श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 March, 2013 - 06:15

श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....

एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....

वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....

कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....

कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...

कधी आपली सगळी व्यथा विठ्ठलासमोर मांडणारा तर कधी त्याच विठ्ठलाशी कडाकडा भांडणारा...

तुकाराम हे कधीही न सुटणारे कोडे - पण एकदा का त्याच्या अभंगांनी वेड लावले की त्यातून सुटकाच नाही मग.....

कधी अभंगाचा एखादा चरण तर कधी पूर्ण अभंगच अंतःकरणाचा असा ठाव घेतो की वाचक केवळ डोळे मिटून स्वस्थ होऊन रहातो तर कधी त्या भावाशी एकरुप होऊ पहातो ......

त्यांच्या अभंगातून प्रकटणार्‍या विविध भावांशी एकरुप होणे हे कोणाला शक्यच होणार नाही असे वाटताना त्यातील निर्हेतुक, सहज विठ्ठलप्रेमाने मात्र आपण पूर्ण लुब्ध होतो हे मात्र निश्चित.....

फाल्गुन वद्य द्वितीया ही त्यांच्या सदेह वैकुंठगमनाची तिथी

त्यांचे मला भावलेले काही अभंग वा त्यातील काही चरण त्यानिमित्ताने इथे द्यावे एवढाच मानस आहे.

समस्त मराठी भाषिकांना बुवांनी जे ऋणी करुन ठेवले आहे ते ऋण मिरवण्यातच खरी धन्यता आहे असे वाटत रहाते......

या अभंगात दररोज भर टाकत राहीन, तसेच ज्या कुणाला असेच भन्नाट अभंग माहित असतील त्यांनी ते प्रतिसादात देत रहावे, ते मूळ धाग्यात समाविष्ट केले जातील ...
(कृपया हे लक्षात घ्यावे की फार लोकप्रिय असलेले अभंग देऊ नयेत, आगळेवेगळे अभंग वाचण्यात, अभ्यासण्यात एक वेगळीच अनुभूति आहे, अवीट, अवर्णनीय आनंद आहे)
(प्रत्येक अभंग / चरणाचे शेवटी जे आकडे आहेत ते तुकाराम गाथेतील संदर्भाचे आहेत - कोणा भाविकाला/ अभ्यासकाला त्यातील अजून काही जाणून घेण्यास त्याने मदत व्हावी)
(www.tukaram.com या वर संपूर्ण गाथा मिळू शकते)

१] पवित्र ते अन्न | हरिचिंतनी भोजन |
येर वेठ्या पोट भरी | चाम मसकाचे परी |
जेऊनि तो धाला | हरिचिंतनी केला काला |
तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले || २८०६ ||

चाम मसक = गोचिड, धाला = तृप्त झाला, येर वेठ्या = कोणी एखादा
हरिचे चिंतन्/स्मरण न करता जेवणारा म्हणजे नुसती पोटाची खळगी भरणारा - म्हणजे बुवांच्या दृष्टीने जणू एखादा क्षुल्लक गोचिडच.
आणि ते पुढे म्हणतात की - तुका म्हणे चवी आले | जे का मिश्रित विठ्ठले ||
सगळे भोग भोगत असताना एक विठ्ठल आठवा - त्याला एक आगळीवेगळी चव येईल - जी बुवांनी स्वतः चाखली होती ज्यामुळे ते स्वतः विठ्ठलरुपच झाले...

२] आशा हे समूळ खणोनी काढावी | तेव्हाची गोसावी व्हावे तेणे || १४३१||

३] क्षणक्षणा सांभाळितो | साक्षी होतो आपुला |
न घडावी पायी तुटी | मन मुठी घातले |
विचारतो वचना आधी | धरुनि शुद्धि ठेविली |
तुका म्हणे मागे भ्यालो | तरी जालो जागृत ||१३७४||

४] चिंतनासी न लगे वेळ | सर्वकाळ करावे || १४४४||

५] ठेवा जाणीव गुंडाळून | येथे भावचि प्रमाण ||१४५३||

६] चित्ती नाही आस | त्याचा पांडुरंग दास
असे भक्तांचिया घरी | काम न सांगता करी |
अनाथाचा बंधु | असे अंगी हा संबंधु |
तुका म्हणे भावे | देवा सत्ता राबवावे ||२०७३|| आस - आसक्ती, इच्छा.

