आईला उद्योजिका व्हायचंय..

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:49

udyojika%20aai2.jpg

आपले शिक्षण, आपल्या अंगी असणारे कलागुण, कौशल्ये ह्यांना वाव मिळावा, त्यांच्या योगे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, सक्षम व्हावे असे अनेक जणींच्या मनात असते. परंतु घरगुती जबाबदार्‍या, बालसंगोपन किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडून पूर्ण वेळाची नोकरी/व्यवसाय करणे मात्र शक्य नसते. स्वतःमधील क्षमता, कौशल्ये माहीत असतात. घरबसल्या "काहीतरी" करायचंय ही ऊर्मी सतत अस्वस्थ करत असते. पण हे "काहीतरी" कुठून आणि कसे सुरू करावे ह्याबद्दल मात्र मन साशंक असते.

आपल्या मायबोलीकरांपैकी बरेच जण प्रथितयश व्यावसायिक/उद्योजक/उद्योजिका आहेत तर काही लघु उद्योजक/उद्योजिका आहेत. खालील प्रश्नावलीच्या आधारे ज्या आयांना अशा प्रकारे उद्योग/ व्यवसाय सुरू करायची इच्छा असेल त्यांना आपले अनुभवी मार्गदर्शन लाभावे, त्यांच्या शंकांचे निरसन होऊन प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

तेव्हा ह्या उगवत्या उद्योजिकांना आत्मविश्वासाने नवीन सुरुवात करण्यासाठी मदत कराल ना!

आपल्या व्यावसायिक अनुभवाच्या अनुषंगाने आपण खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का?

design.jpg

१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?

२. कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?

३. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल कुठल्या मार्गांनी उभारता येते? कुठले पर्याय उपलब्ध असतात? त्यासाठी सामान्यतः कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? कमीत कमी भांडवल उपलब्ध असताना देखील कोणकोणते व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत?

४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?

५. सध्या कोणते व्यवसाय/उद्योग चलतीचे आहेत किंवा खूप मागणीचे आहेत, जे घरगुती स्वरूपात करता येऊ शकतात?

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?

१०. या विषयावरील अतिरिक्त माहितीचे स्रोत.

११. अन्य काही सल्ले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

गेली अनेक वर्ष व्यवसाय करत असल्याने खालील माहिती माझ्या अनुभवाप्रमाणे जशी सुचेल तशी लिहिली आहे. येत्या दोन दिवसात वेळ झाल्यास आणि वाचकांना इंटरेस्ट वाटल्यास आणखी लिहिन.

१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?

घरगुती स्वरुपात नवा उद्योग सुरू करतांना पहिले आपले गोल काय आहे हे निश्चित करावे. म्हणजे आपण हा व्यवसाय सुरू करणार आहोत त्यात नक्की कुठल्या लेवल पर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे हे आधी नक्की करावे. साधारण पहिले गोल ६ महिन्यासाठीचे दुसरे १ वर्षाचे आणि तिसरे ३ ते ५ वर्षाचे असा कालावधी ठेवता येऊ शकेल. ज्यात पहिल्या सहा महिन्यात , व्यवसायात गुंतवलेले भांडवल, सुरुवातीचे बिझनेस सेटअप साठी लागणारे विविध प्रकारचे खर्च आणि त्या तुलनेत झालेली विक्री याचा आढावा घेता येईल या सहा महिन्यात व्यवसायात होत असलेली विक्री पाहून पुढील १ वर्षाचे (वाढीव विक्रीचे) गोल ठरवता येईल व त्या साठीच्या उपाययोजनांचा विचार करून त्यात अमलात आणता येतील.
उदा : समजा एखाद्या उद्योजिकेला आपण डिझाईन केलेल्या कपड्यांची विक्री करायची आहे आणि त्याचे अल्टिमेट गोल हे आपले स्वत़:चे बुटीक असावे असे तिला वाटत असेल तर
त्यात सुरूवातीला ६ महिने ती वेगवेगळ्या प्रदर्शनांमधून भाग घेवू शकते अथवा एखाद्या दुसर्‍याच्या स्टोअर/बुटीक मधे कपडे विक्रीला ठेवू शकते. ज्यातून आपले प्रॉडक्ट लोकांना कितपत आवडते आहे, आपल्याला हव्या असलेल्या किंमतीत ते विकल्या जाते का आणि आपले सर्व खर्च वजा जाऊन जो फायदा झाला तो आपली मेहनत, त्या विषयातली अक्कल, कल्पकता आणि वेळ यासाठी वर्थ आहे का? याचा अंदाज येईल.
या सहा महिन्यांच्या अनुभवातून पुढील एक वर्षासाठीची आणि तीन किंवा पाच वर्षांची योजना तयार करता येईल.

कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?

बाजारपेठेचा अभ्यास करणे अतिशय महत्वाचे वाटते. म्हणजे आपण व्यवसाय करणार असलेल्या भागात आपले प्रॉडक्ट विकले जाईल का आणि ते कुठल्या दर्जाचे असल्यास जास्त चालेल याचा अंदाज घेतलाच पाहीजे. सगळ्या प्रकारच्या दर्जांसाठी ग्राहक असतातच. आपल्याला कुठल्या दर्जाचे काम करायचे आहे हे आपल्यालाही ठरवावे लागेल आणि त्याप्रमाणे त्या दर्जाच्या प्रॉडक्ट साठी त्या भागात व्यवसाय करावा लागेल. उदा: आपण डिझाईन करत असलेले कपडे आणि त्याच्या किंमती जर का मध्यमवर्गीय लोकांच्या पसंतीस उतरतील असे आपल्याला वाटते तर प्रदर्शनात भाग घेतांना मध्यमवर्गीय लोक राहतात अशा भागात होणार्‍या प्रदर्शनात भाग घेणे/त्या भागातल्या बुटीकला अप्रोच होणे जास्त योग्य राहील.


४. आपल्या व्यवसायासंबंधीचे सरकारी नियम, कायदेशीर अटी व पूर्तता यांची अधिकृत माहिती कोठे मिळते? यासंबंधी कोणाचे मार्गदर्शन घ्यावे?
चार्टर्ड अकाऊंटंट, वकिल हे लोक ही माहिती देऊ शकतात. आपण करणार असलेल्या व्यवसायाशी संबंधीत सरकारी खात्याच्या वेबसाईट वर पण काही माहिती मिळू शकते.

५. सध्या कोणते व्यवसाय/उद्योग चलतीचे आहेत किंवा खूप मागणीचे आहेत, जे घरगुती स्वरूपात करता येऊ शकतात?
कुठलाही व्यवसाय डोकं आणि मेहनत लावून केला तर चलतीचा असू शकतो असं मला वाटतं पण तरी नवनविन तत्रज्ञानामुळे कधी कधी अचानक एखादी प्रॉडक्ट्/सेवा यांची गरज संपून जाते तेव्हा याचाही अंदाज घ्यायलाच हवा. मला सध्या सुचत असलेले घरगुती स्वरुपात सुरूवात करता येतील (आणि मग पुढे वाढवता पण येतील) असे व्यवसाय -

(यातले काही खूप कॉमन आहेत याची कल्पना आहे पण तरी इथे यादीत असणे आवश्यक वाटले म्हणून लिहिले आहेत.)

फूड -
१. खाद्यपदार्थ तयार करून विकणे (कायम चलती असते..चव चांगली असल्यास खूप चालणारा व्यवसाय.. अंगमेहनत आणि वेळ भरपूर द्यावा लागतो.)
२. लहान कार्यक्रमांचे केटरींग काँट्रॅक्ट घेणे (सहसा १० ते ५० जणांच्या कार्यक्रमांचे काँट्रॅक्ट घ्यायला जास्त लोक तयार नसतात. )
३. होममेड चॉकलेट्स बनवणे (कॉरपोरेट्स कडून दिवाळी, नविन वर्ष वगैरेंच्या वेळी भरपूर बिझनेस मिळू शकतो. सुरूवातीला स्वत:चे दुकान नसल्यास बिझिनेस सिझनल स्वरुपात पण करता येऊ शकतो.)

