये पदार्पणात त्रिशतक ठोकल्याचे वाचले.
एक दिवसीय सामन्यांमधली त्याची कामगिरी नक्कीच महत्त्वाची आहे. त्याचा स्ट्राइक रेट ज्यांना आपण ग्रेट मानतो त्या भारतीय गोलंदाजांपेक्षा सरस आहे. एकदिवसीय सामन्यांमधली जलद अर्धशतके-गोलंदाजी आणि फलंदाजीतही. गोलंदाजीतला रेकॉर्ड अजंता मेंडिसकडे गेला. पण सर्वाधिक जलद भारतीय अर्धशतक अजितचेच आहे.
अ‍ॅन अण्डर-अचीव्हर? रणजीचा हा सीझन खेळून निवृत्ती घ्यायला हवी होती.

एकूण एक बर्‍याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू. अजित - आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा>> हे जाम पटलं... त्याची बॉलिंग स्टाईल (फक्त अ‍ॅक्शनच बरं का) बरीचशी मॅग्रा सारखी वाटायची.. अर्थात हे माझं वैयक्तिक मत Happy

छानच लिहिलंय. आवडलं Happy

त्यानं ६ बळी घेतलेली अ‍ॅडलेड कसोटी टी.व्ही.ला नाक लावून पाहिली होती. (द्रविडसाठी, अर्थातच.)

ब्रिस्बेन कसोटीत तो बॅटिंग-गार्ड घेत असताना कॅमेरा त्याच्या चेहर्‍यावर होता. त्याच्या रोखलेल्या, वटारलेल्या घार्‍या डोळ्यांवर समालोचकांनी त्याच्या डक्सचा उल्लेख करत थट्टेच्या सुरात टिप्पणी केली होती. (बहुतेक टोनी ग्रेगनं.)

आगरकर फास्टेस्ट फिफ्टी विकेट्स घेणारा बोलर आहे ना? >>> हो, वन-डेत बहुतेक...

"He would have been the best bowler if an over had only five balls!" >>> हे भारीये! Lol

<त्याच्या स्विंगचे एक खतरनाक उदाहरण. रिप्ले मधे लक्ष देऊन बघितलेत तर अफाट स्विंग लक्षात येइल. कालिसचा ऑफ स्टंप उडवणे इतके सोपे नाही.
http://www.youtube.com/watch?v=010HkflyuI4
>
भारी! अजून चांगलं करायला हवं होतं. महाराष्ट्राचा असल्यामुळे जरा सॉफ्ट कॉर्नरसुद्धा होता .... Wink
पण 'त्रिफळा' जबर्‍या उडवायचा तो.

रच्याक - फास्ट बॉलरचं फिजीक नव्हतं असं का म्हणलाय?अगदीच नाही असं नाही वाटत...

http://cricket.yahoo.com/news/ajit-agarkar--ducks-and-glory-144955198.html

छान लेख, आवडला, आणि त्यापेक्षा जास्त आवडले ते आगरकर बद्दल लिहिलेले, माझा खूप आवडता प्लेअर, अंगकाठीच्या मानाने खरेच भेदक बॉलर, उत्तम आऊटस्विंग, अचानक चकीत करणारा यॉर्कर अन बाऊन्सर मारायची क्षमता, रिव्हर्स स्विंग सुद्धा जमणे... मात्र वर उलेखल्याप्रमाणे एखादा लूज बॉल, अन तो ही बरेचदा ऑफ स्टंपच्या बाहेर आखूड टप्प्याचा .. इथे तो गंडायचा....

मात्र ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयात त्याच्या ६ विकेटचा मोलाचा वाटा कारण आपल्या धावा तिथे बनायच्या पण समोरच्या संघाला बाद केल्याशिवाय कसोटी जिंकता येत नाही अन नेमके तेच त्याने केले होते.. एकदिवसीय मध्ये फास्टेस्ट ५० विकेट, (बहुतेक २३ सामन्यात) घेणार्‍या बॉलरची तुलनेत उपेक्षाच झाली असे नेहमी वाटत आले, कालच्या सामन्यात इशांत शर्माने जे केले ते पाहता आगरकरला आतबाहेर करण्यापेक्षा कायम संघात ठेवायची गरज होती..