७] जालो निर्भर मानसी | म्हणउनि कळलासी |
तुझे म्हणविती त्यास | भय चिंता नाही आस |
चुकविसी पाश | गर्भवासयातना |
तुझे जाणोनिया वर्म | कंठी धरियेले नाम |
तुका म्हणे तेणे सुखे | विसरलो जन्मदु:खे ||२०९५||

८] अवघा तो शकुन | हृदयी देवाचे चरण |
येथे नसता वियोग | लाभा उणे काय मग |
संग हरिच्या नामाचा | शुचिर्भूत सदा वाचा |
तुका म्हणे हरिच्या दासा | शुभकाळ अवघ्या दिशा || १५१२ ||

९] आवडीचे दान देतो नारायण | बाहे उभारोनी राहिलासे |
जे जयासी रुचे ते करी समोर | सर्वज्ञ उदार मायबाप |
ठायी पडलिया ते चि लागे खावे | ठायींचे घ्यावे विचारुनि |
बीज पेरुनिया ते चि घ्यावे फळ | डोरलीस केळ कैचे लागे |
तुका म्हणे देवा काही बोल नाही | तुझा तू चि पाही शत्रू सखा || २०८३||

डोरली - कारले

१०] जन मानियेले वरी बाह्यात्कारी | तैसा मी अंतरी नाही जालो |
म्हणउनि पंढरीनाथा वाटतसे चिंता | प्रगट बोलता लाज वाटे |
संता ब्रह्मरुप जाले अवघे जन | ते माझे अवगुण न देखती |
तुका म्हणे मी तो आपणासी ठावा | आहे बरा देवा जैसा तैसा ||१०५२||

११] देवासी अवतार भक्तांसी संसार | दोहींचा विचार एकपणे |
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगे | देव त्यांच्या संगे सुख भोगी |
एका अंगी दोन्ही जाली ही निर्माण | देवभक्तपण स्वामीसेवा |
तुका म्हणे तेथे नाही भिन्न भाव | भक्त तो चि देव देव भक्त ||१०३२||

१२] नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव | मी भक्त तू देव ऐसे करी || १०१६||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येऊ घातलेल्या तुकाराम बीजेचे औचित्य साधून, एक सुरेख संकल्पना इथे रुजु केल्याबद्दल धन्यवाद. नक्की वाचत रहाणार. Happy

शशांक, अभंग सोपे वाटले तरी सोपे नाहीत. तूम्ही किंवा भारतीने थोडे सविस्तर लिहायला पाहिजे, प्रत्येक अभंगावर.

विषय उत्तम आहे.
पहिल्या अभंगातील 'येर वेठ्या'चा अर्थ देखील तेथेच द्याल का? अभंग छानच आहे.
तुकोबांचे अभंग कळायला सोपे पण अर्थगर्भ असतात.
देवाचे अस्तित्व ओळखण्याची त्यांनी दिलेली खालील युक्ती मी भीमसेनांनी गायलेल्या अभंगातून ऐकली आणि तेव्हांपासून वेगवेगळ्या गायकांनी गायलेले त्यांचे अभंग काळजीपूर्वक ऐकण्याची गोडी लागली.
'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.'
केवळ अप्रतीम!

नमस्कार शशांक काका ,

किती आभार मानु तुमचे ! ह्या लेखामुळे माझ्या डायरीत कित्येक दिवसांपुर्वी मीच साठवलेले काही अभंग पुनः वाचले गेले .

मीची मज व्यालो | पोटा आपुलिया आलो||
आता पुरला नवस | निरसोनी गेली आस ||
जालो बरा बळी | गेलो मरोनी ते काळी ||
दोहीकडे पाहे | तुका आहे तैसा आहे || पांडुरंग ||

म्हणवितो दास | परी मी असे उदास ||
हाचि निष्चय माझा | परी मी निश्चयाहुनि दुजा||
सरते कर्टुत्व माझाने | परी मी त्याहीहुन भिन्न ||
तुका तुकासी तुकला | तुका तुकाहुनी निराळा || पांडुरंग ||

हे २ त्यां काही अभंगां पैकी .... काय ही अवस्था आहे ! अद्वैत चा अनुभव ! एक तर तुकाराम महाराजांनी उपनिषदादी प्रस्थानत्रयींचा अभ्यास केला असला पाहीजे , किंव्वा आचार्यांचा भाष्यांचा ....

