अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १

Submitted by स्वाती२ on 14 June, 2013 - 14:34

जून महिना उजाडला की इथे धामधूम सुरु होते हायस्कूल ग्रॅड्युएशनची. पालक, नातेवाईक, शिक्षक, कोच, मेंटर्स यांनी गजबजलेला परीसर. संडे-बेस्ट मधील मुलं-मुली, काही तर आपापल्या सैन्य शाखेच्या गणवेशातली. विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक हायस्कूल पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते. चार वर्ष केलेल्या मेहनतीचे सार्थक होते. मुलं टोप्या उडवतात आणि एक महत्वाचे पर्व संपते.

१ जूनला माझ्या मुलाचे हायस्कूल ग्रॅड्युएशन झाले. चार, नाही, खरे तर पाच वर्षांचा प्रवास. इथे हायस्कूल करणारी पहिली पिढी. त्यामुळे आमच्यासाठीही हा प्रवास नवीनच होता. काही निर्णय योग्य ठरले, काही चूका झाल्या तर काही वेळा he was just lucky. या प्रवासात पालक म्हणून आम्ही जे शिकलो ते इतर मायबोलीकरांना कदाचित उपयोगी पडेल म्हणून हा लेख.

अमेरीकेतील शिक्षण पद्धतीत हायस्कूलची चार वर्षे खूप महत्वाची असतात. या काळात केलेली तयारी, घेतलेले कोर्सेस, ग्रेड्स, स्कोअर्स, समाजसेवा यावर पुढील शिक्षणाचे दरवाजे उघडणार असतात. तसेच या महागड्या शिक्षणाच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी लागणार्‍या स्कॉलरशिप्स आणि ग्रॅंट्स देखील विद्यार्थ्यांनी या चार वर्षांत शाळेत आणि शळेबाहेर जी काही कामगिरी केली त्यावर अवलंबून असतात. म्हणताना जरी हायस्कूलची चार वर्षे धरली तरी आजकाल बहूतेक शाळांतून मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे काही कोर्सवर्क करता येते त्यामुळे खरे तर मिडलस्कूलपासूनच हा प्रवास सुरु होतो.

मिडलस्कूल : ६वी ते ८वी
५वी पर्यंत वेगवेगळ्या प्राथमिक शाळांत शिकणारी मुले गावातल्या मिडलस्कूलमधे येतात. ६वीचे वर्ष नव्या बदलाशी जमवून घ्यायचे. प्रत्येक विषयासाठी नवीन शिक्षक, लॉकर्स, वर्गातील काही मुले माहितीची तर काही दुसर्‍या, खरेतर प्रतिस्पर्धी शाळेतली. त्यातच ५वी त 'दादा' असलेली मुलं इथे परत लोअर क्लास झालेली असतात. स्कुलबसने जातायेता हे बदललेलं स्टेटस सुरुवातीला चांगलच जाणवतं. पण बहूतेक मुलं महिन्याभरात रुळतात. मुलांना रुळायला कठीण जात असेल तर वेळीच काउंसेलरला भेटावे. तसेच मुलांना काही हेल्थ कंडीशन असेल त्याची हेल्थ फाईल प्रत्येक शिक्षकाच्या नजरेखालून गेली आहे ना याची खात्री करावी. इतरही काही सवलत किंवा सुविधा आवश्यक असेल तर त्याबाबत काउंसेलर आणि शिक्षकांशी बोलावे. शाळा सुरु होताना ओपनहाऊस असते. तेव्हा मुलाच्या होमरुम टिचरना भेटून आपल्या पाल्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. काही कंसर्न असतील तर सांगाव्यात. होमरुम टिचर आपापल्या मुलांची खूप छान काळजी घेतात. या वयात मुलं आपल्या 'वेगळे' असण्याबद्दल खूप संवेदनाशील होतात. अशावेळी आधी बोलणे झाले असेल तर शिक्षक खूप छान पद्धतीने मुलांना सामावून घेतात. इतर मुलांना परीस्थिती समजावून सांगतात.

इथे शाळेत अभ्यासाबरोबरच खेळ आणि इतर कलागुणांनाही महत्व असते. मिडलस्कूलपातळीवरील अभ्यासाच्या ग्रेड्स आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटीज जरी कॉलेज अॅडमिशनसाठी विचारात घेतल्या जाणार नसल्या तरी हायस्कूल मधील यशाचा पाया मिडलस्कूलमधे घातला जातो.

