बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

Submitted by फारएण्ड on 19 October, 2013 - 22:26

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले. त्यामुळे मग जेव्हा त्याने त्यानंतर पहिल्यांदा तेथे रन काढला तेव्हा मोठीच कामगिरी होती ती!

पण त्याला 'डक' समजण्यातला धोका कांगारूंना पुढच्याच अ‍ॅडलेड कसोटीत दिसला. पहिल्या डावांत साधारण बरोबरी झालेली असताना दुसर्‍या डावात त्यांचे सहा लोक उडवून आगरकरने मॅच ओपन केली. मग द्रविड ने दुसर्‍या डावातही शेवटपर्यंत राहून ती जिंकून दिली. पण चौथ्या दिवशी आगरकरने त्या विकेट्स काढल्या नसत्या तर भारताला संधीच मिळाली नसती.

अमेरिकेतील वर्ल्ड सिरीज किंवा इंग्लंड मधली काउंटीची चॅम्पियनशिप आधीच्या सीझन मधे जिंकून देणारा कप्तान जेव्हा निवृत्त होतो तेव्हा मीडियामधले रकाने च्या रकाने त्याला वाहिले जातात. अमेरिकेत पुढे त्यांच्यावर चित्रपट निघतात. आपल्या रणजी ला तेवढी किंमत दिली जात नाही. पूर्वी तेथे धावांचा पाऊस पाडणारे लोक आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकत नसत तेव्हा ठीक होते. पण आता तसे नाही. नाहीतर मागच्या वर्षी अंतिम सामन्यात महत्त्वाच्या वेळेस जबरी बोलिंग करून मुंबईला करंडक जिंकून देणारा खेळाडू इतका दुर्लक्षित राहिला नसता.

मागच्या सीझन च्या आधी आगरकरचे मुंबई व्यवस्थापनाबरोबर काहीतरी वाजले, व तो अचानक संघ सोडून निघून गेला. मग त्याला पटवल्यावर आला, कप्तान झाला व रणजी करंडकच जिंकून दिला. ही खास पाकिस्तानी स्टाईल - आज सर्वसाधारण खेळाडू, उद्या संघाबाहेर्/निवृत्त/बंदी, तर परवा विजयी कप्तान!

आगरकर बद्दल एकदम चपखल कॉमेण्ट एक क्रिकइन्फो वर परवा वाचायला मिळाली - "He would have been the best bowler if an over had only five balls!" Happy ओव्हर मधे चार-पाच जबरी भेदक बॉल टाकायचे व त्यातून वाचल्याबद्दल बॅट्समनला बक्षिस दिल्यासारखा एक बॉल द्यायचा ही आगरकरची खासियत. त्यामुळेच तो कधी प्रचंड आवडायचा तर कधी त्याचा प्रचंड राग यायचा.

कौशल्याबद्दल बोलायचे तर फास्ट बोलर चे 'फिजिक' अजिबात नसूनही बर्‍यापैकी चांगला वेग (आणि ९८ साली तो आला तेव्हा असलेल्या आपल्या बोलर्सच्या मानाने तर खूपच चांगला), खतरनाक स्विंग, चांगला यॉर्कर या जमेच्या बाजू. ओव्हर मधे एक 'हिट मी' बॉल देणे हा मेन प्रॉब्लेम. मात्र इतर सर्व बोलर्सच्या तुलनेत अत्यंत चांगली फिल्डिंग, आणि 'ऑल राउंडर' मधे गणना होण्याएवढी नाही, पण अचानक चमक दाखवणारी बॅटिंग. लॉर्ड्स च्या ड्रेसिंग रूम मधे तेथे कसोटी शतके मारणार्‍यांची नावे लिहीलेली आहेत तेथे असलेले त्याचे नाव तेथील टूर गाईड आवर्जून दाखवतो.

त्याच्या स्विंगचे एक खतरनाक उदाहरण. रिप्ले मधे लक्ष देऊन बघितलेत तर अफाट स्विंग लक्षात येइल. कालिसचा ऑफ स्टंप उडवणे इतके सोपे नाही.
http://www.youtube.com/watch?v=010HkflyuI4

स्टीव वॉ ने त्याच्या आत्मचरित्रात लिहीले आहे की त्याच्या करीयर च्या सुरूवातीला रिचर्ड्स ला बोलिंग करताना मुद्दाम खुन्नस उकरायला त्याने त्याला बाउन्सर टाकला होता. ही त्याचीच मात्रा वॉ विरूद्ध, त्याच्याच सेलेब्रेटरी शेवटच्या सिरीज मधे
http://www.youtube.com/watch?v=l4v1e_WgYh4

