अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १

Submitted by स्वाती२ on 14 June, 2013 - 14:34

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

१ जूनला माझ्या मुलाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले. चार, नाही, खरे तर पाच वर्षांचा प्रवास. इथे हायस्कूल करणारी पहिली पिढी. त्यामुळे आमच्यासाठीही हा प्रवास नवीनच होता. काही निर्णय योग्य ठरले, काही चूका झाल्या तर काही वेळा he was just lucky. या प्रवासात पालक म्हणून आम्ही जे शिकलो ते इतर मायबोलीकरांना कदाचित उपयोगी पडेल म्हणून हा लेख.

अमेरीकेतील शिक्षण पद्धतीत हायस्कूलची चार वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात केलेली तयारी, घेतलेले कोर्सेस, ग्रेड्स, स्कोअर्स, समाजसेवा यावर पुढील शिक्षणाचे दरवाजे उघडणार असतात. तसेच या महागड्या शिक्षणाच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी लागणार्‍या स्कॉलरशिप्स आणि ग्रॅंट्स देखील विद्यार्थ्यांनी या चार वर्षांत शाळेत आणि शळेबाहेर जी काही कामगिरी केली त्यावर अवलंबून असतात. म्हणताना जरी हायस्कूलची चार वर्षे धरली तरी आजकाल बहूतेक शाळांतून मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे काही कोर्सवर्क करता येते त्यामुळे खरे तर मिडलस्कूलपासूनच हा प्रवास सुरु होतो.

मिडलस्कूल : ६वी ते ८वी
५वी पर्यंत वेगवेगळ्या प्राथमिक शाळांत शिकणारी मुले गावातल्या मिडलस्कूलमधे येतात. ६वीचे वर्ष नव्या बदलाशी जमवून घ्यायचे. प्रत्येक विषयासाठी नवीन शिक्षक, लॉकर्स, वर्गातील काही मुले माहितीची तर काही दुसर्‍या, खरेतर प्रतिस्पर्धी शाळेतली. त्यातच ५वी त 'दादा' असलेली मुलं इथे परत लोअर क्लास झालेली असतात. स्कुलबसने जातायेता हे बदललेलं स्टेटस सुरुवातीला चांगलच जाणवतं. पण बहूतेक मुलं महिन्याभरात रुळतात. मुलांना रुळायला कठीण जात असेल तर वेळीच काउंसेलरला भेटावे. तसेच मुलांना काही हेल्थ कंडीशन असेल त्याची हेल्थ फाईल प्रत्येक शिक्षकाच्या नजरेखालून गेली आहे ना याची खात्री करावी. इतरही काही सवलत किंवा सुविधा आवश्यक असेल तर त्याबाबत काउंसेलर आणि शिक्षकांशी बोलावे. शाळा सुरु होताना ओपनहाऊस असते. तेव्हा मुलाच्या होमरुम टिचरना भेटून आपल्या पाल्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. काही कंसर्न असतील तर सांगाव्यात. होमरुम टिचर आपापल्या मुलांची खूप छान काळजी घेतात. या वयात मुलं आपल्या 'वेगळे' असण्याबद्दल खूप संवेदनाशील होतात. अशावेळी आधी बोलणे झाले असेल तर शिक्षक खूप छान पद्धतीने मुलांना सामावून घेतात. इतर मुलांना परीस्थिती समजावून सांगतात.

इथे शाळेत अभ्यासाबरोबरच खेळ आणि इतर कलागुणांनाही महत्व असते. मिडलस्कूलपातळीवरील अभ्यासाच्या ग्रेड्स आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटीज जरी कॉलेज अॅडमिशनसाठी विचारात घेतल्या जाणार नसल्या तरी हायस्कूल मधील यशाचा पाया मिडलस्कूलमधे घातला जातो.

मुलांना पुढे हायस्कूलसाठी खेळायचे असेल तर ही वर्षे महत्वाची. प्राथमिक शाळेत बहुतेक ठिकाणी सगळ्या मुलांना टीमवर घेतात. मिडलस्कूलमधे हे बदलते. कोच मंडळींचे नव्या मुलांवर बारीक लक्ष असते. टीम मध्ये सिलेक्शन झाले नाही निराश न होता सराव चालू ठेवावा. मुलांचा सुधारलेला खेळ, वर्तन बघून बरेचदा पुढील सिझनला कोच ऑफर देतात. सिलेक्शन झाल्यास या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा. भरपूर मेहनत करावी. बॉइज क्लब, गर्ल्स इंक चे प्रोगॅम्स असतात. तिथेही खूप शिकायला मिळते. हायस्कूलला वर्सिटी स्पोर्ट्स खेळायचे असतील तर मिडलस्कूलमधे मेहनत आवश्यक.