त्याच्या लॉर्डसच्या शतकाचे मला तितकेसे कौतुक नाही, बहुतेक ते हरलेल्या सामन्यात झाले असल्याने तसे वाटत असावे, मात्र त्याची बॅटींग फक्त हाय बॅकलिफ्ट या एका दोषामुळे नेहमी गंडायची, तो त्याने सुधारला असता तर एक अष्टपैलू म्हणून गणला गेला असता आणि संघातली जागाही राखली असती..

त्याची एक आठवणीतील फटकेबाजी श्रीलंकेसमोरची आठवतेय... अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेच्या स्पिनरसनी रॉबिनसिंगला ऑफ स्टंपच्या बाहेर खेळवून रोखून धरले होते तिथे हा आला आणि काही चौकार षटकार मारत गेलेला सामना खेचला.. जर माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर रॉबिन सिंग २६ चेंडूत १२ धावा आणि आगर याउलट आगरकर १२ चेंडूत २६ धावा असे नेमके उलट समीकरण होते.. अन त्या काळात असा स्ट्राईकरेट अन फटकेबाजी रोज रोज बघायला मिळत नसल्याने लक्षात राहायची..

फारेंडा मस्त लिहिलयस एकदम !!!
आगरकर माझाही अतिशय आवडता खेळाडू.. त्या पाच बॉल्स बद्दलच्या कमेंटबद्दल अगदी अगदी.. एखादा बॉल घाण टाकून स्वतःच्या केलेल्यावर पाणी फिरवायचा..
मुंबईचा होता म्हणून जरा जास्त आवडायचा.. Happy

अमोल तू लेख लिहिलास ह्याबद्दल धन्यवाद !

आगरकर मूळचा बॅटस्मन होता, u-19/17 मधे श्रिकांतच्या सल्ल्याने तो फास्ट बॉलिंग टाकू लागला असे श्रिकांतच्या मुलाखतीमधे वाचलेले. त्याला all rounder project करायची सुरूवात श्रिकांतनेच केली होती. हे जरे खरे असेल तर त्याची बॉलिंग खरच कौतुकास्पद होती. मला आठवतय त्याप्रमाणे तो नेहमीच consistent pace maintain करून होता. त्याच्या डक्स्चा नको तेव्हढा गवगवा करून आधी aussies press नि मग त्यांचा आंधळेपणाने पाठपुरावा करणार्‍या भारतीय मिडीयाने आगरकरवर प्रचंड अन्याय केला. अ‍ॅडलेड च्या विजयामधे त्याचा सिंहाचा वाटा होता ह्यापेक्षा अधिक आनंदाची बात ती काय असणार.
त्याची fielding विशेषतः outfield मधली, हा एक जबरदस्त प्रकार होता. थेट South African, Australian खेळाडूंच्या लेव्हलचा पिकप नि अचूक थ्रो असे. अर्थात आपल्या देशात एकूणच क्ष्रेत्ररक्षणाचे कौतुक पाहता हा प्ल्स पॉईंट धरला जाणे अशक्य होते.

फारेंडा मस्त लिहिले आहेस रे. आगरकर गुणी खेळाडू होता पण त्याचे कौतूक न होणे हे त्याचे स्वतःचेच कर्तुत्व होते. अजून एक म्हणजे आगरकर एकदिवसीय सामन्यातील बळींच्या संख्येनुसार संयुक्त १३व्या स्थानावर आहे आणि भारताच्या गोलंदाजीच्या क्रमात तिसर्‍या स्थानावर.
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/283193.html
अगदी जहीर, हरभजन आणि कपिल देवने सुद्धा आगरकरपेक्षा जास्त सामने खेळून त्याच्यापेक्षा कमी बळी घेतले आहेत. ही यादी बघितली लगेच लक्षात येईल की त्याच्या समवयस्क गोलंदाजांनी सरासरी ४ ते ४.५ धावा दर षटकामागे दिल्या तर आगरकरने ५.०७

