श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2013 - 06:15

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....

वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....

कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....

कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...

कधी आपली सगळी व्यथा विठ्ठलासमोर मांडणारा तर कधी त्याच विठ्ठलाशी कडाकडा भांडणारा...

तुकाराम हे कधीही न सुटणारे कोडे - पण एकदा का त्याच्या अभंगांनी वेड लावले की त्यातून सुटकाच नाही मग.....

कधी अभंगाचा एखादा चरण तर कधी पूर्ण अभंगच अंतःकरणाचा असा ठाव घेतो की वाचक केवळ डोळे मिटून स्वस्थ होऊन रहातो तर कधी त्या भावाशी एकरुप होऊ पहातो ......

त्यांच्या अभंगातून प्रकटणार्‍या विविध भावांशी एकरुप होणे हे कोणाला शक्यच होणार नाही असे वाटताना त्यातील निर्हेतुक, सहज विठ्ठलप्रेमाने मात्र आपण पूर्ण लुब्ध होतो हे मात्र निश्चित.....

फाल्गुन वद्य द्वितीया ही त्यांच्या सदेह वैकुंठगमनाची तिथी

त्यांचे मला भावलेले काही अभंग वा त्यातील काही चरण त्यानिमित्ताने इथे द्यावे एवढाच मानस आहे.

समस्त मराठी भाषिकांना बुवांनी जे ऋणी करुन ठेवले आहे ते ऋण मिरवण्यातच खरी धन्यता आहे असे वाटत रहाते......

या अभंगात दररोज भर टाकत राहीन, तसेच ज्या कुणाला असेच भन्नाट अभंग माहित असतील त्यांनी ते प्रतिसादात देत रहावे, ते मूळ धाग्यात समाविष्ट केले जातील ...
(कृपया हे लक्षात घ्यावे की फार लोकप्रिय असलेले अभंग देऊ नयेत, आगळेवेगळे अभंग वाचण्यात, अभ्यासण्यात एक वेगळीच अनुभूति आहे, अवीट, अवर्णनीय आनंद आहे)
(प्रत्येक अभंग / चरणाचे शेवटी जे आकडे आहेत ते तुकाराम गाथेतील संदर्भाचे आहेत - कोणा भाविकाला/ अभ्यासकाला त्यातील अजून काही जाणून घेण्यास त्याने मदत व्हावी)
(www.tukaram.com या वर संपूर्ण गाथा मिळू शकते)

१] पवित्र ते अन्न | हरिचिंतनी भोजन |
येर वेठ्या पोट भरी | चाम मसकाचे परी |
जेऊनि तो धाला | हरिचिंतनी केला काला |
तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले || २८०६ ||

चाम मसक = गोचिड, धाला = तृप्त झाला, येर वेठ्या = कोणी एखादा
हरिचे चिंतन्/स्मरण न करता जेवणारा म्हणजे नुसती पोटाची खळगी भरणारा - म्हणजे बुवांच्या दृष्टीने जणू एखादा क्षुल्लक गोचिडच.
आणि ते पुढे म्हणतात की - तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले ||
सगळे भोग भोगत असताना एक विठ्ठल आठवा - त्याला एक आगळीवेगळी चव येईल - जी बुवांनी स्वतः चाखली होती ज्यामुळे ते स्वतः विठ्ठलरुपच झाले...

२] आशा हे समूळ खणोनी काढावी | तेव्हाची गोसावी व्हावे तेणे || १४३१||

३] क्षणक्षणा सांभाळितो | साक्षी होतो आपुला |
न घडावी पायी तुटी | मन मुठी घातले |
विचारतो वचना आधी | धरुनि शुद्धि ठेविली |
तुका म्हणे मागे भ्यालो | तरी जालो जागृत ||१३७४||

४] चिंतनासी न लगे वेळ | सर्वकाळ करावे || १४४४||

५] ठेवा जाणीव गुंडाळून | येथे भावचि प्रमाण ||१४५३||

६] चित्ती नाही आस | त्याचा पांडुरंग दास
असे भक्तांचिया घरी | काम न सांगता करी |
अनाथाचा बंधु | असे अंगी हा संबंधु |
तुका म्हणे भावे | देवा सत्ता राबवावे ||२०७३|| आस - आसक्ती, इच्छा.