मुलांना पुढे हायस्कूलसाठी खेळायचे असेल तर ही वर्षे महत्वाची. प्राथमिक शाळेत बहुतेक ठिकाणी सगळ्या मुलांना टीमवर घेतात. मिडलस्कूलमधे हे बदलते. कोच मंडळींचे नव्या मुलांवर बारीक लक्ष असते. टीम मध्ये सिलेक्शन झाले नाही निराश न होता सराव चालू ठेवावा. मुलांचा सुधारलेला खेळ, वर्तन बघून बरेचदा पुढील सिझनला कोच ऑफर देतात. सिलेक्शन झाल्यास या संधीचा पुरेपुर फायदा घ्यावा. भरपूर मेहनत करावी. बॉइज क्लब, गर्ल्स इंक चे प्रोगॅम्स असतात. तिथेही खूप शिकायला मिळते. हायस्कूलला वर्सिटी स्पोर्ट्स खेळायचे असतील तर मिडलस्कूलमधे मेहनत आवश्यक.

६वी पासून अभ्यास वाढायला सुरुवात होते. बरेचदा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट्स किंवा प्रोजेक्ट्स असेही होते. रोजच्या रोज अभ्यास आणि प्लॅनर वापरायची सवय लावली तर आयत्या वेळचे मेल्टडाऊन टळतात. मिडलस्कूलमधे टाईम मॅनेजमेंट आणि नियमित अभ्यासाची सवय लागली की हायस्कूल सोपे होते. इथे शाळेतील शिक्षक खूप मदत करतात. मुलांची शाळेत लवकर येण्याची किंवा शाळा सुटल्यावर थांबायची तयारी असेल तर कठीण भाग पुन्हा समजावून सांगतात. त्या त्या आठवड्यात शिकवलेल्या भागापैकी जे काही नीट समजले नसेल त्यासाठी शिक्षकांकडे वेळीच मदत मागावी.
रोजचा ग्रुहपाठ आणि विकेंडला थोडा अभ्यास किंवा प्रोजेक्ट्सची तयारी एवढे या लेवलला पुरेसे असते. या पातळीवर हा अभ्यास मुले आपला आपण करु शकतात. अभ्यासाव्यतिरिक्त रोज कमीतकमी अर्धा तास अवांतर वाचन होणे गरजेचे आहे. हे वाचन शक्यतो ग्रेड लेवलच्या वरचे असावे. यामुळे एकंदरीत भाषेचा अभ्यास सोपा होतो. त्याचबरोबर शक्य झाल्यास विकेंडला मुलांच्या आवडीचे एक-दोन निवडक कार्यक्रम मुलांबरोबर बघायची, त्यावर चर्चा करायची सवय लावावी. यामुळे स्वतंत्र विचार करायची, आपले विचार मांडायची मुलांना सवय लागते आणि आपल्यालाही त्यांच्याशी संवाद करायला संधी मिळते.
बँड किंवा कॉयर यापैकी जे काही निवडले असेल त्याचाही नियमीत सराव हवा. म्युझिकमधे पुढे काही करायचे नसले तरी म्युझिक डिपार्टमेंट मधे लागलेली शिस्त, एकत्र काम करणे, कलेबद्दलची जाणीव वगैरे गोष्टी पुढे कायम साथ देतात.
बर्‍याच शाळांतून आजकाल मिडलस्कूलमधेच हायस्कूलचे गणित विषयाचे कोर्स घेता येतात. मात्र त्यासाठी ६वीत गणिताची चांगली तयारी हवी. तयारी चांगली असेल तर गणिताचे शिक्षक वरच्या वर्गाच्या कोर्ससाठी निवड करतात. निवड झाल्यास रोजचा ग्रूहपाठ आणि विकेंडला कन्सेप्ट क्लिअर आहेत ना हे बघण्यासाठी थोडा सराव सोडल्यास फार काही करावे लागत नाही. काही शाळा ८वीसाठी हायस्कूल बायोलॉजी घेण्याचा पर्याय देतात. बरेचदा कोर्सची अॅडमिशन टिचर रेकमेंडेशनवर असते. मिडलस्कूलला हायस्कूल लेवलचे कोर्स घेणार असल्यास अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तसेच या ग्रेड हायस्कुल ट्रान्सक्रिप्टवर कायम होतात. त्यामुळे कोर्ससाठी निवड झाल्यास मुलांशी चर्चा करुन, एकंदरीत कोर्सवर्क आणि वाढीव कष्टाची मुलांना कल्पना देऊन अॅडमिशनचे ठरवावे. माझ्या मुलाला जेव्हा हायस्कूल कोर्सेस ऑफर केले गेले तेव्हा डिपार्टमेंट हेडशी बोलून कोर्ससाठी काय अपेक्षित आहे ते समजून घेतले. मुलाला एकंदरीत काय अभ्यास करावा लागेल त्याची कल्पना यावी म्हणून क्रमिक पुस्तके शाळेकडून विकेंड्साठी मागून घेतली. त्याच्या इतर अॅक्टिविटीज आणि वाढीव अभ्यास यासाठीच्या वेळाचा ताळमेळ जुळतोय ना ते पाहिले. माझ्या मुलाने ८वीत अल्जिब्रा -१ आणि बायलॉजी ऑनर्स असे दोन हायस्कूल कोर्सेस घेतले. अल्जिब्रा - १ मुळे हायस्कूलला AP Calculus घेता आले तर बायोलॉजी ऑनर्स मुळे आवडत्या विषयांसाठी हायस्कूल स्केड्युलमधे जागा झाली. मिडलस्कूलला हायस्कूलचे कोर्सेस घेण्याचा फायदा म्हणजे हायस्कूलमधे वेगवेगळे AP कोर्सेस घेणे शक्य होते. हायस्कूलमधे कुठले AP कोर्सेस उपलब्ध आहेत ते पाहून शिक्षक आणि काउंसेलरच्या मदतीने एकंदरीत मार्ग आखावा. फंडिंग उपलब्ध असेल तर मिडलस्कूलमधे फॉरीन लँग्वेजचा पर्यायही उपलब्ध होतो. तसे असेल तर त्याचा जरूर लाभ घ्यावा. मिडलस्कुलमधे हायस्कूलचे कोर्सेस उपलब्ध नसतील तर काळजी करु नये. कॉलेज अॅडमिशन ऑफिस विद्यार्थ्याच्या करीयर ट्रॅकनुसार हायस्कूलमधे जे काही सगळ्यात वरच्या लेवलचे कोर्सेस उपलब्ध आहेत ते विद्यार्थ्याने चांगल्या ग्रेड्सह पूर्ण केलेत ना एवढेच पहाते.