आणखी एक विस्मरणात गेलेला त्याचा अफलातून स्पेल कोणत्यातरी फायनल मधला लन्केविरुधचा स्पेल.
काही डीटेल्स आठवत नाहीयेत. याची देही याची डोळा पाहिलेला तो स्पेल पाहून कृतकृत्य झालो होतो. वाटले, भारतामध्ये चुकून एक मक्ग्रा आणि वासिम अक्रम च्या मिश्रणातले काहीतरी जन्माला आलय. बहुतेक अबु धाबी मधे एक ट्राय सिरीज होती. मोहम्मद कैफ ची बहुधा डेब्यू सिरीज होती. (ही तीच मेच ज्यामध्ये, श्रीनाथ च्या round the wicket बोलिंग वर रोबिन सिंग ने शोर्ट लेगला रणतुंगाचा अफलातून एक हाती catch घेतला होता.) पाटा पीच वर लंकेने भारताला ५० ओवर मध्ये १९६ वर रोखून धरले होते.
भारतीय टीम फिल्डिंगला उतरली आणि आगरकरने कमाल धमाल केली.
लाईन आणि लेन्थ चा अत्युच्च आविष्कार घडवत लंकेची वरची फळी कापून काढली. सामन्याच्या शेवटी त्याच्या बोलिंग चे पृथक्करण होते. ८-?-२०-३. त्याने किती मेडन टाकल्या ते आठवत नाहीये. youtube वर शोधण्याचा खूप खूप प्रयत्न केला, पण सापडले नाही.
इथे ३ च्या ऐवजी ४ नक्की झाले असते, जर एक अम्पायारिंग डिसिजन अजित च्या विरुद्ध गेला नसता तर. अरविंद डिसिल्वा चा रेकॉर्ड होता, one-day मध्ये कधीही शून्यावर आऊट न होण्याचा. डिसिल्वा पीच वर नवीन असताना, आगरकर त्याला सतत आउट स्वीन्गिंग गुड लेन्थ टू शोर्ट ऑफ गुड लेन्थ बॉल्स टाकत होता. आणि एका क्षणी आगरकर ने त्या सामन्यातला त्याचा उत्कृष्ठ लयबद्ध बॉल टाकला, आउट स्वीन्गिंग शोर्ट बोल क्लोस टू बॉडी. झाले, डिसिल्वा च्या bat ची कड घेऊन अलगदपणे मोंगियाच्या (किंवा साबा करीम) च्या हातात जाऊन विसावला. जोरदार अपील झाले. सर्वांना डिसिल्वा आउट असल्याची खात्री होती, अम्पायर सोडून. बहुतेक ब्रेक मध्ये बिर्याणी खाऊन अम्पायरला पेंग आली असावी, किंवा त्याचे हात फार जड झाले असावेत. काही केल्या बोट वर जायला तयारच होत नव्हते. आणि स्वतःहून पीच सोडून जायला डिसिल्वा काही तेंडूलकर किंवा गिलख्रिस्तच्या वंशातला नव्हता. अम्पायर च्या कृपेने डिसिल्वा चा रेकॉर्ड वाचला आणि आगरकरची तोपर्यंतची बेस्ट बोलिंग फिगर होता होता राहिली.
भारत तो सामना जिंकला आणि आगरकरला सामनावीराच पुरस्कार मिळाला.
तेंव्हा वाटले होते कि ९९ चा इंग्लंड मधला world-cup वर आता फक्त इंडियाच च नाव कोरले जाणार.
पण शितावरून भाताची केलेली परीक्षा नेहमीच बरोबर ठरते असे नाही ना!
पण आगरकर चे माझ्या सारखेच आणखीही बरेच मराठी fans आहेत, हे बघून खरच खूप बरे वाटले.
काहीही झाले तरी एक रेकॉर्ड आगरकरच्या नावावरून कधीच कोणीही हिसकावू शकणार नाही, The Greatest Under Achiever.

त्याची fielding विशेषतः outfield मधली, हा एक जबरदस्त प्रकार होता. थेट South African, Australian खेळाडूंच्या लेव्हलचा पिकप नि अचूक थ्रो असे. अर्थात आपल्या देशात एकूणच क्ष्रेत्ररक्षणाचे कौतुक पाहता हा प्ल्स पॉईंट धरला जाणे अशक्य होते.

>>>>>>>>>>>>>

हेच मला एके ठिकाणी चर्चेच्या ओघात आठवलेले इथे सांगायला आलो होतो... त्याचा थ्रोईंग आर्म जबर्दस्तच होता... थर्डमॅन, फाईनलेगवरून अचूक आणि भेदक थ्रो..

चंद्रगुप्त, ही मॅच का ती? मलाही आठवते. श्रीनाथ व आगरकर दोघांनी जबरी बोलिंग केली होती तेव्हा.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65883.html

टण्या, स्टॅट्स बद्दल धन्यवाद. तो अँगल बघितला नव्हता मी.

