श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2013 - 06:15

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....

वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....

कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....

कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...

कधी आपली सगळी व्यथा विठ्ठलासमोर मांडणारा तर कधी त्याच विठ्ठलाशी कडाकडा भांडणारा...

तुकाराम हे कधीही न सुटणारे कोडे - पण एकदा का त्याच्या अभंगांनी वेड लावले की त्यातून सुटकाच नाही मग.....

कधी अभंगाचा एखादा चरण तर कधी पूर्ण अभंगच अंतःकरणाचा असा ठाव घेतो की वाचक केवळ डोळे मिटून स्वस्थ होऊन रहातो तर कधी त्या भावाशी एकरुप होऊ पहातो ......

त्यांच्या अभंगातून प्रकटणार्‍या विविध भावांशी एकरुप होणे हे कोणाला शक्यच होणार नाही असे वाटताना त्यातील निर्हेतुक, सहज विठ्ठलप्रेमाने मात्र आपण पूर्ण लुब्ध होतो हे मात्र निश्चित.....

फाल्गुन वद्य द्वितीया ही त्यांच्या सदेह वैकुंठगमनाची तिथी

त्यांचे मला भावलेले काही अभंग वा त्यातील काही चरण त्यानिमित्ताने इथे द्यावे एवढाच मानस आहे.

समस्त मराठी भाषिकांना बुवांनी जे ऋणी करुन ठेवले आहे ते ऋण मिरवण्यातच खरी धन्यता आहे असे वाटत रहाते......

या अभंगात दररोज भर टाकत राहीन, तसेच ज्या कुणाला असेच भन्नाट अभंग माहित असतील त्यांनी ते प्रतिसादात देत रहावे, ते मूळ धाग्यात समाविष्ट केले जातील ...
(कृपया हे लक्षात घ्यावे की फार लोकप्रिय असलेले अभंग देऊ नयेत, आगळेवेगळे अभंग वाचण्यात, अभ्यासण्यात एक वेगळीच अनुभूति आहे, अवीट, अवर्णनीय आनंद आहे)
(प्रत्येक अभंग / चरणाचे शेवटी जे आकडे आहेत ते तुकाराम गाथेतील संदर्भाचे आहेत - कोणा भाविकाला/ अभ्यासकाला त्यातील अजून काही जाणून घेण्यास त्याने मदत व्हावी)
(www.tukaram.com या वर संपूर्ण गाथा मिळू शकते)

१] पवित्र ते अन्न | हरिचिंतनी भोजन |
येर वेठ्या पोट भरी | चाम मसकाचे परी |
जेऊनि तो धाला | हरिचिंतनी केला काला |
तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले || २८०६ ||

चाम मसक = गोचिड, धाला = तृप्त झाला, येर वेठ्या = कोणी एखादा
हरिचे चिंतन्/स्मरण न करता जेवणारा म्हणजे नुसती पोटाची खळगी भरणारा - म्हणजे बुवांच्या दृष्टीने जणू एखादा क्षुल्लक गोचिडच.
आणि ते पुढे म्हणतात की - तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले ||
सगळे भोग भोगत असताना एक विठ्ठल आठवा - त्याला एक आगळीवेगळी चव येईल - जी बुवांनी स्वतः चाखली होती ज्यामुळे ते स्वतः विठ्ठलरुपच झाले...

२] आशा हे समूळ खणोनी काढावी | तेव्हाची गोसावी व्हावे तेणे || १४३१||

३] क्षणक्षणा सांभाळितो | साक्षी होतो आपुला |
न घडावी पायी तुटी | मन मुठी घातले |
विचारतो वचना आधी | धरुनि शुद्धि ठेविली |
तुका म्हणे मागे भ्यालो | तरी जालो जागृत ||१३७४||

४] चिंतनासी न लगे वेळ | सर्वकाळ करावे || १४४४||

५] ठेवा जाणीव गुंडाळून | येथे भावचि प्रमाण ||१४५३||

६] चित्ती नाही आस | त्याचा पांडुरंग दास
असे भक्तांचिया घरी | काम न सांगता करी |
अनाथाचा बंधु | असे अंगी हा संबंधु |
तुका म्हणे भावे | देवा सत्ता राबवावे ||२०७३|| आस - आसक्ती, इच्छा.

