ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (८)

Submitted by तुमचा अभिषेक on 8 October, 2013 - 12:36

२ ऑक्टोबर २०१३
.
.

तापलेल्या तव्यावर चरचरणार्‍या मच्छीचा वास.. स्वयंपाकघरातून दिवाणखान्याला चकमा देत, चुरचुरत थेट, बेडरूममध्ये माझ्या नाकाला झिणझिण्या द्यायला आत शिरला.. अन दिवसभराच्या कामाचा अर्धा थकवा तिथेच पळाला. श्रावणापाठोपाठ गणपती अन त्यामुळे थंडावलेला मत्स्याहार.. जर आजचा हा वार चुकला तर पुढचे काही दिवस नवरात्री निमित्त पुन्हा जिभेला लगाम घालावा लागणार हा विचार खायची इच्छा आणखी प्रबळ करून गेला.. अर्थात बाहेर हॉटेलात खायला तेवढी परवानगी होती, पण तिथे घरची, आईच्या हातची चव कुठे येणार.. ते नेहमीच ताकाची तहान दूधावर वाटते मला.... म्हण मुद्दामच उलटी म्हटली कारण दूधापेक्षा ताकच जास्त आवडते मला..

रात्रीचे दोन घास कमीच खायचे असतात, हे मानून आणि पाळूनही आज चार घास जास्तच गेले. तळलेली मच्छीची तुकडी आणि सारभात असले की हे माझे नेहमीचेच आहे, पण आजवर ना कधी मळमळले ना कधी अजीर्ण झाले. आज तेवढे जेवण जरा अंगावर आले.. घरच्या घरी केलेली शतपावली यावर उतारा म्हणून पुरेशी असते, पण आज चार पावले जरा जास्तच चालावीशी वाटली.. आधी आमच्या जुन्या घरी चाळीचा कॉमन पॅसेज मुबलक उपलब्ध व्हायचा, पण आता थेट रस्त्यावर उतरावे लागले. अर्थात तू तिथं मी या उक्तीला अनुसरून जोडीनेच उतरलो.. खरे तर लग्न झाल्यावर नवे जोडपं म्हणून रोजच रात्री जेवल्यावर बाहेर फेरफटका मारायचा शिरस्ता होता आमचा.. नाक्यापलीकडच्या चौकापर्यंत चालत जायचे अन तिथेच एखादा बसस्टॉप गाठून त्यावर बैठक जमवायची.. मग दिवसभरातील गप्पा, उद्याचे प्लॅन, उगाळलेला भूतकाळ अन रंगवलेली भविष्यातील स्वप्ने... संसारात गुरफटलो तसे रोजच्या रूटीनमध्ये हे सारे मागे पडले.. पण त्याची खंत अशी कधी वाटली नाही, ना आवर्जून पुन्हा तसे करावेसे वाटले.. आज मात्र पुन्हा तसाच फेरफटका मारायच्या विचाराने तिचेही मन उल्हासित झाले एवढे मात्र खरे.. विचारणा करताच तिचे लगबगीने तयार होणे यातच ते सारे आले.. रात्रीची वेळ असूनही तिचे नेहमीचेच, मी काय घालू अन मला काय चांगले दिसेल, हे प्रश्न विचारणे चालूच होते.. सवयीनेच मी विचार न करता एखादा निर्णय देऊन टाकला.. अन तिनेही अखेर नेहमीप्रमाणेच जे तिच्या मनात होते तेच परिधान केले..

बिल्डींग खाली उतरलो अन समोर रस्त्यावर नजर टाकली, तर माझगावच्या महालक्ष्मीचे वाजतगाजत आगमन होत होते. अपशकुन मी मानत नाही मात्र शुभशकुनांवर विश्वास ठेवतो. देवीला आडवे जाण्यापेक्षा सामोरी जाऊन तिचे दर्शन घेतले. मिरवणूकीची गर्दी असल्याने बायको लांबवरच थांबली, मात्र मी थेट देवीच्या चरणापर्यंत पोहोचलो.. नुकतेच गणपती येऊन गेलेले, तेव्हा त्या गणरायाच्या मुर्त्या पाहताना जगात यापेक्षा सुंदर अन देखणे शिल्प असूच शकत नाही असा जो विश्वास वाटायचा त्यावर मात्र या देवीच्या चेहर्‍यावरील सात्विक भावांनी मात केली. कदाचित देवी हि एक स्त्री असल्याने तिच्यात मातेचे रूप दिसत असावे अन हि सात्विकता त्यातूनच आली असावी.. काही का लॉजिक असेना, जय माता दी म्हणत नकळत मजसारख्या नास्तिकाचेही हात जोडले गेले. दुरून पाहणार्‍या एखाद्याला यात भक्तीभावच दिसला असता पण माझ्यासाठी मात्र हा संस्कारांचा भाग होता.. गर्दीतून वाट काढत अन उधळल्या जाणार्‍या गुलालाला चुकवत, मी मागे फिरलो तर खरे, पण थोडे चालून गेल्यावर लक्षात आले की देवीचा फोटो काढायची छानशी संधी हुकवली.. मागे सोडून आलेल्या गर्दीमध्ये आता पुन्हा मिसळायची इच्छा होत नव्हती, मात्र हे वेळीच का सुचले नाही याची चुटपुट मात्र लागून राहिली.. अन याच चुटपुटीत मागे वळून वळून पाहत पुढे पुढे चालत राहिलो ते अगदी वळण येईपर्यंत..