किंवा मग ...

"तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ | परम पद बळ वैराग्याचे ||"
अहाहा !!

हा उपक्रम आवडणारे जे तुकोबाप्रेमी आहेत त्या सर्वांना सप्रेम नमस्कार.
यथामती अर्थ देण्याचा प्रयत्न करीत आहेच - पण जर कोणाला अजून जास्त चांगला अर्थ सांगता आला / विवेचन करता आले तर स्वागतच आहे.

गिरीजा -
तुमच्याकडील तुकोबांचे अति उत्कृष्ट अभंग वाचून मन आनंदाने मोहरुन गेलं.
अहो, तुकोबा म्हणजे साक्षात पांडुरंगमयच झालेले .... मग ते - योगी, ज्ञानी, अद्वैतवादी, अव्यभिचारी भक्ति आचरणारे अंतरंग भक्त, धर्मोपदेशक, संन्यासी, कर्मयोगी, स्थितप्रज्ञ, गुणातीत वगैरे सर्वच होते यात नवल ते काय ?
आता तुकोबांचा हा अभंग पहा - यात ते केवळ निर्गुणाची साधना करतानाही दिसतात -

सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथे | वृत्ति निवृत्त झाली जन न दिसे तेथे |
मी माझे हारपले ठायी जेथींच्या तेथे | अदृश्य ते चि झाले काही दृश्य जे होते |
सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे | त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईते |
टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा | कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वोळसा |
न मागे भीक आता हाचि झाला भरवसा | वोळली सत्रावी गा तिने पुरविली इच्छा |
ऊर्ध्वमुखे आळविला सोहं शब्दाचा नाद | अरुप जागविला दाता घेऊनि छंद |
घेऊनि आला दाता निजतत्व निजबोध | स्वरुपी मेळविले नाव ठेविला भेद |

पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते "आई" होते - बुडते हे जन न देखवे डोळा - अशा अतीव करुणेने ज्यांचे अंतःकरण भरुन वहात होते त्यांनी सर्वसामान्यांकरता "भक्तिचाच" जास्त प्रसार केला. पण स्वतः मात्र त्यांनी योग, ज्ञान व कर्म यांचा संपूर्ण अभ्यास केलेला होता, त्या त्या मार्गावर वाटचाल करुन अंतिम शिखर (अद्वैत बोध) त्यांनी गाठलेले होते हे त्यांच्या विविध अभंगावरुनही कळते.

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | इतरांनी व्हावा भार माथा | - असे ते उगाचच कसे बरे म्हणतील ?

मला तुकोबाराय याकरताच आवडतात की हे सगळ्या मार्गाचा अवलंब करुन झाल्यावरही ते मुक्तिवरील भक्तिला प्राधान्य देतात तेव्हा -
जसं गीतेच्या बाराव्या अध्यायात माऊली जे म्हणते -
हे विश्वचि माझे घर | ऐशी मती जयाचे स्थिर | किंबहुना चराचर | आपणचि झाला ||
एवढे म्हणून पुढे माऊली म्हणते - मग याहीवरी पार्था | माझिया भजनी आस्था | तयाते मी माथा | मुगुट करी ||

आत्मबोधाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले सगळे संत कसे एकच सांगतात बघा -
साधू दिसती वेगळाले | परि ते स्वरुपी मिळाले | अवघे मिळोन एकचि झाले | देहातीत वस्तु || - श्री समर्थ

हे असेच वेगवेगळे अभंग अभ्यासणे त्यातील भावाशी, बोधाशी एकरुप होण्याचा प्रयत्न करणे, त्यातील अनिर्वाच्य आनंद घेण्याचा प्रयत्न करणे हाच या धाग्याचा मुख्य हेतू आहे पहा.

३] क्षणक्षणा सांभाळितो | साक्षी होतो आपुला |
न घडावी पायी तुटी | मन मुठी घातले |
विचारतो वचना आधी | धरुनि शुद्धि ठेविली |
तुका म्हणे मागे भ्यालो | तरी जालो जागृत || १३७४ ||

साधक तुकोबा हे अतिशय दक्ष होते - मनाला मुठीत ठेवण्यासाठी, विचारांकडे साक्षित्वाने बघण्यात, पांडुरंगाच्या पायापासून दूर जाऊ नये म्हणून क्षणाक्षणाला स्वतःला सांभाळत ते साधना करत होते - अशा विविध प्रकारे सावध राहूनच ते तुकोबा झाले. (जन्मवरीच्या श्वासाइतुके मोजियले हरिनाम - असे म्हणणार्‍या मीराबाई काय व क्षणक्षणा सांभाळितो | साक्षी होतो आपुला | असे म्हणणारे तुकोबा काय - दोघेही सारखेच...)