फॅशन -
१. स्वत़: डिझाईन/वर्क केलेले कपडे, साड्या वगैरे विकणे
२. ज्वेलरी मेकींग.
३. आपल्यात हे आर्टिस्ट स्कील नसल्यास होलसेल मधे विकत आणून घरगुती स्वरुपात विकणे.
४. कॉस्मेटीक्स (शॅम्पू साबण सारखे) तयार करून विकणे.
५. भरतकामाचे मशीन विकत आणून कंप्युटराइझ्ड एम्ब्रॉयडरी

लाईफस्टाईल-
१.हस्तकलेच्या वस्तू बनवून विकणे. यात शिवणकाम विणकाम इतकेच नाही तर अगदी लोखंड, स्टील, प्लाय, लाकूड वगैरे वापरून मोठमोठी म्युरल्स वगैरे पण बनवून विकता येतात. (ग्राहक : हॉटेल्स, इंटिरियर डिझायनर्स ई.)
२. वेगवेगळी मटेरियल्स वापरून रांगोळ्या (!) बनवणे. कुठल्याही लहानमोठ्या कार्यक्रमाला या शोभा वाढवीतात आणि बायकांना रांगोळ्या घालत बसायला हल्ली अजिबात वेळ नसतो.
३. पेपरबॅग्स बनवणे तसेच इतर सुशोभीत पॅकेजींग (लग्न समारंभात खासकरून उत्तर भारतीयांना लग्नांमधे आहेराची देवाणघेवाण करायला अशा गोष्टि भरपूर लागतात.)
४. फ्लोरिस्ट - पुष्परचना करून त्या निरनिराळ्या हॉटेल्स, रेस्त्रॉ इ ना पुरवणे. तसेच समारंभ लग्नकार्य इ साठी जे फुलांचे डेकोरेशन लागते ते करून देणे. (याचे ६-८ महिन्यांचे कोर्सेस असतात.)

इतर काही सेवा पुरवण्यासंबंधीत व्यवसाय
(क्रं १ आणि २ यांना व्यवसाय म्हणता येईल का? हे मला माहित नाही)
१. ज्योतिषी बनणे (शुन्य भांडवल लागेल.)
२. पौरोहित्य
३. इव्हेंट मॅनेजमेंट चा कोर्स शिकून लहानमोठे कार्यक्रम मॅनेज करणे
४. सोसायटी अथवा फ्लॅटच्या वर ज्या पाण्याच्या टाक्या असतात त्यांची साफसफाई करून देणे
५. वेगवेगळ्या प्रकारच्या हाऊसकिपींग सर्विसेस. फ्लोअर क्लिनींग, ग्लास क्लिनींग, ई. (याचे हॉटेल्स, कॉर्पोरेट् ऑफिसेस, ब्युटी सलून्स ई लोकांशी वार्षि़क टायअप करता येईल.)
६. परदेशातील डे केअर प्रमाणे सर्व सोयी सुविधांनी युक्त डे केअर सेंटर.( जे हाय इनकम ग्रुप असलेल्या पालकांना टारगेट ठेवून बनवलेले असेल.) माझ्या माहितीत अशी दोन सेंटर्स आहेत जिथे ७००० ते १२००० महिना प्रत्येक मुलामागे घेतात.

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?
आपल्या कुवतीत असेल तर जास्तीत जास्त उपयोग करावा. कशा प्रकारे करून घेता येतो हे प्रत्येक व्यवसायाप्रमाणे उत्तर बदलेल.

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?

घरगुती स्वरुपात सुरुवातीला व्यवसाय असेल तेव्हा बोलायला अजिबात लाजू नका. सुरुवातीला तरी जिथे जाल तिथे आपण कुठला व्यवसाय सुरू केला आहे ते जरूर सांगा. घरगुती व्यवसायामधे (किंवा एरवीही) माऊथ टू माऊथ पब्लिसिटी फार महत्वाची असते. (अनेकदा आपण आपल्या ओळखीच्यांचे अनुभव वगैरे लक्षात घेवून त्यांनी चांगला रिव्ह्यु दिला म्हणून मग तेच प्रॉडक्ट विकत घेत असतो. )
मुद्दाम म्हणून महिला मंडळ, किटी पार्टी, एखादा क्लब वगैरे जॉईन करावे त्यामुळे सुद्धा अनेक कॉन्टॅक्ट्स निर्माण होतात.
एका ठरावीक लेवल नंतर वेगवेग्ळ्या माध्यमांतून जाहिरात करणे सुद्धा महत्वाचे आहे. व्यवसायाचे स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रमाणे आपल्या टार्गेट ग्राहका पर्यंत पोहचू अशा माध्यमांची निवड करावी आणि जाहिराती साठी सुद्धा वर्षभरासाठीचे एक बजेट आखावे.