६वी पासून अभ्यास वाढायला सुरुवात होते. बरेचदा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट्स किंवा प्रोजेक्ट्स असेही होते. रोजच्या रोज अभ्यास आणि प्लॅनर वापरायची सवय लावली तर आयत्या वेळचे मेल्टडाऊन टळतात. मिडलस्कूलमधे टाईम मॅनेजमेंट आणि नियमित अभ्यासाची सवय लागली की हायस्कूल सोपे होते. इथे शाळेतील शिक्षक खूप मदत करतात. मुलांची शाळेत लवकर येण्याची किंवा शाळा सुटल्यावर थांबायची तयारी असेल तर कठीण भाग पुन्हा समजावून सांगतात. त्या त्या आठवड्यात शिकवलेल्या भागापैकी जे काही नीट समजले नसेल त्यासाठी शिक्षकांकडे वेळीच मदत मागावी.
रोजचा ग्रुहपाठ आणि विकेंडला थोडा अभ्यास किंवा प्रोजेक्ट्सची तयारी एवढे या लेवलला पुरेसे असते. या पातळीवर हा अभ्यास मुले आपला आपण करु शकतात. अभ्यासाव्यतिरिक्त रोज कमीतकमी अर्धा तास अवांतर वाचन होणे गरजेचे आहे. हे वाचन शक्यतो ग्रेड लेवलच्या वरचे असावे. यामुळे एकंदरीत भाषेचा अभ्यास सोपा होतो. त्याचबरोबर शक्य झाल्यास विकेंडला मुलांच्या आवडीचे एक-दोन निवडक कार्यक्रम मुलांबरोबर बघायची, त्यावर चर्चा करायची सवय लावावी. यामुळे स्वतंत्र विचार करायची, आपले विचार मांडायची मुलांना सवय लागते आणि आपल्यालाही त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळते.
बँड किंवा कॉयर यापैकी जे काही निवडले असेल त्याचाही नियमीत सराव हवा. म्युझिकमधे पुढे काही करायचे नसले तरी म्युझिक डिपार्टमेंट मधे लागलेली शिस्त, एकत्र काम करणे, कलेबद्दलची जाणीव वगैरे गोष्टी पुढे कायम साथ देतात.
बर्‍याच शाळांतून आजकाल मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे गणित विषयाचे कोर्स घेता येतात. मात्र त्यासाठी ६वीत गणिताची चांगली तयारी हवी. तयारी चांगली असेल तर गणिताचे शिक्षक वरच्या वर्गाच्या कोर्ससाठी निवड करतात. निवड झाल्यास रोजचा ग्रूहपाठ आणि विकेंडला कन्सेप्ट क्लिअर आहेत ना हे बघण्यासाठी थोडा सराव सोडल्यास फार काही करावे लागत नाही. काही शाळा ८वीसाठी हायस्कूल बायोलॉजी घेण्याचा पर्याय देतात. बरेचदा कोर्सची अॅडमिशन टिचर रेकमेंडेशनवर असते. मिडलस्कूलला हायस्कूल लेवलचे कोर्स घेणार असल्यास अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तसेच या ग्रेड हायस्कुल ट्रान्सक्रिप्टवर कायम होतात. त्यामुळे कोर्ससाठी निवड झाल्यास मुलांशी चर्चा करुन, एकंदरीत कोर्सवर्क आणि वाढीव कष्टाची मुलांना कल्पना देऊन अॅडमिशनचे ठरवावे. माझ्या मुलाला जेव्हा हायस्कूल कोर्सेस ऑफर केले गेले तेव्हा डिपार्टमेंट हेडशी बोलून कोर्ससाठी काय अपेक्षित आहे ते समजून घेतले. मुलाला एकंदरीत काय अभ्यास करावा लागेल त्याची कल्पना यावी म्हणून क्रमिक पुस्तके शाळेकडून विकेंड्साठी मागून घेतली. त्याच्या इतर अॅक्टिविटीज आणि वाढीव अभ्यास यासाठीच्या वेळाचा ताळमेळ जुळतोय ना ते पाहिले. माझ्या मुलाने ८वीत अल्जिब्रा -१ आणि बायलॉजी ऑनर्स असे दोन हायस्कूल कोर्सेस घेतले. अल्जिब्रा - १ मुळे हायस्कूलला AP Calculus घेता आले तर बायोलॉजी ऑनर्स मुळे आवडत्या विषयांसाठी हायस्कूल स्केड्युलमधे जागा झाली. मिडलस्कूलला हायस्कूलचे कोर्सेस घेण्याचा फायदा म्हणजे हायस्कूलमधे वेगवेगळे AP कोर्सेस घेणे शक्य होते. हायस्कूलमधे कुठले AP कोर्सेस उपलब्ध आहेत ते पाहून शिक्षक आणि काउंसेलरच्या मदतीने एकंदरीत मार्ग आखावा. फंडिंग उपलब्ध असेल तर मिडलस्कूलमधे फॉरीन लँग्वेजचा पर्यायही उपलब्ध होतो. तसे असेल तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. मिडलस्कुलमधे हायस्कूलचे कोर्सेस उपलब्ध नसतील तर काळजी करु नये. कॉलेज अॅडमिशन ऑफिस विद्यार्थ्याच्या करीयर ट्रॅकनुसार हायस्कूलमधे जे काही सगळ्यात वरच्या लेवलचे कोर्सेस उपलब्ध आहेत ते विद्यार्थ्याने चांगल्या ग्रेड्सह पूर्ण केलेत ना एवढेच पहाते.