मिडलस्कूलमधे शाळेच्या वेगवेगळ्या क्लब्जमधून एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिविटीज मधे भाग घेता येतो. . यामुळे आपल्या वर्गाव्यतिरिक्त इतर वर्गातील मुलांशी ओळखी होतात. समविचारी मित्र-मैत्रीणी भेटतात. क्लब्ज व्यतिरिक्त शाळेच्या अ‍ॅथलेटिक्स डिपार्टमेंटमधे वेगवेगवेगळ्या संघांसाठी मॅनेजर होण्याची संधी उपलब्ध असते. काम करावे लागते पण त्यातूनच नेतृत्व करायची, वेळेचे नियोजन करायची सवय लागते. शाळेव्यतिरीक्त 4-H तर्फेही विविध संधी उपलब्ध असतात. 4-H हे खेड्यातील शेतीवाल्यामुलांसाठी आहे असा एक गैरसमज असतो. अर्बन सेटिंग मधील मुलांनाही 4-H मधे बरेच काही शिकता येते. मुलामुलींसाठी केक डेकोरेशन पासून रोबोटिक्स पर्यंत विविध उपक्रम यात असतात. गावात समाजसेवेच्याही अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला काय करायला आवडते हे समजून घ्यायला मिडलस्कूलचा काळ योग्य. तेव्हा उपलब्ध असलेल्या संधी अजमावून पहाव्यात. निरनिराळे अनुभव घेऊन आपल्याला काय आवडते ते पहावे आणि त्यानुसार हायस्कूलला कुठल्या १-२ अॅक्टिव्हिटी करायच्या ते ठरवावे.