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?
प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. समजा ते आपण घेतले नसल्यास आपण जो व्यवसाय करणार तो व्यवसाय करणार्‍या ठिकाणी काम करण्याचा अनुभव तरी हवाच.


११. अन्य काही सल्ले.

अ.) .व्यवसाय करत असतांना कधी कधी आपल्या तत्वांना मुरड घालावी लागते. क्वचित असे करावे लागल्यास तसे करण्याची तयारी असावी.
ब). मी लग्नातल्या आहेरासाठी द्यायच्या सुशोभीत वस्तूंचा व्यवसाय करते म्हणजे मी हुंडा पद्धतीला सपोर्ट करते वगैरे मुर्खासारखे विचार करण्यात वेळ घालवू नये..तो वेळ आणि डोके आपला व्यवसाय कसा वाढेल यात घालवावा Wink
क.)रिस्क घेणे हाही बिझनेसचा एक पार्ट आहे आणि रिस्क घेऊन मग नुकसान झाले तर ते आपल्या आवाक्यातले वाटत असल्यास रिस्क घेण्यास मागेपुढे बघू नये.

HH अतिशय सुरेख पोस्ट. सगळ्या प्रश्नांची मुद्देसूद , विस्तृत उत्तरे दिली आहेत. तुमच्याकडून अजून पोस्ट्स नक्कीच वाचायला आवडतील.

HH खूप उपयोगी आहे तुमची पोस्ट. सगळे मुद्दे अगदी स्पष्ट होतात तुमच्या पोस्ट मध्ये.
तुमच्याकडून अजून वाचायला नक्कीच आवडेल.

हह, सुंदर! तुमच्या व्यवसायातील पहिले ६ महिने बद्दल प्लीज लिहाल का? (आधी कुठे लिहील असल्यास लिंक द्या)

छान प्रश्नं आहेत आणि ह ह ने उत्तरं छान दिलियेत.
मला सध्या या प्रश्नाच्या उत्तराबद्दल लिहायला आवडेल !
( माझं उत्तर सगळ्या प्रकारच्या बिजनेस ओनर्स ना फिट बसेल कि नाहे एमाहित नाही पण हे शेअर करावसं वाटतय).

६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक प्रगतीसाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?
(माझ्या स्मॉल बिजनेस अनुभवा प्रमाणे) , काँपिटिशन च्या जमान्यात जर सहज उपलब्ध असलेल्या आधुनिक टेक्नॉलॉजीने स्वतःच्या मार्केटिंग स्किल्स अपडेट करत नसाल तर तुम्ही आउटडेटेड समजले जाता, don't let that happen !

स्मार्ट फोन्स वरून सहज आणि झटपट मॅनेज करता येतात अशा खालील मार्केटिंग टुल्स चा वापर तुमच्या बिजनेस प्रमोशन साठी जरुर करावा :

Facebook business page
Twitter
Instagram
yelp
Blog
Flickr
tumblr
website
Your own youtube channel showing videos of your work.
Google places and google search results वर फस्ट पेज वर तुमच्या सरव्हिस चे रिझल्ट्स दिसणे, त्यासाठी SEO बद्दल माहिती करून घेणे.

जर पार्टी तुम्ही व्हेंडर असल तर abautfacesentertainment, partypop.com, gigmasters, gigsalad सारखी listings पण वापरावी.

फेसबुक-ट्विटर-इन्स्टाग्रॅम इ. ठिकाणी फॅन्स/लाइक्स्/फॉलोअर्स/सबस्क्यारबर्स कसे मिळावावेत, पोस्ट्स कशा प्रकारे टाकाव्या, टार्गेटेड ऑडियन्स लाफॅन्स मधे सर्वात पॉप्युलर कुठल्या प्रकारच्या पोस्ट्स होतात इ. शिकावे, यासाठी webinar पण उपलब्ध असतात.

' पिकस्टिच' सारख्या 'फोटो एडिटर अ‍ॅप्स' चा वापर पण आवश्य करा !
फोटो एडिटर अ‍ॅप्स मुळे तुमच्या कामाचे फोटो एडिटिंग, वॉटरामार्क टाकणे आणि लगेच सोशल नेटवर्किंग साइट्स वर टाकणे सहज आणि फास्ट शक्य होते !