आपण काय तो धडा यातूनच घ्यायचा हे कळलं तरी बस्स ....

७] जालो निर्भर मानसी | म्हणउनि कळलासी |
तुझे म्हणविती त्यास | भय चिंता नाही आस |
चुकविसी पाश | गर्भवासयातना |
तुझे जाणोनिया वर्म | कंठी धरियेले नाम |
तुका म्हणे तेणे सुखे | विसरलो जन्मदु:खे ||२०९५||

तुकोबांनी मन पांडुरंगालाच वाहिले आहे - त्यामुळेच तू आकळला आहेस असे ते म्हणतात - याचा पुरावा काय तर अशा भक्ताच्या मनात भय, चिंता, इच्छा या रहातच नाहीत - कारण त्या मनात आता भगवंतच रहातोय ना !!
याची सुरवात नाम घेण्याने झाली - ते साधनही तुकोबा सांगत आहेत - कंठी धरियेले नाम ....

असे सरळ, साधे पण गोड गोड अभंग आहेत तुकोबांचे....

आशा हे समूळ खणोनी काढावी | तेव्हाची गोसावी व्हावे तेणे || १४३१||

ठेवा जाणीव गुंडाळून | येथे भावचि प्रमाण ||१४५३||

सुंदर. धन्यवाद शशांक.
तुकारामाच्या ओव्यांचा अधिकाधिक अभ्यास आणि प्रचार व्हायला हवा.
उत्तम उपक्रम.

शुध्द बिजे पोटीं फळे रसाळ गोमटी.
ह्या ओळी आठवल्या,
आजच्या Radiation च्या जमान्यात ( मोबाईल,टीव्ही,फ्रीज,इ.इ. विविध विद्युत उपकरणांचा सतत असलेला सहवासामुळे च ) सर्वच गर्मी वाढवणारे वातावरण असल्याने आजची तरूण पिढी संयम हा शब्द च विसरत चालली आहे. वाट पहाणे हा प्रकारच आता नष्ट होत आहे. या मुळेच सर्व वाट लागली आहे.
होई गार माथा, वाचता तुकोबाच्या गाथा. असा माझा अनुभव.
म्हणून सर्वानीच तुकोबाच्या गाथा नित्य वाचाव्यात म्हणून हा उपक्रम खरेच बहुमुल्य आहे. सर्वत्र रसाळ गोमटी फळे असणारी फळ झाडे बहरावित हेच जगतगुरू तुकोबाच्या चरणी विनम्र मागणे.

माणसं वर्षानुवर्षं भक्ति करीत असतात पण त्यांना दिव्यत्वाचा स्पर्शदेखील होत नाही कारण त्या भक्तीत 'जिवंतपणा' नसतो, केवळ एक गतानुगतिकता असते. तुकारामांच्या भक्तिमार्गात देवाच्या अस्तित्वाचा भाव अखंड आहे. त्यांच्या हृदयाला प्रेमाचं स्पंदन आहे त्यामुळे ती भक्ति जिवंत आहे, आणि तिला चिंतनातून आलेली नाविन्यपूर्णता आहे.
देवात स्वतःला हरवून बसलेला "भक्त तुकाराम" मोठा रमणीय आहे.

(संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श - या पुस्तकातून साभार, ले. डॉ माधव नगरकर)

काका ,

आपण ह्या लेखनावर रोज एक अभंग प्रतिसाद म्हणुन द्याल का ?

त्यानिमित्ताने आमचेही नित्य नेमाने वाचन होईल !!

