ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते..

Submitted by तुमचा अभिषेक on 5 June, 2013 - 12:04

२९ मे २०१३

आज ऑफिसमधून घरी आलो, बॅग फेकली, कपडे भिरकावले, बाथरूममध्ये जाऊन झटपट शॉवर घेतला, तोपर्यंत माझा चहा रेडी होता. बस तो हातात घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर म्हणजे हॉलमधील भल्यामोठ्या खिडकीसमोर आरामखुर्ची टाकून बसलो, पाय पुढे पसरवून त्या खिडकीच्या कठड्यावर टेकवले अन लांबवर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेल्या मुंबईकडे पहात, जिच्यासमोर एअर कंडीशन सुद्धा झक मारेल अश्या दहाव्या मजल्यावरील आमच्या खिडकीतून आत शिरणार्‍या वार्‍याच्या थंडगार झुळकीचा आनंद घेत हातातल्या कॉफी मगातील गरमागरम चहाचे घोट मारत.... बस्स ती पंधरा-वीस मिनिटे.. बायकोही खिडकीला रेलून उभी, सोबतीला, तिच्या बरोबर मारल्या जाणार्‍या इकडच्या तिकडच्या गप्पा अन हलकेफुलके विषय.. स्साला सुख म्हणजे आणखी काय असते.

.
.
.

३१ मे २०१३

काल महिन्याभराने गालावरचे केस साफ केले आणि माणसात आलो. आरशात स्वतःचे रुपडे पाहिले अन तेव्हाच समजले, आजचा दिवस खासच जाणार. बायकोला मी कसा दिसतो हे विचारणे आणि तिने छान दिसतोयस हे सांगणे, रोजचेच आहे. खरी मजा आहे तिने स्वताहून सांगण्यात. आज नेमकं तेच झाले. नेहमी मी तिच्यामागे माझा एखादा फोटो काढ म्हणून लागत असतो पण आज सकाळी तिनेच आणखी एक आणखी एक करत उशीर करवला. तिच्या नवीन घेतलेल्या मोबाईलचा हाई मेगापिक्सेल कॅमेरा हे केवळ एक निमित्त होते. ऑफिसमध्येही कौतुकाच्या नजरा झेलतच दिवस गेला. एक दोन नजरा लाजल्याही. त्या तेवढ्या वगळता घरी गेल्यावर बायकोला सारा वृतांत दिला, की आज ऑफिसला सारे कसे तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ चालू होते. तिनेच मग सकाळच्या फोटोचा विषय काढला. म्हणाली, छानच आलाय, उगाच ती दाढी वाढवतोस, कॉलेजगोईंग स्टुंडट वाटतोयस फोटोत. माझी सर्वात आवडती कॉम्प्लीमेंट, न मागता समोरून आली. छाती दोन इंच पुढे अन पाय चार ईंच हवेत. पुढचे चारचौघांत सांगण्यासारखे नसते, पण स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

बस्स आता इथे एखाद्याने विचारावे, अभ्या तो फोटो तर दाखव, म्हणजे सुखाचे एक वर्तुळ पुर्ण होईल !

.
.
.

१ जुन २०१३

पाच दिवस ऑफिसमध्ये, बसून बसून राबल्यावर, येणारा सुट्टीचा शनिवार हल्ली बेडरूममध्ये झोपण्यातच जातो. आज मात्र आम्ही दिवाणखान्यावर कब्जा केला.. आईवडील कोण्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले असल्याने संध्याकाळपर्यंत घरावर आम्हा दोघांचेच राज्य होते.. मिळून बनवलेले ब्रेडबटर, कडक चहाच्या साथीने अन टीव्हीवर बारा वाजताचा मॅटीनी शो - दिल तो पागल है. कित्येक वर्षांनी, कितव्यांदा ते आता आठवत नाही.. तसा वरचेवर लागत असतोच, पण आज चॅनेल बदलून पुढे जावेसे वाटले नाही. ना बायकोने तो हट्ट धरला.. काही सिनेमे काही ठराविक वेळीच बघण्यात मजा असते. हा त्यापैकीच एक, अन आज तश्यातलीच वेळ.. पुन्हा एकदा शाहरुखच्या प्रेमात पडलो. माधुरीच्या तर सदैव होतोच.. कोई लडकी है, जब वो हसती है.. गाणे सुरू झाले अन पायाने सहज ठेका धरला. तसा तो नेहमीच धरतो, पण आज अख्खा हॉल मोकळा मिळाला होता.. अचानक अंगातला शाहरुख बाहेर आला अन बघता बघता सहज ठेक्याचे रुपांतर नाचात झाले.. हे ही वरचेवर होतेच, पण आज सोने पे सुहागा म्हणजे बायकोनेही साथ दिली.. गाणे संपले अन जाहीरात लागली, पण मूड बदलू द्यायचा नव्हता. चॅनेल चेंज केला तर एक लडकी भिगी भागीसी.. शाहरुखचा किशोर कुमार व्हायला कितीसा वेळ लागणार होता. पुढच्या पाचदहा मिनिटांत रणबीर कपूरही येऊन गेला.. त्याच तालावर खुंटीवरचे टॉवेल खेचून बायकोने बाथरूममध्ये पिटाळले.. नच बलिये संपले अन सारेगामापा सुरू झाले.. फुल जोश अन फुल्ल फॉर्मात.. स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.