In my honest opinion, service professional जितक्या तत्परतेनी कस्टमर्स ला उत्तरं-फीडबॅक देतात त्यालाही आजकालच्या जमान्यात तुम्ही ऑफर करणार्‍या सरव्हिस स्किल्स इतकच महत्त्व आहे, सो गेट स्मार्ट, गेट अपडेटेड विथ टेक्नॉलॉजि !
सवय नसेल तर सुरवातीला जरा कटकटीचं वाटेल पण जसजसे तुम्ही एक्स्प्लोअर कराल, तुम्ही एंजॉय कराल !
मधे एक छान फेसबुक स्टेटस पाहिलं होतं,

Technology is like a relationship, hard to understand in the beginning, you need to take efforts to understand it completely and once you do you start to enjoy it !

बाकी अगोनी नुकतीच मुलाखत घेतली होती त्यात बरच काही कव्हर झालं आहे म्हणून परत परत लिहित नाही.
तरी काही आठवलं तर नक्की लिहिन :).

क्या बात डीज्जे! छान पोस्ट.
>>Google places and google search results वर फस्ट पेज वर तुमच्या सरव्हिस चे रिझल्ट्स दिसणे, त्यासाठी SEO बद्दल माहिती करून घेणे.
SEO म्हणजे?

हह, डीजे, उत्तम पोस्ट.

कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?

>>> कुठलाही बिझनेस चालू करताना बाजारपेठेचा अभ्यास ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. आपण जो व्यवसाय करणार असू त्याला जर बाजारपेठेत मागणीच नसेल तर आपले उत्पादन कितीही उच्च दर्जाचे असले तरी त्याला ग्राहक मिळणे मुश्किल. आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य आणि सुविधांची मागणी ओळखण्यासाठी मार्केट आणि कन्ह्ज्युमर सर्वे अवश्य करायलाच हवा. यामधूनच भावी ग्राहक, पुरवठादार आणि स्पर्धक समजतात. कितीही मोठी कंपनी असली आणि तिच्या पदरी कितीही उच्चशिक्षित मार्केटिंग प्रोफेशनल्स असले तरी ती कंपनी अ‍ॅक्च्युअल ग्राहकांचा सर्वे केल्याशिवाय नवीन उत्पादन बाजारात आणायचा विचार करत नाही. यावरून छोट्या उद्योजकांनी ग्राहक सर्वेचे महत्त्व लक्षात घ्यावे.

जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा??
>>>> उद्योगाचे गोल आखतानाचा जाहिरात (योग्य शब्द मार्केटिंग असायला हवा इथे!) साठी बजेट आणि नक्की काय करणार हे प्लान करणे अपेक्षित. नंतर ग्राहकांचा प्रतिसाद जसा असेल तसा प्लान बदलत जाऊ शकतो. मार्केटिंगसाठी सर्वात आधी कमी खर्चाच्या मात्र जास्त इम्पॅक्ट देणार्‍या मार्केटिंग टूल्सचा विचार करावा, त्यानंतर मग पैसे देऊन करणार्‍या जाहिरातींचा. उद्योग थोडा स्थिरावल्यावर बीटीएल (बीलो द लाईन) मार्केटिंगचा विचार करता येऊ शकतो. मार्केटिंग संदर्भात वेळ असल्यास स्वत: अभ्यास करून मग निर्णय घ्यावेत अन्यथा मार्केटिंग प्रोफेशनल गाठावा. इतर लोक करत आहेत म्हणून आपणदेखील तसेच करण्यापेक्षा आपल्या उद्योगाला जास्त मदत कशाने मिळते याचा जास्त विचार करायला हवा. कधीकधी पैसे भरून केलेल्या जाहिरातीपेक्षाही फुकटात झालेली एक छोटीशी प्रसिद्धीदेखील उद्योगाला फार महत्त्वाची ठरते.

सोशल नेटवर्किंग साईट्स हे मार्केटिंगसाठी अगदी व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे. मात्र, या साईट्स तुम्ही तुमच्या उद्योगासाठी कशापद्धतीने वापरता यावर बरंच काही अवलंबून असतं. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे डीजेची वेबसाईट, फेसबूक पेज आणि तिथले तिचे अपडेट्स. दुसरं अजून एक उदाहरण म्हणजे ओन्लीपैठणी.कॉम