७] जालो निर्भर मानसी | म्हणउनि कळलासी |
तुझे म्हणविती त्यास | भय चिंता नाही आस |
चुकविसी पाश | गर्भवासयातना |
तुझे जाणोनिया वर्म | कंठी धरियेले नाम |
तुका म्हणे तेणे सुखे | विसरलो जन्मदु:खे ||२०९५||

८] अवघा तो शकुन | हृदयी देवाचे चरण |
येथे नसता वियोग | लाभा उणे काय मग |
संग हरिच्या नामाचा | शुचिर्भूत सदा वाचा |
तुका म्हणे हरिच्या दासा | शुभकाळ अवघ्या दिशा || १५१२ ||

९] आवडीचे दान देतो नारायण | बाहे उभारोनी राहिलासे |
जे जयासी रुचे ते करी समोर | सर्वज्ञ उदार मायबाप |
ठायी पडलिया ते चि लागे खावे | ठायींचे घ्यावे विचारुनि |
बीज पेरुनिया ते चि घ्यावे फळ | डोरलीस केळ कैचे लागे |
तुका म्हणे देवा काही बोल नाही | तुझा तू चि पाही शत्रू सखा || २०८३||

डोरली - कारले

१०] जन मानियेले वरी बाह्यात्कारी | तैसा मी अंतरी नाही जालो |
म्हणउनि पंढरीनाथा वाटतसे चिंता | प्रगट बोलता लाज वाटे |
संता ब्रह्मरुप जाले अवघे जन | ते माझे अवगुण न देखती |
तुका म्हणे मी तो आपणासी ठावा | आहे बरा देवा जैसा तैसा ||१०५२||

११] देवासी अवतार भक्तांसी संसार | दोहींचा विचार एकपणे |
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगे | देव त्यांच्या संगे सुख भोगी |
एका अंगी दोन्ही जाली ही निर्माण | देवभक्तपण स्वामीसेवा |
तुका म्हणे तेथे नाही भिन्न भाव | भक्त तो चि देव देव भक्त ||१०३२||

१२] नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव | मी भक्त तू देव ऐसे करी || १०१६||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंढरीचे बा भूत मोटे | आल्या गेल्या झडपी वाटे ||१||
तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतोनि ||२||
तुका पंढरीसी गेला | पुन्हा जन्मा नाही आला ||३|| गाथा अ. क्र. ४०३१ ||

अन्वय व अर्थासहीत ही अमृतवाणी आमच्यासारख्यांपर्यंत पोचवणार्‍या इथल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
<< कधी आपली सगळी व्यथा विठ्ठलासमोर मांडणारा तर कधी त्याच विठ्ठलाशी कडाकडा भांडणारा...>> सकृतदर्शनी वाटणार्‍या या विसंगतितलं सूत्र शोधण्याचा पू. गुरूदेव रानडे यानी अभ्यासपूर्वक प्रयत्न केला आहे; त्यांच्या पुस्तकात तुकारामांचे अभंग तुकारामांच्या साधनेच्या व मानसिकतेच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या संदर्भात मांडून त्या त्या अवस्थेतलं त्या अभंगांचं औचित्य दाखवलं आहे. [ अर्थात , हें समजण्यासाठीही लागणारी आध्यात्मिक बैठक व प्रगल्भता नसल्याने मला तरी त्याचं पूर्ण आकलन होणं अशक्यच, हेंही नम्रपणे नमूद करतो. ]

शशांक ,
एक काम होते. हा अभंग खरंच तुकारामबुवांचा आहे का ते सांगु शकाल का प्लीज?
तो इतका माईल्ड वाटतोय वाचायला की त्यांचा खरंच आहे की नाही कळत नाहीये.

http://www.youtube.com/watch?v=lZfNSJsgDqU

श्री अनंता मधुसूदना। पद्मनाभा नारायणा। जगव्यापका जनार्दना। आनंदघना अविनाशा॥ सकळ देवाधिदेवा। कृपाळु व्हा जी केशवा। महानंदा महानुभवा। सदाशिवा सहजरूपा॥ चक्रधरा विश्वंभरा। गरूडध्वजा करूणाकरा। सहस्त्रपादा सहस्त्रकरा। क्षिरसागरा शेषशयना॥ कमलनयना कमलापती। कामिनीमोहना मदनमूर्ती। भवतारका धरी त्या क्षिती। वामनमूर्ती त्रिविक्रमा॥ अगा हे सगुणा निर्गुणा। जगजनित्या जगजिवना। वसुदेव देवकीनंदना। बाळ रांगना बाळकृष्णा॥ तुका आला लोटांगणी। मज ठाव द्यावा जी चरणी। हेचि करीतसे विनवणी। भवबंधनी सोडवावे॥