आहा... किती सुंदर धागा, शशांक... खरच रोज एका अभांगावर लिहीच इथे.
तुकोबारायांचे देवाशी भांडण किती मधुर आहे.... माझ्या वाचनात आलेला आणि टिपून ठेवलेला एक अभंग -
काय तुझे वेचे मज भेटी देता | वचन बोलता एक दोन ||
काय तुझे रुप घेतो मी चोरोनि | त्या भेणे लपोनी राहिलासी ||
काय तुझे आम्हा करावे वैकुंठ | भेवो नको भेट आता मज ||
तुका म्हणे तुझी न लगे दसोडी | परि आहे आवडी दर्शनाची ||

"भेटलास, दोन शब्दं बोललास... तर काय जातं रे तुझं? तुझं वैकुण्ठ, तुझं वैभव तुला लखलाभ होवो.... अगदी त्यातल्या दसोडीचीही आस नाही... पण तुझ्या दर्शनाची आहे, बाबा"

असं साधं, सरळ... अन म्हणूनच गोमटं आहे. तुकोबा तुमची-माझी बोली बोलतात. त्यांचे अनुभव आपलेच असतात. तुकोबांचे अभंग ही त्यांच्या संतमार्गाची स्ट्रीट डिरेक्टरी आहे Happy
वाचावीच... म्हणजे आपलाही प्रवास सुखे सरतो.

____/\____

पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे | आपुल्याला दैवे पिके भूमि |
बीज ते चि फळ येईल सेवटी | लाभ हानि तुटी ज्याची तया |
दीपाचिया अंगी नाही दुजा भाव | धणी चोर साव सारिखे चि |
काउळे ढोपर ककर तित्तिरा | राजहंसा चारा मुक्ताफळे |
तुका म्हणे येथे आवडी कारण | पिकला नारायण जया तैसा || १९९९ ||

आपली आवड / इच्छा ही किती महत्वाची आहे हे वेगवेगळी उदाहरणे देउन बुवा सांगत आहेत. बी पेरायचे कारल्याचे आणि अपेक्षा करायची द्राक्षाची - हे कधी तरी शक्य होईल का ?
राजहंस होउन मोत्यांचा चारा खायचा का कावळा होउन काहीही घाणेरडे खायचे - बुवा म्हणतात - तुमचे तुम्हीच ठरवा ......

__/\__
शशा॑क दादा,
खुप सु॑दर धागा!
स॑त तुकारामा॑चे अभ॑ग हे सर्वसामान्या॑च्या जिवनाशी निगडित असल्याने वाचकाला ते खुप जवळचे
कि॑बहुना आपले वाटतात.
धागा सुरु केल्याबद्द्ल पुनःश्च धन्यवाद!!

जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे |
बुका लावू नये भाळा | माळ घालू नये गळा |
तटावृषभासी दाणा | तृण मागो नये जाणा |
तुका म्हणे द्रव्य घेती | देती ते ही नरका जाती ||३०७४||

तुकारामबुवा गावोगाव कीर्तने करीत होते हे खरे. पण एक व्रत म्हणून किती बंधने त्यांनी आपल्यावरच घालून घेतली होती ते पहा - कीर्तनाचे पैसे घेणे दूरच पण तिथे जेवणही घेत नसत, एवढेच नव्हे तर पूर्वी घोड्यावरुन, बैलगाडीतून जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण त्या बैलांसाठी वैरण , घोड्यासाठी दाणापाणीही घेणे त्यांना बिल्कुल मान्य नव्हते.
एवढे प्रखर वैराग्य ज्यांच्याठायी होते त्यांच्या मुखातूनच खरोखर पांडुरंग बोलणार - उगा कोणाही ऐरागैर्‍या कीर्तनकाराच्या मुखातून नाही......

तुका म्हणे येथे आवडी कारण | पिकला नारायण जया तैसा || १९९९ ||

>>> सुंदर !!

जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे |

>>> कित्ती खरं आहे हे ...आजकाल तर कीर्तन करणे हा धंदा होवुन बसलाय ...

त्यागे भोग माझ्या येतील अंतरा | मग मी दातारा काय करु || ३१६८||

किती सावध असावे साधकाने ???? बुवा म्हणजे या गोष्टीची अगदी लिमिट आहेत......
एखाद्या गोष्टीचा मी जाणून त्याग केला तर तीच गोष्ट मला सतत आठवत राहील - उदा. - गुलाबजाम समोर होते अगदी, पण मी नाही खाल्ले अजिबात - ही गोष्ट वारंवार आठवली म्हणजे गुलाबजामाचे स्मरणच चालू राहील की ...
आणि दुसरी गोष्ट - "मी" एकही गुलाबजाम खाल्ला नाही - म्हणजे "मी"चा फुलोरा यानिमित्ताने वाढतच चाललाय की तो तर कमी व्हायला पाहिजे ना ?