मार्केटिंग संदर्भातील अजून एक मायबोलीवरचे उदाहरण देतेय: दोन तीन वर्षापूर्वी दिवाळी फराळानिमित्त कुणीतरी खाज्याचे कानवले पाककृती लिहिली होती. त्यामधे झब्बू म्हणून एक फोटो टाकण्यात आला. फोटो पाहूनच कानवले किती अप्रतिम झाले आहेत ते दिसत होतं. मग लगेच आपण सर्वांनी हे कुणी केले याची चौकशी केली. उत्तरादाखल, हा त्या आयडीचा व्यवसाय असून पुण्यामधे हे कानवले घरपोच मिळतील वगैरे व्यावसायिक माहिती मिळाली. अगदी हजारो रूपये खर्चून वर्तमानपत्रातील जाहिरातींसाठी किती आयबॉल्स मिळाले असतील त्याहून जास्त या एका बीबीवर त्या आयडीला मिळाले!!! नंतर किती जणांनी त्या कानवल्यांची चौकशी केली आणि किती जणांनी ऑर्डर केली तो भाग अलाहिदा.

नेटवर्किंग हा दुसरा अजून एक विषय आहे. नेटवर्किंगमधे "बोलणार्‍याची बोरं विकतात, पण गप्प राहिल्याचे आंबे विकले जात नाहीत" हे आपण कायम ऐकतो. पण त्याचवेळेला बोरं विकणारा रूपयाची चार बोरं विकत असतो आणि आंबेवाला डझनाला तीनशे रूपये रेट लावत असतो हे आपण विसरतो. त्यामुळे बोरं विकणारा रस्त्यावर उभं राहून बोरं घ्या बोरं हे ओरडणारच. आंबेवाला कोपर्‍यात शांत बसून गिर्‍हाईकाची वाट बघणार. आणि गिर्‍हाईक चांगला आंबेवाला कुठे आहे ते शोधत आणी मागच्या वेळेला या आंबेवाल्याकडे उत्तम आंबे मिळाले असतील तर शोधत शोधत इथवर येणार. मतितार्थ असा की, तुमचा उद्योग नक्की कुठल्या ग्राहकांसाठी आहे हे एकदा स्पष्ट झालं की उद्योगासाठी नेटवर्किंग कुठे करायचं हे स्पष्ट होत जातं. त्याहीसाठी, आधी कुठे बोलायचं आणि किती बोलायचं याचं तारतम्य बाळगायलाच हवं. समजा, तुमचा लग्नासाठी लाडू-पेढे पुरवण्याचा व्यवसाय आहे, अशावेळेला तुम्ही एखाद्या ओळखीच्या ऐन लग्नाच्या दिवशी मांडवात जाऊन "अहो, मी हे काम करते हो" असे जाऊन सांगण्यामधे काहीच पॉइंट नाही, कारण त्यांची लाडू खरेदी ऑलरेडी झालेली असणार आणि लगीनघाईमधे कुणाला ऐकायला वेळ नसणार. हेच जर का तुम्ही ते तुमच्या घरी आमंत्रण द्यायला आलेले अस्ताना तुम॑चे लाडू त्यांना खायला देऊन तुमच्या व्यवसायाची कल्पना दिलीत तर त्याचा ईफेक्ट अधिक उत्तम. कारण जेव्हा ते लग्नाची आखणी करत असतील तेव्हा त्यांना तुमचे नाव पटकन आठवेल.

तूर्तात इतकेच. वेळ मिळाला की अजून अपडेट करेन.

मी software testing मध्ये नुकतेच freelancing सुरु केले आहे. त्यामुळे 'उद्योजिका' म्हणून या धाग्यावर लिहीणे माझ्यासाठी थोडे धाडसाचेच आहे. तरी 'अनुदोन' यांच्या प्रोत्साहनामुळे (संकोचून :)) इथे पोस्टत आहे.
मी पोस्ट करत असलेले अपडेट्स software Industryला related असले तरी काही गोष्टी लघु उद्योगांना in-general लागु होतीलसे वाटते.

१. घरगुती स्वरुपात एखादा नवा व्यवसाय/उद्योग सुरू करताना त्याची योजना कशी आखावी? लेखी आराखडा तयार करावा का? किती वर्षांसाठीचा आराखडा सुरुवातीस आखणे आवश्यक आहे?

हो, योजना फार महत्वाची. सर्वात आधी तुम्ही काय करू इच्छीता - product/service त्याचा विचार महत्वाचा. ते फायनल असले की तुमची या उद्योगासाठी काय काय करायची तयारी आहे हे measurable goals च्या स्वरूपात लिहून काढणे. e.g. Will devote 4 hours per day, will invest 80Lacs etc.
तसेच उद्योगाचा परतावादेखील measurable हवा. e.g. should recover 75% of investment by say 3 years time. etc.