८वी च्या शेवटच्या ग्रेडिंग पिरिएडच्या सुरुवातीला हायस्कूलचे स्केड्युल आखून ९वी (फ्रेशमन इअर) साठी कोर्सेस ठरवावे लागतात. त्यासाठी ८वीच्या दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला हायस्कुलचे कोर्सबुक डोळ्याखालून घालावे. हायस्कूलच्या वेबसाईटवर हे उपलब्ध असते. नसल्यास हायस्कूल गायडन्स ऑफिसाकडे विचारणा करावी. पुढील ४ वर्षांचा मार्ग आखताना स्केड्युल कंफ्लिक्ट, कोर्स रद्द होणे, मुलांना घेतलेला कोर्स न आवडणे वगैरे शक्यता विचारात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करून ठेवावा. हायस्कूलमधे बरेचदा शाळा सुरु व्हायच्या ८-१० दिवस आधी स्केड्युल कंन्फ्लिक्टचे घोळ लक्षात येतात. काही वेळा बजेट कट्स मुळे निवडलेला कोर्स रद्द झालेला असतो. अशावेळी आधी विचार केला नसेल तर आयत्यावेळी गडबड उडते. माझ्या मुलाच्या बाबतीत दोनदा अशी गडबड झाली. एकदा कोर्स रद्द म्हणून आयत्यावेळी दुसरा पर्याय शोधावा लागला तर एकदा स्केड्युल कंफ्लिक्ट म्हणून बिझिनेस एलेक्टिवच्या जागी अजून एक फॉरीन लँग्वेज घ्यावी लागल्याने अचानक वर्कलोड वाढले. तेव्हा उपलब्ध पर्याय आधीच विचारात घ्यावेत.

इथे वयाची १४ वर्षे पूर्ण झाली की मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शाळा सांभाळून पार्टटाईम नोकरी करु शकतात. शक्य असेल तर किमान सुट्टीत तरी नोकरी करावी. बहुतेक जणांसाठी मिडलस्कूल पूर्ण केल्यावर घेतलेला समर जॉब हा पहिला वहिला जॉब असतो. जॉब शोधण्यासाठी बरेचदा शाळेतील शिक्षकांची मदत मिळते. शाळेतील सिनियर फ्रेंड्स, समाजसेवा आणि इतर एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिव्हिटी निमित्ताने ओळखीची झालेली मोठी माणसे वगैरे मंडळी देखील जॉब मिळवण्यासाठी मदत करतात. माझ्या मुलाला आत्ता पर्यंतचे सगळे जॉब शिक्षक आणि ब्युरो डायरेक्टर्सनी कामाच्या संधींबद्दल सुचना दिल्यामुळे मिळाले. जानेवारीपासून काम शोधायला सुरुवात केली तर सुट्टी सुरु होताना हातात काम असेल. नोकरी व्यतिरिक्त लॉन केअर, स्नो काढणे, बेबी सिटिंग वगैरे करुनही मुले अर्थार्जन करु शकतात. इथे हॉस्पिटल्समधे बेबीसिटिंगचा कोर्स असतो. तो केल्यास बेबीसिटिंगची कामे मिळणे सोपे जाते.

मिडलस्कूलचा काळ छान एंजॉय करावा. मिडलस्कूलच्या एखाद्या विषयात ग्रेड कमी मिळाली म्ह्णून निराश होऊ नये. कुठे कमी पडत आहोत ते शोधून सुधारण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी सजग रहावे. पण उगाच स्ट्रेस घेऊ नये. मुलांचे 'मोठे' होणे एंजॉय करावे.

टीप : लेखातील माहिती माझ्या माफक अनुभवावर आधारीत आहे. इतर मायबोलीकरांनी त्यात आपापल्या अनुभवानुसार जरूर भर घालावी ही विनंती.

