अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १

Submitted by स्वाती२ on 14 June, 2013 - 14:34

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

१ जूनला माझ्या मुलाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले. चार, नाही, खरे तर पाच वर्षांचा प्रवास. इथे हायस्कूल करणारी पहिली पिढी. त्यामुळे आमच्यासाठीही हा प्रवास नवीनच होता. काही निर्णय योग्य ठरले, काही चूका झाल्या तर काही वेळा he was just lucky. या प्रवासात पालक म्हणून आम्ही जे शिकलो ते इतर मायबोलीकरांना कदाचित उपयोगी पडेल म्हणून हा लेख.

अमेरीकेतील शिक्षण पद्धतीत हायस्कूलची चार वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात केलेली तयारी, घेतलेले कोर्सेस, ग्रेड्स, स्कोअर्स, समाजसेवा यावर पुढील शिक्षणाचे दरवाजे उघडणार असतात. तसेच या महागड्या शिक्षणाच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी लागणार्‍या स्कॉलरशिप्स आणि ग्रॅंट्स देखील विद्यार्थ्यांनी या चार वर्षांत शाळेत आणि शळेबाहेर जी काही कामगिरी केली त्यावर अवलंबून असतात. म्हणताना जरी हायस्कूलची चार वर्षे धरली तरी आजकाल बहूतेक शाळांतून मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे काही कोर्सवर्क करता येते त्यामुळे खरे तर मिडलस्कूलपासूनच हा प्रवास सुरु होतो.

मिडलस्कूल : ६वी ते ८वी
५वी पर्यंत वेगवेगळ्या प्राथमिक शाळांत शिकणारी मुले गावातल्या मिडलस्कूलमधे येतात. ६वीचे वर्ष नव्या बदलाशी जमवून घ्यायचे. प्रत्येक विषयासाठी नवीन शिक्षक, लॉकर्स, वर्गातील काही मुले माहितीची तर काही दुसर्‍या, खरेतर प्रतिस्पर्धी शाळेतली. त्यातच ५वी त 'दादा' असलेली मुलं इथे परत लोअर क्लास झालेली असतात. स्कुलबसने जातायेता हे बदललेलं स्टेटस सुरुवातीला चांगलच जाणवतं. पण बहूतेक मुलं महिन्याभरात रुळतात. मुलांना रुळायला कठीण जात असेल तर वेळीच काउंसेलरला भेटावे. तसेच मुलांना काही हेल्थ कंडीशन असेल त्याची हेल्थ फाईल प्रत्येक शिक्षकाच्या नजरेखालून गेली आहे ना याची खात्री करावी. इतरही काही सवलत किंवा सुविधा आवश्यक असेल तर त्याबाबत काउंसेलर आणि शिक्षकांशी बोलावे. शाळा सुरु होताना ओपनहाऊस असते. तेव्हा मुलाच्या होमरुम टिचरना भेटून आपल्या पाल्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. काही कंसर्न असतील तर सांगाव्यात. होमरुम टिचर आपापल्या मुलांची खूप छान काळजी घेतात. या वयात मुलं आपल्या 'वेगळे' असण्याबद्दल खूप संवेदनाशील होतात. अशावेळी आधी बोलणे झाले असेल तर शिक्षक खूप छान पद्धतीने मुलांना सामावून घेतात. इतर मुलांना परीस्थिती समजावून सांगतात.

इथे शाळेत अभ्यासाबरोबरच खेळ आणि इतर कलागुणांनाही महत्व असते. मिडलस्कूलपातळीवरील अभ्यासाच्या ग्रेड्स आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटीज जरी कॉलेज अॅडमिशनसाठी विचारात घेतल्या जाणार नसल्या तरी हायस्कूल मधील यशाचा पाया मिडलस्कूलमधे घातला जातो.