मिरवणूकीच्या आवाजाला सोडून दूर निघून आलो तसे वातावरणात एक शांतता जाणवू लागली.. पण त्याच बरोबर एक गारवादेखील.. अचानक एखादी दुचाकी वेगाने सुसाट निघून जायची तर एखादी चारचाकी स्पर्शून जातेय की काय असे वाटायचे.. काळजीपोटी मग तेवढ्यापुरते फूटपाथवरून चालणे व्हायचे पण मोकळ्या ठाक पडलेल्या रस्त्यावरून चालायचा मोह किती काळ आवरणार.. तिचा हात हातात घेऊन आणि तिला उजव्या हाताला सुरक्षित ठेऊन त्या नीरव शांततेचा आस्वाद घेत जमेल तितके रस्त्याच्या कडेकडेने चालू लागलो..

आमच्या नेहमीच्या.., म्हणजे एकेकाळच्या नेहमीच्या बसस्टॉपवर काही मुलांचा ग्रूप बसलेला दिसला.. तसे त्याला टाळून पुढच्या बसस्टॉपच्या शोधात निघालो.. गेल्या काही वर्षांत बसने प्रवास करण्याचा योग आला नसल्याने आपल्याच विभागात कुठेकुठे बसस्टॉप आहेत याचीही आपल्याला माहीती नसल्याची जाणीव झाली.. अन मग ते शोधायच्या नादात काही अश्या गल्ल्या फिरू लागलो ज्यांना मी स्वता कित्येक वर्षे मागे सोडून आलो होतो.. त्या गल्यातच मग मला एकेक करत काहीबाही गवसू लागले.. काही जुन्या चाळी जाऊन टॉवर उभे राहिलेले तर काही चाळी आणखी विदीर्ण अवस्थेत पोहोचल्या होत्या.. ओळखीच्या वडापाव-पावभाजीच्या गाड्या उठल्या होत्या तर एका चिंचोळ्या गल्लीतही नवे चायनीज रेस्टॉरंट उघडलेय याचा शोध लागला.. मध्येच एखाद्या वाडीकडे बोट दाखवून मी हिला सांगू लागलो की इथला गोविंदापथक एकेकाळी खूप फेमस होता, ज्याबरोबर हंड्या फोडायला एके वर्षी मी देखील गेलो होतो.. तर पुढे एक मैदान लागले जिथे क्रिकेट खेळण्यात माझे अर्धे बालपण गेलेले.. बघता बघता जुन्या आठवणी गप्पांचे विषय बनू लागले, जे बोलताना ना मला थकायला होत होते, ना ऐकताना तिला पकायला होत होते.. मात्र या नादात ज्या गोष्टीच्या शोधात आम्ही फिरत होतो त्या बसस्टॉपलाच विसरून गेलो.. पाय थकले तेव्हा जाणवले आता कुठेतरी बूड टेकायलाच हवे कारण घरापासून खूप लांबवर निघून आलो होतो..

एकट्याने नॉस्टेल्जिक होण्यापेक्षा कधीतरी कोणाच्या साथीने नॉस्टेल्जिक होण्यात एक वेगळीच मजा असते.. अर्थात ती साथही तशीच खास असावी लागते जिला आपल्या गत आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असेल.. अन या जागी आयुष्याच्या जोडीदाराची जागा दुसरा कोण घेऊ शकेल.. बालपणीचे किस्से एकमेकांना सांगत स्वताला दुसर्‍यासमोर आणखी आणखी उलगडवत नेणे या आमच्या आवडीच्या गप्पा.. ज्या आज रात्रीच्या शांततेत बसस्टॉपच्या खांबावर अगदी चंद्रतार्‍यांच्या साक्षीने खुलून आल्या होत्या.. काही वेळापूर्वी रस्त्याकडेने चालताना भेसूर अन भयाण वाटणार्‍या मगासच्या त्या झाडांच्या सावल्या.. आता मात्र मोजकाच तो चंद्रप्रकाश आमच्यावर सोडून मंदधुंद वातावरणनिर्मिती करत होत्या.. मध्येच एखाद्या कुत्र्याने घेतलेला आलाप आता बेसूर वाटत नव्हता.. त्यापैकीच एक श्वान बसस्टॉपच्या त्या टोकाला जणू आमची प्रायव्हसी जपण्याची काळजी घेतच लवंडला होता.. पण आमच्या गप्पा काही संपणार्‍यातल्या नव्हत्या ना डोळे पेंगुळणार होते.. मात्र वेळाकाळाचे भान आले तसे पुढचा किस्सा घरी सांगतो असे तिला म्हणतच आम्ही उठलो..