७] जालो निर्भर मानसी | म्हणउनि कळलासी |
तुझे म्हणविती त्यास | भय चिंता नाही आस |
चुकविसी पाश | गर्भवासयातना |
तुझे जाणोनिया वर्म | कंठी धरियेले नाम |
तुका म्हणे तेणे सुखे | विसरलो जन्मदु:खे ||२०९५||

८] अवघा तो शकुन | हृदयी देवाचे चरण |
येथे नसता वियोग | लाभा उणे काय मग |
संग हरिच्या नामाचा | शुचिर्भूत सदा वाचा |
तुका म्हणे हरिच्या दासा | शुभकाळ अवघ्या दिशा || १५१२ ||

९] आवडीचे दान देतो नारायण | बाहे उभारोनी राहिलासे |
जे जयासी रुचे ते करी समोर | सर्वज्ञ उदार मायबाप |
ठायी पडलिया ते चि लागे खावे | ठायींचे घ्यावे विचारुनि |
बीज पेरुनिया ते चि घ्यावे फळ | डोरलीस केळ कैचे लागे |
तुका म्हणे देवा काही बोल नाही | तुझा तू चि पाही शत्रू सखा || २०८३||

डोरली - कारले

१०] जन मानियेले वरी बाह्यात्कारी | तैसा मी अंतरी नाही जालो |
म्हणउनि पंढरीनाथा वाटतसे चिंता | प्रगट बोलता लाज वाटे |
संता ब्रह्मरुप जाले अवघे जन | ते माझे अवगुण न देखती |
तुका म्हणे मी तो आपणासी ठावा | आहे बरा देवा जैसा तैसा ||१०५२||

११] देवासी अवतार भक्तांसी संसार | दोहींचा विचार एकपणे |
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगे | देव त्यांच्या संगे सुख भोगी |
एका अंगी दोन्ही जाली ही निर्माण | देवभक्तपण स्वामीसेवा |
तुका म्हणे तेथे नाही भिन्न भाव | भक्त तो चि देव देव भक्त ||१०३२||

१२] नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव | मी भक्त तू देव ऐसे करी || १०१६||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव घ्या कोणी देव घ्या कोणी | आयिता आला घर पुसोनी |
देव न लगे देव न लगे | साठवणेचे रुंधले जागे |
देव मंदला देव मंदला | भाव बुडाला काय करु |
देव घ्या फुका देव घ्या फुका | न लगे रुका मोल काही |
दुबळा तुका भावेविणे | उधारा देव घेतला रुणे ||१००३||

काय अचाट आणि अफाट लिहितील बुवा कळतच नाही - हेच बघा ना -
कोणाला देव पाहिजे का देव ? तो ही घर बसल्या असे मी विचारतोय तो लोक म्हणतात - नको बाबा देव .... का म्हणून विचारले तर म्हणतात - कुठे ठेवायचा त्याला ?? कारण अंतःकरणात इतक्या गोष्टी भरुन ठेवल्यात की देवाला तिथे ठेवायला जागाच नाही (साठवणेचे रुंधले जागे). सहाजिकच देव या गोष्टीला मंदी आली, भाव पार बुडाला.......
मग बुवा म्हणतात - फुकट देव घ्या, काही त्याचे मोल नको म्हणून मागे लागलो.....
पण लक्षात आले - कोणाला देवाची नड आहे इथे ????
मी तर भावविरहीत- दुबळा कोणी एक - घेतला देव अखेर उधारीने, ऋण काढून.....

मी तर भावविरहीत- दुबळा कोणी एक - घेतला देव अखेर उधारीने >> हे तितकेसे नाही पटले. देव भावानेच मिळतो. भावाशिवाय देव ही कल्पना तुकोबांच्या तोंडी येणे अशक्य आहे.

शशांक, बाकी धागा मस्त चालू आहे.

मी तर भावविरहीत- दुबळा कोणी एक - घेतला देव अखेर उधारीने >> हे तितकेसे नाही पटले. देव भावानेच मिळतो. भावाशिवाय देव ही कल्पना तुकोबांच्या तोंडी येणे अशक्य आहे. >>>>>

बुवांच्या मनात केव्हा काय विचार/भाव चालू होते हे ओळखणे अतिशय कठीणच .... कधी ते स्वतःला अति हीन दीन म्हणवतात तर कधी अगदी - "तुका आकाशाएवढा" म्हणवतात.....