हा अभंग खरंच तुकारामबुवांचा आहे का ते सांगु शकाल का प्लीज? >>>> तुकाराम गाथेमधे ६४६ क्रमांकाचा हा अभंग आहे त्याअर्थी तो तुकोबांचाच असावा. त्यांचे बरेच अभंग माईल्डच आहेत -क्वचित काही काही उग्र स्वरुपाचे आहेत Happy

आभारी आहे शशांक.
आज पूर्ण बाफही वाचला. लिहीत रहा. आता नियमीत वाचेन.

अन्वय व अर्थासहीत ही अमृतवाणी आमच्यासारख्यांपर्यंत पोचवणार्‍या इथल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.>>
+१

पंढरीचा महिमा | देता आणिक उपमा |
ऐसा ठाव नाही कोठे | देव उभाउभी भेटे |
आहेति सकळ | तीर्थे काळे देती फळ |
तुका म्हणे पेठ | भूमिवरि हे वैकुंठ || ११३||

घेऊनिया चक्र गदा | हाचि धंदा करी तो |
भक्त राखे पायापासी | दुर्जनासी संहारी |
अव्यक्त ते आकारले | रुपा आले गुणवंत |
तुका म्हणे पुरवी इच्छा | जया तैसा विठ्ठल || ११५ ||

खुप सुंदर !!
<<खरं तर गाथा वाचताना असं वाटत रहातं - देहूच्या विठ्ठल मंदीरात नाहीतर भामगिरी वर बुवा एकतारी हातात घेऊन एकटेच शांतपणे बसले आहेत - आपणही अतिशय प्रेमाने त्यांच्या पुढ्यात बसावं, त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवावं - आंतरिक प्रेमामुळे बुवाच आपल्याला ओढून त्यांच्या जवळ घेतील, डोक्यावरुन हात फिरवत कुशल विचारतील - अशा या प्रेमगंगेत आपण स्वतःला विसरुन झोकून द्यावं..... तो अभंगाचा अर्थ वगैरे विसरुन त्या महाभागवताचे केवळ प्रेम आणि प्रेमंच अनुभवत रहावं - बस्स - यापरती अजून कसली इच्छा नाही......
.....तेच मुक्तिधाम, तोच चौथा परम पुरुषार्थ, तोच योग, तेच ज्ञान आणि तीच केवळ परम-शांतिमय अवस्था.......>>
अतिशय आतपर्यंत पोचले हे... असं लिहणार्‍या तुम्हांला -----^-----

सुंदर..

तुकाराम हे कधीही न सुटणारे कोडे - पण
एकदा का त्याच्या अभंगांनी वेड लावले की त्यातून
सुटकाच नाही मग.....<<अगदी अगदी..!

श्री तुकारामांचे मराठी चरित्र (pdf) कुठे उपलब्ध आहे का? >>>>>
www.tukaram.com या साईटवर एक चरित्र उपलब्ध आहे, पी डी एफ आहे का बघावे लागेल.
कै. श्री. गोनीदा उर्फ अप्पासाहेब दाण्डेकर यांनी तुकोबांचे अतिशय रसाळ, भावपूर्ण व अभ्यासपूर्ण चरित्र "तुका आकाशाएवढा" या कादंबरीरुपाने वर्णन केले आहे.

अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काही काही अभंगातून तुकोबांनी स्वतःचे चरित्र आपल्याला सांगितले आहे - ते अभंग मी येथे देईनच - ते अभंग सगळ्यात ऑथेंटिक चरित्र म्हणता येईल - कारण बुवांच्या मुखातूनच ते आलेले आहे.

अतिशय आतपर्यंत पोचले हे... असं लिहणार्‍या तुम्हांला -----^----- >>>> पारु - "तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले" असे तुकोबांचे जे यथार्थ वर्णन केले आहे त्या तुकोबांच्या चरणी आपण सगळेच संपूर्ण शरणागत होणे फार गरजेचे आहे.
तुकोबांचे वर्णन करता येईल असे खरे तर शब्ददेखील नाहीत इतक्या उंचीवर बुवा आहेत - त्यांच्या अभंगांचा अतिशय भावभक्तिने व कोणा जाणकाराकडून समजून घेऊन अभ्यास करणे फार महत्वाचे आहे.