३ जुन २०१३

आज संध्याकाळी नेहमीसारखे वाशी स्टेशनवर बायकोला पिकअप केले अन ट्रेन पकडली.. ठरलेली ट्रेन अन ठरलेली जागा.. रिकामे कंपार्टमेट अन खिडकीतला वारा.. पण आज वार्‍याबरोबर पावसाचे तुषारही चेहर्‍यावर थुडथुडत होते.. खिडकीसाठी आपसात भांडून झाल्यावर.. अन भांडणात नेहमीसारखेच हरल्यावर, मी मुकाट दारावर उभा राहायला गेलो.. वाशी खाडीच्या पूलावरून धडधडत जाणारी ट्रेन, अन दोन्ही बाजूला पसरलेला गोलाकार समुद्र.. नेहमीची निश्चलता विसरून पार खवळून उठला होता.. खिडकीतून त्याचे रौद्र रुप डोळ्यात सामावणे अशक्यच, म्हणून बायकोही उठून दारावर आली अन मला हरलेल्या भांडणातही जिंकल्यासारखे झाले.. वार्‍यावर भुरभुरणारे तिचे कुरळे केस, त्यांना सांभाळू की स्वताला सांभाळू.. एस्सेलवर्ल्डची राईडही झक मारेल, अशी ही आमची मुंबई लोकल ट्रेन.. आता तीनचार महिने रोजच नशिबी असणार आहे.. स्साले सुख म्हणजे आणखी असते काय..

.
.
.

५ जुन २०१३

काल संध्याकाळी पुन्हा पावसाने गाठले.. या मोसमातील हा तिसरा पाऊस.. की चौथा.. काय फरक पडतो.. पहिल्या दुसर्‍यातील नवलाई तशीही ओसरली होतीच.. ट्रेनमध्ये होतो तोपर्यंत काही वाटले नाही, पण स्टेशन जवळ येऊ लागले तसे कपाळावर चिंतेची एक लकेर उमटली.. तेच कपाळ जाळीच्या खिडकीला टेकवून वर आकाशावर नजर टाकली.. काळवंडलेल्या प्रतलाकडे पाहून काही समजत नसले तरी तोंडावर झालेल्या टपोर्‍या थेंबांचा मारा हवे ते सांगून गेला.. डॉकयार्ड आले तरी पावसाचा जोर काही ओसरला नव्हता.. पहिल्या पावसात भिजण्याच्या आनंदात छत्री शोधायचे नेहमीच राहून जाते.. अन मग दुसरा पाऊस असा खिंडीत पकडतो.. एका हाताने पॅंट आणि एका हाताने बायकोला सांभाळत, उतरणीच्या जिन्याने स्टेशनबाहेर पडलो खरे, पण इथून खरा प्रश्न सुरु होत होता ते चिखलपाण्याचा रस्ता तुडवत घरी जायचे कसे. टॅक्सीचे डबल भाडे देण्याची तयारी असूनही ती मिळणार नव्हतीच, नशीब तेवढे चांगले की मुसळधार पावसाची जागा रिमझिम बुंदाबांदीने घेतली होती. मनाचा ठिय्या करून चालायला सुरुवात केली, तो इतक्यात फोन खणखणला.. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. अभि'ज मॉम कॉलिंग.. येताना दूध आणि हार घेऊन यायचा आदेश.. आता बाहेरून फिरून जावे लागणार म्हणून बायकोची चिडचिड.. पण माझे विचार मात्र आता बदलले होते, असेही कमीजास्त भिजणारच आहोत तर का नाही पुर्णच भिजण्याचा आनंद घेत जावे.. तोच रस्ता अन तोच पाऊस, बघण्याची नजर बदलली अन वेगळाच भासू लागला.. दोनचार पावले चपचप करून पाय आपटत काय चाललो., मुद्दामच., अन चिखलाचेही अप्रूप वाटेनासे झाले.. बायको मात्र अजूनही वेगळ्याच ट्रॅकवर चालत होती.. समांतर असूनही न मिळणारा.. खेचूनच तिला भटाच्या टपरीवर नेले.. उकाळ्याचा तो वास, अन सैरावैरा सुटलेली वाफ., भिजलेल्या गर्दीतही उत्साह पेरायची किमया करून जात होती.. हिचाही मूड बदलला नसता तर नवलच.. दोन हातात दोन कटींग, गर्दीतून वाट काढत मी.. फूटपाथकडेच्या झाडाचा आडोसा पकडला. पावसाची रिपझिप थांबली होती मात्र हवेने गारवा पकडला होता.. अगदी रोमँटिक की काय म्हणतात तसले वातावरण., बस ती आणि मी.. सोबतीला होते ते झाडावरून ओघळणारे अन चहाच्या पेल्यात विरघळणारे, पावसाचे टपोरे थेंब.. पाण्यात विरघळणारी ती आणि तिच्यात विरघळणारा मी.. स्साले सुख म्हणजे आणखी काय असते..