या अभंगात ते स्वतःकडे अतिशय लीनता घेऊन म्हणताहेत - मी तर भावविरहीत - हीन-दीन - पण मला देवाची अत्यंत गरज वाटत आहेच त्यामुळे माझ्याकडे भाव (भाविकता) नसली तरी मी उधार भाव आणून का पण देव घेतलाच......

बाकी - लोकांबाबत जो उपरोध दाखवला आहे बुवांनी - देव न लगे....., देव मंदला.... तो अतिशय बोचणारा, टोचणारा असा आहे ......

शशांकजी:
खालील अभंग मला समजून घेताना काही शंका आल्या.
निरासन होईल ह्या आशेने लिहीत आहे.

सुटायाचा काही पाहातो उपाय
तो हे देखे पाय गोवियले
ऐसिया दु:खाचे सापडलो संदी
हारपली बुध्दि बळ माझे
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे
वोढत ठायींचे आले साचे
विधिनिषेधाचे सापडलो चपे
एके एक लोपे निवडेना
सारावे ते वाढे त्याचियाचि अंगे
तृष्णेचिया संगे दु:खी झालो
तुका म्हणे आता करी सोडवण
सर्वशक्तिहीन झालो देवा

संदी=कोनाकोपरा
चपे=कोनास (चपेट तर नाही ना?) काही प्रतीत चेपे असा शब्द आहे ज्याचा अर्थ दाब असा होतो
क्रियमाण=हातातील काम (क्रीयमाण प्रारब्ध बद्दल मोल्सवर्थ म्हणतो The actions of the present life with reference to merit and demerit, and the consequent pleasure and pain to be experienced in births yet to be).

ही एक अतिशय व्याकुळ करून सोडणारी रचना.
मला पूर्ण समजलेली नाही.
पहिल्या चार आणि शेवटच्या तीन ओळींत अर्थ स्पष्ट आहे.
उरलेल्या ओळींचा अर्थ समजून घ्यायचा थोडाफार प्रयत्न करतो.
काही चुकलेच तर न चुकता सांगावे.
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे ह्याचा अर्थ मला प्रारब्ध हे संचिताचे (भूतकाळाचे) कन्ट्युनुएशन आहे असा वाटतो. भूतकाळ भयानक असेल तो आपली दुष्ट सावली घेऊन प्रारब्धात येणारच, असे म्हणायचे असावे.
साचे चा अर्थ सत्य असा घेतला तर ओळीचा काय अर्थ असावा हे पहायला हवे.
साचे चा साचा असा अर्थही नाकारता येत नाही.
तसेच विधिनिषेधाचे सापडलो चपे चा अर्थ नियमांविरूध्द गेल्यानंतर चेपला गेलो असे असावे का? काही प्रतीत एक एका लोपे निवडेना अशी ओळ आहे. एके एक लोपे निवडेना सारावे ते वाढे त्याचियाचि अंगे चा अर्थ काहीकेल्या लागेना.

समीर चव्हाण

नव्हती ते संत करीता कवित्व | संताचे ते आप्त नव्हती संत |
येथे नाही वेश सरते आडनावे | निवडे घावडाव व्हावा अंगी |
नव्हती ते संत धरिता भोपळा | करीता वाकळा प्रावरण |
नव्हती ते संत करीता कीर्तन | सांगता पुराणे नव्हती संत |
नव्हती ते संत वेदाच्या पठणे | कर्म आचरणे नव्हती संत |
नव्हती संत करीता तप तीर्थाटणे | सेविलिया वन नव्हती संत |
नव्हती संत माळा-मुद्रांच्या भूषणे | भस्म उधळणे नव्हती संत |
तुका म्हणे नाही निरसला देहे | तो अवघे हे सांसारिक |

कसे परखड उद्गार आहेत बुवांचे पहा.......
देहाचा निरास - देहबुद्धि टाकून देऊन ज्याची बुद्धी आत्म्यातच रत झाली आहे तो संत / जो आत्मरुप झाला आहे तो संत .....