AP Courses
AP courses कॉलेज लेवलचे कोर्सेस असतात. हायस्कूल मधे हे कोर्सेस घेता येतात. परीक्षा कॉलेजबोर्ड (हो. तेच ते सॅट वाले) घेते. परीक्षेत स्कोर चांगला आला तर कॉलेज क्रेडिट मिळू शकते. या कॉलेज क्रेडिटचे प्रत्येक युनिवर्सिटीचे स्वतःचे असे नियम आहेत. त्याबाबतची माहिती युनिवर्सिटी देते. बर्‍याचदा AP course हा dual credit असतो. अशावेळी हायस्कूलचे तुमच्या स्टेटमधील पब्लिक युनिवर्सिटीशी कॉन्ट्रॅक्ट असते. कोर्सचे फ्रेमवर्क हे एकाचवेळी AP आणि युनिवर्सिटीचा संबंधीत कोर्स यानुसार असते. विद्यार्थी AP/university credit/dual यापैकी हवा तो पर्याय निवडू शकतात. यातील युनि. क्रेडीट स्टेट मधील बहुतेक पब्लिक युनिवर्सिटी घेतात. स्टेट्मधील प्रायवेट युनिवर्सिटीच्या बाबतीत तुमच्या स्टेटचे लॉज कसे आहेत त्याप्रमणे क्रेडिट ट्रान्सफर होते किंवा नाही. बाहेरच्या स्टेट मधे बहूतेक वेळा क्रेडीट ट्रान्सफर होत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिटेल्ड लेख खरच छान आहे. मिडल स्कूल आता वर्षभराच्या अंतरावर आहे. हा खरतर १ लेख न होता लेखमाला हवी होती.
इथेच माबोवर शिक्षणासाठीचे आर्थिक नियोजन असा पण लेख आहे ना तुमचाच की आणखी कोणाचा.. तो लेख, मिडल स्कूल वर फोकस असणारा लेख, हायस्कूल वर फोकस असणारा लेख, कोणत्या एक्स्ट्रा करीक्युलर अ‍ॅक्टिविटीज घ्याव्यात आणी त्या चॉइसचा फायदा/तोटा, मुलांनी ड्रायव्हिंग शिकून घेण्याची फेज, डेटिंग, हायस्कूल मधून बाहेर पडल्यावर लोकल कॉलेज की बाहेरगावी जाणं हा निर्णय, आणि शेवटी एम्टी नेस्टर्स नी बदलाशी जुळवून घेणे ही एक मस्त लेखमाला होइल असं मनात आलं.

आवांतरः एका मैत्रिणीची मुलगी ६वी जाणार्‍या धाकट्या बहिणीला सांगत होती ते ऐकून मनापासून हसू आलं होतं. मी म्हणे, "middle school is hard. Girls are stupid, boys are immature, you will lose a lot of friends" Proud

शीर्षकातला "- १" आकडा आत्ता लक्षात आला. म्हणजे ही लेखमालाच आहेत तर, मस्त मस्त.

स्वाती२: सर्वप्रथम ही लेखमाला सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या लेकाचे न तुम्हा उभयतांचे हार्दिक अभिनंदन.

अनेक प्रशनांवर लेकाकडून " तू इथल्या हाय स्कूल मध्ये गेली नाहीयस...तूला काय कळात नाही " अशी प्रतिक्रि या असते. या लेखा ची मदत होईल .

हे माझे काही प्रश्नः

१. मुलांना " motivate" कसे करावे/ करत राहावे.....
२. एकाक्षरी उत्तर मिळत असली तरी बोलणं कसं सुरु ठेवावं
३. हाय स्कूल मधले व्हिलन्स (ड्रग, स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे ) पासून आपल्या कोकराचा बचाव कसा करावा.

शक्य असेल तर किमान सुट्टीत तरी नोकरी करावी. >>> +१००
एका चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये साधे lab assistant साठी मी इंटरव्ह्यू घेतले (कोलेजचे पहिले-चौथे वर्ष यातील मुले). जवळ जवळ २५ अर्ज आले. त्यातून आम्ही ८ मुलांची निवड केली. त्यात २ भारतीय होते. त्यांचे जी.पी.ए. इतरांपेक्षा सरस होते. पण मुलाखतीच्या वेळी - भारतीय मुलांचे अनुभव माझे आई-वडील डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत इ इ त्यामुळे मी इथे-तिथे व्होलेन्तीयर करतो अशा आशयाचे होते. प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव शून्य होता आणि 'मला गरज नव्हती' असा काहीसा अविर्भाव होता. गुण चांगले असले कि सगळ साधते असा भ्रम. वास्तवाशी जवळीक नसल्याने (माझी खूप इच्छा असूनही) त्यांना घेतले गेले नाही Sad