२. कुठल्याही उद्योगास सुरुवात करताना बाजारपेठेचा अभ्यास ह्याला किती महत्त्व आहे? आपण पुरवीत असलेल्या वस्तू, कौशल्य किंवा सुविधांना बाजारात कितपत मागणी आहे हे कशा प्रकारे समजून येते? आपले भावी ग्राहक, पुरवठादार, बाजारपेठ आणि स्पर्धक कसे ओळखावेत करावेत?

Market खूप महत्वाचे. e.g. Software development/testing च्या freelancing साठी internetवर बरीच sites उपलब्ध आहेत. अश्या ठिकाणी कामाचे स्वरूप कळू शकते.

७. जाहिरात व नेटवर्किंगचा व्यवसायासाठी कशा प्रकारे वापर करावा?

या दिवसात स्वतःची वेबसाईट असणे फार उपयुक्त. त्यात तुमचे प्रोफाईल, अनुभव, कौशल्ये, आधी केलेल्या कामांची लिंक, references-recommondations ई. चा समावेश जरूर असावा. तसेच इतर डीजेच्या पोस्टमध्ये आलेल्या सोशल networking websites चा उपयोग करावा.

८. व्यवसायासंबंधी काही विशेष प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे का? त्याचा किती फायदा होतो? कोणकोणत्या क्षेत्रातील प्राथमिक माहिती किंवा ज्ञान असणे गरजेचे आहे?
हे तुमच्या व्यवसाय्/कामावर अवलंबून आहे. Software Testing/development साठी बरीच certifications उपलब्ध आहेत. तुमच्या कामाच्या depth नुसार तुम्ही हे certifications करू शकतात. पण certification निवडतांना सावधान! त्या गोष्टीचा तुमच्या व्यवसायाला जर येत्या वर्षात काही उपयोग असेल तरच ते निवडा. नाहीतर dont waste time & money.

९. नव्या उद्योग व्यवसायात कोणती पथ्ये पाळावीत? तसेच कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?

freelancing करतांना विषयीचा धागा मायबोलीवर आहेच. पण कुठल्याही व्यवसायासाठी dedicated time फार महत्वाचा. तसेच focus ही. मी हेही करेन, तेही करेन असे धोरण अवलंबल्यास kingfisher व्हायला वेळ लागणार नाही! तसेच घरून काम करत असल्यासही devotion महत्वाचे. घरी असल्यावरही Office time पाळणे महत्वाचे.

वरील उत्तरांना कोर्सेरावरील बिजिनेस रीलेटेड कोर्सचा आधार आहे. अश्या वेब्साईटस/कोर्सेसची माहिती दिल्याबद्दल मायबोली आणि संयुक्तांना खूप खूप धन्यवाद. ही पोस्ट त्या सर्व संयुक्तांना समर्पित! Happy

अजून कुणाला काही प्रश्न असल्यास जरूर संपर्क करा. या सर्व चर्चेचा 'आई'ला उपयोग व्हावा हीच सदीच्छा!
सर्व उपक्रमांबद्दल थँक यू संयुक्ता!

चांगली पोस्ट नंदु.

अन्य सल्ल्यांमध्ये, प्रोजेक्ट डेथ टाईमदेखील आराखडा आखतांना लक्षात घ्यावा. म्हणजे समजा तुमचा measurable goal असेल 60% revenue by mid septermber 2015 आणि तो achieve झाला नाही तर किती दिवसांनी हा व्यवसाय scrap कराल किंवा आणखी 'किती दिवस' आणि कुठले प्रयत्न कराल.

उत्तम माहिती. दादर वनिता समाज येथे दर महिन्याच्या दुसरया मंगळवारी मिनल मोहाडीकर आणि त्यांच्या सहकारी नवीन व्यवसाय सुरु करण्यासठी स्त्रियांना विनामूल्य मार्गदर्शन करतात असे ऐकण्यात आले आहे. इच्छुकांना चौकशी करता येइल.

संयुक्ता तर्फे मेल आली की मी ईथे काही सुचवावे.

सुरुवात खूप छान झाली आहे ईथे. खूप छान पोस्ट्स HH, दीपांजली ,चिन्नु आणि नंदु !