कामना अंतरातील सर्व सोडोनी जो स्वये
आत्म्यातचि असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला || -गीताई अ. २ श्लोक ५५||

मी माझे ऐसी आठवण | विसरले जयाचे अंतःकरण | पार्था तो संन्यासी जाण | निरंतर || - माऊली||

देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी | सदा संगती सज्जनाची धरावी | - समर्थ ||

मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी
तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधी || - स्वामी स्वरुपानंद, पावस ||

सुटायाचा काही पाहातो उपाय
तो हे देखे पाय गोवियले
ऐसिया दु:खाचे सापडलो संदी
हारपली बुध्दि बळ माझे
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे
वोढत ठायींचे आले साचे
विधिनिषेधाचे सापडलो चपे
एके एक लोपे निवडेना
सारावे ते वाढे त्याचियाचि अंगे
तृष्णेचिया संगे दु:खी झालो
तुका म्हणे आता करी सोडवण
सर्वशक्तिहीन झालो देवा

समीरजी - तुम्ही लावलेला सर्व अर्थ बरोबरच आहे.
प्रारब्ध, संचित - साधारणतः एकाच अर्थाचे शब्द - नशिब, दैव या अर्थाच्या जवळपासचे.
क्रियमाण - वर्तमान.
दैवाने, नशिबाने, संचिताने मला या स्थितीत (वर्तमानात) ओढून आणलेले आहे. या दु:खात मी असा काही सापडलो आहे की माझी बुद्धीही चालेनाशी झाली आहे.
विधी-निषेधाच्या "चापात" मी असा काही सापडलो आहे की एक एक निवडून काढूनही ते संपता संपत नाहीत, वाढतच आहेत.
हे विधी -निषेध बाजूला सारावे तर तृष्णा / इच्छा इतक्या वाढतात की मी अधिकाधिक दु:खी होतोय.

आता अतिशय व्याकुळ होऊन ते भगवंताला हाक मारताहेत - माझी शक्ति, बुद्धी सर्व संपलेली आहे, तूच आता कृपा कर व मला यातून सोडव.

तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी |
मिळालिया संतसंग | समर्पिता भले अंग |
तीर्थी भाव फळे | येथे अनाड ते वळे |
तुका म्हणे पाप | गेले गेल्या कळे ताप || ११४ ||

बुवांची वचने कशी रोख ठोक आहेत पहा - तीर्थ यात्रेला जाणार्‍याला ते खडसाऊन विचारतात - अरे तिथे जाऊन काय पहाणार - दगड आणि पाणीच ना ?? (साईट सिईंगच ना ते शेवटी.....)
तुला खरंच देव हवा असेल तर संत-सज्जनांचे दर्शन घे, त्यांच्याचरणी समर्पित हो

@पुरंदरे शशांक | 21 March, 2013 - 08:35
देव घ्या फुका देव घ्या फुका | न लगे रुका मोल काही |
दुबळा तुका भावेविणे | उधारा देव घेतला रुणे ||१००३||
>>
देव जर फुकट मिळतो आहे तरीही त्यांना तो ऋण काढून घ्यावा लागला याची संगती लागत नाही.
'दुबळा तुका भावेविण' मध्ये 'भावेविण'चा अर्थ काही वेगळा असावा. इतरांना ते फुकट घ्या म्हणताहेत पण त्यांना मात्र तो फुकट उपलब्ध नाही ते का?
बाकी तुम्ही अर्थासह लिहिताहात त्यासाठी धन्यवाद!
सुंदर अभंग अर्थ आणि विवेचनासह वाचायला मिळताहेत.