हो आगरकरने पहिल्या २३ मॅचेस मधे ५० विकेट्स काढून रेकॉर्ड केले होते तेव्हा. आणि विशेष म्हणजे त्यातील बहुतेक (किंवा सर्वच) भारतीय उपखंडातील पिचेस वर होत्या.

मस्त लिहिलं आहेस फारेंडा!!!

अजितवर सचिनचा प्रचंड विश्वास होता. त्याच्यासाठी तो लकी होता म्हणे, कारण वर अभिषेकने त्याच्या पोस्टमधे लिहिलंय तेच. त्या अटीतटीच्या मॅचमधे त्याने शेवटच्या काही ओव्हरमधे अनपेक्षितपणे फटकेबाजी करून मॅच खेचून आणली होती. त्यावेळी सचिन कॅप्टन होता.

तो मुंबईचा होता म्हणून तर आवडतोच. पण तो आमच्या कॉलेजला होता, आमच्या ग्रूपच्या काही गोड आणि सुखद आठवणी त्याच्यासोबत जोडल्या गेल्या आहेत Wink

^^^^^^^^^^
खरेय मंजुडी, सचिनला कौतुकही होते त्याचे.. त्याच्या (आगरकरच्या) सुरुवातीच्या काळात एका मुलाखतीत सचिनने मुंबई रणजी संघाच्या नेटमध्ये त्याची बॉलिंग खेळायचा अनुभव फार कौतुकाने सांगितला होता.. म्हणजे बारीक देहयष्टी असूनही वेगवान गोलंदाजीची क्षमता, त्याचा चेंडू तोफेच्या गोळ्यासारखा येतो वगैरे अन हा गोलंदाज लंबी रेस का घोडा आहे वगैरे वगैरे....... आणि आम्ही सचिनभक्त, सचिन कोण्या गोलंदाजाचे कौतुक केवळ मुंबईचा आणि मराठी आहे म्हणून नाही करणार यावर ठाम विश्वास, म्हणून तेव्हाच आवडू लागला होता..

मस्त रे फारेण्ड.

आगरकर म्हणजे त्या क्रिकेट वाल्याचा कोणी आहेस का रे ? असं खूप वेळा विचारलं गेलंय मला.
कारणे काहीही असोत, पण त्याचं व्हायला पाहिजे तेवढं कौतुक झालं नाही ते खरंच.

आगरकर ला आगरकरांतर्फे पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

Happy

मला आगरकरचं सगळ्यात जास्त काय लक्षात आहे तर त्याची अ‍ॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज जी आपल्या फार कमी बोलर्स कडे होती तेव्हा (जर माझ्या नीट लक्षात/माहित असेल तर ..) आणि त्यातून तो मुंबईचा, मराठी म्हणून आणखीनच अभिमान .. Happy

हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
अजित माझा खुप आवडता क्रिकेटर. मी तर वेडी होते त्याच्यासाठी. तो खेळणार असे तेव्हा उपवास वैगरे, वाईट खेळला कि दु:ख होणे, मित्रांमध्ये त्याची बाजू घेऊन भांडणे, हे सर्रास चालयचं. आजही माझे काही मित्र मला "काय आगरकर" अशीच हाक मारतात. त्याच्यावरच्या बातम्या-लेख, त्याचे रेकॉर्‍ड्स, फोटो आजही जपून ठेवले आहेत.
हा लेखसुद्धा माझ्या निवडक दहात.

मस्त आढावा घेतला आहे. ज्याला नावे ठेववत नाही आणि वाखाणताही येत नाही असा हा खेळाडू 'आहे मनोहर तरी' पद्धतीचा खेळ करायचा. हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

The Greatest Under Achiever. >> +१

तो बरेचदा आवडायचा आणि बरेचदा नाही. त्याला संधी ही खूपदा मिळाली. अजून खूप काही करू शकला असता.

मस्त लेख फारेंडा..

९८ साली तो आला तेव्हा असलेल्या आपल्या बोलर्सच्या मानाने तर खूपच चांगला >> तो तेव्हा आपला सगळ्यात फास्ट बोलर होता. त्याच्यानंतर यॉर्कर्स टाकणं अजून तर कोणाला जमलेलं नाही फारसं.

Pages