हे सगळं, सगळं ते पांडुरंगाला निवेदन करुन म्हणताहेत - तू सोडव रे बाबा मला याच्यातून - मला हे काही जमत नाहीये - किती प्रामाणिक, किती विनम्रता....

त्यामुळेच की काय ते कधीतरी म्हणून गेलेत - "तोवरी तोवरी शोभतील गारा | जव नाही हिरा प्रकाशला |
..
तोवरि तोवरि सांगती संताचिया गोष्टी | जंव नाही भेटी तुक्यासवे || २७७४| "....

त्यांच्यासम तेच.......

कोणी एक भुलली नारी | विकिता गोरस म्हणे घ्या हरि |
देखिला डोळा बैसला मनी | तो वदनी उच्चारी |
आपुलियाचा विसर भोळा | गोविंद कळा कौतुके |
तुका म्हणे हासे जन | नाही कान ते ठायी || ४००||

कोणी एक गोपी हरिभजनात एवढी एकरुप झाली की दूध विकताना दूधाऐवजी "हरि" घ्या असे म्हणू लागली. हरिस्मरण किती उत्कट असावे हे बुवा सांगताहेत. हे पाहून लोक ह्सताहेत पण त्या गोपीला त्याची पर्वा नाही - ती हरिभक्तित पूर्ण रंगलीये.....

तुकोबांचा कवीपणा ..
''करितो कवित्व म्हणाल हे कोणी | नव्हे माझी वाणी पदरीची ||
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार | मज विश्वंभर बोलवतो ||
काय मी पामर जाणे अर्थभेद| वदवी गोविंद तेच वदे ||
निमित्त मापासी बैसविलो आहे |मी तो काही नव्हे स्वामीसत्ता ||
तुका म्हणे आहे पाईकचि खरा | वागवतो मुद्रा नामाची हे||''

परखड लिहावे तर असे.

आशाबध्द वक्ता, भय श्रोतयांच्या चित्ता
गातो तेही नाही ठावे, तोंडवाशी काही द्यावे
झाले लोभाचे मांजर, भीक मागे दारोदार
उभयतां लोभी मन, वायां गेले ते भजन
बहिरे मुके एके ठायी, तैसे झाले तया दोन्ही
माप आणि गोणी तुका म्हणे रिती दोन्ही

ह्यातही झाले लोभाचे मांजर, भीक मागे दारोदार
आणि माप आणि गोणी तुका म्हणे रिती दोन्ही
ह्या ओळी तर कमालीची सुंदर आहे.

शब्दांचे महत्व सांगणारा तुकोबांचा हा अंभग....

आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे यत्न करु ||१||
शब्दचि आमुच्या जिवांचे जिवन | शब्द वांटुं धन जनलोका ||२||
तुका म्हणे पाहा शब्दचि देव | शब्देंची गौरव पुजा करु ||३||

हा धागा काढल्याबद्द्ल धन्यवाद. अत्यंत आवडला. तुकाराम हा महासागर आहे. तुकारामांच्या प्रचलित अभंगांपेक्षा अप्रचलितच संख्येने अधिक आहेत. त्यांची भाषा हा एक संशोधनाचाच विषय. कधी अगदी हळूवार आर्जवी होणारी त्यांची भाषा प्रसंगी परखड होते. सामान्यांच्या पातळीवर उतरून तुकाराम अध्यात्म मांडताना दिसतात. बोलीभाषेतले आज अश्लील म्हणता येतील असे अनेक शब्द उपमा, अध्यात्माच्या अंगाने त्यांच्या गाथेत/अभंगात आलेले आहेत. असा एक अभंग स्मरतो;

माझ्या रामा विसरली | म्हणुन गर्दभी झाली |
आता कैचे चोळी लुगडे | सदा ढुंगण उघडे |
आता कैची पुरणपोळी | सदा उकिरडे धुंडाळी |
तुका म्हणे अहो मामी | रामा विसरला तुम्ही |

आपल्या पूर्वकर्माचे फळ म्हणून पुढच्या गाढवीच्या जन्माला आलेल्या जीवाला उद्देशून हा अभंग आहे.

Pages