.....बुवांच्या विठ्ठल भक्तिचा एक अंश जरी आपल्याला लाभला तरी आपले जीवन धन्य होऊन जाईल...

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज की जय... विठ्ठल विठ्ठल ...

हे पहा किती अलिप्तपणे, त्रयस्थपणे बुवा आपले चरित्र सांगत आहेत -

याति शूद्र वैश्य केला वेवसाव । आदि तो हा देव कूळपूज्य ॥१॥

नयें बोलो परि पाळिले वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संती ॥धृ॥

संवसारे जालो अतिदु़खे दुखी । मायबाप सेखी कर्मलिया ॥२॥

दुष्काळे आटिले द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली।३॥

लज्जा वाटें जीवा त्रासलो या दु:खे । वेवसाय देख तुटी येता ॥४॥

देवाचे देऊळ होते ते भंगले । चित्तासी जे आले करावेसे ॥५॥

आरंभी कीर्तन करी एकादशी । नव्हते अभ्यासी चित्त आधीं ।

काही पाठ केली संताची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥७॥

गाती पुढे त्यांचे धरावे धृपद । भावे चित्त शुद्ध करोनिया ॥८॥

संताचे सेविले तीर्थ पायवणी । लाज नाही मनी येऊ दिली॥९॥

टाकला तो काही केला उपकार । केले हे शरीर कष्टवूनि ॥१०॥

वचन मानिले नाही सहुदांचे । समूळ प्रपंचे वीट आला ॥११॥

सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाही बहुमता ॥१२॥

मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥

यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥१४॥

निषेधाचा कंही पडिला आघात । तेणे मध्यें चित्त दुखविले ॥१५॥

बुडविल्या वह्या बैसलो धरणे । केले नारायणे समाधान ॥१६॥

विस्तारी सागता बहुत प्रकार । होईल उशीर आता पुरे ॥१७॥

आता आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥

भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आले ॥१९॥

तुका म्हणे माझे सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगे ॥२०॥

बुवांचे चरित्र वर्णन करणारा हा अजून एक अभंग -

बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥धृ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥२॥

पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले ॥३॥

माता मेली मजदेखता । तुका म्हणे हरली चिंता ॥४॥

भंबगिरी/ भामगिरी डोंगरावर त्यांना साक्षात्कार झाला असे ते स्वतःच सांगत आहेत -

पंधरा दिवसामाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥१॥

भंबगिरीपाठारी वस्ती जाण केली । वृत्ती थिरावली परब्रम्ही ॥धृ॥

निर्वाण जाणोनि आसन घातले । ध्यान आरंभिले देवाजीचे ॥२॥

सर्प विन्चू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकळिक ॥३॥

दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे ॥४॥

अभंगांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्यावर तेरा दिवस बुवांनी पांडुरंग चरणी धरणे धरले ते वर्णन करणारा हा अभंग -

तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥

पाषाणाची खोळ घेऊनि बैसलासी । काय हृषिकेशी जाले तूज ॥धृ॥

तुजवरी आता प्राण मी तजीन । हत्त्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥

फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥

तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा साडिन तुजवरी ॥४॥

सुप्रसिद्ध संत श्री नामदेव महाराजांनी तुकोबांना स्वप्नामधे येऊन आपले राहिलेले अभंग पूर्ण करावे असे सांगितले -
.
.

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सावे पांडुरंगे येऊनिया ॥१॥
सागितकें काम करावे कवित्व । वाउगे निमित्त बोलू नको ॥धृ ॥
माप टाकी सल धरिला विठ्ठले थापटोनि केले सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सागे शतकोटी । उरले शेवटी लावी तुका॥३॥

द्याल ठाव तरी राहेन संगती । संताचे पंगती पायापाशी ॥१॥
आवडीचा ठाव आलोसे टाकून । आता उदासीन न धरावे ॥धृ॥
सेवतील स्थळ निंच माझी वृत्ती । आधारे विश्रंती पावईन ॥२॥
नामदेवापायी तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥
.
.
तुकोबांना सद्गुरुंचा अनुग्रह कसा प्राप्त झाला तो अभंग -

सद्गुरुरायें कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही ॥१॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥धृ॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥
काही कळहे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा जाली ॥४॥
राघवचैतन्य केशवचैतन्य सागितली खूण माळिकेची ॥५॥
बाबाजी आपले सागितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥६॥
माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥७॥