मुलांना पुढे हायस्कूलसाठी खेळायचे असेल तर ही वर्षे महत्वाची. प्राथमिक शाळेत बहुतेक ठिकाणी सगळ्या मुलांना टीमवर घेतात. मिडलस्कूलमधे हे बदलते. कोच मंडळींचे नव्या मुलांवर बारीक लक्ष असते. टीम मध्ये सिलेक्शन झाले नाही निराश न होता सराव चालू ठेवावा. मुलांचा सुधारलेला खेळ, वर्तन बघून बरेचदा पुढील सिझनला कोच ऑफर देतात. सिलेक्शन झाल्यास या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा. भरपूर मेहनत करावी. बॉइज क्लब, गर्ल्स इंक चे प्रोगॅम्स असतात. तिथेही खूप शिकायला मिळते. हायस्कूलला वर्सिटी स्पोर्ट्स खेळायचे असतील तर मिडलस्कूलमधे मेहनत आवश्यक.

६वी पासून अभ्यास वाढायला सुरुवात होते. बरेचदा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट्स किंवा प्रोजेक्ट्स असेही होते. रोजच्या रोज अभ्यास आणि प्लॅनर वापरायची सवय लावली तर आयत्या वेळचे मेल्टडाऊन टळतात. मिडलस्कूलमधे टाईम मॅनेजमेंट आणि नियमित अभ्यासाची सवय लागली की हायस्कूल सोपे होते. इथे शाळेतील शिक्षक खूप मदत करतात. मुलांची शाळेत लवकर येण्याची किंवा शाळा सुटल्यावर थांबायची तयारी असेल तर कठीण भाग पुन्हा समजावून सांगतात. त्या त्या आठवड्यात शिकवलेल्या भागापैकी जे काही नीट समजले नसेल त्यासाठी शिक्षकांकडे वेळीच मदत मागावी.
रोजचा ग्रुहपाठ आणि विकेंडला थोडा अभ्यास किंवा प्रोजेक्ट्सची तयारी एवढे या लेवलला पुरेसे असते. या पातळीवर हा अभ्यास मुले आपला आपण करु शकतात. अभ्यासाव्यतिरिक्त रोज कमीतकमी अर्धा तास अवांतर वाचन होणे गरजेचे आहे. हे वाचन शक्यतो ग्रेड लेवलच्या वरचे असावे. यामुळे एकंदरीत भाषेचा अभ्यास सोपा होतो. त्याचबरोबर शक्य झाल्यास विकेंडला मुलांच्या आवडीचे एक-दोन निवडक कार्यक्रम मुलांबरोबर बघायची, त्यावर चर्चा करायची सवय लावावी. यामुळे स्वतंत्र विचार करायची, आपले विचार मांडायची मुलांना सवय लागते आणि आपल्यालाही त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळते.
बँड किंवा कॉयर यापैकी जे काही निवडले असेल त्याचाही नियमीत सराव हवा. म्युझिकमधे पुढे काही करायचे नसले तरी म्युझिक डिपार्टमेंट मधे लागलेली शिस्त, एकत्र काम करणे, कलेबद्दलची जाणीव वगैरे गोष्टी पुढे कायम साथ देतात.
बर्‍याच शाळांतून आजकाल मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे गणित विषयाचे कोर्स घेता येतात. मात्र त्यासाठी ६वीत गणिताची चांगली तयारी हवी. तयारी चांगली असेल तर गणिताचे शिक्षक वरच्या वर्गाच्या कोर्ससाठी निवड करतात. निवड झाल्यास रोजचा ग्रूहपाठ आणि विकेंडला कन्सेप्ट क्लिअर आहेत ना हे बघण्यासाठी थोडा सराव सोडल्यास फार काही करावे लागत नाही. काही शाळा ८वीसाठी हायस्कूल बायोलॉजी घेण्याचा पर्याय देतात. बरेचदा कोर्सची अॅडमिशन टिचर रेकमेंडेशनवर असते. मिडलस्कूलला हायस्कूल लेवलचे कोर्स घेणार असल्यास अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तसेच या ग्रेड हायस्कुल ट्रान्सक्रिप्टवर कायम होतात. त्यामुळे कोर्ससाठी निवड झाल्यास मुलांशी चर्चा करुन, एकंदरीत कोर्सवर्क आणि वाढीव कष्टाची मुलांना कल्पना देऊन अॅडमिशनचे ठरवावे. माझ्या मुलाला जेव्हा हायस्कूल कोर्सेस ऑफर केले गेले तेव्हा डिपार्टमेंट हेडशी बोलून कोर्ससाठी काय अपेक्षित आहे ते समजून घेतले. मुलाला एकंदरीत काय अभ्यास करावा लागेल त्याची कल्पना यावी म्हणून क्रमिक पुस्तके शाळेकडून विकेंड्साठी मागून घेतली. त्याच्या इतर अॅक्टिविटीज आणि वाढीव अभ्यास यासाठीच्या वेळाचा ताळमेळ जुळतोय ना ते पाहिले. माझ्या मुलाने ८वीत अल्जिब्रा -१ आणि बायलॉजी ऑनर्स असे दोन हायस्कूल कोर्सेस घेतले. अल्जिब्रा - १ मुळे हायस्कूलला AP Calculus घेता आले तर बायोलॉजी ऑनर्स मुळे आवडत्या विषयांसाठी हायस्कूल स्केड्युलमधे जागा झाली. मिडलस्कूलला हायस्कूलचे कोर्सेस घेण्याचा फायदा म्हणजे हायस्कूलमधे वेगवेगळे AP कोर्सेस घेणे शक्य होते. हायस्कूलमधे कुठले AP कोर्सेस उपलब्ध आहेत ते पाहून शिक्षक आणि काउंसेलरच्या मदतीने एकंदरीत मार्ग आखावा. फंडिंग उपलब्ध असेल तर मिडलस्कूलमधे फॉरीन लँग्वेजचा पर्यायही उपलब्ध होतो. तसे असेल तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. मिडलस्कुलमधे हायस्कूलचे कोर्सेस उपलब्ध नसतील तर काळजी करु नये. कॉलेज अॅडमिशन ऑफिस विद्यार्थ्याच्या करीयर ट्रॅकनुसार हायस्कूलमधे जे काही सगळ्यात वरच्या लेवलचे कोर्सेस उपलब्ध आहेत ते विद्यार्थ्याने चांगल्या ग्रेड्सह पूर्ण केलेत ना एवढेच पहाते.