अनेक प्रशनांवर लेकाकडून " तू इथल्या हाय स्कूल मध्ये गेली नाहीयस...तूला काय कळात नाही " अशी प्रतिक्रि या असते. >>> Happy बिनु, इंग्लिश विन्ग्लीश बघायची वेळ आली का?? हायस्कूल मध्ये गेली नाही (इथे तिथे कुठेही) तरी टीनेज मधून गेलीयेस कि. तोच महत्त्वाचा आणि 'त्रास्न्फेरबल कॉमन एक्सपीरीयंस' आहे आणि म्हणून तुला महत्त्वाचे प्रश्न विचारतीये असा ठासून सांग Happy

स्वाती, लेखमाला सुरु केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या अनुभवांचा खूप उपयोग होईल पुढे जाऊन.
आत्ताशी कुठे मुलगी १ली त आहे त्यामुळे तु सांगितलेले सगळेच कळते आहे असे नाही पण लेक मोठी होत जाईल तसे कळू लागेल.
मुलांच्या बाबतीतल्या महत्वाच्या प्रत्येक जडणघडणीवर स्वतंत्र लेख लिही.

स्वाती२, छान लिहिलंय. अगदि बारकाईने वाचलं, चुका शोधण्यासाठी; नाहि सापडल्या. Happy अभिनंदन!

आम्हि या दिव्यातुन गेलो/जात आहोत...

अभ्यासाव्यतिरिक्त, मुलांना होम कमिंग गेम, प्रॉम नाईट, डान्स नाईट, इंटर्नॅशनल टुर इत्यादि इवेंट्सना जरुर पाठवा, मोडता घालु नका. हायस्कुल इयर्स डोंट कम बॅक...

छान !उसगाव =USगाव ,कामगिरी =assignment आवडले .मुलांना आणि पालकांना काय दिव्य करावे लागते ते सविस्तर लिहिलं आहे .

छान लेख. प्रत्यक्ष काही संबंध नसला तरी माझा भाचा तिकडे हायस्कूलला गेला आहे नुकताच, तो पुढच्या महिन्यात सुट्टीकरता रहायला येत आहे. त्याच्याशी संवाद साधायला या लेखाचा खूपच उपयोग होईल.

बाकी मुलींसोबत लायब्ररीतून आणलेली स्वीट व्हॅली हाय स्कूल सिरीजमधली पुस्तकं वाचलेली असल्यानेही लेख जवळचा वाटला Happy

आवडलं.. माझं बाळ आता कुठे एलिमेन्टरी मधे आहे. इतक्या लहान मुलांना काय अभ्यासाची जबरदस्ती करायची म्हणुन मी तिला खेळु देते भरपुर. कितपत अभ्यास करायला लावावा ? एलिमेन्टरीबद्दल अजुन काय माहीती देता येईल तुम्हाला?

धन्यवाद मंडळी.

rakheesiji,
AP courses बद्दल माहिती लेखाच्या शेवटी अ‍ॅड केलेय.

बिनू,
मोटिवेट करण्याबद्दल -
आमच्या स्कुल डिस्ट्रीक्ट मधे साधारण २७% विद्यार्थ्री हे फ्री/रिड्युस लंच प्रोग्रॅममधे आहेत. इथल्या इकॉनॉमीची मुलाला चांगली जाण आहे. शिवाय 'सेवा' हा त्याच्या आणि त्याच्या फ्रेंड्सच्या फेथचा महत्वाचा घटक आहे. 'भरपूर शिका, मोठे व्हा आणि आपल्या गावासाठी काहीतरी चांगले करा.' हे ऐकत ही मुलं मोठी झाली. आजूबाजूच्या मोठ्या माणसांनी दाखवलेला विश्वास आणि व्यक्त केलेल्या अपेक्षा हेच मोटीवेशन. एक्स्ट्रा करीक्युलर आणि समाजसेवेच्या निमित्ताने खूप छान रोल मॉडेल्स माझ्या मुलासमोर होती. त्यामुळे आम्हाला फारसे काही करावे लागले नाही.

>>एकाक्षरी उत्तर मिळत असली तरी बोलणं कसं सुरु ठेवावं>>
प्रश्न शक्यतो अशा पद्धतीने विचरायचा की उत्तर विस्ताराने द्यावे लागेल. मुलांच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारताना मधेच काही विचारले तर मुलं नीट उत्तरं देतात.