देव घ्या कोणी देव घ्या कोणी | आयिता आला घर पुसोनी |
देव न लगे देव न लगे | साठवणेचे रुंधले जागे |
देव मंदला देव मंदला | भाव बुडाला काय करु |
देव घ्या फुका देव घ्या फुका | न लगे रुका मोल काही |
दुबळा तुका भावेविणे | उधारा देव घेतला रुणे ||१००३||

या अभंगात दोन भाग आहेत -
१] देवाची खरीखुरी निकड सर्वसामान्यांनाना नाहीये हे बुवा सांगू इच्छितात. सरळच आहे ना - आपल्याला देव पाहिजे तो "फक्त देवाकरता" हे कारण नसून मुख्यतः संसाराच्या डागडुजीकरता, प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी पाहिजे.
त्यामुळे तुकोबांसारखे संत हे आपल्याला देव द्यायला बसलेले असूनही या अशा देवाला गिर्‍हाईकच नाहीये..... केवढी विचित्र पण सत्य गोष्ट.
२] या अभंगात ते स्वतःकडे अतिशय लीनता घेऊन म्हणताहेत - मी तर भावविरहीत - हीन-दीन - पण मला देवाची अत्यंत गरज वाटत आहेच त्यामुळे माझ्याकडे भाव (भाविकता) नसला तरी मी उधार भाव आणून का होईना पण देव घेतलाच, घेणारच ......

संतांना देवाची आत्यंतिक गरज वाटतीये - ती ही "देवाकरता देव अशीच", संसाराकरता त्यांना देव नकोच आहे.

तुकोबा अतिशय लीनतेने म्हणताहेत - या संतांच्या भाविकतेकडे पाहिले तर मी अक्षरशः भावविरहीतच आहे, भावाच्या बाबत दुबळा आहे, त्यामुळे या संतांकडून तो देव उधार घेतला आहे, ऋण काढून घेतला आहे.

खरा साधक कसा असतो ते इथे नीट लक्षात येते - संतांच्याकडे पहात पहातच त्याची पारमार्थिक वाटचाल होत असते. या संतांच्या अतिदुर्मिळ भाविकतेकडे पहाता त्या साधकाच्या लक्षात येते - मला तर हा देव दुष्प्राप्यच आहे कारण माझ्याकडे एवढा भावच नाहीये -मग तो अतिशय आर्ततेने या भाविकतेसाठी आळवणी करत रहातो...... (जी आळवणी करता करताच तो हळुहळु संतपदाच्या पायर्‍या चढत असतो....)

इति लेखनसीमा||

भक्ति ते कठीण सूळावरील पोळी | निवडे तो बळी विरळा शूर |
जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत | पायाविण भिंत तातडीची |
कामावले तरि पाका ओज घडे | रुचि आणि जोडे श्लाघ्यताही |
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश | नित्य नवा दीस जागृतीचा ||१५३६||

ज्या कोणाला भक्ति ही फार सोप्पी साधना वाटत असेल त्यांच्याकरता बुवा म्हणतात - अहो, भक्ति सोपी नाही हो -ही तर सूळावरील पोळी म्हणजेच अतिशय कठीण, कठीणतम साधना. ही निवडणारा किती विरळा, किती शूर असला पाहिजे म्हणून कौतुकही करतात.
सर्वसाधारण लोक ज्याला भक्ति म्हणातात / जी भक्ति करतात त्याला बुवा - देखीचा पर्वत (दाखवायचा पर्वत) किंवा पायाशिवाय उभारलेली भिंत म्हणतात - खर्‍या भक्तिचे वर्म न जाणता केलेली भक्ति ही फक्त दिखाऊ असते असे बुवांचे म्हणणे.
स्वयंपाक किती लक्षपूर्वक काळजी घेऊन करावा लागतो तेव्हा कुठे त्या पदार्थाला चव येते, जेवणारा संतुष्ट होतो.
ज्याचा मनावर पूर्ण अंकुश असतो तोच भक्त - त्याला प्रत्येक दिवस नवा म्हणजेच जागृतीचा असतो. थोडक्यात जो अतिशय सजगपणे, सावधपणे साधना करतो, ज्याला दरदिवशी, नव्हे नव्हे - दर क्षणाला जागृती जाणवत असते तो भक्त ......

बुवांनी अशी साधना स्वतः केल्यामुळेच ते इतक्या ठामपणे, विश्वासाने व अधिकाराने हे सगळे सांगू शकतात.