परतीच्या वाटेवर घरापासून चार पावले शिल्लक असताना, आमची हि नाईट सफारी संपत आली असे वाटत असतानाच, समोर पाहिले तर काय.... मगासची देवीची मिरवणूक या एवढ्या वेळात जेमतेम शंभर पावले पुढे सरकली होती.. आमच्या ‘डी’ विंगचा निरोप घेऊन निघालेली ती आता ‘ए’ विंग वाल्यांना दर्शन देत होती.. चमत्कारांवर माझा विश्वास नाही मात्र नशीबावर आहे.. नुसतेच दर्शन नाही तर दर्शनाची स्मृती फोटोरुपात जपण्याची संधी मला देणे हे तिच्याच मनात असावे.. अन इथे बायकोनेही माझ्या मनातले भाव ओळखून मला फोटो काढायला पिटाळले.. आता मात्र झोपताना कसलीही चुटपुट मनाशी राहणार नव्हती.. सुख सुख जे म्हणतात त्याची व्याख्या आजच्या रात्री तरी माझ्यासाठी हिच होती..

- तुमचा अभिषेक

---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://www.maayboli.com/node/43411
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://www.maayboli.com/node/43482
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://www.maayboli.com/node/43589
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४) - http://www.maayboli.com/node/43694
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५) - http://www.maayboli.com/node/44009
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (६) - http://www.maayboli.com/node/44880
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७) - http://www.maayboli.com/node/44976
---------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लिहितोस अभिषेक, नात्यांचं आणि त्यातल्या सुख दु:खाचं वर्णन करणारे व. पु. काळे, माझे सगळ्यात आवडते लेखक पण तुझंही लेखन वाचायला आवडतं, पुन्हा पुन्हा सुद्धा तेच वाचु शकते.
असेचं दोघही आनंदात रहा आणि तो आनंद आमच्याशी शेयर करत रहा.

हा भाग मला खुप आवडला.. या मालिकेतल्या टॉप तीन मध्ये Happy
सकाळी मोबाईल वरुन फेसबूक पहात असताना हा भाग दिसला पण माझ्या मोबाईल मध्ये मराठी फॉण्ट नीट दिसत नाही तेंव्हा वाचता आला नाही.. तेंव्हाच सांगणार होते की माबोवर टाक लवकर पण बस मधुन उतरायच्या गडबडीत राहुन गेलं.

आत्ता हापिसातली कामं संपवुन इकडे डोकावले तर समोर हे Happy
बरं झालं Happy

एकट्याने नॉस्टेल्जिक होण्यापेक्षा कधीतरी कोणाच्या साथीने नॉस्टेल्जिक होण्यात एक वेगळीच मजा असते.. अगदी अगदी Happy

नेहमीप्रमाणेच सहज, साधं, निरागस तरीही आत कुठेतरी रिलेट होणारं Happy

प्रतिसादांना धन्यवाद तर आहेतच.. तसेच या मालिकेतील लेखांत ज्या अधूममधून नेहमीच येतात त्या शुभेच्छा.. त्याबद्दल देखील धन्यवाद Happy

सुंदर Happy

अभिषेक ...गड्या जगणं तुझ्या कडून शिकावं बघ....किती सोप्प...सरळ आणि साधं....सोप्प नाहिये हे....!! अभिनंदन!!!

अभिषेक ...गड्या जगणं तुझ्या कडून शिकावं बघ....किती सोप्प...सरळ आणि साधं....सोप्प नाहिये हे....!! अभिनंदन!!! >>>>>>>>>>+१

खुप खुप छान. तुमचे लिखाण मी नेहमी आवर्जुन वाचते. खुप साधे, सुंदर आणि सकारात्मक असते. नेहमी असेच आनंदी रहा.

अभिषेक ...गड्या जगणं तुझ्या कडून शिकावं बघ....किती सोप्प...सरळ आणि साधं....सोप्प नाहिये हे....!! अभिनंदन!!! >>>>>>>>>>+१

नेहमी प्रमाणे अतिशय साधे, सोपे तरीही भिडणारे लिखाण. खूप आवडले. मस्तच
किती साध्या साध्या गोष्टीतून आयुष्याचा आनंद घेता येतो हे तुमच्या कडून शिकावे.