मिडलस्कूलमधे शाळेच्या वेगवेगळ्या क्लब्जमधून एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिविटीज मधे भाग घेता येतो. . यामुळे आपल्या वर्गाव्यतिरिक्त इतर वर्गातील मुलांशी ओळखी होतात. समविचारी मित्र-मैत्रीणी भेटतात. क्लब्ज व्यतिरिक्त शाळेच्या अ‍ॅथलेटिक्स डिपार्टमेंटमधे वेगवेगवेगळ्या संघांसाठी मॅनेजर होण्याची संधी उपलब्ध असते. काम करावे लागते पण त्यातूनच नेतृत्व करायची, वेळेचे नियोजन करायची सवय लागते. शाळेव्यतिरीक्त 4-H तर्फेही विविध संधी उपलब्ध असतात. 4-H हे खेड्यातील शेतीवाल्यामुलांसाठी आहे असा एक गैरसमज असतो. अर्बन सेटिंग मधील मुलांनाही 4-H मधे बरेच काही शिकता येते. मुलामुलींसाठी केक डेकोरेशन पासून रोबोटिक्स पर्यंत विविध उपक्रम यात असतात. गावात समाजसेवेच्याही अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला काय करायला आवडते हे समजून घ्यायला मिडलस्कूलचा काळ योग्य. तेव्हा उपलब्ध असलेल्या संधी अजमावून पहाव्यात. निरनिराळे अनुभव घेऊन आपल्याला काय आवडते ते पहावे आणि त्यानुसार हायस्कूलला कुठल्या १-२ अॅक्टिव्हिटी करायच्या ते ठरवावे.

८वी च्या शेवटच्या ग्रेडिंग पिरिएडच्या सुरुवातीला हायस्कूलचे स्केड्युल आखून ९वी (फ्रेशमन इअर) साठी कोर्सेस ठरवावे लागतात. त्यासाठी ८वीच्या दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला हायस्कुलचे कोर्सबुक डोळ्याखालून घालावे. हायस्कूलच्या वेबसाईटवर हे उपलब्ध असते. नसल्यास हायस्कूल गायडन्स ऑफिसाकडे विचारणा करावी. पुढील ४ वर्षांचा मार्ग आखताना स्केड्युल कंफ्लिक्ट, कोर्स रद्द होणे, मुलांना घेतलेला कोर्स न आवडणे वगैरे शक्यता विचारात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करून ठेवावा. हायस्कूलमधे बरेचदा शाळा सुरु व्हायच्या ८-१० दिवस आधी स्केड्युल कंन्फ्लिक्टचे घोळ लक्षात येतात. काही वेळा बजेट कट्स मुळे निवडलेला कोर्स रद्द झालेला असतो. अशावेळी आधी विचार केला नसेल तर आयत्यावेळी गडबड उडते. माझ्या मुलाच्या बाबतीत दोनदा अशी गडबड झाली. एकदा कोर्स रद्द म्हणून आयत्यावेळी दुसरा पर्याय शोधावा लागला तर एकदा स्केड्युल कंफ्लिक्ट म्हणून बिझिनेस एलेक्टिवच्या जागी अजून एक फॉरीन लँग्वेज घ्यावी लागल्याने अचानक वर्कलोड वाढले. तेव्हा उपलब्ध पर्याय आधीच विचारात घ्यावेत.