भक्ति ते कठीण सूळावरील पोळी | निवडे तो बळी विरळा शूर |
जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत | पायाविण भिंत तातडीची |
कामावले तरि पाका ओज घडे | रुचि आणि जोडे श्लाघ्यताही |
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश | नित्य नवा दीस जागृतीचा ||१५३६||

अप्रतिम अभंग आहे.
तुकारामगाथा म्हणजे अगदी समुद्रासारखी आहे.
कितीही वाचले तरी नवनवीन आणि थक्क करणा-या अनुभूती सापडतात.
रसग्रहणही नेटके आलेय.
धन्यवाद.

सद्यस्थितीलाही लागू होणा-या ह्या कविता:

गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी

ऐसे संत झाले कळी तोंडी तमाखूची नळी

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |
झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |
अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |
पिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||

बुवा म्हणतात - आम्ही खरे तर वैकुंठवासी (पांडुरंगासन्निध रहाणारे) पण एकंदरीत जी स्थिती दिसत आहे - पुराणातील अर्थ लोपून गेलाय, शब्दज्ञानानेच मंडळी फुगलीयेत -साधना न करता परमार्थ नुसता बडबडताहेत, विषयलोभ तसाच आहे - ही स्थिती सुधारण्याकरता आम्ही पृथ्वीतलावर परत आलोय.
ऋषिमुनींनी जे सांगून ठेवलं त्याचे प्रत्यक्ष आचरण करुन, संतांनी जो मार्ग आखून दिला तो परत साफसूफ करुन सर्वसामान्यांना परमार्थ कसा करायचा असतो हे दाखवून देण्यासाठीच आमचा जन्म आहे.
पण इथेही बुवा अतिशय नम्रपणे ऋषिमुनीं - साधुसंत यांचे ऋण मान्य करुन त्यांनी सांगितलेला मार्गच आम्ही आचरत आहोत हे नमूद करतात.
अशी भक्ति करुन दाखवू की काळालाही दरारा वाटेल (देहबुद्धी ही आत्मबुद्धी झाल्यावर संसार, देह, मरण यांचे भयच नाहीसे होते).
असे (तुकोबांसारखे) संत भेटल्यामुळेच आपण अजूनही बुवांच्या नावाचा गजर करण्यात धन्यता मानतो. असे हे संत काळाला जिंकून पलिकडे गेल्यामुळे अजरामर होऊन रहातात.

<<<वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....

कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....

कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...

कधी आपली सगळी व्यथा विठ्ठलासमोर मांडणारा तर कधी त्याच विठ्ठलाशी कडाकडा भांडणारा...

तुकाराम हे कधीही न सुटणारे कोडे - पण एकदा का त्याच्या अभंगांनी वेड लावले की त्यातून सुटकाच नाही मग.....>>>

तुकोबारायां बद्दल अगदी बरोबर म्हणालात शशांक तुम्ही.

भक्तिचे वर्म जयाचिये हाती | तया घरी शांति क्षमा दया |
अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी | न वजती दुरी दवडिता || ४११४ ||

बुवा नुसती भक्ति सांगत नसून भक्तिचे वर्म सांगून राहिलेत - भक्त म्हणवता मग शांति, क्षमा - दया वगैरे गुणांनी संपन्न आहात का - आपले आपणच तपासून बघा .....

मनवाचातीत तुझे हे स्वरुप | म्हणिनिया माप भक्ति केले |
भक्तिचिया मापे मोजितो अनंता | इतराने तत्वता न मोजवे || ८०४ ||

तुका म्हणे घरी वसे नारायण | कृपेची ते खूण साम्या येते || ८१८||

नव्हती माझे बोल | अवघे करितो विठ्ठल || ९४६ ||

उजळले भाग्य आता | अवघी चिंता वारली || ८४८ ||

गाथेतील एक क्षेपक अभंग एक छोटेसे कथानक खुलवतो.
बोलता-बोलता मनाचे व्यंग टिपतो, आणि इच्छा-अपेक्षांना अंत नसतो ही जाणीवही करून देतो.