जयसूर्या ९६-९७ मधे पाटा विकेट्स वर व्यंकटेश प्रसाद ई ना ठोक ठोक ठोकायचा (अर्थात प्रसादही आपण हेडिंग्ले च्या स्विंग वाल्या किंवा पर्थच्या बाउन्स वाल्या पिचवर बोलिंग करत आहोत अशा भ्रमात मुंबई व कोलंबोत त्या लाईन-लेन्थ वर जयसूर्याला बोलिंग करायचा). मात्र माझ्या आठवणीत आगरकरने त्याला कधीच जास्त खेळू दिला नाही.
http://www.youtube.com/watch?v=U6GJjE1a6Tw

भारताकडे 'बोल्ड' घेणारे बोलर्स फारसे नव्हते तेव्हा. त्यामुळे याचा यॉर्कर व त्याने उडवलेले बोल्ड व एलबीडब्ल्यूज उठून दिसत. मग नंतर झहीर, इरफान, आरपी सिंग ई. आले.

आगरकरला मॅन ऑफ द मॅच न दिल्याचे मला सर्वात वाईट वाटले होते ते १९९८ च्या श्री लंकेतील 'इंडिपेण्डन्स कप फायनल' ला. याची थोडी पार्श्वभूमी म्हणजे १९९६ मधे वर्ल्ड कप जिंकल्यावर पुढे दोन वर्षे वन डेज मधे लंका सर्वांनाच भारी पडत होते. जुलै १९९८ मधे तेथे ही एक 'इंडिपेण्डन्स कप' स्पर्धा झाली. त्याच्या फायनलला सचिन व दादा दोघांनीही शतके ठोकून भारताला ३०० च्या पुढे नेऊन ठेवले होते. पण लंकेकडे अजूनही फॉर्मात असलेले वर्ल्ड कपचे हीरो होते. त्यांना घरच्या पिच वर ३०० बनवणे तेवढे अवघड नव्हते. पण गोलंदाजीला इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आगरकरने जयसूर्या, कालुवितरणा, रणतुंगा व अरविंदा डीसिल्वा या चार सर्वात महत्त्वाच्या विकेट्स प्रत्येक मोक्याच्या वेळी उडवल्या. त्यामुळेच भारत जिंकला. 'मॅन ऑफ द मॅच' नक्कीच आगरकरला मिळायला हवे होते. प्रत्यक्षात सचिनला दिले गेले. तो चांगला खेळला होताच, पण शतके तर गांगुली व डीसिल्वाने ही मारली होती. हे स्कोरकार्ड बघितल्यावर अंदाज येइल.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66157.html

याखेरीज आगरकरच्या बर्‍याच बोलिंग व बॅटिंग मधल्या खेळी लक्षात आहेत. तुमच्याही असतील. अझर, सचिन, गांगुली व द्रविड या चार कप्तानांच्या कारकीर्दीत अनेक वेळा तो संघात आला ते प्रत्येक वेळेस काहीतरी पोटेन्शियल दिसल्यानेच. बर्‍याच संघनिवडींनंतर "अब ये कहाँसे आ गया?" हा माझ्या एका मित्राचा पेटंट प्रश्न असे. सध्याच्या बोलर्स चा फिटनेस पाहता अजूनही कदाचित आला असता. खरे म्हणजे यावर्षीही त्यालाच मुंबईचा कप्तान करणार होते असे वाचले. रणजीची पहिली मॅच सचिनही खेळणार आहे, तर आगरकरलाही का आग्रह केला नाही कळत नाही. त्याने आधीच निवृत्ती जाहीर केल्याने बॉम्बे डक चे स्वॅन साँग आपल्याला बघायला मिळाले नाही.

एकूण एक बर्‍याच वेळा डोक्याला ताप देणारा पण तितक्याच वेळा थक्क करणारा खेळाडू. अजित - आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख.. छान लिहिल आहेस.

अंडर १९च्या टिमची ओपनिंग आगरकर करायचा.. त्याची भारतीय टिम मधे निवडही त्याच धर्तीवर झाली होती अस श्रीकांतने सांगितल्याच आठवतयं.

मला पण आजच दिसला हा लेख.. मस्त आढावा...

तो आला तेव्हाच्या काळातला एक उत्तम बॉलर.. आणी बरा बॅट्समन.. तो यायच्या आधी पर्यंत आपली फलंदाजी विकेटकीपर पर्यंतच मर्यादित होती.. पण तो आल्यावर काहीवेळ असे वाटायचे की हा अजून यायचा आहे.. कदाचित मॅच जिंकू शकू..

Pages