इथे वयाची १४ वर्षे पूर्ण झाली की मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शाळा सांभाळून पार्टटाईम नोकरी करु शकतात. शक्य असेल तर किमान सुट्टीत तरी नोकरी करावी. बहुतेक जणांसाठी मिडलस्कूल पूर्ण केल्यावर घेतलेला समर जॉब हा पहिला वहिला जॉब असतो. जॉब शोधण्यासाठी बरेचदा शाळेतील शिक्षकांची मदत मिळते. शाळेतील सिनियर फ्रेंड्स, समाजसेवा आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटी निमित्ताने ओळखीची झालेली मोठी माणसे वगैरे मंडळी देखील जॉब मिळवण्यासाठी मदत करतात. माझ्या मुलाला आत्ता पर्यंतचे सगळे जॉब शिक्षक आणि ब्युरो डायरेक्टर्सनी कामाच्या संधींबद्दल सुचना दिल्यामुळे मिळाले. जानेवारीपासून काम शोधायला सुरुवात केली तर सुट्टी सुरु होताना हातात काम असेल. नोकरी व्यतिरिक्त लॉन केअर, स्नो काढणे, बेबी सिटिंग वगैरे करुनही मुले अर्थार्जन करु शकतात. इथे हॉस्पिटल्समधे बेबीसिटिंगचा कोर्स असतो. तो केल्यास बेबीसिटिंगची कामे मिळणे सोपे जाते.

मिडलस्कूलचा काळ छान एंजॉय करावा. मिडलस्कूलच्या एखाद्या विषयात ग्रेड कमी मिळाली म्ह्णून निराश होऊ नये. कुठे कमी पडत आहोत ते शोधून सुधारण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी सजग रहावे. पण उगाच स्ट्रेस घेऊ नये. मुलांचे 'मोठे' होणे एंजॉय करावे.

टीप : लेखातील माहिती माझ्या माफक अनुभवावर आधारीत आहे. इतर मायबोलीकरांनी त्यात आपापल्या अनुभवानुसार जरूर भर घालावी ही विनंती.

AP Courses
AP courses कॉलेज लेवलचे कोर्सेस असतात. हायस्कूल मधे हे कोर्सेस घेता येतात. परीक्षा कॉलेजबोर्ड (हो. तेच ते सॅट वाले) घेते. परीक्षेत स्कोर चांगला आला तर कॉलेज क्रेडिट मिळू शकते. या कॉलेज क्रेडिटचे प्रत्येक युनिवर्सिटीचे स्वतःचे असे नियम आहेत. त्याबाबतची माहिती युनिवर्सिटी देते. बर्‍याचदा AP course हा dual credit असतो. अशावेळी हायस्कूलचे तुमच्या स्टेटमधील पब्लिक युनिवर्सिटीशी कॉन्ट्रॅक्ट असते. कोर्सचे फ्रेमवर्क हे एकाचवेळी AP आणि युनिवर्सिटीचा संबंधीत कोर्स यानुसार असते. विद्यार्थी AP/university credit/dual यापैकी हवा तो पर्याय निवडू शकतात. यातील युनि. क्रेडीट स्टेट मधील बहुतेक पब्लिक युनिवर्सिटी घेतात. स्टेट्मधील प्रायवेट युनिवर्सिटीच्या बाबतीत तुमच्या स्टेटचे लॉज कसे आहेत त्याप्रमणे क्रेडिट ट्रान्सफर होते किंवा नाही. बाहेरच्या स्टेट मधे बहूतेक वेळा क्रेडीट ट्रान्सफर होत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त माहिती स्वाती. लिहिलीत याबद्दल धन्यवाद. आणखीन वाचायला आवडेल. माझी मुलगी आता आठवीत जाईल. रोजचा अभ्यास व्यवस्थित करते. अंगात आळस आहे त्यामुळे खूप मेहनत करायला, जास्तीचा अभ्यास करायला विशेष आवडत नाही. पुढच्या वर्षीपासून आम्हांलाही थोडं सजग रहायला हवं आणि तिला मदत करायला हवी.