हीनवर बीजवर दोघी त्या गडणी
अखंड कहाणी संसाराची
माझा पति बहु लहानचि आहे
खेळावया जाये पोरांसवे
माझे दु:ख जरी ऐकशील सई
म्हातारा तो बाई खोकतसे
खेळे सांजवरी बाहेरी तो राहे
वाट मी वो पाहे सेजेवरी
पूर्वपुण्य माझे नाही बाई नीट
बहु होती कष्ट सांगो काई
जवळ मी जाते अंगा अंग लावू
नेदी जवळ येऊ कंटाळतो
पूर्वसुकृताचा हाचि बाई ठेवा
तुका म्हणे देवा काय बोल

हीनवर=पोरवयातला नवरा,
बीजवर=लग्नाचे वय होऊन गेलेला (म्हातारा) नवरा,
गडणी=बायका/मैत्रिणी, सांजवरी= संध्याकाळभर
सुकृत=पुण्यकर्म

दोघी मैत्रिणी, एक अशी की जिचे लग्न एका पोराशी आणि दुसरी अशी की जिचे लग्न म्हाता-याशी झालेय, मन मोकळं करत आहेत. दोघींचा तक्रारीचा सूर आहे जसे काही जिचे-तिचे दु:ख सगळ्यात मोठे.
समाधान मानण्यात असतं हे सरळ-सरळ न सांगता
चिमटा काढत लिहिले आहे की देवाला बोल लावून काय उपयोग, हे तर पूर्व जन्मीच्या पुण्याशी निगडीत आहे.
मात्र खात्रीशीरपणे सांगू शकत नाही की असेच म्हणायचेय. आपले मत द्याल.

मात्र खात्रीशीरपणे सांगू शकत नाही की असेच म्हणायचेय. आपले मत द्याल. >>>> बुवांच्या पुढे माझे मत काय देणार हो ????

पण ही सगळीच मंडळी काहीबाबतीत पूर्वजन्मींचे संचित मानताना दिसतात.
(बहुत सुकृताची जोडी| म्हणुनी विठ्ठली आवडी | - माऊली)

पण हे सगळं एका मर्यादेपर्यंतच मानतात कारण मग प्रयत्नवाद नावालाही रहाणार नाही ना !!

त्यामुळे आता मला काय (सुख व दु:ख) भोगायला लागतंय (पूर्वजन्मींच्या कर्मानुसार) त्यापेक्षा मी "आत्ता" काय केलं पाहिजे यावरच सर्व संतांचा भर दिसतो.

गोंदवलेकर महाराज याबाबत फार प्रॅक्टिकल सांगतात - कोणाशी भांडण झाले वा मित्र भेटला-गप्पा झाल्या - दोन्ही कारणाने आपली जर गाडी चुकली तर काय उपयोग ?
संसार म्हटला की सुख व दु:ख आलेच - त्यातच गुंतून पडलो आणि जर परमात्म्याचे प्रेम (जी संतांना सगळ्यात मुख्य गोष्ट वाटते आहे) लाभले नाही तर काय उपयोग ?

घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती सांडवीन |
ब्रह्मभूत होते काया च कीर्तनी | भाग्य तरी ऋणी देवा ऐसा |
सांडवीन तपोनिधा अभिमान | यज्ञ आणि दान लाजवीन |
भक्तिभाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ | ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा |
धन्य म्हणवीन इही लोकी लोका | भाग्य आम्ही तुका देखियेला || १५८४ ||

बुवांनी स्वतःच्याच या अतिउच्च अवस्थेचं केलेलं वर्णन वाचतानाही अंगावर काटा येतो, कंठ सद्गगदित होतो .....
कुठे पोहोचले होते बुवा - काही पारच लागत नाही - सर्वसामान्यांना नाहीच, सिद्धांनाही नाही ........

केवळ वारंवार नमस्कार करीत रहाणे व चरणी एवढीच प्रार्थना - या भक्ति-वैराग्याचा लेशमात्र तरी आमच्या झोळीत टाका - बस्स बाकी काही काही नको देवा ......

संसार म्हटला की सुख व दु:ख आलेच - त्यातच गुंतून पडलो आणि जर परमात्म्याचे प्रेम (जी संतांना सगळ्यात मुख्य गोष्ट वाटते आहे) लाभले नाही तर काय उपयोग ? >> Happy हे वाइस-अ-वर्सा आहे. गृहस्थाश्रमी असूनही उत्तम परमार्थ साधता येतोच. अगदी कुणावरही अन्याय न करता. श्रद्धावानांना प्रपंच व परमार्थ हे एकमेकांना पूरक ठरवता येतात.