मिडलस्कूलमधे शाळेच्या वेगवेगळ्या क्लब्जमधून एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिविटीज मधे भाग घेता येतो. . यामुळे आपल्या वर्गाव्यतिरिक्त इतर वर्गातील मुलांशी ओळखी होतात. समविचारी मित्र-मैत्रीणी भेटतात. क्लब्ज व्यतिरिक्त शाळेच्या अ‍ॅथलेटिक्स डिपार्टमेंटमधे वेगवेगवेगळ्या संघांसाठी मॅनेजर होण्याची संधी उपलब्ध असते. काम करावे लागते पण त्यातूनच नेतृत्व करायची, वेळेचे नियोजन करायची सवय लागते. शाळेव्यतिरीक्त 4-H तर्फेही विविध संधी उपलब्ध असतात. 4-H हे खेड्यातील शेतीवाल्यामुलांसाठी आहे असा एक गैरसमज असतो. अर्बन सेटिंग मधील मुलांनाही 4-H मधे बरेच काही शिकता येते. मुलामुलींसाठी केक डेकोरेशन पासून रोबोटिक्स पर्यंत विविध उपक्रम यात असतात. गावात समाजसेवेच्याही अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला काय करायला आवडते हे समजून घ्यायला मिडलस्कूलचा काळ योग्य. तेव्हा उपलब्ध असलेल्या संधी अजमावून पहाव्यात. निरनिराळे अनुभव घेऊन आपल्याला काय आवडते ते पहावे आणि त्यानुसार हायस्कूलला कुठल्या १-२ अॅक्टिव्हिटी करायच्या ते ठरवावे.