तुकोबांची प्रसिद्ध आरती ज्या रामेश्वर भट्ट नामक वेदविद्या पारंगत ब्राह्मणाने केली त्यांचे बुवांच्या स्तुतिपर काही अभंग -
असे म्हणतात की तुकोबांची योग्यता न जाणता रामेश्वर भट्टांनी अभंगगाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची आज्ञा केली.
अतिशय निरिच्छ बुवांनी हे स्वहस्ते केले मात्र, तिकडे रामेश्वरांच्या अंगाचा असह्य दाह होऊ लागला. रामेश्वर हे ज्ञानोबांना मानणारे असल्याने त्यांनी माऊलीपाशी साकडे घातले. जेव्हा प्रत्यक्ष माऊलींनीच त्यांना तुकोबांची क्षमा मागा असा संकेत केला तेव्हा केवळ एका अभंगाद्वारे त्यांचा दाह शांत झाला व ते तुकोबांच्याचरणी लागले असे म्हणतात.

भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्यद्भुत चराचरी ।
ऐसिय़ा अनंतामाजी तू अनंत । लीला वेश होत जगत्राता ॥१॥ ॥धृ॥
ब्रह्मानंद तुके तुळे आलातुका । तो हा विश्वसखा क्रीडे जनी ॥ऽ॥
शाखा शिष्ताचार अविरुद्ध क्रिया । तुझी भक्तराया देखियली।
देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥२॥
संत ग्रहमेळि जगधंद्यागिळी । पैल उदयाचळी भानु तुका ।
सत वृंदे तीर्थ गौतमी हरिकथा ।तुकयानर सिंहस्ता भेटों आली ॥३॥
शाती पतिव्रते जाले परि नयन । काम संतर्पण निष्कामता ।
क्ष्मा क्षमापणे प्रसिद्ध प्रथा जगीं । ते तो तुझ्या अंगी मूर्तीमंत ॥४॥
दया दीनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीर्ती तुझी ।
वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्व भूते ॥५॥
अधर्म क्षयव्याधि धर्माशी स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभक्ति ।
ब्रम्ह ऐक्यभावे भक्ति विस्तारली । वाक्यें सपळ केली वेदविहिते ॥६॥
देहबुद्धी जात्या अभिमाने वंचलो । ते मी उपेक्षिलो न पाहिजे ।
न घडों याचे पायी बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥७॥

पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परि सरी न पवती तुकयाची ।
शास्त्र ही पुराणे गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यासी ॥१॥।धृ॥
कर्म अभिमाने वर्ण अभिमाने । नादले ब्राम्हण कलियुगीं ॥ऽ॥
तैसा नव्हे तुका वाणी व्यवसाई । भाव त्याचा पायी विठोबाचॆं ।
अमृताची वाणी वरुषला शुद्ध । करी त्या अशुद्ध ऐसा कोण॥२॥
चहूं वेदांचे हे केले विवरण अर्थ हि गहन करुनिया ।
उत्तम मध्यम कनिष्ट वेगळे। करुनि निराळे ठेविले ते ॥३॥
भक्तिज्ञाने आणि वैराग्यॆं आगळा । ऐसा नाही डोळा देखियेला ।
जप तप यद्न्य लाजविली दाने । हरिनाम कीर्तने करुनिया ॥४॥
मागे कवीश्वर जाले थोर थोर । नेले कलिवर कोणे सागा ।
म्हणे रामेश्वर सकळा पसोनि । गेला तो विमानि बैसोनिया ॥५॥

माझी मज आली रोकडी प्रचित । होऊनि फजित दु:ख पावे ॥१॥ ॥धृ॥
काही द्वेष त्यांचा करिता अंतरी । व्यथा या शरीरी बहुत जाली ॥ऽ॥
ज्ञानेश्वरे मज केला उपकार । स्वप्नीं सविस्तर सागितले ॥२॥
तुका सर्वां श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर । का जे अवतार नामयाचा ॥३॥
त्याची तुज काही घडली रे निंदा । म्हणोनि हे बाधा घडली तुज ॥४॥
आता एक करी सागेन ते तुला । शरण जाई त्याला निश्चयेशी ॥५॥
दर्शने चि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सागितला ॥६॥
तो चि हा विश्वास धरूनि मानसी । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥
म्हणे रामेश्वर त्याच्या समागमॆं । जाले हे आराम देह माझे ॥८॥

इति ||
ॐ राम कृष्ण हरि |
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ....

Pages