>>हाय स्कूल मधले व्हिलन्स (ड्रग, स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे ) पासून आपल्या कोकराचा बचाव कसा करावा.>>
आमच्या इथे लोकल पोलिस एलिमेंटरी स्कूल पासून D.A.R.E. program चालवतात. त्यामुळे याबाबत संवाद सतत होताच. जोडीला SADD चा हायस्कूल चॅप्टर, आरोग्याविषयी माहिती आणि इथले कायदे. आपण पालक म्हणून माहिती देऊ शकतो. थोडेफार सजग राहू शकतो. पण शेवटी कशा प्रकारचे आयुष्य निवडायचे हा निर्णय मुलांनीच घ्यायचा. बरेचदा मित्रांना लागलेली ठेच बघूनही मुलं शहाणी होतात. हायस्कुल पासहोईपर्यंत मुलाला क्लास सी, डी, अंडर ३० वगैरे सगळे ऐकून माहित झाले होते. आज त्या अमक्याची कोर्टात तारीख आहे, तमक्याच्या आईकडे केस आलेय वगैरे बातम्या तोच आम्हाला द्यायचा. Happy

शिल्पा,
एलिमेंटरी स्कूलसाठी रोजचा गृहपाठ पुरेसा आहे. आमच्या इथे १ली साठी १० मिनिटे आणि पुढील वर्गांसाठी १०-१० मिनिटांची वाढ असे होते. यात प्रोजेक्ट्स साठीचा वेळ धरत नाहित. बाकी ग्रेडलेवलचे अवांतर वाचन, खेळ, आर्ट-क्राफ्ट वगैरे आवडीप्रमाणे . रोज १५-२० मिनीटे ग्रेडलेवल वरचे वाचन आई-बाबांनी स्टोरीटाईम म्हणून करायचे.

धन्यवाद स्वाती!!!
लेख अतिशय माहितीपूर्ण आहे.
माझी मुलगी पण एलिमेन्टरी (२ री) मधे जाईल.
इतक्या लहान मुलांना काय अभ्यासाची जबरदस्ती करायची म्हणुन मी तिला खेळु देते भरपुर. कितपत अभ्यास करायला लावावा ? एलिमेन्टरीबद्दल अजुन काय माहीती देता येईल तुम्हाला? >>> हि माहिती मला पण वाचयला नक्की आवडेल. पुढल्या भागाची प्रतिक्षा :).

स्वाती, छान माहिती दिली आहे.
AP courses चे काही फायदे-
१. हे कोर्सेस हायर लेव्हलचे असल्यामुळे़ कॉलेज अ‍ॅडमिशनच्या अ‍ॅप्लिकेशनला 'वजन' येतं.
२. कुठल्याही डिग्रीला कॉलेजमधे U.S.History, U.S. Govt. हे करायलाच लागतात. मग ते हायस्कूलमधेच केले की फक्त College Board ला परिक्षेची फी द्यावी लागते, तेच क्लास कॉलेजमध्ये करायला महागडी फी भरावी लागते. त्यामुळे बरीचशी मुलं निदान हे काही ए पी कोर्सेस तरी नक्की करतात. काही जणांना आपण पुढे काय करणार आहोत हे माहीत असतं, मग ते त्या विषयाचे ए पी कोर्सेस घेतात.
३. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे हायस्कूलमधे हे कोर्सेस करून टाकले कि कॉलेजमधे त्यांना अजून पुढचे क्लासेस घेता येतात आणि डिग्री लवकर पुरी करता येते. खूप मुलं तीन्/साडेतीन वर्षात डिग्री पूर्ण करतात.
माझ्या मुलाने ३३ ए पी क्रेडीट्स(कॉलेजच्या एका वर्षाईतकी) ट्रान्स्फर केली होती. कॉलेजचे क्लास schedule करताना आम्ही मॅथ डिपार्ट्मेंटच्या डीनला भेटायला गेलो होतो, तेव्हा ती त्याला म्हणाली, "तुझी तीन वर्षात डिग्री पूर्ण होईल, पण मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना सांगते कि ही कॉलेजची वर्षं तुमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर वर्षं असतात, नंतर तुम्हाला rat race मधे धावायचं आहेच; तर ही वर्षं अशी घाईघाईत संपवू नका." माझ्या मुलाने मग चार वर्षात दोन मेजर्स केली आणि त्याला आवडतं म्हणून फिलॉसॉफीचे काही क्लासेस घेतले आणि एक क्रिकेटचा पण घेतला.

Pages