८वी च्या शेवटच्या ग्रेडिंग पिरिएडच्या सुरुवातीला हायस्कूलचे स्केड्युल आखून ९वी (फ्रेशमन इअर) साठी कोर्सेस ठरवावे लागतात. त्यासाठी ८वीच्या दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला हायस्कुलचे कोर्सबुक डोळ्याखालून घालावे. हायस्कूलच्या वेबसाईटवर हे उपलब्ध असते. नसल्यास हायस्कूल गायडन्स ऑफिसाकडे विचारणा करावी. पुढील ४ वर्षांचा मार्ग आखताना स्केड्युल कंफ्लिक्ट, कोर्स रद्द होणे, मुलांना घेतलेला कोर्स न आवडणे वगैरे शक्यता विचारात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करून ठेवावा. हायस्कूलमधे बरेचदा शाळा सुरु व्हायच्या ८-१० दिवस आधी स्केड्युल कंन्फ्लिक्टचे घोळ लक्षात येतात. काही वेळा बजेट कट्स मुळे निवडलेला कोर्स रद्द झालेला असतो. अशावेळी आधी विचार केला नसेल तर आयत्यावेळी गडबड उडते. माझ्या मुलाच्या बाबतीत दोनदा अशी गडबड झाली. एकदा कोर्स रद्द म्हणून आयत्यावेळी दुसरा पर्याय शोधावा लागला तर एकदा स्केड्युल कंफ्लिक्ट म्हणून बिझिनेस एलेक्टिवच्या जागी अजून एक फॉरीन लँग्वेज घ्यावी लागल्याने अचानक वर्कलोड वाढले. तेव्हा उपलब्ध पर्याय आधीच विचारात घ्यावेत.

इथे वयाची १४ वर्षे पूर्ण झाली की मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शाळा सांभाळून पार्टटाईम नोकरी करु शकतात. शक्य असेल तर किमान सुट्टीत तरी नोकरी करावी. बहुतेक जणांसाठी मिडलस्कूल पूर्ण केल्यावर घेतलेला समर जॉब हा पहिला वहिला जॉब असतो. जॉब शोधण्यासाठी बरेचदा शाळेतील शिक्षकांची मदत मिळते. शाळेतील सिनियर फ्रेंड्स, समाजसेवा आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटी निमित्ताने ओळखीची झालेली मोठी माणसे वगैरे मंडळी देखील जॉब मिळवण्यासाठी मदत करतात. माझ्या मुलाला आत्ता पर्यंतचे सगळे जॉब शिक्षक आणि ब्युरो डायरेक्टर्सनी कामाच्या संधींबद्दल सुचना दिल्यामुळे मिळाले. जानेवारीपासून काम शोधायला सुरुवात केली तर सुट्टी सुरु होताना हातात काम असेल. नोकरी व्यतिरिक्त लॉन केअर, स्नो काढणे, बेबी सिटिंग वगैरे करुनही मुले अर्थार्जन करु शकतात. इथे हॉस्पिटल्समधे बेबीसिटिंगचा कोर्स असतो. तो केल्यास बेबीसिटिंगची कामे मिळणे सोपे जाते.

मिडलस्कूलचा काळ छान एंजॉय करावा. मिडलस्कूलच्या एखाद्या विषयात ग्रेड कमी मिळाली म्ह्णून निराश होऊ नये. कुठे कमी पडत आहोत ते शोधून सुधारण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी सजग रहावे. पण उगाच स्ट्रेस घेऊ नये. मुलांचे 'मोठे' होणे एंजॉय करावे.

टीप : लेखातील माहिती माझ्या माफक अनुभवावर आधारीत आहे. इतर मायबोलीकरांनी त्यात आपापल्या अनुभवानुसार जरूर भर घालावी ही विनंती.