छान माहिती.
या वयात मुलं आपल्या 'वेगळे' असण्याबद्दल खूप संवेदनाशील होतात. म्हणजे काय?

>>या वयात मुलं आपल्या 'वेगळे' असण्याबद्दल खूप संवेदनाशील होतात. म्हणजे काय?>>

मुलांना काही शारीरीक व्याधी असतील तर त्या मॅनेज करायला आहारापासून प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज पर्यंत अनेक गोष्टींची मदत लागते. वेगवेगळ्या उघड दिसणार्‍या अणि काही वेळा सहज लक्षात न येणार्‍या डिसॅबिलीटीज असतात. हस्ताक्षराचा प्रॉब्लेम म्हणून काँप वर टाईप करणे ते टेस्ट पूर्ण करण्यासाठी जादा वेळ यासारख्या अनेक सुविधांची गरज असते. काही वेळा पाठ टेकायला उशी तर काही वेळा शुगर मेंटेन करायला हेल्दी स्नॅक गरजेचे असते. मिडलस्कूलमधे मुलांना आपल्या या वेगळेपणाची प्रकर्षाने जाणीव होते. आपल्या व्याधीची इतर मुले टिंगल करतील, आपल्याशी मैत्री करणार नाहीत अशी भीती वाटते. बरेचदा मुलं आवश्यक सुविधा नाकारतात. औषध घ्यायला नर्सच्या ऑफिसमधे जाणे टाळतात. याचा परीणाम त्यांच्या तब्येतीवर , वर्तनावर, अभ्यासावर होतो.

रत्ना,
तुमच्या मुलाचं अभिनंदन.

१. हे कोर्सेस हायर लेव्हलचे असल्यामुळे़ कॉलेज अ‍ॅडमिशनच्या अ‍ॅप्लिकेशनला 'वजन' येतं. >>>> सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे. सर्वच युनिव्हर्सिटीज हायस्कूल मध्ये घेतलेले AP Courses मान्य करतात असं नाही. सध्या युनिव्हर्सिटीजना मिळणारी ग्रांट कमी झाली आहे. तसंच प्राध्यापकांचे वाढते पगार, नवनविन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये आणणे वगैरे गोष्टींमुळे खर्च वाढले आहेत. जास्त AP कोर्सेस 'व्हॅलिड' दिले तर युनीव्हर्सिटीला मिळणारे पैसे कमी होतात, त्यामुळे अ‍ॅडमिशनच्या दृष्टीने ठराविक कोर्सेसच valid धरले जातात. आमच्या राज्यातल्या दोन 'रँक्ड' युनीव्हर्सिटीजनी (UNC Chapel Hill, Duke) जास्तीत जास्त ५ AP कोर्सेसचा उपयोग कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी होईल असं सांगितलं आहे. त्यापुढे तुम्हाला आवड असल्यास, उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही अधिक कोर्सेस घेऊ शकता पण अ‍ॅडमिशन्च्या दृष्टीने त्याचा फायदा होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तसंच कॉलेज अ‍ॅडमिशनसाठी किती AP कोर्सेस घेतले आहेत यापेक्षा GPA, ACT/SAT Score बघतात. AP Courses कॉलेज लेव्हलचे असल्याने अभ्यासही तसाच जास्त असतो. त्याचा GPA वर परिणाम होऊ न देणं महत्वाचं आहे. म्हणून AP कोर्सेस घेताना विचार करून घ्या हे परत परत सांगत असतात.

"They found that students who take more AP or IB courses do better in college – but only up to a certain point. If two students have similar SAT scores and high-school grades, and one takes zero AP courses and the other takes five, the student with five AP courses will probably have a higher first-year GPA (3.26 versus 3.07). But above five courses, there’s no significant increase in GPA. "

ही लिंक : http://gazette.unc.edu/2013/01/08/study-finds-that-more-ap-classes-may-n...

