वालाची पालेभाजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 June, 2013 - 05:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वालाची पालेभाजी
दोन मोठे कांदे चिरुन
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
चवीनुसार मिठ आणि साखर
पाव वाटी तेल
मुठभर ओल खोबर

क्रमवार पाककृती: 

१) ही पालेभाजी सहसा बाजारात मिळत नाही. उन्हाळ्यात जेंव्हा आपण टिकवण्यासाठी वाल घेतो तेंव्हा त्यातील किडके वाल बाजूला काढतो. हेच किडके वाल न टाकता बाजूला ठेऊन आपल्याला हवे तेंव्हा कुंडीत किंवा जमिनीवर पेरायचे. त्याला मोड येऊन दोन पाने मोठी आली की ही भाजी काढायची. भाजी हवी असल्यास चांगले वालही पेरू शकता. साधारण ८-१० दिवसांत भाजी काढण्यासाठी तयार होते. पण शक्यतो तिसरे पान यायच्या आत काढायची नाहीतर पाने जून होतात.

२) हया भाजीची पाने चिरुन घ्या. थोडासा देठाचा कोवळा भाग घेतला तरी चालतो.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडणी द्या. लसुण जरा लालसर होऊ द्या म्हणजे चांगला वास येतो.

४) त्यावर मिरची व कांदा घालून परता.
५) वरून हिंग व हळद घालून कांदा परता.

६)कांदा शिजवायची गरज नसते पालेभाजीला. लगेच चिरलेली भाजी घालून परता.

७) आता भाजीवर झाकण द्या आणि ५ मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्या.

८) भाजी शिजली की त्यावर मिठ, साखर घाला आणि ढवळून वरून खोबरे घाला व परता.

९) पुन्हा एकदा झाकण ठेऊन २-३ मिनीटे ठेवा वाफ येण्यापुरती व गॅस बंद करा.

१०) ही आहे तय्यार वालाची पालेभाजी.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

वरील टोपलीतली सगळी भाजी लागली नाही. त्यातील अर्धीच घेतली मी.

भाजीत हवे असल्यास टोमॅटो घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच टेस्टी दिसतेय भाजी. आमच्याकडे गावाला पूर्वी शेतात वाल पेरायचो पण पालेभाजी करायची पद्धत नव्हती. हीच पाने जून झाली की गायींना घालायचो. पण आता ही रेसेपी वाचून घरातले वाल पेरून भाजी करावीशी वाटतेय.

मस्त. नवीनच भाजी माझ्याकरता. कधी ऐकलेली, पाहिलेली नव्हती. वाल पेरुन मिळवणंही सहज सोप्पं दिसतंय.
पालेभाजीत खोबरंही पहिल्यांदाच ऐकलं.

जागु, तुसि ग्रेट हो.
कधी करता तुम्ही हे सगळ.
पेरण्या , खुडण्या पासून ते रेसिपी इथे टाकण्या पर्यंत.
मला तर हे सगळे करणे तर काही होणार नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा की चव कशी असते ह्या भाजीची?

मस्त भाजी.
मुंबईत नाहीच मिळणार ही. गावाला असते. वर्षभर वाल निवडताना जे वाल फेकलेले असतात ते उगवून येतात.
पहिल्या पावसानंतर ते रुजतात. आमच्याकडे त्याला कूचर म्हणतात. मस्तच लागते ती भाजी.
कोकणात तर अशी भाजी काजूची पण करतात. पण ते लगेच खुडावे लागतात. पाने यायच्या आधीच.

जागू, तुझ्यामुळेच नविन नविन भाज्याची माहिती मिळते. फोटो टाकल्याने तर ती भाजी कशी आहे ते पण माहीत होते. आम्ही मेथीची अशीच खोबरे टाकुन भाजी करतो.

हल्लीच वाल लावलेत...करुन बघते.
अशीच कारल्याच्या पानांची करता येते का? कशी करायची?

बंडोपंत, वावे, अविगा, सायो, ज्यो, दिनेशदा, स्वाती, शिल्पा, विद्या, सुमंगल, शुंपी, गजानन, मृण्मयी, मानुषी धन्यवाद.

मृणाल भाजीची चव खुप छान असते.

अनिष्का आम्ही पण सगळ्या भाजीत खोबर घालतो. Happy

छान रेसपी...

पालेभाजीत खोबरंही पहिल्यांदाच ऐकलं.>>>>>>>आम्ही तर सर्व भाज्यांमधे खोबरे टाकतो...>>++१११११

नुसत्या भाजीसाठी वाल पेरलेत तर भाजीकरता ते मुळापासून न उपटता फक्त पाने खुडली तर उरलेले रोप वाढून त्यापासून शेंगाही मिळतील ना?

खोबरं आमच्याकडेही सगळ्या भाज्यांमध्ये असतं पण पालेभाजीत पहिल्यांदाच बघितलं. असो.>>>> कान्द्यावर परतवलेली पालेभाजी without खोबर मी विचारच करु शकत नाही.

कालच वाल भिजत घातलेत, त्यातले जे चहाडे (हाच शब्द आहे ना?) निघतील त्यान्च्यावर हा प्रयोग करीन.

रेसीपी छाने.

वालाला पानं असतात हे आजच रिअलाईझ झाले (असणारच. पण तरी, अशी पालेभाजी असेल असं कधी डोक्यात आलं नाही!) Proud
मस्तच आहे रेसीपी. पण करून बघणं जमणार नाही. Sad
पालेभाजी खोबरं खरंच इंटरेस्टींग काँबो आहे. कसं लागत असेल? Happy

>>निवडून किडके वाल टाकून न देता पेरावेत<< छान जागू . आम्ही असे वाल ,चवळी आणि मूग मटकी पेरतो आणि दोन पाने आल्यावर दुसऱ्या आणलेल्या पालेभाजीत(पालक ,मुळा सोडून) टाकतो .खूप नसल्याने त्याची स्वतंत्र भाजी होत नाही . जे वाल भिजत नाहित ते चहाडे अथवा गणंग . फणस सोलल्यावर चरे आणि साल जमीनीत पुरावे आणि त्यावर माती ढकलून तीन कारल्याच्या बिया लावाव्यात या वेलांना पुढे भरपूर कारली लागतात .

Pages