वालाची पालेभाजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 June, 2013 - 05:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वालाची पालेभाजी
दोन मोठे कांदे चिरुन
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
चवीनुसार मिठ आणि साखर
पाव वाटी तेल
मुठभर ओल खोबर

क्रमवार पाककृती: 

१) ही पालेभाजी सहसा बाजारात मिळत नाही. उन्हाळ्यात जेंव्हा आपण टिकवण्यासाठी वाल घेतो तेंव्हा त्यातील किडके वाल बाजूला काढतो. हेच किडके वाल न टाकता बाजूला ठेऊन आपल्याला हवे तेंव्हा कुंडीत किंवा जमिनीवर पेरायचे. त्याला मोड येऊन दोन पाने मोठी आली की ही भाजी काढायची. भाजी हवी असल्यास चांगले वालही पेरू शकता. साधारण ८-१० दिवसांत भाजी काढण्यासाठी तयार होते. पण शक्यतो तिसरे पान यायच्या आत काढायची नाहीतर पाने जून होतात.

२) हया भाजीची पाने चिरुन घ्या. थोडासा देठाचा कोवळा भाग घेतला तरी चालतो.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडणी द्या. लसुण जरा लालसर होऊ द्या म्हणजे चांगला वास येतो.

४) त्यावर मिरची व कांदा घालून परता.
५) वरून हिंग व हळद घालून कांदा परता.

६)कांदा शिजवायची गरज नसते पालेभाजीला. लगेच चिरलेली भाजी घालून परता.

७) आता भाजीवर झाकण द्या आणि ५ मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्या.

८) भाजी शिजली की त्यावर मिठ, साखर घाला आणि ढवळून वरून खोबरे घाला व परता.

९) पुन्हा एकदा झाकण ठेऊन २-३ मिनीटे ठेवा वाफ येण्यापुरती व गॅस बंद करा.

१०) ही आहे तय्यार वालाची पालेभाजी.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

वरील टोपलीतली सगळी भाजी लागली नाही. त्यातील अर्धीच घेतली मी.

भाजीत हवे असल्यास टोमॅटो घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!किती छान क्रमवार दिलीत रेस्पी. एकदम आवडली.
फोटोत किती छान दिसतंय सगळं !चवही छान असेल..शंकाच नाही. Happy

व्वा... काय सुंदर दिसतेय भाजी!! Happy
मी पण पहिल्यांदाच पाहिली वालाच्या पानाची भाजी. नक्कीच मस्त लागत असणार.

खरच छान लागते ही भाजी.

बस्के, वर्षू, अंजली, नंदीनी, आर्या धन्यवाद.

एस.आर.डी. टिप्स खुपच आवडल्या. आता मीही मुग, मटकी, चवळीची पालेभाजी करेन.

फोटो मस्त आहेत.
आमच्याकडे ही पानं चिरून आमटीत ढकलतात. भाजी कधी केली/ खाल्ली नाहीये. चार माणसांची भाजी होण्याएवढी पानं घरच्या कुंडीत मिळतील का शंकाच आहे. पण दोन कुंड्यांमधे पेरून बघते वाल.

सगळ्यांना अगदी घरची उगवलेली पालेभाजी मिळू शकते असं कधी वाटलंच नव्हतं. शाळेत असताना करवंटीत वाल पेरले जायचे. अगदी सहज उगवणारे कडधान्य आहे त्यामुळे घरी उगवून भाजी करायला हवी.

जागू, मस्तच! Happy

मस्तच गं जागू, मी पण वाल पेरुन मग ही भाजी करून बघण्याचा विचार करतेय. आणि पालेभाजीत नारळाचा खीस पण आता या पुढे घालून बघेन.

जागूताई, मला हवी ही भाजी. माझी आजी दर वर्षी हा उद्योग करायची.. आम्ही मदत करायचो.. आता ती नाही.. दोन वर्षापूर्वी मी हा उद्योग केला.. नवरा पोटभर हसला.. शेवटी भाजी झालीच नाही Sad कुंडीतल्या भाजीने बाल्कनीची शोभा तेवढी वाढली.

खोबरं आमच्याकडेही सगळ्या भाज्यांमध्ये असतं पण पालेभाजीत पहिल्यांदाच बघितलं

बापरे, आमच्याकडे मालवणी पद्धतीने केलेल्या पालेभाज्या बहुतेक सगळ्या सुक्याच असतात आणि त्यात खोबरे असतेच असते. खोब-याशिवाय पालेभाजी कोणी खाणारच नाही. शेवग्याच्या पाल्याच्या भाजीत तर भाजीइतकेच खोबरे असते Happy

जागु, माझ्याकडचे वाल पेरुन करते आता भाजी. अशीच बाकीच्या कडधान्याचीही करता येईल ना?

जागू धन्य आहेस तु!!काय जबरा माहीती मिळते तुझ्या मुळे.

@ Srd:-फणस सोलल्यावर चरे आणि साल जमीनीत पुरावे आणि त्यावर माती ढकलून तीन कारल्याच्या बिया लावाव्यात या वेलांना पुढे भरपूर कारली लागतात ....हे फक्त कारल्यां साठीच करायचं की बाकी भाज्यांना पण उपयोगी पडू शकत् ?? मी हे आजच करणार आहे.

फणसाचे खत .@सुखदा ८ ,खते दोन तीन प्रकारची आहेत .सर्व वेलवर्गीय भाजा (कारली ,दोडका ,पडवळ , भोपळा ,दुधी वगैरे )यांसाठी असे अगोदर न कुजलेले वनस्पतीजन्य पदार्थ ( भाज्यांची डेखे इ .) उत्तम होय .जसजसे कुजत जातात तसा हळूहळू अन्नपुरवठा वरच्या वेलाला मिळतो आणि कारली वगैरे दळदार भरदार होतात .चार महिन्यांनी भर ओसरल्यावर वेल काढून तोपण पुरावा . तोंडल्याचा वेल मात्र कायमचा असतो त्याच्या बुडाशी फणस टाकून मातीने झाकावे .पालेभाज्या नाजूक असतात आणि त्यांची पाने हवी असतात .त्यांना कमीतकमी तीन महिने कुजलेले खत वापरावे .

>>>खोब-याशिवाय पालेभाजी कोणी खाणारच नाह>>><<

ओल्या खोबर्‍याशिवाय पालेभाजीला हात लावणार नाहीत घरी. Happy
अशी मूगाची पानाची भाजी सुद्धा बनते एकलेय आजीकडून. वालाची दर उन्हाळ्यात खाल्लीय.

जागुताई, एकदम मस्त पाककृती. गावाची आठवण आली गावी पहिला पाऊस झाला की दोन दिवसानी आम्ही शेताच्या बांधावर टोळक्याने जाऊन ही भाजी गोळा करून आणायचो. चविला तर एवढी चांगली असते. मुंबईत ही भाजी कुठेच मिळणार नाही आणि हल्ली गावी जाणे फार कमी झाले आहे त्यामुळे आता राहिल्या फक्त आठवणी.

ह्यावर्षी मला माझ्याच शेताच्या बांधावर ही भाजी भेटली. वेळ देऊन स्वतः भाजी गोळा केली आणि घरी आणली.

Pages