तसंच बरीच मुलं हायस्कूलला जायच्या आधीच्या समरमधे हायस्कूल मॅथ्स घेतात, पण आमच्या शाळेतल्या काऊन्सलरनं बर्‍याचदा अशा मुलांचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होत नाहीत आणि पुढे त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो असं सांगितलं. त्यामुळं AP कोर्स निवडताना आवड आणि आपल्याला झेपेल ना याचा विचार जरूर करावा.

माझी हि मुलगी अजुन खुप लहान आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो कि, चांगलं कॉलेज/university कोणतं हे कसं ठरवायचं ईथे usa मध्ये?

>>AP कोर्स निवडताना आवड आणि आपल्याला झेपेल ना याचा विचार जरूर करावा.>> +१

आमच्या इथे बायलॉजी आणि पर्यावरण या दोन विषयाचे AP उपलब्ध असूनही केवळ या विषयांची आवड नाही म्हणून माझ्या मुलाने घेतले नव्हते. घेतले असते तर झेपले असते का? तर हो. आधीच्या वर्षी बायलॉजी ऑनर्सला त्याला A+ होता. इथे AP course साठी वेटेड जीपीए असल्याने हे दोन्हीही कोर्स न घेणे म्हणजे वॅलिडिक्टोरीअनच्या स्पर्धेतून बाहेर पडणे होते. पण त्याचे शिकणे आनंददायी असणे हे जास्त महत्वाचे असल्याने या दोन्ही विषयांचे कोर्स घेतले नाहीत.
कॉलेजमधे त्याच्या करीयर ट्रॅकशी संबंधीत विषयाचे काही कोर्सेस तो AP कोर्स केला असूनही घेणार आहे.

>>चांगलं कॉलेज/university कोणतं हे कसं ठरवायचं ईथे usa मध्ये?>>
दर वर्षी रँकिंग प्रसिद्ध होतात. पण खरे सांगायचे कॉलेज टूर घ्यावी. तुमच्या पाल्याला जे कॉलेज आवडेल, रुचेल ते चांगले. जोडीला खर्चाचे गणितही मांडावे.

स्वाती२,छान माहिती देत आहात.हायस्कूलसाठी आम्हाला अजून बराच वेळ असला तरी ह्या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.

मला तर तुमच्याकडून नुसतंच हायस्कुल आणि मिडलस्कुल पेक्षा मुलांच्या संपुर्ण संगोपनाबद्दलच समजुन घ्यायला आवडेल.
अतिशय छान लेखमाला, प्लीज अजून लिहीत रहा.

..

हेल्लो स्वाती ,

AP साठी online course बाहेरून class करणे हा पर्याय तुम्ही घेतला होता का? माझ्या मुलीने एका US History च्या online course ला enroll केले आहे, पण माहित नाही तो पर्याय कितपत चांगला आहे ते.
Colleges , collegeboard AP test चा score बघतात कि AP subject चा शाळेचा score बघतात?

धन्यवाद.

आम्ही ऑनलाईन कोर्सचा पर्याय घेतला नव्हता. ऑनलाइन कोर्स घरून करणार की शाळेत? घरून करणार असल्यास सुरुवातीपासून पक्के रुटिन ठेवा. सेल्फ डिसिप्लीन हवी. ऑनलाईन कोर्स टिचर लेड असेल तर उत्तम. माझ्या मुलाने ड्युएल क्रेडिट घेतले होते. त्यात एपी साठी United States History: Preparing for the Advanced Placement Examination हे पुस्तक वापरले. ५ मिळाले.
कॉलेज क्रेडीट्ससाठी collegeboard AP test score विचारात घेतात आणि GPA साठी शाळेचा स्कोर विचारात घेतात. शाळेच्या परीक्षेत ग्रेड चांगली असेल तर एपीला ४ किंवा ५ स्कोर नक्की मिळतो. AP course साठी weighted GPA घेत असली तरी कॉलेज weighted GPA विचारात घेत नाही. मात्र क्लास रँक ठरवताना weighted GPA महत्वाचा ठरू शकतो.