.
.
.
- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच रे,दृष्ट लागेल (ह्या वर्णनानंतर मुद्दाम मुंबईत पावसात लोकलच्या दारात नवर्‍यासहं प्रवासाचे खुळे डोहाळे लागले तर... तर भेटशील तेव्हा धपाटे घालेन Happy )
मस्तंच

मस्तच लिहिलेस रे.... दृष्ट लागण्यासारखच , पण आपल्या माणसांची दृष्ट नाही लागत. सो काळजी नको.
Happy
अरे एक राहीलच..अभ्या तो फोटो तर दाखव ना....अपलोड करच...

आजकालच्या, 'पैसा म्हणजे सुख विकत घेण्याचे साधन, अधिक पैसा म्हणजे अधिक सुख' अशी विचारसरणी असणार्‍या काळात, रोजच्याच दैनंदिन जीवनातले असे पैशांशी संबंधित नसलेले सुखाचे क्षण टिपण्याची सवय भावली.

खरोखरच, सुख म्हणजे अशा क्षणांमधला आनंद टिपण्याची / लुट्ण्याची क्षमता (जी बालपणी आपल्या सगळ्यांमधेच असते) मोठेपणीही अबाधित / शाबूत ठेवणे.

लिखाणाबद्दल धन्यवाद...

मस्त लिहिलंस रे अभिषेक .....

असेच सुखाचे कण कण टिपत रहा व इथे टाकत रहा ..... लगे रहो ....

सर्व प्रतिसादांचे आभार
वि.प., नि.द. बद्दल आभार

खरे तरे हे माझे या आठवड्यातील फेसबूक शेअर होते, तिथल्या मित्रांना आवडले तर इथल्या मित्रांशीही शेअर करूया म्हणून संकलित करून टाकले..

दाद ___ जर भिजायची इच्छा असेल तर लोकलच्या दारात उभे राहून भिजण्यासारखे सुख नाही, जोडीदार तर आता मिळाला अन्यथा शाळेपासून मी एकटा असलो तरी असा एकही मौका जाऊ द्यायचो नाही.. त्यामुळे धपाटा घाला मला.. पण संधी मिळालीच तर मिसवू नका.. Happy

सामी ___ @ "द्रुष्ट लागणे" मी सुद्धा "आपल्या माणसांची द्रुष्ट लागत नाही" असाच एखादा सेंटी डायलॉग मारणार होतो, टायपायचा त्रास कमी केल्याबद्दल धन्यवाद.... अन विशेष धन्यवाद फोटोच्या फर्माईशीबद्दल.. खरे तर हे लिखाण फेसबूक स्टेटस असल्याने ते तसे वाक्य टाकले होते, पण आता इथे तू बोलतच आहेस तर ठिकाय, टाकतो आज रात्रीच.. Wink
बाकी हा त्याच आपल्या चुकलेल्या भेटीच्या दिवशी काढलेला फोटो आहे.. त्यामुळे फोटोतले रुप त्या दिवशी पाहिले तेच.

हर्पेन___ खरंय, पैसा अन सुख यांचा आपसात काही संबंध नसतो, आपल्या आवडीच्या माणसांबरोबर व्यतीत केलेले क्षण अशीच साधीसोपी व्याख्या असते सुखाची.

लंपन___ "काहीतरी नवीन" हे माझ्यासाठी नवीनच आहे, म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतोय, माझा ब्लॉग नाही तो..

mast

bha po

Happy

for a change, pahilyandach KRAMASH: awadalay. ata pawasalabharach navhe tar nehamich adhun madhun as lihit ja Happy

बाहेर फुल्ल पाऊस...पुर्ण भिजलेलो..... हातात तंदूरी... समोर टिव्ही वर मॅच.... समोस सिझलर्स... आणि गोल्ड लेबल...

हे देखील सुख... Happy

खूपच छान लिहिता तुम्ही अभिषेक .अगदी तरल , काव्यात्मक आणि रोमँटिक. साधंसोपं आणि भिडणारं.
वर्षाची डायरी च करून टाका आता.

<बाहेर फुल्ल पाऊस...पुर्ण भिजलेलो..... हातात तंदूरी... समोर टिव्ही वर मॅच.... समोर सिझलर्स... आणि गोल्ड लेबल...>> + १००

Pages