शोधिता चि नये | म्हणोनी वोळगतो पाये |
आता दिसो नये जना | ऐसे करा नारायणा |
परतोनि मन | गेले ठायी ची मुरोन |
विसरला तुका | बोलो चालो जाला मुका ||१५८१||

इथपासून ते १६०४ पर्यंतचे सर्व अभंग हे गाथेमधे "स्वामींनी काय ब्रह्म केली" या शीर्षकाखाली दिलेले आहेत - जे मुळातून वाचणेच योग्य होईल.

बुवांच्या जीवनचरित्रासारखेच बुवांचे "सदेह वैकुंठगमन" हे देखील मोठे आश्चर्यच होउन गेले आहे.

मराठी भाषा कळते याचा विशेष अभिमान केव्हा वाटत असेल तर गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारखे ग्रंथ वाचताना...
"ती अक्षरे नव्हती देखा | ब्रह्मसाम्राज्य दीपिका | अर्जुनालागी चित्कळिका | उजळलिया श्रीकृष्णे || अ. ११ ज्ञानेश्वरी||" - माऊलींच्या या वचनाप्रमाणे संतांच्या वाणीचे सामर्थ्य हे केवळ अद्वितीयच.

संतांनी तर सर्व काही उदार हातांनी वाटून टाकले आहेच -जितकी ज्याची समज, तितके तो घेऊ शकतो.

इति लेखनसीमा||

सर्व संतांना साष्टांग प्रणिपात.....

संतश्रेष्ठ तुकोबामहाराजकी जय ||

|| राम कृष्ण हरि ||

बुवांचे जीवन, त्यांचे अभंग सारं काही अथांग, असीम, अफाट आहे......... ते बुद्धीच्या आकलना पलिकडचं तर आहेच, पण आपल्या अल्प-स्वल्प प्रतिभेच्याही खूप दूर दूर आहे ..........

ज्याला जे भावते ते पहाण्याचा तो प्रयत्न करतो - बुवाही त्यांच्या उदार मनोभूमिकेला अनुसरुन त्या त्या व्यक्तिला ते ते प्रदान करीत असणार....

ज्या कोणाला या धाग्यावर मत मांडावेसे वाटले, बुवांचे अभंग लिहावेसे वाटले, ते अभ्यासावेसे वाटले ते सर्व बुवांवरील प्रेमाचे प्रतिकच ......

माझ्या अल्पमतीप्रमाणे बुवांच्या विविध अभंगांवर मी जे काय लिहिले ते बुवांसकट तुम्ही सर्वांनी सहन केलेत ते बुवांवरील प्रेमाखातरच .....

खरं तर गाथा वाचताना असं वाटत रहातं - देहूच्या विठ्ठल मंदीरात नाहीतर भामगिरी वर बुवा एकतारी हातात घेऊन एकटेच शांतपणे बसले आहेत - आपणही अतिशय प्रेमाने त्यांच्या पुढ्यात बसावं, त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवावं - आंतरिक प्रेमामुळे बुवाच आपल्याला ओढून त्यांच्या जवळ घेतील, डोक्यावरुन हात फिरवत कुशल विचारतील - अशा या प्रेमगंगेत आपण स्वतःला विसरुन झोकून द्यावं..... तो अभंगाचा अर्थ वगैरे विसरुन त्या महाभागवताचे केवळ प्रेम आणि प्रेमंच अनुभवत रहावं - बस्स - यापरती अजून कसली इच्छा नाही......
.....तेच मुक्तिधाम, तोच चौथा परम पुरुषार्थ, तोच योग, तेच ज्ञान आणि तीच केवळ परम-शांतिमय अवस्था.......

पांडुरंग, पांडुरंग.... तुकोबा -माऊली, तुकोबा-माऊली.....

इति लेखनसीमा||.... हरि....

पुरंदरे शशांक तुम्ही तुकाराम महाराज्याच्या अभंगावर लिहलं..... त्यांच्या अभंगाचं सार आमच्या पर्यंत पोहचवलं..... यातुन बरचं काही साध्य केलं..... तुम्ही लिहीत राहा....थांबु नका....

Pages