AP साठी online course बाहेरून class करणे हा पर्याय तुम्ही घेतला होता का? <<<
आमच्याकडे काही मुलं Online Course किंवा Summer school करून काही विषय शिकतात.
१. त्यात शाळेची आधी Permission घ्यावी लागते.
२. Extra अभ्यास करावा लागतो.
३. त्यांची परीक्षा देऊन पास व्हावे लागते, आणि तो Result ते परस्पर शाळेला पाठवतात.
४. शाळेची त्या विषयाची परीक्षा ठरल्या दिवशी देऊन ८५% / ९०% मार्क मिळवावे लागतात.
मग शाळा ते Credit धरते ,आणि पुढे जाऊ देते. ते Credit शाळेला चालते, GPA मधे धरले जाते, आणि कॉलेजलाही चालते..

>>AP च्या इतर subject exam. prep course पुस्तकाची ची यादी असेल तर कृपया इथे टाका>>

AP French rea चे AP French Language and Culture All Access सगळ्यात कठीण भाग ऑडिओ. त्या साठी बरीच प्रॅक्टीस हवी.

AP Chem, AP Physics साठी क्रमिक पुस्तक वापरले. रोजच्या रोज अभ्यास. केमिस्ट्रीसाठी दर रविवारी १/२- १ तास मुलाला कठीण वाटलेला भाग तो माझ्याबरोबर बसून पुन्हा करायचा. केमिस्ट्रीचा ड्युएल कोर्स असल्याने त्याचाही उपयोग झाला. फिजिक्ससाठी मुलांनी स्ट्डीग्रुप केला होता. रवीवारी तास-दिडतास जमायची. त्यामुळे महिन्यातुन एकदा गाडी ट्रॅकवर आहे ना एवढेच बघावे लागले.

AP Cal, AP Lit साठी बॅरन मधील टेस्ट्स सोडवल्या. बाकी अभ्यास गणिताचे क्रमिक पुस्तक, इंग्लीशसाठी -वाचनासाठी नेमलेली पुस्तके . कॅलचा कोर्स ड्युएल होता पण मोजकीच मुलं AP ला होती. त्यामुळे शाळेत एपी च्या दृष्टीने फोकस नव्हता. एपीच्या तयारीसाठी थोडा अभ्यास मी घरी आणि थोडा टिचरने शाळा भरण्याआधी करुन घेतला.
सॅट्च्या मॅथसाठी तसेच मॅथ सबजेक्ट टेस्ट्साठी Dr. John Chung ची पुस्तके वापरली.

१ Oct ला सिन्गापुर वरुन Cleveland Ohio ला आलो. मुलानी CBSC, India मधुन १० वी केले होती मार्च २०१३ मध्ये. .मधल्या ६ महिन्यच्या सुट्टि मध्ये SAT दिली तसेच AP Course चा अभ्यास केला.

२ Oct ला Highschool admission साठी गेलो. Semester चालु होउन ५ आठवडे झाले होते. पण Counselor चान्गली असल्यने २ AP Course , 2 Honers & 2 Elective दिले. तसेच CBSC result वरुन ९ & १० grade चे
credit दिले. (They were impressed by CBSC result since it has all details as well as strength & weakness & what child should do in 11th-12th grade.It also published percentile. ), तसेच ५ आठवड्यात जे नुकसान झाले ते teachers will take extra effort. लगेच पुस्तके पण दिली आणी मुलानी अभ्यस सुरु केला.

Very nice experience.. उद्यापसुन मुलगा शाळेत जाईल.

ही सिरीज आता वाचत आहे. एकदम उपयोगी माहिती आहे. इतरांनाही दिसावी म्हणून वर काढत आहे.

स्वाती२ - खेळासंबंधी एक प्रश्न होता. हायस्कूल मधे जे खेळ खेळले जातात त्या खेळात प्रावीण्य मिळवून हायस्कूल टीम मधे असणे हा एक भाग. पण जे खेळ इथे हायस्कूल मधे खेळले जात नाहीत (उदा: क्रिकेट) त्यात बाहेरच्या लीग्ज मधून हायस्कूल च्या वर्षांमधे खेळत राहिल्याचा पुढे कॉलेज मधे फायदा होतो का - म्हणजे तो खेळ हे एक कौशल्य असे काही धरले जाते का?

रत्ना - क्रिकेटचा कोर्स घेतला म्हणजे नक्की काय? हायस्कूल मधे उपलब्ध होता का तो?

Pages