AP Courses
AP courses कॉलेज लेवलचे कोर्सेस असतात. हायस्कूल मधे हे कोर्सेस घेता येतात. परीक्षा कॉलेजबोर्ड (हो. तेच ते सॅट वाले) घेते. परीक्षेत स्कोर चांगला आला तर कॉलेज क्रेडिट मिळू शकते. या कॉलेज क्रेडिटचे प्रत्येक युनिवर्सिटीचे स्वतःचे असे नियम आहेत. त्याबाबतची माहिती युनिवर्सिटी देते. बर्‍याचदा AP course हा dual credit असतो. अशावेळी हायस्कूलचे तुमच्या स्टेटमधील पब्लिक युनिवर्सिटीशी कॉन्ट्रॅक्ट असते. कोर्सचे फ्रेमवर्क हे एकाचवेळी AP आणि युनिवर्सिटीचा संबंधीत कोर्स यानुसार असते. विद्यार्थी AP/university credit/dual यापैकी हवा तो पर्याय निवडू शकतात. यातील युनि. क्रेडीट स्टेट मधील बहुतेक पब्लिक युनिवर्सिटी घेतात. स्टेट्मधील प्रायवेट युनिवर्सिटीच्या बाबतीत तुमच्या स्टेटचे लॉज कसे आहेत त्याप्रमणे क्रेडिट ट्रान्सफर होते किंवा नाही. बाहेरच्या स्टेट मधे बहूतेक वेळा क्रेडीट ट्रान्सफर होत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर एखादा स्पोर्ट चा कोर्स शाळेत उपलब्ध नसेल किंवा तो schedule मध्ये बसत नसेल तर तो बाहेरुन करु शकतात.
माझ्या दोन्ही मुलानी हिंदी शाळेत केले न्हवते तरी त्याचे क्रेडिट मिळाले. (मुलगी भारतात परतल्याने त्याचा काही उपयोग नाही) मुलानी फिजिकल टेर्निंग schedule मधे नसल्याने बाहेरुन केले. त्यावेळी क्रिकेट करायचा विचार होता पण ६ महिने स्नो असल्याने फिजिकल टेर्निंग घेतले. आमच्या कडे वेळ खुप कमी होता.

कॉलेज मध्ये जर क्रिकेट असेल तर त्याचा फायदा होईल. सहसा अमेरिकन कॉलेज मध्ये क्रिकेट नसते . NY, California मध्ये असेल तर माहित नाही. पण जरी कॉलेज मध्ये क्रिकेट नसेल तरी ती activity म्हणुन काउट होईल

माझ्या मुलाने क्रिकेटचा क्लास काॅलेजच्या शेवटच्या वर्षी Fairfax VA इथल्या George Mason University मध्ये ४ वर्षांपूर्वी घेतला होता. आणि तो क्लास घेणारी एकूण एक मुलं इथे जन्मलेली भारतीय-पाकिस्तानी होती.

फारेंड, बाहेरच्या लिग मधून खेळले तरी एक्स्ट्रा करीक्युलर म्हणून धरले जाईल. त्याशिवाय लीग संबंधी इतर कामे जसे की स्पॉन्सर मिळवण्यासाठी प्रयत्न, पीआरची कामे वगैरे करण्याची संधी मिळाल्यास लिडरशिप स्किल्स म्हणून दाखवता येइल.

तुमचा मुलगा/मुलगी जर आयव्ही लीग स्कूलच्या कॅलिबरचा असेल आणि स्कॉलरशिप मिळायलाच हवी असे तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे. अन्यथा इतका जिवाचा आटापिटा करण्याची अजिबात गरज नाही, असे माझे मत आहे.रिझनेबली ओके जीपीए, एस.ए.टी./ए.सी.टी स्कोर असेल तर बर्यापैकी चांगल्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळू शकतो. Managing your career is like investing - the degree of difficulty does not count. So you can save yourself money and pain by getting on the right train.

Pages