माझे काही मुद्दे :

ईतर काही व्यवसायांमध्ये "योग प्रशिक्षिका" हे मी जरुर सुचवेन. घरी जाऊन योगाभ्यास शिकवणे याला मुंबईत चांगलीच मागणी आहे. तासभराच्या सेशन साठी ५००-१००० रु. देखिल आकारले जातात. अर्थात यामध्ये काही सुरक्षितता बाळगुन हा व्यवसाय करावा लागेल.

कुठल्याही व्यवसायामध्ये आपले कौशल्य विकसित करत राहणे गरजेचे आहे. त्याकरीता लागणारे प्रशिक्षण घेणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. उत्पादन अथवा सेवाक्षेत्र असो, स्वतःला नियमित 'अपडेट' करत राहणे खूप मह्त्वाचे आणि गरजेचे आहे.

Goal should be SMART

S : Specific
M: Measureable
A: Acheivable
R: Realistic
T: Time Bound

आपल्या ध्येयाच्या दिशेने जाताना काय काय करावे लागेल याचा आराखडा आपल्यापाशी असणे आणि प्रत्येक टप्प्यावर पोचल्यावर त्या आराखड्याचा पुन्हा आढावा घेणे फार गरजेचे आहे. म्हणजे लढाईवर जाताना सैनिक जशी तयारी करतो, तशी तयारी व्यावसायिकाने केली पाहिजे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

सर्व संयुक्ताना शुभेच्छा!

Very nice n useful info given by you gals! Thanks a lott. Im sure this will definitely help me for pre school set up. Happy

या विषयावरील अतिरिक्त माहितीचे स्रोत व अन्य काही सल्ले.

१. http://www.mced.nic.in/map.aspx येथे महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेनॉर्शिप डेव्ह्लपमेंट तर्फे वरील बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. होम पेज वस बिझ्नेस ऑपॉरचुनिटीज वर खूप सारे उद्योग दिले आहेत.

२. सुरुवातीचे भांडवल ही थोडी कठीण गोष्ट आहे. पण घरगुती उद्योग असेल तर फार भांडवल लागत नाही.

३. कमिटमेंट खूप महात्त्वाची. मूल रडत आहे, घरातल्या म्हातार्‍या माणसाला अमुक-तमुक हवे आहे, नातेवाईक घरी आले इ. कारणे देऊन ग्राहकाचा खोळंबा करू नये. नोकरीपेक्षा जास्त कमिटमेंट स्व-रोजगारात लागते.

४. स्री म्हणून सहानुभूती मागू नये. त्यापेक्षा बाजारातील स्पर्धकांच्या स्प्र्धेत टिकून राहण्यासाठी सर्व कष्ट घ्यावेत. ग्राहकाने आपला माल / सेवा उत्तम आहे म्हणून घ्यावी. आपण 'गरजू' / 'स्त्री' / स्ट्रगलर आहोत म्हणून नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे. नाहीतर ग्राहक आप्ल्यावर उपकार केल्याची भावना बाळगतात व वेळ आल्यावर आपण त्या उपकाराची परतफेड करावी अशी अपेक्षा करतात हा एक अनुभव. (उदा. मी एवढी तिच्या साड्या खपवयाला मदत केली (म्हणजे १ किंवा २साड्या) पण तिनी मला एकही साडी फुकट दिली नाही.)

५. स्पर्धक कसे ओळखावेत? च्याणक्याच्या भाषेत सांगायचे तर सगळे स्पर्धकच असतात. त्यामुळे महत्त्वाची माहिती फुटू देऊ नये.

६. कोठे पैसे वाचवावेत व कोठे वाचवू नयेत?
क्वालिटी, संशोधन ( आर & डी), गाहकाचे समाधान, नोकरांचे पगार, नीट चालणारी वेब साईट यात पैसे वाचवू नयेत. उधारीवर वस्तू / सेवा देणे, वीज बिल, फोन बिल, पेट्रोल, अनावश्यक चहा / कॉफी / एंटरटेन्मेंट, अनावश्यक कच्चा माल साठवणे, यात पैसे वाचवावेत.

भ्रमा, SMART goals बद्दल अगदी अगदी.
सुस्मिता, छान पोस्ट. सगळेच मुद्दे छान. स्त्रीविषयक मुद्दा पटला.

Pages